मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    सार्थ ज्ञानेश्वरी

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सहावा

    ओवी १

    मग रायातें म्हणे संजयो।
    तोचि अभिप्रावो अवधारिजो।
    कृष्ण सांगती आतां जो।
    योगरूप॥६-१॥
    अर्थ: मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला – कृष्ण जो पाचव्या अध्यायात दाखवलेला योगरूप अभिप्राय अर्जुनाला सांगतील, तो ऐका.




    ओवी २

    सहजें ब्रह्मरसाचें पारणें।
    केलें अर्जुनालागीं नारायणें।
    कीं तेचि अवसरीं पाहुणे।
    पातलों आम्ही॥६-२॥
    अर्थ: श्रीकृष्णांनी अर्जुनास ब्रह्मज्ञानाचे पारणे केले, त्या समयी आम्ही सहजगत्या पाहुणे म्हणून प्राप्त झालो.




    ओवी ३

    कैसी दैवाची आगळिक नेणिजे।
    जैसें तान्हेलिया तोय सेविजे।
    कीं तेंचि चवी करूनि पाहिजे।
    तंव अमृत आहे॥६-३॥
    अर्थ: आमचे दैव किती थोर आहे हे कळत नाही. ज्याप्रमाणे तहानलेल्या पुरुषाने पाणी पिण्यास लागावे, तो त्यास ते पाणी नसून अमृत आहे असे समजावे.




    ओवी ४

    तैसें आम्हां तुम्हां जाहलें।
    जे आडमुठीं तत्त्व फावलें।
    तंव धृतराष्ट्रें म्हणितलें।
    हें न पुसों तूतें॥६-४॥
    अर्थ: तसे आम्हाला व तुम्हाला झाले आहे. कारण मिळण्याचा संभव नसतांना ब्रह्मज्ञान आपणास मिळाले आहे. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, "आम्ही तुला ही गोष्ट विचारीत नाही."




    ओवी ५

    तया संजया येणें बोलें।
    रायाचें हृदय चोजवलें।
    जें अवसरीं आहे घेतलें।
    कुमारांचिया॥६-५॥
    अर्थ: या बोलण्याने त्या संजयाला धृतराष्ट्राचे हृदय मुलांविषयीच्या स्नेहाने या वेळी घेरले आहे असे कळून आले.




    ओवी ६

    हें जाणोनि मनीं हांसिला।
    म्हणें म्हातारा मोहें नाशिला।
    एऱ्हवीं बोलु तरी भला जाहला।
    अवसरीं इये॥६-६॥
    अर्थ: हे लक्षात येऊन संजय मनात हसला व आपल्याशीच म्हणाला – "हा म्हातारा मोहाने अगदीच बिघडून गेला आहे. येर्‍हवी या वेळेला प्रतिपादन तर फार चांगले झाले आहे."



    ओवी ७

    परि तें तैसें कैसेनि होईल।
    जात्यंधु कैसें पाहेल।
    तेवींचि ये रुसें घेईल।
    म्हणौनि बिहे॥६-७॥
    अर्थ: पण ते तसे कसे होईल? (पण धृतराष्ट्राला हे प्रतिपादन गोड कसे लागणार?) जन्मांधाला उजाडेल कसे? त्यामुळे (ही गोष्ट धृतराष्ट्रास उघड सांगितली तर) तो मनात रोष ठेवील म्हणून संजय उघड बोलण्यास भ्यायला.





    ओवी ८

    परि आपण चित्तीं आपुला।
    निकियापरी संतोषला।
    जे तो संवादु फावला।
    कृष्णार्जुनांचा॥६-८॥
    अर्थ: पण तो मात्र आपल्याला कृष्ण व अर्जुन यांचा संवाद प्राप्त झाला म्हणून आपल्या मनात चांगल्या प्रकारे खूष झाला.




    ओवी ९

    तेणें आनंदाचेनि धालेपणें।
    साभिप्राय अंतःकरणें।
    आतां आदरेंसीं बोलणें।
    घडेल तया॥६-९॥
    अर्थ: त्या तृप्तीने श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अभिप्राय मनामधे घेऊन तो संजय धृतराष्ट्रास आदराने सांगता होईल.




    ओवी १०

    तो गीतेमाजी षष्ठींचा।
    प्रसंगु असे आयणीचा।
    जैसा क्षीरार्णवीं अमृताचा।
    निवाडु जाहला॥६-१०॥
    अर्थ: ते संजयाचे बोलणे हाच गीतेच्या सहाव्या अध्यायाचा प्रसंग आहे. व तो जाणण्यास चांगलीच बुद्धी पाहिजे, ज्याप्रमाणे क्षीरसमुद्रातून अमृताची निवड झाली.



    ओवी ११

    तैसें गीतार्थाचें सार। जें विवेकसिंधूचें पार।
    नाना योगविभवभांडार। उघडलें कां।
    अर्थ: हा सहावा अध्याय गीतेचे सार आहे. हा अध्याय विचाररूपी समुद्राचा पलिकडचा किनारा आहे. अथवा हा अध्याय म्हणजे अष्टांगयोगाच्या ऐश्वर्याचे खुले केलेले कोठारच होय.


    ओवी १२

    जें आदिप्रकृतीचें विसवणें। जें शब्दब्रह्मासि न बोलणें।
    जेथूनि गीतावल्लीचें ठाणें। प्ररोहो पावे।
    अर्थ: जो मूळ मायेचे विश्रांतीस्थान आहे, ज्याचे वर्णन करण्यास वेद समर्थ नाहीत व ज्यात गीतारूपी वेलीच्या अंकुराचे स्वरूप वाढीला लागलेले आहे.


    ओवी १३

    तो अध्यावो सहावा। वरि साहित्याचिया बरवा।
    सांगिजैल म्हणौनि परिसावा। चित्त देउनी।
    अर्थ: असा हा सहावा अध्याय असून त्यावर तो अलंकाराने सजवून सांगितला जाईल म्हणून लक्ष देऊन ऐकावा.


    ओवी १४

    माझा मराठाचि बोलु कौतुकें। परि अमृतातेंही पैजां जिंके।
    ऐसीं अक्षरें रसिकें। मेळवीन।
    अर्थ: माझे हे प्रतिपादन मराठी आहे खरं पण अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकेल, अशा तर्‍हेची रसभरित शब्दरचना मी करीन.


    ओवी १५

    जिये कोंवळिकेचेनि पाडें। दिसती नादींचें रंग थोडे।
    वेधें परिमळाचें बीक मोडे। जयाचेनि।
    अर्थ: ज्या माझ्या अक्षरांच्या अरुवारपणाचे मानाने पाहिले असता, सुस्वरांचे निरनिराळे प्रकार कमी योग्यतेचे दिसतील व ज्या अक्षरांचा चित्ताकर्षकपणा सुवासाचे बल नाहीसे करील.


    ओवी १६

    ऐका रसाळपणाचिया लोभा। कीं श्रवणींचि होति जिभा।
    बोले इंद्रियां लागे कळंभा। एकमेकां।
    अर्थ: ऐका, रसाळपणाच्या लोभाने कानास जिभा उत्पन्न होतील व माझ्या शब्दांच्या योगाने इंद्रियांमधे परस्परांत भांडण लागेल.


    ओवी १७

    सहजें शब्दु तरी विषो श्रवणाचा। परि रसना म्हणे हा रसु आमुचा।
    घ्राणासि भावो जाय परिमळाचा। हा तोचि होईल।
    अर्थ: सहज विचार करून पाहिले तर शब्द हा केवळ कानांचा विषय आहे. परंतु जिव्हा म्हणेल हा शब्द माझा रसविषय आहे, नाकाला असे वाटेल की या शब्दाच्या योगाने मला सुवास मिळावा तर तो शब्दच अनुक्रमे रस व सुवास होईल.


    ओवी १८

    नवल बोलतीये रेखेची वाहणी। देखतां डोळयांही पुरों लागे धणी।
    ते म्हणती उघडली खाणी। रूपाची हे।
    अर्थ: या बोलण्याच्या मर्यादेची पद्धत आश्चर्यकारक आहे. ही पाहिली असता डोळ्यांनाही तृप्ती मिळू लागेल व ते म्हणतील, ‘हे आम्हाला रूपविषयाचे कोठारच उघडले आहे.’


    ओवी १९

    जेथ संपूर्ण पद उभारे। तेथ मनचि धांवे बाहिरें।
    बोलु भुजाही आविष्करें। आलिंगावया।
    अर्थ: संपूर्ण पद जेथे पूर्ण होईल तेथे त्याच्या भेटीकरता अंत:करण बाहेर धाव घेईल व शब्दाला आलिंगन देण्यास बाहूही पुढे सरसावतील.


    ओवी २०

    ऐशीं इंद्रियें आपुलालिया भावीं। झोंबती परि तो सरिसेपणेंचि बुझावी।
    जैसा एकला जग चेववी। सहस्त्रकरु।
    अर्थ: याप्रमाणे इंद्रिये आपापल्या इच्छेप्रमाणे माझ्या शब्दाला लगट करतील, पण तो शब्द सर्वांचे सारखे समाधान करेल. ज्याप्रमाणे सूर्य एकटाच सर्व जगाला जागे करतो.



    ओवी २१

    तैसें शब्दाचें व्यापकपण। देखिजे असाधारण।
    पाहातयां भावज्ञां फावती गुण। चिंतामणीचे।
    अर्थ: शब्दाचे व्यापकपण असामान्य आहे, याचा विचार करता, अभिप्राय जाणणार्‍याला यात चिंतामणीसारखे गुण दिसतात.




    ओवी २२

    हे राहू द्या, असे शब्द हीच कोणी चांगली ताटे व त्यात मोक्षरूप पक्वान्ने वाढली आहेत। अशी ही ग्रंथरचनारूपी मेजवानी मी निष्काम संतांना केली आहे।
    अर्थ: या बोलांमध्ये मोक्षरूप पक्वान्नांची वाढलेली चांगली ताटे आहेत, आणि ही मेजवानी निष्काम संतांसाठी तयार केली आहे.




    ओवी २३

    आता नित्य नवा आत्मप्रकाश हीच कोणी ठाणदिवी करून, जो इंद्रियांना न कळता उपभोग घेतो त्यालाच कैवल्यरूप पक्वान्नांचा लाभ होतो।
    अर्थ: जो नित्य नवा आत्मप्रकाश इंद्रियांना न कळता उपभोगतो, त्यालाच कैवल्यरूप पक्वान्नांचा लाभ मिळतो.




    ओवी २४

    या मेजवानीकरता श्रोत्यांना श्रवणेंद्रियांचा पंगिस्तपणा टाकावयास पाहिजे। ही मेजवानी मनाच्या अंतर्मुखतेने भोगावयाची आहे।
    अर्थ: या मेजवानीसाठी श्रोत्यांनी श्रवणेंद्रियांचा पंगिस्तपणा सोडावा लागेल, कारण ही मेजवानी अंतर्मुखतेने भोगावी लागेल.




    ओवी २५

    वरवर असलेली शब्दरूपी गवसणी काढून आत अर्थरूपी ब्रह्म आहे, त्याच्यशी तद्रूप व्हावे, नंतर सुखामधेच सुखाने रंगून जावे।
    अर्थ: शब्दांची गवसणी काढून आत अर्थरूपी ब्रह्म आहे, त्याच्याशी तद्रूप होऊन सुखामध्ये रंगावे.




    ओवी २६

    याप्रमाणे चित्ताला जर सूक्ष्मपणा येईल, तर माझ्या निरूपणाचा उपयोग होईल। नाहीतर मुक्याबहिर्‍याच्या गोष्टीसारखा सर्व प्रकार होईल।
    अर्थ: चित्ताला सूक्ष्मपणा येत असल्यास, निरूपणाचा उपयोग होईल; अन्यथा सर्व गोष्टी मुक्याबहिर्‍यासारख्या होऊन जातील.




    ओवी २७

    परंतु ते आता सर्वच राहू दे। श्रोत्यांची निवड करण्याची जरुरी नाही। कारण या विषयात सहजच कामनाशून्य अंत:करणाचे लोकच अधिकारी आहेत।
    अर्थ: आता सर्वच गोष्टींना राहू द्या. श्रोत्यांची निवड करण्याची आवश्यकता नाही, कारण या विषयात केवळ निष्काम अंत:करणाचे लोकच अधिकारी आहेत.




    ओवी २८

    ज्यांनी आत्मज्ञानाच्या आवडीने संसार व स्वर्ग हा उतारा उतरून टाकला आहे, त्या लोकांवाचून दुसरे लोक या विषयाची गोडी समजत नाहीत।
    अर्थ: आत्मज्ञानाच्या आवडीने संसार व स्वर्ग यांचा उतारा उतरवणार्‍या लोकांशिवाय इतरांना या विषयाची गोडी समजत नाही.




    ओवी २९

    ज्याप्रमाणे कावळ्यांना चंद्राची ओळख नसते, त्याप्रमाणे विषयासक्त लोकांना हे प्रतिपादन समजणार नाही, आणि शीतल किरणांचा चंद्र, हाच ज्याप्रमाणे चकोरांचे आवडते खाद्य आहे।
    अर्थ: कावळ्यांना चंद्राची ओळख नसल्यासारखे, विषयासक्त लोकांना हे ज्ञान समजणार नाही; चंद्राचे शीतल किरण चकोरांचे आवडते खाद्य आहे.




    ओवी ३०

    त्याप्रमाणे ज्ञानवानांना हा ग्रंथ भोगण्याचा विषय आहे आणि अज्ञानांना तर हा ग्रंथ अगदी अनोळखीचे ठिकाण आहे, म्हणून पहा, ह्याविषयी फार बोलण्याचे कारण नाही।
    अर्थ: ज्ञानवानांसाठी हा ग्रंथ भोगण्याचा विषय आहे, आणि अज्ञानांना हा ग्रंथ अनोळखी आहे, म्हणून याबद्दल अधिक बोलण्याचे कारण नाही.



    ओवी ३१
    परी अनुवादलों मी प्रसंगें, तें सज्जनीं उपसाहावें लागे।
    आतां सांगेन काय श्रीरंगें, निरोपिलें जें।
    अर्थ: पण आता वेळ आली म्हणून मी बोलून गेलो. हे संतांनी क्षमा करणे उचित आहे. आता मी श्रीकृष्णांनी जे सांगितले ते सांगतो.




    ओवी ३२
    तें बुद्धीही आकळितां सांकडें, म्हणौनि बोलीं विपायें सांपडे।
    परी श्रीनिवृत्तिकृपादीप उजियेडें, देखैन मी।
    अर्थ: ते बुद्धीला देखील आकलन करण्यास कठिण आहे, म्हणून शब्दांनी ते क्वचितच सांगता येईल. तरीपण माझे गुरु निवृत्तिनाथ यांच्या कृपारूपी दिव्याच्या उजेडाने मी ते पाहीन व सांगेन.




    ओवी ३३
    जें दिठीही न पविजे, तें दिठीविण देखिजे।
    जरी अतींद्रिय लाहिजे, ज्ञानबळ।
    अर्थ: जर अतींद्रिय ज्ञानाचे बळ प्राप्त होईल तर जे दृष्टीला दिसत नाही, ते डोळ्यांशिवाय पहाता येते.




    ओवी ३४
    ना तरी जें धातुवादाही न जोडे, तें लोहींचि पंधरें सांपडे।
    जरी दैवयोगें चढे, परिसु हातां।
    अर्थ: दैववशात जर परीस हाताला येईल तर किमयेच्या योगानेही प्राप्त न होणारे उत्तम सोने लोखंडातच मिळेल.




    ओवी ३५
    तैसी गुरुकृपा होये, तरी करितां काय आपु नोहे।
    म्हणौनि तें अपार मातें आहे, ज्ञानदेवो म्हणे।
    अर्थ: त्याप्रमाणे जर सद्गुरूची कृपा प्राप्त होईल तर प्रयत्न केला असता कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्यावर ती कृपा अलोट आहे.




    ओवी ३६
    तेणें कारणें मी बोलेन, बोलीं अरूपाचें रूप दावीन।
    अतींद्रिय परी भोगवीन, इंद्रियांकरवीं।
    अर्थ: त्या सद्गुरूकृपेच्या योगाने मी व्याख्यान करीन व म्हणून माझ्या व्याख्यानात अरूप ब्रह्माचे स्पष्ट रूप दाखवीन. आणि जरी ते ब्रह्म इंद्रियांना गोचर होण्यापलीकडचे आहे तरी त्याचाही अनुभव इंद्रियांना घेता येईल असे मी करीन.




    ओवी ३७
    आइका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य।
    हे साही गुणवर्य, वसती जेथ।
    अर्थ: ऐका, कीर्ती, लक्ष्मी, उदारता, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे सहा उच्चप्रतीचे गुण ज्याचे ठिकाणी असतात.




    ओवी ३८
    म्हणौनि तो भगवंतु, जो निःसंगाचा सांगातु।
    तो म्हणे पार्था दत्तचित्तु, होईं आतां।
    अर्थ: म्हणून ज्यास भगवंत म्हणतात व जो सर्वसंग परित्याग केलेल्यांचा सोबती आहे तो श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना आता तू पूर्ण लक्ष दे.




    ओवी ३९
    आइकें योगी आणि संन्यासी जनीं, हे एकचि सिनानें झणीं मानीं।
    एऱ्हवीं विचारिजती जंव दोन्ही, तंव एकचि ते।
    अर्थ: अर्जुना ऐक. या जगात निष्काम कर्मयोगी आणि सांख्ययोगी हे दोन्ही एकच आहेत. ह्यांना कदाचित् तू वेगळे मानशील, पण तसे मानू नकोस. कारण सहज विचार करून पाहिले तर हे दोन्ही एकच आहेत.




    ओवी ४०
    सांडिजे दुजया नामाचा आभासु, तरी योगु तोचि संन्यासु।
    पाहतां ब्रह्मीं नाहीं अवकाशु, दोहींमाजीं।
    अर्थ: नावाच्या वेगळेपणामुळे भासणारा दुजेपणा टाकून दिला तर योग तोच संन्यास होय. तत्वत: पाहिले तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ह्या दोहोत अंतर रहात नाही.




    ओवी ४१
    जैसें नामाचेनि अनारिसेपणें । एका पुरुषातें बोलावणें ।
    कां दोहींमार्गीं जाणें । एकाचि ठाया ॥
    अर्थ: ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नावांने एकाच पुरुषाला हाक मारतात किंवा दोन रस्त्यांनी एकच मुक्काम गाठतात.




    ओवी ४२
    नातरी एकचि उदक सहजें । परि सिनाना घटीं भरिजे ।
    तैसें भिन्नत्व जाणिजे । योगसंन्यासांचें ॥
    अर्थ: किंवा स्वभावत: पाणी जितके तितके एकच, परंतु ते वेगवेगळ्या घागरीतून भरावे म्हणजे ते जसे वेगवेगळे दिसते, त्याप्रमाणे योग व संन्यास ह्यांचा वेगवेगळेपणा फक्त दिसण्यापुरता आहे.




    ओवी ४३
    आइकें सकळ संमतें जगीं । अर्जुना गा तोचि योगी ।
    जो कर्में करूनि रागी । नोहेचि फळीं ॥
    अर्थ: अर्जुना, ऐक, जो कर्माचे आचरण करून त्याच्या फलाविषयी आसक्त होत नाही, तोच ह्या जगामधे सर्वांना मान्य असलेला योगी होय.




    ओवी ४४
    जैसी मही हे उद्भिजें । जनी अहंबुद्धीवीण सहजें ।
    आणि तेथिंचीं तियें बीजें । अपेक्षीना ॥
    अर्थ: ज्याप्रमाणे पृथ्वी ही अहंकारावाचून सहजच वृक्षादिकांना जन्म देते, आणि त्यांना येणार्‍या बीजाची (फलाची) अपेक्षा करत नाही.




    ओवी  ४५
    तैसा अन्वयाचेनि आधारें । जातीचेनि अनुकारें ।
    जें जेणें अवसरें । करणें पावे ॥
    अर्थ: तसे कुलक्रमातील वहिवाटीप्रमाणे वर्णाश्रमधर्मातील आचारांना अनुसरून जे कर्म ज्या वेळेला करणे प्राप्त आहे.




    ओवी  ४६
    तें तैसेंचि उचित करी । परी साटोपु नोहे शरीरीं ।
    आणि बुद्धीही करोनि फळवेरी । जायेचिना ॥
    अर्थ: ते त्याप्रमाणे यथास्थित करतो, परंतु त्यासंबंधी आपल्या ठिकाणी कर्तृत्वबुद्धी घेत नाही, आणि बुद्धीनेही फलापर्यंत जात नाही. (फलांची इच्छा करत नाही)




    ओवी ६-४७
    ऐसा तोचि संन्यासी । पार्था गा परियेसीं ।
    तोचि भरंवसेनिसीं । योगीश्वरु ॥
    अर्थ: असा जो असेल तोच संन्यासी होय. अर्जुना ऐक, तोच खात्रीने योगीराज आहे असे समज.




    ओवी ६-४८
    वांचूनि उचित कर्म प्रासंगिक । तयातें म्हणे हे सांडावें बद्धक ।
    तरी टांकोटांकीं आणिक । मांडीचि तो ॥
    अर्थ: याशिवाय नित्यनैमित्तिक कर्म करणे प्राप्त झाले तर त्या कर्माला तो म्हणतो, हे कर्म बंधन करणारे आहे, हे मी टाकीन. पण हे कर्म टाकले की लागलीच तो दुसरे कर्म करण्याचे आरंभतोच.




    ओवी ६-४९
    जैसा क्षाळूनियां लेपु एकु । सवेंचि लाविजे आणिकु ।
    तैसेनि आग्रहाचा पाइकु । विचंबे वायां ॥
    अर्थ: जसा एक लेप धुवून टाकून लागलीच दुसरा लावाला, त्याप्रमाणे केवळ आग्रहाचा दास झालेला तो व्यर्थच कष्टात पडतो.




    ओवी ६-५०
    गृहस्थाश्रमाचें वोझें । कपाळीं आधींचि आहे सहजें ।
    कीं तेंचि संन्याससवा ठेविजे । सरिसें पुढती ॥
    अर्थ: डोक्यावर अगोदरच स्वभावत: गृहस्थाश्रमाचे ओझे आहेच, ते टाकण्याकरता संन्यास घेतला तर त्याबरोबरच पुन: संन्यासाश्रमातील कर्मांचे ओझे तो डोक्यावर घेतो.





    ओवी ५१

    म्हणौनि अग्निसेवा न सांडितां । कर्माची रेखा नोलांडितां ।
    आहे योगसुख स्वभावता । आपणपांचि ॥
    अर्थ: म्हणून अग्निसेवा न टाकता व कर्माचरणाची मर्यादा न उल्लंघता ज्ञानयोगाने सुख आपले ठिकाणी सहजच मिळाणारे.




    ओवी ५२

    ऐकें संन्यासी तोचि योगी । ऐसी एकवाक्यतेची जगीं ।
    गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरीं ॥
    अर्थ: ऐक जो संन्यासी आहे तोच योगी आहे अशी आपली एकवाक्यता असल्याबद्दल अनेक शास्त्रांनी जी या जगात ध्वजा उभारून प्रसिद्ध केले आहे.




    ओवी ५३

    जेथ संन्यासिला संकल्पु तुटे । तेथचि योगाचें सार भेटे ।
    ऐसें हें अनुभवाचेनि धटें । साचें जया ॥
    अर्थ: ज्या ठिकाणी टाकून दिलेला संकल्प अजिबात नाहीसा होतो त्याच ठिकाणी योगाचे सर्वस्व (ब्रह्म) प्राप्त होते असे हे ज्याच्या अनुभवाच्या तराजूत खरे ठरून पटले आहे (तोच संन्यासी व तोच योगी होय).




    ओवी ५४

    आतां योगाचळाचा निमथा । जरी ठाकावा आथि पार्था ।
    तरी सोपाना या कर्मपथा । चुका झणी ॥
    अर्थ: अर्जुना आता योगरूपी पर्वताच्या शिखरावर ज्या कोणास जाऊन पोहोचावयाचे असेल त्याने या कर्ममार्गरूपी पायर्‍यास चुकू नये.




    ओवी ५५

    येणें यमनियमांचेनि तळवटें । रिगे आसनाचिये पाउलवाटें ।
    येई प्राणायामाचेनि आडकंठें । वरौता गा ॥
    अर्थ: (कर्ममार्गाने जाणारा) या नियमरूपी पायथ्यावरून आसनाच्या पायवाटेवर येतो आणि मग प्राणायामाच्या कड्याने योगरूपी डोंगराच्या मध्यभागावर पोहोचतो.




    ओवी ५६

    मग प्रत्याहाराचा अधाडा । जो बुद्धीचियाही पायां निसरडा ।
    जेथ हटिये सांडिती होडा । कडेलग ॥
    अर्थ: नंतर प्रत्य़ाहाररूपी तुटलेला कडा लागतो. त्य़ा निसरड्या कड्यावर बुद्धीचेही पाय ठरत नाहीत. त्या प्रसंगात हटयोग्यांना शेवटी आपल्या प्रतिज्ञा सोडून द्याव्या लागतात.




    ओवी ५७

    तरी अभ्यासाचेनि बळें । प्रत्याहारीं निराळें ।
    नखीं लागेल ढाळें ढाळें । वैराग्याची ॥
    अर्थ: तरी अभ्यासाच्या बळाने चढण्यास आधार न देणार्‍या प्रात्याहाररूपी कड्यावर वैराग्यरूपी नखी (घोरपडीसारखी) हळू हळू चिकटेल (आणि याप्रमाणे) चढावयास आश्रय मिळेल.




    ओवी ५८

    ऐसा पवनाचेनि पाठारें । येतां धारणेचेनि पैसारें ।
    क्रमी ध्यानाचें चवरें । सांपडे तंव ॥
    अर्थ: याप्रमाणे प्राण व अपान या वायूंच्या वाहनावरून येऊन धारणेच्या प्रशस्त रस्त्याने ध्यानरूपी शिखर मागे टाकी पर्यंत तो चालतो.




    ओवी ५९

    मग तया मार्गाची धांव । पुरेल प्रवृत्तीची हांव ।
    जेथ साध्यसाधना खेंव । समरसें होय ॥
    अर्थ: मग त्या धारणामार्गाची चाल पुरी होऊन अमूक एक गोष्ट करायची आहे अशा विषयीची इच्छा बंद पडून ज्या अवस्थेमधे ब्रह्मैक्य झाल्यामुळे साध्य व साधन यातील भेद नाहीसा होतो.




    ओवी ६०

    जेथ पुढील पैसु पारुखे । मागील स्मरावें तें ठाके ।
    ऐसिये सरिसीये भूमिके । समाधि राहे ॥
    अर्थ: ज्या ठिकाणी पुढील प्रवृत्ति बंद पडून मागील कशाचेही स्मरण होत नाही अशा या ऐक्याच्या भूमिकेवर समाधि रहाते.




    ओवी ६१

    येणें उपायें योगारूढु । जो निरवधि जाहला प्रौढु ।
    तयाचिया चिन्हांचा निवाडु । सांगैन आइकें ॥
    अर्थ: या उपायांनी जो योगनिष्णात अखंड परिपूर्ण झाला, त्याची चिन्हे तुला स्पष्ट तर्‍हेने सांगतो ऐक.



    ओवी ६२

    तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा, नाहीं विषयांचिया येरझारा।
    जो आत्मबोधाचिया वोवरां, पहुडला असे।
    अर्थ: तरी ज्याच्या इंद्रियरूपी घरात विषयांचे जाणे येणे होत नाही आणि जो आत्मज्ञानरूपी विश्रांतीच्या खोलीत स्वस्थ पडलेला असतो.




    ओवी ६३
    जयाचें सुखदुःखाचेनि आंगें, झगटलें मानस चेवो नेघे।
    विषय पासींही आलियां से न रिगे, हें काय म्हणौनि।
    अर्थ: ज्याच्या मनाला सुखदु:खांनी स्वत: धक्के दिले असतांना ते जागे होत नाहीत, विषय अगदी जवळ आले तरी हे काय आहे म्हणून ज्याला स्मरणच होत नाही.




    ओवी ६४
    इंद्रियें कर्माच्या ठायीं, वाढीनलीं परि कहीं।
    फळहेतूची चाड नाहीं, अंतःकरणीं।
    अर्थ: ज्यांची इंद्रिये कर्मे करीत आली परंतु ज्यांच्या अंत:करणात फलाची इच्छा कधीही उत्पन्न झाली नाही.




    ओवी ६५
    असतेनि देहें एतुला, जो चेतुचि दिसे निदेला।
    तोचि योगारूढु भला, वोळखें तूं।
    अर्थ: जो देहधारी असून वरीलप्रमाणे असतो व जो जागृतीप्रमाणे सर्व व्यवहार करीत असूनही निद्रिस्ताप्रमाणे क्रियाशून्य असतो, तोच उत्तम प्रतीचा योगनिष्णात आहे असे तू समज.




    ओवी ६६
    तेथ अर्जुन म्हणे अनंता, हें मज विस्मो बहु आइकतां।
    सांगे तया ऐसी योग्यता, कवणें दीजे।
    अर्थ: त्यावेळी अर्जुन म्हणाला, कृष्णा, तुझे हे बोलणे ऐकून मला फार आश्चर्य वाटते. सांग त्याला अशी ही योग्यता कोण देतो?



    ओवी ६७

    तंव हांसोनि श्रीकृष्ण म्हणे । तुझें नवल ना हें बोलणें ।
    कवणासि काय दिजेल कवणें । अद्वैतीं इये ॥
    अर्थ: तेव्हा कृष्ण हसून म्हणाले, तुझे हे बोलणे आश्चर्यकारक नाही काय? या अद्वैतामधे येथे कोणाला कोणी काय द्यावयाचे आहे?




    ओवी ६८

    पैं व्यामोहाचिये शेजे । बळिया अविद्या निद्रितु होइजे ।
    ते वेळी दुःस्वप्न हा भोगिजे । जन्ममृत्यूंचा ॥
    अर्थ: अविवेकरूपी अंथरुणावर प्रबळ अविद्येच्या योगाने ज्यावेळेला जीव निजतो, त्यावेळेला जन्ममरणरूपी वाईट स्वप्न अनुभवतो.




    ओवी ६९

    पाठीं अवसांत ये चेवो । तैं तें अवघेंचि होय वावो ।
    ऐसा उपजे नित्य सद्भावो । तोहि आपणपांचि ॥
    अर्थ: नंतर ज्यावेळेला अकस्मात जागृति येते त्या वेळेला ते स्वप्न वगैरे सर्वच व्यर्थ होते. अशा प्रकारचा आपल्या नित्य अस्तित्वाचा जो सहज प्रत्यय येतो, तोही आपल्याच ठिकाणी आपल्याला येतो.




    ओवी ७०

    म्हणौनि आपणचि आपणयां । घातु कीजतु असे धनंजया ।
    चित्त देऊनि नाथिलिया । देहाभिमाना ॥
    अर्थ: म्हणून अर्जुना, मिथ्या देहाभिमान, त्याकडे चित्त देऊन (देहच मी आहे असे चित्ताने मानून) आपणच आपला घात करतो.




    ओवी ७१

    हा विचारूनि अहंकारु सांडिजे । मग असतीचि वस्तु होईजे ।
    तरी आपली स्वस्ति सहजें । आपण केली ॥
    अर्थ: विचार करून अहंकार टाकावा आणि मग असलेले आपले स्वरूप ओळखून ब्रह्मरूप व्हावे, म्हणजे आपण आपले कल्याण केल्यासारखेच सहजच होईल.




    ओवी ७२

    एऱ्हवीं कोशकीटकाचिया परी । तो आपणया आपण वैरी ।
    जो आत्मबुद्धि शरीरीं । चारुस्थळीं ॥
    अर्थ: नाहीतर शरीर हेच उत्तम समजून तेथे आत्मबुद्धी ठेवतो, तो कोसल्याप्रमाणे आपला आपणच शत्रु होतो.




    ओवी ७३

    कैसे प्राप्तीचिये वेळे । निदैवा अंधळेपणाचे डोहळे ।
    कीं असते आपुले डोळे । आपण झांकी ॥
    अर्थ: ऐन लाभाच्या वेळेला करंट्याला आंधळेपणाचे डोहाळे कसे होतात पहा. तो आपले असलेले डोळे आपणच झाकून घेतो.




    ओवी ७४

    कां कवण एकु भ्रमलेपणें । मी तो नव्हे गा चोरलों म्हणे ।
    ऐसा नाथिला छंदु अंतःकरणें । घेऊनि ठाके ॥
    अर्थ: किंवा कोणी एक मनुष्य वेड लागल्यामुळे पूर्वीचा जो मी तो मी आता नाही, मी चोरीला गेलो असे म्हणतो आणि आपल्या मनात असा नसताच आग्रह घेऊन बसतो.




    ओवी ७५

    एऱ्हवीं होय तें तोचि आहे । परि काई कीजे बुद्धि तैशी नोहे ।
    देखा स्वप्नींचेनि घायें । कीं मरे साचें ॥
    अर्थ: खरा विचार करून पाहिले तर हल्ली तो जो आहे, तो पूर्वीचाच आहे, पण काय करावे? त्याच्या बुद्धीला तसे वाटत नाही. पहा. स्वप्नातील तरवारीच्या वाराने कोणी खरोखर मरतो का?




    ओवी ७६

    जैशी ते शुकाचेनि आंगभारें । नळिका भोविन्नली एरी मोहरें ।
    तेणें उडावें परी न पुरे । मनशंका ॥
    अर्थ: पोपटाला धरण्याकरता बांधलेल्या नळीवर पोपट बसल्यामुळे जेव्हा पोपटाच्या वजनाने ती नलिका उलट बाजूला फिरते, तेव्हा वास्तविक त्याने तेथून उडून जावे, परंतु ही नळी सोडली तर आपण पडू व मरू या त्याच्या मनातील शंकेचे समाधान होत नाही.




    ओवी ७७

    वायांचि मान पिळी । अटुवें हियें आंवळी ।
    टिटांतु नळी । धरूनि ठाके ॥
    अर्थ: मग व्यर्थच मान इकडे तिकडे करतो व संकोचलेल्या छातीने नळीला आवळीत ती नळी चवड्यात धरून रहातो.




    ओवी ७८

    म्हणे बांधला मी फुडा । ऐसिया भावनेचिया पडे खोडां ।
    कीं मोकळिया पायांचा चवडा । गोंवी अधिकें ॥
    अर्थ: मग मनात म्हणतो की मी खरोखरच बांधला गेलो आहे, अशा या कल्पनेच्या खोड्यात सापडतो आणि मग मोकळा असलेला आपल्या पायांचा चवडा अधिकच गुंतवतो.




    ओवी ७९

    ऐसा काजेंवीण आंतुडला । तो सांग पां काय आणिकें बांधिला ।
    मग न सोडीच जऱ्ही नेला । तोडूनि अर्धा ॥
    अर्थ: याप्रमाणे विनाकारण अडकलेल्या त्या पोपटाला दुसऱ्या कोणी बांधले आहे काय? अशा स्थितीत त्याला ओढून, अर्धा तोडून जरी नेला, तरी तो काही केल्या नळी सोडत नाही.




    ओवी ८०

    म्हणौनि आपणयां आपणचि रिपु । जेणें वाढविला हा संकल्पु ।
    येर स्वयंबुद्धी म्हणे बापु । जो नाथिलें नेघे ॥
    अर्थ: म्हणून ज्याने आपला संकल्प (देहाभिमान) वाढवला आहे, तो आपला आपणच शत्रु होय. श्रीकृष्ण म्हणतात दुसरा जो खोट्याचा मिथ्या देहाचा अभिमान घेत नाही, तो आत्मज्ञानी म्हणावा.




    ओवी ८१तया स्वांतःकरणजिता, सकळकामोपशांता।
    परमात्मा परौता, दुरी नाहीं।
    अर्थ: अशा त्या पुरुषाने आपले अंत:करण जिंकल्यामुळे व त्याच्या सर्व इच्छा निवृत्त झाल्यामुळे त्याला परमात्मा कोठे लांब पलीकडे नाही.




    ओवी ८२
    जैसा किडाळाचा दोषु जाये, तरी पंधरें तेंचि होये।
    तैसें जीवा ब्रह्मत्व आहे, संकल्पलोपीं।
    अर्थ: ज्याप्रमाणे हिणकस सोन्यातून मिसळलेल्या धातूचा दोष निघाला तर तेच शंभर नंबरी सोने होते त्याप्रमाणे अहंकाराचा नायनाट झाला असता जीवाला ब्रह्मत्व ठेवलेलेच आहे.




    ओवी ८३
    हा घटाकारु जैसा, निमालिया तया अवकाशा।
    नलगे मिळों जाणें आकाशा, आना ठाया।
    अर्थ: (घट फुटून) हा घटाचा आकार नाहीसा झाला असता त्यातील पोकळीस आकाशाला मिळण्याकरता ज्याप्रमाणे कोठे लांब जावे लगत नाही.




    ओवी ८४
    तैसा देहाहंकारु नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला।
    तोचि परमात्मा संचला, आधींचि आहे।
    अर्थ: ज्याचा हा मिथ्या देहाहंकार कारणांसह नाहीसा झाला आहे, तो मूळचाच सर्वत्र भरलेला परमात्मा आहे.




    ओवी ८५
    आतां शीतोष्णाचिया वाहणी, तेथ सुखदुःखाची कडसणीं।
    इयें न समाती कांहीं बोलणीं, मानापमानांचीं।
    अर्थ: आता थंड व उष्ण असे प्रकार, किंवा हे सुख व हे दु:ख अशी निवड, तसेच हा मान व हा अपमान अशी समजूत ह्या गोष्टी त्या पुरुषाच्या ठिकाणी मुळीच संभवत नाहीत.




    ओवी ८६
    जे जिये वाटा सूर्यु जाये, तेउतें तेजाचें विश्व होये।
    तैसें तया पावे तें आहे, तोचि म्हणौनी।
    अर्थ: कारण की सूर्य ज्या मार्गाने जातो तितका जगाचा भाग प्रकाशित होतो. त्याप्रमाणे त्याला जे जे प्राप्त होईल, ते त्य़ाचेच स्वरूप आहे. म्हणून (वर सांगितलेली द्वंद्वे त्याच्या ठिकाणी संभवत नाहीत.



    ओवी ८७
    देखैं मेघौनि सुटती धारा, तिया न रुपती जैसिया सागरा।
    तैशीं शुभाशुभें योगीश्वरा, नव्हती आनें।
    अर्थ: पाहा मेघापासून ज्या पावसाच्या धारा पडतात, त्या ज्याप्रमाणे समुद्राला खोचत नाहीत, त्याप्रमाणे शुभाशुभें ही योगेश्वराच्या आत्मस्वरूपाहून भिन्न नसल्यामुळे, त्यास ती द्वंद्वे प्रतीत होत नाहीत.



    ओवी ८८जो हा विज्ञानात्मकु भावो, तया विवरितां जाहला वावो।
    मग लागला जंव पाहों, तंव ज्ञान तें तोचि।
    अर्थ: अनुभवाला येणारे हे जे दृश्य जगत त्याचा विचार करता, ते त्याच्या दृष्टीने मिथ्या ठरले व मग आपण कोण आहो, असे जेव्हा तो पहावयास लागला तेव्हा ज्ञान तेच आपण आहोत असे त्यास कळले.




    ओवी ६-८९
    आतां व्यापकु कीं एकदेशी, हे ऊहापोही जे ऐसी।
    ते करावी ठेली आपैशी, दुजेनवीण।
    अर्थ: आता द्वैत नसल्यामुळे मी व्यापक आहे किंवा मर्यादित आहे अशी वाटाघाट करण्याचे त्याच्या ठिकाणी सहजच थांबते.




    ओवी ६-९०
    ऐसा शरीरीचि परी कौतुकें, परब्रह्माचेनि पाडें तुकें।
    जेणें जिंतलीं एकें, इंद्रियें गा।
    अर्थ: अशा रीतीने ज्या कोणी एकाने आपली इंद्रिये जिंकली आहेत, तो देहधारीच असतो, परंतु सहजच तो परब्रह्माच्या बरोबरीचा ठरतो.



    ओवी ६-९१तो जितेंद्रियु सहजें, तोचि योगयुक्तु म्हणिजे।
    जेणे सानें थोर नेणिजे, कवणें काळीं।
    अर्थ: तो सहजच जितेंद्रिय आहे आणि त्यालाच योगयुक्त म्हणावे व त्याला लहान-थोर असा भेद कोणत्याच वेळेला प्रतीत होत नाही.




    ओवी ६-९२
    देखैं सोनयाचें निखळ, मेरुयेसणें ढिसाळ।
    आणि मातियेचें डिखळ, सरिसेंचि मानी।
    अर्थ: पाहा, शुद्ध सोन्याचा मेरुपर्वता एवढा ढीग आणि मातीचे ढेकूळ तो सारखेच मानतो.




    ओवी ६-९३
    पाहतां पृथ्वीचें मोल थोडें, ऐसें अनर्घ्य रत्न चोखडें।
    देखें दगडाचेनि पाडें, निचाडु ऐसा।
    अर्थ: पहावयास गेले तर पृथ्वीची किंमत ही काही नाही, असे शुद्ध अमूल्य रत्न (पण तो ते) दगडासारखे मानतो, असा तो निरीच्छ असतो.




    ओवी ६-९४
    सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु।
    साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते।
    अर्थ: हितचिंतक, मित्र, शत्रु, उदासीन, मध्यस्थ, (दोन्ही पक्षांचे हित इच्छिणारा), अप्रिय, नातलग, सज्जन, पापी, या सर्वांचे ठिकाणी समबुद्धी असलेला योगी सर्वांमधे श्रेष्ठ होय.




    ओवी ६-९५
    तेथ सुहृद आणि शत्रु, कां उदासु आणि मित्रु।
    हा भावभेदु विचित्रु, कल्पूं कैंचा।
    अर्थ: त्याचे ठिकाणी हितचिंतक व शत्रु, किंवा उदास आणि मित्र अशा तर्‍हेच्या वेगवेगळ्या वृत्तींची कल्पना कोठून करावी?




    ओवी ६-९६
    तया बंधु कोण काह्याचा, द्वेषिया कवणु तयाचा।
    मीचि विश्व ऐसा जयाचा, बोधु जाहला।
    अर्थ: मीच विश्व आहे, अशी प्रतीती ज्यास आली आहे त्य़ाला नातलग कोण आणि कशाचा? व त्याला वैरी तरी कोण?



    ओवी ६-९६ग तयाचिये दिठी, अधमोत्तम असे किरीटी?
    काय परिसाचिये कसवटी, वानिया कीजे?
    अर्थ: मग त्याच्या दृष्टीने, अर्जुना, वाईट-चांगले असेल काय? परिसाच्या कसवटीवर घासले असता सोन्यात निरनिराळे प्रकार करता येतील काय?




    ओवी ६-९७
    ते जैशी निर्वाण वर्णुचि करी, तैशी जयाची बुद्धी चराचरीं।
    होय साम्याची उजरी, निरंतर।
    अर्थ: ती परिसाची कसवटी ज्या प्रमाणे त्यास उत्तम रंगाचेच सोने करते त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीमधे चराचराविषयीच्या समतेचा निरंतर उदय होतो.




    ओवी ६-९८
    जे ते विश्वालंकाराचें विसुरे, जरी आहाती आनानें आकारें।
    तरी घडले एकचि भांगारें, परब्रह्में।
    अर्थ: कारण विश्वातील प्राणीरूप अलंकारांचे समुदाय जरी निरनिराळ्या आकाराचे आहेत तरी ते एक परब्रह्मरूप सोन्याचेच बनले आहेत.




    ओवी ६-९९
    ऐसें जाणणें जें बरवें, तें फावलें तया आघवें।
    म्हणौनि आहाचवाहाच न झकवे, येणें आकारचित्रें।
    अर्थ: असे जे उत्तम ज्ञान ते त्याला सर्व प्राप्त झाले, म्हणून तो वरवरच्या या नानाप्रकारच्या आकारांनी फसत नाही.




    ओवी ६-१००
    घापे पटामाजि दृष्टी, दिसे तंतूंची सैंघ सृष्टी।
    परी तो एकवांचूनि गोठी, दुजी नाहीं।
    अर्थ: वस्त्रावर दृष्टी टाकली असता त्य़ा वस्त्रामधे जिकडे तिकडे तंतूंचीच रचना दिसते, तरीही पण त्या वस्त्रात एका सुतावाचून दुसरी गोष्टच नाही.




    ओवी ६-१०१
    ऐसेनि प्रतीती हें गवसे, ऐसा अनुभव जयातें असे।
    तोचि समबुद्धि हे अनारिसें, नव्हे जाणें।
    अर्थ: अशा या तंतुपटन्यायाने हा वर सांगितलेला अनुभव येतो व असा ज्याचा अनुभव आहे तोच समबुद्धी होय, यात अन्यथा नाही असे समज.




    ओवी ६-१०२
    जयाचें नांव तीर्थरावो, दर्शनें प्रशस्तीसि ठावो।
    जयाचेनि संगें ब्रह्मभावो, भ्रांतासही।
    अर्थ: ज्याचे नाव तीर्थराज आहे व ज्याचे दर्शन झाले असता समाधान होते व ज्याच्या संगतीने भ्रमलेल्यास ब्रह्मता मिळते.




    ओवी ६-१०३
    जयाचेनि बोलें धर्मु जिये, दिठी महासिद्धितें विये।
    देखैं स्वर्गसुखादि इयें, खेळु जयाचा।
    अर्थ: ज्याच्या बोलण्याने धर्म जगतो, ज्याची कृपा मोठाल्या सिद्धीला उत्पन्न करते, पहा स्वर्गसुखादिक ही ज्याचा खेळ आहेत, स्वर्गसुखादिक देणे हा ज्याचा हाताचा मळ आहे.




    ओवी ६-१०४
    विपायें जरी आठवला चित्ता, तरी दे आपुली योग्यता।
    हें असो तयातें प्रशंसितां, लाभु आथि।
    अर्थ: अशा पुरुषाचे नाव मनाला सहज जरी आठवले तरी तो आपली योग्यता देतो, ते राहू दे, त्याची स्तुती केली असता हित आहे.




    ओवी ६-१०५
    पुढती अस्तवेना ऐसें, जया पाहलें अद्वैतदिवसें।
    मग आपणपांचि आपणु असे, अखंडित।
    अर्थ: मग आपणपणाची आपण अशी अवस्था होते, जी अद्वैत दृष्टीच्या दर्शनाने अस्तित्वात येते.




    ओवी ६-१०६ऐसिया दृष्टी जो विवेकी, पार्था तो एकाकी।
    सहजें अपरिग्रही जो तिहीं लोकीं, तोचि म्हणौनि।
    अर्थ: अशा दृष्टीने जो विचारयुक्त आहे, अर्जुना, तो अद्वितीय आहे. कारण तिन्ही लोकात तोच आहे, म्हणून तो सहजच परिग्रहशून्य असतो.




    ओवी ६-१०७
    ऐसियें असाधारणें, निष्पन्नाचीं लक्षणें।
    आपुलेनि बहुवसपणें, श्रीकृष्ण बोले।
    अर्थ: (ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) अशी प्राप्त पुरुषांची लोकोत्तर लक्षणे कृष्ण आपल्या सर्वज्ञतेने सांगतात.




    ओवी ६-१०८
    जो ज्ञानियांचा बापु, देखणेयांचे दिठीचा दीपु।
    जया दादुलयाचा संकल्पु, विश्व रची।
    अर्थ: जो श्रीकृष्ण ज्ञान्यांचा वडील आहे, सर्व पहाणार्‍यांच्या दृष्टीचा जो प्रकाशक आहे व ज्या समर्थांचा संकल्प विश्वाची उभारणी करतो.




    ओवी ६-१०९
    प्रणवाचिये पेठे, जाहलें शब्दब्रह्म माजिठे।
    तें जयाचिया यशा धाकुटें, वेढूं न पुरे।
    अर्थ: ॐकाराच्या पेठेत तयार झालेले वेदरूपी वस्त्र हे ज्याच्या सहा गुणांपैकी एक जे यश, त्या यशाला अपुरे असल्यामुळे वेढू शकले नाही, (वेदाकडून ज्या श्रीकृष्णाच्या यशाचे संपूर्ण वर्णन झाले नाही).




    ओवी ६-११०
    जयाचेनि आंगिकें तेजें, आवो रविशशीचिये वणिजे।
    म्हणौनि जग हें वेशजे- वीण असे तया।
    अर्थ: ज्याच्या (श्रीकृष्णाच्या) अंगातील तेजाने सूर्य-चंद्रांच्या व्यापाराला जोर आहे, तर मग जग हे त्याच्यावाचून प्रकाशित आहे काय?




    ओवी ६-१११
    हां गा नामचि एक जयाचें, पाहतां गगनही दिसे टांचें।
    गुण एकैक काय तयाचे, आकळशील तूं।
    अर्थ: (ज्ञानेश्वर महाराज आपल्या मनाला म्हणतात, हे मना) ज्या भगवंताच्या नामाचे माहात्म्य पाहिले असता त्याच्या पुढे आकाशही कमी दिसते. त्या भगवंताचे एक एक गुण तू कसे जाणशील?




    ओवी ६-११२
    म्हणौनि असो हें वानणें, सांगों नेणों कवणाचीं लक्षणें।
    दावावीं मिषें येणें, कां बोलिलों तें।
    अर्थ: म्हणून हे वर्णन करणे पुरे. या संतांची लक्षणे सांगण्याच्या निमित्ताने देवाने कोणाची लक्षणे सांगितली व ती का सांगितली हे मला सांगता येत नाही.




    ओवी ६-११३
    ऐकें द्वैताचा ठावोचि फेडी, ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी।
    तरी अर्जुना पढिये हे गोडी, नासेल हन।
    अर्थ: (पण मला असे वाटते की) ऐक, द्वैताचा ठावठिकाणा नाहीसा करणारे असे जे आत्मज्ञान ते उघड उघड व्यक्त केले तर अर्जुन मला आवडतो ही प्रेमाची गोडी खरोखर नाहीशी होईल.




    ओवी ६-११४
    म्हणौनि तें तैसे बोलणें, नव्हे सपातळ आड लावणें।
    केलें मनचि वेगळवाणें, भोगावया।
    अर्थ: म्हणून भगवंत तसे बोलले नाहीत. (म्हणजे भगवंतांनी अर्जुनास ते ब्रह्म तू आहेस असा महावाक्याचा स्पष्ट बोध केला नाही). परंतु मध्ये असा बारीकसा पडदा ठेवला.




    ओवी ६-११५
    जया सोऽहंभाव अटकु, मोक्षसुखालागोनि रंकु।
    तयाचिये दिठीचा झणें कळंकु, लागेल तुझिया प्रेमा।
    अर्थ: जे ‘मी ब्रह्म आहे’ अशा बोधात अडकले आहेत व जे मोक्षसुखाकरता दीन झाले आहेत अशांच्या (मुमुक्षूंच्या) दृष्टीचा काळिमा तुझ्या प्रेमाला कदाचित् लागेल.




    ओवी ६-११६विपाये अहंभावो ययाचा जाईल, मी तेंचि हा जरी होईल।
    तरी मग काय कीजेल, एकलेया।
    अर्थ: कदाचित् याचा मीपणा जाईल आणि हा जर मीच होईल, तर मग मी एकट्याने काय करावे?




    ओवी ६-११७
    दिठीची पाहतां निविजें, कां तोंड भरोनि बोलिजे।
    नातरी दाटूनि खेंव दीजे, ऐसें कवण आहे?
    अर्थ: दृष्टीनेच पाहून शांत व्हावे किंवा तोंड भरून बोलावे अथवा कडकडून आलिंगन द्यावे असे दुसरे कोण आहे?




    ओवी ६-११८
    आपुलिया मना बरवी, असमाई गोठी जीवीं।
    ते कवणेंसि चावळावी, जरी ऐक्य जाहलें।
    अर्थ: जी गोष्ट आपल्या मनाला चांगली वाटते आणि जी जिवात मावत नाही (म्हणजे कोणाला तरी सांगावीशी वाटते) अशी गोष्ट जर अर्जुनाचे आपणाशी ऐक्य झाले तर कोणास सांगावी?




    ओवी ६-११९
    इया काकुळती जनार्दनें, अन्योपदेशाचेनि हाताशनें।
    बोलामाजि मन मनें, आलिंगूं सरलें।
    अर्थ: या प्रमाणे भगवंतांनी आपल्याविषयीची करुणा आपल्या मनात घेऊन, अन्योपदेशाच्या हातवटीने (साधूंच्या वर्णनाने) बोलण्यामधे, श्रीकृष्णांनी अर्जुनाचे अर्जुनत्व कायम ठेऊन आपल्या मनाने अर्जुनाच्या मनास आलिंगन दिले.




    ओवी ६-१२०
    हें परिसतां जरी कानडें, तरी जाण पां पार्थ उघडें।
    कृष्णसुखाचेंचि रूपडें, वोतलें गा।
    अर्थ: हे ऐकण्यास जरी अवघड वाटले तरी (ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या मना) तू असे समज की अर्जुन हा श्रीकृष्णाच्या सुखाचीच ओतलेली उघड मूर्ति आहे.




    ओवी ६-१२१
    हें असो वयसेचिये शेवटीं, जैसें एकचि विये वांझोटी।
    मग ते मोहाची त्रिपुटी, नाचों लागे।
    अर्थ: हे राहू द्या. ज्याप्रमाणे वयाच्या शेवटी (म्हातारपणी) एखाद्या वांझ स्त्रीला एकुलते एक मूल झाले असता त्या स्त्रीच्या रूपाने मग मूर्तिमंत मोहच वावरतो (मोहाने भरलेली स्त्री तिचे मूल व मोह).




    ओवी ६-१२२
    तैसें जाहलें श्रीअनंता, ऐसें तरी मी न म्हणतां।
    जरी तयाचा न देखतां, अतिशयो एथ।
    अर्थ: अर्जुनाविषयी देवाच्या प्रेमाचा अतिरेक जर मी पाहिला नसता तर मी असे (वांझोट्या बाईसारखे) देवाला झाले असे म्हटले नसते.




    ओवी ६-१२३
    पाहा पां नवल कैसें चोज, कें उपदेशु केउतें झुंज।
    परी पुढें वालभाचें भोज, नाचत असे।
    अर्थ: आश्चर्य पहा, की भगवंताचे अर्जुनाचे ठिकाणी प्रेम कसे आहे! कोठे उपदेश व कोणीकडे युद्ध! (युद्धाचा प्रसंग ही अत्यंत विक्षेपाची जागा असल्यामुळे आत्मज्ञानाचा उपदेश करण्याला अगदी अयोग्य. परंतु अर्जुनाच्या प्रेमामुळे भगवंतांनी वेळेच्या योग्यतेकडे लक्ष न देता आत्मज्ञानाचा उपदेश केला).




    ओवी ६-१२४
    आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी।
    पिसें आणि न भुलवी, तरी तेंचि काई?
    अर्थ: प्रेम आहे आणि ते लाज उत्पन्न करते तर ते प्रेम कसले? तसेच व्यसन आहे आणि त्याने जर शीण होत नसेल तर ते व्यसन कसले? वेड आहे परंतु ते जर भ्रम पाडत नसले तर ते वेड कसले?




    ओवी ६-१२५
    म्हणौनि भावार्थु तो ऐसा, अर्जुन मैत्रियेचा कुवासा।
    कीं सुखें श्रृंगारलिया मानसा, दर्पणु तो।
    अर्थ: म्हणून इतक्या बोलण्याचा अभिप्राय एवढाच की अर्जुन हा भगवंताच्या सख्य भक्तीचा आश्रय आहे. अथवा श्रृंगारलेल्या (भगवंताच्या) मनाचा तो आरसाच आहे.




    ओवी ६-१२६यापरी बाप पुण्यपवित्र, जगीं भक्तिबीजासि सुक्षेत्र।
    तो श्रीकृष्णकृपे पात्र, याचिलागीं।
    अर्थ: याप्रमाणे तो अर्जुन धन्य असून पुण्याने पावन आहे. या जगात भक्तिरूपी बी पेरण्यास तो चांगले शेत आहे आणि म्हणून कृष्णकृपेला तो पात्र झाला आहे.




    ओवी ६-१२७
    हो कां आत्मनिवेदनातळींची, जे पीठिका होय सख्याची।
    पार्थु अधिष्ठात्री तेथिंची, मातृका गा।
    अर्थ: अथवा आत्मनिवेदनरूपी भक्तीच्या खालची जी सख्यभक्तीची भूमिका आहे त्यावरील अर्जुन ही मुख्य देवता आहे.




    ओवी ६-१२८
    पासींचि गोसावी न वर्णिजे, मग पाइकाचा गुण घेईजे।
    ऐसा अर्जुनु तो सहजें, पढिये हरी।
    अर्थ: शेजारीच असलेल्या श्रेष्ठ प्रभूचे वर्णन न करता मग भक्ताच्या गुणांचे वर्णन करावे इतका अर्जुनच स्वाभाविक रीतीने देवास आवडतो.




    ओवी ६-१२९
    पाहां पां अनुरागें भजें, जे प्रियोत्तमें मानिजे।
    ते पतीहूनि काय न वानिजे, पतिव्रता?
    अर्थ: पाहा जी नवर्‍याला प्रेमाने भजते व जिला नवरा मानतो त्या पतिव्रतेचे वर्णन तिच्या नवर्‍यापेक्षा देखील जास्त करावयास नको का?




    ओवी ६-१३०
    तैसा अर्जुनचि विशेषें स्तवावा, ऐसें आवडलें मज जीवा।
    जे तो त्रिभुवनींचिया दैवां, एकायतनु जाहला।
    अर्थ: त्याप्रमाणेच अर्जुनाचेच विशेष वर्णन करावे असेच माझ्या मनाला पसंत पडते. कारण त्रिभुवनातील सर्व भाग्य एका अर्जुनाच्याच ठिकाणी राहिले आहे.




    ओवी ६-१३१
    जयाचिया आवडीचेनि पांगें, अमूर्तुही मूर्ती आवगें।
    पूर्णाहि परी लागे, अवस्था जयाची।
    अर्थ: ज्याच्या प्रेमाच्या स्वाधीन होऊन निराकार परमात्मा सगुणरूप घेतो व तो देव पूर्ण आहे परंतु त्याला देखील ज्याचा वेध लागतो.




    ओवी ६-१३२
    तंव श्रोते म्हणती दैव, कैसी बोलाची हवाव।
    काय नादातें हन बरव, जिणोनि आली।
    अर्थ: तेव्हा श्रोते म्हणतात काय आमचे भाग्य? काय बोलण्याचा रंग आहे? याच्या बोलण्याची शोभा नादब्रह्मास जिंकून आली की काय न कळे.




    ओवी ६-१३३
    हां हो नवल नोहे देशी, मऱ्हाटी बोलिजे तरी ऐशी।
    वाणें उमटताहे आकाशीं, साहित्य रंगाचे।
    अर्थ: अहो देशीभाषारूपी आकाशात अलंकाररूपी रंगाचे निरनिराळे प्रकार स्पष्ट होत आहेत अशी मराठी भाषा बोलता येते हे आश्चर्य नव्हे काय?




    ओवी ६-१३४
    कैसें उन्मेखचांदिणें तार, आणि भावार्थु पडे गार।
    हेचि श्लोकार्थ कुमुदिनी फार, साविया होती।
    अर्थ: ज्ञानरूपी चांदणे कसे स्वच्छ व टपोर पडले आहे. पहा, त्या व्याख्यानातला निरनिराळा अभिप्राय हाच चांदण्यांचा गारवा आहे आणि श्लोकांचा अर्थ हीच कोणी चंद्रविकासी कमळे सहज विकसित होत आहेत.




    ओवी ६-१३५
    चाडचि निचाडां करी, ऐसी मनोरथीं ये थोरी।
    तेणें विवळले अंतरीं, तेथ डोलु आला।
    अर्थ: (ज्ञानेश्वर महाराजांचे) व्याख्यान ऐकण्याच्या इच्छेची थोरवी अशीच आहे की निरीच्छ पुरुषाला देखील हे व्याख्यान ऐकण्याची इच्छा होईल, असा श्रोत्यांच्या मनात व्याख्यानाविषयी प्रकाश पडल्यामुळे ते डोलू लागले.




    ओवी ६-१३६
    तें निवृत्तिदासें जाणितलें, मग अवधान द्या म्हणितलें।
    नवल पांडवकुळीं पाहलें, कृष्णदिवसें।
    अर्थ: निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज यांनी ते जाणले व मग श्रोत्यांस म्हणाले, महाराज, लक्ष द्या. पांडवांच्या कुळामधे कृष्णरूपी अद्भुत दिवस उगवला आहे.




    ओवी ६-१३७
    देवकीया उदरीं वाहिला, यशोदा सायासें पाळिला।
    कीं शेखीं उपेगा गेला, पांडवांसी।
    अर्थ: देवकीने त्याला वाढवले, यशोदेने त्याचे कष्टाने पालन केले, पण शेवटी तो पांडवांच्या उपयोगाला आला.




    ओवी ६-१३८
    म्हणौनि बहुदिवस वोळगावा, कां अवसरु पाहोनि विनवावा।
    हाही सोसु तया सदैवा, पडेचिना।
    अर्थ: म्हणून पुष्कळ दिवस सेवा करावी किंवा वेळ पाहून विनंती करावी, एवढाही प्रयास त्या भाग्यवान अर्जुनास पडला नाही.




    ओवी ६-१३९
    हें असो कथा सांगें वेगीं, मग अर्जुन म्हणे सलगी।
    देवा इयें संतचिन्हें आंगीं, न ठकती माझ्या।
    अर्थ: श्रोते म्हणतात हे राहू दे, लवकर चालू विषय सांग. (यावर ज्ञानदेव म्हणतात) मग अर्जुन सलगीने म्हणाला, कृष्णा, ही संतांची लक्षणे माझ्या अंगात वसत नाहीत.




    ओवी ६-१४०
    एऱ्हवीं या लक्षणांचिया निजसारा, मी अपाडें कीर अपुरा।
    परि तुमचेनि बोलें अवधारा, थोरावें जरी।
    अर्थ: येर्‍हवी या लक्षणांच्या तात्पर्याचा विचार केला तर मी खरोखर फारच अपुरा पडेन. परंतु ऐका, जर माझ्यात मोठेपणा आला तर तो तुमच्या बोलण्यानेच येईल.




    ओवी ६-१४१जी तुम्ही चित्त देयाल, तरी ब्रह्म मियां होईजेल।
    काय जहालें अभ्यासिजेल, सांगाल जें।
    अर्थ: महाराज, तुम्ही लक्ष द्याल तर मी ब्रह्म होईन. आणि सांगाल तो अभ्यास करीन, न करायला काय झाले?




    ओवी ६-१४२
    हां हो नेणों कवणाची काहाणी, आइकोनि श्लाघिजत असों अंतःकरणीं।
    ऐसी जहालेपणाची शिरयाणी, कायसी देवा।
    अर्थ: अहो देवा, आपण कोणाची गोष्ट सांगता हे कळत नाही. (परंतु) ती ऐकून मनात मी त्यांची स्तुती करत आहे. अशी लक्षणे ज्यांच्या अंगात सिद्ध असतील, त्यांचे महत्व कसे असेल बरे?




    ओवी ६-१४३
    हें आंगें म्यां होईजो का, येतुलें गोसावी आपुलेपणें कीजो कां।
    तंव हांसोनि श्रीकृष्ण हो कां, करूं म्हणती।
    अर्थ: ते मी स्वत: व्हावे येवढे प्रभु मी आपला आहे, असे समजून आपण करावे. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणतात, असे का तुझे म्हणणे आहे? तर तसे करू बरे!




    ओवी ६-१४४
    देखा संतोषु एक न जोडे, तंवचि सुखाचें सैंघ सांकडें।
    मग जोडलिया कवणीकडे, अपुरें असे?
    अर्थ: पाहा, जोपर्यंत एक समाधान प्राप्त झाले नाही, तोपर्यंत सुखाचा चोहिकडे दुष्काळ असतो. पण एकदा संतोष पूर्णपणे प्राप्त झाल्यावर मग सुखाला कोठे कमी आहे?




    ओवी ६-१४५
    तैसा सर्वेश्वरु बळिया सेवकें, म्हणौनि ब्रह्मही होय तो कौतुकें।
    परि कैसा भारें आतला पिकें, दैवाचेनि।
    अर्थ: त्याप्रमाणे सर्वशक्तिमान सर्वेश्वराचा अर्जुन सेवक आहे, म्हणून तो सहज ब्रह्मही होईल. पण अर्जुनाच्या दैवाच्या वजनाने दडपल्यामुळे श्रीकृष्ण कशाप्रकारे फलद्रूप झाला ते पहा.




    ओवी ६-१४६
    जो जन्मसहस्रांचियासाठीं, इंद्रादिकांही महागु भेटी।
    तो आधीनु केतुला किरीटी, जे बोलुही न साहे।
    अर्थ: इंद्रादिकांना देखील हजारो जन्म घेतले तरी ज्याची भेट होणे दुर्मिळ तो अर्जुनाच्या किती स्वाधीन झाला आहे! अर्जुनाचे प्रश्न करणेही त्याला सहन होत नाही (कारण अर्जुनाने प्रश्न करण्यापूर्वीच देवाची सांगण्याची तयारी असते).




    ओवी ६-१४७
    मग ऐका जें पांडवें, म्हणितलें म्यां ब्रह्म होआवें।
    तें अशेषही देवें, अवधारिलें।
    अर्थ: मग ऐका, अर्जुनाने ‘मी ब्रह्म व्हावे’ असे जे म्हटले ते श्रीकृष्णांनी पूर्णपणे ऐकले.




    ओवी ६-१४८
    तेथ ऐसेंचि एक विचारिलें, जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले।
    परि उदरा वैराग्य आहे आलें, बुद्धीचिया।
    अर्थ: परंतु भगवंतांनी तेथे असा विचार केला की ज्य़ाअर्थी अर्जुनाला ब्रह्मत्वाचे डोहाळे लागले आहेत, त्या अर्थी याच्या पोटात वैराग्याचा गर्भ राहिला आहे.




    ओवी ६-१४९
    एऱ्हवीं दिवस तरी अपुरे, परी वैराग्यवसंताचेनि भरें।
    जे सोऽहंभाव महुरे, मोडोनि आला।
    अर्थ: सहज विचार करून पाहिले तर ब्रह्म होण्याला यास दिवस कमी आहेत. परंतु वैराग्यरूपी वसंताच्या भराने ‘मी ब्रह्म आहे’ असा भावरूपी मोहोर दाट आला आहे.




    ओवी ६-१५०
    म्हणौनि प्राप्तिफळीं फळतां, यासि वेळु न लगेल आतां।
    होय विरक्तु ऐसा अनंता, भरंवसा जाहला।
    अर्थ: म्हणून हे ब्रह्मप्राप्ती हे फळ येण्यास आता यास उशीर लागणार नाही, अशा रीतीने हा वैराग्यसंपन्न झाला आहे, अशी देवाची पूर्ण खात्री झाली.





    ओवी ६-१५१म्हणे जें जें हा अधिष्ठील, तें आरंभींच यया फळेल।
    म्हणौनि सांगितला न वचेल, अभ्यासु वायां।
    अर्थ: श्रीकृष्ण आपल्यापाशी म्हणाले की हा अर्जुन ज्या ज्या कर्माचे आचरण करेल ते ते याला आरंभालाच फळास येईल. म्हणून याला सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही.




    ओवी ६-१५२
    ऐसें विवरोनियां श्रीहरी, म्हणितलें तिये अवसरीं।
    अर्जुना हा अवधारीं, पंथराजु।
    अर्थ: (ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) श्रीकृष्णाने असा दूरवर विचार करून त्यावेळेला म्हटले, अर्जुना, हा सर्वोत्कृष्ट मार्ग ऐक.




    ओवी ६-१५३
    तेथ प्रवृत्तितरूच्या बुडीं, दिसती निवृत्तिफळाचिया कोडी।
    जिये मार्गींचा कापडी, महेशु अजुनी।
    अर्थ: या मार्गामधे प्रावृत्तिरूपी झाडाच्या बुडालाच निवृत्तिरूपी कोट्यावधी फळे दिसत आहेत. व या मार्गाचे श्रीशंकर अद्यापपर्यंत यात्रेकरू आहेत.




    ओवी ६-१५४
    पैल योगवृंदे वहिलीं, आडवीं आकाशीं निघालीं।
    कीं तेथ अनुभवाच्या पाउलीं, धोरणु पडिला।
    अर्थ: योग्यांचे समुदाय सुषुम्नेच्या संकोचित मार्गाने मूर्ध्नी आकाशाकडे सत्वर जावयास निघाले व असे योग्यांचे समुदाय अनुभवाच्या पाउलांनी जाता जाता तो मार्ग सुलभ झाला.




    ओवी ६-१५५
    तिहीं आत्मबोधाचेनि उजुकारें, धांव घेतली एकसरें।
    कीं येर सकळ मार्ग निदसुरे, सांडूनियां।
    अर्थ: त्यांनी इतर सर्व अज्ञानाचे मार्ग टाकून आत्मज्ञानाच्या सरळ मार्गाने एकसारखी धाव घेतली.




    ओवी ६-१५६
    पाठीं महर्षी येणें आले, साधकांचे सिद्ध जाहाले।
    आत्मविद थोरावले, येणेंचि पंथें।
    अर्थ: नंतर महर्षी याच मार्गाने साधकाचे सिद्ध झाले व याच मार्गाने आत्मज्ञानी पुरुष महत्व पावले.




    ओवी ६-१५७
    हा मार्गु जैं देखिजे, तैं तहान भूक विसरिजे।
    रात्रिदिवसु नेणिजे, वाटे इये।
    अर्थ: या मार्गाची ओळख झाली असता तहानभुकेची आठवण रहात नाही. या रस्त्यावर रात्र व दिवस यांची कल्पना येत नाही.




    ओवी ६-१५८
    चालतां पाऊल जेथ पडे, तेथ अपवर्गाची खाणी उघडे।
    आव्हांटलिया तरी जोडे, स्वर्गसुख।
    अर्थ: या मार्गाने जात असता जेथे जेथे पाऊल पडेल तेथे तेथे मोक्षाची खाणच उघडते. आणि या मार्गाचे आचरण करणारा जरी भलत्या मार्गाला लागला तथापि त्यास स्वर्गसुख मिळते.




    ओवी ६-१५९
    निगिजे पूर्वींलिया मोहरा, कीं येइजे पश्चिमेचिया घरा।
    निश्चळपणें धनुर्धरा, चालणें एथिंचें।
    अर्थ: अर्जुना, (या मार्गात) पूर्वदिशेच्या मार्गाने निघून पश्चिम दिशेच्या घरास यावे असे आहे. या मार्गाचे चालणे स्थिरपणाने आहे.




    ओवी ६-१६०
    येणें मार्गें जया ठाया जाइजे, तो गांवो आपणचि होईजे।
    हें सांगों काय सहजें, जाणसी तूं।
    अर्थ: या मार्गाने ज्या मुक्कामास जायचे तो गावच आपण होतो, हे कशास सांगावयास पाहिजे? तुला ते सहजच कळेल.




    ओवी ६-१६१
    तेथ पार्थें म्हणितलें देवा, तरी तेंचि मग केव्हां।
    कां आर्तिसमुद्रौनि न काढावा, बुडतु जी मी।
    अर्थ: तेव्हा अर्जुन म्हणाला, कृष्णा, (तर मग) तेच तुम्ही केव्हा करणार? मी उत्कंठारूप समुद्रात बुडत असतांना त्यातून तुम्ही मला का काढीत नाही?




    ओवी ६-१६२
    तंव श्रीकृष्ण म्हणती ऐसें, हें उत्सृंखळ बोलणें कायसें।
    आम्हीं सांगतसों आपैसें, वरि पुशिलें तुवां।
    अर्थ: तेव्हा कृष्ण म्हणाले, असे हे उतावीळपणाचे भाषण कशाकरता? आम्ही आपण होऊन सांगत होतो, आणखी त्यात तू तेच विचारलेस.




    ओवी ६-१६३तरी विशेषें आतां बोलिजेल, परि तें अनुभवें उपेगा जाईल।
    म्हणौनि तैसें एक लागेल, स्थान पाहावें।
    अर्थ: तर आताच सविस्तर प्रतिपादन केले जाईल. परंतु त्याप्रमाणे अनुष्ठान करून अनुभाव घेतला तरच त्याचा उपयोग होईल. त्याकरता अभ्यासाला योग्य असे ठिकाण पहाणे जरुर आहे.




    ओवी ६-१६४
    जेथ अराणुकेचेनि कोडें, बैसलिया उठों नावडे।
    वैराग्यासी दुणीव चढे, देखिलिया जें।
    अर्थ: ज्या ठिकाणी सहज बसले असता असे समाधान प्राप्त होते की तेथून उठावे असे वाटत नाही व जे पाहिल्याबरोबर वैराग्यास दुप्पट जोर येतो.




    ओवी ६-१६५
    जो संतीं वसविला ठावो, संतोषासि सावावो।
    मना होय उत्सावो, धैर्याचा।
    अर्थ: जेथे संतांनी वास्तव्य केले आहे आणि ज्या ठिकाणी समाधानाला साहाय्य मिळून मनाला धैर्याचा उल्हास येतो.




    ओवी ६-१६६
    अभ्यासुचि आपणयातें करी, हृदयातें अनुभवु वरी।
    ऐसी रम्यपणाची थोरी, अखंड जेथ।
    अर्थ: जेथे अभ्यासच आपण आपल्याला साधकाकडून करवतो व अनुभव आपण होऊन साधकांच्या अंत:काणाला माळ घालतो याप्रमाणे जेथे रम्यपणाचे माहात्म्य निरंतर आहे.




    ओवी ६-१६७
    जया आड जातां पार्था, तपश्चर्या मनोरथा।
    पाखांडियाही आस्था, समूळ होय।
    अर्थ: अर्जुना, ज्या स्थानावरून सहज गेले असता नास्तिकाला देखील तपश्चर्या करावी अशी पूर्णपणे मनापासून आस्था वाटते.




    ओवी ६-१६८
    स्वभावें वाटे येतां, जरी वरपडा जाहला अवचितां।
    तरी सकामुही परि माघौता, निघों विसरे।
    अर्थ: सहज वाटेने येत असता जर कोणी अकस्मात् त्या ठिकाणी आला तर तो विषयासक्त जरी असला, तरीही तो परत माघारी जाण्याचे विसरतो.




    ओवी ६-१६९
    ऐसेनि न राहतयातें राहावी, भ्रमतयातें बैसवी।
    थापटूनि चेववी, विरक्तीतें।
    अर्थ: याप्रमाणे जे स्थान न रहाणार्‍याला रहावयास लावते, व भटकणार्‍याला एके ठिकाणी बसवते आणि वैराग्याला थापटी मारून जागे करते.




    ओवी ६-१७०
    हें राज्य वर सांडिजे, मग निवांता एथेंचि असिजे।
    ऐसें श्रृंगारियांहि उपजे, देखतखेंवो।
    अर्थ: जे स्थान पाहिल्याबरोबर एखाद्या विलासी पुरुषाला सुद्धा असे वाटावे की या स्थानावरून राज्य ओवाळून टाकावे व येथेच स्वस्थपणे रहावे.




    ओवी ६-१७१
    जें येणें मानें बरवंट, आणि तैसेंचि अतिचोखट।
    जेथ अधिष्ठान प्रगट, डोळां दिसे।
    अर्थ: जे स्थान इतके सुंदर आणि तसेच अतिशय पवित्र असून जेथे डोळ्याला ब्रह्म स्पष्ट दिसते.




    ओवी ६-१७२
    आणिकही एक पहावें, जें साधकीं वसतें होआवें।
    आणि जनाचेनि पायरवें, रुळेचिना।
    अर्थ: आणखीही त्या स्थानाचे लक्षण पहावे, ते हे की ज्या स्थानी राहिलेले साधक असावेत व जे स्थान लोकांच्या येण्याजाण्याने मळलेले नसावे.




    ओवी ६-१७३
    जेथ अमृताचेनि पाडें, मुळाहीसकट गोडें।
    जोडती दाटें झाडें, सदा फळतीं।
    अर्थ: जेथे अमृताच्या योग्यतेची मुळासकट गोड असलेली व नेहेमी फळणारी अशी दाट झाडे लागतात.




    ओवी ६-१७४
    पाउला पाउला उदकें, वर्षाकाळेंही अतिचोखें।
    निर्झरें का विशेखें, सुलभें जेथ।
    अर्थ: ज्या ठिकाणी पावलोपावली पाणी आहे, पण ते पावसाळ्यातही निर्मळ असते, व जेथे तर विशेष करून पाण्याचे झरे सहज आढळतात.




    ओवी ६-१७५
    हा आतपुही आळुमाळु, जाणिजे तरी शीतळु।
    पवनु अति निश्चळु, मंदु झुळके।
    अर्थ: हे ऊन देखील जेथे सौम्य भासते आणि जेथे वारा अतिशय शांत असून त्याच्या मंद झुळुका येत असतात.




    ओवी ६-१७६बहुत करूनि निःशब्द, दाट न रिगे श्वापद।
    शुक हन षट्पद, तेउतें नाहीं।
    अर्थ: जे स्थान बहुतेक नि:शब्द असावे व ज्या ठिकाणी राघू आणि भ्रमर नसावेत.




    ओवी ६-१७७
    पाणिलगें हंसें, दोनी चारी सारसें।
    कवणे एके वेळे बैसे, तरी कोकिळही हो।
    अर्थ: ज्या ठिकाणी पाण्याच्या संबंधाने असणारे हंस, दोन चार चक्रवाक, कोणी एखाद्या वेळेला कोकिळही असला तरी चालेल.




    ओवी ६-१७८
    निरंतर नाहीं, तरी आलीं गेलीं कांहीं।
    होतु कां मयूरेंही, आम्ही ना न म्हणों।
    अर्थ: जेथे नेहेमी जरी नाही तरी येऊन जाऊन असणारे काही मोरही असले तरी त्यास आमची ना नाही.




    ओवी ६-१७९
    परि आवश्यक पांडवा, ऐसा ठावो जोडावा।
    तेथ निगूढ मठ होआवा, कां शिवालय।
    अर्थ: परंतु अर्जुना असे स्थान जरुर शोधून ठेवावे. त्या ठिकाणी सहज दृष्टीस न पडणारा एखादा मठ अथवा शंकराचे देऊळ असावे.




    ओवी ६-१८०
    दोहींमाजीं आवडे तें, जें मानलें होय चित्तें।
    बहुतकरूनि एकांते, बैसिजे गा।
    अर्थ: या दोहोमध्ये जे मनाला मानेल असे एक स्थान असावे. बहुतकरून एकांतात बसावे.




    ओवी ६-१८१
    म्हणौनि तैसें तें जाणावें, मन राहतें पाहावें।
    राहील तेथ रचावें, आसन ऐसें।
    अर्थ: म्हणून ते स्थान तसे आहे की नाही हे समजून घ्यावे. आपले मन तेथे स्थिर रहाते की नाही ते पहावे आणि राहील तर तेथे आसन लावावे.




    ओवी ६-१८२
    वरी चोखट मृगसेवडी, माजीं धूतवस्त्राची घडी।
    तळवटीं अमोडी, कुशांकुर।
    अर्थ: तळास साग्र दर्भ घालून त्यावर शुद्ध कृष्णाजिन घालून त्यावर धुतलेल्या वस्त्राची घडी घालावी.




    ओवी ६-१८३
    सकोमळ सरिसे, सुबद्ध राहती आपैसे।
    एकपाडें तैसें, वोजा घालीं।
    अर्थ: ते दर्भ कोवळे असून सारखे व सहजच एकमेकाला लागलेले रहातील असे व्यवस्थेने घालावेत.




    ओवी ६-१८४
    परि सावियाचि उंच होईल, तरी आंग हन डोलेल।
    नीच तरी पावेल, भूमिदोषु।
    अर्थ: परंतु ते आसन कदाचित उंच होईल तर शरीर कलंडेल आणि सखल होईल तर जमिनीचे (गारवा वगैरे दोष प्राप्त होतील.





    ओवी ६-१८५
    म्हणौनि तैसें न करावें, समभावें धरावें।
    हें बहु असो होआवें, आसन ऐसें।
    अर्थ: म्हणून आसन उंच अथवा सखल होऊ देऊ नये, तर ते समांतर घालावे. आता हे फार वर्णन करणे पुरे. अशा प्रकारचे आसन असावे.




    ओवी ६-१८६मग तेथ आपण, एकाग्र अंतःकरण।
    करूनि सद्गुरुस्मरण, अनुभविजे॥
    अर्थ: मग तेथे आपण एकाग्र अंत:करण करून मनात सद्गुरूचे स्मरण करावे.




    ओवी ६-१८७
    जेथ स्मरतेनि आदरें, सबाह्य सात्त्विकें भरे।
    जंव काठिण्य विरे, अहंभावाचें॥
    अर्थ: त्या स्मरणाच्या आदराने अहंकाराचा कठिणपणा इतका नाहीसा होतो की तो स्मरण करणारा आत आणि बाहेर सात्विक भावांनी व्याप्त होतो.




    ओवी ६-१८८
    विषयांचा विसरु पडे, इंद्रियांची कसमस मोडे।
    मनाची घडी घडे, हृदयामाजीं॥
    अर्थ: विषयांचा विसर पडतो, इंद्रियांची अस्वस्थता दूर होते, आणि मन हृदयात स्थिर होते.




    ओवी ६-१८९
    ऐसें ऐक्य हें सहजें, फावें तंव राहिजे।
    मग तेणेंचि बोधें, बैसिजे आसनावरी॥
    अर्थ: याप्रमाणे साधकाला ऐक्य सहज प्राप्त होईपर्यंत थांबावे, आणि मग त्या ऐक्याच्या बोधाने आसनावर स्थिर बसावे.




    ओवी ६-१९०तां आंगातें आंग वरी । पवनातें पवनु धरी ।
    ऐसी अनुभवाची उजरी । होंचि लागे॥
    अर्थ: आसनावर स्थिर बसल्यानंतर, शरीर आपले अंग स्वतःच नियंत्रित करते, वायू स्वतःलाच संयमित करतो, आणि याप्रमाणे अनुभवाची स्पष्टता प्रकट होऊ लागते.




    ओवी ६-१९१
    प्रवृत्ति माघौति मोहरे । समाधि ऐलाडी उतरे ।
    आघवें अभ्यासु सरे । बैसतखेंवो॥
    अर्थ: मनाची प्रवृत्ती मागे हटते, समाधी सहजपणे प्राप्त होते, आणि बसताक्षणीच साधकाचा सारा अभ्यास संपतो.




    ओवी ६-१९२
    मुद्रेची प्रौढी ऐशी । तेचि सांगिजेल आतां परियेसीं ।
    तरी उरु या जघनासी । जडोनि घालीं॥
    अर्थ: मुद्रेचे महत्त्व खूप मोठे आहे, ते आता सांगतो. पायाच्या मांडीला जांघेवर लावून व्यवस्थित घालावे.




    ओवी ६-१९३
    चरणतळें देव्हडीं । आधारद्रुमाच्या बुडीं ।
    सुघटितें गाढीं । संचरीं पां॥
    अर्थ: दोन्ही तळपाय वाकडे करून गुदप्रदेशाच्या ठिकाणी व्यवस्थित बसवावे.




    ओवी ६-१९४
    सव्य तो तळीं ठेविजे । तेणें सिवणीमध्यें पीडिजे ।
    वरी बैसे तो सहजें । वाम चरणु॥
    अर्थ: उजव्या पायाची टाच गुदप्रदेशावर ठेवून दाबावी, त्यामुळे त्यावर सहजच डावा पाय बसतो.




    ओवी ६-१९५
    गुद मेंढ्राआंतौतीं । चारी अंगुळें निगुतीं ।
    तेथ सार्ध सार्ध प्रांतीं । सांडूनियां॥
    अर्थ: गुद आणि जननेंद्रियांच्या मधली चार बोटे जागा सोडून, अर्धी बोट वर आणि अर्धी बोट खाली अशी जागा ठेवावी.




    ओवी ६-१९६
    माजी अंगुळ एक निगे । तेथ टांचेचेनि उत्तरभागें ।
    नेहेटिजे वरि आंगें । पेललेनि॥
    अर्थ: जी एक बोट जागा उरते, त्या जागी उजव्या पायाच्या टाचेला ठेवावे व शरीराला वर उचलून धरावे.




    ओवी ६-१९७
    उचलिलें कां नेणिजे । तैसें पृष्ठांत उचलिजे ।
    गुल्फद्वय धरिजे । तेणेंचि मानें॥
    अर्थ: शरीर उचलले आहे की नाही ते कळू न देता, पाठीचा खालचा भाग हलका उचलावा आणि दोन्ही घोटे व्यवस्थित धरावेत.




    ओवी ६-१९८
    मग शरीर संचु पार्था । अशेषही सर्वथा ।
    पार्ष्णीचा माथा । स्वयंभु होय॥
    अर्थ: अर्जुना, मग शरीराचा आकार अगदी टाचेच्या शीर्षबिंदूपर्यंत व्यवस्थित होऊन जातो.




    ओवी ६-१९९
    अर्जुना हें जाण । मूळबंधाचें लक्षण ।
    वज्रासन गौण । नाम यासी॥
    अर्थ: अर्जुना, हे मूळबंधाचे लक्षण समज आणि याचेच गौण नाव वज्रासन आहे.




    ओवी ६-२००
    ऐसी आधारीं मुद्रा पडे । आणि आधींचा मार्गु मोडे ।
    तेथ अपानु आंतुलेकडे । वोहोटों लागे॥
    अर्थ: जेव्हा आधारचक्रावर योग्य प्रकारे मूळबंध लागू होतो, खालचा मार्ग बंद होतो आणि अपान वायु शरीराच्या आतल्या दिशेने वाहू लागतो.




    ओवी ६-२०१तंव करसंपुट आपैसें । वाम चरणीं बैसे ।
    तंव बाहुमूळीं दिसे । थोरीव आली ॥अर्थ:
    मग हाताची हस्तांजुळी स्वतःहून डाव्या पायावर येऊन बसते, ज्यामुळे खांदे उंच दिसू लागतात.




    ओवी ६-२०२
    माजीं उभारलेनि दंडें । शिरकमळ होय गाढें ।

    नेत्रद्वारींचीं कवाडें । लागूं पाहती ॥
    अर्थ: वर उचललेल्या खांद्यामुळे मस्तक स्थिर होऊन, डोळ्यांच्या पापण्या हलकेच झाकायला लागतात.




    ओवी ६-२०३
    वरचिलें पातीं ढळतीं । तळींचीं तळीं पुंजाळती ।

    तेथ अर्धोन्मीलित स्थिती । उपजे तया ॥
    अर्थ: वरच्या पापण्या हलक्याशा ढळतात आणि खालच्या पापण्या खाली स्थिर होतात, ज्यामुळे अर्धवट उघडी डोळ्यांची स्थिती तयार होते.




    ओवी ६-२०४
    दिठी राहोनि आंतुलीकडे । बाहेर पाऊल घाली कोडें ।

    ते ठायीं ठावो पडे । नासाग्रपीठीं ॥
    अर्थ: दृष्टि डोळ्यांच्या आतच राहते, आणि कधी बाहेर आलीच तर ती नाकाच्या शेंड्यावर स्थिर राहते.




    ओवी ६-२०५
    ऐसें आंतुच्या आंतुचि रचे । बाहेरी मागुतें न वचे ।

    म्हणौनि राहणें आधिये दिठीचें । तेथेंचि होय ॥
    अर्थ: अशा प्रकारे दृष्टि आतल्याच ठिकाणी स्थिर होते, ती बाहेर पडत नाही, म्हणून अर्धवट उघड्या डोळ्यांची स्थिती नाकाच्या शेंड्यावरच होते.




    ओवी ६-२०६
    आतां दिशांची भेटी घ्यावी । कां रूपाची वास पहावी ।

    हे चाड सरे आघवी । आपैसया ॥
    अर्थ: आता चारही दिशांकडे पाहण्याची वा कोणतेही रूप पाहण्याची इच्छा नाहीशी होते.




    ओवी ६-२०७
    मग कंठनाळ आटे । हनुवटी हडौती दाटे ।

    ते गाढी होऊनि नेहटे । वक्षःस्थळीं ॥
    अर्थ: मग गळा आकुंचित होतो, हनुवटी (चिन) घट्ट होते आणि छातीवर स्थिरपणे दाबली जाते.




    ओवी ६-२०८
    माजीं घंटिका लोपे । वरी बंधु जो आरोपे ।

    तो जालंधरु म्हणिपे । पंडुकुमरा ॥
    अर्थ: गळ्याची घंटिका (कंठमणी) अदृश्य होते आणि जो बंध तयार होतो, त्याला जालंधर बंध म्हणतात.




    ओवी ६-२०९
    नाभीवरी पोखे । उदर हें थोके ।

    अंतरीं फांके । हृदयकोशु ॥
    अर्थ: नाभीवरील बंधामुळे पोट खपाटीला जाते आणि हृदयकमल फुलते.




    ओवी ६-२१०
    स्वाधिष्ठानावरिचिले कांठीं । नाभिस्थानातळवटीं ।

    बंधु पडे किरीटी । वोढियाणा तो ॥
    अर्थ: स्वाधिष्ठानावर आणि नाभिस्थानाच्या खालच्या भागात जो बंध तयार होतो, त्याला "वोढियाणा बंध" म्हणतात.




    ओवी ६-२११
    ऐसी शरीराबाहेरलीकडे । अभ्यासाची पांखर पडे ।

    तंव आंतु त्राय मोडे । मनोधर्माची ॥
    अर्थ: या प्रकारे शरीराबाहेर अभ्यासाची छटा दिसते, आणि आत मनाच्या अस्थिरतेचा अंत होतो.




    ओवी ६-२१२
    कल्पना निमे । प्रवृत्ती शमे ।

    आंग मन विरमे । सावियाचि ॥
    अर्थ: कल्पना नाहीशा होतात, मनाची बाह्य प्रवृत्ती थांबते, आणि शरीर व मन स्वाभाविकच विश्रांती घेतात.




    ओवी ६-२१३
    क्षुधा काय जाहाली । निद्रा केउती गेली ।

    हे आठवणही हारपली । न दिसे वेगां ॥
    अर्थ: भूक काय झाली, झोप कोठे गेली याचे भानही राहत नाही.




    ओवी ६-२१४
    जो मूळबंधें कोंडला । अपानु माघौता मुरडला ।

    तो सवेंचि वरी सांकडला । धरी फुगूं ॥
    अर्थ: मूळबंधामुळे जो अपान वायू थांबवला जातो, तो उलटा फिरून वर चढतो आणि शरीर फुगलेले वाटते.




    ओवी ६-२१५
    क्षोभलेपणें माजे । उवाइला ठायीं गाजे ।

    मणिपूरेंसीं झुंजे । राहोनियां ॥
    अर्थ: अपान वायू उत्तेजित होतो आणि मणिपूर चक्राजवळ घोटाळतो, जणू तेथे संघर्ष करतो.




    ओवी ६-२१६
    मग थावलिये वाहटुळी । सैंघ घेऊनि घर डहुळी ।

    बाळपणींची कुहीटुळी । बाहेर घाली ॥
    अर्थ: मग अपान वायू शरीरात खोल शोधन करतो आणि लहानपणीच्या शरीरातील कुचकी घाण बाहेर काढतो.




    ओवी ६-२१७
    भीतरीं वळी न धरे । कोठ्यामाजीं संचरे ।

    कफपित्तांचे थारे । उरों नेदी ॥
    अर्थ: वायू आत शिरतो आणि शरीरात जमा झालेला कफ व पित्त यांचा थारा दूर करतो.




    ओवी ६-२१८
    धातूंचे समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी ।

    आंतली मज्जा काढी । अस्थिगत ॥
    अर्थ: सप्तधातूंचे समुद्र ओलांडून, मेदाचे पर्वत फोडून हाडांमधील मज्जा बाहेर काढतो.




    ओवी ६-२१९
    नाडीतें सोडवी । गात्रांतें विघडवी ।
    साधकातें भेडसावी । परी बिहावें ना ॥
    अर्थ: तो नाड्या मोकळ्या करतो, शरीराच्या अंगांचा वेध घेतो, आणि साधकाला धक्का देतो, पण साधकाने घाबरू नये.




    ओवी ६-२२०
    व्याधीतें दावी । सवेंचि हरवी ।
    आप पृथ्वी कालवी । एकवाट ॥
    अर्थ: तो रोगांना रोखतो आणि नष्ट करतो, आणि शरीरातील पृथ्वी आणि पाण्याचे अंश एकमेकात मिसळतो.



    ओवी ६-२२१तंव येरीकडे धनुर्धरा । आसनाचा उबारा ।
    शक्ति करी उजगरा । कुंडलिनीतें ॥अर्थ:
    अर्जुना, वज्रासनाच्या उष्णतेमुळे कुंडलिनी शक्ती जागृत होते, जणू धनुर्धारी योद्धा (धनुर्धरा) सज्ज झाल्यासारखे.




    ओवी ६-२२२
    नागिणीचें पिलें । कुंकुमें नाहलें ।

    वळण घेऊनि आलें । सेजे जैसें ॥
    अर्थ: जणू नागिणीचे पिल्लू केशराने स्नान करून वळणे घेत आपल्या सेजेला येऊन निजते तसेच कुंडलिनी देखील आहे.




    ओवी ६-२२३
    तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी ।

    अधोमुख सर्पिणी । निदेली असे ॥
    अर्थ: कुंडलिनी म्हणजेच साडेतीन वळ्यांची मोठी, खाली तोंड करून झोपलेली सर्पिणी आहे.




    ओवी ६-२२४
    विद्युल्लतेची विडी । वन्हिज्वाळांची घडी ।

    पंधरेयाची चोखडी । घोंटीव जैशी ॥
    अर्थ: ती कुंडलिनी जणू वीजेच्या चमचमत्या कड्याप्रमाणे, अग्नीच्या ज्वालांच्या घड्यांप्रमाणे किंवा उत्कृष्ट सोन्याच्या गोलाकार गाठीसारखी आहे.




    ओवी ६-२२५
    तैशी सुबद्ध आटली । पुटीं होती दाटली ।

    तें वज्रासनें चिमुटली । सावधु होय ॥
    अर्थ: ती कुंडलिनी व्यवस्थितपणे आकुंचित होऊन नाभीजवळच्या जागेत दाटून बसलेली आहे आणि वज्रासनाने चिमटीत धरल्यामुळे ती जागृत होते.




    ओवी ६-२२६
    तेथ नक्षत्र जैसें उलंडलें । कीं सूर्याचें आसन मोडलें ।
    तेजाचें बीज विरूढलें । अंकुरेंशीं ॥

    अर्थ: ती जागृत होणे जणू तारे तुटून पडावे, सूर्याने आपले आसन सोडावे किंवा तेजाचे बीज अंकुर फुटून वाढावे यासारखे आहे.




    ओवी ६-२२७
    तैशी वेढियातें सोडिती । कवतिकें आंग मोडिती ।

    कंदावरी शक्ती । उठली दिसे ॥
    अर्थ: कुंडलिनी जणू आपल्या वळणातून सुटते, कौतुकाने अंग हलवते, आणि नाभीच्या खालील कंदावर शक्ती उभारली जाते.




    ओवी ६-२२८
    सहजें बहुतां दिवसांची भूक । वरी चेवविली तें होय मिष ।
    मग आवेशें पसरी मुख । ऊर्ध्वा उजू ॥

    अर्थ: ती कुंडलिनी सहजच अनेक दिवसांच्या भुकेने त्रस्त असते, आणि ती जागी झाल्यावर आपल्या तोंडाचा आवेशात प्रसार करते, वरती उचलते.




    ओवी ६-२२९
    तेथ हृदयकोशातळवटीं । जो पवनु भरे किरीटी ।

    तया सगळेयाचि मिठी । देऊनि घाली ॥
    अर्थ: अर्जुना, हृदयकोशाच्या तळाशी असलेला वारा ती कुंडलिनी पकडून आवळते व खाऊन टाकते.




    ओवी ६-२३०
    मुखींच्या ज्वाळीं । तळीं वरी कवळी ।

    मांसाची वडवाळी । आरोगूं लागे ॥
    अर्थ: ती कुंडलिनी आपल्या तोंडातील ज्वाळांनी संपूर्ण शरीर व्यापते आणि शरीरातील मांसाचे तुकडे खाऊ लागते.




    ओवी ६-२३१:जे जे ठाय समांस, तेथ आहाच जोडे घाउस।
    पाठी एकदोनी घांस, हियाही भरी॥
    अर्थ: कुंडलिनी ज्या ठिकाणी मांसल भाग आहे तिथे मोठ्या लचक्याने त्या भागाचे सेवन करते आणि हृदयाचा भाग देखील सोडत नाही.




    ओवी ६-२३२:
    मग तळवे तळहात शोधी, उर्ध्वींचे खंड भेदी।
    झाडा घे संधी, प्रत्यंगाचा॥
    अर्थ: नंतर कुंडलिनी तळहात आणि तळपायातून प्रवास करते, वरच्या भागाचे भेदन करते, आणि प्रत्येक सांध्यावर नियंत्रण ठेवते.




    ओवी ६-२३३:
    अधोभाग तरी न संडी, परि नखींचेंही सत्त्व काढी।
    त्वचा धुवूनि जडी, पांजरेशीं॥
    अर्थ: ती आपल्या नियंत्रणात खालच्या भागाला धरून ठेवते, नखांचा सत्त्व घेतले जाते, आणि त्वचा धुवून हाडांच्या सापळ्यास चिकटवते.




    ओवी ६-२३४:
    अस्थींचे नळे निरपे, शिरांचे हीर वोरपे।
    तंव बाहेरी विरूढी करपे, रोमबीजांची॥
    अर्थ: कुंडलिनी हाडांच्या नळ्या आणि शिरांचे सर्व पदार्थ ओरपून घेते आणि त्यावेळी बाहेरून केसांची वाढ होण्याची शक्ती कमी होते.




    ओवी ६-२३५:
    मग सप्तधातूंच्या सागरीं, ताहानेली घोंट भरी।
    आणि सवेंचि उन्हाळा करी, खडखडीत॥
    अर्थ: ती सप्तधातूंना तहानेने पिऊन टाकते, त्यामुळे शरीरात एक प्रकारचा कोरडेपणा निर्माण होतो.




    ओवी ६-२३६:
    नासापुटौनि वारा, जो जातसे अंगुळें बारा।
    तो गच्च धरूनि माघारा, आंतु घाली॥
    अर्थ: ती नाकातून आत जाणाऱ्या वायूला गच्च धरून, त्याला आत मागे ढकलते.




    ओवी ६-२३७:
    तेथ अध वरौतें आकुंचे, ऊर्ध्व तळौतें खांचे।
    तया खेंवामाजि चक्राचे, पदर उरती॥
    अर्थ: त्यावेळी खालचा वायू वरती खेचला जातो आणि वरचा वायू खाली ढकलला जातो, त्यामुळे चक्रांचा फक्त पदर तेवढा उरतो.




    ओवी ६-२३८:
    एऱ्हवीं तरी दोन्ही तेव्हांचि मिळती, परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती।
    ते तयांतें म्हणे परौती, तुम्हीच कायसी येथे॥
    अर्थ: सामान्यत: प्राण आणि अपान वायूंचा मिलाफ सहज होतो, परंतु कुंडलिनी क्रोधाने विचारते, "तुम्ही कोण? येथून निघून जा."




    ओवी ६-२३९:
    आइकें पार्थिव धातु आघवी, आरोगितां कांहीं नुरवी।
    आणि आपातें तंव ठेवी, पुसोनियां॥
    अर्थ: अर्जुन, पृथ्वीशी संबंधित सर्व धातूंना ही कुंडलिनी काहीच शिल्लक ठेवत नाही आणि पाण्याचे भाग तर ती चाटून साफ करते.




    ओवी ६-२४०:
    ऐसी दोनी भूतें खाये, ते वेळीं संपूर्ण धाये।
    मग सौम्य होउनि राहे, सुषुम्नेपाशीं॥
    अर्थ: याप्रमाणे पृथ्वी आणि जल तत्त्वांचे सेवन केल्यावर कुंडलिनी तृप्त होते आणि शांत होऊन सुषुम्ना नाडीच्या जवळ स्थिर होते.




    ओवी ६-२४१तेथ तृप्तीचेनि संतोषें । गरळ जें वमी मुखें ।
    तेणें तियेचेनि पीयूषें । प्राणु जिये ॥६-२४१॥
    अर्थ: त्यावेळी तृप्त होऊन समाधान झाल्यावर ती तोंडाने जे गरळ ओकते त्या गरळरूपी अमृताच्या योगाने प्राणवायु जगतो.




    ओवी ६-२४२
    तो अग्नि आंतूनि निघे । परी सबाह्य निववूंचि लागे ।
    ते वेळीं कसु बांधिती आंगें । सांडिला पुढती ॥६-२४२॥
    अर्थ: तो गरळरूपी अमृताचा अग्नी तिच्या तोंडातून निघतो खरा, परंतु तो अग्नी आत व बाहेर थंडच करू लागतो, त्यावेळेस सर्व गात्रांची गेलेली शक्ती पुन्हा येऊ लागते.




    ओवी ६-२४३
    मार्ग मोडिती नाडीचे । नवविधपण वायूचें ।
    जाय म्हणौनि शरीराचे । धर्मु नाहीं ॥६-२४३॥
    अर्थ: नाड्यांचे वहाणे बंद पडते व वायूचे नऊ प्रकार जातात म्हणून शरीराचे धर्म रहात नाहीत.




    ओवी ६-२४४
    इडा पिंगळा एकवटती । गांठी तिन्ही सुटती ।
    साही पदर फुटती । चक्रांचे हे ॥६-२४४॥
    अर्थ: इडा व पिंगळा ह्या दोन्ही नाड्या एक होतात आणि तिन्ही गांठी सुटून सहा चक्रांचेही पदर फुटतात.




    ओवी ६-२४५
    मग शशी आणि भानु । ऐसा कल्पिजे जो अनुमानु ।
    तो वातीवरी पवनु । गिंवसितां न दिसे ॥६-२४५॥
    अर्थ: अनुमानिक कल्पनेने ठरवलेले डाव्या व उजव्या नाकपुडीतून वहाणारे चंद्रसूर्यरूपी वायु, नाकापुढे कापूस धरून पाहिले तरी दिसत नाहीत.




    ओवी ६-२४६
    बुद्धीची पुळिका विरे । परिमळु घ्राणीं उरे ।
    तोही शक्तीसवें संचरे । मध्यमेमाजीं ॥६-२४६॥
    अर्थ: बुद्धीचा आकार (चैतन्यात) नाहीसा होतो व नाकामधे राहिलेली गंध घेण्याची जी शक्ति, ती कुंडलिनीबरोबर सुषुम्ना नाडीत शिरते.




    ओवी ६-२४७
    तंव वरिलेकडोनि ढाळें । चंद्रामृताचें तळें ।
    कानवडोनी मिळे । शक्तिमुखीं ॥६-२४७॥
    अर्थ: तेव्हा वरच्या बाजूस हळू हळू चंद्रामृताचे तळे कलते होऊन ते चंद्रामृत कुंडलिनीच्या मुखात पडते.




    ओवी ६-२४८
    तेणें नाळकें रस भरे । तो सर्वांगामाजीं संचरे ।
    जेथिंचा तेथ मुरे । प्राणपवनु ॥६-२४८॥
    अर्थ: त्या नळीने (कुंडलिनीने) रस भरतो, तो सर्वांगामधे संचार करतो व प्राणवायु जेथल्या तेथे मुरतो.




    ओवी ६-२४९
    तातलिये मुसें । मेण निघोनि जाय जैसें ।
    मग कोंदली राहे रसें । वोतलेनी ॥६-२४९॥
    अर्थ: तापलेल्या मुशीतील मेण निघून गेल्यावर मग ती मूस जशी नुसत्या ओतलेल्या रसानेच भरून रहाते.




    ओवी ६-२५०
    तैसें पिंडाचेनि आकारें । ते कळाचि कां अवतरे ।
    वरी त्वचेचेनि पदरे । पांघुरली असे ॥६-२५०॥
    अर्थ: त्याप्रमाणे शरीराच्या आकाराने जणु काय त्वचेचा पदर पांघरलेले मूर्तिमंत तेजच प्रकट झालेले असते.



    ओवी ६-२५१जैशी आभाळाची बुंथी । करूनि राहे गभस्ती ।
    मग फिटलिया दीप्ति । धरूनि ये ॥६-२५१॥
    अर्थ: सूर्यवर ढगांचे आवरण आले असता त्याचे तेज झाकलेले असते, पण ते ढगांचे आवरण निघून गेल्यावर मग त्याचे तेज जसे आवरून धरता येत नाही.




    ओवी ६-२५२
    तैसा आहाचवरि कोरडा । त्वचेचा असे पातोडा ।
    तो झडोनि जाय कोंडा । जैसा होय ॥६-२५२॥
    अर्थ: त्याप्रमाणे वरवर असणारा कातड्याचा कोरडा पापुद्रा कोंड्यासारखा झडून जातो.




    ओवी ६-२५३
    मग काश्मीरीचे स्वयंभ । कां रत्नबीजा निघाले कोंभ ।
    अवयवकांतीची भांब । तैसी दिसे ॥६-२५३॥
    अर्थ: मग जणु काय मूर्तिमंत स्फटिकच अथवा रत्नरूप बीजास निघालेला अंकुरच की काय अशी अवयवांच्या कांतीची शोभा दिसते.




    ओवी ६-२५४
    नातरी संध्यारागींचे रंग । काढूनि वळिलें तें आंग ।
    कीं अंतर्ज्योतीचें लिंग । निर्वाळिलें ॥६-२५४॥
    अर्थ: अथवा संध्याकालाच्या आकाशरंगाचे रंग काढून बनवलेली किंवा प्रत्यगात्म्याचे शुद्ध लिंगच.




    ओवी ६-२५५
    कुंकुमाचें भरींव । सिद्धरसाचें वोतींव ।
    मज पाहतां सावेव । शांतिचि ते ॥६-२५५॥
    अर्थ: केशराचे पूर्ण भरलेले किंवा अमृताचे ओतलेले, अथवा ते पहातांना मला असे वाटते की ती मूर्तिमंत शांतीच आहे.




    ओवी ६-२५६
    तें आनंदचित्रींचें लेप । नातरी महासुखाचें रूप ।
    कीं संतोषतरूचें रोप । थांबलें जैसें ॥६-२५६॥
    अर्थ: ते योग्याचे शरीर आनंदरूपी चित्राचा रंग अथवा ब्रह्मसुखाची प्रत्यक्ष मूर्तीच किंवा संतोषरूप झाडाचे जसे काही बळावलेले रोप आहे.





    ओवी ६-२५७
    तो कनकचंपकाचा कळा । कीं अमृताचा पुतळा ।
    नाना सासिन्नला मळा । कोंवळिकेचा ॥६-२५७॥
    अर्थ: तो योगी सोनचाफ्याची मोठी कळी अथवा अमृताचा पुतळा किंवा नाजुकपणाचा भरास आलेला मळाच.




    ओवी ६-२५८
    हो कां जे शारदियेचेनि वोलें । चंद्रबिंब पाल्हेलें ।
    कां तेजचि मूर्त बैसलें । आसनावरी ॥६-२५८॥
    अर्थ: किंवा शरदऋतूच्या ओलाव्याने टवटवीत झालेले चंद्रबिंबच अथवा आसनावर बसलेले मूर्तिमंत तेजच की काय.




    ओवी ६-२५९
    तैसें शरीर होये । जे वेळीं कुंडलिनी चंद्र पीये ।
    मग देहाकृति बिहे । कृतांतु गा ॥६-२५९॥
    अर्थ: ज्यावेळी कुंडलिनी चंद्रामृत पिते त्यावेळी शरीर असे होते. मग त्या देहाच्या आकाराला पाहून यम भितो.




    ओवी ६-२६०
    वार्धक्य तरी बहुडे । तारुण्याची गांठी विघडे ।
    लोपली उघडे । बाळदशा ॥६-२६०॥
    अर्थ: म्हातारपण मागे फिरते, व तारुण्याचा वियोग होतो आणि गेलेली बाल्यावस्था परत येते.



    ओवी ६-२६१वयसा तरी येतुलेवरी । एऱ्हवीं बळाचा बळार्थु करी ।
    धैर्याची थोरी । निरुपमु ॥६-२६१॥
    अर्थ: वय तर त्याचे इतके तथापि जेवढी बलवान पुरुष कृत्ये करू शकतो, तेवढी हा करतो. आणि ज्याच्या धैर्याच्या थोरवीला तर उपमा नाही.



    ओवी ६-२६२
    कनकद्रुमाच्या पालवीं । रत्नकळिका नित्य नवी ।
    नखें तैसीं बरवीं । नवीं निघती ॥६-२६२॥
    अर्थ: सोन्याच्या झाडाला पालवी फुटून जशी रत्नाची नित्य कळी यावी तशी चांगली नवी नखे येतात.



    ओवी ६-२६३
    दांतही आन होती । परि अपाडें सानेजती ।
    जैसी दुबाहीं बैसे पांती । हिरेयांची ॥६-२६३॥
    अर्थ: दातही दुसरे नवे येतात. पण ते फार लहान होतात व ते असे दिसतात की जणुकाय दुतर्फा हिर्‍यांची रांगच बसली आहे.




    ओवी ६-२६४
    माणिकुलियांचिया कणिया । सावियाचि अणुमानिया ।
    तैसिया सर्वांगीं उधवती अणियां । रोमांचियां ॥६-२६४॥
    अर्थ: ज्याप्रमाणे माणकाचे अणुएवढाले कण असावेत त्याप्रमाणे सहजच सर्व अंगावर केसांची अग्रे वर येतात.




    ओवी ६-२६५
    करचरणतळें । जैसीं कां रातोत्पलें ।
    पाखाळींव होती डोळे । काय सांगों ॥६-२६५॥
    अर्थ: तळहात व तळपाय हे तांबड्या कमळाप्रमाणे असतात व डोळे किती स्वच्छ होतात हे काय सांगू?




    ओवी ६-२६६
    निडाराचेनि कोंदाटें । मोतियें नावरती संपुटें ।
    मग शिवणी जैशी उतटे । शुक्तिपल्लवांची ॥६-२६६॥
    अर्थ: परिपूर्ण दशेला येऊन गच्च भरल्यामुळे मोती शिंपेच्या गर्भात मावत नाहीत, म्हणून जसा शिंपेच्या दोन शकलांचा सांधा उकलतो.




    ओवी ६-२६७
    तैशीं पातियांचिये कवळिये न समाये । दिठी जाकळोनि निघों पाहे ।
    आधिलीचि परी होये । गगना कवळिती ॥६-२६७॥
    अर्थ: त्याप्रमाणे दृष्टी पापण्यांच्या कवळीत न मावता त्या कवळीला व्यापून बाहेर निघण्यास पहाते. दृष्टी पूर्वीचीच असते परंतु ती आकाश व्यापणारी होते.




    ओवी ६-२६८
    आइके देह होय सोनियाचें । परि लाघव ये वायूचें ।
    जे आप आणि पृथ्वीचे । अंशु नाहीं ॥६-२६८॥
    अर्थ: अर्जुना ऐक, त्याचा देह सोन्याचा (सोन्यासारख्या कांतीचा) होतो, परंतु त्याला वायूसारखा हलकेपणा येतो. कारण की त्याच्यात पृथ्वीचे व पाण्याचे अंश नसतात.




    ओवी ६-२६९
    मग समुद्रापैलीकडील देखे । स्वर्गींचा आलोचु आइके ।
    मनोगत वोळखे । मुंगियेचें ॥६-२६९॥
    अर्थ: मग तो समुद्राच्या पलीकडचे पहातो, स्वर्गातील विचार ऐकतो, व मुंगीच्या मनातील भाव ओळखतो.




    ओवी ६-२७०
    पवनाचा वारिकां वळघे । चाले तरी उदकीं पाऊल न लागे ।
    येणें येणें प्रसंगें । येती बहुता सिद्धि ॥६-२७०॥
    अर्थ: वायुरूप घोड्यावर बसतो व पाण्यावर चालतो, पण पाण्यात पाऊल शिरत नाही. अशा अनेक प्रकारच्या सिद्धी त्यास प्रसंगानुरूप प्राप्त होतात.




    ओवी ६-२७१आइकें प्राणाचा हातु धरूनी । गगनाची पाउटी करूनी ।
    मध्यमेचेनि दादराहुनी । हृदया आली ॥६-२७१॥
    अर्थ: अर्जुना ऐक. प्राणवायूचा हात धरून, आकाशाची पायरी करून, सुषुम्नारूप जिन्याने हृदयात आली.




    ओवी ६-२७२
    ते कुंडलिनी जगदंबा । जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा ।
    जया विश्वबीजाचिया कोंभा । साउली केली ॥६-२७२॥
    अर्थ: जी कुंडलिनी जगाची आई आहे, ब्रह्मरूपी सार्वभौमाची शोभा आहे, व जिने विश्वाच्या बीजाच्या कोंभाला सावली केली आहे (आश्रय दिला आहे).




    ओवी ६-२७३
    जे शून्यलिंगाची पिंडी । जे परमात्मया शिवाची करंडी ।
    जे प्रणवाची उघडी । जन्मभूमी ॥६-२७३॥
    अर्थ: जी निराकार परमात्म्याचे चिन्ह दाखवणारी पिंडी, जी परब्रह्मरूपी शिवाची संबळी व जी प्राणांची उघड उघड जन्मभूमी आहे.




    ओवी ६-२७४
    हें असो ते कुंडलिनी बाळी । हृदयाआंतु आली ।
    अनुहताची बोली । चावळे ते ॥६-२७४॥
    अर्थ: हे असो. ती कुंडलिनी हृदयात (अनाहत चक्रात) येते तेव्हा ती अनाहताच्या शब्दाने बोलते.




    ओवी ६-२७५
    शक्तीचिया आंगा लागलें । बुद्धीचें चैतन्य होतें जाहलें ।
    तें तेणें आइकिलें । अळुमाळु ॥६-२७५॥
    अर्थ: कुंडलिनीला चिकटून राहिलेले जे बुद्धीचे (जाणीवशक्तियुक्त) ज्ञान (तिच्याबरोबर) आले होते, त्याने (त्या ज्ञानाने) तो अनाहत शब्द किंचित ऐकला.




    ओवी ६-२७६
    घोषाच्या कुंडीं । नादचित्रांचीं रूपडीं ।
    प्रणवाचिया मोडी । रेखिलीं ऐसीं ॥६-२७६॥
    अर्थ: घोषाच्या (परावाणीच्या) कुंडात नादचित्रांची (मध्यमारूपी) रुपडी ॐकाराच्या आकारासारखी रेखलेली असतात.




    ओवी ६-२७७
    हेंचि कल्पावें तरी जाणिजे । परी कल्पितें कैचें आणिजे ।
    तरी नेणों काय गाजे । तिये ठायीं ॥६-२७७॥
    अर्थ: याची कल्पना करता येईल तर समजून घ्यावे. पण आता कल्पना करणारे मन कोठून आणावे? तर त्या ठिकाणी काय वाजते, ते कळत नाही.




    ओवी ६-२७८
    विसरोनि गेलों अर्जुना । जंव नाशु नाहीं पवना ।
    तंव वाचा आथी गगना । म्हणौनि घुमे ॥६-२७८॥
    अर्थ: अर्जुना, पण ते तसे नव्हे, विसरून सांगण्याचेच राहिले, ते काय म्हणशील तर जोपर्यंत वायूचा नाश झाला नाही तोपर्यंत हृदयाकाशात शब्द असतो, म्हणून तो अनाहत शब्द घुमतो असे समज.




    ओवी ६-२७९
    तया अनाहताचेनि मेघें । आकाश दुमदुमों लागे ।
    तंव ब्रह्मस्थानींचें बेगें । फिटले सहजे ॥६-२७९॥
    अर्थ: मग त्या अनाहतरूप मेघाने आकाश दुमदुमायला लागते, तेव्हा ब्रह्मस्थानाचे द्वार आपोआप उघडते.




    ओवी ६-२८०
    आइकें कमळगर्भाकारें । जें महदाकाश दुसरें ।
    जेथ चैतन्य आधातुरें । करूनि असिजे ॥६-२८०॥
    अर्थ: अर्जुना ऐक. कमळाच्या गर्भाच्या आकाराप्रमाणे जे मूर्ध्नि आकाश आहे ते दुसरे महाकाशच आहे, त्या मूर्ध्न्याकाशाचे ठिकाणी चैतन्य अर्धे भोजन करू अतृप्त असते.




    ओवी ६-२८१तया हृदयाच्या परिवरीं । कुंडलिनिया परमेश्वरी ।
    तेजाची शिदोरी । विनियोगिली ॥६-२८१॥
    अर्थ: त्या चैतन्याला हृदयाकाशाच्या माजघरात असणारी कुंडलिनी देवी ही आपल्या तेजाची शिदोरी अर्पण करते.. (ती कशी तर)




    ओवी ६-२८२
    बुद्धीचेनि शाकें । हातबोनें निकें ।
    द्वैत तेथ न देखे । तैसें केलें ॥६-२८२॥
    अर्थ: द्वैत ज्याला पहाणार नाही असा बुद्धीच्या भाजीसह हातात घेतलेला चांगला नैवेद्य अर्पण केला.




    ओवी ६-२८३
    निजकांती हारविली । मग प्राणुचि केवळ जाहाली ।
    ते वेळीं कैसी गमली । म्हणावी पां ? ॥६-२८३॥
    अर्थ: याप्रमाणे आपले तेज अर्पण केल्यावर ती कुंडलिनी केवल प्राणवायुरूप होते, तेव्हा ती कशी भासते म्हणून म्हणाल तर




    ओवी ६-२८४
    हो कां जे पवनाची पुतळी । पांघुरली होती सोनसळी ।
    ते फेडूनियां वेगळी । ठेविली तिया ॥६-२८४॥
    अर्थ: जशी एखादी वार्‍याची पुतळी असावी व तिने पितांबर नेसलेला असावा व मग तिने वस्त्र सोडून ठेवावे




    ओवी ६-२८५
    नातरी वायूचेनि आंगें झगटली । दीपाची दिठी निवटली ।
    कां लखलखोनि हारपली । वीजु गगनीं ॥६-२८५॥
    अर्थ: अथवा वार्‍याची झुळुक लागून दिव्याची ज्योत नाहीशी व्हावी किंवा आकाशात वीज चमकून अदृश्य व्हावी




    ओवी ६-२८६
    तैशी हृदयकमळवेऱ्हीं । दिसे जैशी सोनियाची सरी ।
    नातरी प्रकाशजळाची झरी । वाहत आली ॥६-२८६॥
    अर्थ: अथवा हृदयकमळापर्यंत जणुकाय सोन्याची सरी अथवा प्रकाशरूप जलाचा झरा जसा काही वहात आला आहे तशी ती दिसते.




    ओवी ६-२८७
    मग ते हृदयभूमी पोकळे । जिराली कां एके वेळे ।
    तैसें शक्तीचें रूप मावळे । शक्तीचिमाजीं ॥६-२८७॥
    अर्थ: मग तो प्रकाशाचा झरा जसा हृदयाच्या पोकळ भूमीत एकदम जिरावा त्याप्रमाणे शक्तीचे रूप शक्तीमधेच मावळते.




    ओवी ६-२८८
    तेव्हां तरी शक्तीचि म्हणिजे । एऱ्हवीं तो प्राणु केवळ जाणिजे ।
    आतां नादुबिंदु नेणिजे । कळा ज्योती ॥६-२८८॥
    अर्थ: तेव्हा तरी शक्तीच म्हणतात, पण वास्तविक तो प्राणवायूच आहे असे समज. आता त्यास नाद, बिंदु, कला, ज्योती एवढे चारही धर्म नसतात.




    ओवी ६-२८९
    मनाचा हन मारु । कां पवनाचा आधारु ।
    ध्यानाचा आदरु । नाहीं परी ॥६-२८९॥
    अर्थ: मनाचा निग्रह करणे किंवा ध्यान करावेसे वाटणे हे प्रकार तेथे रहात नाहीत.




    ओवी ६-२९०
    हे कल्पना घे सांडी । तें नाहीं इये परवडी ।
    हे महाभूतांची फुडी । आटणी देखां ॥६-२९०॥
    अर्थ: ही कल्पना घे, ती कल्पना टाक, हे प्रकार तेथे नाहीत. कारण ही स्थिती पंचमहाभूतांची पक्की आटणी आहे असे समज.




    ओवी ६-२९१पिंडें पिंडाचा ग्रासु । तो हा नाथसंकेतींचा दंशु ।
    परि दाऊनि गेला उद्देशु । श्रीमहाविष्णु ॥६-२९१॥
    अर्थ: पिंडाने पिंडाचा ग्रास करणे (पंचमहाभूतांनी पंचमहाभूतांचा लय करावयाचा. हे आदिनाथ जे शंकर यांच्या अंतरंग खुणेचे मर्म आहे. परंतु हे मर्म श्रीविष्णु दाखवून गेले.




    ओवी ६-२९२
    तया ध्वनिताचें केणें सोडुनि । यथार्थाची घडी झाडुनी ।
    उपलविली म्यां जाणुनी । ग्राहीक श्रोते ॥६-२९२॥
    अर्थ: वरच्या ओवीत सांगितलेल्या उद्देशरूपी सणंगाच्या गूढपणारूपी दोर्‍या सोडून, यथार्थाची घडी साफ करून (हे या मालाचे योग्य) गिर्‍हाईक आहेत असे समजून, त्यांच्या पुढे घडी उलगडून मी हे सणंग ठेवले आहेत (असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात).




    ओवी ६-२९३
    ऐकें शक्तीचें तेज जेव्हां लोपे । तेथ देहाचें रूप हारपे ।
    मग तो डोळ्यांमाजीं लपे । जगाचिया ॥६-२९३॥
    अर्थ: अर्जुना, ऐक. कुंडलिनीचे तेज जेव्हा लय पावते, तेव्हा देहाचा आकार नाहीसा होतो, (देह वायुरूप होतो). तो याप्रमाणे सूक्ष्म झाल्यामुळे मग त्या योग्याला जगाच्या लोकांच्या) डोळ्यातच लपता येते.




    ओवी ६-२९४
    एऱ्हवीं आधिलाचि ऐसें । सावयव तरी दिसे ।
    परी वायूचें कां जैसें । वळिलें होय ॥६-२९४॥
    अर्थ: वास्तविक तो देह पूर्वीप्रमाणेच सावयव असतो, परंतु आता तो देह जसा वायूचाच बनवलेला असावा असा होतो.




    ओवी ६-२९५
    नातरी कर्दळीचा गाभा । बुंथी सांडोनी उभा ।
    कां अवयवचि नभा । उदयला तो ॥६-२९५॥
    अर्थ: अथवा केळीतील सोपटे काढून टाकून ती पोकळी जशी उभी करावी किंवा आकाशालाच अवयव उत्पन्न व्हावेत असा तो दिसतो.




    ओवी ६-२९६
    तैसें होय शरीर । तैं तें म्हणिजे खेचर ।
    हें पद होतां चमत्कार । पिंडजनीं ॥६-२९६॥
    अर्थ: असे ज्यावेळेस शरीर होते, तेव्हा त्यास खेचर (गगनविहारी) असे म्हणतात. देहधारी लोकात असे रूप होणे म्हणजे मोठा चमत्कार आहे.





    ओवी ६-२९७
    देखें साधकु निघोनि जाये । मागां पाउलांची वोळ राहे ।
    तेथ ठायीं ठायीं होये । अणिमादिक ॥६-२९७॥
    अर्थ: पहा साधक निघून गेल्यावर मागे जी पावलांची ओळ रहाते, तेथे ठिकठिकाणी आणिमादिक सिद्धी उत्पन्न होतात. (म्हणजे साधकाची जी जी भूमिका सिद्ध होईल त्या त्या ठिकाणी त्याला अणिमादिक सिद्धी प्राप्त होतात.).





    ओवी ६-२९८
    परि तेणें काय काज आपणयां । अवधारीं ऐसा धनंजया ।
    लोप आथी भूतत्रया । देहींचा देहीं ॥६-२९८॥
    अर्थ: पण आपल्याला त्या सिद्धींशी काय काम आहे ? अर्जुना ऐक. देहाच्या आतच तीनही भूतांचा असा लोप होतो.




    ओवी ६-२९९
    पृथ्वीतें आप विरवी । आपातें तेज जिरवी ।
    तेजातें पवनु हरवी । हृदयामाजीं ॥६-२९९॥
    अर्थ: पृथ्वीला पाणी नाहीसे करते, पाण्याला तेज नाहीसे करते व तेजाला वायु हृदयामधे नाहीसा करतो.




    ओवी ६-३००
    पाठीं आपण एकला उरे । परि शरीराचेनि अनुकारें ।
    मग तोही निगे अंतरें । गगना मिळे ॥६-३००॥
    अर्थ: नंतर प्राणवायु एकटा उरतो. पण तो शरीराच्या आकाराने असतो. मग तोही काही वेळाने निघून मूर्ध्निआकाशात शांत मिळतो.




    ओवी ६-३०१ते वेळीं कुंडलिनी हे भाष जाये । मग मारुत ऐसें नाम होये ।
    परि शक्तिपण तें आहे । जंव न मिळे शिवीं ॥६-३०१॥
    अर्थ: त्यावेळी कुंडलिनी ही भाषा जाते व तिला ‘मारुत्’ असे नाव मिळते. पण जोपर्यंत ती शिवाशी एकरूप होत नाही, तोपर्यंत तिचा शक्तिपणा असतोच.




    ओवी ६-३०२
    मग जालंधर सांडी । ककारांत फोडी ।
    गगनाचिये पाहाडीं । पैठी होय ॥६-३०२॥
    अर्थ: मग ती प्राणवायुरूप शक्ती जालंदर बंधाचे उल्लंघन करून टाळ्यावरती नऊ इंद्रियांचे ऐक्य होण्याचे जे काकीमुख म्हणून स्थान आहे, त्याचा भेद करून मग मूर्ध्न्याकशरूपी पर्वतावर जाऊन रहाते.




    ओवी ६-३०३
    ते ॐ काराचिये पाठी । पाय देत उठाउठी ।
    पश्यंतीचिये पाउटी । मागां घाली ॥६-३०३॥
    अर्थ: ती ॐकाराचे पाठीवर तात्काळ पाय देऊन पश्यंती वाणीची पायरी मागे टाकते.




    ओवी ६-३०४
    पुढां तन्मात्रा अर्धवेरी । आकाशाच्या अंतरीं ।
    भरती गमे सागरीं । सरिता जेवीं ॥६-३०४॥
    अर्थ: पुढे समुद्रात कशा नद्या मिळालेल्या दिसतात, त्याप्रमाणे अर्धमात्रापर्यंतच्या ॐकाराच्या मात्रा मूर्ध्नि-आकाशात मिळतात.




    ओवी ६-१५
    युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः ।
    शान्ति निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥६-१५॥
    अर्थ: मनाचे नियमन केलेला व याप्रमाणे मनाला सदा युक्त करणारा योगी जिचे पर्यवसान मोक्षामधे आहे, अशी मत्स्वरूप शांती प्राप्त करून घेतो.



    ओवी ६-३०५
    मग ब्रह्मरंध्रीं स्थिरावोनी । सोऽहंभावाच्या बाह्या पसरुनी ।
    परमात्मलिंगा धांवोनी । आंगा घडे ॥६-३०५॥
    अर्थ: मग ब्रह्मरंध्राचे ठिकाणी स्वस्थ होऊन ‘ते ब्रह्म मी आहे’ या भावनारूप बाहू पसरून त्वरेने परब्रह्मरूपी लिंगाशी ऐक्य पावते.




    ओवी ६-३०६
    तंव महाभूतांची जवनिका फिटे । मग दोहींसि होय झटें ।
    तेथ गगनासकट आटे । समरसीं तिये ॥६-३०६॥
    अर्थ: तेव्हा पंचमहाभूतांचा पडदा नाहीसा होतो व मग शक्ति आणि परमात्मा यांचे ऐक्य होते. त्या ऐक्यात मूर्ध्नि आकाशासकट सगळ्यांचा लय होतो.




    ओवी ६-३०७
    पैं मेघाचेनि मुखीं निवडिला । समुद्र कां वोघीं पडिला ।
    तो मागुता जैसा आला । आपणपयां ॥६-३०७॥
    अर्थ: मेघांच्या द्वाराने समुद्रापासून वेगळे झालेले समुद्राचे पाणी नदीच्या ओघात पडून, नदीच्या रूपाने जसे पुन्हा समुद्रास मिळते, (तो समुद्रच नदीच्या रूपाने आपणास मिळतो)




    ओवी ६-३०८
    तेवीं पिंडाचेनि मिषें । पदीं पद प्रवेशे ।
    तें एकत्व होय तैसें । पंडुकुमरा ॥६-३०८॥
    अर्थ: हे अर्जुना, याप्रमाणे शरीराच्या द्वारे जेव्हा शक्तिरूप टाकून शिवच शिवात मिळतो, तेव्हा ते एकत्व वरील समुद्राच्या ऐक्याप्रमाणे आहे.




    ओवी ६-३०९
    आतां दुजें हन होतें । कीं एकचि हें आइतें ।
    ऐशिये विवंचनेपुरतें । उरेचिना ॥६-३०९॥
    अर्थ: आता द्वैत होते की हे स्वरूप स्वत:सिद्ध एकच होते असा विचार करण्यापुरतीही जागा उरत नाही.




    ओवी ६-३१०
    गगनीं गगन लया जाये । ऐसें जें कांहीं आहे ।
    तें अनुभवें जो होये । तो होऊनि ठाके ॥६-३१०॥
    अर्थ: चिदाकाशात मूर्ध्निआकाशाचा लय होतो. अशी जी काही स्थिती आहे, ती अनुभवाने जो होईल त्यालाच ती स्थिती प्राप्त होईल.




    ओवी ६-३११म्हणौनि तेथिंची मातु । न चढेचि बोलाचा हातु ।
    जेणें संवादाचिया गांवाआंतु । पैठी कीजे ॥६-३११॥
    अर्थ: मागे सांगितल्याकारणाने त्या स्थितीची गोष्ट शब्दांनी सांगता येत नाही आणि शब्दांनी सांगता येईल तेव्हाच ती गोष्ट संवादाच्या गावात स्थापित करता येईल. (अर्थात शब्दांनी सांगताच येणार नाही तर तिजविषयी संवादही होणे शक्य नाही).




    ओवी ६-३१२
    अर्जुना एऱ्हवीं तरी । इया अभिप्रायाचा जे गर्व धरी ।
    ते पाहें पां वैखरी । दुरी ठेली ॥६-३१२॥
    अर्थ: अर्जुना सहज विचार करून पाहिले तरी हा अभिप्राय सांगण्याचा गर्व जी वैखरी धरते ती वाचा या ब्रह्मस्थितीपासून फार दूर राहिली.




    ओवी ६-३१३
    भ्रूलता मागिलीकडे । तेथ मकाराचेंचि आंग न मांडे ।
    सडेया प्राणा सांकडें । गगना येतां ॥६-३१३॥
    अर्थ: भिवईच्या मागील बाजूस (आज्ञाचक्रात) मकाराचे स्वरूप रहात नाही, इतकेच नव्हे तर एकट्या प्राणवायूला गगनास येण्याला संकट पडते.




    ओवी ६-३१४
    पाठीं तेथेंचि तो भेसळला । तैं शब्दाचा दिवो मावळला ।
    मग तयाहि वरी आटु भविन्नला । आकाशाचा ॥६-३१४॥
    अर्थ: नंतर तो प्राणवायु तेथेच (मूर्ध्निआकशात) मिळाला तेव्हा शब्दाचा दिवस मावळला. मग त्यानंतर आकाशाचाही लय झाला.




    ओवी ६-३१५
    आतां महाशून्याचिया डोहीं । जेथ गगनसीचि थावो नाहीं ।
    तेथ तागा लागेल काई । बोलाचा इया ? ॥६-३१५॥
    अर्थ: आता परब्रह्मरूपी डोहात जेथे आकाशाचाच थांग लागत नाही तेथे शब्दरूपी (होडी ढकलण्याच्या) वेळूचा लाग लागेल काय ?




    ओवी ६-३१६
    म्हणौनि आखरामाजीं सांपडे । कीं कानवरी जोडे ।
    हे तैसें नव्हे फुडें । त्रिशुद्धी गा ॥६-३१६॥
    अर्थ: या कारणास्तव ती ब्रह्मस्थिती अक्षरात सापडेल (शब्दांनी सांगता येईल) अथवा कानांनी ऐकता येईल अशी खरोखर नाही, हे त्रिवार सत्य आहे.




    ओवी ६-३१७
    जें कहीं दैवें । अनुभविलें फावे ।
    तैं आपणचि हें ठाकावें । होऊनियां ॥६-३१७॥
    अर्थ: जेव्हा कधीतरी दैवयोगाने ते अनुभवाला प्राप्त होईल तेव्हा आपणच होऊन रहावे असे ते आहे.




    ओवी ६-३१८
    पुढती जाणणें तें नाहींचि । म्हणौनि असो किती हेंचि ।
    बोलावें आतां वायांचि । धनुर्धरा ॥६-३१८॥
    अर्थ: अर्जुना तद्रूप झाले म्हणजे त्यापुढे आता जाणणे काही उरले नाही. म्हणून आता हे राहू दे. हेच व्यर्थ किती बोलावे ?




    ओवी ६-३१९
    ऐसें शब्दजात माघौतें सरे । तेथ संकल्पाचें आयुष्य पुरे ।
    वाराही जेथ न शिरे । विचाराचा ॥६-३१९॥
    अर्थ: याप्रमाणे शब्दामात्र जेथून माघारी फिरतो, जेथे संकल्पाचे आयुष्य संपते (संकल्प नाहीसा होतो व विचाराचा वाराही जेथे प्रवेश करू शकत नाही).




    ओवी ६-३२०
    जें उन्मनियेचें लावण्य । जें तुर्येचें तारुण्य ।
    अनादि जें अगण्य । परमतत्त्व ॥६-३२०॥
    अर्थ: जे परमात्मतत्व मनरहित अवस्थेचे सौंदर्य आहे व चौथ्या ज्ञानरूप अवस्थेचे तारुण्य आहे आणि जे नित्यसिद्ध व अमर्याद आहे.




    ओवी ६-३२१जें विश्वाचें मूळ । जें योगद्रुमाचें फळ ।
    जें आनंदाचें केवळ । चैतन्य गा ॥६-३२१॥
    अर्थ: जे आकाराचे शेवट आहे, जे मोक्षाचे निश्चयाचे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आरंभ आणि शेवट ही नाहीशी झाली आहेत.




    ओवी ६-३२२
    जें आकाराचा प्रांतु । जें मोक्षाचा एकांतु ।
    जेथ आदि आणि अंतु । विरोनी गेले ॥६-३२२॥
    अर्थ: जे त्रैलोक्याचे कारण आहे, जे अष्टांगयोगरूप वृक्षाचे फळ आहे व जे आनंदाची केवल जीवनकला आहे.




    ओवी ६-३२३
    जें महाभूतांचें बीज । जें महातेजाचें तेज ।
    एवं पार्था जें निज- । स्वरूप माझें ॥६-३२३॥
    अर्थ: जे पंचमहाभूतांचे बीज आहे, जे सूर्याचे तेज आहे (ज्याच्यापासून सूर्याला तेज मिळते) याप्रमाणे अर्जुना, जे माझे खास स्वरूप आहे.




    ओवी ६-३२४
    ते हे चतुर्भुज कोंभेली । जयाची शोभा रूपा आली ।
    देखोनि नास्तिकीं नोकिलीं । भक्तवृंदें ॥६-३२४॥
    अर्थ: नास्तिकांनी भक्तांचे समुदाय पराभव केलेले पाहून ज्याची (निर्गुणस्वरूपाची) शोभा व्यक्ततेला आली तीच ही आकाराला आलेली चतुर्भुज मूर्ति होय.




    ओवी ६-३२५
    तें अनिर्वाच्य महासुख । पैं आपणचि जाहले जे पुरुष ।
    जयांचे कां निष्कर्ष । प्राप्तिवेरीं ॥६-३२५॥
    अर्थ: ज्या पुरुषांचे निश्चय प्राप्तीपर्यंत टिकतात ते पुरुष असे हे शब्दातीत उत्कृष्ट सुख आपणच बनतात.




    ओवी ६-३२६
    आम्हीं साधन हें जें सांगितलें । तेंचि शरीरीं जिहीं केलें ।
    ते आमुचेनि पाडें आले । निर्वाळलेया ॥६-३२६॥
    अर्थ: आम्ही जे हे अष्टांगयोगरूपी साधन सांगितले, त्या साधनाची मूर्तीच आपले शरीर ज्यांनी केले, ते योगाभ्यासाने शुद्ध झाल्यावर आमच्या बरोबरीला आले.




    ओवी ६-३२७
    परब्रह्माचेनि रसें । देहाकृतीचिये मुसें ।
    वोतींव जाहले तैसे । दिसती आंगें ॥६-३२७॥
    अर्थ: देहाकृतीच्या मुशीत परब्रह्मरस ओतून तयार केलेली जणुकाय मूर्तीच, ते शरीराने दिसतात.




    ओवी ६-३२८
    जरी हे प्रतीति हन अंतरीं फांके । तरी विश्वचि हें अवघें झांके ।
    तंव अर्जुन म्हणे निकें । साचचि जी हें ॥६-३२८॥
    अर्थ: जर हा अनुभव अंत:करणात प्रकाशेल तर हे सर्व जग मावळेल. तेव्हा अर्जुन म्हणाला, ठीक. हे खरे आहे महाराज.




    ओवी ६-३२९
    कां जें आपण आतां देवो । हा बोलिले जो उपावो ।
    तो प्राप्तीचा ठावो । म्हणोनि घडे ॥६-३२९॥
    अर्थ: कारण की आता देवा आपण जो हा उपाय सांगितला, तो ब्रह्मप्राप्तीचे ठिकाण आहे. म्हणून त्या उपायाने ब्रह्मप्राप्ती होते.




    ओवी ६-३३०
    इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरंवसेनि ब्रह्मत्वा येती ।
    हें सांगतियाची रीती । कळलें मज ॥६-३३०॥
    अर्थ: याचा दृढनिश्चयाने जे अभ्यास करतात ते खात्रीने ब्रह्मत्वास प्राप्त होतात, हे आपल्या सांगण्याच्याच रीतीवरून मला समजले.




    ओवी ६-३३१देवा गोठीचि हे ऐकतां । बोधु उपजतसे चित्ता ।
    मा अनुभवें तल्लीनता । नोहेल केवीं ? ॥६-३३१॥
    अर्थ: देवा, योगाचे हे वर्णनच केवल ऐकले असता चित्तात ज्ञान उत्पन्न होते तर मग अनुभवाने तल्लीनता कशी होणार नाही ?




    ओवी ६-३३२
    म्हणौनि एथ कांहीं । अनारिसें नाहीं ।
    परी नावभरी चित्त देईं । बोला एका ॥६-३३२॥
    अर्थ: म्हणून तुझ्या सांगण्यात अन्यथा नाही, परंतु क्षणभर माझ्या एका बोलण्याकडे लक्ष दे.




    ओवी ६-३३३
    आतां कृष्णा तुवां सांगितला योगु । तो मना तरी आला चांगु ।
    परि न शकें करूं पांगु । योग्यतेचा ॥६-३३३॥
    अर्थ: कृष्णा तू हा जो योग आता सांगितलास तो माझ्या मनाला तर चांगलाच पटला, परंतु माझ्या ठिकाणी अधिकाराची उणीव असल्यामुळे मी त्याचे अनुष्ठान करू शकत नाही.




    ओवी ६-३३४
    सहजें आंगिक जेतुलें आहे । तेतुलियाची जरी सिद्धि जाये ।
    तरी हाचि मार्गु सुखोपायें । अभ्यासीन ॥६-३३४॥
    अर्थ: माझ्या अंगात स्वभावत: जितकी योग्यता आहे, तितक्याच योग्यतेने जर हा अभ्यास सिद्धीला जाईल तर याच मार्गाचा मी सुखाने अभ्यास करीन.




    ओवी ६-३३५
    नातरी देवो जैसें सांगतील । तैसें आपणपें जरी न ठकेल ।
    तरी योग्यतेवीण होईल । तेंचि पुसों ॥६-३३५॥
    अर्थ: अथवा देव जसे सांगतील, तसे जर आपल्या हातून होणार नसेल तर योग्यतेशिवाय जे होण्याजोगे असेल तेच विचारू.




    ओवी ६-३३६
    जीवींचिये ऐसी धारण । म्हणोनि पुसावया जाहलें कारण ।
    मग म्हणे तरी आपण । चित्त देइजो ॥६-३३६॥
    अर्थ: माझ्या मनाची अशी समजूत झाली म्हणून पुसण्याचे प्रयोजन पडले. म्हणून मी (अर्जुन) म्हणतो आपण इकडे लक्ष द्यावे.




    ओवी ६-३३७
    हां हो जी अवधारिलें । जें हें साधन तुम्हीं निरूपिलें ।
    तें आवडतयाहि अभ्यासिलें । फावों शके ? ॥६-३३७॥
    अर्थ: अहो महाराज, ऐकले का ? तुम्ही जे साधन सांगितले त्याचे वाटेल त्याने अनुष्ठान केले तर ते साध्य होईल काय ?




    ओवी ६-३३८
    कीं योग्यतेवीण नाहीं । ऐसें हन आहे कांहीं ।
    तेथ श्रीकृष्ण म्हणती काई । धनुर्धरा ॥६-३३८॥
    अर्थ: अथवा योग्यतेशिवाय प्राप्त होत नाही, असे काही येथे आहे का ? असे अर्जुनाने विचारले, तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, तू हे काय विचारतोस ?




    ओवी ६-३३९
    हें काज कीर निर्वाण । परि आणिकही जें कांहीं साधारण ।
    तेंही अधिकाराचे वोडवेविण । काय सिद्धि जाय ? ॥६-३३९॥
    अर्थ: ही तर शेवटची (अत्यंत उच्च दर्जाची) गोष्ट आहे, पण इतर काही साधारण काम असते ते तरी अधिकाराच्या योग्यतेशिवाय सिद्धीस जाते काय ?




    ओवी ६-३४०
    पैं योग्यता जे म्हणिजे । ते प्राप्तीची अधीन जाणिजे ।
    कां जे योग्य होऊनि कीजे । तें आरंभिलें फळें ॥६-३४०॥
    अर्थ: परंतु योग्यता जी म्हणावयाची, ती प्राप्तीच्या आधीन आहे असे जाणावे. कारण योग्य होऊन जे करावे ते आरंभीच फलदायी होते.



    ओवी ६-३४१तरी तैसी एथ कांहीं । सावियाचि केणी नाहीं ।
    आणि योग्यतेची काई । खाणी असे ? ॥६-३४१॥
    अर्थ: तर तसा काही येथे योग्यता हा सहज बाजारात मिळाणारा माल नाही, आणि योग्य पुरुषांची काय खाण आहे का ?




    ओवी ६-३४२
    नावेक विरक्तु । जाहला देहधर्मीं नियतु ।
    तरि तोचि नव्हे व्यवस्थितु । अधिकारिया ? ॥६-३४२॥
    अर्थ: थोडासा विरक्त असून देहाच्या गरजा ज्याने आवरल्या आहेत, तोच या कामी योग्य नाही का ?




    ओवी ६-३४३
    येतुलालिये आयणीमाजिवडें । योग्यपण तूतेंही जोडे ।
    ऐसें प्रसंगें सांकडें । फेडिलें तयाचें ॥६-३४३॥
    अर्थ: एवढ्या युक्तीने एवढी योग्यता तुलाही प्राप्त होईल. (ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की) अशा त्याची अडचण देवांनीच ओघाने दूर केली.




    ओवी ६-३४४
    मग म्हणे पार्था । ते हे ऐसी व्यवस्था ।
    अनियतासि सर्वथा । योग्यता नाहीं ॥६-३४४॥
    अर्थ: मग देव पुढे म्हणतात, अर्जुना, त्याची अशीही व्यवस्था आहे की जो अनियमित वागतो त्याची मुळीच योग्यता नाही.




    ओवी ६-३४५जो रसनेंद्रियाचा अंकिला । कां निद्रेसी जीवें विकला ।
    तो नाहींच एथ म्हणितला । अधिकारिया ॥६-३४५॥
    अर्थ: जो जिव्हेच्या स्वाधीन आहे किंवा झोपेला मनापासून वाहिलेला आहे, तो योगाविषयी अधिकारी आहे असे म्हणता येत नाही.




    ओवी ६-३४६
    अथवा आग्रहाचिये बांदोडी । क्षुधा तृषा कोंडी ।
    आहारातें तोडी । मारूनियां ॥६-३४६॥
    अर्थ: अथवा जो हट्टाच्या बंदिखान्यात भूक व तहान कोंडतो व भुकेला मारून आहार तोडतो.




    ओवी ६-३४७
    निद्रेचिया वाटा नवचे । ऐसा दृढिवेचेनि अवतरणें नाचे ।
    तें शरीरचि नव्हे तयाचें । मा योगु कवणाचा ? ॥६-३४७॥
    अर्थ: जो निद्रेच्या वाट्यास जात नाही, याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी हट्टाचा पूर्ण संचार होऊन जो नाचतो, त्याचे ते शरीरच त्याच्या ताब्यात रहाणार नाही, तर मग योग कोण करणार ?




    ओवी ६-३४८
    म्हणौनि अतिशयें विषयो सेवावा । तैसा विरोधु नोहावा ।
    कां सर्वथा निरोधावा । हेंही नको ॥६-३४८॥
    अर्थ: म्हणून विषयांचे अति सेवन करावे ही अशा प्रकारची विरोधी बुद्धी नसावी. किंवा वाजवीपेक्षा फाजिल नियमन करणे हेही कामाचे नाही.



    ओवी ६-३४९आहार तरी सेविजे । परी युक्तीचेनि मापें मविजे ।
    क्रियाजात आचरिजे । तयाचि स्थिती ॥६-३४९॥
    अर्थ: अन्न तर सेवन करावे, परंतु नियमाच्या मोजलेले असावे. त्याचप्रमाणे इतर सर्व क्रिया कराव्यात.




    ओवी ६-३५०
    मितला बोलीं बोलिजे । मितलिया पाउलीं चालिजे ।
    निद्रेही मानु दीजे । अवसरें एकें ॥६-३५०॥
    अर्थ: मोजके शब्द बोलावेत, नियमित पावलांनी चालावे व कोणा एका योग्य वेळेला झोपेलाही मान द्यावा.




    ओवी ६-३५१
    जागणें जरी जाहलें । तरी होआवें तें मितलें ।
    येतुलेनि धातुसाम्य संचलें । असेल सहजें ॥६-३५१॥
    अर्थ: जागावयाचे झाले तरी तेही परिमितच असावे. एवढ्याने अनायासे कफवातादि सर्व धातूंची समता राहिल.




    ओवी ६-३५२
    ऐसें युक्तीचेनि हातें । जें इंद्रियां वोपिजे भातें ।
    तैं संतोषासी वाढतें । मनचि करी ॥६-३५२॥
    अर्थ: अशा रीतीने नियमितपणाच्या द्वाराने विषय दिले असता मनच संतोषाला वाढवते.




    ओवी ६-३५३
    बाहेर युक्तीची मुद्रा पडे । तव आंत आंत सुख वाढे ।
    तेथें सहजेंचि योगु घडे । नाभ्यासितां ॥६-३५३॥
    अर्थ: मग बाह्येंद्रियांना नियमितपणाचे वळण पडते आणि अंत:करणामधे सुख वाढते. अशा स्थितीत अभ्यासाचे कष्ट न पडता योगाचा अभ्यास सहजच होतो.




    ओवी ६-३५४
    जैसें भाग्याचिया भडसें । उद्यमाचेनि मिसें ।
    मग समृद्धिजात आपैसें । घर रिघे ॥६-३५४॥
    अर्थ: ज्याप्रमाणे दैवाचा उदय झाला की उद्योगाच्या निमित्ताने सर्व ऐश्वर्य आपोआप घरी चालत येतात.




    ओवी ६-३५५तैसा युक्तिमंतु कौतुकें । अभ्यासाचिया मोहरा ठाके ।
    आणि आत्मसिद्धीचि पिके । अनुभवु तयाचा ॥६-३५५॥
    अर्थ: त्याप्रमाणे नियमाने वागणारा पुरुष ज्यावेळेस लीलेने आपला मोर्चा योगाभ्यासाकडे वळवतो, त्याच वेळेला त्याचा अनुभव आत्मप्राप्तीरूपाने पिकतो.




    ओवी ६-३५६
    म्हणोनि युक्ति हे पांडवा । घडे जया सदैवा ।
    तो अपवर्गीचिये राणिवा । अळंकारिजे ॥६-३५६॥
    अर्थ: म्हणून अर्जुना, हा नियमितपणा ज्या भाग्यवानाच्या हातून घडतो, तो पुरुष मोक्षाच्या राज्याने अलंकृत होतो.




    ओवी ६-३५७
    युक्ति योगाचें आंग पावे । ऐसें प्रयाग जेथ होय बरवें ।
    तेथ क्षेत्रसंन्यासें स्थिरावें । मानस जयाचें ॥६-३५७॥
    अर्थ: नियमितपणा ज्या वेळेस योगाला जाऊन मिळतो व असा दोघांचा प्रयागरूप चांगला संगम जेथे होतो त्या ठिकाणी ज्याचे मन क्षेत्रसंन्यास करून स्थिर होते,



    ओवी ६-३५८तयातें योगयुक्त तूं म्हण । हेंही प्रसंगें जाण ।
    तें दीपाचे उपलक्षण । निर्वातींचिया ॥६-३५८॥
    अर्थ: त्याला तू योगयुक्त म्हण. त्या पुरुषाच्या मनाच्या स्थितीला निर्वात स्थलीच्या दीपाची उपमा योग्य होईल, हेही तू प्रसंगानुसार समज.





    ओवी ६-३५९
    आतां तुझें मनोगत जाणोनी । कांहीं एक आम्ही म्हणौनि ।
    तें निकें चित्त देउनी । परिसावें गा ॥६-३५९॥
    अर्थ: आता तुझ्या मनातील अभिप्राय ओळखून तुला मी काही थोडे सांगतो, ते तू चांगले चित्त देऊन ऐक.




    ओवी ६-३६०
    तूं प्राप्तीची चाड वाहसी । परी अभ्यासीं दक्षु नव्हसी ।
    तें सांग पां काय बिहसी । दुवाडपणा ? ॥६-३६०॥
    अर्थ: तू प्राप्तीची इच्छा बाळगतोस, परंतु अभ्यास करण्याविषयी तत्पर नाहीस. तर सांग बाबा, तू कठिणपणाला भितोस काय?




    ओवी ६-३६१
    तरी पार्था हें झणें । सायास घेशीं हो मनें ।
    वायां बागूल इये दुर्जनें । इंद्रियें करिती ॥६-३६१॥
    अर्थ: तरी अर्जुना, यात कष्ट आहेत, असा तुझ्या मनाचा ग्रह कदाचित होऊन बसेल, तर तो तसा होऊ देऊ नकोस. ही दुष्ट इंद्रिये याचा उगाचच बाऊ करतात.




    ओवी ६-३६२
    पाहें पां आयुष्यातें अढळ करी । जें सरतें जीवित वारी ।
    तया औषधातें वैरी । काय जिव्हा न म्हणे ? ॥६-३६२॥
    अर्थ: पाहा बरे, आयुष्याला स्थिर करणारे व संपलेल्या जीविताला मागे आणणारे औषध त्याला जिव्हा शत्रू समजत नाही का?





    ओवी ६-३६३ऐसें हितासि जें जें निकें । तें सदाचि या इंद्रियां दुःखें ।
    एऱ्हवीं सोपें योगासारिखें । कांहीं आहे ? ॥६-३६३॥
    अर्थ: त्याप्रमाणे आपल्या हितास जे जे चांगले, ते या इंद्रियांना सदोदित दु:खकारक वाटते, येर्‍हवी योगासारखे सोपे काही आहे काय?




    ओवी ६-३६४
    म्हणौनि आसनाचिया गाढिका । जो आम्हीं अभ्यासु सांगितला निका ।
    तेणें होईल तरी हो कां । निरोधु यया ॥६-३६४॥
    अर्थ: म्हणून आसनाच्या बळकटपणापासून आरंभ करून जो आम्ही चांगला योगाभ्यास सांगितला, त्यायोगाने इंद्रियांचा निरोध झाला तर होईल.




    ओवी ६-३६५एऱ्हवीं तरी येणें योगें । जैं इंद्रियां विंदाण लागे ।
    तैं चित्त भेटों रिगे । आपणपेयां ॥६-३६५॥
    अर्थ: एरवी तरी या योगामुळे ज्या वेळेला इंद्रियांचा निग्रह होतो, त्यावेळेला चित्त आपल्या चैतन्याच्या भेटीला निघते.




    ओवी ६-३६६
    परतोनि पाठिमोरें ठाके । आणि आपणियांतें आपण देखे ।
    देखतखेवों वोळखे । म्हणे तत्त्व हें मी ॥६-३६६॥
    अर्थ: ते ज्यावेळेला विषय सोडून परत अंतर्मुख होते आणि आपण आपल्या आत्मस्वरूपाला पहाते, त्याचवेळी पाहिल्याबरोबर त्यास स्वस्वरूपाची ओळख पटते व ते तत्व मी आहे अशा समजुतीवर ते येते.




    ओवी ६-३६७
    तिये ओळखीचिसरिसें । सुखाचिया साम्राज्यीं बैसे ।
    मग आपणपां समरसें । विरोनि जाय ॥६-३६७॥
    अर्थ: त्या ओळखीबरोबरच ते सुखाच्या साम्राज्यावर बसते आणि तेथे आत्म्याशी समरस झाल्यामुळे चित्ताचा चित्तपणा नाहीसा होतो.




    ओवी ६-३६८
    जयापरतें आणिक नाहीं । जयातें इंद्रियें नेणती कहीं ।
    तें आपणचि आपुलिया ठायीं । होऊनि ठाके ॥६-३६८॥
    अर्थ: व ज्याहून दुसरे काही नाही व ज्याला इंद्रिये केव्हाच जाणत नाहीत असे जे चैतन्य, ते चैतन्य, मन आपण स्वत: आपल्या ठिकाणी होऊन रहाते




    ओवी ६-३६९
    मग मेरूपासूनि थोरें । देह दुःखाचेनि डोंगरें ।
    दाटिजो पां पडिभरें । चित्त न दटे ॥६-३६९॥
    अर्थ: मग मेरूपेक्षा मोठ्या दु:खाच्या डोंगराने त्याचा देह जरी दडपला तरी पण त्या भाराने त्याचे चित्त दडपत नाही.




    ओवी ६-३७०

    कां शस्त्रें वरी तोडिलिया । देह अग्निमाजीं पडलिया ।
    चित्त महासुखीं पहुडलिया । चेवोचि नये ॥६-३७०॥
    अर्थ: अथवा शस्त्राने त्याचा देह तोडला किंवा देह अग्नीमधे पडला तरी चित्त निरतिशय सुखात लीन झाल्यामुळे परत वृत्तीवर येत नाही.




    ओवी ६-३७१
    ऐसें आपणपां रिगोनि ठाये । मग देहाची वासु न पाहे ।
    आणिकचि सुख होऊनि जाये । म्हणूनि विसरे ॥६-३७१॥
    अर्थ: याप्रमाणे चित्त आपल्यात प्रवेश करून राहिल्यावर मग देहाची वाट पहात नाही. (देह तादात्म्य घेत नाही). व अलौकिक सुखच बनल्यामुळे ते चित्त देहाला विसरते.








    ओवी ६-३७२
    जया सुखाचिया गोडी । मग आर्तीची सेचि सोडी ।
    संसाराचिया तोंडीं । गुंतलें जें ॥६-३७२॥
    अर्थ: ज्या सुखाची चटक लगल्याने संसाराच्या तोंडात गुंतलेले जे मन ते विषयवासनेची आठवण देखील ठेवीत नाही.




    ओवी ६-३७३
    जें योगाची बरव । संतोषाची राणिव ।
    ज्ञानाची जाणीव । जयालागीं ॥६-३७३॥
    अर्थ: जे सुख योगाचे सौभाग्य आहे, संतोषाचे राज्य आहे आणी ज्याच्याकरता ज्ञानाची समजूत करून घ्यावयाची असते,




    ओवी ६-३७४
    तें अभ्यासिलेनि योगें । सावयव देखावें लागे ।
    देखिलें तरी आंगें । होईजेल गा ॥६-३७४॥
    अर्थ: ते सुख अभ्यासलेल्या योगाच्या द्वारा मूर्तिमंत पाहिले पाहिजे आणि पाहिल्यावर मग तो पहाणारा आपणच स्वत: सुखरूप होऊन जातो.



    ओवी ६-३७५तरि तोचि योगु बापा । एके परी आहे सोपा ।
    जरी पुत्रशोकु संकल्पा । दाखविजे ॥६-३७५॥
    अर्थ: पण बाबा अर्जुना एक प्रकाराने तो योग सोपा आहे. तो कसा म्हणशील तर संकल्पाला पुत्रशोक दाखवावा. (संकल्पाचा पुत्र जो काम म्हणजे विषयवासना ती नाहीशी करावी).




    ओवी ६-३७६
    हां विषयातें निमालिया आइके । इंद्रियें नेमाचिया धारणीं देखे ।
    तरी हियें घालूनि मुके । जीवित्वासी ॥६-३७६॥
    अर्थ: हा संकल्प जर विषयवासना मेल्या असे ऐकेल व इंद्रिये नियमाच्या स्थितीत आहेत असे पाहील तर तो ऊर फुटून प्राणास मुकेल.




    ओवी ६-३७७
    ऐसें वैराग्य हें करी । तरी संकल्पाची सरे वारी ।
    सुखें धृतीचिया धवळारीं । बुद्धि नांदे ॥६-३७७॥
    अर्थ: असे हे वैराग्याने केले तर संकल्पाची येरझार संपते व बुद्धी धैर्याच्या महालात सुखाने वास करते.





    ओवी ६-३७८बुद्धी धैर्या होय वसौटा । मनातें अनुभवाचिया वाटा ।
    हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभुवनीं ॥६-३७८॥
    अर्थ: बुद्धी जर धैर्याला आश्रयस्थान झाली तर ती मनाला अनुभवाच्या वाटेने हळू हळू आत्मानुभवात कायमचे स्थिर करते.




    ओवी ६-३७९
    याही एके परी । प्राप्ती आहे विचारीं ।
    हें न ठके तरी सोपारी । आणिक ऐकें ॥६-३७९॥
    अर्थ: याही एक तर्‍हेने ब्रह्मप्राप्ती आहे. याचा विचार कर आणि हे जर तुला साध्य होत नसेल तर आणखी एक सोपी युक्ती आहे ती ऐक.




    ओवी ६-२६
    यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरम् ।
    ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥६-२६॥
    अर्थ: चंचलवृत्तीमुळे अस्थिर असलेले मन आत्म्याकडून निघून ज्या ज्यामुळे बाहेर जाते त्या त्या पासून नियमन करून त्याला आत्म्याच्याच ताब्यात आणावे.




    ओवी ६-३८०
    आतां नियमुचि हा एकला । जीवें करावा आपुला ।
    जैसा कृतनिश्चयाचिया बोला- । बाहेरा नोहे ॥६-३८०॥
    अर्थ: आता तू जो निश्चय करशील त्याच्या हुकुमाच्या बाहेर जो नियम कधी जाणार नाही अशा प्रकारचा हा एकटा नियमच जिवाभावापासून तू आपलासा कर.




    ओवी ६-३८१
    जरी येतुलेनि चित्त स्थिरावें । तरी काजा आलें स्वभावें ।
    नाहीं तरी घालावें । मोकलुनी ॥६-३८१॥
    अर्थ: जर एवढ्याने चित्त स्थिर झाले तर सहजच काम झाले. आणि जर येवढ्याने चित्त स्थिर झाले नाही तर त्याला मोकळे सोडून द्यावे.




    ओवी ६-३८२
    मग मोकलिलें जेथ जाईल । तेथूनि नियमूचि घेउनि येईल ।
    ऐसेनि स्थैर्यचि होईल । सावियाचि कीं ॥६-३८२॥
    अर्थ: मग मोकळे सोडले असता ते जेथे जेथे जाईल तेथून नियमच त्यास परत घेऊन येईल. अशा रीतीने यालाही स्थैर्याची सवय होईल.




    ओवी ६-३८३

    पाठीं केतुलेनि एके वेळे । तया स्थैर्याचेनि मेळें ।
    आत्मस्वरूपाजवळें । येईल सहजें ॥६-३८३॥
    अर्थ: नंतर काही वेळाने त्या स्थैर्याच्या योगाने मन सहज आत्मस्वरूपाजवळ येईल.




    ओवी ६-३८४
    तयातें देखोनि आंगा घडेल । तेथ अद्वैतीं द्वैत बुडेल ।
    आणि ऐक्यतेजें उघडेल । त्रैलोक्य हें ॥६-३८४॥
    अर्थ: आणि मनाने त्या आत्मस्वरूपास पाहिल्यावर ते मन स्वत: आत्मरूप बनून जाईल. तेव्हा या अद्वैत स्वरूपात द्वैत नाहीसे होईल, आणि नंतर सर्व त्रैलोक्य ऐक्याच्या तेजाने प्रकाशित होईल.




    ओवी ६-३८५
    आकाशीं दिसे दुसरें । तें अभ्र जैं विरे ।
    तैं गगनचि कां भरे । विश्व जैसें ॥६-३८५॥
    अर्थ: आकाशामधे निराळे दिसणारे जे मेघ, ते नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणे संपूर्ण विश्व पोकळीनेच भरलेले असते.




    ओवी ६-३८६
    तैसें चित्त लया जाये । आणि चैतन्यचि आघवें होये ।
    ऐसी प्राप्ति सुखोपायें । आहे येणें ॥६-३८६॥
    अर्थ: त्याप्रमाणे आत्मस्वरूपी चित्त लयाला गेले की संपूर्ण विश्वच चैतन्यमय होते. या सुलभ उपायाने अशी एवढी मोठी प्राप्ती होते.



    ओवी ६-३८७या सोपिया योगस्थिती । उकलु देखिला गा बहुतीं ।
    संकल्पाचिया संपत्ती । रुसोनियां ॥६-३८७॥
    अर्थ: संकल्पाच्या संपत्तीचा म्हणजेच विषयवासनांचा त्याग करून पुष्कळांनी या सोप्या योगमार्गाचा उलगडा करून पाहिला आहे. (अनुभव घेतला आहे).





    ओवी ६-३८८
    तें सुखाचेनि सांगातें । आलें परब्रह्मा आंतौतें ।
    तेथ लवण जैसें जळातें । सांडूं नेणें ॥६-३८८॥
    अर्थ: ते पुरुष अनायासे परब्रह्माच्या आत आले, ते कसे तर मीठ पाण्यास मिळाले असता पाण्यास सोडून जसे वेगळे रहात नाही.




    ओवी ६-३८९
    तैसें होय तिये मेळीं । मग सामरस्याचिया राउळीं ।
    महासुखाची दिवाळी । जगेंसि दिसे ॥६-३८९॥
    अर्थ: त्याप्रमाणे त्या योग्याचा जेव्हा परब्रह्माशी मिलाफ होतो तेव्हा वरील मीठ-पाणी यांच्या दृष्टांताप्रमाणे एकस्वरूपाची स्थिती होते. मग समरसतेच्या मंदिरात संपूर्ण जगासह त्याला महासुखाची दिवाळी दिसते.




    ओवी ६-३९०
    ऐसें आपुले पायवरी । चालिजे आपुले पाठीवरी ।
    हें पार्था नागवे तरी । आन ऐकें ॥६-३९०॥
    अर्थ: आपल्या पायानी आपल्या पाठीवर चालण्यासारखे हे आहे. अर्जुना म्हणून जर ते तुला करता येणार नाही तर दुसरे सांगतो ऐक.




    ओवी ६-३९१तरी मी तंव सकळ देहीं । असे एथ विचारु नाहीं ।
    आणि तैसेंचि माझ्या ठायीं । सकळ असे ॥६-३९१॥
    अर्थ: आणि मी तर सर्व देहांमधे आहे, यात वाटाघाट करण्यासारखे काही नाही आणि त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी हे सर्व आहे.




    ओवी ६-३९२
    हें ऐसेंचि संचलें । परस्परें मिसळलें ।
    बुद्धी घेपे एतुलें । होआवें गा ॥६-३९२॥
    अर्थ: हे असेच बनलेले आहे व परस्पर मिसळलेले आहे, पण बुद्धीने एवढे ग्रहण मात्र केले पाहिजे.




    ओवी ६-३९३एऱ्हवीं तरी अर्जुना । जो एकवटलिया भावना ।
    सर्वभूतीं अभिन्ना । मातें भजे ॥६-३९३॥
    अर्थ: एरवी अर्जुना, जो ऐक्याच्या समजुतीने मी सर्व भूतात सारखा व्यापून राहिलेलो आहे असे जाणून मला भजतो.




    ओवी ६-३९४
    भूतांचेनि अनेकपणें । अनेक नोहे अंतःकरणें ।
    केवळ एकत्वचि माझें जाणें । सर्वत्र जो ॥६-३९४॥
    अर्थ: प्राण्याच्या भेदाने ज्याच्या अंतःकरणात द्वैत उत्पन्न होत नाही आणि जो सर्व ठिकाणी माझे केवळ एकत्वच जाणतो.




    ओवी ६-३९५मग तो एक हा मियां । बोलता दिसतसे वायां ।
    एऱ्हवीं न बोलिजे तरी धनंजया । तो मीचि आहें ॥६-३९५॥
    अर्थ: अर्जुना, मग तो माझ्याशी एकच आहे असे बोलणे व्यर्थ आहे. कारण असे जरी बोलले नाही तरी तो मीच आहे.




    ओवी ६-३९६
    दीपा आणि प्रकाशा । एकवंकीचा पाडु जैसा ।
    तो माझ्या ठायीं तैसा । मी तयामाजीं ॥६-३९६॥
    अर्थ: दिवा व त्याचा प्रकाश हे जसे दोन्ही एकच आहेत, त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी ऐक्यतेने आहोत.





    ओवी ६-३९७
    जैसा उदकाचेनि आयुष्यें रसु । कां गगनाचेनि मानें अवकाशु ।
    तैसा माझेनि रूपें रूपसु । पुरुषु तो गा ॥६-३९७॥
    अर्थ: ज्याप्रमाणे जेथपर्यंत पाणी आहे, तेथपर्यंत ओलावा आहे अथवा आकाशाच्या बरोबरीने पोकळी आहे, त्याप्रमाणे माझ्या रूपाने तो पुरुष रूपवान आहे.




    ओवी ६-३९८
    जेणें ऐक्याचिये दिठी । सर्वत्र मातेंचि किरीटी ।
    देखिला जैसा पटीं । तंतु एकु ॥६-३९८॥
    अर्थ: अर्जुना, ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये केवळ एकच तंतु असतो, त्याप्रमाणे ज्याने अद्वैतबोधाने सर्व ठिकाणी केवळ मलाच पाहिले आहे.




    ओवी ६-३९९
    कां स्वरूपें तरी बहुतें आहाती । परी तैसीं सोनीं बहुवें न होती ।
    ऐसी ऐक्याचळाची स्थिती । केली जेणें ॥६-३९९॥
    अर्थ: अथवा अलंकारांचे आकार जरी पुष्कळ असले तरी त्याप्रमाणे सोनी पुष्कळ नाहीत, अशी ऐक्यरूपी पर्वताची स्थिरता ज्याने केली आहे.




    ओवी ६-४००
    नातरी वृक्षांचीं पानें जेतुलीं । तेतुलीं रोपें नाहीं लाविलीं ।
    ऐसी अद्वैतदिवसें पाहली । रात्री जया ॥६-४००॥
    अर्थ: अथवा झाडाची जितकी पाने आहेत, तितकी रोपे लावलेली नाहीत, अशा अद्वैतदिवसाने ज्यास द्वैताची रात्र उजाडली.




    ओवी ६-४०१तो पंचात्मकीं सांपडे । तरी मग सांग पां कैसेनि अडे ? ।
    जो प्रतीतीचेनि पाडें । मजसीं तुके ॥६-४०१॥
    अर्थ: अशा रीतीने जो अनुभवाच्या योग्यतेने माझ्या बरोबरीचा ठरतो, तो पंचमहाभूतात्मक शरीरात जरी असला तरी मग सांग बरे, तो देहतादात्म्य घेऊन त्यात कसा अडकून राहील?




    ओवी ६-४०२
    माझें व्यापकपण आघवें । गवसलें तयाचेनि अनुभवें ।
    तरी न म्हणतां स्वभावें । व्यापकु जाहला ॥६-४०२॥
    अर्थ: माझे सर्व व्यापकपण त्याच्या अनुभवाने कवटाळले तर त्याला व्यापक असे जरी म्हटले नाही तरी तो सहज व्यापक आहे.




    ओवी ६-४०३
    आतां शरीरीं तरी आहे । परी शरीराचा तो नोहे ।
    ऐसें बोलवरी होये । तें करूं ये काई ॥६-४०३॥
    अर्थ: आता तो देहधारी जरी आहे, तरी तो देहाचे तादात्म्य घेत नाही, अशी ही त्याची स्थिती शब्दांनी सांगता येईल असे करता येईल काय?




    ओवी ६-४०४म्हणौनि असो तें विशेषें । आपणपेयांसारिखें ।
    जो चराचर देखे । अखंडित ॥६-४०४॥
    अर्थ: म्हणून त्याचे विशेष वर्णन करणे राहू दे. अथवा जो तत्त्ववेत्ता सर्व चराचर आपणासारखेच निरंतर पहातो.




    ओवी ६-४०५
    सुखदुःखादि वर्में । कां शुभाशुभें कर्में ।
    दोनी ऐसीं मनोधर्में । नेणेचि जो ॥६-४०५॥
    अर्थ: सुखदु:खादी वर्मे अथवा पुण्यपापादी कर्मे अशी ही द्वंद्वे जो मनाने समजतच नाही.




    ओवी ६-४०६
    हें सम विषम भाव । आणिकही विचित्र जें सर्व ।
    तें मानी जैसे अवयव । आपुले होती ॥६-४०६॥
    अर्थ: हे समविषमभाव बरे वाईट आणखीही सर्व निरनिराळ्या प्रकारच्या वस्तु, ह्या जसे काही आपले अवयव आहेत, असे जो समजतो.




    ओवी ६-४०७
    हें एकैक काय सांगावें । जया त्रैलोक्यचि आघवें ।
    मी ऐसें स्वभावें । बोधा आलें ॥६-४०७॥
    अर्थ: हे वेगवेगळे काय सांगावयाचे आहे? ज्याला सर्व त्रैलोक्यच आपण आहोत असे ज्ञान सहजच प्राप्त झाले आहे.




    ओवी ६-४०८
    तयाही देह एकु कीर आथी । लौकिकीं सुखदुःखी तयातें म्हणती ।
    परी आम्हांतें ऐसी प्रतीती । परब्रह्मचि हा ॥६-४०८॥
    अर्थ: त्यालाही देह आहे खरा आणि लोकात त्याला सुखीदु:खीही म्हणतात, परंतु आमचा अनुभव असाच आहे की तो परब्रह्म आहे.




    ओवी ६-४०९
    म्हणौनि आपणपां विश्व देखिजे । आणि आपण विश्व होईजे ।
    ऐसें साम्यचि एक उपासिजे । पांडवा गा ॥६-४०९॥
    अर्थ: म्हणून आपल्या ठिकाणी जगत् पहावे आणि आपण जगत व्हावे अशा एका साम्याचीच हे अर्जुना, तू उपासना कर.




    ओवी ६-४१०
    हें तूतें बहुतीं प्रसंगीं । आम्ही म्हणों याचिलागीं ।
    जे साम्यापरौती जगीं । प्राप्ति नाहीं ॥६-४१०॥
    अर्थ: तू समदृष्टी ठेव, असे आम्ही एवढ्याकरताच तुला पुष्कळ प्रसंगी म्हणत आलो, कारण साम्यापलिकडे या जगात दुसरा लाभ नाही.





    ओवी ६-४१२

    हें मन कैसें केवढें । ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडें ।
    एऱ्हवीं राहाटावया थोडें । त्रैलोक्य यया ॥६-४१२॥
    अर्थ: "हे मन कसे व केवढे आहे, याचा पत्ता लावू असे म्हटले तर सापडत नाही. एरवी या मनाला वावरण्याला हे सर्व त्रैलोक्य अपुरे पडते."




    ओवी ६-४१३
    म्हणौनि ऐसें कैसें घडेल । जे मर्कट समाधी येईल ।
    कां राहा म्हणतलिया राहेल । महावातु ? ॥६-४१३॥
    अर्थ: "म्हणून हे असे कसे होईल की माकडाला समाधि लागेल? किंवा सोसाट्याचा वारा थांब म्हटल्याबरोबर थांबेल काय?"





    ओवी ६-४१४जें बुद्धीतें सळी । निश्चयातें टाळी ।धैर्येसीं हातफळी । मिळऊनि जाय ॥६-४१४।अर्थ: "जे मन बुद्धीला छळते, बुद्धीने केलेला निश्चय सिद्धीस जाऊ देत नाही आणि सात्विक धैर्याच्या हातावर हात मारून पळून जाते."




    ओवी ६-४१५
    जें विवेकातें भुलवी । संतोषासी चाड लावी ।
    बैसिजे तरी हिंडवी । दाही दिशा ॥६-४१५।
    अर्थ: "जे सारासार बुद्धीला भ्रमात पडते, संतोषाला आशा उत्पन्न करते आणि आपण एके ठिकाणी राहिलो तरी आपल्याला दाही दिशांना फिरवते."




    ओवी ६-४१६
    जें निरोधलें घे उवावो । जया संयमुचि होय सावावो ।

    तें मन आपुला स्वभावो । सांडील काई ? ॥६-४१६।
    अर्थ: "ज्याला आवरले असता ते जास्त उसळते, ज्याला निरोधच साह्य होतो, ते मन आपला स्वभाव टाकील काय?"




    ओवी ६-४१७
    म्हणौनि मन एक निश्चळ राहेल । मग आम्हांसि साम्य होईल ।

    हें विशेषेंही न घडेल । याचिलागीं ॥६-४१७।
    अर्थ: "म्हणून हे मन एक निश्चल राहील आणि मग आम्हाला साम्यावस्था प्राप्त होईल हे एवढ्यासाठी फार करून घडणार नाही."




    ओवी ६-४१८

    तंव कृष्ण म्हणती साचचि । बोलत आहासि तें तैसेंचि ।यया मनाचा कीर चपळचि । स्वभावो गा ॥६-४१८।

    अर्थ: "तेव्हा कृष्ण म्हणाले, खरोखर तू म्हणत आहेस तसेच आहे. या मनाचा स्वभाव खरोखर चपलच आहे."



    ओवी ६-४१९
    परि वैराग्याचेनि आधारें । जरी लाविलें अभ्यासाचिये मोहरें ।

    तरी केतुलेनि एके अवसरें । स्थिरावेल ॥६-४१९।
    अर्थ: "परंतु वैराग्याच्या जोरावर मन जर अभ्यासाकडे वळवले तर काही वेळाने ते स्थिर होईल."




    ओवी ६-४२०
    कां जें यया मनाचें एक निकें । जें देखिलें गोडीचिया ठाया सोके ।

    म्हणौनि अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाइजे ॥६-४२०।
    अर्थ: "कारण की या मनाची एक गोष्ट चांगली आहे, ती ही की ते अनुभवलेल्या गोडीच्या ठिकाणी सवकते. म्हणून त्याला कौतुकाने आत्मानुभवसुखच वारंवार दाखवीत जावे."




    ओवी ६-४२१

    एऱ्हवीं विरक्ति जयांसि नाहीं । जे अभ्यासीं न रिघती कहीं ।
    तयां नाकळे हें आम्हीही । न मनूं कायी ॥६-४२१।
    अर्थ: "एरवी ज्यांना वैराग्य नाही, जे केव्हाच अभ्यासात शिरत नाहीत. त्यांना मन आवरत नाही ही गोष्ट आम्हाला कबूल नाही काय?"




    ओवी ६-४२२
    परि यमनियमांचिया वाटा न वचिजे । कहीं वैराग्याची से न करिजे ।
    केवळ विषयजळीं ठाकिजे । बुडी देउनी ॥६-४२२।
    अर्थ: "परंतु यम नियमांच्या वाटेने गेले नाही, वैराग्याची केव्हाही आठवण केली नाही व केवळ विषयरूपी पाण्यामधे बुडी मारून राहिले."




    ओवी ६-४२३
    यया जालिया मानसा कहीं । युक्तीची कांबी लागली नाहीं ।
    तरी निश्चळ होईल काई । कैसेनि सांगें ? ॥६-४२३।
    अर्थ: "व आपल्या मनाला उत्पन्न झाल्यापासून कधीही युक्तीचा चिमटा जर लावलाच नाही तर ते स्थिर कसे होईल? सांग बरे."




    ओवी ६-४२४
    म्हणौनि मनाचा निग्रहो होये । ऐसा उपाय जो आहे ।
    तो आरंभीं मग नोहे । कैसा पाहों ॥६-४२४।
    अर्थ: "म्हणून मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे तो करण्याला आरंभ कर. मग निग्रह कसा होत नाही ते पाहू."




    ओवी ६-४२५
    तरी योगसाधन जितुकें । कें अवघेंचि काय लटिकें ? ।
    परि आपणयां अभ्यासूं न ठाके । हेंचि म्हण ॥६-४२५।
    अर्थ: "तर योगसाधन जेवढे आहे, ते सर्वच खोटे आहे काय? परंतु आपल्या हातून अभ्यास होत नाही असे म्हण."




    ओवी ६-४२६
    आंगीं योगाचें होय बळ । तरी मन केतुलें चपळ ? ।
    काय महदादि हें सकळ । आपु नोहे ? ॥६-४२६।
    अर्थ: "अंगामधे योगाचे सामर्थ्य असेल, तर त्यापुढे मनाची चपलता ती किती आहे? हे महतत्वादी सर्व आपल्या स्वाधीन होणार नाही काय?"





    ओवी ६-४२७तेथ अर्जुन म्हणे निकें । देवो बोलती तें न चुके ।साचचि योगबळेंसीं न तुके । मनोबळ ॥६-४२७।अर्थ: "त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, फार चांगले. देव म्हणतात त्यात काही चूक नाही. खरोखर योगाच्या सामर्थ्याबरोबर मनाच्या सामर्थ्याची तुलना करता येणार नाही."



    ओवी ६-४२८
    तरी तोचि योगु कैसा केवीं जाणों । आम्ही येतुले दिवस याची मातुही नेणों ।
    म्हणौनि मनातें जी म्हणों । अनावर ॥६-४२८।
    अर्थ: "परंतु तोच योग कसा आहे व त्याचे ज्ञान कसे करून घ्यावयाचे? ह्यााची इतके दिवस आम्हाला वार्ताही नव्हती. म्हणून महाराज, आम्ही म्हणत होतो की हे मन अनावर आहे."


    ओवी ६-४२९
    हा आतां अघवेया जन्मा । तुझेनि प्रसादें पुरुषोत्तमा ।
    योगपरिचयो आम्हां । जाहला आजी ॥६-४२९।
    अर्थ: "कृष्णा, ह्या सार्‍या जन्मात तुझ्या प्रसादाच्या योगाने ही आता सांप्रत आम्हाला योगाची ओळख झाली."


    ओवी ६-४३०
    परि आणिक एक गोसांविया । मज संशयो असे साविया ।
    तो तूं वांचूनि फेडावया । समर्थु नाहीं ॥६-४३०।
    अर्थ: "परंतु महाराज, या प्रसंगी, मला आणखी एक संशय आलेला आहे. तो दूर करण्यास तुझ्यावाचून कोणी समर्थ नाही."


    ओवी ६-४३१
    म्हणौनि सांगें गोविंदा । कवण एकु मोक्षपदा ।
    झोंबत होता श्रद्धा । उपायेंविण ॥६-४३१।
    अर्थ: "म्हणून देवा, सांगा, कोणी एक योग्य खटपटीशिवाय केवळ श्रद्धेच्या बळावर मोक्षपद काबीज करायला पहात होता?"


    ओवी ६-४३२
    इंद्रियग्रामोनि निघाला । आस्थेचिया वाटे लागला ।
    आत्मसिद्धिचिया पुढिला । नगरा यावया ॥६-४३२।
    अर्थ: "पुढले गाव जे आत्मसिद्धी, त्या गावाला येण्याकरता तो इंद्रियरूपी गावाहून निघून आस्थेच्या वाटेला लागला."




    ओवी ६-४२७तेथ अर्जुन म्हणे निकें । देवो बोलती तें न चुके ।साचचि योगबळेंसीं न तुके । मनोबळ ॥६-४२७।अर्थ: "त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, फार चांगले. देव म्हणतात त्यात काही चूक नाही. खरोखर योगाच्या सामर्थ्याबरोबर मनाच्या सामर्थ्याची तुलना करता येणार नाही."



    ओवी ६-४२८
    तरी तोचि योगु कैसा केवीं जाणों । आम्ही येतुले दिवस याची मातुही नेणों ।
    म्हणौनि मनातें जी म्हणों । अनावर ॥६-४२८।
    अर्थ: "परंतु तोच योग कसा आहे व त्याचे ज्ञान कसे करून घ्यावयाचे? ह्यााची इतके दिवस आम्हाला वार्ताही नव्हती. म्हणून महाराज, आम्ही म्हणत होतो की हे मन अनावर आहे."


    ओवी ६-४२९
    हा आतां अघवेया जन्मा । तुझेनि प्रसादें पुरुषोत्तमा ।
    योगपरिचयो आम्हां । जाहला आजी ॥६-४२९।
    अर्थ: "कृष्णा, ह्या सार्‍या जन्मात तुझ्या प्रसादाच्या योगाने ही आता सांप्रत आम्हाला योगाची ओळख झाली."


    ओवी ६-४३०
    परि आणिक एक गोसांविया । मज संशयो असे साविया ।
    तो तूं वांचूनि फेडावया । समर्थु नाहीं ॥६-४३०।
    अर्थ: "परंतु महाराज, या प्रसंगी, मला आणखी एक संशय आलेला आहे. तो दूर करण्यास तुझ्यावाचून कोणी समर्थ नाही."


    ओवी ६-४३१
    म्हणौनि सांगें गोविंदा । कवण एकु मोक्षपदा ।
    झोंबत होता श्रद्धा । उपायेंविण ॥६-४३१।
    अर्थ: "म्हणून देवा, सांगा, कोणी एक योग्य खटपटीशिवाय केवळ श्रद्धेच्या बळावर मोक्षपद काबीज करायला पहात होता?"


    ओवी ६-४३२
    इंद्रियग्रामोनि निघाला । आस्थेचिया वाटे लागला ।
    आत्मसिद्धिचिया पुढिला । नगरा यावया ॥६-४३२।
    अर्थ: "पुढले गाव जे आत्मसिद्धी, त्या गावाला येण्याकरता तो इंद्रियरूपी गावाहून निघून आस्थेच्या वाटेला लागला."




    ओवी ६-४३३तंव आत्मसिद्धि न ठकेचि । आणि मागुतें न येववेचि ।ऐसा अस्तु गेला माझारींचि । आयुष्यभानु ॥६-४३३।अर्थ: "आता तो आत्मसिद्धीच्या गावालाही पोहोचला नाही आणि त्यास परतही येववत नाही असा मध्येच असतांना त्याचा आयुष्यरूपी सूर्य अस्ताला गेला."



    ओवी ६-४३४
    जैसें अकाळीं आभाळ । अळुमाळु सपातळ ।
    विपायें आलें केवळ । वसे ना वर्षे ॥६-४३४।
    अर्थ: "भलत्यावेळी विरळ असे थोडे नुसते चुकून ढग आले तर ते टिकत नाहीत व वर्षावही करत नाहीत."



    ओवी ६-४३५तैसीं दोन्ही दुरावलीं । जे प्राप्ती तंव अलग ठेली ।आणि अप्राप्तीही सांडवली । श्रद्धा तया ॥६-४३५।अर्थ: "त्याप्रमाणे विषयासक्तता व मोक्ष ही दोन्ही त्यास दूर राहिली अशी की आत्मसिद्धीची प्राप्ती तर दूरच राहिली आणि दुसरे आपल्यास आत्मप्राप्ती होणार नाही अशी आशाही त्याला श्रद्धा असल्यामुळे सोडता येत नाही."




    ओवी ६-४३६
    ऐसा दोंला अंतरला कां जी । जो श्रद्धेच्या समाजीं ।
    बुडाला तया हो जी । कवण गति ? ॥६-४३६।
    अर्थ: "याप्रमाणे जो पुरुष उशीरामुळे फसला व जो आत्मप्राप्तीविषयी पूर्ण श्रद्धा असतांना मेला त्याला अहो महाराज, कोणती गती प्राप्त होते ते सांगा."




    ओवी ६-४३७तंव कृष्ण म्हणती पार्था । जया मोक्षसुखीं आस्था ।तया मोक्षावांचूनि अन्यथा । गती आहे गा ? ॥६-४३७।अर्थ: "तेव्हा कृष्ण म्हणाले, अर्जुना, ज्याला मोक्षसुखाची उत्कट इच्छा आहे, त्याला मोक्षाशिवाय दुसरी गती आहे काय?"




    ओवी ६-४३८
    परि एतुलें हेंचि एक घडे । जें माझारीं विसवावें पडे ।

    तेंही परी असेनि सुरवाडें । जो देवां नाहीं ॥६-४३८।
    अर्थ: "पण एवढेच एक होते की मध्ये विसावा घ्यावा लागतो. पण तो विसावा घेणेही असे सुखकर असते की जे इंद्रांदि देवांनाही नाही."




    ओवी ६-४३९
    एऱ्हवीं अभ्यासाचा उचलता । पाउलीं जरी चालता ।

    तरी दिवसाआधीं ठाकिता । सोऽहंसिद्धीतें ॥६-४३९।
    अर्थ: "वास्तविक अभ्यासाच्या जलद पावलाने जर तो चालता तर मरणकाळापूर्वीच ब्रह्मसिद्धीस येऊन मिळता."



    ओवी ६-४४०
    परि तेतुला वेगु नव्हेचि । म्हणौनि विसांवा तरी निकाचि ।

    पाठीं मोक्षु तंव तैसाचि । ठेविला असे ॥६-४४०।
    अर्थ: "पण तितक्या वेगाने अभ्यास न झाल्यामुळे विसावा घेणे योग्यच होते व नंतर मोक्ष त्याच्याकरता ठेवलेलाच आहे."




    ओवी ६-४४१

    ऐकें कवतिक हें कैसें । जें शतमखा लोक सायासें ।तें तो पावे अनायासें । कैवल्यकामु ॥६-४४१।

    अर्थ: "ऐक कसा चमत्कार होतो तो, शंभर यज्ञ करणार्‍यास कष्टाने जी स्थिती प्राप्त होते ती त्या मोक्षाची इच्छा करणारास श्रमावाचून मिळते."




    ओवी ६-४४२
    मग तेथिंचे जे अमोघ । अलौकिक भोग ।

    भोगितांही सांग । कांटाळे मन ॥६-४४२।
    अर्थ: "मग त्या ठिकाणाचे जे दिव्य व निष्फळ न होणारे भोग ते यथास्थित भोगीत असताही त्याच्या मनास कंटाळा येतो."




    ओवी ६-४४३
    हा अंतरायो अवचितां । कां वोढवला भगवंता ? ।

    ऐसा दिविभोग भोगितां । अनुतापी नित्य ॥६-४४३।


    अर्थ: "देवा, हे विघ्न आमच्यावर का कोसळले’ असा स्वर्गातील भोग भोगीत असता तो सारखा पश्चात्ताप करत असतो."



    ओवी ६-४४४
    पाठीं जन्में संसारीं । परि सकळ धर्माचिया माहेरीं ।

    लांबा उगवे आगरीं । विभवश्रियेचा ॥६-४४४।


    अर्थ: "नंतर तो मनुष्यलोकात जन्मतो, पण सर्वधर्मांचे वसतिस्थान आणि वैभवरूप लक्ष्मीचे जे कुलरूपी शेत त्यामध्ये भातगोट्याचे रोपाप्रमाणे वाढतो."



    ओवी ६-४४५
    जयातें नीतिपंथें चालिजे । सत्यधूत बोलिजे ।

    देखावें तें देखिजे । शास्त्रदृष्टीं ॥६-४४५।
    अर्थ: "जे कुल नीतीच्या मार्गाने चालते, सत्याने पवित्र झालेले बोलते आणि जे पहाणे असेल ते शास्त्रदृष्टीने पाहाते."




    ओवी ६-४४६
    वेद तो जागेश्वरु । जया व्यवसाय निजाचारु ।
    सारासार विचारु । मंत्री जया ॥६-४४६।


    अर्थ: "ज्या कुळात वेद हे जागृत दैवत असते, शास्त्रविहित आचरण हाच ज्याचा व्यापार आहे व सारासार विचार हाच ज्याचा सल्लामसलत देणारा प्रधान आहे."



    ओवी ६-४४७
    जयाच्या कुळीं चिंता । जाली ईश्वराची पतिव्रता ।

    जयातें गृहदेवता । आदि ऋद्धि ॥६-४४७।


    अर्थ: "ज्या कुळामधे चिंता ईश्वराचीच एकनिष्ठ पत्नी झालेली असते आणि ऋध्यादिक या ज्याच्या घरातील देवता आहेत."



    ओवी ६-४४८
    ऐसी निजपुण्याची जोडी । वाढिन्नली सर्वसुखाची कुळवाडी ।
    तिये जन्मे तो सुरवाडी । योगच्युतु ॥६-४४८।


    अर्थ: "अशा रीतीने ज्या कुळात आपल्या पुण्याईच्या कमाईने सर्व सुखाचा व्यापार वाढला आहे त्या कुळात तो योगभ्रष्ट सुखाने जन्म घेतो."





    ओवी ६-४४९अथवा ज्ञानाग्निहोत्री । जे परब्रह्मण्यश्रोत्री ।महासुखक्षेत्रीं । आदिवंत ॥६-४४९।अर्थ: "अथवा जे अग्नीमधे हवन करतात आणि जे ब्रह्मनिष्ठ व वेदसंपन्न असतात व जे ब्रह्मसुखरुपी शेताचे मिरासदार असतात."




    ओवी ६-४५०
    जे सिद्धांताचिया सिंहासनीं । राज्य करिती त्रिभुवनीं ।

    जे कूजती कोकिल वनीं । संतोषाच्या ॥६-४५०।
    अर्थ: "जे (एकमेवाद्वितीय ब्रह्म) या सिद्धांताच्या सिंहासनावर बसून त्रैलोक्यात राज्य करतात व हे संतोषाच्या वनात शब्द करणारे कोकिळ आहेत."




    ओवी ६-४५१
    जे विवेकद्रुमाचे मुळीं । बैसले आहाति नित्य फळीं ।

    तया योगियांचिया कुळीं । जन्म पावे ॥६-४५१।
    अर्थ: "जे विवेकरूप गावाच्या मुख्य ठिकाणी असलेल्या ब्रह्मरूप फळाचे नित्य सेवन करीत राहिले आहेत त्या योग्याच्या कुळात त्यास जन्म मिळतो."




    ओवी ६-४५२
    तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् ।

    यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥६-४३॥
    अर्थ: "त्या ठिकाणी पूर्वदेहीच्या संस्काराने आलेला बुद्धियोग त्याला प्राप्त होतो. हे कुरुनंदना, त्यापुढे तो पुन्हा योगसिद्धीसाठी प्रयत्न करतो."




    ओवी ६-४५३
    मोटकी देहाकृति उमटे । आणि निजज्ञानाची पाहांट फुटे ।

    सूर्यापुढें प्रगटे । प्रकाशु जैसा ॥६-४५२।
    अर्थ: "अल्प वयातच त्याच्या ठिकाणी स्वरूपज्ञानाचा उदय होतो. ज्याप्रमाणे सूर्य उगवण्यापूर्वी अरुणोदयाचा प्रकाश होतो."




    ओवी ६-४५४
    तैसी दशेची वाट न पाहतां । वयसेचिया गांवा न येतां ।
    बाळपणींच सर्वज्ञता । वरी तयातें ॥६-४५३।
    अर्थ: "त्याप्रमाणे योग्य अवस्थेची वाट न पहाता, प्रौढ वयरूपी गावाला पोहोचण्यापूर्वीच, अगोदरच लहानपणीच सर्वज्ञता त्याला माळ घालते."




    ओवी ६-४५५
    तिये सिद्धप्रज्ञेचेनि लाभें । मनचि सारस्वतें दुभे ।

    मग सकळ शास्त्रे स्वयंभें । निघती मुखें ॥६-४५४।
    अर्थ: "पूर्वजन्मात तयार झालेली बुद्धी त्याला अनुकूल असल्यामुळे त्याचे मनच सर्व विद्यांना प्रसवते आणि मग सर्व शास्त्रे आपोआप त्याच्या मुखातून निघतात."




    ओवी ६-४५६
    ऐसें जे जन्म । जयालागीं देव सकाम ।

    स्वर्गीं ठेले जप होम । करिती सदा ॥६-४५५।
    अर्थ: "ज्याकरता देव कामनायुक्त होऊन स्वर्गात नेहेमी जप, होम इत्यादिक करत राहिले आहेत असा जो जन्म."




    ओवी ६-४५७
    अमरीं भाट होईजे । मग मृत्युलोकातें वानिजे ।

    ऐसें जन्म पार्था गा जे । तें तो पावे ॥६-४५६।
    अर्थ: "व देवांनी भाट होऊन मृत्युलोकाचे वर्णन करावे असा जो जन्म, अर्जुना, त्याला प्राप्त होतो."




    ओवी ६-४५८तेथ सदैवा आणि पायाळा । वरी दिव्यांजन होय डोळां ।मग देखे जैसी अवलीळा । पाताळधनें ॥६-४५८।अर्थ: "एखादा भाग्यवान पुरुष पायाळू असून त्याला डोळ्यात घालण्याला दिव्यांजन मिळाल्यानंतर, तो जसा पाताळातील द्रव्य सहज पहातो."




    ओवी ६-४५९
    तैसें दुर्भेद जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाय ।

    तेथ सौरसेंवीण जाय । बुद्धि तयाची ॥६-४५९।
    अर्थ: "त्याप्रमाणे ज्या सिद्धांतात बुद्धीचा प्रवेश होत नाही अथवा जे सिद्धांत केवल गुरूकडून खरोखर कळावयाचे असतात, त्या सिद्धांतात त्याची बुद्धी यत्नावाचून प्रवेश करते."


    ओवी ६-४६०
    बळियें इंद्रियें येती मना । मन एकवटे पवना ।

    पवन सहजें गगना । मिळोंचि लागे ॥६-४६०।
    अर्थ: "बलवान इंद्रिये मनाच्या स्वाधीन होतात, मन प्राणवायूशी एक होते आणि प्राणवायु अनायासे मूर्ध्निआकाशास मिळू लागतो."


    ओवी ६-४६१
    ऐसें नेणों काय अपैसें । तयातेंचि कीजे अभ्यासें ।

    समाधि घर पुसे । मानसाचें ॥६-४६१।
    अर्थ: "असे सहजच कसे काय होते ते समजत नाही. अभ्यास त्याला आपोआप येतो व समाधि त्याच्या मनातील घर विचारीत येते."


    ओवी ६-४६२
    जाणिजे योगपीठीचा भैरवु । काय हा आरंभरंभेचा गौरवु ।

    कीं वैराग्यसिद्धीचा अनुभवु । रूपा आला ॥६-४६२।
    अर्थ: "हा योगभ्रष्ट पुरुष योगरूपी आसनावरील जणुकाय भैरवदेवच अथवा योगारंभरूपी केळीची शोभाच किंवा जणु काय वैराग्याच्या पूर्णतेचा अनुभवच आकाराला आलेला आहे."


    ओवी ६-४६३
    हा संसारु उमाणितें माप । कां अष्टांगसामग्रीचें द्वीप ।

    जैसें परिमळेंचि धरिजे रूप । चंदनाचें ॥६-४६३।
    अर्थ: "हा पुरुष म्हणजे संसार मोजण्याचे मापच किंवा अष्टांगयोगाची सामुग्री दाखवणारा जणू दिवाच होय."





    ओवी ६-४६४तैसा संतोषाचा काय घडिला । कीं सिद्धिभांडारींहूनि काढिला ।दिसे तेणें मानें रूढला । साधकदशे ॥६-४६४।अर्थ: "त्याप्रमाणे हा पुरुष जसा काही संतोषाचाच बनवलेला अथवा सिद्धांच्या समुदायातून काढलेला असावा इतक्या योग्यतेचा साधकदशेतच तयार झालेला दिसतो."




    ओवी ६-४६५
    जे वर्षशतांचिया कोडी । जन्मसहस्रांचिया आडी ।
    लंघितां पातला थडी । आत्मसिद्धीची ॥६-४६५।
    अर्थ: "कारण कोट्यावधी शतवर्षात हजारो जन्मांचे प्रतिबंध उल्लंघन करून तो आत्मसिद्धीच्या किनार्‍याला येऊन पोचला."




    ओवी ६-४६६
    म्हणौनि साधनजात आघवें । अनुसरे तया स्वभावें ।
    मग आयतिये बैसे राणिवे । विवेकाचिये ॥६-४६६।
    अर्थ: "म्हणून सर्व साधन मात्र आपोआप त्याच्यामागे येतात. नंतर तो आयताच विवेकाच्या राज्यावर बसतो."




    ओवी ६-४६७
    पाठीं विचारितया वेगां । तो विवेकुही ठाके मागां ।
    मग अविचारणीय तें आंगा । घडोनि जाय ॥६-४६७।
    अर्थ: "नंतर विचाराच्या वेगामुळे तो विवेकही मागे रहातो आणि मग विचारांच्या आवाक्याबाहेरचे जे स्वरूप ते तो स्वत: बनतो."




    ओवी ६-४६८
    तेथ मनाचें मेहुडें विरे । पवनाचें पवनपण सरे ।
    आपणपां आपण मुरे । आकाशही ॥६-४६८।
    अर्थ: "त्या ठिकाणी मनरूपी मेघ नाहीसा होतो व वार्‍याचा वारेपणा (चंचलपणा) संपतो आणि त्याचप्रमाणे आकाशदेखील आपण आपल्यातच मुरते."




    ओवी ६-४६९
    प्रणवाचा माथा बुडे । येतुलेनि अनिर्वाच्य सुख जोडे ।
    म्हणौनि आधींचि बोलु बहुडे । तयालागीं ॥६-४६९।
    अर्थ: "तो ॐकाराच्या अर्धमात्रेत लीन व्हावा, इतके त्याला शब्दातीत सुख मिळते. म्हणून त्याच्याविषयी शब्द अगोदरच परत फिरतो. (शब्दाने ह्याचे वर्णन करता येत नाही.)"




    ओवी ६-४७०
    ऐसी ब्रह्मींची स्थिती । जे सकळां गतींसी गती ।
    तया अमूर्ताची मूर्ति । होऊनि ठाके ॥६-४७०।
    अर्थ: "तात्पर्य अशी जी ब्रह्माची स्थिती जी सगळ्या गतींची गती आहे, त्या निराकार ब्रह्मस्थितीची हा मूर्ती होऊन रहातो."





    ओवी ६-४७१तेणें बहुतीं जन्मीं मागिलीं । विक्षेपांचीं पाणिवळें झाडिलीं ।म्हणौनि उपजतखेंवो बुडाली । लग्नघटिका ॥६-४७१।अर्थ: "त्याने मागील अनेक जन्मात विक्षेपरूपी केरकचरा काढून टाकला म्हणून या जन्मी उपजताक्षणीच लग्नघटका बुडाली." (त्याचा कर्मक्षय होऊन ब्रह्माशी ऐक्य होण्याची वेळ प्राप्त झाली).




    ओवी ६-४७२
    आणि तद्रूपतेसीं लग्न । लागोनि ठेलें अभिन्न ।
    जैसे लोपलें अभ्र गगन । होऊनि ठाके ॥६-४७२।
    अर्थ: "आणि ज्याप्रमाणे ढग नाहीसा झाला की तो आकाशाशी एकरूप होतो, त्याप्रमाणे ब्रह्मरूपाशी त्याचे अभिन्नतेने लग्न लागते."




    ओवी ६-४७३
    तैसें विश्व जेथ होये । मागौतें जेथ लया जाये ।

    तें विद्यमानेंचि देहें । जाहला तो गा ॥६-४७३।
    अर्थ: "त्याचप्रमाणे हे अर्जुना, ज्या स्वरूपापासून विश्व उत्पन्न होते व फिरून ते विश्व ज्या स्वरूपी लीन होते, ते स्वरूप तो हल्लीच्या देहानेच होतो."




    ओवी ६-४७४
    जया लाभाचिया आशा । करूनि धैर्यबाहूंचा भरंवसा ।

    घालीत षट्कर्मांचा धारसां । कर्मनिष्ठ ॥६-४७४।
    अर्थ: "ज्या वस्तूच्या प्राप्तीच्या आशेने, धैर्यरूपी बाहूंचा विश्वास धरून, कर्मनिष्ठ लोक षट्कर्मांच्या प्रवाहामधे उडी टाकतात."




    ओवी ६-४७५
    कां जिये एक वस्तूलांगीं । बाणोनि ज्ञानाची वज्रांगी ।

    झुंजत प्रपंचेंशीं समरंगीं । ज्ञानिये गा ॥६-४७५।
    अर्थ: "अथवा ज्या एका वस्तुकरता ज्ञानी लोक ज्ञानाचे चिलखत अंगात घालून समरांगणामधे संसाराशी लढतात."




    ओवी ६-४७६
    अथवा निलागें निसरडा । तपोदुर्गाचा आडकडा ।

    झोंबती तपिये चाडा । जयाचिया ॥६-४७६।
    अर्थ: "अथवा तपी लोक ज्या स्वरूपप्राप्तीच्या इच्छेने तपरूपी तुटलेल्या निराधार व निसरड्या कड्यावर चढण्याचा प्रयत्न करतात."




    ओवी ६-४७७
    जें भजतियां भज्य । याज्ञिकांचें याज्य ।

    एवं जें पूज्य । सकळां सदा ॥६-४७७।
    अर्थ: "ते स्वरूप भजन करणार्‍या लोकांचा भजनाचा विषय आहे, जे स्वरूप यज्ञ करणार्‍या लोकांच्या यज्ञाचा विषय आहे, याप्रमाणे जे स्वरूप सर्वांना सर्वकाळी पूज्य आहे."



    ओवी ६-४७८तेंचि तो आपण । स्वयें जाहला निर्वाण ।जें साधकांचें कारण । सिद्ध तत्त्व ॥६-४७८।अर्थ: "जे स्वरूप शेवटची गती आहे, साधकांचे साध्य आहे व जे एकच सिद्धतत्व आहे, ते स्वरूप तो यो."




    ओवी ६-४७९
    म्हणौनि कर्मनिष्ठा वंद्यु । तो ज्ञानियांसि वेद्यु ।

    तापसांचा आद्यु । तपोनाथु ॥६-४७९।
    अर्थ: "म्हणून तो पुरुष कर्मनिष्ठांना पूज्य आहे. ज्ञानी पुरुषास जाणण्यास तो योग्य आहे आणि तपस्वी लोकांमधे तो मूळ तपोनाथ आहे."




    ओवी ६-४८०
    पैं जीवपरमात्मसंगमा । जयाचें येणें जाहलें मनोधर्मा ।
    तो शरीरीचि परी महिमा । ऐशी पावे ॥६-४८०।
    अर्थ: "जीव परमात्म्याच्या ऐक्याच्या ठिकाणी ज्याच्या मनाच्या वृत्तीचे येणे झाले, तो जरी देहधारी असला तरी त्याला असला महिमा प्राप्त होतो."



    ओवी ६-४८९तो प्रसंगु आहे पुढां । जेथ शांतु दिसेल उघडा ।तो पालविजेल मुडा । प्रमेयबीजाचा ॥६-४८९।अर्थ: "तो प्रसंग पुढे आहे. जेथे शांत रस स्पष्ट दिसेल असे जे प्रतिपाद्य विषयरूपी बीजाचे साठवण ते मोकळे करून विस्तृत तर्‍हेने श्रोत्यांच्या मनात पेरण्यात येईल."




    ओवी ६-४९०
    जें सात्त्विकाचेनि वडपें । गेलें आध्यात्मिक खरपें ।

    सहजें निडारले वाफे । चतुरचित्ताचे ॥६-४९०।
    अर्थ: "कारण की सर्वगुणाच्या दृष्टीने मानसिकतारूपी डिखळे विरघळून योग्य चित्ताचे वाफे सहज तयार झाले."




    ओवी ६-४९१
    वरी अवधानाचा वाफसा । लाधला सोनया ऐसा ।

    म्हणौनि पेरावया धिंवसा । श्रीनिवृत्तीसी ॥६-४९१।
    अर्थ: "आणखी सोन्यासारखा अवधानरूपी वापसा मिळाला. म्हणून श्रीनिवृत्तिनाथांना पेरण्याची इच्छा झाली."




    ओवी ६-४९२
    ज्ञानदेव म्हणे मी चाडें । सद्गुरूंनीं केलें कोडें ।

    माथां हात ठेविला तें फुडें । बीजचि वाइलें ॥६-४९२।
    अर्थ: "ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सद्गुरूंनी कौतुकाने मला चाडे केले व माझ्या मस्तकावर हात ठेवला, ते उघड उघड बीजच घातले."




    ओवी ६-४९३
    म्हणौनि येणें मुखें जें जें निगे । तें संतांच्या हृदयीं साचचि लागे ।

    हें असो सांगों श्रीरंगें । बोलिलें जें ॥६-४९३।
    अर्थ: "म्हणून या माझ्या मुखातून जे निघेल ते संतांच्या मनाला खरोखर पटेल. श्रोते म्हणतात, हे रूपक राहू दे. श्रीकृष्ण परमात्मा जे काही म्हणाले ते तू सांग."




    ओवी ६-४९४
    परी तें मनाच्या कानीं ऐकावें । बोल बुद्धीच्या डोळां देखावें ।

    हे सांटोवाटीं घ्यावें । चित्ताचिया ॥६-४९४।


    अर्थ: "असे म्हटल्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते मी सांगतो. पण ते मनाच्या कानाने ऐकले पाहिजे. माझे शब्द बुद्धीच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजेत. हे माझे शब्द चित्त देऊन त्याचा मोबदला घेतले पाहिजेत."




    ओवी ६-४९५
    अवधानाचेनि हातें । नेयावें हृदयांआतौतें ।

    हे रिझवितील आयणीतें । सज्जनांचिये ॥६-४९५।
    अर्थ: "हे शब्द अवधानाच्या द्वारा मनाच्या आत न्यावेत. हे शब्द सज्जनांच्या बुद्धीला समाधान देतील."




    ओवी ६-४९६

    हे स्वहितातें निवविती । परिणामातें जीवविती ।
    सुखाची वाहविती । लाखोली जीवां ॥६-४९६।
    अर्थ: "हे शब्द आत्महिताला स्थिर करतील. पूर्ण अवस्थेला जगवितील आणि जीवाला सुखाची लाखोली वाहवतील."




    ओवी ६-४९७
    आतां अर्जुनेंसीं श्रीमुकुंदें । नागर बोलिजेल विनोदें ।

    तें वोंवियेचेनि प्रबंधें । सांगेन मी ॥६-४९७।
    अर्थ: "आता अर्जुनाशी श्रीकृष्ण चांगले कौतुकाने बोलले ते त्यांचे बोलणे मी ओवी छंदाने सांगेन."




    सार्थ ज्ञानेश्वरी

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा:(Sarth Dnyaneshwari...

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चवथा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सहावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सातवा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय आठवा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...