मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २१ ओव्या ३०१ ते ४००
तेथ कैंचें स्वर्गसुख । अविधि-साधनें महामूर्ख ।
पावले गा अघोर नरक । सकामें देख नाडले ॥ १ ॥
त्यांना स्वर्गसुख कशाचें? अविधीनें साधन केल्यामुळे ते महामूर्ख अघोर नरकाला मात्र जातात. अशा प्रकारें सकाम लोक सफाई बुडतात १.
यथेष्ट करावया मांसभक्षण । स्वेच्छा जें कां पशुहनन ।
त्यांसी वेदें केलें निर्बंधन । पशुहनन यज्ञार्थ ॥ २ ॥
त्यांसी वेदें केलें निर्बंधन । पशुहनन यज्ञार्थ ॥ २ ॥
यथेच्छ मांसभक्षण करण्याकरितां स्वेच्छेनेच जें पशु मारणे, त्याला आळा घालण्यासाठी वेदानें केवळ यज्ञाकरितांच पशूचे हनन करावे असा निर्बंध लावून दिला आहे २.
तेथही घातली जाण । देश काळ आणि वर्तमान ।
मंत्र तंत्र विधि विधान । धन संपूर्ण अतिशुद्ध ॥ ३ ॥
मंत्र तंत्र विधि विधान । धन संपूर्ण अतिशुद्ध ॥ ३ ॥
त्यांतही देश, काल, वर्तमान, मंत्र, तंत्र, विधि, विधान आणि सारे द्रव्य ही शुद्ध असावीत असाही निर्बंध घातलेला आहे ३.
शक्त सज्ञान धनवंत । ऐसा कर्ता पाहिजे थेथ ।
मुष्टिघातें करावया पशुघात । पडे प्रायश्चित्त 'मे' म्हणतां ॥ ४ ॥
मुष्टिघातें करावया पशुघात । पडे प्रायश्चित्त 'मे' म्हणतां ॥ ४ ॥
आणखी कर्ता असावा तोसुद्धा सशक्त, ज्ञानसंपन्न व श्रीमान् असा पाहिजे. कारण मुठीच्या तडाक्याने पशु मारतांना त्याने जर 'मे मे' असा शब्द केला तर प्रायश्चित्त घ्यावे लागते ४.
ऐशी वेदाज्ञा नाना अवघड । घातलीं प्रायश्चित्तें अतिगूढ ।
तरी सकाम जे महामूढ । ते धांवती दृढ पशुहनन ॥ ५ ॥
तरी सकाम जे महामूढ । ते धांवती दृढ पशुहनन ॥ ५ ॥
अशी वेदाची आज्ञा मोठी बिकट आहे. तींत मोठमोठी अवघड प्रायश्चित्तें सांगितली आहेत, तरी महामूर्ख सकाम लोक पशु मारावयास धावतच असतात! ५.
ऐसें झाल्या पशुहनन । विभाग येईल कवळ प्रमाण ।
तेंचि करावें भक्षण । दांतांसी जाण न लागतां ॥ ६ ॥
तेंचि करावें भक्षण । दांतांसी जाण न लागतां ॥ ६ ॥
अशा रीतीने पशु मारल्यानंतर प्रमाणाने जेवढा वाटा येईल तेवढाच भक्षण करावा; पण तोसुद्धा दांताला न लागू देतां खाल्ला पाहिजे ६.
विभाग भक्षितां आपण । जो करी रसस्वादन ।
त्यासीही प्रायश्चित्र जाण । हेंही निर्बंधन वेदें केलें ॥ ७ ॥
त्यासीही प्रायश्चित्र जाण । हेंही निर्बंधन वेदें केलें ॥ ७ ॥
असा आपला वाटा खातांना जो कोणी त्याची चव घेईल, त्यानेही प्रायश्चित्त घेतले पाहिजे, असाही वेदानें निर्बध घातला आहे ७.
करावें मांसभक्षण । हे वेदाज्ञा नाहीं जाण ।
त्याचें करावया निराकरण । लाविलें विधान यज्ञाचें ॥ ८ ॥
त्याचें करावया निराकरण । लाविलें विधान यज्ञाचें ॥ ८ ॥
सारांश, मांसभक्षण करावे अशी वेदाची आज्ञा नाही; तर मांसभक्षणाची निवृत्ति करण्यासाठीच यज्ञाचे विधान लावून दिले आहे असें तूं समज ८.
स्वेच्छा पशु न मारावया जाण । यज्ञीं नेमिलें पशुहनन ।
न करावया मांसभक्षण । नेमिला प्रमाण यज्ञभाग ॥ ९ ॥
न करावया मांसभक्षण । नेमिला प्रमाण यज्ञभाग ॥ ९ ॥
आपल्याच इच्छेने पशु मारूं नये, म्हणून यज्ञामध्ये पशु मारण्याचा नियम करून दिला आहे; आणि मांसभक्षण करूं नये म्हणूनच यज्ञांतील भागाला प्रमाण ठेवले आहे ९.
हेंही वेदाचें बोलणें । मूर्खप्रलोभाकारणें ।
येर्ह वीं पशुहिंसा न करणें । मांस न भक्षणें हें वेदगुह्य ॥ ३१० ॥
येर्ह वीं पशुहिंसा न करणें । मांस न भक्षणें हें वेदगुह्य ॥ ३१० ॥
पण हेसुद्धा वेदाचे सांगणे मूर्खाच्या लोभिष्टपणाकरितांच आहे; बाकी पशुहिंसाही करूं नये व मांसभक्षणही करूं नये, हेच वेदाचे खरें गुह्य आहे ३१०.
हिंसाविहारा ह्यालब्धैः पशुभिः स्वसुखेच्छया ।
यजन्ते देवता यज्ञैः पितृभूतपतीन् खलाः ॥ ३० ॥
यजन्ते देवता यज्ञैः पितृभूतपतीन् खलाः ॥ ३० ॥
[श्लोक ३०] ते माझे मत लक्षात न घेऊन, विषयलोलुप दुष्ट लोक हिंसेच्या खेळात पशूंना मारतात आणि त्यांच्या योगाने देव, पितर आणि भूतपतींना उद्देशून यज्ञ करतात. (३०)
न मानें वेदविधानासी । पशुहननीं क्रीडा ज्यांसी ।
अविधी मारूनि पशूंसी । मिरविती श्लाघेसी यज्ञिकत्वें ॥ ११ ॥
अविधी मारूनि पशूंसी । मिरविती श्लाघेसी यज्ञिकत्वें ॥ ११ ॥
वेदोक्त विधीला न जुमानतां पशुहत्येचा जे खेळ खेळतात, ते अविधीनें पशुवध करून याज्ञिकपणाची आढ्यता मिरवितात! ११.
अविधीं करूनि जीवहनन । तेणें पशूनें करिती यज्ञ ।
पितृदेवभूतगण । करिती यजन सुखेच्छा ॥ १२ ॥
पितृदेवभूतगण । करिती यजन सुखेच्छा ॥ १२ ॥
अविधीने जीव घेऊन त्या पशूनें यज्ञ करतात; आणि खुशाल पितृ-देव-भूतगण ह्यांना हविर्भाग देतात १२.
बाबडें बीज पेरिल्या शेतीं । पिकास नाडले निश्चितीं ।
शेखीं निजबीजा नागवती । राजे दंडूनि घेती करभार ॥ १३ ॥
शेखीं निजबीजा नागवती । राजे दंडूनि घेती करभार ॥ १३ ॥
पोकळ (अथवा भाजलेले) बी घेऊन शेतात पेरले, तर पिकाला मुकावेच लागेल; इतकेच नव्हे, तर बीं नाहींसें होतेच, आणि सरकारचा सारा मात्र भरावा लागतो! १३.
तैशी अविधी यज्ञिकांची गती । स्वर्ग स्वप्नींही न देखती ।
थित्या नरदेहा नागवती । शेखीं दुःख भोगिती यमदंडें ॥ १४ ॥
थित्या नरदेहा नागवती । शेखीं दुःख भोगिती यमदंडें ॥ १४ ॥
अविधीने यज्ञ करणारांची गति अशीच होते. स्वर्ग तर स्वप्नांतसुद्धा दिसत नाहीं; आणि असलेला नरदेह मात्र गमावतात ; व शेवटी यमयातनेचे दुःख भोगतात ! १४.
वृथा पशूंस दुःख देती । तेणें दुःखे स्वयें दुःखी होती ।
ऐशी यज्ञिकांची गती । आश्चर्य श्रीपती सांगत ॥ १५ ॥
ऐशी यज्ञिकांची गती । आश्चर्य श्रीपती सांगत ॥ १५ ॥
पशूंना व्यर्थ दुःख देतात; आणि त्यामुळे स्वतः दुःखी होतात, अशी याज्ञिकांची गति विलक्षण होते. तीच श्रीकृष्ण सांगतात १५.
स्वप्रोपमममुं लोकमसन्त श्रवणप्रियम् ।
आशिषो हृदि सङ्कल्प्य त्यजन्त्यर्थान्यथावणिक् ॥ ३१ ॥
आशिषो हृदि सङ्कल्प्य त्यजन्त्यर्थान्यथावणिक् ॥ ३१ ॥
[श्लोक ३१] स्वर्ग इत्यादी लोक स्वप्नासारखे नाशवंत आहेत परंतु त्यांची वर्णने कानाला गोड वाटतात त्यामुळे तेथील भोगांची आशा मनात बाळगून त्यासाठी माणसे आपल्याजवळील धन खर्च करून टाकतात व्यापारी जसा अधिक नफ्याच्या आशेने समुद्रप्रवासासारखी साहसे करून आपले मूळ भांडवलसुद्धा गमावून बसतो. (३१)
स्वप्नीं दिसे सवेंचि नासे । तेवीं विकल्पेनि जग भासे ।
येथ सकाम कामनपिसें । स्वर्ग विश्वासें मानिती सत्य ॥ १६ ॥
येथ सकाम कामनपिसें । स्वर्ग विश्वासें मानिती सत्य ॥ १६ ॥
स्वप्न दिसते आणि लागलेंच नाहींसें होते, त्याप्रमाणे जगही कल्पनेनेच भासते. येथे कामनेने वेडावलेल्या सकाम पुरुषांचा स्वर्ग सत्य आहे असाच विश्वास असतो १६.
मुळींच मिथ्या मृगजळ । त्यामाजीं शीतळ जळ ।
थाया घेऊनि मागे बाळ । तैसे सकाम केवळ स्वर्गालागीं ॥ १७ ॥
थाया घेऊनि मागे बाळ । तैसे सकाम केवळ स्वर्गालागीं ॥ १७ ॥
मृगजळ हे मुळीच मिथ्या; त्यांतलें गार पाणी द्या म्हणून मुलाने हट्ट घ्यावा, त्याप्रमाणेच सकाम लोक स्वर्गासाठी हट्ट घेऊन बसतात १७.
'पिंपळावरून मार्ग आहे' । ऐकोनि रुखावरी वेंघों जाये ।
तो जेवीं भ्रमें गुंतोनि राहे । तेवीं स्वर्गश्रवणें होये सकाम ॥ १८ ॥
तो जेवीं भ्रमें गुंतोनि राहे । तेवीं स्वर्गश्रवणें होये सकाम ॥ १८ ॥
'पिंपळावरून मार्ग आहे' असें ऐकून जो त्या वृक्षावर चढू लागतो, तो जसा भ्रमाने गुंतून राहतो, त्याप्रमाणे स्वर्गाचे वैभव ऐकून सकामाची दशा होते १८.
स्वधर्ममार्गीं चालावया नर । वेदु स्वर्ग बोले अवांतर ।
ते फांटां भरले अपार । स्वर्गतत्पर सकाम ॥ १९ ॥
ते फांटां भरले अपार । स्वर्गतत्पर सकाम ॥ १९ ॥
मनुष्याने स्वधर्माच्या मार्गाने चालावे म्हणून वेद स्वर्गाचें एक अवांतर फळ दाखवितो (मुख्य फळ नव्हे); पण सकाम लोक भ्रमिष्ट होऊन स्वर्गाच्याच पाठीला लागतात ! १९.
वाट पिंपळावरी ऐकोनी । शहाणा चाले मार्ग लक्षोनी ।
अश्वत्थ सांडी डावलोनी । तो पावे स्वस्थानीं संतोषें ॥ ३२० ॥
अश्वत्थ सांडी डावलोनी । तो पावे स्वस्थानीं संतोषें ॥ ३२० ॥
'पिंपळावरून वाट आहे' हे ऐकून शहाणा असतो तो त्या मार्गाकडे लक्ष ठेवून चालू लागतो व पिंपळाला वळसा घालून आनंदाने आपल्या ठिकाणी पोचतो ३२०.
तेवीं स्वधर्माच्या अनुष्ठानीं । जो सांडी स्वर्गफळें उपेक्षूनी ।
तो चित्तशुद्धीतें पावोनी । ब्रह्मसमाधानीं स्वयें पावे ॥ २१ ॥
तो चित्तशुद्धीतें पावोनी । ब्रह्मसमाधानीं स्वयें पावे ॥ २१ ॥
त्याप्रमाणे स्वधर्माच्या अनुष्ठानांत जो स्वर्गाची फळें उपेक्षून टाकून देतो, त्याचे चित्त शुद्ध होऊन तो स्वतः ब्रह्मसमाधान पावतो २१.
या सांडूनि स्वधर्ममार्गासी । श्रवणप्रिय स्वर्गसुखासी ।
सकाम भुलले त्यासी । जेवीं घंटानादासी मृग लोधे ॥ २२ ॥
सकाम भुलले त्यासी । जेवीं घंटानादासी मृग लोधे ॥ २२ ॥
ह्या स्वधर्ममार्गाला सोडून ऐकण्यास गोड वाटणाऱ्या स्वर्गसुखाला सकाम लोक भुलतात. घंटानादाला मृग भुलून पडतात २२,
तेवीं जन्मोनि कर्मभूमीसी । वेंचूनि धनधान्यसमृद्धीसी ।
थित्या नाडले नरदेहासी । स्वर्गसुखासी भाळोनी ॥ २३ ॥
थित्या नाडले नरदेहासी । स्वर्गसुखासी भाळोनी ॥ २३ ॥
त्याप्रमाणे कर्मभूमीत जन्माला येऊन धनधान्यसमृद्धि खर्च करून स्वर्गसुखाला भाळून, अनायासें लाभलेल्या नरदेहाला फुकटचे मुकतात! २३.
जैसा कोणी एक वाणी । जुनी नाव आश्रयोनी ।
द्वीपांतरींचा लाभ ऐकोनी । न विचारितां मनीं समुद्रीं रिघे ॥ २४ ॥
द्वीपांतरींचा लाभ ऐकोनी । न विचारितां मनीं समुद्रीं रिघे ॥ २४ ॥
ज्याप्रमाणे कोणी एखादा वाणी जुनें मोडके तोडकें गलबत घेऊन, द्वीपांतरी गेले असता मोठा नफा होतो असें ऐकून, मनांत फारसा विचार न करितां समुद्रात रिघतो २४;
उन्मत्त कर्णधाराचे संगतीं । फुटकी नाव धरोनि हातीं ।
घेऊनियां सकळ संपत्ते । रिघे कुमती महार्णवीं ॥ २५ ॥
घेऊनियां सकळ संपत्ते । रिघे कुमती महार्णवीं ॥ २५ ॥
आणि उन्मत्त खलाशाच्या नादाला लागून फुटकी नाव हातीं धरून व सारी संपत्ति घेऊन तो अविचारी मनुष्य महासागरांत शिरतो २५,
तो जेवीं समुद्रीं बुडे । तैसेंचि सकामांसी घडे ।
स्वर्ग वांछितां बापुडे । बुडाले रोकडे भवार्णवीं ॥ २६ ॥
स्वर्ग वांछितां बापुडे । बुडाले रोकडे भवार्णवीं ॥ २६ ॥
भग तो जसा समुद्रात बुडतो, तीच गत सकामांची होते! बिचारे स्वर्गाची इच्छा धरून संसारसागरामध्ये बुडून जातात!२६.
वांछितां स्वर्गसुखफळ । बुडालें स्वधर्मवित्त सकळ ।
बुडालें चित्तशुद्धीचें मूळ । बुडालें मुद्दल नरदेह ॥ २७ ॥
बुडालें चित्तशुद्धीचें मूळ । बुडालें मुद्दल नरदेह ॥ २७ ॥
स्वर्गसुखाची इच्छा केली, की स्वधर्मरूपी सारे द्रव्य बुडते ; चित्तशुद्धीचें मूळच नाहीसे होऊन नरदेहरूपी मुद्दल नष्ट होते! २७.
एव्हडें हानीचें कारण । देवो सांगत आहे आपण ।
सकामतेसी मूळ गुण । तेंही लक्षण स्वयें सांगे ॥ २८ ॥
सकामतेसी मूळ गुण । तेंही लक्षण स्वयें सांगे ॥ २८ ॥
एवढ्या हानीचे कारण, देव आपण सांगतात की, सकामतेला मूळ त्रिगुण आहेत. त्यांचेही विशेष लक्षण स्वतः सांगतात २८.
रजः सत्त्वतमोनिष्ठा रजःसत्वतमोजुषः ।
उपासत इन्द्रौख्यान् देवादीन्न तथैव माम् ॥ ३२ ॥
उपासत इन्द्रौख्यान् देवादीन्न तथैव माम् ॥ ३२ ॥
[ श्लोक ३२ ] सत्त्वरजतमोगुणी लोक त्याच गुणांच्या इंद्रादी देवतांची उपासना करतात परंतु तशी माझी उपासना करीत नाहीत. (३२)
रजतमाचेनि उन्मत्तें । सत्त्व संकीर्ण होय तेथें ।
तेव्हां रजाचेनि संमतें । काम चित्ततें व्यापूनि खवळे ॥ २९ ॥
तेव्हां रजाचेनि संमतें । काम चित्ततें व्यापूनि खवळे ॥ २९ ॥
रज व तम अत्यंत वाढले असता त्यांत सत्त्वही मिश्रित होते, त्यावेळी रजाच्या संगतीने काम चित्ताला व्यापून खवळतो २९ .
अतिकाम खवळल्या चित्तीं । गुणनुसारें विषयीं प्रीती ।
तेव्हा सकामाची संगती । धरी निश्चितीं भावार्थें ॥ ३३० ॥
तेव्हा सकामाची संगती । धरी निश्चितीं भावार्थें ॥ ३३० ॥
चित्तामध्ये काम अतिशय खवळला म्हणजे गुणानुसार विषयावर प्रेम जडते. तेव्हा निश्चितपणे भक्तिपूर्वक तो सकामाचीच संगत धरतो ३३०.
सकामसंगती साचार । काम्यकर्मी अत्यादर ।
स्वर्गभोगीं महातत्पर । यजी देवपितर प्रमथादिक ॥ ३१ ॥
स्वर्गभोगीं महातत्पर । यजी देवपितर प्रमथादिक ॥ ३१ ॥
खरोखर सकामाच्या संगतीमुळे काम्यकामध्येच अत्यंत आदर वाटू लागतो आणि स्वर्गभोगामध्ये तत्पर होऊन देव, पितर, भूत, प्रमथगण यांचे यजन करतो ३१.
मी सर्वात्मा सवेश्वर । त्या माझ्या ठायीं अनादर ।
कामलंपटत्वें नर । देवतांतर उपासिती ॥ ३२ ॥
कामलंपटत्वें नर । देवतांतर उपासिती ॥ ३२ ॥
ह्याप्रमाणे वासनालुब्ध असणारे लोक, मी सर्वांत्मा, सर्वेश्वर, जवळ असतां माझा अनादर करून इतर देवांचीच उपासना करतात ३२.
म्हणसी देवतांतर जें कांहीं । तें तूंचि पैं गा सर्वही ।
हाही ऐक्यभावो नाहीं । भेदबुद्धीं पाहीं विनियोग ॥ ३३ ॥
हाही ऐक्यभावो नाहीं । भेदबुद्धीं पाहीं विनियोग ॥ ३३ ॥
आता कदाचित म्हणशील, इतर देव जरी झाले तरी सर्व काही तूंच आहेस; पण असा ऐक्यभावही त्यांचा असत नाही. तर सारा विनियोग भेदबुद्धीतच ३३.
एंद्रादि देवद्वारां जाण । मीचि होय गा प्रसन्न ।
त्या माझ्या ठायीं नाहीं भजन । सकाम मन स्वर्गार्थी ॥ ३४ ॥
त्या माझ्या ठायीं नाहीं भजन । सकाम मन स्वर्गार्थी ॥ ३४ ॥
अरे ! इंद्रादि देवांच्या द्वाराने मीच प्रसन्न होतो, पण त्यांचे सकाम मन स्वर्गाचीच इच्छा धरीत असल्यामुळे ते माझे भजन करीत नाहीत ३४.
दृढ कामना जडली चित्तीं । सांगतां स्वर्गीं पुनरावृत्ती ।
तेही हितत्वेंचि मानिती । ऐक निश्चितीं अभिप्रावो ॥ ३५ ॥
तेही हितत्वेंचि मानिती । ऐक निश्चितीं अभिप्रावो ॥ ३५ ॥
मनामध्ये दृढ वासना बिंबलेली असते, यामुळे स्वर्गाला पुनरावृत्तीचे फेरे आहेत असे जरी त्यांना सांगितले, तरी ते त्यांना हितकरच वाटते. तोही अभिप्राय निश्चित ऐक ३५.
इष्द्वेह देवता यज्ञैर्गत्वा रंस्यामहे दिवि ।
तस्यान्त इह भूयास्म महाशाला महाकुलाः ॥ ३३ ॥
तस्यान्त इह भूयास्म महाशाला महाकुलाः ॥ ३३ ॥
[श्लोक ३३] ते अशी कल्पना करतात की, "आम्ही या लोकी यज्ञांचेद्वारा देवतांचे यजन करून स्वर्गांमध्ये जाऊ आणि तेथे दिव्य पदार्थांचा उपभोग घेऊ त्यानंतर जेव्हा पुन्हा आम्हांला जन्म मिळेल, त्यावेळी आम्ही मोठ्या कुलीन श्रीमंत परिवारात जन्म घेऊ; (३३)
जे कर्मभूमीसी मनुष्य झाले । ते सहजें मोक्षाधिकारा आले ।
तेथही कामना नागविले । स्वर्गार्थ भजले देवतांतरा ॥ ३६ ॥
तेथही कामना नागविले । स्वर्गार्थ भजले देवतांतरा ॥ ३६ ॥
जे कर्मभूमीमध्ये मनुष्यरूपाने जन्माला येतात, ते सहजच मोक्षाचे अधिकारी असतात. असें असताही ते कामनेने नाडले जातात आणि स्वर्गासाठी इतर देवतांचेच भजन करतात! ३६.
स्वर्गभोगीं ठेवूनि मन । नाना यागीं करिती यजन ।
तेणें दिविभोग पावेन । हा निश्चिय जाण याज्ञिकां ॥ ३७ ॥
तेणें दिविभोग पावेन । हा निश्चिय जाण याज्ञिकां ॥ ३७ ॥
स्वर्गभोगावरच मन ठेवून अनेक यज्ञयाग करितात, आणि तेवढ्याने आपल्याला स्वर्गातील सुखोपभोग मिळतील अशी याज्ञिकांना खात्री वाटत असते ३७.
काळें भोगक्षयाच्या पतनीं । तेही घेती हितत्वें मानोनी ।
सवेंचि इहलोकीं जन्मोनी । ब्राह्मणपणीं सुशील ॥ ३८ ॥
सवेंचि इहलोकीं जन्मोनी । ब्राह्मणपणीं सुशील ॥ ३८ ॥
कालांतराने पुण्यक्षय होतांच ती स्वर्गसुखें नाहींशी होऊन त्यांना पतन घडते, तेही त्यांना हितकरच वाटते. आम्ही पुण्यवान् स्वर्गस्थ जीव म्हणून सुशील ब्राह्मणाच्या कुळांत जन्माला आलो असे म्हणतात ३८.
वेदवेदांगअोध्ययन । धनधान्यें अतिसंपन्न ।
आम्ही विख्यात गृहस्थ होऊन । क्षीणपुण्य स्वर्गस्थ ॥ ३९ ॥
आम्ही विख्यात गृहस्थ होऊन । क्षीणपुण्य स्वर्गस्थ ॥ ३९ ॥
स्वर्गातील पुण्य संपले तरी आम्ही वेदवेदांगाचे अध्ययन करून धनधान्याची अत्यंत समृद्धि मिळवून विख्यात गृहस्थ होऊन राहूं असें त्यांस वाटत असते ३९.
नेणोनि वेदार्थनिजस्थिती । ऐसऐनशिया उपपत्तीं ।
सकामीं मानिली निश्चिती । ऊंस सांडोनि मागती कणीस त्याचें ॥ ३४० ॥
सकामीं मानिली निश्चिती । ऊंस सांडोनि मागती कणीस त्याचें ॥ ३४० ॥
वेदार्थातील खरे रहस्य न समजल्यामुळे वरील उपपत्तीने हे लोक काम्यकर्मामध्येच निश्चिति मानितात आणि ऊस सोडून त्याचे कणीस मागत बसतात ! ३४०.
एवं पुष्पितया वाचा व्याक्षिप्तमनसां नृणाम् ।
मानिनां चातिस्तब्धानां मद्वार्तापि न रोचते ॥ ३४ ॥
मानिनां चातिस्तब्धानां मद्वार्तापि न रोचते ॥ ३४ ॥
[श्लोक ३४ ] अशाप्रकारे भुलविणार्या वेदवाणीने त्यांचे चित्त मोहित होते अशा घमेंडखोर अहंकारी लोकांना माझ्याविषयी काहीच आवडत नाही. (३४)
फल सांडूनि फुल खाये । तैसा परिपाक याज्ञिकां होये ।
स्वर्गकामाचेनि उपायें । अपायीं स्वयें पडताती ॥ ४१ ॥
स्वर्गकामाचेनि उपायें । अपायीं स्वयें पडताती ॥ ४१ ॥
फळ टाकून फूल खावें तसाच याज्ञिकांचा प्रकार होतो. ते स्वर्गाच्या इच्छेने जे उपाय म्हणून करितात, तेच त्यांना अपायांत पडतात ४१.
अवघा संसार काल्पनिक । तेथ सत्य कैंचे स्वर्गसुख ।
परि श्रवणमात्रें देख । भुलले मूर्ख स्वर्गसुखा ॥ ४२ ॥
परि श्रवणमात्रें देख । भुलले मूर्ख स्वर्गसुखा ॥ ४२ ॥
सारा संसारच मुळी काल्पनिक, त्यांत स्वर्गाचें सुखच खरे कसे असणार? परंतु केवळ ऐकीव गोष्टीवरूनच मूर्ख लोक स्वर्गसुखाला भुलतात ४२.
जैसा नपुंसक वांछी स्त्रीसुख । परी संग तया कैंचा देख ।
मुळींच नाहीं बीजारोप । मा कैंचा कामसाटोप तयासी ॥ ४३ ॥
मुळींच नाहीं बीजारोप । मा कैंचा कामसाटोप तयासी ॥ ४३ ॥
ज्याप्रमाणे नपुंसकानें स्त्रीसुखाची इच्छा केली, तरी त्याला संग कसा करता येणार ? मुळीं बीजोत्पत्तिच नाही, तर त्याला कामाचा खटाटोप काय कामाचा ४३.
परी लटिकाचि तडतडां उडे । कष्टोनि व्यर्थाचि पहुडे ।
परी तया नसे भगभोग रोकडे । तैसे स्वर्ग फुडे प्राणिया ॥ ४४ ॥
परी तया नसे भगभोग रोकडे । तैसे स्वर्ग फुडे प्राणिया ॥ ४४ ॥
पण फुकटच तडतडा उडतो; धडपड करून व्यर्थ निजतो मात्र; पण त्याला खरेखुरें स्त्रीसुख काही मिळत नाही! त्याप्रमाणेच अगदी स्वर्गासंबंधाने मनुष्यांची स्थिति होते ४४.
गव्हांचा जो प्रथम मोड । तोंडीं घालितां लागे गोड ।
परी जो जाणे पिकाचा निवाड । तो मोड जाण उपडीना ॥ ४५ ॥
परी जो जाणे पिकाचा निवाड । तो मोड जाण उपडीना ॥ ४५ ॥
गव्हांचा जो पहिला कोंब येतो, तो तोंडांत घातला असतां गोड लागतो; परंतु पिकाचे महत्त्व ज्याला कळते, तो त्या कोंबाला उपटीत नाही ४५.
पालेयाची चवी घेतां । गव्हांची गोडी न लगे तत्त्वतां ।
मग पाला पाळूनी स्वभावतां । शेवटीं रडता गव्हांचिकारणें ॥ ४६ ॥
मग पाला पाळूनी स्वभावतां । शेवटीं रडता गव्हांचिकारणें ॥ ४६ ॥
पाल्याचीच चव घेऊ लागले तर त्याला काही गव्हांची गोडी येत नाही, असे असतां पालाच काढून घेतला तर शेवटी गव्हांकरितां रडतच बसावे लागते ४६.
तेवीं वेदु बोलिला स्वर्गफल । तें स्वधर्माचें कोंवळें मूळ ।
तें उप्डूनि खातां तत्काळ । मोक्षफळ अंतरे ॥ ४७ ॥
तें उप्डूनि खातां तत्काळ । मोक्षफळ अंतरे ॥ ४७ ॥
त्याप्रमाणे वेदानें स्वर्गाचे फळ सांगितले आहे ते स्वधर्माचे कोवळे मूळ आहे. ते लगेच उपटून खाल्लं तर मोक्षफळ अंतरलेंच! ४७.
हें जाणती जे सज्ञान । ते स्वर्गासी नातळती आपण ।
परी मूर्खाचें सकामपण । अनिवार जाण अतिशयें ॥ ४८ ॥
परी मूर्खाचें सकामपण । अनिवार जाण अतिशयें ॥ ४८ ॥
जे ज्ञाते लोक हे जाणतात, ते स्वर्गाला शिवतही नाहीत; पण मूर्खाची विषयतृष्णा अनिवार असते ४८.
कामाचिया लोलंगती । सदा सकाम कर्में करिती ।
तेणें जन्ममरणांचे आवर्तीं । पडले नुगंडती आकल्प ॥ ४९ ॥
तेणें जन्ममरणांचे आवर्तीं । पडले नुगंडती आकल्प ॥ ४९ ॥
ते लोक कामाच्या आसक्तीने सकाम कार्मेचं करीत असतात, त्यामुळे ते जन्ममरणाच्या भोवऱ्यांत सांपडून कल्पपर्यंत त्यांतून बाहेर निघत नाहीत ४९.
त्यांसी हित सांगती साधुजन । ते न मानिती संतवचन ।
आम्ही वेदार्थीं सज्ञान । हा ज्ञानाभिमान अतिगर्वें ॥ ३५० ॥
आम्ही वेदार्थीं सज्ञान । हा ज्ञानाभिमान अतिगर्वें ॥ ३५० ॥
त्यांना साधुलोक हितबोध सांगत असतात, पण ते साधूचे बोलणे मान्य करीत नाहीत. आम्ही ज्ञाते आहोत, वेदाचा अर्थ आम्हांसच कळतो, असा ज्ञानाभिमान असल्यामुळे ते गर्वाने फुगून जातात ३५०.
मी भगवंत नियंता सृष्टी । हें वेदें दाविल्या नवडे गोष्टी ।
निष्कामता कपाळ उठी । सकम पोटीं सुबुद्ध ॥ ५१ ॥
निष्कामता कपाळ उठी । सकम पोटीं सुबुद्ध ॥ ५१ ॥
मी भगवान् सृष्टीचा नियंता आहे, असें वेदाने दाखवून दिले असताही ती गोष्ट त्यांना मान्य नाही. निष्काम कर्म म्हटले की त्यांचे कपाळच उठते. कारण त्यांची सकामबुद्धि अगदी दृढ झालेली असते ५१.
एवं वेद मानूनि प्रवृत्तिपर । ठकले सकळ सकाम नर ।
तोचि वेदार्थ ब्रह्मपर । स्वयें श्रीधर सांगत ॥ ५२ ॥
तोचि वेदार्थ ब्रह्मपर । स्वयें श्रीधर सांगत ॥ ५२ ॥
अशा प्रकारे वेद हे प्रवृत्तिपरच आहेत असे मानून सगळे सकाम लोक फसतात. ह्याकरिता त्या वेदाचा ब्रह्मपर अर्थ स्वतः श्रीकृष्ण सांगत आहेत ५२.
वेदा ब्रह्मात्मविषयास्त्रिकाण्डविषया इमे ।
परोक्षवादा ऋषयः परोक्षं मम च प्रियम् ॥ ३५ ॥
परोक्षवादा ऋषयः परोक्षं मम च प्रियम् ॥ ३५ ॥
[श्लोक ३५] उद्धवा ! कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड अशी तीन कांडे असणारे वेद ब्रह्म आणि आत्मा यांची एकताच सांगतात परंतु ऋषी हा विषय अप्रत्यक्षपणे सांगतात आणि तसे सांगणेच मलाही आवडते. (३५)
कर्मकांड उपासना ज्ञान । इंहीं त्रिकांडीं वेदु आपण ।
चित्तशुद्धिद्वारा जाण । ब्रह्मसंपन्न जीव करी ॥ ५३ ॥
चित्तशुद्धिद्वारा जाण । ब्रह्मसंपन्न जीव करी ॥ ५३ ॥
वेद हा कर्मकांड, उपासनाकांड व ज्ञानकांड या तीन कांडांनी आपण होऊन चित्तशुद्धीच्या द्वाराने जीवाला ब्रह्मस्वरूप करतो ५३.
पारधी लावून बडिशपिंडी । मीनांसी जळाबाहेर काढी ।
तेवीं दावून स्वर्गसुखगोडी । वेद जीवास ओढी परमार्थीं ॥ ५४ ॥
तेवीं दावून स्वर्गसुखगोडी । वेद जीवास ओढी परमार्थीं ॥ ५४ ॥
कोळी जसा गळाला मांसाचा तुकडा लावून माशांना पाण्याच्या बाहेर काढतो, त्याप्रमाणे वेदही स्वर्गसुखाची गोडी दाखवून जीवाला परमार्थाकडे ओढीत असतो ५४.
परोक्षवाद वेदव्युत्पत्तीं । त्यागमुखें गा अन्योक्ती ।
सांडविली विषयासक्ती । ब्रह्मप्राप्तीलागूनि ॥ ५५ ॥
सांडविली विषयासक्ती । ब्रह्मप्राप्तीलागूनि ॥ ५५ ॥
वेदविभाग हा परोक्षवाद म्ह० अस्पष्ट कथन करणारा असून ब्रह्मप्राप्ति व्हावी म्हणून त्यागमुखाने अन्योक्तीच्या द्वारे विषयावरील आसक्ति सोडविली आहे ५५.
हें जाणोनि वेदार्थगुह्यज्ञान । जो जीव झाला ब्रह्मसंपन्न ।
तेथ कर्म-कर्ता मिथ्या जाण । आश्रम-वर्ण कैंचे ॥ ५६ ॥
तेथ कर्म-कर्ता मिथ्या जाण । आश्रम-वर्ण कैंचे ॥ ५६ ॥
हें वेदार्थातील गुह्यज्ञान लक्षात आणून जीव जेव्हां ब्रह्मस्वरूप होतो, तेव्हां कर्म व कर्ता मिथ्या होऊन जातो. मग आश्रम आणि वर्ण कशाचे ? ५६.
तेथ कैंचें ध्येय-ध्याता-ध्यान । कैंचें ज्ञेय-ज्ञाता-ज्ञान ।
नाहीं भज्य-भजक-भजन । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ५७ ॥
नाहीं भज्य-भजक-भजन । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ५७ ॥
ध्येय, ध्याता आणि ध्यान कशाचें ? ज्ञेय, ज्ञाता, आणि ज्ञान तरी कशाचें ? तो परिपूर्णतेने परब्रह्मस्वरूपच झाल्यामुळे भज्य,भजक आणि भजन हीही शिल्लक राहात नाहीत ५७.
तेथ कैंचे कर्म-कर्माचरण । कैंचा वेद-वेदाध्ययन ।
कैंचें साध्य आणि साधन । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ५८ ॥
कैंचें साध्य आणि साधन । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ५८ ॥
तेव्हां कर्मकर्माचरण तरी कशाचें ? वेद कशाचा व वेदाध्ययन कशाचे आणि साधन कशाचें? कारण, तो पूर्णपणाने परिपूर्ण ब्रह्मच झालेला असतो ५८.
तेथ कैंचे दोष कैंचे गुण । कैंचे पाप कैंचें पुण्य ।
कैंचें जन्म कैंचें मरण । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ५९ ॥
कैंचें जन्म कैंचें मरण । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ५९ ॥
तेव्हां दोष आणि गुण, पाप आणि पुण्य, जन्म आणि मृत्यु कसा असणार ? परिपूर्णत्वाने सारें पूर्ण ब्रह्मच भरलेले असते ५९.
तेथ कैंचा भेदु कैंचा बोधु । कैंचा मोक्ष कैंचा बंधु ।
सदोदित परमानंदु । हा वेदार्थ शुद्ध उद्धवा ॥ ३६० ॥
सदोदित परमानंदु । हा वेदार्थ शुद्ध उद्धवा ॥ ३६० ॥
तेथे भेद कशाचा आणि ऐक्यज्ञान तरी कशाचें ? बंध कशाचा आणि मोक्ष कशाचा? उद्धवा! सदा सर्वकाल परमानंदच साठलेला असतो. हाच वेदाचा खरा अर्थ होय ३६०.
या वेदार्थाचें निरूपण । प्रकट करितां आपण ।
निजस्वार्था नाडती जन । यालागीं जाण म्यां गुप्त केलें ॥ ६१ ॥
निजस्वार्था नाडती जन । यालागीं जाण म्यां गुप्त केलें ॥ ६१ ॥
परंतु ह्या वेदार्थांचे निरूपण आपण होऊन प्रागट केले, तर लोकांच्या हितावर पाणी पडेल, म्हणून मी तें गुप्त ठेवले आहे ६१.
हें वेदार्थाचें गुह्य सार । मज गुप्ताचें गुप्त भांडार ।
तुझा देखोनि अधिकार । म्यां साचार सांगितलें ॥ ६२ ॥
तुझा देखोनि अधिकार । म्यां साचार सांगितलें ॥ ६२ ॥
वेदार्थातील रहस्याचे सार असून माझ्या गुप्त ज्ञानाचे भांडार आहे, खरोखर तुझा अधिकार लक्षात आणूनच ते मी तुला सांगितलें आहे ६२.
हा गुह्यार्थ करितां प्रकट । सांडोनि कर्ममार्गाची वाट ।
कर्म ब्रह्म उभयभ्रष्ट । होतील नष्ट अनधिकारी ॥ ६३ ॥
कर्म ब्रह्म उभयभ्रष्ट । होतील नष्ट अनधिकारी ॥ ६३ ॥
हा गुह्यार्थ प्रगट केला तर नष्ट व अनधिकारी असतील ते कर्ममार्गाची वाट सोडून कर्म व ब्रह्म या उभयतांनाही मुकतील ६३.
हें जाणॊनि ज्ञाते ऋषीश्वरीं । वेदार्थनिरूपणकुसरी ।
हा मुख्यार्थ झांकोनि निर्धारीं । परोक्षवादावरी व्याख्यान केलें ॥ ६४ ॥
हा मुख्यार्थ झांकोनि निर्धारीं । परोक्षवादावरी व्याख्यान केलें ॥ ६४ ॥
हेंच मोठमोठ्या ज्ञानसंमन्न ऋषींनी लक्षात आणून वेदार्थ सांगण्याच्या शैलीत खरोखर हा मुख्य अर्थ गुप्त ठेवून परोक्षवाद म्ह० प्रवृत्तिमार्गच प्रतिपादन केलेला आहे ६४ .
सकळलोकहितार्थ । माझेंही हेंचि मनोगत ।
परोक्षवाद गोड लागत । लोकासंग्रहार्थ उद्धवा ॥ ६५ ॥
परोक्षवाद गोड लागत । लोकासंग्रहार्थ उद्धवा ॥ ६५ ॥
उद्धवा ! सर्व लोकांच्या हितासाठी व लोकांना वळण लागावे म्हणून तसेंच करणे उक्त आहे असे मलाही वाटते. कारण, सर्वांना प्रवृत्तिमार्गच गोड लागतो ६५.
मीही लोकसंग्रहार्थ । अकर्ता कर्में आचरत ।
वेदाचें जें परोक्ष मत । मी स्वयें राखित लोकहिता ॥ ६६ ॥
वेदाचें जें परोक्ष मत । मी स्वयें राखित लोकहिता ॥ ६६ ॥
लोकांना वळण लावून देण्याकरितां मी अकर्ता असूनही कर्मे करतो आणि लोककल्याणाकरितां वेदाचे जे प्रवृत्तिपर मत माहे मी स्वतःही पाळतों ६६.
वेदाचें स्वरूप गहन । अतर्क्य अलक्ष्य अगम्य जाण ।
तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ६७ ॥
तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ६७ ॥
त्या वेदाचे स्वरूप फार खोल ,अतर्क्य, अलक्ष्य आणि अगम्य आहे असें तूं जाण. त्याच अर्थाचे निरूपण (पुढील श्लोकांत) श्रीकृष्ण स्वतः करीत आहेत ६७.
शब्दब्रह्म सुदुर्बोधं प्राणेन्द्रियमनोमयम् ।
अनन्तपारं गम्भीरं दुर्विगाह्यं समुद्रवत् ॥ ३६ ॥
अनन्तपारं गम्भीरं दुर्विगाह्यं समुद्रवत् ॥ ३६ ॥
[श्लोक ३६] वेदांना शब्दब्रह्म म्हणतात त्यांचे रहस्य समजणे अतिशय कठीण आहे ते परा, पश्यंती आणि मध्यमा वाणीच्या रूपात प्राण, मन आणि इंद्रियमय आहे ते समुद्राप्रमाणे सीमा नसलेले, गूढ असून, त्याचा थांग लागणे अतिशय अवघड आहे. (३६)
माझी वेदरूप जे बोली । शब्दतः अर्थतः अगाध खोली ।
ब्रह्मादिकां भुली पडली । मर्यादा केली न वचेनि ॥ ६८ ॥
ब्रह्मादिकां भुली पडली । मर्यादा केली न वचेनि ॥ ६८ ॥
माझं वेदरूपी भाषण आहे ते शब्दशः आणि अर्थशः फार खोल आहे, याबद्दल ब्रह्मदेवादिकांनासुद्धा भ्रम पडतो. कारण, त्याची मर्यादाच त्यांना करवत नाही ६८.
बाहीं न तरवे समुद्र । तेवीं स्वमतीं न कळे वेदपार ।
येचि अर्थीं नाना ऋषीश्वर । युक्तीचे संभार वेंचिले ॥ ६९ ॥
येचि अर्थीं नाना ऋषीश्वर । युक्तीचे संभार वेंचिले ॥ ६९ ॥
समुद्र जसा हातांनी पोहून जाता येत नाही, तसा आपल्याच बुद्धीने वेदाचाही अर्थ कळत नाही. म्हणूनच अनेक ऋषिवर्यांनी नाना प्रकारच्या युक्तिप्रयुक्ति लढविल्या आहेत ६९.
परी एवंविध तत्त्वतां । हे वेदवादाची कथा ।
न येचि कोणाचेही हाता । अर्थतः शब्दतः दुर्ज्ञेय ॥ ३७० ॥
न येचि कोणाचेही हाता । अर्थतः शब्दतः दुर्ज्ञेय ॥ ३७० ॥
पण अशाने खराखुरा वेदाचा अर्थ कोणाच्याच हाताला येत नाही. कारण तो शब्दशः व अर्थशःही दुर्बोधच असतो ३७०.
ज्याची शब्दवाचकता । स्वरवर्णें शुद्ध न ये हाता ।
त्याची अर्थावबोधकता । अगम्य सर्वथा सुरनरां ॥ ७१ ॥
त्याची अर्थावबोधकता । अगम्य सर्वथा सुरनरां ॥ ७१ ॥
ज्याच्या शब्दांची मोडणीच शुद्ध स्वरवर्णानं आधी पुरती कोणाच्या हाती येत नाही, त्याच्या अर्थाची गोष कशाला विचारावी? ती मनुष्यांनाच नव्हे, तर देवांनाही अगम्य आहे ७१.
पूर्वीं हाचि वेद अनुच्छिष्ट । म्यां ब्रह्मयाहातें करविला पाठ ।
तेणेंही नेणोनियां स्पष्ट । कर्मीं कर्मठ होऊनि ठेला ॥ ७२ ॥
तेणेंही नेणोनियां स्पष्ट । कर्मीं कर्मठ होऊनि ठेला ॥ ७२ ॥
पूर्वी हाच वेद अनुच्छिष्ट म्ह. दुसऱ्या कोणीही पाहिला नव्हता, तेव्हा ब्रह्मदेवाच्या हातून पाठ करविला. पण त्यालाही तो नीटसा न समजल्यामुळे कर्मानें तो कर्मठच होऊन बसला ७२.
ते कर्मक्रिया अतिगोमटी । शंखें ह्रिली उठाउठी ।
ब्रह्मा विसरला वेदगोठी । पडलें सृष्टीं कर्मांध्य ॥ ७३ ॥
ब्रह्मा विसरला वेदगोठी । पडलें सृष्टीं कर्मांध्य ॥ ७३ ॥
ती अत्यंत सुंदर अशी कर्मक्रिया हां हां म्हणता शंखासुराने चोरून नेली. त्यामुळे ब्रह्मदेव वेदाची गोष्टच विसरून गेला, आणि सृष्टयुत्पत्तीचे कार्यच बंद पडलें ७३.
तो करावया वेदोद्धार । म्यां मर्दिला शंखासुर ।
सकळ श्रुतींचा संभार । ब्रह्मयासी साचार दीधला ॥ ७४ ॥
सकळ श्रुतींचा संभार । ब्रह्मयासी साचार दीधला ॥ ७४ ॥
त्या वेदांचा उद्धार करण्याकरिता मी शंखासुराचा वध केला; आणि सारी वेदाची रास ब्रह्मदेवाला आणून दिली ७४.
म्यां वेद ठेविले ब्रह्ययापुढें । तो पूर्व स्मरेना धडफुडें ।
तेव्हा चाकाटलें बापुडें । केवळ वेडें होऊनि ठेलें ॥ ७५ ॥
तेव्हा चाकाटलें बापुडें । केवळ वेडें होऊनि ठेलें ॥ ७५ ॥
अशा प्रकारें ते सारे वेद जरी मी ब्रह्मदेवापुढे आणून ठेविले, तरी त्याला ते काही पहिल्याप्रमाणे स्मरेनात. तेव्हा तो बिचारा अगदी घाबरून जाऊन वेडाच होऊन बसला ७५.
त्या वेदभागालागीं जाण । ऋषीं वेंचिलें निजज्ञान ।
शाखोपशाखीं रावण । वेदविभागन करूं आला ॥ ७६ ॥
शाखोपशाखीं रावण । वेदविभागन करूं आला ॥ ७६ ॥
त्या वेदविभागासाठी ऋषींनी आपलें ज्ञान खर्ची घातलें त्याच्या शाखाउपशाखांचा पदच्छेद करण्यासाठी रावण पुढे आला ७६.
परी इत्थंभूत तत्त्वतां । माझ्या वेदविभागाची वार्ता ।
न येचि कोणाचिया हाता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ७७ ॥
न येचि कोणाचिया हाता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ७७ ॥
तरी उद्धवा! माझ्या वेदविभागाची इत्थंभूत वार्ता तत्त्वता कोणाच्याच हाताला लागली नाहीं ७७.
तो मी वेदस्थापक श्रीहरी । लोक राखावया मर्यादेवरी ।
स्वयें सत्यवतीच्या उदरीं । झालों अवतारधारी श्रीव्यास ॥ ७८ ॥
स्वयें सत्यवतीच्या उदरीं । झालों अवतारधारी श्रीव्यास ॥ ७८ ॥
तोच मी वेदसंस्थापक श्रीहरि, लोकांना मर्यादेत ठेवण्यासाठी स्वतः श्रीव्यासाचा अवतार धारण करून सत्यवतीच्या पोटी जन्मास आलों ७८.
वेदविभागीं राजहंसु । यालागीं नामें 'वेदव्यासु' ।
तेणें म्यां केला श्रुतिविलासु । वेदविशेषु चतुर्धा ॥ ७९ ॥
तेणें म्यां केला श्रुतिविलासु । वेदविशेषु चतुर्धा ॥ ७९ ॥
वेदविभाग करण्यांत तो केवळ राजहंस होता, म्हणूनच त्याला 'वेदव्यास' असें म्हणतात. त्याने वेदार्थ प्रगट करून त्याचे चार प्रकार केले ७९.
वेद अर्थत्वें अतिदुर्घट । परी वाचकत्वें झाला प्रगट ।
त्या चारी वाचा अतिश्रेष्ठ । ऐक स्पष्ट सांगेन ॥ ३८० ॥
त्या चारी वाचा अतिश्रेष्ठ । ऐक स्पष्ट सांगेन ॥ ३८० ॥
वेद हा अर्थाच्या दृष्टीने अत्यंत गूढ आहे, पण शब्दाच्या दृष्टीने प्रगट आहे. ते शब्द म्ह० वाणी चार प्रकारच्या आहेत. त्या मी स्पष्ट करून सांगतों ऐक ३८०.
नादाचें प्रथम स्फुरण । घोषमात्र सूक्षम प्राण ।
ती नांव 'परा' वाचा जाण । प्रथम लक्षण ॐकारीं ॥ ८१ ॥
ती नांव 'परा' वाचा जाण । प्रथम लक्षण ॐकारीं ॥ ८१ ॥
नादाचे जें पहिले स्फुरण म्हणजे घोषमात्र सूक्ष्म प्राण, त्याचे नाव 'परावाणी'. तेच ओंकाराचे प्रथम लक्षण होय ८१.
तोचि नादयुक्त प्राण । अंतःकरणीं होय स्फुरण ।
ते 'पश्यंती' वाचा जाण । विवेकलक्षण तीमाजीं ॥ ८२ ॥
ते 'पश्यंती' वाचा जाण । विवेकलक्षण तीमाजीं ॥ ८२ ॥
तोच नादयुक्त प्राण अंत:करणांत स्फुरण पावला म्हणजे त्याला 'पश्यंती वाणी' असे म्हणतात. ती विवेकलक्षणरूप आहे ८२.
नाभीपासोनी नाभिस्वरीं । जे घुमघुमी कंठवरी ।
ते 'मध्यमा' वाचा खरी । स्वयें श्रीहरी सांगत ॥ ८३ ॥
ते 'मध्यमा' वाचा खरी । स्वयें श्रीहरी सांगत ॥ ८३ ॥
आणि नाभीपासून नाभिस्वरानें कंठापर्यंत घुमघुमणारी जी वाणी ती 'मध्यमा' होय. असें श्रीकृष्णांनी स्वतः सांगितले ८३.
अकार-उकार-मकार । स्वरवर्णयुक्त उच्चार ।
जेथ प्रगट होय ओंकार । ते वाचा साचार 'वैखरी' ॥ ८४ ॥
जेथ प्रगट होय ओंकार । ते वाचा साचार 'वैखरी' ॥ ८४ ॥
त्यानंतर अकार, उकार व मकार असा स्वर-वर्णयुक्त उच्चार, ज्यापासून 'ओंकार' प्रगट होतो, तीच 'वैखरी वाणी' होय ८४.
ते वैखरीच्या ठायीं । शाखोपशाखीं जो कांहीं ।
वेद अनंतरूप पाहीं । त्यासही नाहीं मर्यादा ॥ ८५ ॥
वेद अनंतरूप पाहीं । त्यासही नाहीं मर्यादा ॥ ८५ ॥
त्या वैखरी वाणींत शाखोपशाखांमध्ये जो अनंतरूपाने वेद भरलेला आहे, त्यालाही मर्यादा नाहींच ८५.
यापरी वेद अमर्याद । जरी चतुर्धा केला विशद ।
तरी जनासी अतिदुर्बोध । यालागीं उपवेद विभागिले ॥ ८६ ॥
तरी जनासी अतिदुर्बोध । यालागीं उपवेद विभागिले ॥ ८६ ॥
याप्रमाणे वेद हा अमर्याद आहे. त्याचे चार विभाग करून स्पष्टीकरण केले, तरी तो लोकांना अतिशय दुर्बोधच झाला, ह्याकरिता त्याचे 'उपवेद' म्हणून आणखी विभाग केले ८६.
ऐसेनिही जनासी न कळे वेद । यालागीं वेदावरी पद ।
श्रीव्यासें केले विशद । तरी वेदार्थ शुद्ध कळेना ॥ ८७ ॥
श्रीव्यासें केले विशद । तरी वेदार्थ शुद्ध कळेना ॥ ८७ ॥
इतकें केलें तरीसुद्धा लोकांना वेद कळेनाच. ह्यास्तव श्रीव्यासांनी वेदांची पदे पाडून त्याचा अर्थ स्पष्ट केला. तरीही वेदाचा खरा अर्थ कळत नाही तो नाहींच ८७.
येचि अर्थीं ऋषीश्वर बहुत । सुमंतु जैमिनी भाष्य भारत ।
पैल सूत्रादि जे समस्त । शिणतां वेदार्थ न कळेचि ॥ ८८ ॥
पैल सूत्रादि जे समस्त । शिणतां वेदार्थ न कळेचि ॥ ८८ ॥
ह्याचा अर्थ लावण्याकरितां सुमंत, जैमिनी, भाष्यभारत, पैल सूत्र इत्यादि सारे मोठमोठे ऋषी थकले. तरीही त्यांस वेदाचा अर्थ कळलाच नाही ८८.
एवं वाच्यता आणि लक्ष्यता । स्थूलसूक्ष्मत्वें वेदार्थज्ञाता ।
मजवांचूनि तत्त्वतां । आणिक सर्वथा असेना ॥ ८९ ॥
मजवांचूनि तत्त्वतां । आणिक सर्वथा असेना ॥ ८९ ॥
तात्पर्य, वेदाचा स्थूल व सूक्ष्म वाच्यार्थ व लक्ष्यार्थ जाणणारा माझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही ८९.
मयोपबृंहितं भूम्रा ब्रह्मणानन्तशक्तिना ।
भूतेषु घोषरूपेण बिसेषूर्णेव लक्ष्यते ॥ ३७ ॥
भूतेषु घोषरूपेण बिसेषूर्णेव लक्ष्यते ॥ ३७ ॥
[श्लोक ३७] अनंत शक्तिसंपन्न, सर्वव्यापी ब्रह्मस्वरूप अशा मीच वेदवाणीचा विस्तार केला आहे कमळाच्या देठामध्ये जसा बिसतंतू असतो, त्याप्रमाणे ही वेदवाणी प्राण्यांच्या अंतःकरणामध्ये अनाहतनादाच्या रूपाने दिसून येते. (३७)
जो मी अंतर्यामी आपण । ’भूमा’ म्हणिजे अपरिछिन्न ।
सबाह्य व्यापकत्वें संपूर्ण । ब्रह्म परिपूर्ण जो कां मी ॥ ३९० ॥
सबाह्य व्यापकत्वें संपूर्ण । ब्रह्म परिपूर्ण जो कां मी ॥ ३९० ॥
जो मी स्वतः सर्वांच्या अंत:करणांत 'भूमा' म्हणजे अपरिच्छिन्नपणे अंतर्बाह्य व्यापूनही परिपूर्ण असा जो पूर्णब्रह्म ३९०,
तेणें म्यां वेद अधिष्टित । या नांव बोलिजे 'उपबृंहित' ।
अधिष्ठाता विकारी होत । जेवीं अभ्रांत चंद्रमा ॥ ९१ ॥
अधिष्ठाता विकारी होत । जेवीं अभ्रांत चंद्रमा ॥ ९१ ॥
त्या मजकडून वेद अधिष्ठित आहे, ह्यालाच 'उपबृंहित' असे म्हणतात. परंतु अधिष्ठाता हा अभ्रांतल्या चंद्राप्रमाणे विकृत होतो (झालासा दिसतो) ९१.
कां अग्नि काष्ठीं अधिष्ठितां । त्यासी तत्काळ ये साकारता ।
मग प्रबळ आणि शांतता । या विकारावस्था अग्नीसी ॥ ९२ ॥
मग प्रबळ आणि शांतता । या विकारावस्था अग्नीसी ॥ ९२ ॥
किंवा अग्नि काष्ठामध्ये अधिष्ठित झाला की, त्याला लगेच आकार येतो; तेव्हां त्या अग्नीलाही प्रबळता व शांतता ह्या दोन विकारावस्था प्राप्त होतात ९२.
यापरी विकारी नव्हे जाण । मी अंतर्यामी नारायण ।
ब्रह्मस्वरूपें परिपूर्ण । विकारनिर्दळण स्वयें कर्ता ॥ ९३ ॥
ब्रह्मस्वरूपें परिपूर्ण । विकारनिर्दळण स्वयें कर्ता ॥ ९३ ॥
त्याप्रमाणे मी अंतर्यामी नारायण विकारी होत नाही. मी ब्रह्मस्वरूपाने परिपूर्ण असून स्वतः विकाराचे निर्दालन करणारा आहे ९३.
मीचि विकारांचा कर्या । करूनि मीचि अकर्ता ।
त्या मज न ये विकारता । ब्रह्मस्वरूपतास्वभावें ॥ ९४ ॥
त्या मज न ये विकारता । ब्रह्मस्वरूपतास्वभावें ॥ ९४ ॥
विकारांचा कर्ता मीच; आणि करून अकर्ताही मीच ; मी स्वयंभू ब्रह्मस्वरूप असल्यामुळे मला विकार म्हणून होतच नाही ९४.
ब्रह्म केवळ निर्धर्म । तें केवीं विकारी कर्म ।
ऐसा कांहीं कल्पिसी भ्रम । तेंही सुगम सांगेन ॥ ९५ ॥
ऐसा कांहीं कल्पिसी भ्रम । तेंही सुगम सांगेन ॥ ९५ ॥
ब्रह्म केवळ निर्धर्म आहे. ते विकाराचे कर्म कसे करील? अशी काही तरी तुझ्या मनामध्ये शंका उत्पन्न होईल, तर त्याचेही उत्तर स्पष्ट करून सांगतों ऐक ९५.
माझी योगमाया अनंतशक्ती । जे शंभुस्वयंभूंसी न ये व्यक्ती ।
तिचेनि योगें मी चिन्मूर्ती । उत्पत्तिस्थितिसंहर्ता ॥ ९६ ॥
तिचेनि योगें मी चिन्मूर्ती । उत्पत्तिस्थितिसंहर्ता ॥ ९६ ॥
माझी अनंत शक्तिरूप जी योगमाया आहे, ती शंकर व ब्रह्मदेव ह्यांनासुद्धा समजत नाही; तिच्या योगानेच मी चिन्मूर्ति असतांही उत्पत्ति, स्थिति व संहारकर्ता होतों ९६.
एवं योगमाया स्वभावतां । मी सकळ करूनि अकर्ता ।
त्या मज देशतां काळतां । विकारिता स्पर्शेना ॥ ९७ ॥
त्या मज देशतां काळतां । विकारिता स्पर्शेना ॥ ९७ ॥
असा योगमायेचा स्वभाव आहे. मी सर्व कांहीं करून अकर्ता आहे. त्यामुळे मला देश व काल ह्यांचा विकार शिवत नाहीं ९७.
जरी सत्य असती भेदता । तरी मज येती विकारिता ।
माझे निजस्वरूपीं पाहतां । भेदाची वार्ता असेना ॥ ९८ ॥
माझे निजस्वरूपीं पाहतां । भेदाची वार्ता असेना ॥ ९८ ॥
भेदभाव जर खरा असता, तर मला विकार झाला असता; परंतु माझ्या निजस्वरूपांत पाहिले तर भेदाची वार्ताच असत नाहीं ९८.
जेवीं भ्रमें सर्पत्व दोरावरी । परी दोर सर्पत्व कदा न धरी ।
तेवीं मी परमात्मा श्रीहरी । करूनि अविकारी निजरूपें ॥ ९९ ॥
तेवीं मी परमात्मा श्रीहरी । करूनि अविकारी निजरूपें ॥ ९९ ॥
भ्रमानें ज्याप्रमाणे दोरावर सर्पाचा भास होतो, परंतु दोर कांहीं सर्प कधीच होत नाही, त्याप्रमाणे मी परमात्मा श्रीहरि सर्व करूनही निजरूपाने अविकारीच असतों ९९.
घोषरूपें अतिसूक्ष्म नादु । तो मी प्रणवरूपें निजवेदु ।
प्राणिमात्रीं असें स्वतःसिद्धु । परी नेणती बोधु सकामत्वें ॥ ४०० ॥
प्राणिमात्रीं असें स्वतःसिद्धु । परी नेणती बोधु सकामत्वें ॥ ४०० ॥
घोषरूपाने असणारा जो अत्यंत सूक्ष्म नाद तो मी प्रणवरूपानें खरा वेद प्रत्येक प्राणिमात्राच्या ठिकाणी स्वतःसिद्धच आहे; परंतु लोक सकामबुद्धीमुळे हे जाणत नाहीत ४००.
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...