मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० ओव्या १0१ ते २००

    श्रवण मनन करितां । कर्मासी झालिया विगुणता ।

    बाधक नव्हे माझ्या भक्तां । कर्मकिंकरता त्यां नाहीं ॥१॥
    श्रवणमनन करीत असतांना कर्मांत काही वैगुण्य आले, तर ते माझ्या भक्तांना बाधक होत नाही. कारण, कर्म-किंकरता त्यांना नसते. १.


    स्वधर्म केलिया फळ काये । चित्ताचा मळमात्र जाये ।
    भक्तु भजनें निर्मळ आहे । बाधूं न लाहे स्वकर्म ॥२॥
    स्वधर्म केल्यापासून फळ काय ? तर त्याने चित्ताचा मळ मात्र जातो. परंतु माझा भक्त हा भजनानेच निर्मळ होत असल्यामुळे स्वकर्म त्याला बाधक होत नाही २.


    एवं कर्माची चोदना । मद्‍भक्तासी नाहीं जाणा ।
    करितां श्रवणकीर्तना । कर्मबंधना नातळती ॥३॥
    तात्पर्य, माझ्या भक्तांना कर्माची आज्ञा लागू होत नाही. कारण, ते श्रवणकीर्तन करीत असल्यामुळे कर्मबंधनांत सांपडत नाहींत ३.


    ऐशिया जिज्ञासावस्थेसी । कर्मबाधा नाहीं त्यासी ।
    मुख्य तात्पर्य ब्रह्मज्ञानासी । हेंचि उद्धवासी सांगतु ॥४॥
    असे जे जिज्ञासावस्थेमध्ये असतात, त्यांना कर्मापासून बाधा होत नाही. मुख्य तात्पर्य ब्रह्मज्ञानसंपादनाकडे असते, हेच उद्धवाला भगवान् सांगतात ४.


    यमान् अभीक्ष्णं सेवेत नियमान् मत्परः क्वचित् ।
    मदभिज्ञं गुरुं शांतं उपासीत मदात्मकम् ॥ ५ ॥
    [श्लोक ५] माझ्या भक्ताने अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह या यमांचे पूर्णपणे पालन करावे शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान या नियमांचे आत्मज्ञानाला अडथळा येत नसेल तर यथाशक्ति पालन करावे मला जाणणार्‍या शांतस्वरूप गुरूंजवळ जाऊन त्यांना माझेच स्वरूप समजून त्यांची सेवा करावी. (५)


    होआवया वृत्तीचा उपरम । अहिंसा-सत्यादि धर्म ।
    आचरावे अविश्रम । बाह्य नेम अविरोधें ॥५॥
    वृत्तीचा उपरम होण्यासाठी अहिंसा, सत्य, इत्यादि धर्म बाह्य नियमाला विरोध न येईल अशा रीतीनें अविश्रांत आचरण करावेत ५.


    आचरतां अहिंसा-सत्यादिकांसी । तंव तंव दशा उजळे कैसी ।
    अतिप्रीति गुरुभक्तीसी । अहर्निशीं गुरु चिंती ॥६॥
    अहिंसा- सत्यादिकांचे आचरण करीत असता त्याची स्थिति अशी काही उज्ज्वल होते की, गुरुभक्तीवर त्याचे अत्यंत प्रेम जडतें, तो रात्रंदिवस गुरूचेंच चिंतन करूं लागतो ६.


    सद्‍गुरूवीण ब्रह्मज्ञान । सर्वथा नव्हे नव्हे जाण ।
    हें उपनिषदर्थें प्रमाण । परम निर्वाण साधिलें ॥७॥
    कारण, सद्गुरूशिवाय ब्रह्मज्ञान कधीच प्राप्त व्हावयाचे नाही, असे प्रमाण उपनिषद्वाक्यांनी अखेरचा निर्णय म्हणून सांगून दिले आहे ७.


    डोळा देखणाचि आहे । त्यासी सूर्य नव्हतां साह्ये ।
    सिद्ध पदार्थ देखों न लाहे । स्तब्ध राहे अंधारीं ॥८॥
    डोळ्याला चांगले दिसत आहे, पण त्याला जर सूर्याचे साहाय्य नसेल, तर पुढे असलेला पदार्थ त्याला पहातां येणार नाही. तो अंधारांतच स्तब्ध राहील ८.


    नाव तारी हे साचार । माजीं बैसले थोर थोर ।
    परी तारकेंवीण परपार । समर्थ नर न पावती ॥९॥
    नावच तारते ही गोष्ट खरी आहे, तिच्यांत थोरथोर लोक बसले आहेत, परंतु त्या थोर लोकांना नावाडी असल्याशिवाय काही पलीकडे जातां यावयाचें नाहीं ९.


    पर्जन्यें भूमी मार्दवा आली । बीजें कणिंग असे भरली ।
    परी ज्ञातेन पेरणी नाहीं केली । तंव पिकाची बोली पोंचट ॥११०॥
    पावसाने जमिनीला ओल आली; आणि बियाने कणगी भरलेली असली, तरी तज्ज्ञ मनुष्यानें पेरणी केली नाही, तोपर्यंत पिकाची गोष्ट व्यर्थ आहे ११०.


    रत्‍न सांपडलें अवचितें । परी खरें खोटें संषय तेथें ।
    रत्‍नपारखी करी मोलातें । अतियत्‍न त्यातें मग करिती ॥११॥
    अकस्मात् एखादें रत्न सापडतें पण ते खरे की खोटें असा संशय उत्पन्न होतो. तेथें रत्नपरीक्षक येऊन त्याचे मोल करतो, तेव्हा मग ते मिळविण्याविषयी लोक खटपट करतात ११.


    तैसें निजस्वरूप आइतें । श्रद्धा-सद्‍गुरूचेनि हातें ।
    खरें करूनियां ज्ञाते । निजसुखातें पावले ॥१२॥
    त्याप्रमाणे आत्मस्वरूप हे आयतेंच हातांत असते, त्याला श्रद्धापूर्वक सद्गुरूच्या हाताने खरें करून घेउन, ज्ञाते आत्मसुखाला पात्र होतात १२.


    साधावया निजज्ञान । करितां सद्‍गुरूचें सेवन ।
    निवाले संत सज्जन । आनंदघन सद्‍गुरु ॥१३॥
    आत्मज्ञान संपादन करण्याकरितां सद्‌गुरूची सेवा करून संत सज्जन शांत होतात. कारण सद्गुरु हा आनंदघन असतो १३.


    म्हणसी साधनें केलीं अनेक । तैसें सद्‍गुरूही साधन एक ।
    म्हणतां मुमुक्षु झाला मूर्ख । निजात्मसुख बुडालें ॥१४॥
    पण तूं म्हणशील की, अनेक साधनें केली, त्यांतलें गुरु हें एक साधन असेल. पण असे जर मुमुक्षु म्हणेल तर तो मूर्ख होईल. त्याचे निजात्मसुख बुडून जाईल १४.


    सद्‍गुरु केला तो साधन । त्याहूनि परतें साध्य आन ।
    म्हणतां आली नागवण । नागवला जाण सर्वस्वें ॥१५॥
    सद्गुरु केला. तो एक साधनरूप आहे; आणि साध्य त्याहून वेगळेच आहे, असे म्हटले की नागवण झाली. तो सर्वस्वी नागवला म्हणून समजावें १५.


    जो चित्सुखें सदा संपन्न । चिद्रूपें ज्यासी समाधान ।
    तो चिन्मात्राहोनि भिन्न । नव्हे जाण सर्वथा ॥१६॥
    जो चित्सुखाने सदा संपन्न, चित्स्वरूपाने ज्याला समाधान, तो चिन्मात्राहून भिन्न केव्हांच असणार नाही. १६.


    लवण सागरीं रिघालें । तेव्हांचि तें समुद्र झालें ।
    दीपें वणवया आलिंगिलें । वणवाचि झालें तें तेज ॥१७॥
    कारण मीठ समुद्रात पडते, तेव्हांच तें समुद्र होते; दीप वणव्याला आलिंगन देतो, तेव्हांच ते दीपतेज वणवा होऊन राहते १७.


    एवं चिद्रूपाचें ज्यासी ज्ञान । तो चिद्रूपचि सत्य संपूर्ण ।
    गुरु ब्रह्म अभिन्न जाण । ये अर्थीं प्रमाण उपनिषदें ॥१८॥
    त्याप्रमाणे चिद्‌रूपाचें ज्याला ज्ञान होते, तो परिपूर्ण चिद्‌रूपच बनतो. त्याप्रमाणे गुरु आणि ब्रह्म भिन्न नव्हते, ह्याविषयी उपनिषदच प्रमाण आहे १८.


    हो कां घृताची पुतळी । नव्हतां घृतपणावेगळी ।
    घृतरूपें रूपा आली । तैसी मूर्ती झाली सद्‍गुरूची ॥१९॥
    किंवा तुपाची बाहुली केली, तर ती तुपाहून भिन्न न होता, तुपाच्याच रूपाने आकाराला आलेली असते; त्याप्रमाणेच सद्गुरूची मूर्तिही (चिद्‌रूपत्वानेच साकार) झालेली असते (अर्थात् ब्रह्मरूपच असते) १९.


    तो चित्सुखाचा पुतळा । कीं सच्चिदानंदाचा सोहळा ।
    प्रत्यक्ष देखावया डोळां । धरी लीलाविग्रहो ॥१२०॥
    केवळ चित्सुखाचा पुतळा, किंवा सच्चिदानंदाचा सोहाळा प्रत्यक्ष डोळ्यांनी पहावा म्हणून लीलेनेंच त्याने देह धारण केलेला असतो २०.


    त्याची होआवया भेटी । पाहिजेति भाग्याचिया कोटी ।
    हे बोलणेंवरी दिसे दिठी । तैसी गोठी ते नाहीं ॥२१॥
    त्याची भेट व्हावयाला कोटि भाग्य पदरी पाहिजेत. असें बोलतां बोलतां तो दृष्टीस पडेल अशांतलीही गोष्ट नाही २१.


    सद्‍गुरु जेउती वास पाहे । तेउती सुखाची सृष्टी होये ।
    तो म्हणे तेथ लवलाहें । महाबोधु राहे स्वानंदें ॥२२॥
    सद्गुरु जिकडे दृष्टि फेंकतो, तिकडे सुखाचीच सृष्टि उत्पन्न होते. तो म्हणेल तेथे महाबोध स्वानंदाने राहतो २२.


    त्या सद्‍गुरूचे देखिल्या पाये । तहानभूक तत्काळ जाये ।
    कल्पना उठोंचि न लाहे । निजसुख आहे गुरुचरणीं ॥२३॥
    त्या सद्गुरूचे पाय पाहिले की, तहान-भूक तत्काळ नाहीशी होते. कल्पना तर उठूच शकत नाही. तात्पर्य, गुरूच्या चरणीं निजसुख असते २३.


    त्या सद्‍गुरूचें लक्षण । सांगतां शब्दुं थोंटावे जाण ।
    जो सनातन ब्रह्म पूर्ण । ऊणखूण त्या नाहीं ॥२४॥
    त्या सद्गुरूचे लक्षण सांगतांना शब्दच खुंटून जातात. जो सनातन पूर्णब्रह्मच आहे, त्याला ऊणखूण कशाची ? २४.


    तर्‍ही स्फुरली एकी स्फूर्ती । त्यासी सर्वार्थी दिसे शांती ।
    शांतीवेगळी उपपत्ती । प्रमाण निश्चिती रिघेना ॥२५॥
    तथापि एक खूण सांगण्याची स्फूर्ति होते. ती ही की, त्याच्या ठिकाणी सर्वतोपरी शांति मात्र दिसते. शांतीशिवाय दुसरे प्रमाण निश्चित असें कांहींच दिसत नाही २५.


    शांति तेचि समाधान । शांति तेचि ब्रह्मज्ञान ।
    शांती तेचि ब्रह्म पूर्ण । सत्य जाण उद्धवा ॥२६॥
    उद्धवा ! शांति तेच समाधान होय. शांति तेच ब्रह्मज्ञान होय; आणि शांति तेच खरोखर पूर्णब्रह्म होय असें तूं निश्चित समज २६.


    ऐसी सद्‍गुरूची स्थिती । ऐकोनि शिष्याच्या चित्तीं ।
    वाढली अतिप्रीती । गुरुभक्तीलागोनी ॥२७॥
    सद्गुरूची अशी स्थिति ऐकून शिष्याच्या मनांत गुरुभक्तीविषयी अधिक प्रेम वाढलें २७.


    यालागीं गुरुगवेषणा । उसंतु घेवों नेदी अंतःकरणा ।
    अष्टौ प्रहर विचक्षणा । गुरुलक्षणा लक्षितु ॥२८॥
    म्हणून तो गुरूच्या शोधाला लागला. त्याचे अंतःकरण त्याला विसावा घेऊ देईना. अष्टौप्रहर गुरुलक्षणाचेच चिंतन तो करूं लागला २८.


    कैं तो स्वामी देखेन ऐसा । कैं हा माझा फिटेल फांसा ।
    कैं उपरमु होईल मानसा । सद्‍गुरुपिसा तो झाला ॥२९॥
    त्या सर्वसमर्थाला मी केव्हां पाहीन ? हा माझा पाश केव्हां सुटेल ? मनाला शांति कधी येईल ? असा तो सद्गुरूसाठी वेडा होऊन गेला २९.


    आयुष्य वेंचतें उठाउठी । अझूनि नव्हे सद्‍गुरूसी भेटी ।
    झाल्या मनुष्यदेहासी तुटी । सर्वस्व शेवटीं बुडेल ॥१३०॥
    हें आयुष्य बघता बघतां संपत आले, अजून मला सद्गुरूची भेट होत नाहीं; मनुष्यदेह निघून गेला म्हणजे सारेंच बुडेल ( असें त्याला वाटू लागलें ) १३०.


    ऐकतां गुरूचें नांव । मनापुढें घेत धांव ।
    ते गोठीसीच देत खेंव । येवढी हांव जयाची ॥३१॥
    गुरूचे नुसते नांव ऐकलें तरीसुद्धा मनाच्या पुढे तो धावूं लागतो; आणि त्या वार्तेलाच मिठी मारून बसतो. इतकी त्याची आतुरता वाढते ३१.


    सद्‍गुरु प्रत्यक्ष न भेटतां । मनेंचि पूजी गुरुनाथा ।
    परमादरें पूजा करितां । प्रेम तत्त्वतां न संटे ॥३२॥
    सद्गुरु प्रत्यक्ष भेटला नाही तर मनानेच गुरुनाथाची पूजा करतो आणि परमभक्तीने पूजा करतांना त्याला एवढे प्रेम उचंबळते की, ते हृदयांत मावत नाही ३२.


    सद्‍गुरु भेटावयाकारणें । हिंडे तीर्थें तपोवनें ।
    गुरु न विसंबे मनें । नित्यविधानें आचरतां ॥३३॥
    सद्गुरूची भेट व्हावी म्हणून तो तीर्थे आणि तपोवनें हिंडत असतो. नित्यकर्में करीत असतांही मनांतून एक क्षणभरसुद्धा गुरूला विसंबत नाही ३३.


    सद्‍गुरुप्राप्तीचिया काजा । लहानथोरांची करी पूजा ।
    अत्यादरें मानी द्विजा । गुरु मज माझा भेटावा ॥३४॥
    सद्गुरूची प्राप्ति व्हावी म्हणून तो लहान थोरांची पूजाच करीत सुटतो. माझा गुरु मला भेटावा म्हणून तो ब्राह्मणांचा अतिशय सत्कार करतो ३४.


    अस्वलाचिया परी । गुरुनामाचा जप करी ।
    गुरुवांचोनि निरंतरीं । चिंता न करी आनाची ॥३५॥
    तो अस्वलासारखा 'गुरु गुरु' असा सारखा जपच करीत असतो. निरंतर गुरुवांचून दुसऱ्या कशाचेही तो चिंतन करीत नाही ३५.


    आसनीं भोजनीं शयनीं । गुरूतें न विसंबे मनीं ।
    जागृतीं आणि स्वप्नीं । निदिध्यासनीं गुरु केला ॥३६॥
    बसतांना, जेवतांना, निजतांना, मनांतून गुरूला विसंबत म्हणून नाही. जागृतींत व स्वप्नांत सुद्धा त्याला गुरूचा निदिध्यास लागून राहिलेला असतो ३६.


    गुरुस्मरण करितां देख । स्मरणें विसरे तहानभूक ।
    विसरला देहगेहसुख । सदा संमुख परमार्था ॥३७॥
    पहा ! गुरूचे नुसते स्मरण केले, तरी सुद्धा त्या स्मरणाने तहान-भूक विसरून जाते. तो घरादाराच्या सुखालाही विसरून जाऊन सदासर्वदा परमार्थाच्याच सन्मुख असतो ३७.


    ऐसी सद्‍गुरूची आवडी । ज्याची आस्था चढोवढी ।
    त्यासी गुरुरूपें तांतडी । भेटी रोकडी मी देतों ॥३८॥
    अशी सद्गुरूची ज्याला आवड असते, ज्याची आस्था चढाओढीने वाढतच जाते, त्याला तत्काळ गुरूच्या रूपानें मीच प्रत्यक्ष भेट देतों ३८.


    जंव जंव आस्था अधिक । तंव तंव भेटीची जवळिक ।
    साधनांमाजीं हें साधन मुख्य । आस्थाचि एक विशेष ॥३९॥
    उत्कंठा जितकी जितकी अधिक, तितकी तितकी भेटही जवळ. साधन-सामग्रीमध्ये 'विशेष उत्कंठा' हेच एक मुख्य साधन आहे ३९.


    करितां वरिष्ठसाधनकोडी । बोधाची जोडेना कवडी ।
    सद्‍गुरुभजनाची अर्ध घडी । जोडी कोडी बोधाच्या ॥१४०॥
    जरी कोट्यवधि मोठमोठी साधने केली, तरी आत्मज्ञानाची कवडीसुद्धा हाती लागावयाची नाही. पण सद्गुरूच्या भजनांत अर्ध-घटका जरी खर्च केली, तरी आत्मज्ञानाची रासच्या रास पदरांत पडेल १४०.


    सद्‍गुरुभजनीं लागवेगें । मोक्ष येऊनि पायां लागे ।
    गुरुभक्त तोही नेघे । चरणरंगें रंगला ॥४१॥
    सद्गुरूच्या भजनीं लागले की, मोक्षही येऊन पायाला लागतो. पण गुरूचा भक्त त्याचाही स्वीकार करीत नाही. कारण तो चरणसेवेतच रंगून गेलेला असतो ४१.


    श्रीगुरुचरणाची गोडी । विसरली मोक्षसुखाच्या कोडी ।
    गुरुभजनीं जयां अनावडी । ते संसार बांदवडीं पडियेले ॥४२॥
    श्रीगुरुचरणाची गोडी अशी असते की, ती मोक्षसुखाच्या राशीचाही विसर पाडते. गुरुभजनाची ज्यांना आवड नसते तेच संसारबंधनांत पडतात ४२.


    छेदावया संसारबंधन । करावें सद्‍गुरुसेवन ।
    सद्‍गुरुसेवा तें माझें भजन । गुरु-आम्हां भिन्नभावो नाहीं ॥४३॥
    संसाराचे बंधन तोडावयाला सद्गुरूचीच सेवा करणे अवश्य आहे. सद्‌गुरूची सेवा तेंच माझे भजन आहे. कारण गुरूमध्ये व आम्हांमध्ये भिन्नभाव नाही ४३.


    गुरुभक्तांची श्रद्धा गाढी । आणि गुरुभजनाची गोडी ।
    ते सांगितली आवडीं । प्रत्यक्ष उघडी करूनि ॥४४॥
    ह्याप्रमाणे गुरुभक्तांची श्रद्धा किती निस्सीम असते, आणि त्यांना गुरुभजनाची किती गोडी असते, ते मी आवडीने अगदी उघड करून तुला सांगितले ४४.


    सहज प्रसंगें येणें । शिष्यांचींही लक्षणें ।
    सांगेन तुजकारणें । कृष्ण म्हणे उद्धवा ॥४५॥
    कृष्ण म्हणतात, उद्धवा ! आता ह्या सहज प्रसंगाने ओघानुसार शिष्याची लक्षणें मी तुला सांगतों ४५.


    अमान्यमत्सरो दक्षो निर्ममो दृढसौहृदः ।
    असत्वरोऽर्थजिज्ञासुः अनसूयुरमोघवाक् ॥ ६ ॥
    [श्लोक ६] कसलाही अभिमान धरू नये कोणाचाही मत्सर करू नये नेहमी सावध असावे 'माझे' पणाचा भाव सोडावा गुरू आणि माझ्याबद्दल निःसीम प्रेम ठेवावे तत्त्व समजून घेण्याची जिज्ञासा असणार्‍याने कोणत्याही प्रकारची घाई करू नये कोणाबद्दलही दोषदृष्टी ठेवू नये निरर्थक आणि असत्य भाषण यांपासून दूर राहावे. (६)


    मान देखोनि सहसा । शिष्य सांकडों लागे कैसा ।
    जेवीं गळीं लागला मासा । चरफडी तैसा सन्मानें ॥४६॥
    गळाला लागलेला मासा जसा तळमळतो, तसा मान-सन्मान पाहिला की, सच्छिष्य संकटांत पडतो ४६.


    नांवें ऐकोनि बागुलातें । बाळ सांडूं पाहे प्राणातें ।
    तेवीं ऐकतांचि सन्मानातें । भयें प्राणांतें सांकडें ॥४७॥
    बागुलाचे नांव ऐकल्याबरोबर मूल जसें कासावीस होते, त्याप्रमाणे सन्मान ऐकला की, भयाने प्राणांत संकट आले असें त्यास वाटते ४७.


    चंडवातें जेवीं केळी । समूळ कांपे चळवळी ।
    कां लहरींच्या कल्लोळीं । कांपे जळीं रविबिंब ॥४८॥
    सोसाट्याच्या वाऱ्याने केळ ज्याप्रमाणे मुळासकट थरथर कापू लागते, किंवा लाटांच्या उसळ्यांनी पाण्यांतील सूर्याचे प्रतिबिंब जसे कापू लागते ४८,


    सन्मानु तेणें पाडें । दृष्टीं देखोनि नावडे ।
    महत्त्वें थोर सांकडें । अंगाकडे येवों नेदी ॥४९॥
    त्याप्रमाणे सन्मान हा दृष्टीनेंसुद्धा त्याला पाहवत नाही. मोठेपणा हें मोठे संकट वाटते व तें तो आपल्याकडे येऊ देत नाही ४९.


    आदरें घेतां सन्मान । दृढ होईल देहाभिमान ।
    सांडोनि मानाभिमान । हीनदीन होऊनि असे ॥१५०॥
    प्रीतीने सन्मानाचा स्वीकार केला तर देहाभिमान दृढ होईल म्हणून तो मानाभिमान सोडून हीनदीन होऊनच रहातो १५०.


    समूळ नामरूप जाये । मज कोणी देखों न लाहे ।
    ऐसी दशा जेणें होये । ते ते उपाये करीतसे ॥५१॥
    आपलें नामरूप सारें नाहींसें व्हावे व आपणाकडे कोणी पाहूंही नये, अशी स्थिति ज्यायोगें होईल तसला उपाय तो करूं लागतो ५१.


    लौकिक देखोनि उद्वेगु । देहगेहांचा उबगु ।
    एकलेपणीं अतिचांगु । न धरी संगु द्वैताचा ॥५२॥
    लौकिकाला पाहून तो उद्विग्न होतो, देहगेहाचा त्याला कंटाळा येतो, एकांतच त्याला चांगला वाटतो, म्हणून द्वैताची तो संगतच धरीत नाही ५२.


    मज कोणीं न देखावें । मज कोणीं न वोळखावें ।
    मज कोणीं न लाजावें । ऐसें जीवें वांछितु ॥५३॥
    मला कोणी पाहूं नये; मला कोणी ओळखू नये; मला कोणी लाजूं नये, हीच त्याची मनापासून इच्छा असते ५३.


    मान देखोनियां दिठीं । लपे देह‍उपेक्षेच्या पोटीं ।
    जेवीं चोर लागलिया पाठीं । लपे संकटीं धनवंतु ॥५४॥
    चोर पाठीस लागला म्हणजे द्रव्यवान् मनुष्य ज्याप्रमाणे मोठ्या संकटाने लपून बसतो, त्याप्रमाणे मान डोळ्यांनी पाहिला की, देहउपेक्षेच्या पोटांत तो लपून राहतो ५४.


    मी एकु लौकिकीं आहें । ऐसें कोणा ठावें नोहे ।
    ऐशी ऐशी दशा पाहे । मानु न साहे यालागीं ॥५५॥
    लोकांत मी एक कोणी तरी आहे, हे कोणाला ठाऊक असूं नये, अशा प्रकारच्या स्थितीत तो राहात असतो, म्हणून त्याला मानपान खपत नाही ५५.


    सांडावया अहंममता । मानु न पाहे सर्वथा ।
    लौकिकीं सन्मानु घेतां । दृढ अहंता होईल ॥५६॥
    मीपणा व माझेपणा सोडून द्यावा म्हणून तो मानाकडे पहात नाही. कारण, लोकांमध्ये सन्मान घेतला तर अहंता दृढ होऊन राहील असें त्याला वाटते ५६.


    ज्याचें पोटीं दृढ अभिमान । ते सदा वांछिति सन्मान ।
    जो सांडूं निघे अभिमान । तो मानापमान न पाहे ॥५७॥
    ज्यांच्या पोटांत अभिमान बळावलेला असतो, तेच नेहमी सन्मानाची अपेक्षा करतात. तो अभिमानच जो सोडून द्यावयाला तयार होतो, तो मानापमानाकडे पहात नाही ५७.


    जेणें घेतला सन्मान । त्यासी नेघवे अपमान ।
    तेथ सहजें आला देहाभिमान । यालागीं सन्मान नावडे ॥५८॥
    ज्याने सन्मान घेतलेला असतो, त्याला अपमान सहन होत नाही. तेव्हा तेथे सहजच देहाभिमान उत्पन्न होतो. म्हणून त्याला सन्मानच मुळी आवडत नाही ५८.


    सन्मानु घ्यावया तत्त्वतां । ज्ञातेपण मिरवी ज्ञाता ।
    ते संधीं वसे ममता । अर्थस्वार्थाचेनि लोभें ॥५९॥
    खरोखर पाहिले तर ज्ञाता माणूस सन्मान व्हावा म्हणूनच ज्ञातेपणा मिरवीत असतो. तशा संधींत अर्थस्वार्थाच्या लोभाने ममता राहत असते ५९.


    एवं नापेक्षी सन्मान । हें प्रथम शिष्याचें लक्षण ।
    आतां 'निर्मत्सरत्व' संपूर्ण । तें सुलक्षण परियेसीं ॥१६०॥
    तात्पर्य, सन्मानाची इच्छा न करणे हेच शिष्याचे 'पहिले' लक्षण होय. आतां 'निर्मत्सरपणा' म्हणजे काय, त्याचेही लक्षण सांगतों ऐक १६०.


    सज्ञानामाजीं वैर । ज्ञातृत्वाचाचि मत्सर ।
    तेथें देहाभिमानें केलें घर । अतिदुस्तर जीवासी ॥६१॥
    ज्ञातृत्वाच्या मत्सरामुळे ज्ञात्यांमध्येही परस्परांविषयीं वैर उत्पन्न होते. तेथें देहाभिमान हा जिवाला अतिदुस्तर असें घर करून राहतो ६१.


    ज्ञानाभिमानाची गोष्टी । वेंचुनी तपाचिया कोटी ।
    दुजी करीत होता सृष्टी । अभिमान पोटीं ज्ञानाचा ॥६२॥
    ज्ञानाभिमानाची गोष्ट काय सांगावी ? अपार तपश्चर्या खर्ची घालून (विश्वामित्र ) दुसरी सृष्टि उत्पन्न करीत होता; कारण, मनांत ज्ञानाचा अभिमान ! ६२.


    ज्ञानाभिमानु दुर्वासासी । व्यर्थ शापिलें अंबरीषासीं ।
    म्यां सोशिलें गर्भवासासी । ज्ञानाभिमानासी भिऊनि ॥६३॥
    दुर्वासालाही ज्ञानाचाच अभिमान, म्हणून त्याने अंबरीषाला व्यर्थ शाप दिला ! आणि ज्ञानाभिमानाला भिऊन त्याच्या शापाचे दहा गर्भवास मी सहन केले ! ६३.


    ज्ञानाभिमानु ब्रह्मयासी । नेलें गोपालवत्सांसी ।
    मज होणें पडिलें त्या वेषांसी । ज्ञानाभिमानासी भिऊनि ॥६४॥
    ब्रह्मदेवालाही ज्ञानाचा अभिमान झाला, म्हणून त्याने गोपाल व वत्से हरण केली. आणि ज्ञानाभिमानाला भिऊन मला त्यांची स्वरूपें घेऊन राहावे लागले ६४.


    उद्धवा ज्ञानाभिमान । सर्वां अभिमानांमाजीं कठिण ।
    वसिष्ठ विश्वामित्र जाण । ज्ञानाभिमानें भांडती ॥६५॥
    उद्धवा ! साऱ्या अभिमानांत ज्ञानाभिमान मोठा कठिण आहे. वसिष्ठ आणि विश्वामित्र हे ज्ञानाभिमानानेंच भांडत होते ६५.


    एवं ज्ञानाभिमानाभेण । म्यां घेतलें गोवळेपण ।
    मज मूर्ख म्हणती याज्ञिक ब्राह्मण । त्यांसी ज्ञानाभिमान कर्माचा ॥६६॥
    अशा ज्ञानाभिमानाच्या भयानेंच मी गवळीपणा घेतला. याज्ञिक ब्राह्मणांनी तर मला मूर्ख ठरविले. कारण, त्यांना कर्माचा व ज्ञानाचा अभिमान होता ६६.


    मुख्य माझीच हे ऐशी दशा । तेथें इतरांचा पाडु कायसा ।
    ज्ञानाभिमानाचा दृढ फांसा । नुगवे सहसा ज्ञात्यासी ॥६७॥
    माझीच जर ही दशा ! तेथे इतरांचा पाड काय ? शानाभिमानाचा बळकट पाश ज्ञात्यांना सहसा सुटतच नाही ६७.


    ज्ञानाभिमानाची जाती कैशी । उभा न ठाके मूर्खापाशीं ।
    वैर लावी सज्ञानासी । समत्सरेंसीं वर्तवी ॥६८॥
    ज्ञानाभिमानाची जात तरी कसली ? तो मूर्खाजवळ उभा राहत नाही. ज्ञात्याज्ञात्यांतच वैर माजवून मत्सराने वागावयाला लागतो ६८.


    एवं निर्मत्सर होणें ज्यासी । तेणें सांडावें ज्ञानाभिमानासी ।
    येरवीं तो ज्ञातयासी । समत्सरेंसीं नांदवी ॥६९॥
    तात्पर्य, ज्याला निर्मत्सर होणे असेल त्याने ज्ञानाचा अभिमान टाकून द्यावा. नाही तर तो ज्ञात्यांना मत्सरानेच वागावयाला लावतो ६९.


    ऐक मत्सराची सामग्री । देहीं देहाभिमान दृढ करी ।
    तोही ज्ञातेपणाचें बळ धरी । लोभ माझारीं अर्थस्वार्थे ॥१७०॥
    आता मत्सराची सामग्री ऐक. देहामध्ये देहाभिमान दृढ करतो; तोही ज्ञातेपणाचे बळ धरतो व त्यामध्ये द्रव्याच्या आशेने लोभही घुसून राहतो १७०.


    इतुकी सामग्री जेथें होये । तोचि समत्सर द्वेषु वाहे ।
    शुद्ध शिष्य हें न साहे । त्यागोनि जाये मत्सरु ॥७१॥
    इतकी सामग्री ज्याच्यापाशी जमते तोच मत्सरासहित द्वेष वाहात असतो. शुद्ध शिष्याला हे सहन होत नाही. तो मत्सराचा त्यागच करतो ७१.


    मत्सराची जाती कैशी । अवश्य वसे ज्ञात्यापाशीं ।
    मत्सर थोर पंडितांशीं । यावज्जन्मेंसीं न संडिती ॥७२॥
    मत्सराची जात कशी आहे पाहा ! तो हटकून ज्ञात्यापाशीच राहतो. पंडितांना मत्सर दांडगा. तो ते यावजन्म सोडीत नाहीत ! ७२.


    पंडित भेटती समत्सर । लवणभंजन अतिनम्र ।
    बोलती अतिमधुर । समत्सर छळणोक्तीं ॥७३॥
    पंडित म्हणून जितके आढळतात तितके मत्सरीच असतात. ते वरकरणी मोठी नम्रता दाखवून अतिशय गोड बोलतात. पण त्यांचे बोलणे सारे मत्सराचें व दुसर्‍याच्या छळाचे असतें ७३.


    मत्सरें पंडित येती क्रोधा । असदारोपणें करिती निंदा ।
    एवढी मत्सराची बाधा । नातळे कदा सच्छिष्यु ॥७४॥
    मत्सराने पंडित रागाला चढतात आणि एकमेकांवर खोडसाळपणाचे आरोप करून निंदा करतात. अशी मत्सराची बाधा सच्छिष्याला कधीही शिवत नाहीं ७४.


    मत्सरु ज्ञात्यातें न सोडी । मा इतर काइसी बापुडीं ।
    शिष्य द्वेषाची गोष्टी सोडी । मत्सरु तोडी सर्वस्वें ॥७५॥
    ज्ञानीलोकांना सुद्धा जर मत्सर सोडीत नाही, तर मग इतर बिचारे लोक काय ? परंतु शिष्य असतो तो द्वेषाची गोष्टच सोडून देतो, आणि मत्सर तर निखालस तोडून टाकतो ७५.


    मत्सर सांडूनि तत्त्वतां । शिष्यें रहावें सर्वथा ।
    निर्मत्सरतेची कथा । ऐक आतां सांगेन ॥७६॥
    शिष्याने खरोखर नेहमी मत्सर सोडूनच राहिले पाहिजे. त्या निर्मत्सरपणाची गोष्ट सांगतों ऐक ७६.


    पुढूनि स्वार्थु नेतां । द्वेष उपजों नेदी चित्ता ।
    भूतीं भगवंतु भावितां । द्वेषु सर्वथा येवों नेदी ॥७७॥
    आपल्यापुढे आलेला लाभ कोणी हिरावून नेला, तरी चित्तामध्ये तो द्वेष उत्पन्न होऊ देत नाही. प्राणिमात्रामध्ये भगवंतच भरलेला आहे, अशी भावना तो धरीत असल्यामुळे द्वेष येऊच शकत नाहीं ७७.


    निंदेचिया वाग्बाणीं । दारुण विंधिल्या दुर्जनीं ।
    द्वेषु उपजों नेदी मनीं । हित मानीं निंदेचें ॥७८॥
    दुर्जनांनी निंदेच्या वाग्बाणांनी कितीही विद्ध केले, तरी तो मनांत द्वेष उत्पन्न होऊ देत नाही. निंदेमध्ये हितच मानतो ७८.


    जेणें जेणें निजनिंदा केली । तो तो मानी हित माउली ।
    पापमळांची क्षाळणता झाली । शुद्ध केली माझि वृत्ति ॥७९॥
    ज्याने ज्याने आपली निंदा केली असेल, तो तो आपली हितकर्ती माउलीच समजतो. तिने आपला पातकाचा मळ धुऊन काढला व माझी वृत्ति निर्मळ केली, असाच त्याचा समज असतो ७९.


    ऐस‍ऐशिया विवंचना । द्वेषु आळों नेदी मना ।
    निर्मत्सरता ते हे जाणा । दुसरी लक्षणा शिष्याची ॥१८०॥
    अशा अशा विचारानें तो आपल्या मनाला द्वेष शिवूंच देत नाही. 'निर्मत्सरपणा' तो हाच, हे लक्षात ठेव. आणि हेच शिष्याचे 'दुसरें' लक्षण होय १८०,


    यावरी जे 'दक्षता' । तेही तुज सांगों आतां ।
    शिष्याची प्रागल्भ्यता । निजस्वार्थालागोनि ॥८१॥
    ह्यानंतर तिसरे लक्षण म्हणजे 'दक्षता' तेही आतां तुला सांगतो. म्हणजे आपले हित साधण्याकरितां शिष्याची दक्षता किती असते अथवा असावी ते लक्षात येईल ८१.


    उगवल्या सावधान-भास्करा । नाशी निद्रेतंद्रेच्या अंधारा ।
    होय धारणेचा दिवसु खरा । धृतीच्या दुपारा वर्ततु ॥८२॥
    सावधानता म्ह. जागरूकतारूपी सूर्य उगवला की तो निद्रेचा आणि तंद्रेचा अंधार चटसारा नाहीसा करून टाकतो आणि धारणेचा दिवस सुरू होतो, (धारणा म्हणजे गुरूक्त साधनाभ्यासाची एकसारखी धारा चालू ठेवणे ), व धृतीची दुपार होऊन बसते ८२.


    त्या दिवसाचेनि लवलाहें । शमदमादि समुदायें ।
    भक्तिपंथें चालताहे । मार्गीं न राहे क्षणभरी ॥८३॥
    असा दिवस उगवतांच लगबगीने शमदमादि समुदाय भक्तीच्या मार्गानें चालू लागतो. वाटेत एक क्षणभरही थांबत नाहीं ८३.


    तेथ उचलतां पाउलीं । निजबोधाची पव्हे ठाकिली ।
    जेथ पांथिकांची निवाली । तृषा हरली तृष्णेची ॥८४॥
    तेथे प्रत्येक पावलाला निजबोधाची पाणपोई घातलेली असते, तेथें मार्गस्थांचीच तृषा भागते असे नाही, तर तृषेचीही तृषा नाहीशी होते ८४.


    तेथ निजग्रामींचे भेटले । सोहंसांगाती एकवटले ।
    तेथूनि चुकणया मुकले । नीट लागले निजपंथी ॥८५॥
    या मार्गात गांवचे गांवकरी (संत) भेटले व ते 'सोहं' (ब्रह्म तें मीच) या भावनेने एकत्र मिळाले, म्हणजे पुढची वाट चुकावयाची भीतीच राहात नाही. ते सरळ निजमार्गाला लागतात ८५.


    ऐकें बापा विचक्षणा । आळस विलंबु नातळे मना ।
    त्या नांव 'दक्षता' जाणा । 'तिसरी' लक्षणा शिष्याची ॥८६॥
    हे चतुर उद्धवा ! ऐक. आळस किंवा विलंब मनाला न शिवणे ह्याचंच नांव 'दक्षता. ' हेंच शिष्याचे 'तिसरें' लक्षण होय ८६.


    जुनाट संग्रहो सवें होता । ते सर्व सांडिली ममता ।
    सांडिल्याची क्षिती मागुता । न करी सर्वथा निजबोधें ॥८७॥
    पूर्वीचा जुनाट संग्रह जवळ राहिला होता, त्याचीही सारी ममता तो सोडून देतो आणि आत्मज्ञानाच्या अनुभवामुळे ते सोडल्याची पुन्हा कधीं क्षितीही करीत नाही ८७.


    देहीं दृढ धरावी अहंता । तेणें देहसंबंधीयांची ममता ।
    देहाभिमानु नातळे चित्ता । गेली ममता न लगतां ॥८८॥
    देहाच्या ठिकाणी 'अहंता' दृढ केली, तर देहसंबंधियांची 'ममता' जडते. देहाभिमानच चित्ताला शिवला नाही, तर ममता लगेच नाहीशी होते ८८.


    देह नश्वरत्वें देखिला । विष्ठामूत्रांचा मोदळा ।
    यालागीं अहंकारु गेला । 'सोहं' लागला दृढभावो ॥८९॥
    देह हे मलमूत्राचे गांठोडे अथवा गोळा असून नाशवंत असलेला दिसतोच ; त्यामुळे त्याजवरील अहंबुद्धि म्हणजे अहंकार जाऊन त्या ठिकाणी 'सोहंबुद्धि म्हणजे ब्रह्म ते मीच' ही भावना दृढतर होऊन जाते ८९.


    दृढ वाढवूनि सोहंता । तेणें सांडविली अहंममता ।
    हे 'चौथी' गा अवस्था । जाण तत्त्वतां शिष्याची ॥१९०॥
    सोहंभावना दृढतर वाढवून त्याने अहंभावना व ममत्वभावना सोडलेली असते. हाच शिष्याच्या अंगचा 'निर्ममता' हा 'चौथा ' गुण होय १९०.


    गुरु माता गुरु पिता । गुरु गणगोत तत्त्वतां ।
    गुरु बंधु सुहृदता । निजस्वार्था शिष्याच्या ॥९१॥
    शिष्याचे हित साधण्याचे कामी गुरु हाच माता, गुरु हाच पिता, गणगोतही खरोखर गुरुच, आणि बंधु व सुहृदही गुरुच ९१.


    गुरुपरिचर्या नित्यकर्म । गुरुसेवा हाचि स्वधर्म ।
    गुरु तोचि आत्माराम । सुहृदसंभ्रम सद्‍गुरूसी ॥९२॥
    गुरूची सेवा हेच त्याचे नित्यकर्म ; गुरुसेवा हाच त्याचा धर्म ; गुरु तोच आत्माराम; ह्याप्रमाणे सुहृदाचा सर्व गौरव तो सद्गुरूलाच ९२.


    ऐसें सद्‍गुरूसी 'सुहृद' पण । असावें शिष्यासीं संपूर्ण ।
    हें 'पांचवें' गा लक्षण । सत्य जाण उद्धवा ॥९३॥
    याप्रमाणे सद्गुरूच्या ठिकाणींच सर्व आप्तपणा मानावा. उद्धवा ! सच्छिष्याचे हेंच 'पांचवें' लक्षण होय ९३.


    चंचळत्वें चळु चित्ता । येवों नेदीच सर्वथा ।
    निजीं निजरूपनिश्चळता । साधी सर्वथा सर्वस्वें ॥९४॥
    चित्ताला चंचलपणानें तो कधींच चकू देत नाही. सर्वोपरीनें सर्वकाल आत्म्यामध्येंच निश्चळता तो साधतो ९४.


    जर्‍ही चंचळ झालें अंग । चित्त गुरुचरणीं निश्चळ चांग ।
    अंगीं वाजतां लगबग । वृत्ति अभंग गुरुचरणीं ॥९५॥
    अंग म्ह. शरीर जरी चंचल झाले, तरी त्याचे चित्त गुरुचरणाच्या ठिकाणी अगदी निश्चळच असते. विक्षेपाचे प्रसंग अंगावर कितीही येऊन कोसळले, तरी वृत्ति गुरुचरणाच्या ठिकाणी अढळच असते ९५.


    शरीर वर्ततां व्यापारा । ज्याचे हृदयीं नाहीं त्वरा ।
    गुरुचरणीं धरिला थारा । हा शिष्यु खरा परमार्थी ॥९६॥
    शरीर व्यापार करीत असले तरी ज्याच्या हृदयांत गडबड म्हणून नाहीं, गुरुचरणाच्याच ठिकाणी जो थारा धरून राहतो, तोच खरा परमार्थी शिष्य होय ९६.


    ज्यासी हृदयीं चंचळता । तो शिष्य नव्हे निजस्वार्था ।
    ज्याचे अंतरीं 'निश्चळता' । तोचि परमार्था साधकु ॥९७॥
    ज्याच्या हृदयांत चंचलता असते, तो स्वहित साधणारा शिष्यच नव्हे. ज्याच्या हृदयांत निश्चलता असते, तोच परमार्थाचा साधक होय ९७.


    ऐसी साधूनि निश्चळता । ज्यासी निजस्वार्थीं जिज्ञासुता ।
    तोचि क्षणार्धे परमार्था । पावे तत्त्वतां गुरुवाक्यें ॥९८॥
    अशा प्रकारची निश्चलता साधून जो आपल्या खऱ्या हिताची इच्छा करतो, तोच गुरूपदेशाने क्षणार्धात परमार्थाला पात्र होतो ९८.


    जैसा दीपु दीपें लाविला । लावितांचि तत्समान झाला ।
    तैसा निश्चळास गुरु भेटला । तो तत्काळ झाला तद्‌रूप ॥९९॥
    ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असतां लावतांक्षणींच तो त्याच्यासारखाच होऊन बसतो, त्याप्रमाणे निश्चळ वृत्तीच्या साधकाला गुरु भेटला की, तो तत्काळ तद्‌रूप बनतो ९९.


    एवं अंतरीं जें निश्चळपण । तें शिष्याचें श्रेष्ठ लक्षण ।
    तो 'सहावा' गा गुण जाण । तेणें निर्दळण षड्‌विकारां ॥२००॥
    तात्पर्य, अंतःकरणांतील निश्चलपण हेच शिष्याचे श्रेष्ठ लक्षण होय. आणि तोच शिष्याचा 'सहावा' गुण, हे लक्षात ठेव. याच्याचमुळे षड्विकारांचा नाश होतो २००.

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...