मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २४ ओव्या १0१ ते २००
मधील पडदा जैं तोडिती । तैं पुरुष ना प्रकृती ।
तेव्हां प्रकटे निजात्मस्थिती । स्त्रीपुरुषव्यक्ती समूळ मिथ्या ॥ १ ॥
प्रकृति व पुरुष यांच्या मधला भेदभावं जेव्हां तोडते, तेव्हां पुरुषही नाही आणि प्रकृतीही नाही. त्या वेळी आपलें स्वस्वरूपचं प्रगट होतें. तात्पर्य, स्त्रीपुरुषव्यक्ति या समूळ मिथ्याच आहेत १.
ऐशी मिथ्या मायिक प्रकृती । तीपासाव गुणोत्पत्ती ।
गुणास्तव संसारस्थिती । स्वयें श्रीपती सांगत ॥ २ ॥
गुणास्तव संसारस्थिती । स्वयें श्रीपती सांगत ॥ २ ॥
अशा प्रकारें प्रकृति ही मायिक असल्यामुळे मिथ्या आहे. तिच्यापासून गुण उत्पन्न होतात, आणि त्या गुणांपासून संसार उत्पन्न होतो असें श्रीकृष्ण स्वतः सांगतात २.
तमो रजः सत्त्वमिति प्रकृतेरभवन्गुणाः ।
मया प्रक्षोभ्यमाणायाः पुरुषानुमतेन च ॥ ५ ॥
मया प्रक्षोभ्यमाणायाः पुरुषानुमतेन च ॥ ५ ॥
[श्लोक ५] जीवांच्या शुभअशुभ कर्मांनुसार मीच प्रकृतीला प्रक्षुब्ध केले तेव्हा तिच्यापासून सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण प्रगट झाले. (५)
प्रकृति गुणमयी पूर्ण । ते लाहोनि पुरुषईक्षण ।
प्रकट करी तिन्ही गुण । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ ३ ॥
प्रकट करी तिन्ही गुण । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ ३ ॥
प्रकृति ही पूर्णपणे गुणमयी आहे. तिला पुरुषदृष्टि प्राप्त झाली म्हणजे ती तिन्ही गुण प्रगट करते. तेच निरूपण श्रीकृष्ण सांगतात ३.
जेवीं सूर्यावलोकनमेळीं । कळीं विकासे कमळदळीं ।
ते वेगळवेगळी पांकोळी । होती मूळीं कळिकेमाजीं ॥ ४ ॥
ते वेगळवेगळी पांकोळी । होती मूळीं कळिकेमाजीं ॥ ४ ॥
ज्याप्रमाणे सूर्याची दृष्टि पोचल्याबरोबर कमळाची कळी निरनिराळ्या पाकळ्यांनी विकसित होते; पण त्या विकासलेल्या निरनिराळ्या पाकळ्या त्या कळीमध्येच असतात ४.
तेवीं पुरुषाच्या ईक्षणीं । गुणमयी झाली गुर्विणी ।
ते तम-रज-सत्त्वगुणी । प्रसवली तिनी गुणांतें ॥ ५ ॥
ते तम-रज-सत्त्वगुणी । प्रसवली तिनी गुणांतें ॥ ५ ॥
त्याप्रमाणे प्रकृति असते ती ईश्वराच्या दृष्टीनेच आपल्या गर्भामध्ये गुणांचें धारण करून गर्भिणी होते; आणि सत्त्व, रज व तम या तिन्ही गुणांना प्रसवते ५.
जेवीं जळे बीज क्षोभूनी । दोनी दळें उलवूनी ।
डिरू निघाला त्यांतूनी । तरतरूनी तिवणा पैं ॥ ६ ॥
डिरू निघाला त्यांतूनी । तरतरूनी तिवणा पैं ॥ ६ ॥
ज्याप्रमाणे पाण्याने बीज फुगून त्याच्या दोन्ही डाळिंब्या उकलून त्यातून तीन पानांचा अंकुर तरतरून बाहेर निघतो ६;
तेवीं परमात्मा मी आपण । पुरुषत्वातें पावोनि जाण ।
प्रकृति क्षोभवूनी पूर्ण । तिनी गुण प्रकटविले ॥ ७ ॥
प्रकृति क्षोभवूनी पूर्ण । तिनी गुण प्रकटविले ॥ ७ ॥
त्याप्रमाणे मी परमात्मा स्वतः पुरुषत्व पावून आणि प्रकृतीला पूर्णपणे क्षुब्ध करून तिन्ही गुण प्रगट केले आहेत ७.
जेवीं कां सूर्याचे किरणीं । सूर्यकांतीं पडे अग्नी ।
तेवीं पुरुषें प्रकृती भोगुनी । गुण तिनी ते प्रसवे ॥ ८ ॥
तेवीं पुरुषें प्रकृती भोगुनी । गुण तिनी ते प्रसवे ॥ ८ ॥
सूर्याच्या किरणाने सूर्यकांतांतून ज्याप्रमाणे अग्नि पडतो, त्याप्रमाणे पुरुषाने प्रकृतीचा उपभोग घेतला, म्हणजे ती तिन्ही गुण प्रसवते ८.
तेभ्यः समभवत्सूत्रं महान्सूत्रेण संयुतः ।
ततो विकुर्वतो जातो अहङ्कारो यो विमोहनः ॥ ६ ॥
ततो विकुर्वतो जातो अहङ्कारो यो विमोहनः ॥ ६ ॥
[श्लोक ६ ] त्यांच्यापासून क्रियाशक्तिप्रधान सूत्र आणि ज्ञानशक्तिप्रधान महतत्त्व हे प्रगट झाले हे दोघे एकमेकांत मिसळलेलेच आहेत महत्तत्त्वापासून अहंकार उत्पन्न झाला हा अहंकारच जीवांना मोह उत्पन्न करतो. (६)
ते तिनी गुण भिन्न भिन्न । भिन्नपणें वाढी समान ।
त्या नांव सूत्र प्रधान । क्रियाशक्ति जाण या नांव ॥ ९ ॥
त्या नांव सूत्र प्रधान । क्रियाशक्ति जाण या नांव ॥ ९ ॥
ते तीन गुण भिन्न भिन्न आहेत, पण ते भिन्नपणांतही सारखेच वाढत असतात. त्यालाच सूत्र, प्रधान आणि क्रियाशक्ति अशी नावे आहेत ९.
क्रियाशक्तीस जडपण । तेथ चेतनात्मक उपजे ज्ञान ।
तेंचि महत्तत्त्व नांव जाण । भिन्नाभिधान या हेतू ॥ ११० ॥
तेंचि महत्तत्त्व नांव जाण । भिन्नाभिधान या हेतू ॥ ११० ॥
क्रियाशक्तींत जडपणा असतो. तेथें जें चेतनात्मक ज्ञान उत्पन्न होते, त्याचेंच नांव महत्तत्त्व होय. हे निराळे नांव ह्यामुळेच त्याला प्राप्त झाले आहे ११०.
महत्तत्त्व आणि प्रधान । दोहिंचें रूप एकचि जाण ।
तेथ क्रिया आणि स्फुरे ज्ञान । यालागीं नांवें भिन्न दोहींचीं ॥ ११ ॥
तेथ क्रिया आणि स्फुरे ज्ञान । यालागीं नांवें भिन्न दोहींचीं ॥ ११ ॥
महत्तत्त्व आणि प्रधान या दोहोंचें स्वरूप एकच आहे. तेथें क्रिया आणि ज्ञान स्फुरण पावते, म्हणून दोहोंची नांव मात्र भिन्न आहेत ११.
क्रियायुक्त जें स्फुरे ज्ञान । तेथ चेतवे अभिमान ।
त्रिगुणीं अहंकार पूर्ण । ते ठायीं जाण उठावे ॥ १२ ॥
त्रिगुणीं अहंकार पूर्ण । ते ठायीं जाण उठावे ॥ १२ ॥
क्रियायुक्त जें ज्ञान स्फुरण पावते, तेथेच अभिमान जागृत होतो. आणि तीन गुणांनी पूर्ण अहंकार त्या ठिकाणी उत्पन्न होतो १२.
अहं खवळल्या दारुण । शिवासी विसरवी शिवपण ।
देहत्मवादें भुलवी पूर्ण । जन्ममरण भोगवी ॥ १३ ॥
देहत्मवादें भुलवी पूर्ण । जन्ममरण भोगवी ॥ १३ ॥
अहंभाव भयंकर रीतीने खवळला, की तो शिवाला शिवपणाचा विसर पाडतो, आणि देहात्मवादाने पूर्णपणे भुरळ घालून जन्ममरण भोगावयास लावतो १३.
त्या अहंकाराची मोहक शक्ती । भवभ्रमें पाडी भ्रांती ।
अहंकाराची विकारउत्पत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ १४ ॥
अहंकाराची विकारउत्पत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ १४ ॥
त्या अहंकाराची मोहक शक्ति संसाराच्या भ्रमाने भ्रांतीत पाडते. अहंकारापासून विकार कसे उत्पन्न होतात. तें श्रीकृष्ण स्वतः सांगतो १४.
वैकारिकस्तैजसश्च तामसश्चेत्यहं त्रिवृत् ।
तन्मात्रेन्द्रियमनसां कारणं चिदचिन्मयः ॥ ७ ॥
तन्मात्रेन्द्रियमनसां कारणं चिदचिन्मयः ॥ ७ ॥
[श्लोक ७ ] तो अहंकार सात्त्विक, राजस आणि तामस असा तीन प्रकारचा आहे पंचतन्मात्रा, इंद्रिये आणि मन ही अहंकाराची कार्ये आहेत म्हणून तो जडचेतन असा उभयात्मक आहे. (७)
अहंकार अतिदुर्धर । गुणानुसारें त्रिप्रकार ।
गुण अहंता दृढ संसार । गुणविकार तो ऐसा ॥ १५ ॥
गुण अहंता दृढ संसार । गुणविकार तो ऐसा ॥ १५ ॥
अहंकार हा अत्यंत दुर्धर आहे. त्याचे सत्त्वादि गुणानुसार तीन प्रकार होतात. गुण व अहंता हाच मोठा संसार होय. गुणांचा विकार असा आहे की १५,
प्रथम अहंभावो सात्त्विक । झाला अंतःकरणद्योतक ।
तोचि देवताविकारजनक । यालागीं वैकारिक बोलिजे त्यासी ॥ १६ ॥
तोचि देवताविकारजनक । यालागीं वैकारिक बोलिजे त्यासी ॥ १६ ॥
प्रथमतः सात्विक अहंकार उत्पन्न होत असून तो अंत:करणाला प्रकाशित करतो. तोच अनेक देवतांचे विकार उत्पन्न करणारा आहे, म्हणून त्याला 'वैकारिक' म्हणतात १६.
अहंकार जो राजसू । तो ज्ञानकर्मेंद्रियप्रकाशू ।
वांछी रजतेजविलासू । यालागीं तैजसू बोलिजे ॥ १७ ॥
वांछी रजतेजविलासू । यालागीं तैजसू बोलिजे ॥ १७ ॥
जो राजस अहंकार असतो, तो ज्ञानेंद्रियांचा आणि कर्मेंद्रियांचा प्रकाशक असतो. राजस तेजाचे विलास त्याला आवडतात, म्हणून त्याला तैजस असे म्हणतात १७.
तामसाहंकाराची सिद्धि । सूक्ष्म भूतांतें उत्पादी ।
यालागीं म्हणिजे तो भूतादी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥ १८ ॥
यालागीं म्हणिजे तो भूतादी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥ १८ ॥
तामस अहंकाराचा परिणाम असा होतो की, तो सूक्ष्म परमाणुरूप भूतांना उत्पन्न करतो. म्हणून उद्धवा ! खरोखर त्याला 'भूतादि' असे म्हणतात १८.
नवल अहंकाराची थोरी । सचेतना अचेतन नोवरी ।
स्वयें लग्न लावी प्रीतीवरी । चिदचिद्ग्रंथी पुरी पाडूनी ॥ १९ ॥
स्वयें लग्न लावी प्रीतीवरी । चिदचिद्ग्रंथी पुरी पाडूनी ॥ १९ ॥
अहंकाराचे बंड मोठे विलक्षण आहे. सचेतनाला अचेतन नवरी बनवितो, आणि ज्ञान-अज्ञानांची पक्की गांठ मारून मोठ्या प्रेमाने स्वतःचे लग्न तिच्याशी लावतो १९.
चिन्मात्रस्वरूपता जीवासी । लग्न लावी जड देहेंसीं ।
‘ओं पुण्या’ एकात्मतेसी । कर्ता ज्योतिषी अभिमान ॥ १२० ॥
‘ओं पुण्या’ एकात्मतेसी । कर्ता ज्योतिषी अभिमान ॥ १२० ॥
जीव हा ज्ञानस्वरूप आहे, त्याचे जड देहाशी लग्न लावून देतो. अभिमान हाच 'ॐ पुण्याहं मंत्र म्हणून त्याचा एकजीव करणारा ज्योतिषी होय १२०.
जीव ज्ञानस्वरूप चोखडा । तो करोनि जड मूढ वेडा ।
दृढ घाली हाडांचे खोडां । तो हा धडफुडा अहंकारू ॥ २१ ॥
दृढ घाली हाडांचे खोडां । तो हा धडफुडा अहंकारू ॥ २१ ॥
जीव हा शुद्ध ज्ञानस्वरूप असून त्याला जड, मूढ व वेडा करून सोडतो, आणि त्याला हाडांच्या खोड्यांत जखडून टाकतो. असा हा अहंकार उपद्व्यापी आहे २१.
तोचि सात्त्विक आणि राजस । होऊनि तिसरा तामस ।
त्रिविध विकारीं बहुवस । वाढवी असोस संसारू ॥ २२ ॥
त्रिविध विकारीं बहुवस । वाढवी असोस संसारू ॥ २२ ॥
तोच सात्विक, राजस आणि तिसरा तामस असा तीन प्रकारांनी जिकडे तिकडे फैलावून अफाट संसार वाढवितो २२.
अर्थस्तन्मात्रिकाज्जज्ञे तामसादिन्द्रियाणि च ।
तैजसाद् देवता आसन् एकादश च वैकृतात् ॥ ८ ॥
तैजसाद् देवता आसन् एकादश च वैकृतात् ॥ ८ ॥
[श्लोक ८] तामस अहंकारापासून पंचतन्मात्रा आणि त्यांपासून पंच महाभूते उत्पन्न झाली राजस अहंकारापासून इंद्रिये आणि सात्त्विक अहंकारापासून इंद्रियांच्या अधिष्ठात्या अकरा देवता प्रगट झाल्या. (८)
विषय तेचि महाभूतें । तामस प्रसवला अपंचीकृतें ।
विषयास्तव प्रकटती भूतें । ऐक तूतें सांगेन ॥ २३ ॥
विषयास्तव प्रकटती भूतें । ऐक तूतें सांगेन ॥ २३ ॥
विषय तीच महाभूतें होत. तामसगुणाने ती पांच महाभूतें परस्परांशी मिश्रण न करिता वेगवेगळी निर्माण केली आहेत. ती पंचमहाभूतें विषयापासून उत्पन्न होतात. तेच तुला आता सांगतों, ऐक २३.
शब्दापासाव नभ उद्भवत । स्पर्शापासाव मारुत ।
रूपापासाव तेज होत । रसास्तव येथ आप उपजे ॥ २४ ॥
रूपापासाव तेज होत । रसास्तव येथ आप उपजे ॥ २४ ॥
शब्दापासून आकाश उत्पन्न होते, स्पर्शापासून वायु उत्पन्न होतो, रूपापासून तेज उत्पन्न होते, आणि रसापासून पाणी उत्पन्न होते २४.
गंधापासोनि पृथ्वी कठिण । उपजली आपीं आपण ।
येरयेरांचें अनुस्यूतपण । सर्वथा जाण मोडेना ॥ २५ ॥
येरयेरांचें अनुस्यूतपण । सर्वथा जाण मोडेना ॥ २५ ॥
गंधापासून कठीण पृथ्वी पाण्यामध्ये स्वतः उत्पन्न झाली आहे. अशा रीतीने जरी ही निरनिराळी उत्पन्न होत असलेली दिसली, तरी परस्परांचा ऐक्यसंबंध सर्वथा मोडत नाही २५.
शब्द निःशब्दीं जन्मला । तो आकाशातें प्रसवला ।
आकाशीं सूक्ष्म स्पर्श झाला । तो स्पर्श व्याला मारुत ॥ २६ ॥
आकाशीं सूक्ष्म स्पर्श झाला । तो स्पर्श व्याला मारुत ॥ २६ ॥
तो प्रकार असा निःशब्दा ( परब्रह्मा) पासून शब्द निर्माण झाला, आणि त्याने आकाश उत्पन्न केले. आकाशामध्ये सूक्ष्म स्पर्श उत्पन्न झाला, आणि त्या स्पर्शानंच वायु निर्माण केला २६.
जन्मल्या मारुताआंत । शब्द स्पर्श दोनी नांदत ।
मारुत रूपातें प्रसवत । त्या रूपांत तेज जन्मलें ॥ २७ ॥
मारुत रूपातें प्रसवत । त्या रूपांत तेज जन्मलें ॥ २७ ॥
अशा रीतीने जन्मलेल्या वायूमध्ये शब्द आणि स्पर्श दोन्ही नांदतात. त्या वायूनें रूप उत्पन्न केले व त्या रूपांत तेज जन्मास आले २७.
त्या जन्मल्या तेजाआंत । शब्द स्पर्श रूप नांदत ।
रूप रसातें प्रसवत । आप रसांत जन्मलें ॥ २८ ॥
रूप रसातें प्रसवत । आप रसांत जन्मलें ॥ २८ ॥
त्या उत्पन्न झालेल्या तेजांत शब्द, स्पर्श वरूप ही तिन्ही नांदतात. रूपापासून रस उत्पन्न झाला, आणि त्या रसापासुन पाणी उत्पन्न झाले २८.
जन्मले आपीं समरस । शब्द स्पर्श रूप रस ।
नांदताती सावकाश । विषयीं विषयांस प्रवेशू ॥ २९ ॥
नांदताती सावकाश । विषयीं विषयांस प्रवेशू ॥ २९ ॥
अशा रीतीनें जन्मलेल्या पाण्यांत शब्द, स्पर्श, रूप आणि रस हे खुशाल नांदत असतात. याप्रमाणे विषयांत विषय मिश्र होऊन राहातात २९.
आपामाजीं जन्मे गंध । गंधापासाव पृथ्वी शुद्ध ।
शब्द स्पर्श रूप रस गंध । पृथ्वी पंचविध विषययुक्त ॥ १३० ॥
शब्द स्पर्श रूप रस गंध । पृथ्वी पंचविध विषययुक्त ॥ १३० ॥
पाण्यामध्ये गंध उत्पन्न होतो व त्या गंधापासून ही शुद्ध पृथ्वी निर्माण होते. अशी ही पृथ्वी शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध अशा पांच विषयांनी युक्त आहे १३०.
विषययुक्त अपंचीकृतें । पूर्वीं लीन होतीं समस्तें ।
तींचि स्थूळावलीं येथें । महाभूतें प्रसिद्ध ॥ ३१ ॥
तींचि स्थूळावलीं येथें । महाभूतें प्रसिद्ध ॥ ३१ ॥
अशी ही विषययुक्त निरनिराळी पंचमहाभूतें पूर्वी अत्यंत सूक्ष्म रूपानें लीन झालेली असतात, तींच येथे स्थूल रूपाला येऊन पंचमहाभूते या नावाने प्रसिद्ध होतात ३१.
ज्ञान कर्म उभयपंचक । श्रोत्रादि इंद्रियदशक ।
राजसापासोनि देख । स्वाभाविक जन्मलीं ॥ ३२ ॥
राजसापासोनि देख । स्वाभाविक जन्मलीं ॥ ३२ ॥
पांच ज्ञानेंद्रियें, पांच कर्मेदिये, आणि कान इत्यादि दहा इंद्रिये ही राजस अहंकारापासून आपोआपच उत्पन्न होतात ३२.
सत्त्वअहंतेचा विकार । चित्तचतुष्टय चमत्कार ।
मन बुद्धि चित्त अहंकार । अकराही सुर इंद्रियाधिप ॥ ३३ ॥
मन बुद्धि चित्त अहंकार । अकराही सुर इंद्रियाधिप ॥ ३३ ॥
सत्त्वाहंकाराच्या विकारांपासून मन, बुद्धि, चित्त आणि अहंकार असा चित्तचतुष्टयाचा चमत्कार उत्पन्न होतो. आणि प्रजापति-इंद्रादि अकरा देव इंद्रियांचे अधिष्ठाते होतात ३३.
महाभूतें अतिजडें देख । इंद्रियें तेथें प्रवर्तक ।
अंतःकरणचाळक । देव प्रकाशक कर्माचे ॥ ३४ ॥
अंतःकरणचाळक । देव प्रकाशक कर्माचे ॥ ३४ ॥
वास्तविक महाभूतें अत्यंत जड आहेत. इंद्रियें ही त्यांची प्रवर्तक होत. अंतःकरण हें चालक असून देव हे कर्माचे प्रकाशक होत ३४.
त्रिविध अहंकारवृत्ती । गुणक्षोभें क्षोभक शक्ती ।
यापरी झाली उत्पत्ती । ब्रह्मांडस्थितीलागूनी ॥ ३५ ॥
यापरी झाली उत्पत्ती । ब्रह्मांडस्थितीलागूनी ॥ ३५ ॥
तीन प्रकारच्या अहंकारवृत्ति गुणक्षोभानें क्षोभक शक्ति होतात. याप्रमाणे ब्रह्मांडाची सर्व रचना झाली आहे ३५.
मया सञ्चोदिता भावाः सर्वे संहत्यकारिणः ।
अण्डमुत्पादयामासुः ममायतनमुत्तमम् ॥ ९ ॥
अण्डमुत्पादयामासुः ममायतनमुत्तमम् ॥ ९ ॥
[श्लोक ९] माझ्या प्रेरणेने हे सर्व पदार्थ एकत्र होऊन एकमेकात मिसळले गेले आणि त्यांनी ब्रह्मांडरूप अंडे उत्पन्न केले हे ब्रह्मांड माझे उत्तम निवासस्थान आहे. (९)
भूतां परस्परें वैर देख । पृथ्वीतें गिळूं धांवे उदक ।
उदकातें आवश्यक । तेज देख निर्दळी ॥ ३६ ॥
उदकातें आवश्यक । तेज देख निर्दळी ॥ ३६ ॥
भूतांमध्ये एकमेकांत वैरच असते. पाणी पृथ्वीला गिळून टाकावयाला धावत असते; तेज (अग्नि) त्या पाण्याचा खात्रीने नाश करिते ३६.
तेजातें प्राशी पवन । पवनातें ग्रासी गगन ।
एवं भूतांसी सौजन्य । सर्वथा जाण असेना ॥ ३७ ॥
एवं भूतांसी सौजन्य । सर्वथा जाण असेना ॥ ३७ ॥
तेजाला वायु गिळून टाकतो. वायूला आकाश गिळून टाकतें. ह्याप्रमाणे भूतांभूतातही एकमेकांशी मुळींच सख्य असत नाही ३७.
तेथ अंतर्यामिरूपें मी जाण । स्वयें प्रवेशोनि आपण ।
भूतें मेळवूनि पूर्ण । करीं संरक्षण मर्यादा ॥ ३८ ॥
भूतें मेळवूनि पूर्ण । करीं संरक्षण मर्यादा ॥ ३८ ॥
त्यांत मी अंत:करणरूपाने आपण स्वतः प्रवेश करून सर्व भूतें एकत्र करून त्यांची मर्यादा संरक्षण करतों ३८.
माझे मर्यादेची रेखा । प्रथ्वी न विरवी उदका ।
उदकातें तेज देखा । न लववी नखा शोषाचे ॥ ३९ ॥
उदकातें तेज देखा । न लववी नखा शोषाचे ॥ ३९ ॥
मी मर्यादेची रेषा घालून दिल्यामुळे पाणी पृथ्वीला विरवून टाकू शकत नाही. आणि पहा ! तेजही आपले शोषणक्रियेचे नख उदकाला लावण्याकरिता पुढे करीत नाही (तेज उदकाला शोधूं शकत नाही) ३९.
तेजातें न प्राशी पवन । वायु स्वेच्छा विचरतां जाण ।
सर्वथा ग्रासीना गगन । गतिबंधन करीना ॥ १४० ॥
सर्वथा ग्रासीना गगन । गतिबंधन करीना ॥ १४० ॥
तसेंच वायु तेजाला गिळून टाकीत नाही, आणि वायु कितीही स्वेच्छाचाराने वागत असला तरी आकाश त्याला कधीच गिळीत नाही, किंवा त्याच्या गतीला प्रतिबंध करीत नाही १४०.
यापरी हीं महाभूतें । एकवटूनि समस्तें ।
स्रजिलें ब्रह्मांडातें । मज महापुरुषातें वस्तीशीं ॥ ४१ ॥
स्रजिलें ब्रह्मांडातें । मज महापुरुषातें वस्तीशीं ॥ ४१ ॥
याप्रमाणे ही सर्व महाभूते एकत्र होऊन मला महापुरुषाला राहण्यासाठी त्यांनी ब्रह्मांड तयार केले आहे ४१.
सप्तावरणेंसीं प्रचंड । आवो साधूनि उदंड ।
निर्माण केलें ब्रह्मांड । मयूरांड आकारें ॥ ४२ ॥
निर्माण केलें ब्रह्मांड । मयूरांड आकारें ॥ ४२ ॥
मोठमोठाल्या सप्त आवरणांसह प्रशस्त जागा व्यापून मयूराच्या अंड्याच्या आकाराचें ब्रह्मांड निर्माण केले आहे ४२.
तस्मिन्नहं समभवं अण्डे सलिलसंस्थितौ ।
मम नाभ्यामभूत्पद्मं विश्वाख्यं तत्र चात्मभूः ॥ १० ॥
मम नाभ्यामभूत्पद्मं विश्वाख्यं तत्र चात्मभूः ॥ १० ॥
[श्लोक १०] जेव्हा ते अंडे पाण्यामध्ये स्थिर झाले, तेव्हा मीच नारायणरूपाने त्यात विराजमान झालो माझ्या नाभीपासून विश्वकमळाची उत्पत्ती झाली त्यावर ब्रह्मदेव प्रगट झाला. (१०)
ऐसें ब्रह्मांड जें विद्यमान । त्यामाजीं मी नारायण ।
लीलाविग्रही झालों जाण । आपण्या आपण विश्वात्मा ॥४३ ॥
लीलाविग्रही झालों जाण । आपण्या आपण विश्वात्मा ॥४३ ॥
असें जें हें आज अस्तित्वात असलेलें ब्रह्मांड, त्यामध्ये मूळचाच आपला आपण विश्वात्मा असणारा मी नारायण लीलेने देह धारण करणारा झालों ४३.
त्या माझे नाभीसी नाभिपद्म । विकासलें विश्वधाम ।
त्याहीमाजीं उत्तमोत्तम । आत्मभू नाम जन्मला ब्रह्मा ॥ ४४ ॥
त्याहीमाजीं उत्तमोत्तम । आत्मभू नाम जन्मला ब्रह्मा ॥ ४४ ॥
त्या माझ्या नाभीमध्ये विश्वाला आधारभूत असें नाभिकमल उत्पन्न झाले, आणि त्यांत उत्तमोत्तम असा 'आत्मभू' नामक ब्रह्मदेव जन्मास आला ४४.
नाहीं योनिद्वारा उदरगर्भू । मज आत्म्यापासूनि स्वयंभू ।
उपजला यालागीं आत्मभू । नामाचा शोभू ब्रह्मयासी ॥ ४५ ॥
उपजला यालागीं आत्मभू । नामाचा शोभू ब्रह्मयासी ॥ ४५ ॥
तो उदरांत गर्भरूपाने राहून योनिद्वारा जन्मलेला नव्हता, तर तो माझ्या आत्म्यापासून स्वयंभूच निर्माण झाला. म्हणूनच ब्रह्मदेवाला 'आत्मभू' अशा नांवाचे भूषण प्राप्त झाले आहे ४५.
ब्रह्मांड तो विराटदेहो । त्याचा मुख्य भाग विग्रहो ।
माझे नाभिकमळीं पहा हो । ब्रह्मदेवो जन्मला ॥ ४६ ॥
माझे नाभिकमळीं पहा हो । ब्रह्मदेवो जन्मला ॥ ४६ ॥
ब्रह्मांड हाच विराट देह होय. आणि विग्रह हाच त्याचा मुख्य भाग. अहो ! पहा. अशा रीतीने ब्रह्मदेव माझ्या नाभिकमलापासून जन्मास आला ४६.
करावया लोकसर्जन । पद्मनाभाचे नाभीसी जाण ।
स्वयें जन्मला चतुरानन । रजोगुणप्राधान्यें ॥ ४७ ॥
स्वयें जन्मला चतुरानन । रजोगुणप्राधान्यें ॥ ४७ ॥
सृष्टि निर्माण करण्याकरिता पद्मनाभाच्या नाभिकमलामध्ये रजोगुणाच्या प्राधान्येकरून ब्रह्मदेव स्वतःच जन्मास आला ४७.
सोऽसृजत्तपसा युक्तो रजसा मदनुग्रहात् ।
लोकान् सपालान् विश्वत्मा भूर्भुवःस्वरिति त्रिधा ॥ ११ ॥
लोकान् सपालान् विश्वत्मा भूर्भुवःस्वरिति त्रिधा ॥ ११ ॥
[श्लोक ११] विश्वरूप ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली आणि माझ्या कृपेने रजोगुणाच्या द्वारे पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग या तीन लोकांची व त्यांच्या लोकपालांची निर्मिती केली. (११)
ब्रह्म रजोगुणप्रधान । नाभिकमळीं बैसोनि जाण ।
मी जन्ममूळ जो नारायण । त्यासी तो आपण देखेना ॥ ४८ ॥
मी जन्ममूळ जो नारायण । त्यासी तो आपण देखेना ॥ ४८ ॥
अशा प्रकारचा रजोगुणप्रधान जो ब्रह्मदेव, तो जन्मास येऊन नाभिकमळांत बसला, परंतु त्याच्या जन्माचे मूळ जो मी नारायण, त्या मला काही तो पाहू शकला नाही ४८.
स्वयें बैसल्या कमळासी । कमळमूळ न कळे त्यासी ।
देखे एकार्णव जळासी । रजोगुणेंसीं मोहित ॥ ४९ ॥
देखे एकार्णव जळासी । रजोगुणेंसीं मोहित ॥ ४९ ॥
कारण तो स्वतःच कमळांत बसल्यामुळे त्या कमळाचे मूळ काही त्याला दिसेना. तो रजोगुणाला भुलल्यामुळे त्याला सर्व एकरूप समुद्रासारखे पाणीच पाणी दिसू लागले ४९.
तें कमळमूळ पहावया बुडीं । एकार्णवीं घालोनि उडी ।
बुडतां दिवसांच्या कोडी । त्या मूळाची जोडी न लभेचि ब्रह्मा ॥ १५० ॥
बुडतां दिवसांच्या कोडी । त्या मूळाची जोडी न लभेचि ब्रह्मा ॥ १५० ॥
तें कमळाचे मूळ पहाण्याकरिता त्याने त्या समुद्रात बुडी मारली, आणि किती तरी दिवस पाण्यातच बुडून होता, तरी देखील त्या ब्रह्मदेवाला त्या कमळाच्या मूळाचा शोध लागला नाहींच १५०.
तेथ निर्बुजला जळभयें । बाहेरि उसासे लवलाहें ।
कमळावरी बैसोनि पाहें । करावें काये स्मरेना ॥ ५१ ॥
कमळावरी बैसोनि पाहें । करावें काये स्मरेना ॥ ५१ ॥
अखेरीस तेथे तो पाण्याच्या भीतीने घाबरून गेला, आणि झटकन पाण्याच्या बाहेर येऊन उसासे टाकू लागला. मग तो त्या कमळावर पुन्हा बसला, पण पुढे काय करावे हे त्याला सुचेना ५१.
धांव पाव गा अच्युता । निवारीं माझी जगदंधता ।
तुजवांचूनि सर्वथा । संरक्षिता मज नाहीं ॥ ५२ ॥
तुजवांचूनि सर्वथा । संरक्षिता मज नाहीं ॥ ५२ ॥
तो म्हणाला, “हे अच्युता ! धावत ये आणि मला प्रसन्न हो. मला जगाविषयी आलेले अंधत्व नाहीसे कर. तुझ्याशिवाय माझे सर्वस्वीं रक्षण करणारा दुसरा कोणी नाही" ५२.
ब्रह्मा माझे पोटींचें बाळ । रजें रजांध झालें केवळ ।
धरोनि ठेला नाभिकमळ । कृपा तत्काळ मज आली ॥ ५३ ॥
धरोनि ठेला नाभिकमळ । कृपा तत्काळ मज आली ॥ ५३ ॥
ब्रह्मदेव माझ्याच पोटचे लेंकरूं. रजाने बिचारे केवळ आंधळे झाले. असा तो नाभिकमळालाच धरून बसला, तेव्हा मला तत्काळ त्याची दया आली ५३.
मज विश्वात्म्याचें अपत्य । जडत्वें राहिला तटस्थ ।
म्यां उपदेशिला तेथ । सृष्टिसर्जनार्थ तपोनिष्ठा ॥ ५४ ॥
म्यां उपदेशिला तेथ । सृष्टिसर्जनार्थ तपोनिष्ठा ॥ ५४ ॥
मज विश्वात्म्याचाच तो पुत्र, पण केवळ जडत्वाने स्तब्ध होऊन राहिला. तेव्हा त्या तपोनिष्ठाला सृष्टि निर्माण करण्याकरितां मी उपदेश केला ५४.
महाकल्पादींचे मांडणी । माझिया अशरीरी वाणी ।
तप तप या दों वचनीं । उपदेशिला अग्रगणी चतुरानन ॥ ५५ ॥
तप तप या दों वचनीं । उपदेशिला अग्रगणी चतुरानन ॥ ५५ ॥
महाकल्पादिकाच्या आरंभी मी आपल्या आकाशवाणीने 'तप तप' या दोन शब्दांनी श्रेष्ठ ब्रह्मदेवाला उपदेश केला ५५.
यथोक्त तप करितां जाण । वृद्धि पावला सत्त्वगुण ।
त्याचिया सात्त्विकता पूर्ण । प्रत्यक्ष नारायण मी झालों ॥ ५६ ॥
त्याचिया सात्त्विकता पूर्ण । प्रत्यक्ष नारायण मी झालों ॥ ५६ ॥
मी सांगितल्याप्रमाणे त्याने तप करितांच त्याचा सत्त्वगुण वाढला आणि त्याच्या त्या पूर्ण सत्त्वगुणानेच मी प्रत्यक्ष नारायण झालों ५६.
काळत्रयीं अबाधिक । तूंचि विश्वात्मा निश्चित ।
हें चतुःश्लोकी भागवत । म्यां त्यासी तेथ उपदेशिलें ॥ ५७ ॥
हें चतुःश्लोकी भागवत । म्यां त्यासी तेथ उपदेशिलें ॥ ५७ ॥
“त्रिकालाबाधित विश्वात्मा खरोखर तूंच आहेस" अशा अर्थाच्या चतुःश्लोकी भागवताचा मी त्याला उपदेश केला ५७.
माझिया उपदेशविधीं । होऊनियां समबुद्धी ।
कल्पकल्पांचिये अवधी । मोह त्रिशुद्धी बाधीना ॥ ५८ ॥
कल्पकल्पांचिये अवधी । मोह त्रिशुद्धी बाधीना ॥ ५८ ॥
त्या माझ्या उपदेशाने तो समबुद्धि होऊन राहिला आणि कल्पाचे कल्प गेले तरी खरोखर त्याला मोह स्पर्शही करीत नाही ५८.
यापरी ब्रह्मा कल्पादी । पावला परम समाधी ।
प्रकटोनि निजात्मबुद्धी । सर्जनसिद्धी तेणें केली ॥५९ ॥
प्रकटोनि निजात्मबुद्धी । सर्जनसिद्धी तेणें केली ॥५९ ॥
याप्रमाणे कल्पाच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने समाधि धारण केली, तेव्हा त्याला आत्मबुद्धि प्राप्त होऊन त्याने ही सर्व उत्पत्ति करण्याचे कार्य सिद्धीस नेले ५९.
सुरासुर मानव पन्नगादिक । यांचे वसते तिन्ही लोक ।
सप्तपाताळ घरें देख । गोपुरें अलोलिक सप्तसंख्या ॥ १६० ॥
सप्तपाताळ घरें देख । गोपुरें अलोलिक सप्तसंख्या ॥ १६० ॥
देव, राक्षस, मनुष्य, सर्प यांची वस्ती असलेले तिन्ही लोक, सात पाताळें व तशीच विलक्षण सात गोपुरेही त्याने निर्माण केली ६०
भूशब्दें पाताळलोक । भुवःशब्दें मृत्युलोक ।
स्वःशब्दें स्वर्गलोक । त्रिलोक देख यां नांव ॥ ६१ ॥
स्वःशब्दें स्वर्गलोक । त्रिलोक देख यां नांव ॥ ६१ ॥
'भूः' म्हणजे पाताळलोक, ' भुवः ' म्हणजे मृत्युलोक, आणि 'स्व:' म्हणजे स्वर्गलोक, यांनाच त्रिभुवन असें नाव आहे ६१
चतुर्दश भुवनें सकळ । तेथ वसते लोक लोकपाळ ।
तेंचि करोनियां विवळ । सांगे प्रांजळ श्रीकृष्ण ॥ ६२ ॥
तेंचि करोनियां विवळ । सांगे प्रांजळ श्रीकृष्ण ॥ ६२ ॥
सर्व मिळून चौदा लोक, व तेथे राहणारे लोकपाळ, हे स्पष्ट करून श्रीकृष्ण नीट रीतीने सांगत आहे ६२.
देवानामोक आसीत् स्वर्भूतानां च भुवः पदम् ।
मर्त्यादीनां च भूर्लोकः सिद्धानां त्रितयात्परम् ॥ १२ ॥
अधोऽसुराणां नागानां भूमेरोकोऽसृजत्प्रभुः ।
त्रिलोक्यां गतयः सर्वाः कर्मणां त्रिगुणात्मनाम् ॥ १३ ॥
मर्त्यादीनां च भूर्लोकः सिद्धानां त्रितयात्परम् ॥ १२ ॥
अधोऽसुराणां नागानां भूमेरोकोऽसृजत्प्रभुः ।
त्रिलोक्यां गतयः सर्वाः कर्मणां त्रिगुणात्मनाम् ॥ १३ ॥
[श्लोक १२-१३] देवतांचे निवासस्थान स्वर्ग, भूतप्रेतांचे अंतरिक्ष आणि मनुष्य इत्यादींसाठी पृथ्वी हे स्थान ठरविले या तीन लोकांच्या वरच्या बाजूला महर्लोक इत्यादी सिद्धींची निवासस्थाने ठरविली. (१२)
ब्रह्मदेवाने असुर आणि नागांच्यासाठी पृथ्वीच्या खाली लोक तयार केले या तिन्ही लोकांमध्ये त्रिगुणात्मक कर्मांना अनुसरून जीवांना निरनिराळ्या गती प्राप्त होतात. (१३)
ब्रह्मदेवाने असुर आणि नागांच्यासाठी पृथ्वीच्या खाली लोक तयार केले या तिन्ही लोकांमध्ये त्रिगुणात्मक कर्मांना अनुसरून जीवांना निरनिराळ्या गती प्राप्त होतात. (१३)
मागील श्लोकाचे अंतीं । भूर्भुवःस्वर इति ।
यापरी त्रिलोकी श्रीपती । जाण निश्चितीं बोलिला ॥ ६३ ॥
यापरी त्रिलोकी श्रीपती । जाण निश्चितीं बोलिला ॥ ६३ ॥
मागच्या श्लोकाच्या शेवटी भूः, भुवः, स्वः असे तीन लोक श्रीकृष्णाने स्पष्टपणे सांगितले ६३.
तेंचि पुढील श्लोकार्था । पाताळलोक होय चौथा ।
तो मृत्युलोक एकात्मता । जाण तत्त्वतां व्याख्यान ॥ ६४ ॥
तो मृत्युलोक एकात्मता । जाण तत्त्वतां व्याख्यान ॥ ६४ ॥
त्याप्रमाणेच पुढच्या श्लोकाच्या अर्थामध्ये पाताळ लोक हा चौथा सांगितलेला आहे, व त्याचे मृत्युलोकाशी ऐक्य आहे. याचेही यथातथ्य निरूपण आतां समजून घे ६४.
इंद्रादि सकळ देवांसी । स्वर्ग निजमंदिर त्यांसी ।
यक्षरक्षभूतगंधर्वांसी । निवासासी अंतरिक्ष ॥ ६५ ॥
यक्षरक्षभूतगंधर्वांसी । निवासासी अंतरिक्ष ॥ ६५ ॥
इंद्रादि सर्व देवांना स्वर्ग हेंच त्यांचे रहाण्याचे स्थान आहे. यक्ष, राक्षस, भूते आणि गंधर्व ह्यांना रहावयाला आकाश आहे ६५.
जेणें पाविजे निजमोक्षासी । जेथूनि गमन लोकांतरासी ।
ते कर्मभूमी मनुष्यासी । निजभाग्येंसी भूर्लोक ॥ ६६ ॥
ते कर्मभूमी मनुष्यासी । निजभाग्येंसी भूर्लोक ॥ ६६ ॥
आणि ज्याने मोक्षास जाता येते, जेथून परलोकास जाता येते, ती कर्मभुमि म्हणजे अतळादि सप्त पाताळांसह पृथ्वी थोर भाग्याने मनुष्यास रहावयास मिळाली आहे ६६.
त्रिलोकीवरतें जाण । सिद्ध वोळंगती आपण ।
तें सिद्धांचें सिद्धिस्थान । वसतें जाण निरंतर ॥ ६७ ॥
तें सिद्धांचें सिद्धिस्थान । वसतें जाण निरंतर ॥ ६७ ॥
सिद्ध असतात ते स्वत: त्रैलोक्याच्या वर रहातात. ते सिद्धांचे नेहमी राहाण्याचे सिद्धिस्थान होय ६७.
अतळ वितळ सुतळ । रसातळ महातळ ।
तळातळ आणि पाताळ । अधःसंख्या सकळ पाताळा ॥ ६८ ॥
तळातळ आणि पाताळ । अधःसंख्या सकळ पाताळा ॥ ६८ ॥
अतळ, वितळ, सुतळ, रसातळ, महातळ, तळातळ आणि पाताळ ही पृथ्वीच्या खाली असणाऱ्या सर्व पाताळांची संख्या आहे ६८.
सप्तपाताळीं अधिकारमेळू । अतळीं वसे मयपुत्र बळू ।
प्रतापें अतिप्रबळू । दैत्यमेळू समुदाय ॥ ६९ ॥
प्रतापें अतिप्रबळू । दैत्यमेळू समुदाय ॥ ६९ ॥
आतां सप्तपाताळांत अधिकारी कोण आहेत ते ऐक. तर अतळामध्ये मयासुराचा पुत्र बळ राहातो. तो पराक्रमाने अत्यंत प्रबळ आहे. त्याच्याजवळ राक्षसांचा मोठा समुदाय आहे ६९.
वितळीं वसे हाटकेश्वरू । जो उमाकांत कर्पूरगौरू ।
जेथिले हाटकनदीचा पूरू । सुवर्णसंभारूप्रवाही ॥ १७० ॥
जेथिले हाटकनदीचा पूरू । सुवर्णसंभारूप्रवाही ॥ १७० ॥
वितळामध्ये हाटकेश्वर आहे. जो उमाकांत व कापुरासारखा गौरवर्ण, तोच हा हाटकेश्वर होय. तेथे सुवर्णाच्या राशि जिच्या प्रवाहांतून वाहातात अशा हाटकनदीचा प्रवाह वहात आहे १७०.
सुतळीं महावैष्णव बळी । ज्याचा द्वारपाल वनमाळी ।
प्रल्हादही त्याचिजवळी । वैष्णवकुळीं नांदत ॥ ७१ ॥
प्रल्हादही त्याचिजवळी । वैष्णवकुळीं नांदत ॥ ७१ ॥
सुतळामध्ये ज्याचा द्वारपाल विष्णु आहे असा महान् भगवद्भक्त बळीराजा आहे. प्रल्हादही त्याच्याजवळ विष्णुभक्तांसह रहात असतो ७१.
त्रिपुर भेदूनि शंकरू । रसातळीं स्थापिला मयासुरू ।
तो मायालाघवी महावीरू । सपरिवारू वसताहे ॥ ७२ ॥
तो मायालाघवी महावीरू । सपरिवारू वसताहे ॥ ७२ ॥
शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर रसातळामध्ये मयासुराची स्थापना केली. तो मायालाघवी व महान् पराक्रमी वीर सहपरिवार तेथेंच रहात असतो ७२.
माहातळीं कद्रूसुत । जे विषधर क्रोधयुक्त ।
ते सर्प जाण समस्त । तेथ नांदत निजवासें ॥ ७३ ॥
ते सर्प जाण समस्त । तेथ नांदत निजवासें ॥ ७३ ॥
जे विष धारण करणारे व कोपिष्ट असे कद्रुचे मुलगे सर्प, ते सर्व महातळामध्ये वस्ती करून असतात ७३.
तळातळीं नांदती दानव । निवातकवची वीर सर्व ।
फणिमुख्य राजगौरव । रचना अपूर्व ते ठायीं ॥ ७४ ॥
फणिमुख्य राजगौरव । रचना अपूर्व ते ठायीं ॥ ७४ ॥
तळातळामध्ये दानव राहतात, त्यांना 'निवातकवची वीर' असे म्हणतात. [ते प्रऱ्हादाचा भाऊ जो सऱ्हाद त्याचे पुत्र होत.] तेथील राजा नाग असून तो त्यांस पूज्य आहे, त्या ठिकाणची रचना मोठी अपूर्व आहे ७४.
सातवे पाताळीं वसती नाग । शतसहस्त्र फणिगणभोग ।
वासुकिप्रमुख अनेग । पद्मिनीभोग भोगिती ॥ ७५ ॥
वासुकिप्रमुख अनेग । पद्मिनीभोग भोगिती ॥ ७५ ॥
सातव्या पाताळांत नाग राहतात. तेथे एक लाख नागांचा समुदाय ज्याच्या सेवेला तत्पर आहे, असे वासुकि वगैरे अनेक थोर थोर नाग पद्मिनींबरोबर विलास करीत असतात ७५,
स्वर्गीं रंभा उर्वशी सुंदरी । कां पाताळीं पद्मिणी नारी ।
त्यांच्या सौंदर्याची थोरी । लोकांतरीं वाखाणे ॥ ७६ ॥
त्यांच्या सौंदर्याची थोरी । लोकांतरीं वाखाणे ॥ ७६ ॥
स्वर्गामध्ये रंभा, उर्वशी, या जशा सुंदर स्त्रिया आहेत, त्याप्रमाणेच पाताळांत पद्मिनी नामक स्त्रिया आहेत. त्यांच्या सौंदर्याची थोरवी परलोकांमध्येही वर्णन होत असते ७६.
त्या तळीं तीं शतयोजनांवरी । शेष वसे सहस्रशिरी ।
ज्याच्या निजांगावरी । निद्रा करीं मी भगवंत ॥ ७७ ॥
ज्याच्या निजांगावरी । निद्रा करीं मी भगवंत ॥ ७७ ॥
त्याच्या खाली तीनशे योजनांवर सहस्रमुखांचा शेष राहतो. त्याच्याच आंगावर मी भगवान् निद्रा करतों ७७.
त्याहूनि तळीं आत्यंतिक । अंधतामिस्रादि महानरक ।
त्याहीतळीं कूर्म देख । आवरणोदक तयातळीं ॥ ७८ ॥
त्याहीतळीं कूर्म देख । आवरणोदक तयातळीं ॥ ७८ ॥
त्याच्याही पुष्कळ खाली अंधतामिस्रादि मोठमोठाले नरक आहेत. त्याच्याही खाली कर्म असून त्याच्या खाली आवरणोदक आहे ७८.
ज्यांचा स्वर्गभोग होय क्षीण । अधोभोगाचें उरे पुण्य ।
तेणें पुण्यानुक्रमें जाण । सप्तपाताळीं जन जन्मती ॥ ७९ ॥
तेणें पुण्यानुक्रमें जाण । सप्तपाताळीं जन जन्मती ॥ ७९ ॥
ज्यांचा स्वर्गातील भोग क्षयास जातो, आणि अधोभागांतील भोग भोगण्याइतकेंच पुण्य शिल्लक राहते, त्या पुण्याच्या अनुक्रमाप्रमाणेच ते लोक सप्तपाताळांत जन्मास येतात ७९.
ज्याचे गांठीं पाप चोख । तो भोगी नाना नरक ।
ऐशी त्रिलोकी देख । चतुर्मुख स्वयें रची ॥ १८० ॥
ऐशी त्रिलोकी देख । चतुर्मुख स्वयें रची ॥ १८० ॥
ज्याच्या गाठीला फक्त पातकच असते, तो नाना प्रकारच्या नरकांचा उपभोग घेतो. अशी ही त्रिलोकी ब्रह्मदेवानेच स्वतः रचिली आहे १८०.
ज्यांसीं निष्कामता नाहीं चित्तीं । जे स्वप्नीं न देखती विरक्ती ।
त्यांसी त्रिलोकीवरती गती । नाहीं निश्चितीं उद्धवा ॥ ८१ ॥
त्यांसी त्रिलोकीवरती गती । नाहीं निश्चितीं उद्धवा ॥ ८१ ॥
उद्धवा ! ज्यांच्या मनामध्ये निरिच्छता नाही, ज्यांनी स्वप्नांतही विरक्ति पाहिलेली नाही, त्यांना खात्रीने त्रैलोक्याच्यावर गति नाहीं ८१.
जे न करितीचि माझी भक्ती । जे नायकतीचि माझी कीर्ती ।
जे माझें रामनाम नुच्चरिती । भवबंधपंक्तिच्छेदक ॥ ८२ ॥
जे माझें रामनाम नुच्चरिती । भवबंधपंक्तिच्छेदक ॥ ८२ ॥
जे माझी भक्ति करीत नाहीत, जे माझी कीर्ति श्रवण करीत नाहीत, जे संसारबंधनांच्या फेऱ्यांना तोडणारे माझें रामनाम उच्चारीत नाहीत ८२,
त्यांसी पुनः पुनः स्वर्गलोक । पुनः पुनः भोगिती नरक ।
पुनः पाताळ मृत्युलोक । नानायोनीं दुःख भोगिती ॥ ८३ ॥
पुनः पाताळ मृत्युलोक । नानायोनीं दुःख भोगिती ॥ ८३ ॥
त्यांना पुनः पुन्हा स्वर्गलोक आणि पुनः पुन्हा नरक भोगावा लागतो, व ते पुनः पुन्हा पाताळलोक व मृत्युलोक ह्यांत अनेक प्रकारच्या योनीमध्ये जन्म घेऊन दुःख भोगितात ८३.
जे त्रिगुणगुणी सदा सकाम । जे सर्वदा करिती सकाम कर्म ।
त्यांसी त्रैलोक्यबाहेरी निर्गम । त्रिगुणधर्म निघों नेदी ॥ ८४ ॥
त्यांसी त्रैलोक्यबाहेरी निर्गम । त्रिगुणधर्म निघों नेदी ॥ ८४ ॥
जे या तीन गुणांत गुंतलेले असून सदासर्वदा लोभिष्ट असतात, जे निरंतर सकाम कर्मच करतात, त्यांना त्यांचा तो त्रिगुणात्मक धर्म त्रैलोक्याच्या बाहेर जाऊ देत नाही ८४.
सांगीतली पाताळविवंचना । आतां ऐक स्वर्गरचना ।
लोकीं लोकांतरगणना । समूळ जाणा सांगेन ॥ ८५ ॥
लोकीं लोकांतरगणना । समूळ जाणा सांगेन ॥ ८५ ॥
हा पाताळाचा विचार झाला. आता स्वर्गाची रचना ऐक. असेंच इतर लोकांचेही सविस्तर वर्णन सांगेन. ऐक ८५.
रविचंद्रप्रभा जेथवरी । तेथवरी पृथ्वीची थोरी ।
तळीं पाताळ स्वर्ग वरी । लोकलोकांतरीं निवास ॥ ८६ ॥
तळीं पाताळ स्वर्ग वरी । लोकलोकांतरीं निवास ॥ ८६ ॥
जेथपर्यंत सूर्याचा आणि चंद्राचा प्रकाश पोचतो, तेथपर्यंत पृथ्वीचे काय ते महत्त्व आहे. परंतु लोकांची वस्ती खालच्या पाताळापासून तों अगदी वरच्या स्वर्गलोकापर्यंत अनेक निरनिराळ्या लोकांमध्ये आहेच ८६.
पायीं चालिजे तो भूलोक जोडे । येथूनि सूर्याऐलीकडे ।
भुवर्लोकींची थोरी वाढे । तेथ वस्ती घडे यक्षरक्षगंधर्वां ॥ ८७ ॥
भुवर्लोकींची थोरी वाढे । तेथ वस्ती घडे यक्षरक्षगंधर्वां ॥ ८७ ॥
पायांनी चालतात तो भूलोक होय. तेथपासून तो सूर्याच्या अलीकडेपर्यंत भुवलोंकाचा विस्तार आहे. त्या भुवलोकांत यक्ष, रक्ष व गंधर्व ह्यांची वस्ती आहे ८७.
भुवर्लोकाहीवरी । सूर्यलोकाची वाढे थोरी ।
पृथ्वीपासूनि लक्षावरी । जाण निर्धारीं रविलोक ॥ ८८ ॥
पृथ्वीपासूनि लक्षावरी । जाण निर्धारीं रविलोक ॥ ८८ ॥
भुवलोंकाच्याही वर सूर्यलोकाचा विस्तार सुरू होतो. पृथ्वीपासून लक्षावधि योजनांवर सूर्यलोक आहे हे नीट लक्षांत ठेव . ८८.
वायूपासूनि चक्राकारीं । रविचंद्रतारालोक कुसरी ।
खेवणोनियां तयावरी । काळ सूत्रधारी भवंडीत ॥ ८९ ॥
खेवणोनियां तयावरी । काळ सूत्रधारी भवंडीत ॥ ८९ ॥
काळरूपी सूत्रधार हा वायूपासून बनलेल्या चक्रावर सूर्य, चंद्र व तारालोक मोठ्या कौशल्याने कोंदणांत बसविल्याप्रमाणे बसवून त्यांना गरगर फिरवीत असतो ८९.
त्या काळाहीवरी माझी सत्ता । माझेनि भेणें काळू तत्त्वतां ।
क्षणलवनिमिषावस्था । अधिकन्यूनता होऊं नेदी ॥ १९० ॥
क्षणलवनिमिषावस्था । अधिकन्यूनता होऊं नेदी ॥ १९० ॥
पण त्या काळावरही माझी सत्ता आहे. खरोखर माझ्या धाकानेंच क्षण, लव, निमिष इत्यादि विभागांत तो अधिक-उणेपणा होऊ देत नाही १९०.
नवल काळचक्रगती । मासां रवि चंद्र समान होती ।
सूर्याआड चंद्रासी गती । जाण निश्चितीं दिनद्वयें ॥ ९१ ॥
सूर्याआड चंद्रासी गती । जाण निश्चितीं दिनद्वयें ॥ ९१ ॥
या कालचक्राची गति मोठी आचर्यकारक आहे. एक महिन्याने सूर्य व चंद हे एकत्र येत असतात. नक्षत्रचक्रांत चंद्राचे एक परिभ्रमण पूर्ण झाल्यावर आणखी दोन दिवसांनी (एकंदर सुमारे २९॥ दिवसांनी) चंद्र सूर्याच्या आड येतो ९१.
ते अमावास्याप्रतिपदेसी । चंद्र चंद्रमंडळीं सावकाशीं ।
सूर्यसमभागें गमन त्यासी । तें या लोकांसी दिसेना ॥ ९२ ॥
सूर्यसमभागें गमन त्यासी । तें या लोकांसी दिसेना ॥ ९२ ॥
अमावास्या व प्रतिपदा यांच्या संधिकाळी चंद्र आपल्या भ्रमणमार्गात यथावकाश चालत असतां त्याचे राशिअंशादि स्थान सूर्याइतकेच होते. ते सूर्याच्या तेजामुळे या लोकांना दिसत नाही ९२.
इतुक्यासाठीं ते दिवशीं । जीवें जित्या चंद्राशीं ।
नष्टत्व स्थापिती ज्योतिषी । तें लोकांसी सत्य मानें ॥ ९३ ॥
नष्टत्व स्थापिती ज्योतिषी । तें लोकांसी सत्य मानें ॥ ९३ ॥
इतक्यावरूनच त्या दिवशी सजीवपणाने जिवंत असणाऱ्या (आकाशांत प्रत्यक्ष असणाऱ्या) चंद्राला ज्योतिषी तो नष्ट झाला असे म्हणतात, आणि ते या लोकांना खरे वाटते ९३.
रवि चंद्र एकासनीं । सर्वथा नव्हती गमनीं ।
लक्षांतरें वसती दोन्ही । मंडळसमानीं मासांतीं गती ॥ ९४ ॥
लक्षांतरें वसती दोन्ही । मंडळसमानीं मासांतीं गती ॥ ९४ ॥
सूर्य आणि चंद्र आपापल्या मार्गानी चालत असतांना एका ठिकाणी कधींच यावयाचे नाहीत. कारण ते एकमेकांपासून लक्षावधि योजनें दूर अंतरावर राहातात. परंतु महिन्याच्या शेवटी (अमावास्येच्या वेळी ) त्यांच्या गतींनी त्यांची बिबें क्रांतिवृत्तांत आरंभस्थानापासून समान अंतरावर येतात ९४.
रविआड गती ज्या ग्रहासी । त्याचा अस्त सांगे ज्योतिषी ।
सत्य माने या लोकांसी । तो ग्रहो दृष्टीसी दिसेना ॥ ९५ ॥
सत्य माने या लोकांसी । तो ग्रहो दृष्टीसी दिसेना ॥ ९५ ॥
जो ग्रह आपल्या गतीने सूर्याच्या आड येतो (सूर्याच्या जवळ असल्यामुळे दिसेनासा होतो), त्याचा अस्त झाला असें ज्योतिषी सांगतो, आणि ह्या लोकांना ते खरे वाटते. कारण त्या वेळी तो ग्रह दृष्टीसही पडत नाहीं ९५.
दृष्टिसृष्टीचा जो न्यावो । तो ज्योतिषशास्त्रीं सत्य पहा हो ।
न दिसे त्याचा अस्तभावो । दिसे तो पहा हो पूजिती ॥ ९६ ॥
न दिसे त्याचा अस्तभावो । दिसे तो पहा हो पूजिती ॥ ९६ ॥
वेदांतांत जो दृष्टिसृष्टीचा न्याय आहे, तो ज्योतिषशास्त्रामध्येच खरा आहे, हे लक्षात ठेवा. कारण जो दिसत नाही त्याचा अस्त झाला असें ज्योतिषी लोक समजतात, आणि जो दिसतो त्याची पूजा करितात ९६.
अभ्राआड ग्रहण झालें । देखीलें तेथें पर्व फावलें ।
न दिसे ते देशीं नाहींच झालें । येणेहीं बोलें वर्तती ॥ ९७ ॥
न दिसे ते देशीं नाहींच झालें । येणेहीं बोलें वर्तती ॥ ९७ ॥
ग्रहण लागून ते काही वेळ अभ्राआड झाले, तरी ज्यांना ते अभ्र नसते तर ग्रहण दिसूं शकले असते, ते लोक त्या वेळी पर्वकाळ मानितात, पण तेच ग्रहण ज्या देशांत दृश्य आकाशांत नसते (चंद्रग्रहण दिवसा झाले तर त्या वेळी चंद्र दृश्य आकाशांत नसतो, तसेंच रात्रीचें सूर्यग्रहणही दृश्य आकाशांत नसते) त्या देशांतील लोक ग्रहण झाले नाही असे म्हणूनच वागतात ९७.
रविचंद्रांहूनि आरती । राहुकेतूंची असे वस्ती ।
ते जैं मंडळाआड येती । तैं ग्रासिलें म्हणती रविचंद्रां ॥ ९८ ॥
ते जैं मंडळाआड येती । तैं ग्रासिलें म्हणती रविचंद्रां ॥ ९८ ॥
सूर्यचंद्रांच्या अलीकडे राहुकेतूंची वस्ती आहे. ते राहु-केतु जेव्हां सूर्यचंद्रांच्या बिंबांआड येतात, तेव्हां त्यांनी रवि-चंद्रांचा ग्रास केला असे म्हणतात ९८.
राहू सूर्या गिळिता साचें । तैं तोंड जळतें राहूचें ।
मंडळीं मंडळ आड ये त्यांचे । हें सर्वग्रासांचें संमत ॥ ९९ ॥
मंडळीं मंडळ आड ये त्यांचे । हें सर्वग्रासांचें संमत ॥ ९९ ॥
खरोखरच राहु जर सूर्याला गिळीत असता, तर राहूचे तोंडच जळून गेले असते. एका बिंबाआड दुसरें बिंब येते, हेच त्या ग्रहणांतील सर्व ग्रासांचे सर्वमान्य तत्त्व आहे ९९.
सूर्य सूर्यमंडळीं राज्य करी । त्याच्या सर्वग्रासाची थोरी ।
ज्योतिषी सांगे घरोघरीं । तें देखोनि नरीं महाशब्द कीजे ॥ २०० ॥
ज्योतिषी सांगे घरोघरीं । तें देखोनि नरीं महाशब्द कीजे ॥ २०० ॥
वस्तुतः सूर्य हा सूर्यमंडळांत आपले राज्य करीत असतो, परंतु सूर्यग्रहणाच्या वेळी त्याच्या सर्वग्रासाचें माहात्म्य ज्योतिषी घरोघर सांगतो आणि तें ग्रहण पाहून सामान्य जनही कोलाहल करितात २००.
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...