मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २२ ओव्या ७०१ ते ७३०

    उद्धव उवाच-

    यथैवमनुबुध्येयं वद नो वदतां वर ।
    सुधुःसहमिमं मन्ये आत्मन्यसदतिक्रमम् ॥ ५९ ॥
    विदषामपि विश्वात्मन् प्रकृतिर्हि बलीयसी ।
    ऋते त्वद्धर्मनिरताशान्तांस्ते चरणालयान् ॥ ६० ॥
    इति श्रीमद्भा्गवते महापुराणे पारमहंस्यां
    संहितायां एकादशस्कन्धे द्वाविंशोऽध्यायः ॥ २२ ॥
    [ श्लोक ५९-६०] उद्धव म्हणाला भगवन ! हे ज्ञान देण्यात आपणच कुशल आहात दुर्जनांची अशी कृत्ये मला मुळीच सहन होत नाहीत म्हणून मला अशा रीतीने हे सांगा की, जेणेकरून मी हे आचरणात आणू शकेन. (५९)
    हे विश्वात्मन ! जे आपल्या चरणांना शरण आलेले असून भागवत धर्माच्या आचरणात कायम मग्न असतात, अशा शांतचित्त लोकांशिवाय अन्य कोणाही विद्वानांनासुद्धा स्वभाव बदलता येत नाही. (६०)


    जे सांगों जाणती वेदशास्त्रार्था । ते वक्ते म्हणिपती तत्त्वतां ।
    त्या वक्त्यांमाजीं तुझी श्रेष्ठता । मुख्य वेदांचा वक्ता तूं होसी ॥ १ ॥
    जे लोक वेदशास्त्राचा अर्थ पूर्णपणे जाणून घेऊन सांगू शकतात, त्यांनाच खरोखर वक्ते असें म्हणतात. त्या वक्त्यांमध्ये तूं श्रेष्ठ आहेस. कारण वेदांचा मुख्य वक्ता असा तूंच आहेस १.


    शास्त्रें लाहोनि तुझी युक्ती । तुझी तुज प्रतिपादिती ।
    ते परोक्षवादें थोंटावती । श्रुति 'नेति नेति' परतल्या ॥ २ ॥
    शास्त्रे ही तुझीच युक्ति घेऊन तुझेच वर्णन करतात, पण परोक्षवादाने तीही कुंठित होतात. वेद तर ते नव्हे, ते नव्हे ' असें म्हणून मागे सरतात २.


    त्या तुझे मुखींच्या ज्ञानोक्ती । कृपेनें ऐकोनि कृपामूर्ती ।
    श्रवणाचें भाग्य वानूं किती । जे ऐकती ते धन्य ॥ ३ ॥
    त्या तुझ्याच तोंडच्या ज्ञानाच्या उक्ति, हे कृपामूर्ते ! तुझ्याच कृपेनें ऐकावयाला मिळतात, तेव्हां या माझ्या कानाचे भाग्य काय वर्णन करावें? जे ऐकतात ते धन्य होत ३.


    ऐसऐशिया अतियुक्तीं । उद्धवें प्रार्थिला श्रीपती ।
    हात जोडूनि परम प्रीतीं । म्हणे विनंती अवधारीं ॥ ४ ॥
    अशा प्रकारच्या अनेक युक्तींनी उद्धवाने  श्रीकृष्णाची प्रार्थना केली आणि अत्यंत प्रेमाने हात जोडून म्हणाला की, माझी विनंति ऐक ४.


    स्वामी बोलती अतिअगाध । हें बोलणें परम शुद्ध ।
    माझे बुद्धीसी नव्हे बोध । पराचे अपराध कोण साहे ॥ ५ ॥
    देवांनी भाषण केले ते फार खोल आहे. हें भाषण अत्यंत पवित्र आहे. पण माझ्या अंत:करणांत त्याचा बोध होत नाही. कारण, दुसऱ्याचे अपराध सहन करणार कोण? ५.


    सोसावे पराचे अपराध । तेंही कठिणत्वें अतिविरुद्ध ।
    हा दुःसह महाबोध । कैसेनी द्वंद्व सहावे ॥ ६ ॥
    दुसऱ्याचे अपराध सहन करावयाचें तें कर्म महाकठीण असून मानवी स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे. तेव्हा हा महान् उपदेश आचरणांत आणणे अत्यंत कठीण आहे. कारण द्वंद्व कोणत्या उपायाने सहन करितां येईल ? ६.


    उत्तमें केलिया अपराधा । कोटींमाजीं साहे एकादा ।
    परी नीचाची विरुद्ध बाधा । कोणीही कदा न साहे ॥ ७ ॥
    एकाचा मोठ्या मनुष्याने कधी काळी अपराध केला, तर कोट्यवधि मनुष्यातून एकादा तरी कोणी तो अपराध सहन करील. परंतु एकाचा हलकट मनुष्याने केलेला छळ कोणीही कधीं सहन करणार नाही ७.


    ज्याचें न व्हावें दर्शन । ज्यासी करूं नये नमन ।
    त्याचे मस्तकीं वाजतां चरण । साहेल कोण गोविंदा ॥ ८ ॥
    ज्याचें कीं तोंडसुद्धा पाहूं नये, ज्याला कधी नमस्कार करणेही उचित नव्हे, त्याने जर डोक्यावर लाथा मारल्या, तर श्रीकृष्णा! त्या कोण बरें सहन करील? ८.


    ज्याचा निःशेष जाय प्राण । तोचि साहे हें कठिण ।
    जो होय सचेतन । त्यासी सर्वथा जाण न साहवे ॥ ९ ॥
    ज्याच्या शरीरातून प्राण पूर्णपणे निघून गेलेला असेल तोच हा असा अपमान सहन करील. परंतु जो जिवंत आहे त्याला हे कधीच सहन व्हावयाचे नाही ९.


    इतरांची कायसी कथा । सज्ञान जे कां तत्त्वतां ।
    तेही अतिक्रमू न साहती अल्पतां । मा अपमानता कोण साहे ॥ ७१० ॥
    इतरांची गोष्ट कशाला? परंतु खरोखर जे ज्ञानी असतात ते देखील स्वतांची आज्ञा कोणी थोडीशी मोडली तरी तेही सहन करीत नाहीत, मग अपमान सहन करणार कोण ? १०.


    क्रोध जाहला कपिलामहामुनीसी । तेणें भस्म केलें सगरांसी ।
    नारदें कुबेरपुत्रांसी । वृक्षत्वासी आणिलें ॥ ११ ॥
    कपिल महामुनीलाही क्रोध आला होता, म्हणून त्याने सगरांना शाप देऊन त्यांचे भस्म करून सोडले. नारदांनी कुबेराच्या मुलाला शापून वृक्ष करून सोडले ११.


    दुर्वासाची सांगतां गोठी । त्याची कथा आहे मोठी ।
    कोप आला शृंगीचे पोटीं । मेल्या सर्पासाठीं शापिलें ॥ १२ ॥
    दुर्वासाची गोष्ट सांगावयाला गेले तर त्याची ती हकीकत कितीतरी मोठी आहे. शृंगी ऋषीच्या अंत:करणांत कोप आला आणि पित्याच्या गळ्यात मृतसर्प घालणान्या परीक्षितीला त्याने शाप दिला १२.


    मुख्यत्वें शांति सनकादिकांसी । द्वारीं आडकाठी केली त्यांसी ।
    वैकुंठीं क्षोभूनि आवेशीं । जयविजयांसी शापिलें ॥ १३ ॥
    सनकादिकांच्या ठिकाणी मुख्यतः शांति असावयाची. पण तेही वैकुंठास गेले असता त्यांस आंत जाण्यास जयविजयांनी आडकाठी केली, म्हणून रागाच्या भरात त्यांनी जयविजयांना शाप दिला १३.


    सज्ञानाची ऐशी स्थिती । मा इतरांची कोण गणती ।
    परापराधसहनशांती । दुर्लभ त्रिजगतीं गोविंदा ॥ १४ ॥
    ज्ञानसंपन्न लोकांची ही स्थिति, मग त्यांच्यापुढे इतरांचा पाद काय ? गोविंदा ! दुसऱ्याचे अपराध सहन करण्याइतकी शांति त्रिभुवनांतही दुर्लभ आहे १४.


    प्रकृति निजगुणीं सबळ । ते अल्पें क्षोभवीं तत्काळ ।
    साधु सज्जन केवळ । करी विकळ अशांती ॥ १५ ॥
    प्रकृति ही आपल्या गुणांनी प्रबळ झालेली आहे. ती थोड्याशा कारणाने देखील गुणांना तत्काळ धुन्ध करिते. निखालस साधु व सज्जन असतात, त्यांनाही हा क्रोध विकल करून सोडतो १५, 


    ज्यासी तुझी पूर्ण भक्ति घडे । ज्यासी तुझी पूर्ण कृपा जोडे ।
    जो तुझे चरणीं अखंड जडे हे शांती ॥ १६ ॥
    ज्याला तुझीच परिपूर्ण भक्ति घडते, ज्याला तुझ्याच पूर्ण कृपेचा लाभ होतो, तुझ्या चरणाच्या ठिकाणी जो अखंड लीन  होतो, त्यालाच असली शांति प्राप्त होते १६.


    तूं विश्वात्मा त्रिजगतीं । चोरी न चले तुजप्रती ।
    मज हीं द्वंद्वें न साहवती । तूंही श्रीपती जाणसी ॥ १७ ॥
    तूं तर त्रिभुवनामध्ये विश्वात्मा आहेस. तुझ्यापुढे काही चोरी चालावयाची नाही. मी आपले खरेच सांगतों की, हा दुजाभाव किंवा द्वंद्वे  मला सहन करता येणार नाहीत. श्रीकृष्णा ! हे तूही  जाणतोसच १७.


    परम पावन निजशांती । अतिनिंद्य ते अशांती ।
    ऐसें व्याख्यान जे ज्ञाते करिती । तेही न साहती द्वंद्वांतें ॥ १८ ॥
    शांति ही अत्यंत पवित्र आहे, क्रोध हा अत्यंत निंद्य आहे, असे प्रतिपादन शहाणे लोक करीत असतात पण त्यांनासुद्धा द्वंद्व खपत नाहींत १८.


    द्वंद्वें दुःसह सर्वार्थीं । तेथें माझा पाड किती ।
    एवं द्वंद्वसहिष्णुतेची युक्ती । मज कृपामूर्ती सांगावी ॥ १९ ॥
    ही सर्वस्वी दुःसहच आहेत. तेथे माझी ती कथा काय ? याकरितां हे कृपामूर्ते ! द्वद्वे सहन करता येण्याचा उपाय मला सांगावा १९.


    सकल साधनें वश्य होती । परी हे सहिष्णुता न ये चित्तीं ।
    ते मी लाभें निजशांती । ऐशी कृपा निश्चितीं करावी ॥ ७२० ॥
    दुसरी कोणतीही साधनें असली तरी ती साध्य करावयास येतील, पण ही सहिष्णुता मात्र मनांत भरत नाही. याकरितां तशा प्रकारचीच शांति मला प्राप्त होईल अशी कृपा खरोखर करावी २०. 


    मी शांतीचें लाभें कल्याण । ऐशी कृपा करावी परिपूर्ण ।
    म्हणोनि धरिले श्रीचरण । उद्धवें आपण निजभावें ॥ २१ ॥
    मला शांतीच्या योगानें प्राप्त होणाऱ्या कल्याणाचा लाभ होईल अशी कृपा पूर्णपणे करावी. असे म्हणून उद्धवाने स्वतः भक्तिभावाने श्रीकृष्णाचे चरण धरिले २१.


    ऐकोनि उद्धवाची विनंती । संतोषला कृपामूर्ती ।
    जेवीं चातकाचिया तृषार्ती । गर्जोनि त्रिजगती निववी मेघ ॥ २२ ॥
    ही उद्ध्वाची विनंति ऐकून कृपामूर्ति श्रीकृष्णाला मोठा संतोष झाला, आणि चातकाच्या तृषेसाठी मेघ  जशी गर्जना करून त्रिभुवनाला पर्जन्यवृष्टीने तृप्त करितो २२, 


    तेवीं भक्तवचनासरिसा । उल्हासला कृष्ण कैसा ।
    उद्धवाचिया निजमानसा । शांतीचा ठसा घालील ॥ २३ ॥
    त्याप्रमाणे भक्ताची  विनंती ऐकल्याबरोबर आनंदित झालेला श्रीकृष्ण  उद्धवाच्या अंत:करणावर शांतीचा ठसा कसा उमटवील २३.


    उद्धवप्रश्नाचें प्रत्युत्तर । उदार सुंदर गुणगंभीर ।
    उघडोनि शांतीचें भांडार । स्वयें शार्ङ्‌गधर सांगेल ॥ २४ ॥
    उदार, सुंदर व गुणगंभीर असा शार्ङ्गधर आतां शांतीचे भांडार खुले करून स्वतः उद्धवाच्या प्रश्नाचे उत्तर देईल २४.


    नवल सांगती ते ठेव । युक्तिचातुर्यवैभव ।
    निजशांतीस पडे खेंव । ऐसें अपूर्व सांगेल ॥ २५ ॥
    श्रीकृष्णाची सांगण्याची ती पद्धति आश्चर्यकारक असेल. युक्ति व चातुर्य यांचे जणूं काय ते वैभवच. जेणेकरून शांतीला मिठीच पडेल अशी अपूर्व युक्ति तो सांगेल २५.


    श्रीकृष्णमुखींच्या ज्ञानोक्ती । ऐकतां स्वयंभ प्रकटॆ शांती ।
    ते ऐकावया उद्धव चित्तीं । जाहला निश्चितीं सावध ॥ २६ ॥
    श्रीकृष्णाच्या मुखांतील ज्ञानपूर्ण शब्द ऐकून शांति ही स्वत:च मूर्तिमंत प्रगट  होते. तेव्हां असलं भाषण ऐकावयाला उद्धवही खरोखर मनामध्ये सावध होऊन बसला २६.


    जेवीं गजग्रहणाविखीं पंचानन । साटोप धरी आपण ।
    तेवीं शांति साधावया जाण । सावधान उद्धव ॥ २७ ॥
    ज्याप्रमाणे हत्तीला धरण्याविषयी सिंह आपण  होऊन टपून बसतो, त्याप्रमाणे शांतीचा लाभ घेण्यासाठी उद्धवही सावध होऊन बसला २७.


    जळीं तळपतांचि मासा । कवडा झेलूनि ने आकाशा ।
    तेवीं शांतीचिया आमिषा । उद्धव तैसा तळपत ॥ २८ ॥
    पाण्यामध्ये मासा चकाकला, की बहिरी ससाणा त्याला आकाशांत नेतो, त्याप्रमाणे शांतीच्या आमिषाने उद्धवही तसाच टपून राहिला २८.


    तें भिक्षुगीतनिरूपण । पुढिले अध्यायीं श्रीकृष्ण ।
    निजशांति बाणे संपूर्ण । तेंचि लक्षण सांगेल ॥ २९ ॥
    तेच 'भिक्षुगीता'चे निरूपण श्रीकृष्ण पुढल्या अध्यायामध्ये करील, आणि ज्याच्या योगानें अंतःकरणांत परिपूर्ण शांति बिंबते तेंच लक्षण सांगेल २९.


    ज्यांसी परमार्थाची चाड । तिंहीं सांडूनि साधनकवाड ।
    शांतिसाधनीं श्रद्धा वाड । अतिदृढ राखावी ॥ ७३० ॥
    ज्यांना परमार्थांची इच्छा असेल, त्यांनी इतर साधनांची द्वारे सोडून देऊन या शांतिसाधनावरच दृढतर मोठी श्रद्धा ठेवावी ७३०.


    श्रीकृष्ण सांगेल शांति पूर्ण । उद्धव तया अर्थीं सावधान ।
    एका विनवी जनार्दन । श्रोतां अवधान मज द्यावें ॥ ७३१ ॥
    आतां श्रीकृष्ण शांतीचे सविस्तर विवेचन करील, म्हणून त्यासाठी उद्धवही लक्ष लावून बसेल. याकरिता जनार्दनरूपी एकनाथही श्रोत्यांना विनंती करतात की, आपणही मजकडे लक्ष द्यावें ७३१.


    इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे
    श्रीकृष्णोद्धवसंवादे एकाकारटीकायां द्वाविंशोऽध्यायः ॥ २२ ॥
    ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ ६० ॥ ओव्या ॥ ७३० ॥


    बाविसावा अध्याय समाप्त 

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...