मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २१ ओव्या १ ते १००

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

    ॐ नमो सद्‍गुरु वैकुंठनाथा । स्वानंदवैकुंठीं सदा वसता ।
    तुझे ऐश्वर्य स्वभावतां । न कळे अनंता अव्यया ॥ १ ॥
    हे ओंकाररूप सद्गुरो ! हें वैकुंठनाथा ! तुला नमस्कार असो. सदासर्वदा स्वानंदवैकुंठांतच वस्ती करून असतोस १. 


    तुझ्या निजबोधाचा गरुड । कर जोडूनि उभा दृढ ।
    ज्याच्या पाखांचा झडाड । उन्मळी सुदृढ भववृक्षा ॥ २ ॥
    अनंता !हे अव्यया ! तुझे खरें ऐश्वर्य काय आहे त्याचा अंत लागत नाही. तुझा निजबोधाचा गरुड तुझ्यापुढे हात जोडून उभा असतो. त्याने नुसते पंख फडफडावले, की प्रचंड भववृक्ष उन्मळून पडतो २.


    तुझें स्वानुभवैकचक्र । लखलखित तेजाकार ।
    द्वैतदळणीं सतेजधार । अतिदुर्धर महामारी ॥ ३ ॥
    तुझ्या हातांतील स्वानुभावाचे चक्र लखलखीत तेजोमय असून त्याला अभेदभावनेची तीक्ष्ण धार लावलेली आहे. त्यामुळे त्याचा मार फारच भयंकर असतो ३.


    कैसा पांचजन्य अगाध । निःशब्दीं उठवी महाशब्द ।
    वेदानुवादें गर्जे शुद्ध । तोचि प्रसिद्ध शंख तुझा ॥ ४ ॥
    तुझा पांचजन्य शंख तर किती अगाध ! तो निःशब्दांतही भयंकर शब्द उत्पन्न करतो. वेदवाणीने शुद्ध गर्जना करीत असतो. तोच तुझा  प्रसिद्ध शंख होय ४. 


    झळफळित सर्वदा । निजतेजें मिरवे सदा ।
    करी मानाभिमानांचा चेंदा । ते तुझी गदा गंभीर ॥ ५ ॥
     सदासर्वदा आत्मतेजाने झगझगत असणारी गदा तुझ्या हातामध्ये सर्वकाळ शोभत असते. ती तुझी गदा इतकी खंबीर आहे की, ती अभिमानाचा चेंदाच करून सोडते ५.


    अतिमनोहर केवळ । देखतां उपजती सुखकल्लोळ ।
    परमानंदें आमोद बहळ । तें लीलाकमळ झेलिसी ॥ ६ ॥
    दिसण्यामध्ये अत्यंत मनोहर, जे पाहातांच आनंदाच्या उकळ्या फुटतात आणि ज्याला परमानंदरूप घमघमाट सुटलेला असतो, असें जें लीलाकमळ ते झेलीत असतोस ६.


    जीव शिव समसमानी । जय विजय नांवें देउनी ।
    तेचि द्वारपाळ दोनी । आज्ञापूनी स्थापिले ॥ ७ ॥
    समसमान असणारे जीव आणि शिव या दोघांना जय आणि विजय अशी नाव देऊन त्यांना आज्ञा करून द्वारसंरक्षणार्थ ठेवले आहेत ७.


    तुझी निजशक्ति साजिरी । रमारूपें अतिसुंदरी ।
    अखंड चरणसेवा करी । अत्यादरीं सादर ॥ ८ ॥
    तशीच तुझी अवियोगिनी सुकुमार निजशक्ति अति सुंदर अशा लक्ष्मीरूपाने अत्यादराने चरणसेवा करीत असते ८.


    तुझे लोकींचे निवासी जाण । अवघे तुजचिसमान ।
    तेथ नाहीं मानापमान । देहाभिमान असेना ॥ ९ ॥
    तुझ्या लोकांत राहाणारे जितके म्हणून रहिवाशी आहेत, तितके सारे तुझ्याचसारखे आहेत. तेथे मानापमान नाही व देहाभिमानही नाहीं ९.


    तेथ काळाचा रिगमु नाहीं । कर्माचें न चले कांहीं ।
    जन्ममरणाचें भय नाहीं । ऐशिया ठायीं तूं स्वामी ॥ १० ॥
    तेथे काळाचा शिरकाव नाहीं; कर्माचे काही चालत नाहीं; व जन्ममरणाचे भय नाही; अशा ठिकाणचा तू  स्वामी आहेस १०


    जेथ कामक्रोधांचा घात । क्षुधेतृषेचा प्रांत ।
    निजानंदें नित्यतृप्त । निजभक्त तुझेनि ॥ ११ ॥
      जेथे कामक्रोधांचा घात होतो; व क्षुधेतृषेचा अंत होतो; तेथें तुझे भक्त निजानंदाने नित्यतृप्त असतात ११.


    तुझेनि कृपाकटाक्षें । अलक्ष न लक्षितां लक्षें ।
    तुझे चरणसेवापक्षें । नित्य निरपेक्षें नांदविसी ॥ १२ ॥
    तुझ्या कृपाकटाक्षाच्या योगानें, अलक्ष्य वस्तु न लक्षितांच लक्षात येते. तुझ्या चरणसेवेच्या अपेक्षेनें तूं  भक्तांना निरपेक्षपणे वागवितोस १२.


    साम्यतेचें सिंहासन । ऐक्यतेची गादी जाण ।
    त्यावरी तुझें सहजासन । परिपूर्ण स्वभावें ॥ १३ ॥
    साम्यतेच्या सिंहासनावर ऐक्यतेची गादी असते.  तीवर तुझे पूर्णपणाचे व स्वाभाविक असें सहजासन असते १३.


    तन्मयतेचें निजच्छत्र । संतोषाचें आतपत्र ।
    ज्ञानविज्ञानयुग्म चामर । सहजें निरंतर ढळताती ॥ १४ ॥
    तन्मयता हेंच छत्र; संतोष हीच अबदागिरी; ज्ञान-विज्ञान या दोन चवऱ्या, तुझ्यावर सर्वदा ढाळत असतात १४.


    तेथ चारी वेद तुझे भाट । कीर्ति वर्णिती उद्भीट ।
    अठरा मागध अतिश्रेष्ठ । वर्णिती चोखट वंशावळी ॥ १५ ॥
    तेथें चार वेद हे तुझे भाट होत. ते मोठमोठ्याने तुझी कीर्ति वर्णीत असतात आणि अठरा पुराणे हे मागध (बंदी-भाट) तुझी उत्तम वंशावळी वर्णन करतात १५.


    तेथ साही जणां वेवाद । नानाकुसरीं बोलती शब्द ।
    युक्तिप्रयुक्तीं देती बाध । दाविती विनोद जाणीव ॥ १६ ॥
    तसेंच तेथें म्ह० तुझ्या सभेंत  सहाजण (षट्शाखें) वादविवाद करून कोट्यांवर कोट्या रचीत असतात. युक्तिप्रयुक्तीने खंडण मंडण करून आपापल्या ज्ञानाचे कौतुक दाखवितात १६.


    एक भावार्थी तुजलागुनी । स्तुति करिती न बोलुनी ।
    तेणें स्तवनें संतोषोनी । निजासनीं बैसविसी ॥ १७ ॥
    कोणी भावार्थी भक्त न बोलतांच तुझी स्तुति करतात. तशा स्तवनाने तूं  संतोषित होऊन त्यांना आपल्या पदावर बसवितोस १७.


    ऐसा सद्गुवरु महाविष्णु । जो चिद्रूपें सम सहिष्णु ।
    जो भ्राजमानें भ्राजिष्णु । जनीं जनार्दनु तो एक ॥ १८ ॥
    असा तूं सद्गुरु महाविष्णु आहेस, जो चिद्रूपाने सम व सहिष्णु आहे. जो तेजाने भ्राजिष्णु म्ह. देदीप्यमान आहे, तोच जनामध्ये एकरूप जनार्दन होय १८.


    जनीं जनार्दनुचि एकला । तेथ एकपणें एका मीनला ।
    तेणें एकपणाचाही ग्रास केला । ऐसा झाला महाबोध ॥ १९ ॥
    जनामध्ये एकीएक जनार्दनच भरलेला आहे. त्यात एकरूपाने एकनाथ एकरूप होऊन गेला. त्यामुळे त्याने एकपणाचाही ग्रास करून टाकला. असा महाबोध त्याला प्राप्त झाला १९.


    या महाबोधाचें बोधांजन । हातेंवीण लेववी जनार्दन ।
    तेणें सर्वांगीं निघाले नयन । देखणेंपण सर्वत्र ॥ २० ॥
    त्याच महाबोधाचे बोधांजन डोळ्यांत हाताशिवायच जनार्दन घालून देतात. त्यामुळे साऱ्या अंगालाच डोळे फुटतात आणि त्यामुळे दृष्टि सर्वव्यापक होउन राहाते २०.


    परी सर्वत्र देखतां जन । देखणेनि दिसे जनार्दन ।
    ऐंशी पूर्ण कृपा करून । एकपण सांडविलें ॥ २१ ॥
    पण सर्वत्र जनाला पाहिले तरी त्या ठिकाणी सारा एक जनार्दनच दिसतो. अशी परिपूर्ण कृपा करून त्याने एकपणाही नाहींसा करून टाकला २१.


    ऐसा तुष्टोनि भगवंत । माझेनि हातें श्रीभागवत ।
    अर्थविलें जी यथार्थ । शेखीं प्राकृत देशभाषा ॥ २२ ॥
    ह्याप्रमाणे भगवानच प्रसन्न होऊन त्याने माझ्या हाताने श्रीमद्भागवताचा अर्थ यथार्थ रीतीने करविला, व तोही प्राकृत अशा देशभाषेत ! २२.


    श्रीभागवतीं संस्कृत । उपाय असतांही बहुत ।
    काय नेणों आवडलें येथ । करवी प्राकृत प्रबोधें ॥ २३ ॥
    श्रीमद्भागवतावर अनेक संस्कृत टीका असतांही त्यांना काय आवडले कोण जाणे? त्यांनी प्राकृत व सुगम असा अर्थ करविला २३.


    म्यां करणें कां न करणें । हेंही हिरूनि नेलें जनार्दनें ।
    आतां ग्रंथार्थनिरूपणें । माझें बोलणें तो बोले ॥ २४ ॥
    माझें करणेपण किंवा न करणेपण हे त्या जनार्दनाने हिरावून नेले. आतां ग्रंथार्थाच्या निरूपणाचे माझे बोलणेही तोच बोलत आहे २४.


    तेणें बोलोनि निजगौरवा । वेदविभागसद्भा वा ।
    तो एकादशीं विसावा । उद्धवासी बरवा निरूपिला ॥ २५ ॥
    त्याने आपल्या गौरवाकरितां  प्रेमादराने वेदाचे विभाग ज्यांत सांगितले असा एकादश स्कंधांतील विसावा (विसावा देणारा) अध्याय उद्धवाला उत्तम रीतीने सांगितला २५.


    तेथ भक्त आणि सज्ञान । त्यासी पावली वेदार्थखूण ।
    कर्मठीं देखतां दोषगुण । संशयीं जाण ते पडिले ॥ २६ ॥
    त्यामुळे भक्त आणि ज्ञानी ह्यांना वेदार्थाची खूण पटली; परंतु कर्मठ होते ते गुणदोषाकडे पाहू लागल्यामुळे संशयांत पडले २६.


    त्या संशयाचें निरसन । करावया श्रीकृष्ण ।
    एकविसावा निरूपण । गुणदोषलक्षण स्वयें सांगे ॥ २७ ॥
    त्या संशयाचे निरसन करण्याकरितां एकविसाव्या अध्यायाचे निरूपण करून गुणदोषाचे लक्षण स्वतः श्रीकृष्ण सांगत आहेत २७.


    त्या गुणदोषांचा विभाग । सांगोनिया विषयत्याग ।
    करावया श्रीरंग । निरूपण साङ्ग सांगत ॥ २८ ॥
    त्या गुणदोषांचा प्रकार सांगून श्रीकृष्ण विषयाचा त्याग करण्याकरितां सविस्तर निरूपण करीत आहेत २८.


    श्रीभगवानुवाच -
    य एतान्मत्पथो हित्वा भक्तिज्ञानक्रियात्मकान् ।
    क्षुद्रान्कामांश्चलैः प्राणैर्जुषन्तः संसरन्ति ते ॥ १ ॥
    [श्लोक १ ] भगवान श्रीकृष्ण म्हणाले - भक्ती, ज्ञान आणि कर्म हे माझ्या प्राप्तीचे तीन मार्ग आहेत ते सोडून चंचल इंद्रियांच्याद्वारे जे क्षुद्र भोग भोगीत राहातात, ते वारंवार जन्ममृत्यूरूप संसाराच्या चक्रात फिरत राहातात. (१)


    म्यां सांगितले जे विभाग । भक्तिज्ञानक्रियायोग ।
    हा सांडूनि शुद्ध वेदमार्ग । सकाम भोग जे वांछिती ॥ २९ ॥
    भक्ति, ज्ञान व कर्मयोग असे विभाग मी सांगितले, तो शुद्ध वेदमार्ग होय. तो सोडून देऊन लोभिष्ट लोक विषयसुखाची इच्छा करतात २९.


    क्षणभंगुर देहाचा योग । हें विसरोनियां चांग ।
    सकाम कर्माची लगबग । भवस्वर्गभोग भोगावया ॥ ३० ॥
    देहाचा संबंध क्षणभंगुर आहे. हे पुरते विसरून संसारांतील व स्वर्गातील सुखोपभोग मिळण्यासाठी लोभिष्ट लोक सकाम कर्माची धाई करतात ३०.


    चळतेनि प्राणसंगें । देहातें काळ ग्रासूं लागे ।
    येथ नानाकर्मसंभोगें । मूर्ख तद्योगें मानिती सुख ॥ ३१ ॥
    चंचल प्राणाच्या संगतीने काळ हा देहाला ग्रासीतच असतो. असे असतां इहलोकांतील अनेक प्रकारच्या विषयोपभोगांत व त्याच्या खटपर्टीतच मुर्ख लोक सुख मानतात ३१.


    भोगितां कामभोगसोहळे । नेणे आयुष्य ग्रासिलें काळें ।
    मग जन्ममरणमाळें । दुःखउेमाळे भोगिती ॥ ३२ ॥
    कामभोगांचे सोहळे भोगीत असतां काळ आयुष्य ग्रासीत असतो हे समजतच नाहीं; मग जन्ममरणाच्या फेऱ्यांमध्ये दुःखाचे उमाळे भोगीत राहातात ३२.


    काम्य आणि नित्यकर्म । आचरतां दिसे सम ।
    तरी फळीं कां पां विषम । सुगम दुर्गम परिपाकु ॥ ३३ ॥
    काम्यकर्म आणि नित्यकर्म हें आचरण करतांना सारखेच दिसते, तरी फलामध्ये त्याचे विषमत्व म्हणजे चांगले व वाईट परिणाम कां ? ३३.


    तें कर्मवैचित्र्यविंदान । संकल्पास्तव घडे जाण ।
    तेचि अर्थींचें निरूपण । जाणोनि श्रीकृष्ण सांगत ॥ ३४ ॥
    तर हा कर्मवैचित्र्याचा प्रकार संकल्पामुळेच घडतो. ह्याच अर्थाचे निरूपण श्रीकृष्ण सांगत आहेत ३४.


    स्वे स्वेऽधिकारे या निष्ठा स गुणः परिकीर्तितः ।
    विपर्ययस्तु दोषः स्यादुभयोरेष निश्चयः ॥ २ ॥
    [श्लोक २] आपापल्या अधिकारानुसार धर्मांचे ठिकाणी दृढ निष्ठा ठेवणे याला गुण म्हटले आहे आणि याविरूद्ध वागणे हाच दोष आहे गुण आणि दोष यांच्या स्वरूपाविषयी हाच निश्चय आहे. (२)


    कर्म विचारितां अवघें एक । परी अधिकारी भिन्नभिन्न देख ।
    ते मी सांगेन आवश्यक । जेणें सुखःदुख भोगणें घडे ॥ ३५ ॥
    विचार केला तर कर्म सारे येथून तेथून एकच आहे. परंतु अधिकार मात्र भिन्न भिन्न असतात. त्यांच्याच योगाने सुखदुःख भोगणे भाग पडते. तें मी तुला अवश्य सांगतों ३५, 


    मुखाचा व्यापार भोजन । तो नाकें करूं जातां जाण ।
    सुख बुडवूनि दारुण । दुःख आपण स्वयें भोगी ॥ ३६ ॥
    भोजन करणे हे मुखाचे काम आहे; हें जर नाकाने करूं लागलों, तर सुख जाऊन भयंकर दुःख मात्र आपणाला भोगावे लागेल ३६.


    कां पायांचें जें चालणें । पडे जैं डोईं करणें ।
    तैं मार्ग न कंठे तेणें । परी कष्टणें अनिवार ॥ ३७ ॥
    पायांचे जे चालणे आहे ते जर डोक्याने करावे लागले, तर त्याने मार्ग सरावयाचा तर नाहीच, पण अनिवार कष्ट मात्र भोगावे लागतील ३७.


    तेवीं जें कर्म स्वाधिकारें । सुखातें दे अत्यादरें ।
    तेचि कर्म अनधिकारें । दुःखें दुर्धरे भोगवी ॥ ३८ ॥
    त्याप्रमाणे अधिकारपरत्वे जें कर्म निश्चयपूर्वक सुखावह होते, तेच कर्म अनधिकाराने केल्यास दुःसह दुःख मात्र भोगावे लागेल ३८.


    गजाचें आभरण । गाढवासी नव्हे भूषण ।
    परी भारें आणी मरण । तेवीं कर्म जाण अनधिकारीं ॥ ३९ ॥
    हत्तीची अंबारी काही गाढवाला भूषणास्पद व्हावयाची नाही. इतकेच नव्हे, तर ते तिच्या भाराने मरूनही जाईल. त्याप्रमणेच अनधिकाराने केलेल्या कर्माची गोष्ट आहे ३९.


    मेघ वर्षे निर्मळ जळ । परी जैसें बीज तैसें फळ ।
    एका भांगी पिके सबळ । एका प्रबळ साळी केळें ॥ ४० ॥
    मेघ वृष्टि करतो ती निर्मळ जळाचीच करतो. तरी जसें बीज असेल तसेंच फळ येते. एका प्रदेशांत नुसती भांगच पिकते, आणि दुसऱ्या प्रदेशांत साळी केळीच रगडून येतात ४०.


    पाहें पां जैसें दुग्ध चोख । ज्वरितामुखीं कडू विख ।
    तेंचि निरुजां गोड देख । पुष्टिदायक सेवनीं ॥ ४१ ॥
    हे पाहा! दूध कितीही उत्तम असले तरी तापकऱ्याच्या तोंडाला जसें कडू विख लागते, पण तेंच निरोगी मनुष्याला गोड लागते; आणि तें प्याल्याने पुष्टिदायक होते ४१.


    तेवीं सकामीं कर्म घडे । ते बाधक होय गाढें ।
    तेंचि कर्म निष्कामाकडे । मोक्षसुरवाडें सुखावी ॥ ४२ ॥
    तद्वत् कामना धरून केलेले कर्म अतिशय बाधक होते. तेच कर्म निष्कामबुद्धीनें केल्यास मोक्षसुखाचे साधन होते ४२.  


    स्वाधिकारें स्वकर्माचरण । तोचि येथें मुख्यत्वें गुण ।
    अनधिकारीं कर्म जाण । तोचि अवगुण महादोष ॥ ४३ ॥
    आपल्या अधिकाराप्रमाणे कर्माचरण करणें तोच येथे मुख्य गुण होय; आणि अनधिकाराने केलेले कर्म, तोच येथे अवगुण म्हणजे महादोष होय ४३.


    या रीतीं गा कर्माचरण । उपजवी दोष आणि गुण ।
    हेंचि गुणदोषलक्षण । शास्त्रज्ञ जाण बोलती ॥ ४४ ॥
    अशा रीतीने कर्माचरण गुण आणि दोष उत्पन्न  करते आणि शास्त्रवेत्ते ह्याच गुणदोषाचे लक्षण सांगतात ४४.


    तेंचि गुणदोषलक्षण । शुद्ध्यशुद्धींचें कारण ।
    तेचि अर्थींचें विवंचन । देवो आपण सांगत ॥ ४५ ॥
    हेच गुणदोषलक्षण शुद्धाशुद्धीला कारण आहे. ह्याच अर्थाचें विवेचन देव आपण सांगतात ४५.


    शुद्ध्यशुद्धी विधीयेते समानेष्वपि वस्तुषु ।
    द्रव्यस्य विचिकित्सार्थं गुणदोषौ शुंभाशुभौ ॥ ३ ॥
    [श्लोक ३] सर्व वस्तू सारख्याच असल्या, तरी पदार्थांचे गुणदोष शुभअशुभ किंवा शुद्धअशुद्ध हे भेद, पदार्थ योग्य किंवा अयोग्य हे ठरवण्यासाठी केलेले असतात. (३)


    पंचभूतें समान जाण । वस्तु सर्वत्र समसमान ।
    तेथ गुणदोष अप्रमाण । परी केलें प्रमाण या हेतू ॥ ४६ ॥
    पंचमहाभूते ही समानच आहेत. तसेंच परब्रह्मही सर्वत्र समसमानच आहे. तेथे गुणदोष अप्रमाण म्ह. मिथ्या आहेत. परंतु ते वर सांगितलेल्या हेतूनेच प्रमाणभुत झाले आहेत ४६.


    न प्रेरितां श्रुतिस्मृती । आविद्यक विषयप्रवृत्ती ।
    अनिवार सकळ भूतीं । सहजस्थितिस्वभावें ॥ ४७ ॥
    श्रुतीने किंवा स्मृतीने सांगितल्याशिवायच सर्व प्राणिमात्रांमध्ये आविद्यक विषयप्रवृत्ति स्वभावसिद्धच असते ४७.


    ऐसी स्वाभाविक विषयस्थिती । तिची करावया उपरती ।
    नाना गुणदोष बोले श्रुती । विषयनिवृत्तीलागुनी ॥ ४८ ॥
    अशी विषयवासना नैसर्गिकच असल्यामुळे तिची उपरति म्ह. निवृत्ति करण्याकरितांच श्रुतीने अनेक प्रकारचे गुणदोष सांगितले आहेत ४८.


    हें एक शुद्ध एक अशुद्ध । पैल शुभ हें विरुद्ध ।
    मीचि बोलिलों वेदानुवाद । विषयबाध छेदावया ॥ ४९ ॥
    विषयाची बाधा दूर करण्याकरितां एक शुद्ध व एक अशुद्ध ; पलीकडचें तें शुभ, अलीकडचे हे अशुभ. असें वेदवाणीच्या रूपाने मीच सांगून ठेवले आहे ४९.


    विषयांची जे निवृत्ती । तिची वेदरुपें म्यां केली स्तुति ।
    निंदिली विषयप्रवृत्ती । चिळसी चित्तीं उपजावया ॥ ५० ॥
    विषयांची जी निवृत्ति, तिची वेदरूपाने मीच स्तुति केलेली आहे. मनांत चिळस उत्पन्न होण्यासाठींच विषयवृत्तीची निंदाही मीच केली आहे ५०.


    चालतां कर्मप्रवृत्ती । हो विषयांची निवृत्ती ।
    ऐशी वेदद्वारें केली युक्ती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ५१ ॥
    कर्मप्रवृत्ति चालत असतां विषयांची निवृत्ति होवो अशी वेदाच्या द्वाराने मी युक्ति करून ठेविली आहे. तीच तुला सांगतों ऐक ५१.


    धर्मार्थं व्यवहारार्थं यात्रार्थमिति चानघ ।
    दर्शितोऽयं मयाऽऽचारो धर्ममुद्वहतां धुरम् ॥ ४ ॥
    [श्लोक  ४] हे उद्धवा ! धर्मानुसार कर्मे करणार्‍यांच्या धर्मासाठी, व्यवहारासाठी आणि शरीरनिर्वाहासाठी मी हा आचार सांगितला आहे. (४)


    उद्धवा तूं निष्पाप त्रिशुद्धी । यालागीं तुझी शुद्ध बुद्धी ।
    धर्मादि व्यवहारसिद्धी । ऐक तो विधि सांगेन ॥ ५२ ॥
    उद्धृवा! तूं खरोखर निष्पाप आहेस. म्हणून तुझी बुद्धिही शुद्ध आहे. ह्याकरितां धर्मादि व्यवहारसिद्धीचाही विधि तुला सांगतो ऐक ५२.


    करितांही धर्माचरण । प्रवृत्तिधर्म तो अप्रमाण ।
    निवृत्तिधर्म तो अतिशुद्ध जाण । हे दोषगुण स्वधर्मीं ॥ ५३ ॥
    धर्माचरण करीत असतांनाही प्रवृत्तिधर्म हा अप्रमाण आहे. निवृत्तिधर्मच अत्यंत शुद्ध होय. हेच स्वधर्मातील गुणदोष होत ५३.


    जो व्यवहार विषयासक्तीं । ते अशुद्ध व्यवहारस्थिती ।
    जे परोपकारप्रवृत्ती । तो व्यवहार वंदिती सुरनर ॥ ५४ ॥
    विषयाच्या आसक्तीने जो जो व्यवहार करावा, तो तो अशुद्धच होय; आणि परोपकारवृत्तीने जो व्यवहार करावा तो देवाला व मनुष्याला वंद्य होतो ५४.


    अद्रुष्टदाता ईश्वर । हें विसरोनि उत्तम नर ।
    द्रव्यलोभें नीचांचे दारोदार । हिंडणें अपवित्र ते यात्रा ॥ ५५ ॥
    अदृष्टदाता ईश्वर आहे, हे मोठमोठे पुरुष विसरून जातात; आणि द्रव्यलोभाने नीचांच्या दारोदार हिंडत असतात, ती अमंगल यात्रा होय ५५.


    आळस सांडोनि आपण । करूं जातां श्रवण कीर्तन ।
    कां तीर्थयात्रा साधुदर्शन । पूजार्थ गमन देवालयीं ॥ ५६ ॥
    परंतु आपण आळस सोडून कीर्तनादि श्रवण करणे किंवा तीर्थयात्रा करणे, साधूंची दर्शनें घेणे, किंवा पूजा करावयासाठी देवालयांत जाणे ५६.


    कां अनाथप्रेतसंस्कार । करितां पुण्य जोडे अपार ।
    पदीं कोटियज्ञफळसंभार । जेणें साचार उपजती ॥ ५७ ॥
    किंवा अनाथाचा प्रेतसंस्कार करणे, ह्या योगानें अगणित पुण्य लागते. इतकेच नव्हे, तर पावलोपावली तेणेकरून कोटि यज्ञांचें फळ उत्पन्न होते ५७.


    जेणें पाविजे परपार । तिये नांव यात्रा पवित्र ।
    हा यात्रार्थसंचार । गुणदोषविचार वेदोक्त ॥ ५८ ॥
    ज्याच्या योगाने संसारांतून पार जाता येईल, तिचेच नांव पवित्र यात्रा. हेच वेदांत सांगितल्याप्रमाणे यात्रेस जाणे, आणि हाच गुणदोषांचा विचार होय ५८.


    राजा निजपादुका हटेंसीं । वाहवी ब्राह्मणाचे शिसीं ।
    तो दोष न पवे द्विजासी । स्वयें सदोषी होय राजा ॥ ५९ ॥
    राजाने आपले जोडे जर हट्टानें ब्राह्मणांच्या डोक्यावर दिले, तर तो दोष कांहीं ब्राह्मणाला लागावयाचा नाहीं; तर राजा हा स्वतःच दोषी होतो ५९.


    जेवीं आपत्काळबळें जाण । पडतां लंघनीं लंघन ।
    तैं घेऊनि नीचाचें धान्य । वांचवितां प्राण दोष नाहीं ॥ ६० ॥
    त्याचप्रमाणे आपत्काल प्राप्त झाला असतां उपासावर उपास पडू लागले, तर नीचाचे धान्य घेऊन प्राण वाचविला तर त्यात काही दोष नाहीं ६०.


    तेंचि नीचाचें दान । अनापदीं घेतां जाण ।
    जनीं महादोष दारुण । हेंही जाण वेदोक्त ॥ ६१ ॥
    पण तेंच नीचाचें दान आपत्काल नसतांना घेतले तर लोकांमध्ये महादोष लागतो. हेही वेदांतच सांगितलेले आहे ६१.


    जे कर्मधर्मप्रवर्तक शुद्ध । मनुपराशरादि प्रसिद्ध ।
    तिंहीं गुणदोष विविध । शुद्धाशुद्ध बोलिले ॥ ६२ ॥
    प्रसिद्ध असे मनु-पराशरादिक शद्ध कर्मधर्मप्रवर्तक होऊन गेले. त्यांनी नानाप्रकारांनी गुणदोष व शुद्धाशुद्ध सांगून ठेवले आहे ६२.


    तेंचि शुद्धाशुद्धनिरूपण । तीं श्लोकीं नारायण ।
    स्वयें सांगताहे आपण । गुणदोषलक्षणविभाग ॥ ६३ ॥
    तेच गुणदोषाचे विभाग व शुद्धाशुद्धविषयक निरूपण तीन श्लोकांनी स्वतः नारायण आपण होऊन सांगत आहेत ६३.


    भूम्यंब्वग्न्यनिलाकाशा भूतानां पञ्च धातवः ।
    आब्रह्मस्थावरादीनां शारिरा आत्मसंयुताः ॥ ५ ॥
    वेदेन नामरूपाणि विषमाणि विषमाणि समेष्वपि ।
    धातुषृद्धव कल्प्यन्ते एतेषां स्वार्थसिद्धये ॥ ६ ॥
    [श्लोक ५/६] पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूतेच ब्रह्मदेवापासून स्थावरापर्यंत सर्व प्राण्यांच्या शरीरांना मूळ कारण आहेत अशा तर्‍हेने सर्व स्थावरजंगम शरीरांच्या दृष्टीने समान आहेत आणि सर्वांचा आत्मासुद्धा एकच आहे. (५)
    हे उद्धवा ! सर्वांचे देह समान असले तरी वेदाने त्यांची नावे आणि रूपे वेगवेगळी सांगितली आहेत कारण त्यांनी त्या नामरूपानुसार आचरण करून आपल्या स्वाभाविक प्रवृत्तीला आळा घालून चारही पुरूषार्थांची सिद्धी करून घ्यावी, म्हणून. (६)


    पृथ्वी आप तेज वायु गगन । ब्रह्म्यादि स्थावरान्त जाण ।
    भूतीं पंचभूतें समान । वस्तुही आपण सम सर्वीं ॥ ६४ ॥
    ब्रह्मदेवापासून तो स्थावरजंगमापर्यंत सर्व प्राण्यांमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश ही पंचमहाभूतें समसमानच आहेत; आणि ब्रह्मवस्तुही सर्वामध्ये समसमानच आहे ६४.


    नाहीं नाम रूप गुण कर्म । ऐसें जें केवळ सम ।
    तेथ माझेनि वेदें विषम । केलें रूप नाम हितार्थ ॥ ६५ ॥
    ज्याला नाम व रूप नाहीं, गुण नाहीं व कर्मही नाही, अशा सम ब्रह्माचे ठिकाणी लोककल्याणाकरितां माझ्या वेदानें नामरूपाचे भेद कल्पून ठेवले आहेत ६५.


    तळीं पृथ्वी वरी गगन । पाहतां दोनीही समान ।
    तेथ दश दिशा कल्पिल्या जाण । देशांतरगमनसिद्ध्यर्थ ॥ ६६ ॥
    खाली पृथ्वी आणि वर आकाश पाहावयास गेले असतां दोन्ही सारखीच दिसतात; परंतु देशांतरी जाण्यास सोपे पडावे म्हणून दशदिशांची कल्पना करून ठेवली आहे ६६.


    तेवीं नाम रूप वर्णाश्रम । समाच्या ठायीं जें विषम ।
    हा माझेनि वेदें केला नेमे स्वधर्मकर्मसिद्ध्यर्थ ॥ ६७ ॥
    त्याप्रमाणे नाम, रूप आणि वर्णाश्रम, हे माझ्या वेदाने समाच्या ठिकाणी जें विषम उत्पन्न करून ठेवले आहे, ते स्वधर्मकर्माच्या सिद्धीसाठींच ६७.


    येणेंचि द्वारें सुलक्षण । धर्मार्थकाममोक्षसाधन ।
    पुरुषांच्या हितालागीं जाण । म्यां केलें नियमन वेदाज्ञा ॥ ६८ ॥
    ह्याच द्वाराने पुरुषांच्या हिताकरितां उत्तम लक्षणांनी युक्त असे धर्मार्थकाममोक्षसाधनांचे नियम अथवा नियंत्रण मी वेदाज्ञेच्या रूपानें केलें आहे ६८.


    रूप नाम आश्रम वर्ण । वेदु नेमिता ना आपण ।
    तैं व्यवहारु न घडता जाण । मोक्षसाधन तैं कैंचें ॥ ६९ ॥
    रूप, नाम, आश्रम, वर्ण यांचे नियम वेदाने घालून दिले नसते, तर मुळी व्यवहारच चालला नसता; मग मोक्षसाधन कसे होणार ? ६९.


    एवं वेदें चालवूनि व्यवहारु । तेथेंचि परमार्थविचारु ।
    दाविला असे चमत्कारु । सभाग्य नरु तोचि जाणे ॥ ७० ॥
    अशा प्रकारे वेदाने व्यवहार चालवून त्यांतच परमार्थविचाराचा चमत्कारही दाखवून दिला आहे; परंतु भाग्यवान् असेल त्यालाच तो कळेल ७०.


    अत्यंत करिता कर्मादरु । तेणें कर्मठचि होय नरु ।
    तेथ परमार्थ नाहीं साचारु । विधिनिषेधीं थोरु पीडिजे ॥ ७१ ॥
    कर्मावरच अतिशय भर ठेवला, तर तो पुरुष कर्मठच होऊन राहील; त्यामुळे परमार्थ साधणार नाही; त्याला विधिनिषेधाचा त्रास मात्र सोसावा लागेल ७१ . 


    केवळ स्वधर्मकर्म सांडितां । अंगीं आदळे पाषंडता ।
    तेणेंही मोक्ष न ये हाता । निजस्वार्था नागवले ॥ ७२ ॥
    बरें, स्वधर्मकर्म निखालस सोडून दिले, तर अंगावर पाखंडीपणा येऊन आदळेल ! त्यामुळे मोक्ष हाती न येता आपल्या हितावर पाणी पडेल! ७२.


    यालागीं स्वधर्म आचरतां । निजमोक्ष लाभे आइता ।
    हे वेदार्थाची योग्यता । जाणे तो ज्ञाता सज्ञान ॥ ७३ ॥
     ह्याकरितां स्वधर्म आचरण करीत असतांच आयता मोक्षलाभ होईल अशी वेदार्थाची योग्यता ज्याच्या लक्षात येईल, तो ज्ञाता शहाणा होय ७३.


    हे वेदार्थनिजयोग्यता । सहसा न ये कवणाचे हाता ।
    याचिलागीं गा परमार्थ । गुरु तत्त्वतां करावा ॥ ७४ ॥
    पण जें  वेदाच्या अर्थातील रहस्य सहसा कोणाच्या हाती लागत नाही. ह्याचसाठी परमार्थमार्ग दाखविणारा गुरु केला पाहिजे ७४.


    त्या सद्गुगरूची पूर्ण कृपा होय । तरीच आतुडे वेदगुह्य ।
    गुरुकृपेवीण जे उपाय । ते अपाय साधकां ॥ ७५ ॥
    त्या सदुरूची पूर्ण कृपा होईल तरच वेदांतील रहस्य हाती लागेल. गुरुकृपेशिवाय जी जी साधने करावीत, ती ती साधकांना अपायकारक मात्र होतात ७५.


    यालागीं माझा वेद जगद्गुेरु । दावी आपातता व्यवहारु ।
    नेमी स्वधर्मकर्मादरु । जनाचा उद्धारु करावया ॥ ७६ ॥
    ह्याकरितां माझा वेद हा जगाचा गुरु आहे. त्याने प्रथमदर्शनी व्यवहार दाखवून लोकांचा उद्धार करण्यासाठी स्वधर्मकर्मादर लावून दिला आहे ७६.


    ऐसा माझा वेदु हितकारी । दावूनि गुणदोष नानापरी ।
    जन काढी विषयाबाहेरीं । वेद उपकारी जगाचा ॥ ७७ ॥
    असा माझा वेद लोकहितकारी आहे. तो नाना प्रकारचे गुणदोष दाखवून लोकांना विषयाच्या बाहेर काढतो. अशा रीतीने वेद हा जगावर उपकार करतो ७७.


    देशकालादिभावानां वस्तुनां मम सत्तम ।
    गुणदोषौ विधीयेते नियमार्थं हि कर्मणाम् ॥ ७ ॥
    [ श्लोक ७] हे श्रेष्ठ उद्धवा ! देश, काल इत्यादींबद्दल आणि पदार्थांच्याबद्दल जे गुणदोषांचे विधान सांगितले गेले आहे, ते कर्म नियमितरूपाने व्हावे, यासाठी. (७)


    भक्तांमाजी भक्तोत्तम । साधुलक्षणीं साधुसम ।
    यालागीं उद्धवासी 'सत्तम' । म्हणे पुरुषोत्तम अतिप्रीतीं ॥ ७८ ॥
    उद्धव हा भक्तांमध्ये अत्युत्तम भक्त आणि साधुलक्षणांमध्ये साधूसारखाच असल्यामुळे श्रीकृष्ण त्याला अत्यंत प्रेमाने 'सत्तम' म्हणजे हे साधुश्रेष्ठा असे म्हणाले ७८.


    उद्धवा येथ भलता नर । भलता करील कर्मादर ।
    यालागीं वर्णाश्रमविचार । नेमिला साचार वेदांनीं ॥ ७९ ॥
    उद्धवा! ह्या जगामध्ये हवा तो मनुष्य हवें तें कर्माचरण करूं लागेल, ह्याकरितां वेदांनी वर्णाश्रमाचा विचार ठरवून टाकला आहे ७९.


    जेथ करूं नये कर्मतंत्र । ऐसा देश जो अपवित्र ।
    आणि काळादि द्रव्य विचित्र । पवित्रापवित्र सांगेन ॥ ८० ।
    जेथें कर्मतंत्र करता कामा नये असा जो अपवित्र देश, आणि अपवित्र काल व वस्तु, ह्यांचीही पवित्रता व अपवित्रता तुला मी सांगेन ८०


    अकृष्णसारो देशानामब्रह्मण्योऽशुचिर्भवेत् ।
    कृष्णसारोऽप्यसौवीरकीकटासंस्कृतेरिणम् ॥ ८ ॥
    [श्लोक ८] ज्या देशात काळवीट नसतील आणि जेथील लोक ब्राह्मणभक्त नसतील, तो देश अपवित्र होय. काळवीट असले तरी जेथे संतपुरूष राहातात, तेवढाच भाग सोडून अंग, वंग, कलिंग इत्यादी देश अपवित्र होत तसेच असंस्कृत लोक राहात असलेला किंवा रेताड प्रदेशही अपवित्रच होय. (८)


    कोणे एके पृथ्वीतळीं । मेघ न वर्षतां जळीं ।
    पेरिलीं धान्यें सदा निळीं । वसुधा-जिव्हाळी ते म्हणती ॥ ८१ ॥
    पृथ्वीवर एखाद्या ठिकाणीं मेघवृष्टि मुळीच होत नाही; पण तेथे पेरलेली शेते हिरवींचार दिसतात. तेव्हां ती जमीनच पाणथळ आहे असे म्हणतात ८१.


    तेंचि पाहतां पृथ्वीवरी । एके भागीं गा उखरी ।
    मेघ वर्षतां शरधारीं । अंकुरेना डिरी उखरत्वें ॥ ८२ ॥
    त्याच पृथ्वीवर दुसऱ्या ठिकाणी पाहावं तर, एका ठिकाणी अगदीच खडकाळ जमीन असते, तेथें मुसळधार पाऊस पडला तरी जमीनच खडकाळ असल्यामुळे तेथे अंकुरच येत नाहीं! ८२.


    तेवीं देशाची शुद्ध्यशुद्धी । तुज मी सांगेन यथाविधी ।
    जेथ कर्मीं नोहे कार्यसिद्धी । तेथ कर्म त्रिशुद्धी न करावें ॥ ८३ ॥
    त्याप्रमाणे देशाची शुद्धाशुद्धि आहे, ती मी तुला सविस्तर सांगतो. जेथें  कर्माने कार्यसिद्धि होत नाही, त्या ठिकाणी मुळींच कर्म करू  नये ८३.


    कृष्णामृग जेथ नाहीं । ते जाण पां अपवित्र भुयी ।
    कर्मादरु तिये ठायीं । न करावा पाहीं सर्वथा ॥ ८४ ॥
    जेथें कृष्णमृग नसतो ती भूमि अपवित्र म्हणून समजावी. तशा ठिकाणी कधीही कर्म करण्याची यातायात करूं नये ८४.


    जेथ ब्राह्मणचि नाहीं । तो देश अपवित्र पाहीं ।
    ब्राह्मण अकर्मीं जे ठायी । भूमी तेही अपवित्र ॥ ८५ ॥
    तसेच जेथे ब्राह्मणच नसतो, तो देश अपवित्र होय; किंवा जेथें निषिद्ध कर्म करणारे ब्राह्मण असतील; ती भूमिही अपवित्रच होय ८५.


    जेथ ब्राह्मणाची अभक्ती । शेखों हेळूनि निंदिती ।
    तो देश गा कर्माप्रती । जाण निश्चितीं अपवित्र ॥ ८६ ॥
    त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी ब्राह्मणांवर भक्ति नाही, शेवटी त्यांची निंदा करून अवहेलनाही करतात, तो देशही कर्माला खरोखर अपवित्र होय हे लक्षात ठेव ८६.


    जे देशीं कृष्णमृग असती । परी नाहीं भगवद्भतक्ती ।
    तो देश कर्मप्रती । जाण निश्चितीं अपवित्र ॥ ८७ ॥
    एखाद्या देशांत कृष्णमृगही असतात, परंतु भगवद्गक्ति नसते, तो देशही कर्माला निश्चयाने अपवित्र आहे असे समज ८७.


    भक्तिहीन देश प्रसिद्ध । कीकट कलिंग मागध ।
    तेथ स्वधर्म नव्हती शुद्ध । जाण अशुद्ध ते देश ॥ ८८ ॥
    कीकट, कलिंग, आणि मागध हे देश भक्तिहीन असल्याविषयी प्रसिद्ध आहेत. ते देश अशुद्ध असल्यामुळे तेथेही स्वधर्म शुद्ध होत नाहीत ८८.


    नाहीं उपलेप संमार्जन । ते स्वगृहीं भूमी अशुद्ध जाण ।
    कां जेथ वेदबाह्य असज्जन । तेंही स्थान अपवित्र ॥ ८९ ॥
    जेथें सडा संमार्जन होत नाही, अशी आपल्या घरांतील जमीनही अशुद्धच समजावी; किंवा जेथें वेदबाह्य असे दुर्जन राहातात, तेंही स्थान अपवित्र होय ८९.


    जे भूमी केवळ उखर । ते जाण सदा अपवित्र ।
    आतां काळाचें काळतंत्र । पवित्रापवित्र सांगेन ॥ ९० ॥
    जी जमीन केवळ खडकाळ असते, तीही सदा अपवित्रच होय. आता काळाच्या तंत्राचीही पवित्रापवित्रता सांगतों ९०.


    कर्मण्यो गुणवान्कालो द्रव्यतः स्वत एव वा ।
    यतो निवर्तते कर्म स दोषोऽकर्मकः स्मृतः ॥ ९ ॥
    [श्लोक ९] जेव्हा कर्म करण्यास योग्य अशी सामग्री मिळून कर्मही होऊ शकेल, ती वेळ चांगली समजावी आणि ज्यावेळी सामग्री न मिळाल्याने किंवा अन्य कारणाने कर्म होऊ शकत नाही, तो काळ वाईट होय. (९)


    देश काळ द्रव्य पात्र । हे सामग्री होय स्वतंत्र ।
    तोचि काळ अतिपवित्र । वेदशास्त्रसंमत ॥ ९१ ॥
    ज्या काळी देश, काल, द्रव्य आणि पात्र ही सामुग्री स्वतंत्रपणे मिळेल तोच काळ अत्यंत पवित्र असून वेदशास्त्राला संमत आहे ९१.


    ग्रहणकपिलाषष्ठ्यादिद्वारा । तो काळ परम पवित्र खरा ।
    कां संतसज्जन आलिया घरा । काळाचा उभारा अतिपवित्र ॥ ९२ ॥
    ग्रहण, कपिलाषष्ठी , इत्यादि पर्वांच्या द्वारें जो काळ येतो, तो काळ परम पवित्र होय. तसेंच संतसज्जन घरी आले असतां तो काळ अत्यंत पवित्र समजावा ९२.


    हो कां संपत्ति आलिया हाता । कां धर्मी उल्हास जेव्हां चित्ता ।
    तो 'पुण्यकाळ' तत्त्वतां । वेदशास्त्रार्थां अनुकूल ॥ ९३ ॥
    किंवा अकल्पितपणे संपत्ति मिळाली, किंवा धर्म करण्याचा चित्ताला उल्हास वाटला, तो काळ खरोखर 'पुण्यकाळ' असून वेदशास्त्रांनाही मान्य असतो ९३.


    पुरुषासी पर्वकाळ । जन्मात जोडे एकवेळ ।
    मातापित्यांचा अंतकाळ । ते धर्माची वेळ अपवित्र ॥ ९४ ॥
    खरा पर्वकाळ पुरुषाला जन्मामध्ये एकच वेळ प्राप्त होत असतो. तो कोणता ? तर मातापित्याचा अंतकाळ ! ती धर्माची अत्यंत पवित्र वेळ म्हणून समजावी ९४.


    हा पर्वकाळ मागुता । पुरुषासी नातुडे सर्वथा ।
    तेथ श्रद्धेनें धर्म करितां । पवित्रता अक्षय ॥ ९५ ॥
    हा पर्वकाळ पुरुषाला पुन्हा मिळत नसतो. अशा वेळी श्रद्धापूर्वक धर्म केल्यास अक्षय पवित्रता प्राप्त होते ९५.


    स्वभावें काळाची पवित्रता । तुज मी सांगेन आतां ।
    जो उपकारी सर्वथा । निजस्वार्था साधक ॥ ९६ ॥
    आता काळाची स्वाभाविक पवित्रता कोणती ती मी तुला सांगतो. तो काळ सर्वोपरी उपकारक व साधकाचा निजस्वार्थ साधणारा आहे ९६.


    ब्राह्म मुहूर्त तत्त्वतां । पवित्र जाण स्वभावतां ।
    जो साधकांच्या निजस्वार्था । होय वाढवितां अनुदिनीं ॥ ९७ ॥
    खरोखर 'ब्राह्ममुहूर्त' म्ह० पहाटे सूर्योदयापूर्वीच्या पांच घटका, हा स्वभावतांच पवित्र होय; ती वेळ साधकाच्या हिताची असून दिवसेंदिवस हिताची वृद्धीच करीत असते ९७.


    काळाची अकर्मकता । ऐक सांगेन मी आतां ।
    कर्म करूं नये स्वभावतां । निषिद्धता महादोषु ॥ ९८ ॥
    आतां कर्माला अयोग्य काळ कोणता तेंही सांगतों ऐक. अशा वेळी स्वभावतां कर्म करूंच नये, कारण तो काळ निषिद्ध असल्यामुळे मोठा दोष लागतो ९८.


    जेथ जळस्थळादि सर्वथा । विहित द्रव्य न ये हाता ।
    तो काळ अकर्मकता । जाण तत्त्वतां निश्चित ॥ ९९ ॥
    ज्या ठिकाणी जळ, स्थळ किंवा विहित द्रव्यही मिळत नसेल, तो काळ खरोखर कर्म करण्यास योग्य नव्हे हे लक्षात ठेव ९९.


    जो काळ सूतकें व्यापिला । कां राष्ट्र-उपप्लवें जो आला ।
    जे काळीं देह परतंत्र झाला । तो काळ बोलिला अकर्मक ॥ १०० ॥
    ज्या काळांत सुतक असेल, किंवा राष्ट्रावर कांहीं संकट ओढवले असेल किंवा ज्या वेळी देहाला परतंत्रता आलेली 'असेल, तो कालही कर्म करण्यास योग्य नव्हे असे म्हटलेलें आहे १००. 

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...