मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १९ ओव्या ३०१ ते ४००
'भक्तिप्राधान्य भागवतशास्त्र' । तें निजभक्तीचें निजसार ।
तुज मी सांगितले साचार । अत्यादरपूर्वक ॥ १ ॥
भागवतशास्त्र हें भक्तिप्रधान आहे. त्यांतील निजमक्तीचे सार मी तुला अत्यादरपूर्वक यथार्थ रीतीने कथन केलें १.
उद्धवा तुझे प्रीतीचेनि व्याजें । मज गुह्यांचें निजगुह्य हें जें ।
तें भक्तीचें करूनियां खाजें । तुज म्यां वोजें दीधलें ॥ २ ॥
तें भक्तीचें करूनियां खाजें । तुज म्यां वोजें दीधलें ॥ २ ॥
उद्धवा ! तुझ्या आवडीच्या निमित्ताने हे माझे गुह्यांतील गुह्य अशी जी भक्ति, त्या भक्तीचा मेवा करून मोठ्या आवडीनें तुला मी दिला आहे २.
म्यां सांगितलें जैशा रीतीं । तैशी सेवावी माझी निजभक्ती ।
ऐसें बोलत श्रीपती । उद्धव प्रीतीं उचलिला ॥ ३ ॥
ऐसें बोलत श्रीपती । उद्धव प्रीतीं उचलिला ॥ ३ ॥
मी ज्या रीतीने आतां सांगितले, त्याच रीतीने माझी श्रेष्ठ भक्ति आचरण करावी. असें म्हणता म्हणतां श्रीकृष्णांनी उद्धवाला प्रेमाने उचलले ३.
मागां टाकूनि पीतांबरें । सांडोनियां शंखचक्रें ।
उद्धव उचलिला श्रीधरें । तरी प्रेम न सांवरे देवाचें ॥ ४ ॥
उद्धव उचलिला श्रीधरें । तरी प्रेम न सांवरे देवाचें ॥ ४ ॥
पीतांबर मागें सारला : शंख चक्र टाकून दिले; आणि श्रीहरीनें उद्धवाला उचलून घेतले. तरीसुद्धा देवाचे प्रेम आवरेना ४.
हांव न बाणेचि दों करीं । मग चारी भुजा पसरी ।
उद्धवातें हृदयावरी । प्रीतीं थोरीं आलिंगी ॥ ५ ॥
उद्धवातें हृदयावरी । प्रीतीं थोरीं आलिंगी ॥ ५ ॥
दोहों हातांनी काही पुरेसे होईना, म्हणून मग चारही हात पसरले. आणि प्रेमाने उद्धवाला हृदयाशी कवटाळून धरले ५.
हृदयीं हृदय एक जाहलें । ये हृदयींचें ते हृदयीं घातिलें ।
कृष्णें सर्वस्व जें आपुलें । तें हृदयीं सूदलें उद्धवाचे ॥ ६ ॥
कृष्णें सर्वस्व जें आपुलें । तें हृदयीं सूदलें उद्धवाचे ॥ ६ ॥
हृदयामध्ये हृदय एक होऊन गेले. या हृदयांत होतें तें त्या हृदयांत घातले. याप्रमाणे कृष्णांनी आपले सर्वस्व उद्धवाच्या हृदयांत घालून सोडले ६.
देव आवाप्तकाम निचाड । त्यासीही भक्तीची ऐसी चाड ।
अतिशयें उद्धव लागला गोड । स्वानंदें कोड पुरवी त्याचें ॥ ७ ॥
अतिशयें उद्धव लागला गोड । स्वानंदें कोड पुरवी त्याचें ॥ ७ ॥
श्रीहरि अवाप्तकाम व निरिच्छ; पण त्यालासुद्धा भक्तीची एवढी आवड. म्हणून उद्धव त्याला इतका गोड लागला व त्याचे स्वानंदाने सर्व कोड पुरविलें ७.
उद्धव प्रेमाचा लवलाहो । आलिंगन सोडूं विसरे देवो ।
कृष्णहृदया हृदय जडल्या पहा हो । उद्धवा उद्धवो विसरला ॥ ८ ॥
कृष्णहृदया हृदय जडल्या पहा हो । उद्धवा उद्धवो विसरला ॥ ८ ॥
उद्धवाच्या प्रेमाची देवाला इतकी आवड की, देव मिठी सोडावयाचीही विसरून गेले. आणि पाहा! कृष्णाच्या हृदयाला हृदय जडल्यामुळे उद्धवही उद्धवपणाला विसरला ८.
ऐसे स्वानंदीं वाडाकोडा । दोघेहि मिसळले निचाडचाडा ।
भक्तिसुखाचा सुरवाडा । उद्धव गाढा मीनला ॥ ९ ॥
भक्तिसुखाचा सुरवाडा । उद्धव गाढा मीनला ॥ ९ ॥
अशा प्रकारें आनंदाने व आवडीनें दोघेही निष्काम प्रेमामध्ये बुडून गेले. उद्धव तर भक्तिसुखाच्या समृद्धीमध्ये बुडूनच गेला ९.
कृष्णें सर्वस्व आपुलें । उद्धवाचे हृदयीं सूदलें ।
हें उद्धवा कळों नाहीं दीधलें । लाघव केलें गोविंदें ॥ ३१० ॥
हें उद्धवा कळों नाहीं दीधलें । लाघव केलें गोविंदें ॥ ३१० ॥
कृष्णानी आपले सर्वस्व उद्धवाच्या हृदयांत घातलें . परंतु ते उद्धवाला कळू मात्र दिले नाही. श्रीहरीने एक मोठा चमत्कार केला हा ३१०.
हा अर्थ कळल्या उद्धवासी । हा येईल मजसी ऐक्यासी ।
पुढील कथा सुरस ऐसी । मग कोणापाशीं सांगावी ॥ ११ ॥
पुढील कथा सुरस ऐसी । मग कोणापाशीं सांगावी ॥ ११ ॥
कारण ( देव म्हणतात) उद्धवाला हें हृद्गत कळलें तर हा माझ्याशी ऐक्याला येईल; मग पुढची सुरस कथा कोणापाशी सांगावी?" ११.
उद्धवा मज वाडेंकोडें । अखंड हेंचि बोलों आवडे ।
परी तैसा श्रोता न जोडे । हें थोर सांकडें मजलागीं ॥ १२ ॥
परी तैसा श्रोता न जोडे । हें थोर सांकडें मजलागीं ॥ १२ ॥
उद्धवाकडे प्रेमाने निरंतर असेंच बोलावयाला आवडते. याचे कारण तसा श्रोता दुसरा मिळत नाही. मला हेच मोठे संकट वाटते १२.
भक्तिसुखाचा सुरवाड । सांगतां माझें पुरे कोड ।
ऐसा श्रोता कैंचा गोड । यालागीं उद्धवा आड प्रेम सूये ॥ १३ ॥
ऐसा श्रोता कैंचा गोड । यालागीं उद्धवा आड प्रेम सूये ॥ १३ ॥
भक्तिसुखाची थोरवी सांगतांना माझी हैास पूर्ण होईल असा गोड श्रोता आणावा कोठून ? म्हणून उद्धवाच्या आड प्रेम ठेवून दिलें १३.
सूर्यापासूनि फांकती किरण । तैसें सुटलें आलिंगन ।
कृष्ण उद्धव जाहले भिन्न । परी अभिन्नपण मोडे ना ॥ १४ ॥
कृष्ण उद्धव जाहले भिन्न । परी अभिन्नपण मोडे ना ॥ १४ ॥
सूर्यापासून किरण फांकतात (सुटतात) त्याप्रमाणे त्याची मिठी सुटली, आणि कृष्ण व उद्धव हे मिन भिन्न झाले. तरी पण त्यांची अभिन्नता कांहीं मोडली नाही १४.
पुढील कथेची संगती । दूर ठेली श्लोकसंगती ।
श्रोतां विरुद्ध न घ्यावें चित्तीं । समूळार्थ निश्चितीं विचारावा ॥ १५ ॥
श्रोतां विरुद्ध न घ्यावें चित्तीं । समूळार्थ निश्चितीं विचारावा ॥ १५ ॥
असो.(टीकाकार श्रीएकनाथ म्हणतात) पुढील कथेचा संदर्भ व श्लोकाचा संबंध दूर राहिला, असा श्रोत्यांनी मनांत विकल्प आणू नये. मुळांतील अर्थाचा नीट विचार करावा १५.
मूळींचें पद संकोचित । तेथ उत्तम भक्तिभावार्थ ।
स्वयें बोलिला श्रीकृष्णनाथ । तोचि म्यां अर्थ विस्तारिला ॥ १६ ॥
स्वयें बोलिला श्रीकृष्णनाथ । तोचि म्यां अर्थ विस्तारिला ॥ १६ ॥
मुळांतील पद संक्षिप्त आहे. त्यांत श्रीकृष्णांनी स्वतः भक्तिभावार्थ उत्तम रीतीने सांगितला आहे. त्यांतील अर्थाचा मी विस्तार केला इतकेंच १६.
नारळांतल्या वस्त्राची घडी । उकलितां थोर वाढे वाढी ।
तेवीं मूळपदाची घडामोडी । कथा एवढी विस्तारली ॥ १७ ॥
तेवीं मूळपदाची घडामोडी । कथा एवढी विस्तारली ॥ १७ ॥
नारळांत घालून आणलेल्या वस्त्राची घडी उलगडली म्हणजे ती लांबच्या लांब होते ; त्याप्रमाणे मूळ पदाचा ऊहापोह करतांना एवढा विस्तार झाला १७.
मूळपदाचा पदपदार्थ । श्लोकीं पहावा सावचित्त ।
श्लोकौत्तरार्धीं भगवंत । ध्वनितार्थ बोलोनि गेला ॥ १८ ॥
श्लोकौत्तरार्धीं भगवंत । ध्वनितार्थ बोलोनि गेला ॥ १८ ॥
मुळांतील पदपदांचा अर्थ श्लोकामध्ये नीट विचार करून पाहावा. म्हणजे त्या श्लोकाच्या उत्तरार्धात भगवान् ध्वनितार्थ बोलून गेल्याचे लक्षात येईल १८.
त्याचि ध्वनिताचे पोटीं । होती भक्तिरहस्याची पेटी ।
ते म्यां उघडूनि दाविली दिठीं । वृथा चावटी झणें म्हणाल ॥ १९ ॥
ते म्यां उघडूनि दाविली दिठीं । वृथा चावटी झणें म्हणाल ॥ १९ ॥
त्या ध्वनितार्थाच्या पोटांतच भक्तिरहस्याची पेटी होती; तीच उघडी करून मी दाखविली. ह्याकरितां ही व्यर्थ बडबड आहे असे म्हणू नये १९.
तंव श्रोते म्हणती नवल येथ । मूळींचें पद होतें गुप्त ।
तें काढिलें भक्तिसारामृत । सुहृदयस्थ हरीचें ॥ ३२० ॥
तें काढिलें भक्तिसारामृत । सुहृदयस्थ हरीचें ॥ ३२० ॥
तेव्हां श्रोते म्हणाले, केवढे हे आश्चर्य ! मुळामध्ये पद अत्यंत गूढ होते, त्यांतून श्रीहरीच्या मनातील भक्तिसारामृत तूं काढलेंस ३२०.
तुझे हृदयीं श्रीकृष्णनाथ । प्रकटोनि आपुलें हृद्गत ।
ग्रंथीं असे बोलवित । हें सुनिश्चित कळलें आम्हां ॥ २१ ॥
ग्रंथीं असे बोलवित । हें सुनिश्चित कळलें आम्हां ॥ २१ ॥
तुझ्या हृदयामध्ये श्रीकृष्णनाथ प्रगट होऊन आपले हृद्गतच ग्रंथामध्ये तुझ्याकडून बोलवीत आहे, हे आम्हांला पक्कं कळून चुकले २१.
आम्हा ऐकतां भक्तिसारामृत । चित्तीं चैतन्य उथळत ।
होशी देखणा सुनिश्चित । ग्रंथ यथार्थ अर्थिला ॥ २२ ॥
होशी देखणा सुनिश्चित । ग्रंथ यथार्थ अर्थिला ॥ २२ ॥
हें भक्तिसासारामृत श्रवण करतांच चित्तामध्ये चैतन्य उसळू लागले. तूं खरा विचारशील आहेस म्हणूनच ग्रंथाचा अर्थ यथार्थ रीतीने करीत आहेस २२.
हें ऐकोनि संतांचे वचन । हरिखला एकाजनार्दन ।
मस्तकीं वंदिले श्रीचरण । पुढील निरूपण अवधारा ॥ २३ ॥
मस्तकीं वंदिले श्रीचरण । पुढील निरूपण अवधारा ॥ २३ ॥
हें संतांचे भाषण ऐकून एकाजनार्दनाला हर्ष वाटला व त्याने त्यांचे श्रीचरण मस्तकी धरले. आता पुढील निरूपण ऐका २३.
निजभक्तीचे दृढीकरण । आदरें करिताहे श्रीकृष्ण ।
सांगितलें तेंचि निरूपण । पुढती जाण सांगता ॥ २४ ॥
सांगितलें तेंचि निरूपण । पुढती जाण सांगता ॥ २४ ॥
श्रीकृष्ण आपल्या भक्तीचे आदरपूर्वक दृढीकरण करण्याकरितांच सांगितलेले निरूपण पुढे पुन्हा सांगत आहेत २४.
यदाऽऽत्मन्यर्पितं चित्तं शान्तं सत्त्वोपबृंहितम् ।
धर्मं ज्ञान सवैराग्यमैश्वर्यं चाभिपद्यते ॥ २५ ॥
धर्मं ज्ञान सवैराग्यमैश्वर्यं चाभिपद्यते ॥ २५ ॥
[श्लोक २५] धर्माचे अशा प्रकारे पालन करण्याने चित्तामध्ये सत्त्वगुणाची वृद्धी होते आणि ते शांत होऊन आत्मचिंतन करू लागते त्यावेळी भक्ताला धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य स्वतःहून प्राप्त होते. (२५)
आपुलें जें कां अंतःकरण । तें करितां गा मदर्पण ।
माझी निजभक्ति उल्हासे जाण । जिचें निरूपण म्यां केलें ॥ २५ ॥
माझी निजभक्ति उल्हासे जाण । जिचें निरूपण म्यां केलें ॥ २५ ॥
आपलें जें अंत:करण ते मला अर्पण केलें आतां माझी भक्ति उल्हासाने वाढते, याविषयी मी पूर्वी सांगितलेच आहे २५.
मद्रूपीं अर्पावया मन । सुगम वर्म सांगेन जाण ।
माझें करितां नामस्मरण । पापनिर्दळण तेणें होय ॥ २६ ॥
माझें करितां नामस्मरण । पापनिर्दळण तेणें होय ॥ २६ ॥
आतां मन माझ्या स्वरूपांत अर्पण करण्याची एक सोपी युक्ति सांगतो ती लक्षात ठेव. माझे नामस्मरण केले असता त्याच्या योगाने पातकांचा नाश होतो २६.
सकाम स्मरतां नाम । नाम पुरवी सकळ काम ।
निर्विकल्पें स्मरतां नाम । करी भस्म पापाचें ॥ २७ ॥
निर्विकल्पें स्मरतां नाम । करी भस्म पापाचें ॥ २७ ॥
मनांत काही कामना धरून नामस्मरण केले असता तें नामच सर्व कामना पूर्ण करते. आणि निरिच्छपणाने नामस्मरण केले असतां सर्व पातकांचे भस्म करिते २७.
होतां पापाचें क्षालण । रज तम जिणोनि जाण ।
सहजें वाढे सत्त्वगुण । धर्मपरायण धार्मिक ॥ २८ ॥
सहजें वाढे सत्त्वगुण । धर्मपरायण धार्मिक ॥ २८ ॥
आणि पापांचे भस्म झाले म्हणजे रज आणि तम यांना जिंकून आपोआप धर्मपरायण व धार्मिक असा जो सत्त्वगुण तो वाढतो २८.
स्वधर्मनिष्ठ सत्त्वगुणें । अढळ पडे वैराग्याचें ठाणें ।
वैराग्यें विषय निर्दळणें । निजज्ञान तेणें प्रकाशे ॥ २९ ॥
वैराग्यें विषय निर्दळणें । निजज्ञान तेणें प्रकाशे ॥ २९ ॥
सत्वगुणाच्यायोगें वैराग्याचे कायमचे ठाणे बसतें. वैराग्याच्यायोगाने विषयनिर्दळण होते आणि तेणेकरून आत्मज्ञान प्रगट होतें २९.
वाढल्या सविवेक ज्ञान । लागे स्वरूपाचें अनुसंधान ।
चढे शांतीचें समाधान । तैं मदर्पण मन होये ॥ ३३० ॥
चढे शांतीचें समाधान । तैं मदर्पण मन होये ॥ ३३० ॥
विवेकासह वर्तमान ज्ञान वाढलें म्हणजे स्वरूपाचे अनुसंधान लागते आणि शांतीचे समाधान वाढत जातें त्या वेळी मन मदर्पण होते ३३०.
मन जाहल्या मदर्पण । निजभक्ति उल्हासे जाण ।
जिचें गतश्लोकीं निरूपण । म्यां संपूर्ण सांगितलें ॥ ३१ ॥
जिचें गतश्लोकीं निरूपण । म्यां संपूर्ण सांगितलें ॥ ३१ ॥
मन माझ्या ठिकाणी अर्पण झाले म्हणजे निजभक्ति प्रगट होते. तिचे सारें निरूपण मी मागच्या श्लोकांत सांगितलेच आहे ३१.
निजभक्ति पावल्या संपूर्ण । भक्तें न मागतां जाण ।
अष्ट महासिद्धी आपण । त्याचें आंगण वोळंगती ॥ ३२ ॥
अष्ट महासिद्धी आपण । त्याचें आंगण वोळंगती ॥ ३२ ॥
निजभक्ति पूर्णपणे प्राप्त झाली की भक्ताने न मागतांच अष्टमहासिद्धि आपण होऊन त्याच्या आंगणांत येऊन उभ्या राहतात ३२.
जो सिद्धींकडे कदा न पाहे । त्यासी अवशेष कोण अर्थ राहे ।
माझी संपूर्ण पदवी लाहे । मदैक्य होये मद्भक्तां ॥ ३३ ॥
माझी संपूर्ण पदवी लाहे । मदैक्य होये मद्भक्तां ॥ ३३ ॥
त्या सिद्धींकडे जो कधी ढुंकूनसुद्धा पाहात नाही, त्याला अप्राप्य अशी वस्तु कोणती राहते ? माझ्या भक्तांचे माझ्याशी ऐक्य झाल्यामुळे त्यांना माझी सारी सत्ता प्राप्त होते ३३.
ऐशी न जोडतां माझी भक्ती । न लाभतां आत्मस्थिती ।
वर्तणें जैं विषयासक्तीं । तैं अनर्थप्राप्ती अनिवार ॥ ३४ ॥
वर्तणें जैं विषयासक्तीं । तैं अनर्थप्राप्ती अनिवार ॥ ३४ ॥
अशी माझी भक्ति न जोडतां व आत्मस्थिति न लाभतां विषयासक्तीनें वागू लागल्यास मोठा अनर्थ कोसळतो ३४.
यदर्पितं तद्विकल्पे इंद्रियैः परिधावति ।
रजस्वलं चासन्निष्ठं चित्तं विद्धि विपर्ययम् ॥ २६ ॥
रजस्वलं चासन्निष्ठं चित्तं विद्धि विपर्ययम् ॥ २६ ॥
[श्लोक २६] तेच मन जेव्हा मिथ्या प्रपंचात रमून इंद्रियांसह इकडेतिकडे भरकटू लागते, तेव्हा ते चित्त रजोगुणाने व्यापून नश्वर विषयांत गुंतते तेव्हा त्याची स्थिती वरील स्थितीच्या उलट होते. (२६)
जो सत्य न मानी वेदशास्त्रार्थ । साच न म्हणे तो परमार्थ ।
जो ग्रहदाराद्रव्यासक्त । लोलंगत विषयांसी ॥ ३५ ॥
जो ग्रहदाराद्रव्यासक्त । लोलंगत विषयांसी ॥ ३५ ॥
वेदशास्त्रार्थ जो खरा मानीत नाही; परमार्थाला जो सत्य समजत नाहीं; जो घर, दार, बायकामुलें व संपत्ति यांना आसक्त होऊन विषयांनाच लुब्ध झालेला असतो ३५,
तेणें अत्यंत समळमेळें । दारुण रजोगुण खवळे ।
तेणें चित्त होय ज्ञानांधळें । विपरीत कळे ज्ञानार्थ ॥ ३६ ॥
तेणें चित्त होय ज्ञानांधळें । विपरीत कळे ज्ञानार्थ ॥ ३६ ॥
त्याच्यात विषयाच्या अत्यंत संघटनाने रजोगुण अतिशय क्षुब्ध होतो. आणि तेणेकरून त्याचे चित्त ज्ञानाविषयीं आंधळे होऊन राहते. त्याला ज्ञानाचा अर्थ सारा विरुद्धच दिसू लागतो ३६.
ज्यासी विषयांच्या युक्ती गहन । त्यासी म्हणती अतिसज्ञान ।
जो करी युक्तीचें छळण । होय मान्य पंडितपणें ॥ ३७ ॥
जो करी युक्तीचें छळण । होय मान्य पंडितपणें ॥ ३७ ॥
असे लोक विषयोभोगाचे ज्याला नानाविध उपाय सुचतात, त्याला मोठा 'ज्ञानी' असे म्हणतात ! आणि जो छलवादाच्या युक्तीने तोंड बंद करतो, त्याला 'पंडित' म्हणतात! ३७.
ज्यासी प्रपंचाचा अतिविस्तार । त्यास म्हणती भाग्य थोर ।
जो नाना भोगीं पाळी शरीर । सुकृती नर त्या म्हणती ॥ ३८ ॥
जो नाना भोगीं पाळी शरीर । सुकृती नर त्या म्हणती ॥ ३८ ॥
ज्याचे मागे प्रपंचाचे मोठे लटांबर असते, त्याला 'भाग्यवान् ' समजतात; आणि जो नानाप्रकारच्या उपभोगांनी आपल्या शरीराचे पोषण करतो, त्याला मोठा 'पुण्यवान् ' पुरुष म्हणतात ३८.
जो अनुतापी परमार्थविखीं । त्यासी म्हणती परम दुःखी ।
जो नाना विषयांतें पोखी । त्यांते महासुखी मानिती ॥ ३९ ॥
जो नाना विषयांतें पोखी । त्यांते महासुखी मानिती ॥ ३९ ॥
परमार्थविषयांत जी अनुतापी असतो, त्याला मोठा 'दुःखी' म्हणतात; जो अनेक प्रकारच्या विषयांना पोसतो तो मोठा 'सुखी' समजतात ३९.
ज्याचेनि बोलें मनुष्य मरे । त्याचें सिद्धत्व मानिती खरें ।
जो उदास राहटे अनाचारें । मुक्त निर्धारे तो म्हणती ॥ ३४० ॥
जो उदास राहटे अनाचारें । मुक्त निर्धारे तो म्हणती ॥ ३४० ॥
ज्याच्या शब्दाबरोबर (शापाने) मनुष्य मरते, त्याचे 'सिद्धत्व ' खरें मानतात. आणि अनाचाराने जो स्वच्छंद वागणूक ठेवतो त्यास 'मुक्त' असे म्हणतात! ३४०.
ज्याचा दांभिक आचार । त्यातें म्हणती पवित्र नर ।
जे स्त्रियादि शूद्रां देती मंत्र । ते ज्ञाते थोर मानिती ॥ ४१ ॥
जे स्त्रियादि शूद्रां देती मंत्र । ते ज्ञाते थोर मानिती ॥ ४१ ॥
ज्याचा आचार दांभिक असतो, तो पुरुष मोठा 'पवित्र' समजतात. आणखी जे स्त्रियांशूद्रादिकांना मंत्र देतात, ते मोठे 'ज्ञाते' मानतात! ४१.
जो कां अनुतापी वैरागी । त्यातें म्हणती अतिअभागी ।
जो उघड विषयांतें भोगी । तो राजयोगी मानिती ॥ ४२ ॥
जो उघड विषयांतें भोगी । तो राजयोगी मानिती ॥ ४२ ॥
जो अनुतापी व वैराग्यशील असतो त्याला 'कपाळकरंटा' असे म्हणतात! आणि जो राजरोस विषयांचा उपभोग घेतो, त्याला 'राजयोगी' असें मानतात! ४२.
स्वयें द्रव्याचा अभिलाखी । द्रव्य वेंची त्यातें मूर्ख लेखी ।
न वेंची त्यातें म्हणती विवेकी । धर्मज्ञ लोकीं हा एक ॥ ४३ ॥
न वेंची त्यातें म्हणती विवेकी । धर्मज्ञ लोकीं हा एक ॥ ४३ ॥
जो स्वतः द्रव्याचा अभिलाषी असतो, तो द्रव्य खर्च करणाऱ्याला 'मूर्ख' लेखतो; आणि खर्च न करणाऱ्याला मोठा 'विचारी' व जगामधील एक मोठा 'धर्मज्ञ' असे म्हणतात ४३.
ज्याचे गांठी बहुसाल धन । तो सर्वांसी अवश्य मान्य ।
तोचि पवित्र तोचि सज्ञान । ऐसें विपरीत ज्ञान हों लागे ॥ ४४ ॥
तोचि पवित्र तोचि सज्ञान । ऐसें विपरीत ज्ञान हों लागे ॥ ४४ ॥
ज्याच्या गांठीला पुष्कळसे द्रव्य असते, तो सर्वांना मोठा 'पूज्य', 'पवित्र' आणि 'ज्ञानी' वाटतो. असें विपरीत ज्ञान त्यांना होऊ लागते ४४.
आपण सर्वात्मा सर्वेश । हें विसरोनियां निःशेष ।
अधर्मी अकर्मी अनीश । मी अज्ञान पुरुष हें मानी ॥ ४५ ॥
अधर्मी अकर्मी अनीश । मी अज्ञान पुरुष हें मानी ॥ ४५ ॥
आपण सर्वात्मा आणि सर्वेश आहोत, हे मुळीच विसरून जाऊन आपण अधर्मी, अकर्मी, दीनदुबळा व अज्ञानी असें मानू लागतो ४५.
तेथ कैं उपजे माझी भक्ती । कैसेनि होईल माझी प्राप्ती ।
ऐसे भ्रमले नेणों किती । संसारआवर्ती वर्ततां ॥ ४६ ॥
ऐसे भ्रमले नेणों किती । संसारआवर्ती वर्ततां ॥ ४६ ॥
अशा ठिकाणी माझी भक्ति कशी उत्पन्न होणार? आणि माझी प्राप्ति तरी कशाने होणार ! अशा प्रकारे संसाराच्या भोवऱ्यांत सांपडून किती लोक गिरक्या खात आहेत ह्याची गणती नाही ४६.
परमात्मप्राप्तीचीं कारणें । अतिगुह्य चारी लक्षणें ।
पोटंतुल्या कृपागुणें । उद्धवाकारणें हरि सांगे ॥ ४७ ॥
पोटंतुल्या कृपागुणें । उद्धवाकारणें हरि सांगे ॥ ४७ ॥
परमात्म्याच्या प्राप्तीला कारण अशी चार लक्षणे आहेत आणि ती अत्यंत गुह्य आहेत. ती अंत:करणांतील वात्सल्यामुळे श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात ४७.
धर्माची भजन भोय । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ।
माझी प्राप्ती अवश्य होय । ते चारी उपाय अवधारीं ॥ ४८ ॥
माझी प्राप्ती अवश्य होय । ते चारी उपाय अवधारीं ॥ ४८ ॥
धर्माची मुख्य भूमिका म्हणजे भजन, त्यामुळे उत्पन्न होणारे ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य चार उपाय माझ्या प्राप्तीला अवश्य आहेत. ते चारी आतां सांगतों ऐक ४८.
धर्मो मद्भक्तिकृत्प्रोक्तो ज्ञानं चैकात्म्यदर्शनम् ।
गुणेष्वसङ्गो वैराग्यमैश्वर्यं चाणिमादयः ॥ २७ ॥
गुणेष्वसङ्गो वैराग्यमैश्वर्यं चाणिमादयः ॥ २७ ॥
[श्लोक २७] उद्धवा ! ज्याच्यामुळे माझी भक्ती उत्पन्न होते, तोच धर्म होय ज्यामुळे ब्रह्म आणि आत्मा यांच्या एकतेचा साक्षात्कार होतो, तेच ज्ञान होय विषयांपासून अलिप्त राहाणे हे वैराग्य होय आणि अणिमादी सिद्धी हेच ऐश्वर्य होय. (२७)
ऐक उद्धवा निजवर्म । गुह्य सांगेन मी परम ।
माझी भक्ति जे सप्रेम । उत्तम 'धर्म' तो जाण ॥ ४९ ॥
माझी भक्ति जे सप्रेम । उत्तम 'धर्म' तो जाण ॥ ४९ ॥
उद्धवा ! आतां मुख्य वर्म आणि गुह्यांतील अयंत गुह्य असें मी तुला सांगतों तें ऐक. माझी प्रेमयुक्त जी भक्ति, तोच सर्वोत्कृष्ट 'धर्म' होय हें निश्चित समज ४९.
ऐक्यें एकात्मता निजबोध । परतोनि कदा नुपजे भेद ।
या नांव गा 'ज्ञान' शुद्ध । कृष्ण परमानंद सांगत ॥ ३५० ॥
या नांव गा 'ज्ञान' शुद्ध । कृष्ण परमानंद सांगत ॥ ३५० ॥
आणि ऐक्याने एकात्मतेचा जो साक्षात् बोध होतो, आणि पुन्हा कधीं भेद म्हणून उत्पन्न होत नाही, त्याचंच नांव 'शुद्धज्ञान' असें परमानंदरूप श्रीकृष्ण म्हणाले ३५०.
धनधान्य रत्नांच्या राशी । उर्वशी आल्या शेजारासी ।
तें अवघें तृणप्राय ज्यासी । 'वैराग्य' त्यासी आम्ही म्हणों ॥ ५१ ॥
तें अवघें तृणप्राय ज्यासी । 'वैराग्य' त्यासी आम्ही म्हणों ॥ ५१ ॥
आणि धनधान्याच्या किंवा रत्नाच्या राशीच्या राशी पुढे येऊन पडल्या, किंवा उर्वशी जरी शेजेवर आली, तरी तें सारें ज्याला तृणप्राय वाटते, त्यालाच आम्ही 'वैराग्य' असे म्हणतों ५१.
ऐक उद्धवा सुबुद्धी । माझ्या ज्या अष्ट महासिद्धी ।
त्या मजवेगळ्या दूरी कधीं । जाण त्रिशुद्धी न ढळती कदा ॥ ५२ ॥
त्या मजवेगळ्या दूरी कधीं । जाण त्रिशुद्धी न ढळती कदा ॥ ५२ ॥
हे बुद्धिमंता उद्धवा ! ऐक. माझ्या अष्ट महासिद्धि आहेत, त्या खरोखर माझ्यापासून कधीही दूर होत नाहीत, किंवा ढळतही नाहीत हे लक्षात ठेव ५२.
माझे निजभक्तीच्या निर्धारीं । जो माझी पदवी घे ऐक्येंकरीं ।
माझ्या सिद्धी त्याच्या घरीं । होती किंकरी निजदासी ॥ ५३ ॥
माझ्या सिद्धी त्याच्या घरीं । होती किंकरी निजदासी ॥ ५३ ॥
माझ्या या श्रेष्ठ भक्तीच्या निश्चयाने जो एकात्मता करतलामलकवत् करून माझी पदवी प्राप्त करून घेतो, त्याच्या घरामध्ये या माझ्या सिद्धि दासी व बटकी होऊन राहतात ५३.
सिद्धी सेवा करिती । हेंचि नवल सांगों किती ।
श्रियेसहित मी श्रीपती । भक्तांची भक्ती सर्वस्वें करीं ॥ ५४ ॥
श्रियेसहित मी श्रीपती । भक्तांची भक्ती सर्वस्वें करीं ॥ ५४ ॥
सिद्धि त्याची सेवा करतात यांत आश्चर्य तें काय सांगावयाचें? मी लक्ष्मीसहवर्तमान लक्ष्मीपतिच भक्तांची सर्वस्वे भक्ति करतों ५४.
'ऐश्वर्याचें मुख्य लक्षण' । अतिशयेंसी संपूर्ण ।
भगवत्पदवी घेणें आपण । अतिसंपन्न ऐश्वर्यें ॥ ५५ ॥
भगवत्पदवी घेणें आपण । अतिसंपन्न ऐश्वर्यें ॥ ५५ ॥
'ऐश्वर्याचे मुख्य लक्षण ' हें की, आपण स्वतः भगवंताची योग्यता संपादन करून भगवद्-ऐश्वर्याने अत्यंत संपन्न होणे ५५.
म्यां हे सांगितली जे बोली । ते निजगुह्यभांडाराची किल्ली ।
येणें उघडूनि स्वानंदखोली । भोगीं आपुली सुखसिद्धी ॥ ५६ ॥
येणें उघडूनि स्वानंदखोली । भोगीं आपुली सुखसिद्धी ॥ ५६ ॥
ही जी गोष्ट मी तुला सांगितली, ती माझ्या गुप्त भांडाराची किल्लीच आहे. ही घेऊन आत्मानंदाची खोली उघड, आणि आपल्या सुखसिद्धीचा उपभोग घे ५६.
चहूं पदांचीं उत्तरें । वाखाणिलीं अतिगंभीरें ।
ऐकोनि उद्धव चमत्कारें । अत्यादरें विस्मित ॥ ५७ ॥
ऐकोनि उद्धव चमत्कारें । अत्यादरें विस्मित ॥ ५७ ॥
श्लोकांतील चार शब्दांच्या अर्थाचे अशा प्रकारें अत्यंत खोल प्रतिपादन केलेले ऐकून उद्धवालाही मोठा चमत्कार वाटला व तो फारच चकित झाला ५७.
धर्मादि चहूं पदांचा अर्थ । अलोलिक सांगे श्रीकृष्णनाथ ।
तरी यमादिकांचा उत्तमार्थ । देवासी प्रत्यक्ष पुसो पां ॥ ५८ ॥
तरी यमादिकांचा उत्तमार्थ । देवासी प्रत्यक्ष पुसो पां ॥ ५८ ॥
'धर्म' आदिकरून चार शब्दांचा अर्थ श्रीकृष्णनाथांनी फारच विलक्षण सांगितला; तसाच आतां यमादिकांचा अर्थही देवालाच प्रत्यक्ष विचारावा ५८,
गुह्यार्थ सांगेल श्रीकृष्ण । यालागीं यमादिकांचे प्रश्न ।
उद्धव पुसताहे आपण । परमार्थ पूर्ण आकळावया ॥ ५९ ॥
उद्धव पुसताहे आपण । परमार्थ पूर्ण आकळावया ॥ ५९ ॥
म्हणजे तो श्रीकृष्णच त्याचा गुप्तार्थ सांगेल; हें मनांत आणूनच परमार्थ पूर्णपणे ध्यानात येण्यासाठी उद्धव आपण होऊनच यमादिकांचे प्रश्न विचारीत आहे ५९.
पांच श्लोक पंचतीस प्रश्न । उद्धवें केलें ज्ञानगहन ।
ज्याचें ऐकतां प्रतिवचन । समाधान जीवशिवां ॥ ३६० ॥
ज्याचें ऐकतां प्रतिवचन । समाधान जीवशिवां ॥ ३६० ॥
पांच श्लोकांमध्ये उद्धवानें गहन ज्ञानाचे पसतीस प्रश्न विचारले आहेत. त्यांची प्रत्युत्तरें ऐकली असतां जीवाचे आणि शिवाचेंही समाधान होईल ३६०.
पहिल्या श्लोकींचे सहा प्रश्न । दुसर्यामाजीं नव जाण ।
तिसरा चौथा आठ आठ पूर्ण । चारी प्रश्न पंचमीं ॥ ६१ ॥
तिसरा चौथा आठ आठ पूर्ण । चारी प्रश्न पंचमीं ॥ ६१ ॥
पहिल्या श्लोकांत सहा प्रश्न आहेत; दुसऱ्यामध्ये नऊ आहेत; तिसऱ्यांत आणि चौथ्यांत आठ आठ आहेत. आणि पांचच्यांत चार प्रश्न आहेत ६१.
उद्धव उवाच-
यमः कतिविधः प्रोक्तो नियमो वाऽरिकर्शन ।
कः शमः को दमः कृष्ण का तितिक्षा धृतिः प्रभो ॥ २८ ॥
यमः कतिविधः प्रोक्तो नियमो वाऽरिकर्शन ।
कः शमः को दमः कृष्ण का तितिक्षा धृतिः प्रभो ॥ २८ ॥
[लोक २८] उद्धवाने विचारले - हे रिपुसूदना ! यम आणि नियम किती प्रकारचे आहेत ? हे श्रीकृष्णा ! शम म्हणजे काय ? दम म्हणजे काय ? हे प्रभो ! तितिक्षा आणि धैर्य, हे काय आहे ? (२८)
अहंरिपुनिर्दळणा श्रीपती । 'यम' 'नियम' प्रकार किती ।
'शम' 'दम' 'कोण म्हणीजेती तितिक्षा' 'धृती' ते कैशी ॥ ६२ ॥
'शम' 'दम' 'कोण म्हणीजेती तितिक्षा' 'धृती' ते कैशी ॥ ६२ ॥
अहंकाररूपी शत्रूचा नाश करणाऱ्या श्रीकृष्णा ! 'यम' व 'नियम' ह्यांचे किती किती प्रकार आहेत? 'शम' आणि 'दम' कशाला म्हणतात ? तसेंच 'तितिक्षा' व 'धृति' ती कशी असते ? ६२.
किं दानं किं तपः शौर्यं किं सत्यमृतमुच्यते ।
कस्त्यागः किं धनं चेष्टं को यज्ञः का च दक्षिणा ॥ २९ ॥
कस्त्यागः किं धनं चेष्टं को यज्ञः का च दक्षिणा ॥ २९ ॥
[ श्लोक २९] दान, तपश्चर्या, शौर्य, सत्य, ऋत त्याग, कल्याणकारी धन, यज्ञ आणि दक्षिणा यांचे स्वरूप काय आहे ? (२९)
कोण 'दान' कोण 'तप' येथ । 'शौर्य' कोण कैसें तें 'सत्य' ।
'ऋत' जें कां म्हणिजेत । तेंही निश्चित सांगावें ॥ ६३ ॥
'ऋत' जें कां म्हणिजेत । तेंही निश्चित सांगावें ॥ ६३ ॥
येथे 'दान' कोणते व 'तप' 'कोणते ?'शौर्य ' ते काय ? 'सत्य' ते कसे असते ! तसेंच 'ऋत' म्हणून ज्याला म्हणतात तेंही यथार्थ रीतीने सांगावें ६३.
कोणता जी 'त्याग' येथें । इष्ट 'धन' कोण पुरुषातें ।
'यज्ञ' कशातें म्हणिजेतें । 'दक्षिणा' तेथें ते कायी ॥ ६४ ॥
'यज्ञ' कशातें म्हणिजेतें । 'दक्षिणा' तेथें ते कायी ॥ ६४ ॥
ह्याचप्रमाणे 'त्याग' तो कोणता? पुरुषाला इष्ट 'धन' तें कोणते ? 'यज्ञ' कशाला म्हणतात ? त्यांत 'दक्षिणा' ते काय ? ६४.
पुंस किंस्विद्बलं श्रीमन् दया लाभश्च केशव ।
का विद्या ह्रीः परा का श्रीः किं सुखं दुःखमेव च ॥ ३० ॥
का विद्या ह्रीः परा का श्रीः किं सुखं दुःखमेव च ॥ ३० ॥
[श्लोक ३०] श्रीमान केशवा ! पुरूषांचे खरे बळ कोणते ? भग आणि लाभ म्हणजे काय ? विद्या, लज्जा, श्रेष्ठ श्री, तसेच सुख व दुःख हे काय आहे ? (३०)
पुरुषासी 'बळाची' कोण शक्ती । 'दया' बोलिजे कोणे स्थितीं ।
'लाभ' तो कोण गा श्रीपती । सांग कृपामूर्ती केशवा ॥ ६५ ॥
'लाभ' तो कोण गा श्रीपती । सांग कृपामूर्ती केशवा ॥ ६५ ॥
पुरुषाला 'बळाची' शक्ति कोणती? कोणत्या स्थितीला 'दया' म्हणतात ? तसेंच हे कृपामूर्ति श्रीकृष्णा ! 'लाभ' कोणता तोही सांगावा ६५.
'विद्या' म्हणावें कशातें । 'लज्जा' कोणे ठायीं वर्ते ।
उत्कृष्ट 'लक्ष्मी' कोण येथें । तेही अनंतें सांगावी ॥ ६६ ॥
उत्कृष्ट 'लक्ष्मी' कोण येथें । तेही अनंतें सांगावी ॥ ६६ ॥
'विद्या' कशाला म्हणावें ? 'लज्जा' कोठे राहाते ? त्याप्रमाणेच येथे उत्कृष्ट 'लक्ष्मी' कोणती! तीही देवांनी सांगावी ६६.
येथील कोण पां कैसें 'सुख' । मज सांगावें कृपापूर्वक ।
सुखाचे सांगाती जें 'दुःख' । त्याचेंही रूपक सांगावें ॥ ६७ ॥
सुखाचे सांगाती जें 'दुःख' । त्याचेंही रूपक सांगावें ॥ ६७ ॥
येथील 'सुख' ते कोणते व कसे? हेही कृपापूर्वक मला सांगावे. तसेंच सुखाच्या बरोबर असणारे जें 'दुःख' त्याचे स्वरूपही कथन करावे ६७.
कः पण्डितः कश्च मूर्खः कः पन्था उत्पथश्च कः ।
कः स्वर्गो नरकः कः स्वित्को बन्धुरुत किं गृहम् ॥ ३१ ॥
कः स्वर्गो नरकः कः स्वित्को बन्धुरुत किं गृहम् ॥ ३१ ॥
[श्लोक ३१] पंडित आणि मूर्ख यांची लक्षणे कोणती ? सन्मार्ग आणि कुमार्ग म्हणजे काय ? स्वर्ग आणि नरक हे काय आहेत ? बंधू कोणाला मानावे ? घर म्हणजे काय ? (३१)
'पण्डिताचें' काय लक्षण । 'मूर्ख' म्हणावया कोण गुण ।
'सुमार्ग' म्हणावया तो कोण । सांगे निरूपण 'उन्मार्गाचें' ॥ ६८ ॥
'सुमार्ग' म्हणावया तो कोण । सांगे निरूपण 'उन्मार्गाचें' ॥ ६८ ॥
'पंडिताचे लक्षण काय? कोणत्या गुणानें 'मूख' म्हणतात ? 'सुमार्ग' म्हणतात तो कोणता ? तसेंच 'दुर्मार्गाचे' ही निरूपण सांगावें ६८.
'स्वर्ग' कशातें बोलिजे । 'नरक' कैसा वोळखिजे ।
सखा 'बंधु' कोण म्हणिजे । 'गृह' माझें तें कोण ॥ ६९ ॥
सखा 'बंधु' कोण म्हणिजे । 'गृह' माझें तें कोण ॥ ६९ ॥
'स्वर्ग' कशाला म्हणतात ? ' नरक' कसा ओळखावा ? सखा 'बंधु' कोणास म्हणावें ? आणि माझे 'घर' ते कोणते? ६९.
क आढ्यः को दरिद्रो वा कृपणः कः क ईश्वरः ।
एतान् प्रश्नान्मम ब्रूहि विपरीतांश्च सत्पते ॥ ३२ ॥
एतान् प्रश्नान्मम ब्रूहि विपरीतांश्च सत्पते ॥ ३२ ॥
[श्लोक ३२] धनवान कोण आणि निर्धन कोण ? कंजूष कोण आहे ? ईश्वर कोणाला म्हणतात ? हे भक्तवत्सल प्रभो ! आपण माझ्या या प्रश्नांची उत्तरे द्या त्याचबरोबर यांच्या विरोधी जे पदार्थ आहेत, त्यांच्याविषयीही सांगा. (३२)
'आढ्य' कैसेनि म्हणिजे । 'दरिद्री' कैसेनि जाणिजे ।
'कृपण' कोणातें बोलिजे । 'ईश्वर' वोळखिजे तो कैसा ॥ ३७० ॥
'कृपण' कोणातें बोलिजे । 'ईश्वर' वोळखिजे तो कैसा ॥ ३७० ॥
आढ्य' म्ह. संपन्न कोणाला म्हणावें? 'दरिद्री' कशावरून ओळखावा ? 'कृपण' कोणाला महणावें ? 'ईश्वर' कसा ओळखावा ? ३७०.
हे माझे प्रश्न जी समस्त । यांचा सांगावा विशदार्थ ।
जो लौकिकाहूनि विपरीत । उपयुक्त परमार्था ॥ ७१ ॥
जो लौकिकाहूनि विपरीत । उपयुक्त परमार्था ॥ ७१ ॥
असे हे माझे प्रश्न आहेत. जो लौकिक अर्थाहून भिन्न आणि परमार्थाला साधनीभूत होईल असा अर्थ स्पष्ट करून सांगावा ७१.
लौकिकाहूनि विपरीतार्थ । त्यातें बोलती गा 'विपरीत' ।
या अवघियांचा मथितार्थ । परमार्थयुक्त प्रश्न सांगा ॥ ७२ ॥
या अवघियांचा मथितार्थ । परमार्थयुक्त प्रश्न सांगा ॥ ७२ ॥
लौकिकाला जो विरुद्ध अर्थ असतो, त्यालाच 'विपरीत' असे म्हणतात. याकरितां त्या साऱ्यांचा मथितार्थ असा ह्या प्रश्नांचा परमार्थपर अर्थ सांगावा ७२.
ज्ञानें सज्ञान संतमूर्ती ॥ त्यांचा स्वामी तूं निश्चितीं ।
यालागीं तूतें गा 'सत्पत्ती' । सज्ञान म्हणती शास्त्रार्थें ॥ ७३ ॥
यालागीं तूतें गा 'सत्पत्ती' । सज्ञान म्हणती शास्त्रार्थें ॥ ७३ ॥
संतमूर्ति ज्ञानाने ज्ञानसंपन्न असतात, पण त्यांचाही खरोखर तूं स्वामी आहेस. म्हणूनच तुला शास्त्रार्थाने ज्ञानसंपन्न लोक 'सत्पत्ति' असे म्हणतात ७३.
माझ्या प्रश्नांची प्रश्नोक्ती । परमार्थप्राप्तीलागीं श्रीपती ।
मज सांगावें यथार्थस्थिती । देवासी विनंती उद्धवें केली ॥ ७४ ॥
मज सांगावें यथार्थस्थिती । देवासी विनंती उद्धवें केली ॥ ७४ ॥
हे श्रीपते ! परमार्थप्राप्तीसाठी मला माझ्या प्रश्नांचे यथार्थरीतीने अर्थ सांगावे. अशी विनंती उद्धवाने श्रीकृष्णाला केली ७४.
ऐकोनि भक्ताची विनवण । कृपा द्रवला नारायण ।
परमार्थरूप त्याचे प्रश्न । स्वयें श्रीकृष्ण सांगेल ॥ ७५ ॥
परमार्थरूप त्याचे प्रश्न । स्वयें श्रीकृष्ण सांगेल ॥ ७५ ॥
ही भक्ताची विनवणी श्रवण करून नारायणाला कृपा उत्पन्न झाली. यास्तव त्याच्या त्या परमार्थपर प्रश्नांचे उत्तर श्रीकृष्ण स्वतः सांगतील ७५.
प्रथम तीं श्लोकीं यम नियम । विशद सांगेल पुरुषोत्तम ।
इतर प्रश्न अतिउत्तम । सांगे मेघश्याम अध्यायांतीं ॥ ७६ ॥
इतर प्रश्न अतिउत्तम । सांगे मेघश्याम अध्यायांतीं ॥ ७६ ॥
प्रथम तीन श्लोकांमध्ये श्रीकृष्ण 'यम' आणि 'नियम'हे विशद करतील आणि बाकीचे जे अत्युत्तम प्रश्न आहेत ते श्रीकृष्ण अध्यायाच्या अखेरपर्यंत सांगतील ७६.
श्रीभगवानुवाच-
अहिंसा सत्यमस्तेयमसङ्गो ह्रीरसञ्चयः ।
आस्तिक्यं ब्रह्मचर्यं च मौनं स्थैर्यं क्षमाभयम् ॥ ३३ ॥
अहिंसा सत्यमस्तेयमसङ्गो ह्रीरसञ्चयः ।
आस्तिक्यं ब्रह्मचर्यं च मौनं स्थैर्यं क्षमाभयम् ॥ ३३ ॥
[श्लोक ३३] श्रीकृष्ण म्हणाले - अहिंसा, सत्य, चोरी न करणे आसक्ती नसणे, लज्जा, असंग्रह, आस्तिकता, ब्रह्मचर्य, मौन, स्थिरता, क्षमा आणि अभय हे 'यम' होत. (३३)
प्रथम श्लोकींचा उभारा । यमाचीं लक्षणें बारा ।
पुशिल्या प्रश्नानुसारा । प्रतिउत्तरा हरि बोले ॥ ७७ ॥
पुशिल्या प्रश्नानुसारा । प्रतिउत्तरा हरि बोले ॥ ७७ ॥
पहिल्या श्लोकामध्ये यमाची बारा लक्षणे हा विषय आहे. विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून श्रीकृष्ण त्याचे उत्तर देत आहेत ७७.
पुढां प्रश्न आहेत फार । यालागीं यमनियमांचें उत्तर ।
आवरूनि संक्षेपाकार । स्वयें श्रीधर सांगत ॥ ७८ ॥
आवरूनि संक्षेपाकार । स्वयें श्रीधर सांगत ॥ ७८ ॥
पुढे प्रश्न पुष्कळ आहेत. म्हणून यमनियमांचे उत्तर स्वतः श्रीकृष्ण संक्षेपानें आंवरून सांगतात ७८.
'अहिंसा' कायावाचामनें । परपीडात्याग करणें ।
'सत्य' तें यथार्थ बोलणें । 'अचौर्य' लक्षणें तीं ऐक ॥ ७९ ॥
'सत्य' तें यथार्थ बोलणें । 'अचौर्य' लक्षणें तीं ऐक ॥ ७९ ॥
कायावाचामनेंकरून परपीडा न करणे ह्याचे नांव 'अहिंसा'. आणि खरे असेल तसेंच बोलणे याचें नांव 'सत्य'. आतां अचौर्याची लक्षणेही ऐक ७९.
हातें चोरी नाहीं करणें । परी परद्रव्याकारणें ।
मनीं अभिलाष नाहीं धरणें । 'अस्तेय' लक्षण त्या नांव ॥ ३८० ॥
मनीं अभिलाष नाहीं धरणें । 'अस्तेय' लक्षण त्या नांव ॥ ३८० ॥
हातानें चोरी करावयाची नाही इतकेच नव्हे, तर दुसऱ्याच्या द्रव्याचा मनातसुद्धा अभिलाष न धरणे हेच अस्तेय म्ह. चोरी न करण्याचे लक्षण होय ३८०.
असतां देहगेहसंगती । ज्याचे पोटीं नाहीं आसक्ती ।
जेवीं यात्रेमाजीं लोक येती । परी संगासक्ती त्यां नाहीं ॥ ८१ ॥
जेवीं यात्रेमाजीं लोक येती । परी संगासक्ती त्यां नाहीं ॥ ८१ ॥
लोक यात्रेला जातात तेव्हा तेथे जमलेल्या लोकांची संगासक्ति जशी असत नाही, त्याप्रमाणे घरदार असूनही ज्याच्या मनांत त्यांची आसक्ति नसते ८१.
स्फटिक ठेविला ज्या रंगावरी । त्यासारिखा दिसे बाहेरी ।
आपण निर्विकार अंतरीं । तेवीं जो शरीरीं 'असंगता' ते ॥ ८२ ॥
आपण निर्विकार अंतरीं । तेवीं जो शरीरीं 'असंगता' ते ॥ ८२ ॥
स्फटिक ज्या रंगावर ठेवावा, त्यासारखाच तोही बाहेरून दिसू लागतो; पण अंतरांतून तो निर्विकारच असतो. त्याप्रमाणेच जो शरीरांत राहातो, त्याला 'असंगता' म्हणतात ८२.
निंद्य कर्माकारणें । पोटांतूनि कंटाळणें ।
लौकिकीं निंद्य कर्मा लाजणें । 'ह्रीं' म्हणणें या नांव ॥ ८३ ॥
लौकिकीं निंद्य कर्मा लाजणें । 'ह्रीं' म्हणणें या नांव ॥ ८३ ॥
निंद्यकर्माचा मनापासून कंटाळा असणे, आणि लौकिकामध्ये निंद्यकर्माला लाजणे, यालाच ' ऱ्ही ' म्ह. लज्जा म्हणतात ८३.
इहलोकीं संग्रहो करूं नेणें । जाणे दैवाधीन देहाचे जिणें ।
स्वर्गसुख भोगाकारणें । नाहीं संग्रहणें पुण्यातें ॥ ८४ ॥
स्वर्गसुख भोगाकारणें । नाहीं संग्रहणें पुण्यातें ॥ ८४ ॥
इहलोकांत संग्रह म्हणून करावयाचा ज्याला माहीतच नसते, कारण अनाच्छादन हे केवळ प्रारब्धाधीन आहे असें तो जाणतो, तसेंच स्वर्गातील सुखोपभोगाकरितां जो पुण्याचाही संग्रह करीत नाही ८४ ;
पुण्यें स्वर्गभोगप्राप्ती । पुण्यक्षयें होय पुनरावृत्ती ।
जेणें क्षयो पावे पुण्यसंपत्ती । तें न संचिती निजभक्त ॥ ८५ ॥
जेणें क्षयो पावे पुण्यसंपत्ती । तें न संचिती निजभक्त ॥ ८५ ॥
कारण पुण्याने स्वर्गभोग प्राप्त होतात; पण त्याच पुण्याचा क्षय झाला की, पुन्हा जन्म घ्यावा लागतो; म्हणून जेणेकरून पुण्यसंपत्तीचा क्षय होईल अशा कोणत्याही वस्तूचा माझे भक्त संग्रह करीत नाहीत ८५.
या नांव गा 'असंचयो' । ऐक 'आस्तिक्याचा' निर्वाहो ।
सर्वत्र माझा ब्रह्मभावो । कोठेंही अभावो घेऊं नेणें ॥ ८६ ॥
सर्वत्र माझा ब्रह्मभावो । कोठेंही अभावो घेऊं नेणें ॥ ८६ ॥
याचेच नांव 'असंचय' म्ह. संग्रह न करणे होय. आतां 'आस्तिक्याचे' लक्षण म्हणजे सर्वत्र सर्व ठिकाणी माझें ब्रह्मस्वरूपच व्यापलेले आहे असे पाहाणें ; ब्रह्माचा अभाव तो कुठेच पाहात नसतो ८६.
'ब्रह्मचर्य' ऐसें येथ । जैसे आश्रमप्रयुक्त ।
बोलिलें शास्त्रीं यथोचित । तेंचि निश्चित करावें ॥ ८७ ॥
बोलिलें शास्त्रीं यथोचित । तेंचि निश्चित करावें ॥ ८७ ॥
आतां येथे 'ब्रह्मचर्य' तें असें की, आश्रमानुसार शास्त्रांत जो आचार सांगितलेला आहे, तोच निश्चयाने आचरावा ८७.
'मौनिं' न बोलावें इतुकें जाण । मिथ्यालाप असंभाषण ।
नित्य करावें वेदपठण । गायत्रीस्मरण कां हरिनाम ॥ ८८ ॥
नित्य करावें वेदपठण । गायत्रीस्मरण कां हरिनाम ॥ ८८ ॥
खोटें आणि अनुचित भाषण न करणे हेंच 'मौन' होय. नित्य वेदपठन, गायत्रीस्मरण किंवा भगवंताचे नामस्मरण करीत असावें (हेही मौनच होय) ८८.
स्थिरवृत्ति आत्मारामीं । कां असावी निजधर्मीं ।
भावार्थें संतसमागमीं । 'स्थिरता' उपक्रमीं या नांव ॥ ८९ ॥
भावार्थें संतसमागमीं । 'स्थिरता' उपक्रमीं या नांव ॥ ८९ ॥
वृत्ति आत्मस्वरूपामध्ये, स्वधर्मामध्ये किंवा साधूच्या संगतीत स्थिर असणे ह्याचेच नांव 'स्थिरता' होय ८९.
स्वदेह दंडिलें कां वंदिलें । परी क्षमा सम दोंही काळें ।
देहाचा भोग तो दैवमेळें । येणें विवेकमेळें क्षमावंत ॥ ३९० ॥
देहाचा भोग तो दैवमेळें । येणें विवेकमेळें क्षमावंत ॥ ३९० ॥
आपल्या देहाला कोणी वंदन करो किंवा मारो, तरी दोन्ही वेळां क्षमा सारखीच. देहाचा भोग हा दैवावर अवलंबून आहे. असा विचार करून तो नेहमीं क्षमाशीलच असतो ३९०.
या नांव 'क्षमा' म्हणिजे । अभय तें ऐसें जाणिजे ।
जें जें पारिखें देखिजे । तें तें होइजे आपणचि ॥ ९१ ॥
जें जें पारिखें देखिजे । तें तें होइजे आपणचि ॥ ९१ ॥
ह्याचंच नांव 'क्षमा'. आतां अभय तें असें ओळखावें कीं, पर म्हणून जें जें दिसतें तें तें आपणच होऊन राहावें ९१.
आत्मा एक पंचभूतें एक । दुजें पाहतां नाहीं देख ।
निमालें भयाचें महादुःख । 'अभय' निःशेख या नांव ॥ ९२ ॥
निमालें भयाचें महादुःख । 'अभय' निःशेख या नांव ॥ ९२ ॥
आत्मा एक, आणि पंचमहाभूतेही एक. पाहावयास गेले तर दुसरे काहीच नाही. हें प्रत्ययाला आले की भयाचे महादुःख संपलें. ह्याचेच नांव निखालस 'अभय ' ९२.
निमाल्या दुजयाच्या गोठी । वोखदासी भय न मिळे सृष्टीं ।
अभयाची स्वानंदपुष्टी । निजदृष्टीं ठसावें ॥ ९३ ॥
अभयाची स्वानंदपुष्टी । निजदृष्टीं ठसावें ॥ ९३ ॥
दुजेपणाच्या गोष्टीच नाहीशा झाल्या, म्हणजे जगामध्ये औषधालासुद्धा भय मिळावयाचे नाही. ह्याप्रमाणे अभयाच्या आनंदाची पुष्टि आत्मदृष्टीने ठसून जाते ९३.
या नांव गा बाराही 'यम' । उद्धवा सांगितले सवर्म ।
आतां जयाचें नाम 'नेम' । तेंही सुगम अवधारीं ॥ ९४ ॥
आतां जयाचें नाम 'नेम' । तेंही सुगम अवधारीं ॥ ९४ ॥
बारा 'यम' तें याचंच नांव. उद्धवा ! त्यांतील रहस्य तुला सांगितलें. आतां ' नेम' असें ज्याला म्हणतात त्याचेही लक्षण सुलभ रीतीने सांगतों ऐक ९४.
शौचं जपस्तपो होमः श्रद्धाऽऽतिथ्यं मदर्चनम् ।
तीर्थाटनं परार्थेहा तुष्टिराचार्यसेवनम् ॥ ३४ ॥
तीर्थाटनं परार्थेहा तुष्टिराचार्यसेवनम् ॥ ३४ ॥
[श्लोक ३४] अंतःशुद्धी बहिःशुद्धी, जप, तप, हवन, श्रद्धा, अतिथिसेवा, माझे पूजन, तीर्थयात्रा, परोपकार, संतोष आणि गुरूसेवा, हे 'नियम' (३४)
शौचाची ऐशी परी । अंतरीं शुचि विवेकेंकरीं ।
बाह्य तें वेदाज्ञेवरी । 'शौच' करीं मृज्जलें ॥ ९५ ॥
बाह्य तें वेदाज्ञेवरी । 'शौच' करीं मृज्जलें ॥ ९५ ॥
'शौचाचा' म्ह. स्वच्छतेचा प्रकार असा आहे. विचाराने अंत:करणाची शुद्धि करावी आणि बाह्य 'शौच' म्ह. शुद्धि वेदाज्ञेप्रमाणे मृत्तिका व जल यांनी करावी ९५.
परिसें 'जपाचा' विचार । ज्यासी जैसा अधिकार ।
तैसा जपावा नाममंत्र । कां स्वतंत्र गुरुनाम ॥ ९६ ॥
तैसा जपावा नाममंत्र । कां स्वतंत्र गुरुनाम ॥ ९६ ॥
आतां 'जपाचा' विचार ऐक, ज्याला जसा अधिकार असेल त्याप्रमाणे त्याने मंत्राचा जप करावा, किंवा स्वतंत्र गुरूचे नाम किंवा गुरूने दिलेला नाममंत्र जपावा ९६.
ब्राह्मणाचा जप वेदोच्चार । संन्यासी जपे ओंकार ।
द्विजन्म्यासी आगममंत्र । कां नाममंत्र सर्वांसी ॥ ९७ ॥
द्विजन्म्यासी आगममंत्र । कां नाममंत्र सर्वांसी ॥ ९७ ॥
'वेदघोष' करणे हा ब्राह्मणाचा जप होय व 'ओंकार' हा संन्याशाचा जप होय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ह्या तीन जातींना 'द्विजन्मे' म्हणतात. त्यांनी आगमोक्त मंत्राचा जप करावा. नाममंत्र हा तर सर्वांनाच लागू आहे ९७.
तपाचा जो मुख्य प्रकार । जेणें शुद्ध होय अभ्यंतर ।
तो स्वधर्मीं गा सादर । अत्यादर करावा ॥ ९८ ॥
तो स्वधर्मीं गा सादर । अत्यादर करावा ॥ ९८ ॥
आतां ज्याच्या योगाने अंत:करणाची शुद्धि होते, तो 'तपाचा' मुख्य प्रकार होय. ज्याने त्याने आपआपल्या धर्माचे प्रेमादराने आचरण करावें ९८.
शरीरशोषणा नांव तप । हा मूर्खाचा खटाटोप ।
हृदयीं श्रीहरि चिंतणें सद्रूप । परम 'तप' या नांव ॥ ९९ ॥
हृदयीं श्रीहरि चिंतणें सद्रूप । परम 'तप' या नांव ॥ ९९ ॥
शरीरशोषणाला 'तप' म्हणणे हा मूर्खाचा खटाटोप होय. हृदयामध्ये सत्स्वरूप श्रीहरीचें चिंतन करणे च सर्वात 'श्रेष्ठ तप' होय ९९.
ऐक होमाचा विचार । देवाचे मुख वैश्वानर ।
पंचमहायज्ञ अग्निहोत्र । 'होम' साचार या नांव ॥ ४०० ॥
पंचमहायज्ञ अग्निहोत्र । 'होम' साचार या नांव ॥ ४०० ॥
आतां होमाचा विचार ऐक. अग्नि हे देवाचे मुख आहे. यासाठी पंचमहायज्ञ, अग्निहोत्र इत्यादि करणे यास 'होम' असे म्हणतात ४००.
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...