मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
एकनाथी भागवत अध्याय २९ ओव्या ७०१ ते ८००
तुवां जनासी केला उपकारु । इंद्रियां पाटव्य ज्ञानधिकारु ।
तो उपकार विसरे जो नरु । तो जाण साचारु कृतघ्न ॥ ७०१ ॥
जे जाणती तुझ्या उपकारातें । ते काया वाचा चित्तें वित्तें ।
कदा न भजती आनातें । मज निश्चितें मानिलें ॥ ७०२ ॥
मज निमित्त करूनियां जाण । जें त्वां प्रकशिलें निजात्मज्ञान ।
तेणें जगाचें उद्धरण । श्रवणमननकीर्तनें ॥ ७०३ ॥
यापरी तूं क्रुपाळू पूर्ण । माझें छेदिलें भवबंधन ।
तेचि अर्थींचें निरूपण । उद्धव आपण स्वयें सांगे ॥ ७०४ ॥
वृक्णश्च मे सुदृढः स्नेहपाशो
दाशार्हवृष्ण्यन्धकसात्वतेषु ।
प्रसारितः सृष्टिविवृद्धये त्वया
स्वमायया ह्यात्मसुबोधहेतिना ॥ ३९ ॥
तुवां मायेनें सृजिलें जन । ते सृष्टी व्हावया वर्धमान ।
स्त्री पुत्र सुहृद सज्जन । हा स्नेह संपूर्ण वाढविला ॥ ७०५ ॥
मी जन्मलों यादवकुळांत । तेथ वृष्णि-अंधक-सात्वत ।
इत्यादि सुह्रुद समस्त । अतिस्नेहयुक्त आप्तत्वें ॥ ७०६ ॥
तें सुहृदस्त्रीपुत्रस्नेहबंधन । त्या स्नेहपाशाचें छेदन ।
माझे बाळपणीं त्वां केलें जाण । जें खेळतां तुझें ध्यान मज लागलें ॥ ७०७ ॥
जेवीं वोडंबरी खेळतां खेळ । मोहिनी विद्या प्रेरी प्रबळ ।
ते विद्येचें आवरावया बळ । शक्त केवळ खेळ खेळविता ॥ ७०८ ॥
तेवीं तुझी स्वमाया जाण । जे कां सदा तुज अधीन ।
तिचे स्नेहपाश दारुण । तेणें बांधोनि जन अतिबद्ध केले ॥ ७०९ ॥
ते माझे स्नेहपाश जाण । त्वां पूर्वींच छेदिले आपण ।
जैं मज होतें बाळपण । तैंचि कृपा पूर्ण मज केली ॥ ७१० ॥
तें भवबंधछेतितें जें शस्त्र । तुवां निजयुक्तीं फोडोनि धार ।
सतेज करूनियां खडतर । मजलागीं स्वतंत्र अर्पिलें ॥ ७११ ॥
येणें शस्त्रबळें मी जाण । छेदूं शकें जगाचें बंधन ।
एवढी मजवरी कृपा पूर्ण । केली आपण दयालुत्वें ॥ ७१२ ॥
संसार दुःखरूप जो का एथें । तोचि सुखरूप जाहल मातें ।
ऐशिये कृपेचेनि हातें । मज निश्चितें उद्धरिलें ॥ ७१३ ॥
मी कृतकृत्य जाहलों एथें । परी कांहींएक मागेन तूतें ।
ते कृपा करावीं श्रीकृष्णनाथें । म्हणोनि चरणातें लागला ॥ ७१४ ॥
नमोऽस्तु ते महायोगिन् प्रपन्नमनुशाधि ।
यथा त्वच्चरणाम्भोजे रतिः स्यादनपायिनी ॥ ४० ॥
न घडतें घडविसी आपण । नाथिलें दाविसी विंदान ।
जित्या मेल्या लावूनि लग्न । नांदविसी संपूर्ण निजमाया ॥ ७१५ ॥
जे योगियांसी अतिदुस्तर । जिणें नाडिले स्रष्टा शंकर ।
ते माया तुझी किकर । तूं परात्पर महायोगी ॥ ७१६ ॥
त्या तुझ्या कृपेस्तव जाण । मी कृतकृत्य जाहलों आपण ।
न देखें भवभयादि दुःखभान । स्वानंदीं निमग्न सर्वदा ॥ ७१७ ॥
दृश्य द्रष्टा दर्शन । नाहीं त्रिपुटी ना त्रिगुण ।
हारपलें मीतूंपण । स्वानंदपूर्ण निजबोधें ॥ ७१८ ॥
निजबोधें स्वानंदपूर्ण । हेही बोल मायिक जाण ।
परादिवाचां पडिलें शून्य । यालागीं मौन वेदवादा ॥ ७१९ ॥
कार्य कारण कर्तव्यता । मज उरली नाहीं सर्वथा ।
तरी कांहींएक श्रीकृष्णनाथा । तुज मी आतां मागेन ॥ ७२० ॥
जेवीं कां बाळकाचा थाया । कळवळोनि पुरवी माया ।
तेवीं माझिया वचना यया । श्रीकृष्णराया अवधारीं ॥ ७२१ ॥
हें अंतींचें माझें मगतेपण । देवें अवधारावें सावधान ।
वंदूनियां श्रीकृष्णचरण । अगम्य विंदान मागत ॥ ७२२ ॥
मज थोर भ्रम होता चित्तीं । गोड असेल जीवन्मुक्ती ।
तेथ न देखें तुझी भक्ती । कोरडी मुक्ती मज न लगे ॥ ७२३ ॥
सद्गुरुकृपावचनोक्तीं । शिष्य तत्काळ लाहे मुक्ती ।
ज्यांत सद्ग्रूची नांही भक्ती । जळो ती मुक्ती मज न लगे ॥ ७२४ ॥
यालागीं तुज शरण । मागुतेन मी आलों जाण ।
सायुज्याहीवरी पूर्ण । तुझें गुरुभजन मज देईं ॥ ७२५ ॥
मागां बहुतीं केली भक्ती । म्हणसी त्यांसी म्यां दिधली मुक्ती ।
परी मुक्तीवरती भक्ती । नाहीं मजप्रती मागितली ॥ २६ ॥
मागां जिंहीं जिंहीं केली भक्ती । त्यासीं त्वां ठकिलें देऊनि मुक्ती ।
तें ठकडेपण श्रीपती । न चले मजप्रती सर्वथा ॥ ७२७ ॥
ज्यांची अहंकारशून्य वृत्ती । जाहले आत्माराम सहजगतीं ।
तेही अहेतुक भक्ती करिती । ऐशी स्वरूपस्थिती पैं तुझी ॥ ७२८ ॥
( संमतश्लोक )-आत्मारामाश्च मुनयो निर्ग्रन्था अप्युरुक्रमे ।
कुर्वन्त्यहैतुकीं भक्तिं इत्थम्भूतगुणो हरिः ॥
तेथ त्यजोनियां तुझी गुरुभक्ती । मुक्ती मागणें हेचि भ्रान्ती ।
असो तुझी न लगे मुक्ती । माझी गुरुभक्ती मज देईं ॥ ७२९ ॥
ज्यासी आकळली निजमुक्तता । म्हणसी त्यासी भक्ती नेदवे आतां ।
हे मजसी बोलों नको कथा । तुझी समर्थता मी जाणें ॥ ७३० ॥
तूं न घडे तें घडविसी । न चळे तें चाळविसी ।
नव्हे तें तूं होय करिसी । नाहीं सामर्थ्याची मर्यादा ॥ ७३१ ॥
अगम्य सामर्थ्याची गणना । बुडल्या तारूनि पाषाणां ।
त्यावरी तारिसी वानरसेना । सेतुबंधना श्रीरामा ॥ ७३२ ॥
केवळ जे कां वनचर । पालेखाईर वानर ।
चारी मुक्ती त्यांच्या किंकर । त्यांसी सुरवर वंदिती स्वयें ॥ ७३३ ॥
केवळ ज्या कां व्यभिचारिणी । शेखीं ज्या घुरटा गौळणी ।
मोक्ष लागे त्यांच्या चरणीं । ये ब्रह्मा लोटांगणीं चरणरजासी ॥ ७३४ ॥
तूं परमात्मा परमेश्वर । हें नेणती गौळणी वानर ।
तरी तुझें त्यांसी भजनमात्र । फळलें साचार परब्रह्मत्वें ॥ ७३५ ॥
ऐसें अगाध तुझें भजन । अगम्य भजनाचें महिमान ।
भक्तीअधीन तुझें देवपण । मा मोक्षासी कोण अधिकाई ॥ ७३६ ॥
भक्तीच्या पोटीं जन्मली मुक्ती । वाढली मुक्ती भक्तीतें घाती ।
ऐसी जे कां मुक्ती मातृहंती । तिसी मी सर्वार्थीं नातळें ॥ ७३७ ॥
फिटे मुक्तीचें दूषण । जेणें ते होय अतिपावन ।
तें मीं सांगेन विदान । ऐक सावधान श्रीकृष्णा ॥ ७३८ ॥
जोडल्याही मुक्तपण । मज द्यावें तुझें गुरुभजन ।
तेणें मुक्तीही होय पावन । म्हणोनि लोटांगण घातलें ॥ ७३९ ॥
मस्तकीं धरिले श्रीचरण । उद्धव सर्वथा न सोडी जाण ।
तेणें टकच जाहला श्रीकृष्ण । त्यासी संपूर्ण तुष्टला ॥ ७४० ॥
जाणोनि आपलें मुक्तपण । मी न सांडी तुझें निजभजन ।
ऐशी कृपा करीं पूर्ण । म्हणोनि श्रीचरण न सोडी ॥ ७४१ ॥
मुक्तता मानल्या संपूर्ण । तैं राहों शके सद्गुरुभजन ।
हेंही बाधों न शके विघ्न । तैशी भक्ति निर्विघ्न मज सांग ॥ ७४२ ॥
कोटिजन्में शिणतां जाण । म्हणसी नातुडे मुक्तपण ।
त्या मोक्षा नांव ठेविसी ‘विघ्न’ । मूर्ख संपूर्ण मज म्हणसी ॥ ७४३ ॥
जेणें सुटे तुझें सद्गुरुभजन । तें मी मानीं परम विघ्न ।
तुझे भक्तिवीण मुक्तपण । अलवणी मज जाण गोविंदा ॥ ७४४ ॥
माझी न मोडे नित्यमुक्तता । अहेतुक चालवीं भक्तिपंथा ।
ऐसी कृपा श्रीकृष्णनाथा । झणीं संकोचता मानिसी ॥ ७४५ ॥
म्हणसी म्यां दिधली नित्यमुक्ती । ते माझी मजपाशीं सिद्ध होती ।
‘दिधली’ म्हणणें हे मिथ्या वदंती । वाऊगी ख्याती दातृत्वाची ॥ ७४६ ॥
माझी स्वतःसिद्ध नित्यमुक्तता । त्यावरी भक्ति मी मांगे आतां ।
ते देशील तरी तूं साचार दाता । उदारता या नांव ॥ ७४७ ॥
ते संतोषोनि भक्ति देतां । उल्हास न देखों तुझ्या चित्ता ।
थोर मांडली कृपणता । कृष्णनाथा मजलागीं ॥ ७४८ ॥
जे सांडवी सद्गुरुभक्ती । आम्हां न लगे तुझिया जीवन्मुक्ती ।
मुक्ती म्हणणें हेही भ्रांती । ऐक श्रीपती सांगेन ॥ ७४९ ॥
मुळीं मुख्यत्वें नाही बद्धता । तेथ कैंची काढिली मुक्तता ।
मिथ्या मुक्ती मी नातळे सर्वथा । माझी गुरुभक्तिता मज देईं ॥ ७५० ॥
मागें ज्यांसी त्वां दिधली मुक्ति । ते ठकिले ठकिले याच रीतीं ।
तैसें चाळवूं नको श्रीपती । मोक्षावरील भक्ती मज देईं ॥ ७५१ ॥
म्हणोनि घातलें लोटांगण । धांवोनि धरिले दोनी चरण ।
प्रेमें वोसंडला श्रीकृष्ण । उद्धवासी संपूर्ण तुष्टला ॥ ७५२ ॥
मोक्षाहीवरील गुरुभक्ती । उद्धवें मागितली नाना युक्तीं ।
जे जे चालली उपपत्ती । तेणें सुखें श्रीपती सुखावला ॥ ७५३ ॥
सुखें सुखावली श्रीकृष्णमूर्ती । डोलों लागला स्वानंदस्थितीं ।
तेणें संतोषें भक्तिमुक्ती । उद्धवाहातीं अर्पिली ॥ ७५४ ॥
जगीं उद्धवाचें शुद्ध पुण्य । जगीं उद्धवचि धन्य धन्य ।
ज्यालागीं सर्वस्वें श्रीकृष्ण । मोक्षावरील गुरुभजन स्वानंदें देत ॥ ७५५ ॥
गुरु ब्रह्म दोनी अभिन्न । हेंही सद्गुरु प्रबोधी पूर्ण ।
यालागीं मोक्षावरील गुरुभजन । नव्हे दूषण सच्छिष्या ॥ ७५६ ॥
मागिलां निजभक्ताप्रती । स्वानंदें तुष्टला श्रीपती ।
तिहीं मागितली निजमुक्ती । त्यांसी हे स्थिती अतर्क्य ॥ ७५७ ॥
उद्धवें थोर केली ख्याती । मुक्तीचे माथां वाइली भक्ती ।
अगम्य मागितली स्थिती । तेही श्रीपती अर्पित ॥ ७५८ ॥
उद्धवा मुक्तीवरील जे भक्ती । ते मज अवतारांची अवतारशक्ती ।
येणें उत्पत्ति-स्थिति-प्रलय अंतीं । करूनि श्रीपती मी अलिप्त ॥ ७५९ ॥
येणेंचि बळें मी तत्त्वतां । कर्में करूनि अकर्ता ।
भोग भोगोनि अभोक्ता । जाण सर्वथा येणेंचि योगें ॥ ७६० ॥
हा योग न कळे ज्यासी । दुःखरूप संसार त्यासी ।
हा अखंड योग मजपाशीं । मीं संसारेंसी सुखरूप ॥ ७६१ ॥
हा योग सदाशिव जाणे । का म्यां जाणिजे नाराय़णें ।
इतरांचे जें जाणणें । तें अगम्यपणें रिघेना ॥ ७६२ ॥
ऐसी श्रीकृष्ण सांगे गुह्य गोष्टी । ते स्थिति बाणली उद्धवाचे पोटीं ।
दोघां निजबोधें एकगांठी । भजनकसवटी कळों सरली ॥ ७६३ ॥
मुक्तीसी भक्तीची हातवटी । ते उद्धवासी कळली गोष्टी ।
तो उल्हास न माये पोटीं । स्वानंदपुष्टीं कोंदला ॥ ७६४ ॥
जेवीं बाळकाच्या थायाकारणें । माता लेववी निजभूषणें ।
तेवीं उद्धवालागीं श्रीकृष्णें । अवतारस्थिति देणें निश्चित ॥ ७६५ ॥
मनाचें नाइकती कान । बुद्धीचें न देखती नयन ।
शेखीं गगनातेंही चोरून । उद्धवासी श्रीकृष्ण निजस्थिती अर्पी ॥ ७६६ ॥
जे ब्रह्मवेत्त्यांसी नकळे । जे वेदनुवादा नाकळे ।
ते स्थिती उद्धवासी गोपाळें । कृपाबळें अर्पिली ॥ ७६७ ॥
पूर्वीं श्रीकृष्णें पुसतां पहा हो । ‘उद्धरलों’ म्हणे उद्धवो ।
आतां मागें भजनभावो । हा गूढाभिप्रावो हरि जाणे ॥ ७६८ ॥
मुक्तीवरील मागतां भक्ती । श्रीकृष्णाची अवतारशक्ती ।
मायानियंतृत्वाची पूर्ण स्थिति । उद्धवाचे हातीं स्वयें आली ॥ ७६९ ॥
जाणोनि मायेचें मिथ्यात्वपूर्ण । तिचें प्रेरण आणि आवरण ।
हें मायानियंतृत्वलक्षण । उद्धवासी श्रीकृष्ण स्वयें अर्पी ॥ ७७० ॥
जसें बुद्धिबळाचे पोटीं । पूर्व कर्म नसतां गांठीं ।
राजा प्रधान पशु प्यादा उठी । निर्धारितां दृष्टीं काष्ठ एक ॥ ७७१ ॥
एकचि काष्ठ दोहीं भारीं । तेथ कोण कोणाचा वैरी ।
वैर नसतांही झुंजारी । मारामारी अचेतनां ॥ ७७२ ॥
म्हणती हस्ती घोडा प्रधान मेला । तेथ काय त्यांचा प्राण गेला ।
प्यादा होता तो प्रधान जाहला । तो काय पावला गजान्तलक्ष्मी ॥ ७७३ ॥
जीव नसतांही निर्धारीं । मारीलें म्हणती निजगजरीं ।
एका जीत एका हारी । तें ज्ञान सारीं नेणतीं ॥ ७७४ ॥
सारीं निमाल्या पाठीं । कोण धर्मात्मा चढे वैकुंठी ।
कोण पडे नरकसंकटीं । तेवीं बद्धमुक्तगोठी समूळ मिथ्या ॥ ७७५ ॥
एवं बुद्धिबळाचिये परी । ज्याची निजदृष्टीं संसारीं ।
तोचि अवतारांचा अवतारी । जाण तो निर्धारीं भगवंत ॥ ७७६ ॥
समूळ मिथ्या जाणे वेदोक्ती । समूळ मिथ्या जाणे बंधमुक्ती ।
हें जाणोनि आचरे जो वेदविहितीं । तेचि निजभक्ती मुक्तीवरिल ॥ ७७७ ॥
करूनि संसारनिवृत्ती । बहुत पावले नित्यमुक्ती ।
त्यांसी हे दुर्गमभक्ती । अतर्क्य स्थिती तर्केना ॥ ७७८ ॥
ऐशी ज्यापाशीं माझी स्थिती । तोचि मोक्षावरील करी भक्ती ।
इतरांसी हे अतर्क्य गती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ७७९ ॥
उद्धव पावला अगाध गती । त्यासी सर्वलोकोपकारार्थीं ।
वांचवावया ब्रह्मशापाहातीं । उपाय श्रीपती स्वयें योजी ॥ ७८० ॥
नारदासी ब्रह्मज्ञान । त्यासीही दक्षशापबंधन ।
एके ठायीं न राहे जाण । करी परिभ्रमण शापस्तव ॥ ७८१ ॥
झालियाही ब्रह्मज्ञान । ब्रह्मशाप अतिदारुण ।
हें जाणोनियां श्रीकृष्ण । उद्धवा जाण दूरी दवडी ॥ ७८२ ॥
उद्धव जन्मला यादववंशीं । यादव निमती ब्रह्मशापेंसीं ।
तेथ वांचवावया उद्धवासी । बदरिकाश्रमासी स्वयें धाडी ॥ ७८३ ॥
ब्रह्मशापाचेनि आघातें । यादव निमती स्वगोत्रघातें ।
उद्धव वांचवावया तेथें । बदरीकाश्रमातें हरि प्रेरी ॥ ७८४ ॥
उद्धवासी जें झालें ज्ञान । त्याहूनि बदरिकाश्रम पावन ।
हें सर्वथा न घडे जाण । ब्रह्मशापाभेण पळवीत ॥ ७८५ ॥
उद्धवा ऐसें अनर्घ्य रत्न । ज्यासी बाणली स्थिति पूर्ण ।
त्यासी वांचवावया श्रीकृष्ण । पाठवी आपण बदरिकाश्रमा ॥ ७८६ ॥
श्रीभगवानुवाच-
गच्छोद्धव मयाऽऽदिष्टो बदर्याख्यं ममाश्रमम् ।
तत्र मत्पादतीर्थोदे स्नानोपस्पर्शनैः शुचिः ॥ ४१ ॥
गंभीरगिरा बोले श्रीकृष्ण । उद्धवा तुज जाहलें ब्रह्मज्ञान ।
तुटलें स्नेहपाशबंधन । तरी ममाज्ञा करीं गमन बदरिकाश्रमा ॥ ७८७ ॥
त्या बदरिकाश्रमें महिमान । लोकसंग्रहार्थ संपूर्ण ।
तरावया जडामूढ जन । स्वमुखें श्रीकृष्ण सांगत ॥ ७८८ ॥
तो बदरिकाश्रम माझें स्थान । तेथ नित्य माझें अनुष्ठान ।
तया स्थानाचें दूरदर्शन । करी निर्दळण कलिकल्मषा ॥ ७८९ ॥
ज्या पर्वताचें स्पर्शन । मानवां करी परम पावन ।
जें बदरीचें नामस्मरण । विभांडी दारुण महादोषां ॥ ७९० ॥
तेथेंही माझें पादोदक । अलकनंदा पवित्र देख ।
जिचेनि स्पर्शमात्रें लोक । होती अलौकिक पावन ॥ ७९१ ॥
जेथ श्रद्धायुक्त करितां स्नान । जीवाचें तुटे भवबंधन ।
ज्यासी घडे आचमन । तो उद्धरे जाण पितरेंसीं ॥ ७९२ ॥
ऐसें बदरिकाश्रम माझें जाण । अतिशयें परम पावन ।
म्हणासी कैं केलें त्वां तें स्थान । तरे ऐक तें कथन उद्धवा ॥ ७९३ ॥
रजोगुणें सृजिले जन । ते जाहले भोगकर्मीं प्रवीण ।
भोगासक्तीं बुडतां पूर्ण । दों रूपीं जाण मी अवतरलों ॥ ७९४ ॥
तम निरसी रविचंद्र पूर्ण । तैसा मी जाहलों नरनारायण ।
बदरिकाचलामाजीं जाण । केला संपूर्ण नित्योदयो ॥ ७९५ ॥
भज्यपूज्यत्वें मी नारायण । नररूपें मीचि भक्त जाण ।
तेथ भक्ति वैराग्य ज्ञानं । म्यां आचरोन प्रकाशिलें ॥ ७९६ ॥
तो बदरीकाश्रम माझें स्थान । तेथें सर्वदा मी आपण ।
अद्यापि करितों अनुष्ठान । भक्तिज्ञानवैराग्यें ॥ ७९७ ॥
नरनारायणस्थितीं । मी अवतरलों जे पर्वतीं ।
तेथ तोडिले बोरीऐशी मागुती । माझी निजभक्ती फांपाइली ॥ ७९८ ॥
यालागीं ‘बदरीकाश्रम’ । त्या स्थळासी म्यां ठेविलें नाम ।
तेथें फिटे भवभ्रम । यापरी परम पावन तें स्थळ ॥ ७९९ ॥
त्या बदरिकाशमाप्रती । तुवां जावें गा निश्चितीं ।
ऐसें उद्धवा कल्पिसी चित्तीं । मज काय तीर्थीं विवंचू ॥ ८०० ॥