मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १७ ओव्या १ ते १००

    श्रीगणेशाय नमः । श्रीकृष्णायनमः ॥

    ॐ नमो श्रीसद्‍गुरु महामेरु । सुक्ष्मस्वरूपें तूं गिरिवरु ।
    चैतन्यस्वभावें अतिथोरु । तूं आधारु सर्वांचा ॥ १ ॥
    हे ओंकाररूप सद्गुरो ! तुला नमस्कार असो. तूं महामेरुस्वरूप आहेस. तूं सूक्ष्मस्वरूपाने पर्वत आहेस. असें जरी दिसले, तरी चैतन्यरूपानें तूं अत्यंत थोर असल्यामुळे तूं सर्वांचाच आधार आहेस १. 


    तुझ्या निजबोधाचीं शिखरें । वैकुंठकैलासादि अतिथोरें ।
    तेथें ब्रह्माविष्णुमहारुद्रें । तुझेनि आधारें नांदिजे ॥ २ ॥
    वैकुंठ, कैलास, इत्यादि तुझ्या आत्मज्ञानाची अत्यंत उच्च उंच शिखरे आहेत. तेथें ब्रह्मा, विष्णु आणि महेश्वर हे तुझ्याच आधाराने राहतात २.


    तुझिया आधारस्थितीं । नांदती त्रैलोक्य-लोकपंक्ति ।
    सकळ भूतांची उत्पत्ति स्थिती । निदान अंतीं तुजमाजीं ॥ ३ ॥
    ही त्रैलोक्ये आणि सर्व लोक तुझ्याच आधाराने राहिले आहेत. सर्व प्राणिमात्रांची उत्पत्ति, स्थिति, आणि शेवटीं लय ही तुझ्यामध्येच होतात ३.


    सुरासुर लहानथोर । एक सौम्य एक क्रूर ।
    इयें भूतें धरूनि निर्विकार । स्वरूप साचार पैं तुझें ॥ ४ ॥
    देव, दैत्य, लहान, थोर, सौम्य, क्रूर, अशी नानाप्रकारची भूतें धारण करूनही खरोखर तुझे स्वरूप निर्विकारच आहे ४.


    तेथ विवेकाचें आगर । सच्चिदानंदाचे रत्‍नाकर ।
    तेथील लाधल्या कंकर । नीच ते थोर वेव्हारे होती ॥ ५ ॥
    त्यांत विवेकाचे शेत असून चिद्रत्नाच्या खाणी आहेत. तेथचा एक खडा जरी हाती लागला, तरी हलके मनुष्यही मोठे व्यापारी बनतील ५.


    ज्याच्या औषधींचा चमत्कार । सेवितां करिती अजरामर ।
    जेथ चिद्‍गंगेचे निर्झर । निरंतर प्रवाहती ॥ ६ ॥
    त्या पर्वतावरील औषधींचा तर मोठाच चमत्कार आहे. त्यांचे सेवन केले असता त्याला त्या अजरामरच करितात. त्यावर ज्ञानगंगेचे झरेही रात्रंदिवस वहात असतात ६.


    जो सुरनरांचा विश्राम । जो सकळ आश्रमांचा आश्रम ।
    जो क्रियाकर्मांचें नैष्कर्म्य । जो निजधाम जीवाचे ॥ ७ ॥
    जो देवांचे आणि मनुष्यांचे विश्रांतिस्थान, जो ब्रह्मचर्यादि सर्व आश्रमांचाही आश्रम, जो क्रियाकर्माचें नैष्कर्म्य, आणि जो जीवांचें निजधाम होय ७; 


    जो भजनाची कुळवाडी । जो भक्तजीवनाची वाडी ।
    जो आवडीची निजआवडी । जो गोडियेची गोडी निजात्मता ॥ ८ ॥
    जो भजनाचे क्षेत्र, भक्तांच्या जीवनाची बागाईत जमीन; जो आवडीचीही आवड; आणि जो आत्मानुभवाने गोडीचीही गोडी ८, 


    ऐसा सद्‍गुरु महामेरु । जो कठिणत्वेंवीण आधारु ।
    ज्याचेनि अंगें संसारु । होय सुखकरु साधकां ॥ ९ ॥
    असा जो सद्गुरुरूप महामेरु, जो कठिणपणाशिवायच सर्वांना आधार, ज्याच्या योगानें साधकांचा संसारही सुखमय होऊन जातो ९, 


    त्या साधकांचें सामाधान । शिष्यांचा स्वानंदघन ।
    आर्त-चातकां निजजीवन । स्वामी जनार्दन तुष्टला ॥ १० ॥
    त्या साधकांचे समाधान, शिष्यांना तर आत्मानंदरूपमेघ, मुमुक्षुरूप चातकांचे केवळ जीवन, असा जो जनार्दनस्वामी, तो प्रसन्न झाला १०. 


    तयाचा जो चरणप्रसादु । श्रीभागवतीं एकादशस्कंधु ।
    पूर्वार्धाचा विनोदु । भाषाप्रबंधु वाखाणिला ॥ ११ ॥
    त्याच्या चरणांचा जो कृपाप्रसाद, त्याच्या योगाने श्रीमद्भागवतांतील एकादशस्कंधाचा पूर्वार्ध मोठ्या आनंदाने कवितारूपाने वर्णन केला ११. 


    तेथें उद्धवें पुशिल्या विभूती । त्या षोडशाध्यायीं श्रीपती ।
    सांगितल्या यथानिगुतीं । भजनस्थितीलागोनी ॥ १२ ॥
    त्यात उद्धवाने श्रीकृष्णाला विभूती विचारल्या. त्या सोळाव्या अध्यायामध्ये लक्ष्मीपतींनी भजनाप्रीत्यर्थं यथार्थ रीतीनें सांगितल्या १२.


    त्या विभूतींमाजीं निजवर्म । `भक्तांचें जें भजनकर्म ।
    तें मी केवळ आत्माराम' । ऐसें पुरुषोत्तम बोलिला ॥ १३ ॥
    त्या विभूतिवर्णनामध्यें गुह्य गोष्ट म्हणून श्रीकृष्ण असें म्हणाला की, भक्तांचे जे भजनकर्म म्हणून आहे , ते केवळ मीच आत्माराम होय  १३. 


    तेथ आशंकेची व्युत्पत्ती । 'करितां कर्माची कर्मगती ।
    कर्मठ जाहले नेणों किती । तरी कर्में मुक्ती घडे केवीं' ॥ १४ ॥
    तेव्हा त्यात एक शंका उत्पन्न झाली की, सतत कर्में आचरीत असता किती तरी लोक केवळ कर्मठ झाले आहेत ; त्यांची गणतीच नाही . तेंव्हा कर्माने मुक्ति कशी मिळते ? १४.  


    कर्में करितां वाडेंकोडें । कर्मीं कर्मठता न चढे ।
    कर्मांमाजीं मोक्ष आतुडे । हेंचि रोकडें पुसों पां ॥ १५ ॥
    आवडीने कर्में  करीत असतां, कर्मामध्ये कर्तव्यतेचा अभिमान चढावयाचा नाही, आणि कर्मापासून मोक्षप्राप्ति होईल असा उपाय प्रत्यक्ष विचारूं १५, 


    स्वयें बोलिला श्रीपती । `सात्त्विकांची जे कर्मस्थिती ।
    ते कर्मचि माझी विभूती' । हें सोळाव्याअंतीं निरूपिलें ॥ १६ ॥
    कारण लक्ष्मीपतींनी स्वत:च सांगितले आहे की, सात्विकांचें जें कर्म चालत असते, तें कर्म हीच माझी विभूति आहे. असें सोळाव्या अध्यायाच्या अंती सांगितले आहे १६. 


    स्वयें आचरितां स्वकर्म । तें कर्मचि होय ब्रह्म ।
    हेंचि कर्मक्रियेचें वर्म । देवासी सुगम पुसों पां ॥ १७ ॥
     आपण होऊन स्वकर्माचे आचरण केले असतां तें कर्मच ब्रह्मस्वरूप होते, हे जें कर्मक्रियेतील वर्म आहे, तेंच सुलभ रीतीने सांगण्याविषयीं देवांना विचारूं १७.


    ऐसा पोटिंचा आवांका । तेचि पुसावया आशंका ।
    वर्णाश्रमांची स्वधर्मपीठिका । देवासी देखा पुसत ॥ १८ ॥
    उद्धवाच्या मनांतील हाच हेतु होता, म्हणून तीच शंका विचारण्यासाठी देवाला वर्णाश्रमांची व स्वधर्माची मूळपीठिकाच तो विचारूं लागला १८.


    उद्धव उवाच-
    यस्त्वयाभिहितः पूर्वं धमस्त्वद्‍भक्तिलक्षणः ।
    वर्णाश्रमाचारवतां सर्वेषां द्विपदामपि ॥ १ ॥
    [श्लोक १] उद्धव म्हणाला हे कमलनयन श्रीकृष्णा ! आपण पूर्वी वर्णाश्रमांचे आचार पाळणार्‍या माणसांसाठी तसेच सर्वच माणसांसाठी तुमच्या भक्तीचे साधन म्हणून जो धर्म सांगितला होता, (१)


    उद्धव म्हणे गा भक्तपती । ऐकतां तुझ्या निजविभूति ।
    मज ऐसें गमलें चित्तीं । स्वधर्मेंसीं भक्ती घडे कैसी ॥ १९ ॥
    उद्धव म्हणाला, हे भक्तांच्या ईश्वरा! 'तुझ्या आत्मविभूति श्रवण करितांना माझ्या मनांत असें वाटलें की, स्वधर्मानें भक्ति कशी घडेल ? १९.


    तुवां कल्पादि वाडेंकोडें । स्वधर्मकर्में भक्ति जोडे ।
    हें वर्णाश्रमनिजनिवाडें । निरूपण चोखडें निरूपिलें ॥ २० ॥
    तूं तर कल्पाच्या आदीपासूनच मोठ्या कळकळीने सांगत आला आहेस की, स्वधर्मकर्मानेंच भक्ति प्राप्त होते आणि त्याकरितांच वर्णाश्रम कसकसे आहेत ह्यांचे उत्कृष्ट प्रतिपादन तूं  केलें आहेस २०.


    सर्वां मानवां परम गति । स्वधर्में घडे भगवद्‍भक्ति ।
    या निरूपणाची निगुती । तुवां निश्चितीं निरूपिली ॥ २१ ॥
    सर्व मनुष्यांना उत्तम गति आणि भगवद्भक्ति ही स्वधर्मानेंच प्राप्त होतात, असें तूंच यथार्थ व निश्चित निरूपण केलें आहेस २१.


    यथाऽनुष्ठीयमानेन त्वयि भक्तिर्नृणां भवेत् ।
    स्वधर्मेणाऽरविन्दाक्ष तत्समाख्यातुमर्हसि ॥ २ ॥
    [श्लोक २] त्या त्या स्वधर्माचे अनुष्ठान कसे केल्याने माणसांना आपली भक्ती प्राप्त होईल, ते मला सांगावे. (२)


    ऐके कमलनयना अच्युता । जो कां स्वधर्म अनुष्ठितां ।
    तुझी निजभक्ती स्वभावतां । प्राण्याच्या हाता जेणें लाभे ॥ २२ ॥
    हे कमलनयना अच्युता ! ऐक, जो स्वधर्म आचरण केला असतां तुझी भक्ति स्वभावतःच भक्तांच्या हाती लागते २२, 


    ते कर्मकुशलतेची स्थिती । मजलागीं सांगावी सुनिश्चितीं ।
    कमलनयना कमलापती । कृपामूर्ती माधवा ॥ २३ ॥
    त्या कर्मकौशल्याचे लक्षण, हे कमलनयना! माधवा! कृपामूर्ते! मला निश्चयेंकरून निवेदन करावें २३.


    तूं ऐसें म्हणशील श्रीपती । `म्यां कल्पाचे आधीं कवणाप्रती ।
    सांगितली स्वधर्मस्थिती' । तरी ते विनंती अवधारीं ॥ २४ ॥
    लक्ष्मीपते! तूं कदाचित् असें म्हणशील की, मी कल्पाच्या आरंभी ही स्वधर्माची स्थिति कोणाला सांगितली तर त्याबद्दलही माझी विनंति ऐक २४.


    पुरा किल महाबाहो धर्मं परमकं प्रभो ।
    यत्तेन हंसरूपेण ब्रह्मणेऽभ्यात्थ माधव ॥ ३ ॥
    [श्लोक ३] हे प्रभो ! महाबाहो माधवा ! पूर्वी आपण हंसरूपाने ब्रह्मदेवांना परमधर्माचा उपदेश केला होता. (३)


    ज्याच्या बाहूचा प्रताप अद्‍भुत । विश्वमर्यादा धर्मसेत ।
    राखों जाणे यथास्थित । त्यालागीं म्हणिपत `महाबाहो' ॥ २५ ॥
    ज्याच्या बाहूंचा प्रताप अद्भुत असतो, जो विश्वमर्यादेतील धर्मरूपी सेतु व्यवस्थित ठेवण्याचे जाणतो, त्याला 'महाबाहु' असे म्हणतात २५.


    स्वधर्मकर्माचा द्योतकु । अनादि वक्ता तूं एकु ।
    वर्णाश्रमादि विवेकु । उपदेशकु तूं स्रष्ट्याचा ॥ २६ ॥
    स्वधर्मकर्माचा प्रकाशक असा अनादि वक्ता एक तूंच आहेस आणि वर्णाश्रमधर्माचा विचार ब्रह्मदेवाला कथन करणारा उपदेशक तूच आहेस २६.


    पूर्वीं हंसरूपें सविस्तर । बोलिलासी स्वधर्माचा निर्धार ।
    त्यांतील तुवां अध्यात्मसार । निवडूनि साचार मज सांगितलें ॥ २७ ॥
    पूर्वी (तेराव्या अध्यायांत) हंसरूपाने स्वधर्माचा निश्चित विचार तूं सविस्तर सांगितलास, आणि त्यांतलेच अध्यात्मज्ञानाचे रहस्य निवडून मला उत्तम प्रकारे सांगितलेंस २७.


    तेथील स्वधर्माचें लक्षण । मज न कळेचि निरूपण ।
    जें तूं हंसरूपे आपण । स्वधर्म जाण बोलिलासी ॥ २८ ॥
    परंतु तू हंसरूपाने  आपण होऊन जो स्वधर्मं  सांगितलास, त्यांतील स्वधर्माचे लक्षण व त्याचे निरूपण मला समजले  नाही २८.


    तुझेनि मुखें यथोचितें । भक्तियुक्त आश्रमधर्मातें ।
    सनत्कुमार जाहले श्रोते । तेंचि मातें सांगावें ॥ २९ ॥
     याकरितां सन. सनत्कुमारांनी  तुझ्या मुखातून यथोचित असा जो आश्रमधर्म  भक्तिपूर्वक श्रवण केला, तोच मला सांगावा २९.


    म्हणसी `सनत्कुमारद्वारा । धर्म विस्तारला परंपरा ।
    तो विचारूनि करीं निर्धारा' । हें सारंगधरा घडेना ॥ ३० ॥
     आता कदाचित तू म्हणशील  की, सनत्कुमारांच्या द्वारेंच परंपरेने धर्माचा प्रसार झालेला आहे, त्याचाच विचार करून त्यांतील रहस्य जाण म्हणजे झाले . परंतु श्रीकृष्णा ! तसे मजकडून व्हावयाचे नाही ३०.


    स इदानीं सुमहता कालेनामित्रकर्शन ।
    न प्रायो भविता मर्त्यलोके प्रागनुशासितः ॥ ४ ॥
    [श्लोक ४] हे रिपुदमना ! पुष्कळ काळ निघून गेल्याकारणाने यावेळी पूर्वी सांगितलेला तो धर्म मृत्यूलोकातून जवळजवळ नाहीसा झाल्यासारखाच आहे. (४)


    काम क्रोध लोभ अभिमान । हे भक्तांचे वैरी सहाजण ।
    त्यांचें तूं करिशी निर्दळण । अरिमर्दन या हेतू ॥ ३१ ॥
    काम, क्रोध, लोभ, अमिमान इत्यादि षडरिपू  हेच  भक्तांचे मोठे वैरी आहेत, त्यांचा संहार करतोस, म्हणूनच तुला' अरिमर्दन' असे म्हणतात ३१.


    भक्तांचें अरिनिर्दळण । तुजवांचोनि कर्ता आन ।
    तिहीं लोकीं नाहीं जाण । अनन्यशरण यालागीं ॥ ३२ ॥
    भक्तांच्या शत्रूचा नाश करणारा तुझ्यावाचून त्रिभुवनांत दुसरा कोणीच नाही; म्हणूनच तुला मी अनन्य भावाने शरण आलों आहें  ३२.


    तुवां कल्पाचिये आदीसी । उपदेशिलें सनकादिकांसी ।
    बहुकाळ जाहले त्या बोलासी । ते धर्म कोणापाशीं प्रायशां नाहीं ॥ ३३ ॥
    कल्पाच्या प्रारंभी तू  सनकादिकांना  उपदेश केलास, त्या उपदेशाला फारच काळ लोटून गेल्यामुळे तो धर्म आतां बहुतकरून कोणापाशी राहिला नाहीं ३३.


    प्रायशां ये कालीं नर । नाहीं स्वधर्मी तत्पर ।
    शिश्नोदरीं अत्यादर । स्वधर्मविचार विसरोनी ॥ ३४ ॥
    सध्यांच्या काळांत लोक बहुतकरून स्वधर्मामध्ये तत्पर नसतात. स्वधर्माचा विचार विसरून जाऊन कामासक्ति व उदरपूर्ति यांतच आदरपूर्वक लुब्ध झाले आहेत ३४.


    याथातथ्यें धर्मप्रतिष्ठा । करी ऐसा नाहीं उपदेष्टा ।
    यालागीं जी वैकुंठा । स्वधर्मनिजनिष्ठा मज सांग ॥ ३५ ॥
    यामुळे यथार्य धर्म अंत:करणांत  बिंबवील  असा उपदेशकच कोणी उरलेला  नाही. म्हणून  हे वैकुंठाधिपते ! मला स्वधर्माची निष्ठा  तूंच सांग ३५.


    वक्ता कर्ताऽविता नान्यो धर्मास्याच्युत ते भुवि ।
    सभायामपि वैरिञ्च्यां यत्र मूर्तिधराः कलाः ॥ ५ ॥
    कर्ताऽवित्रा प्रवक्त्रा च भवता मधुसूधन ।
    त्यक्ते महीतले देव विनष्टं कः प्रवक्ष्यति ॥ ६ ॥
    [श्लोक ५-६] हे अच्युता ! ब्रह्मदेवाच्या ज्या सभेतही वेदादिक कला मूर्तिमंत होऊन विराजमान असतात, तेथे सुद्धा आपल्याखेरीज दुसरा कोणीही, आपला हा धर्म तयार करणारा, तो सांगणारा व त्याचे रक्षण करणारा नाही मग पृथ्वीवर कसा असेल ? (५)
    हे मधुसूदना ! या धर्माचे प्रवर्तक, रक्षण करणारे आणि उपदेशक असे आपणच पृथ्वीवरून निघून गेल्यावर हा लुप्त धर्म कोण सांगेल ? (६)


    अलुप्तज्ञानें स्वधर्मवक्ता । ये भूलोकीं गा तत्त्वतां ।
    तुजवांचोनि अच्युता । आणिक सर्वथा असेना ॥ ३६ ॥
    हे श्रीकृष्णा ! ह्या जगामध्ये ज्याचे ज्ञान मायेने आच्छादलेले नाही, असा धर्मोपदेशक खरोखर तुझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही ३६.


    एक शास्त्रमर्यादाव्युत्पत्ती । कर्मकलाप बोलों जाणती ।
    परी कर्माची आचरती गती । तेही नेणती तत्त्वतां ॥ ३७ ॥
    कोणाला शास्त्रवचनाच्या मीमांसेने कर्मसमूहाचे प्रतिपादन करावयाचे समजते; पण तेच कर्म आचरण कसे करावें तें मात्र त्यांनाही कळत नाही ३७.


    यालागीं गा भगवंता । धर्माचा कर्ता वक्ता ।
    धर्म विस्तारूनि रक्षिता । आणिक सर्वथा असेना ॥ ३८ ॥
    म्हणूनच हे भगवंता ! धर्माचा कर्ता , धर्माचा वक्ता आणि धर्माचा विस्तार करून त्याचे संरक्षण करणारा तुझ्यावाचून दुसरा असणेच शक्य नाही ३८.


    पहातां या लोकांच्या ठायीं । तुज‍ऐसा सर्वज्ञ नाहीं ।
    ऐसें विचारितां लोकीं तिंही । तुजसमान नाहीं सांगता ॥ ३९ ॥
    या लोकांतच केवळ पाहूं गेलें तर, तुझ्यासारखा सर्वज्ञ कोणी नाही इतकेच नव्हे, तर विचारपूर्वक पाहिले असतां तुझ्यासारखा उपदेशक त्रैलोक्यांतही दुसरा कोणी नाही ३९.


    जरी सत्यलोक पाहणें । जेथें चारी वेद षड्दर्शनें ।
    इतिहास स्मृति पुराणें । मूर्तिमंतपणें उभीं असतीं ॥ ४० ॥
    सत्यलोकाकडे पाहिले तर तेथे चारही वेद, षड्दर्शन, इतिहास, स्मृति, पुराणें हीं मूर्तिमंत उभी राहिलेली असतात ४०.


    तेथें सनकादिकांचा प्रश्न । ब्रह्मयासी न सांगावे जाण ।
    तुवां हंसरूपें येऊन । समाधान दीधलें ॥ ४१ ॥
    पण तेथेसुद्धा सनकादिकांच्या प्रश्नांचे उत्तर ब्रह्मदेवाला सांगवले नाही. तेव्हां तूं हंसरूपाने तेथे येऊन त्यांचे समाधान केलेंस ४१.


    ते ब्रह्मसभेचा ठायीं । तुज‍ऐसा वक्ता नाहीं ।
    तो तूं भक्तानुग्रहें पाहीं । या लोकांच्या ठायीं मूर्तिमंत ब्रह्म ॥ ४२ ॥
    ब्रह्मदेवाच्या सभेमध्येही तुझ्यासारखा वक्ता नाही. तो तूं मूर्तिमंत ब्रह्म केवळ भक्तांवर अनुग्रह करण्याकरितांच या लोकाच्या ठिकाणी अवतरला आहेस ४२.


    तेणें तुवां सर्व कर्मधर्मसंस्था । करूनि दाविली तत्त्वतां ।
    तो तूं निजधामा गेलिया आतां । स्वधर्मवक्ता मग कैंचा ॥ ४३ ॥
    अशा त्वां सर्व कर्मधर्माची स्थापना करून व आचरण करूनही दाखविलेंस. तो तूं आतां निजधामास गेल्यानंतर मग स्वधर्म सांगणारा कोण आहे ? ४३.


    भक्तियुक्त स्वधर्मगती । सांगावया यथास्थिती ।
    तुजवांचोनियां श्रीपती । आणिकासी शक्ति असेना ॥ ४४ ॥
    तात्पर्य हे श्रीकृष्णा ! भक्तीने युक्त असें स्वधर्माचे रहस्य यथार्थ रीतीने प्रतिपादन करण्याचे सामर्थ्य तुजवांचून इतरांना नाही ४४.


    तूं भक्तसाह्य जगज्जीवन । भक्तमदगजभंजन ।
    यालागीं नांवें तुं `मधुसूदन' । ऐसें प्रार्थून बोलत ॥ ४५ ॥
    तूं जगज्जीवन भक्तांचा साहाय्यकर्ता आहेस, भक्तांच्या अभिमानरूपी मत्त हत्तीचें निर्दाळण करणारा आहेस, म्हणूनच तुला 'मधुसूदन' असे म्हणतात. अशी प्रार्थना करून उद्धव बोलू लागला ४५.


    तत्त्वं नः सर्वधर्मज्ञ धर्मस्त्वद्‍भक्तिलक्षणः ।
    यथा यस्य विधीयेत तथा वर्णय मे प्रभो ॥ ७ ॥
    [श्लोक ७] म्हणून सर्व धर्म जाणणार्‍या हे प्रभो ! आपली भक्ती प्राप्त करून देणारा हा धर्म ज्याला जसा आचरणे योग्य आहे, तसा सांगावा. (७)


    तूं सर्वज्ञ ज्ञानमूर्ति । तरी मनुष्यांची कर्मगति ।
    वर्णाश्रमांची धर्मस्थिती । यथानिगुतीं मज सांग ॥ ४६ ॥
    तूं सर्वज्ञ असून ज्ञानाची केवळ मूर्ति आहेस. ह्यास्तव मनुष्यांच्या कर्माची  गति आणि वर्णाश्रमांच्या धर्मातील रहस्य यथार्थ रीतीने मला सांगावें ४६.


    वर्णबाह्याचें निजकर्म । तोही सांगावा विहित धर्म ।
    उद्धवें प्रार्थिला पुरुषोत्तम । तेणें मेघश्याम तुष्टला ॥ ४७ ॥
    तसेंच वर्णबाह्य लोकांचे कर्म व त्यांचा जो विहित धर्म, त्याचेही कथन करावे. ह्याप्रमाणे उद्धवान श्रीकृष्णाची प्रार्थना केली, तेव्हां मेघश्याम श्रीकृष्ण संतुष्ट झाला ४७.


    सकळ जनांचा हितकर । उद्धवें प्रश्न केला सधर ।
    तो ऐकोनि शुकयोगींद्र । आनंदनिर्भर तेणें प्रश्नें ॥ ४८ ॥
    साऱ्याच लोकांना हितावह असा उत्तम प्रश्न उद्धवाने केला, तो ऐकून महान् योगेश्वर शुकाचार्य देखील आनंदनिर्भर झाले ४८.


    शुक म्हणे परीक्षितीसी । धन्य बुद्धी ते उद्धवासी ।
    जेणें प्रार्थूनि हृषीकेशी । जाहला जगासी उपकारी ॥ ४९ ॥
    शुकाचार्य परीक्षितीला म्हणाले, उद्धवाची बुद्धि धन्य होय ! कारण, स्याने श्रीकृष्णाची प्रार्थना करून साऱ्या जगावर उपकार करून ठेवला ४९.


    श्रीशुक‍उवाच-
    इत्थं स्वभृत्यमुख्येन पृष्टः स भगवान् हरिः ।
    प्रीतः क्षेमाय मर्त्यानां धर्मानाह सनातनान् ॥ ८ ॥
    [ श्लोक ८] श्रीशुक म्हणतात - आपल्या भक्तशिरोमणी उद्धवाने जेव्हा असा प्रश्न विचारला, तेव्हा प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्णांनी मनुष्यांच्या कल्याणासाठी त्यांना सनातनधर्माचा उपदेश केला. (८)


    शुक म्हणे गा परीक्षिती । सावधान होईं चित्तीं ।
    धन्य उद्धवाची प्रश्नोक्ती । स्वधर्मे मुक्ती पुशिली ॥ ५० ॥
    शुकाचार्य म्हणाले, हे परीक्षिती! सावधान चित्ताने ऐक. त्या उद्ध्वाचा प्रश्न खरोखरच धन्य  होय. कारण त्याने स्वकर्मानेच मुक्ति विचारली ५०.


    जो भृत्यांमाजीं पढियंता । अत्यंत आवडे कृष्णनाथा ।
    त्या वेगळें श्रीअनंता । क्षणही सर्वथा करमेना ॥ ५१ ॥
    जो सर्व सेवकांमध्ये अत्यंत प्रिय व श्रीकृष्णाला अतिशय आवडता, ज्याच्याशिवाय श्रीकृष्णाला क्षणभरही मुळींच करमत नसे ५१; 


    ज्यापाशीं गा निजगुज । सदा सांगे गरुडध्वज ।
    ज्यावेगळें आप्तकाज । अधोक्षज बोलेना ॥ ५२ ॥
    आपली गुप्त गोष्ट श्रीकृष्ण नेहमी ज्याच्यापाशीच सांगत असे, आपलें हितगुज श्रीकृष्ण ज्याच्यावांचून दुसऱ्या कोणापाशींच सांगत नसे ५२; 


    ज्याच्या वचनासी विलंबु । क्षण न करीच रमावल्लभु ।
    जो ब्रह्मादिकां दुर्लभु । तो जाहला सुलभु उद्धवा ॥ ५३ ॥
    त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्याला त्या रमावल्लभाने एक क्षणाचाही विलंब केला नाही. ब्रह्मदेवादिकांनाही जो दुर्लभ, तो परमात्मा त्या उद्धवाला अगदी सुलभ झाला होता ५३.


    यालागीं 'भृत्यमुख्यता' । आली उद्धवाचे हाता ।
    तेणें प्रार्थूनियां भगवंता । 'स्वकर्में मुक्तता' पुशिली ॥ ५४ ॥
    ह्याकरितां सेवकांतील प्रमुखत्व ह्या जगांत एका उद्धवाच्याच हाती आले होते म्हणून त्यानेच भगवंताची प्रार्थना करून स्वकर्मानेंच मुक्तता कशी होते, हा प्रश्न विचारला ५४.


    हो कां ज्याचेनि प्रश्नधर्मे । जग उद्धरिलें यथानुक्रमें ।
    ज्यालागीं गा पुरुषोत्तमें । मोक्ष स्वधर्मे प्रकटिजे ॥ ५५ ॥
    अहो ! त्याच्या प्रश्नाच्या  योगाने सर्व जगाचा क्रमाने उद्धार झाला, आणि त्या उद्धवाकरितांच श्रीकृष्णांनी स्वधर्मानेंच  मोक्ष कसा प्राप्त होतो हे स्पष्ट सांगितले ५५.


    स्वधर्म करितां स्वभावतां । निजमोक्ष लाभे आयिता ।
    एवढ्या उपकाराची कथा । उद्धवें तत्त्वतां पुशिली ॥ ५६ ॥
    खरोखर स्वाभाविक स्वधर्माचे आचरण केले  असतां मोक्षाचा आयता लाम होतो. एवढ्या उपकाराची कथाच तत्त्वतः उद्धवाने विचारली ५६.


    ऐकोनि चातकांचे वचन । गर्जोनि वर्षे जेवीं घन ।
    कां वत्सहुंकारें जाण । ये हुंबरेन धेनु जैशी ॥ ५७ ॥
    चातकाचा शब्द ऐकला की, मेघ ज्याप्रमाणे गर्जना करून जलाची वृष्टि करितो, किंवा वासराचा हुंकारा ऐकला की गाय जशी हंबरत येते ५७, 


    तेवीं ऐकोनि उद्धवाच्या बोला । श्रीकृष्ण निजबोधें गर्जिन्नला ।
    अतिस्वानंदें संतोषला । काय बोलिला गोविंदु ॥ ५८ ॥
    त्याप्रमाणे उद्धवाचे भाषण ऐकून श्रीकृष्णाने आत्मज्ञानाची गर्जना केली आणि आत्मानंदाने अगदी प्रसन्न होऊन श्रीकृष्ण काय म्हणाला ते आतां ऐका ५८.


    श्रीभगवानुवाच-
    धर्म्य एष तव प्रश्नो नैःश्रेयसकरो नृणाम् ।
    वर्णाश्रमाचारवतां तमुद्धव निबोध मे ॥ ९ ॥
    [श्लोक ९] भगवान श्रीकृष्ण म्हणाले - हे उद्धवा ! तुझा हा धर्मविषयक प्रश्न सर्व वर्णांच्या व आश्रमांच्या माणसांना परम कल्याणस्वरूप अशा मोक्षाची प्राप्ती करून देणारा आहे म्हणून मी तुला त्या धर्मांविषयी सांगतो ऐक. (९)


    जेवीं कां पुत्र एकुलता । त्यासी कांहीं वंचीना माता ।
    तेवीं उद्धव श्रीकृष्णनाथा । त्याचें वचन वृथा हों नेदी ॥ ५९ ॥
    ज्याप्रमाणे एकुलता एक पुत्र असला म्हणजे आई त्याचा कोणताही शब्द व्यर्थं जाऊ देत नाही त्याप्रमाणेच उद्धव श्रीकृष्णाचा लाडका होता. त्याचे भाषण तो व्यर्थ जाऊं देईना ५९.


    हरिखें म्हणे सारंगपाणी । धन्य धन्य उद्धवा तुझी वाणी ।
    मोक्षमार्गींची निशाणी । हे जनालागोनी त्वां केली ॥ ६० ॥
    श्रीहरि आनंदाने म्हणाले, उद्धवा ! तुझी वाणी मोठी धन्य होय. तूं सर्व लोकांसाठी मोक्षमार्गाची ही शिडीच करून दिलीस ६०.


    तुझ्या प्रश्नाचें प्रश्नोत्तर । वर्णाश्रमी जे कोणी नर ।
    त्यांसी स्वधर्मचि मोक्षकर । ऐक साचार सांगेन ॥ ६१ ॥
    तुझ्या प्रश्नाचे उत्तर असे की, जे कोणी वर्णाश्रमी पुरुष आहेत, त्यांना स्वधर्म हाच मोक्षकर होतो. तो कसा? तेही निश्चयेंकरून सांगतों ऐक ६१.


    कल्पादिपासोनि स्वधर्मसंस्था । पुरातनयुगवर्ती कथा ।
    तुज मी सांगेन तत्त्वतां । ऐक आतां उद्धवा ॥ ६२ ॥
    उद्ध्वा ! कल्पाच्या आरंभापासून प्रवृत्त झालेल्या स्वधर्मसंस्थेची पुरातन युगापासूनची कथा आता तत्त्वत: तुला मी सांगतो. उद्धवा ! ती आतां ऐक ६२.


    आदौ कृतयुगे वर्णो नृणा हंस इति श्रुतः ।
    कृतकृत्याः प्रजा जात्या तस्मात्कृतयुगं विदुः ॥ १० ॥
    वेदः प्रणव एवाग्रे धर्मोऽहं वृषरूपधृक् ।
    उपासते तपोनिष्ठा हंसं मां मुक्तकिल्बिषाः ॥ ११ ॥
    [श्लोक १०-११] या कल्पाच्या आरंभी, सत्ययुगात सर्वांचा हंस नावाचा एकच वर्ण होता त्यावेळी सर्वजण जन्मतःच कृतकृत्य होते म्हणूनच त्याचे नाव कृतयुग असेही आहे. (१०)
    त्यावेळी फक्त प्रणवच. (ॐकार) वेद होता आणि तपश्चर्या, पावित्र्य, दया व सत्य अशा चार चरणांनी युक्त असा मीच बैलाचे रूप धारण केलेला धर्म होतो त्यावेळचे निष्पाप आणि केवळ तप करणारे लोक शुद्ध अशा माझी उपासना करीत होते. (११)


    पूर्वील कृतयुगींचें लक्षण । तैं नव्हते गा चारी वर्ण ।
    बहुशाखा वेदपठण । कर्माचरण तैं नाहीं ॥ ६३ ॥
    पूर्वी कृतयुगांतील स्थिति अशी होती की, त्या वेळी चार वर्ण मुळीच नव्हते, अनेक शाखांचे वेदाध्ययन, किंवा कर्माचरणही तेव्हां नव्हते ६३.


    तैं सकळ मनुष्यांसी जाण । `सोहंहंसा' चें अखंड ध्यान ।
    यालागीं `हंस' हा एकचि वर्ण । सर्वांसही जाण ते काळीं ॥ ६४ ॥
    त्यावेळी सारे लोक 'सोहं हंसा'चे म्हणजे मीच ब्रह्म असेंच निरंतर ध्यान करीत असत. म्हणून त्या वेळी सर्वांचा 'हंस' हा एकच वर्ण होता ६४.


    तैं `प्रणवमात्रें' वेदपठण । वृषरूपें मी आपण ।
    धर्म चतुष्पाद संपूर्ण । अधर्माचें जाण नांवही नाहीं ॥ ६५ ॥
    त्या वेळी 'ओंकार ' रूपानेच वेदपठण होत असे; व तप, दया, सत्य व शुद्धता या चार पायांनी परिपूर्ण असा वृषभरूपी धर्म मीच होतो. त्यावेळी अधर्माचें नांवसुद्धा नव्हते, हे लक्षात ठेव ६५.


    ते काळीं श्रेष्ठ सत्त्वगुण । यालागीं सत्यवादी जन ।
    अवघे धर्मपरायण । कपट तैं जाण जन्मलें नाहीं ॥ ६६ ॥
    त्या वेळी सत्त्वगुणच श्रेष्ठ होता. म्हणून सारे लोक सत्यानेच चालणारे असत. सारेच लोक धर्मपरायण लोक होते. कपट तेव्हां जन्मालाच आलेले नव्हतें ६६.


    परद्रव्य आणि परदारा । यांच्या अभिलाषाचा थारा ।
    स्पर्शला नाहीं जिव्हारा । ते काळींच्या नरां धर्मिष्ठां ॥ ६७ ॥
    त्या काळच्या धर्मनिष्ठ लोकांच्या अंत:करणाला परद्रव्य आणि परदास यांचा अभिलाष शिवतही नसे ६७.


    ते काळींच्या जना धर्मिष्ठां । `सोहंहंसा' ची आत्मनिष्ठा ।
    हेंचि भजन मज वरिष्ठा । `तपोनिष्ठा' तया नांव ॥ ६८ ॥
    त्यावेळच्या धर्मशील लोकांची 'परब्रह्म ते मीच' अशी आत्मस्वरूप निष्ठा असे. हेच माझे श्रेष्ठ भजन होय, आणि यालाच 'तपोनिष्ठा' म्हणतात ६८.


    तैं स्वर्गा जावें हे नाहीं कथा । नेणती नरकाची वार्ता ।
    अधर्माची अवस्था । स्वप्नीहीं चित्ता स्पर्शेना ॥ ६९ ॥
    त्यावेळी स्वर्गास जाण्याची गोष्टच नाही व नरकाचीही वार्ता नाही. आणि अधर्म करण्याचे स्वप्नांत सुद्धा मनामध्ये येत नसे ६९.


    यापरी प्रजा समस्त । स्वधर्मस्वभावें कृतकृत्य ।
    यालागीं जाण निश्चित । त्यातें बोलिजेत `कृतयुग' ॥ ७० ॥
    अशा रीतीनें सारी प्रजा स्वधर्माचरणानेच कृतकृत्य झालेली असे. म्हणूनच खरोखर त्याला 'कृतयुग' असे म्हणतात ७०. 


    त्रेतामुखे महाभाग प्रणान्मे हृदयात्रयी ।
    विद्या प्रादुरभुत्तस्या अहमासं त्रिवृन्मखः ॥ १२ ॥
    [श्लोक १२] हे उद्धवा ! त्रेतायुगाच्या आरंभी माझ्या हृदयातून प्राणांच्या द्वारा ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद असे तीन वेद प्रगट झाले त्यांपासून होता, अध्वर्यू व उद्‌गाता हे कर्मरूप तीन भेद असणार्‍या यज्ञांच्या रूपाने मी प्रगट झालो. (१२)


    उद्धवा या कलियुगाच्या ठायीं । तुझ्या भाग्याची परम नवायी ।
    कृतयुगींच्या प्रजांपरीस पाहीं । तुज माझ्याठायीं विश्वास ॥ ७१ ॥
    उद्धवा ! या कलियुगामध्ये तुझ्या भाग्याचे मोठे नवल वाटते. कारण कृतयुगांतील लोकांपेक्षाही तुझा माझ्या ठिकाणी अधिक विश्वास आहे ७१.  


    त्रेतायुगीं प्रकटलें कर्म । जो वैराज मी पुरुषोत्तम ।
    त्या माझेनि निःश्वासें त्रयीधर्म । वेदसंभ्रम वाढला ॥ ७२ ॥
    त्रेतायुगामध्ये कर्म प्रकट झाले. विराटस्वरूप जो मी पुरुषोत्तम, त्या माझ्या श्वासोच्या श्वासोच्छवासापासून तीन वेद उत्पन्न झाले आणि त्या वेदांचा विस्तार झाला ७२.


    तेथ त्रैविद्या विविध भेद । नाना मंत्र नाना छंद ।
    ऋग्वेदादि तिन्हीं वेद । प्रकटले प्रसिद्ध निजशाखीं ॥ ७३ ॥
    तेव्हां तीन प्रकारच्या विद्या व त्यांचे नानाप्रकारचे भेद, अनेक मंत्र व अनेक छंद आणि ऋग्वेद आदिकरून तिन्ही वेद आपापल्या शाखेनें उदयास आले ७३.


    त्या वेदांपासाव त्रिविध मख । त्रिमेखलायुक्त मीचि देख ।
    जेथ होत आध्वर्यव हौत्रिक । कर्मविशेख जे ठायीं ॥ ७४ ॥
     त्या वेदांपासून तीन मेखळांनी युक्त असे तीन यज्ञ उत्पन्न झाले. ते मद्रूपच  आहेत. या यज्ञात अध्वयु उद्गाता यांचे विशिष्ट कर्म होऊ लागले ७४.


    ऐसें मद्‌रूप यज्ञकर्म । तेथिल्या अधिकाराचें वर्म ।
    दों श्लोकीं पुरुषोत्तम । वर्णाश्रम सांगत ॥ ७५ ॥
    अशा प्रकारचे जे यज्ञकर्म तेही मद्रूपच होय. त्यांतील अधिकाराचे वर्म म्हणजे वर्णाश्रमाचे वर्णन पुढील दोन श्लोकांमध्ये श्रीकृष्ण सांगत आहेत ७५.


    विप्रक्षत्रियविट्शूद्रा मुखबाहूरुपादजाः ।
    वैराचात्पुरुषाज्जाता य आत्माचारलक्षणाः ॥ १३ ॥
    [श्लोक १३] हविराट पुरूषाच्या मुखापासून ब्राह्मण, बाहूंपासून क्षत्रिय, मांड्यांपासून वैश्य आणि पायांपासून शूद्रांची उत्पत्ती झाली त्यांचा स्वधर्म हीच त्यांना ओळखण्याची खूण होती. (१३)


    वैराजपुरुषापासाव जाण । मुखीं उपजले `ब्राह्मण' ।
    बाहूपासूनि `राजन्य' । ऊरु जन्मस्थान `वैश्यांचें' ॥ ७६ ॥
    विराट पुरुषाच्या मुखापासून ब्राह्मण जन्मास आले; बाहूपासून क्षत्रिय; आणि मांड्या हे वैश्यांचे जन्मस्थान होय ७६.


    `शूद्र' चरणीं जन्मले जाण । यापरी जाहले चारी वर्ण ।
    यांचें ऐक मुख्य लक्षण । स्वधर्माचरण सर्वांशीं ॥ ७७ ॥
    शुद्र हे पायापासून उत्पन्न झाले, हे लक्षात ठेव. अशा प्रकारे हे चारी वर्ण झाले आहेत. त्यांनी आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करावें हेंच त्यांचे एक मुख्य लक्षण होय  ७७.


    चतुर्वर्णांची उत्पत्ती । वैराज पुरुषापासूनि या रीतीं ।
    आतां आश्रमांची स्थिती । ऐक निश्चितीं सांगेन ॥ ७८ ॥
    अशा रीतीने विराट पुरुषापासून चारही  वर्णांची उत्पत्ति झाली आहे. आता चार आश्रमांची स्थिति निश्चयपूर्वक सांगतो, ती ऐक ७८. 


    गृहाश्रमो जघनतो ब्रह्मचर्यं हृदो मम ।
    वक्षःस्थानात् वने वासो न्यासः शीर्षणि संस्थित ॥ १४ ॥
    [श्लोक १४] विराट पुरूषरूप माझ्या जघनभागापासून गृहस्थाश्रम, हृदयापासून ब्रह्मचर्याश्रम, वक्षःस्थळापासून वानप्रस्थाश्रम आणि डोक्यापासून संन्यासाश्रमाची उत्पत्ती झाली. (१४)


    'गृहास्थाश्रमासी' जघनस्थान । 'ब्रह्मचर्य' माझ्या हृदयीं जाण ।
    'वानप्रस्थासी' मी आपण । वाढवीं महिमान वक्षः स्थळीं ॥ ७९ ॥
    माझ्या कमरेखालचा भाग हा गृहस्थाश्रमाचा होय. ब्रह्मचर्य हे माझ्या हृदयस्थानी आहे. आणि वानप्रस्थाचा महिमा मी स्वतः वक्षःस्थळावर वाढवितों ७९.


    चतुर्थाश्रम जो 'संन्यास' । त्याचा माझे शिरीं रहिवास ।
    एवं वर्णाश्रमविलास । तुज सावकाश सांगितला ॥ ८० ॥
    चतुर्थाश्रम, ज्याला 'संन्यास' असे म्हणतात, त्याचे वास्तव्य माझ्या मस्तकावर असते. अशा प्रकारे वर्णाश्रमाची व्यवस्था यथार्थ रीतीने तुला सांगितली ८०.


    वर्णानामाश्रमाणां च जन्मभूम्यनुसारिणीः ।
    आसन्प्रकृतयो नॄणां नीचैर्नीचोत्तमोत्तमैः ॥ १५ ॥
    [श्लोक १५] या वर्ण आणि आश्रमांच्या माणसांचे स्वभावसुद्धा त्यांच्या जन्माच्या ठिकाणांनुसार उत्तम, मध्यम आणि अधम असे झाले. (१५)


    जैसें जन्म जैसें स्थान । त्या वर्णाश्रमा तैसे गुण ।
    उत्तमीं उत्तमत्व जाण । नीचीं नीचपण सहजेंचि ॥ ८१ ॥
    जसें जन्म व जसें स्थान असते, त्याप्रमाणे त्या त्या वर्णाश्रमामध्येही गुण असतात. उत्तम स्थान असले तर गुणही उत्तमच असतात, व नीच स्थान असले म्हणजे गुणही साहजिकच नीच होतात ८१.  


    'सत्त्वप्राधान्ये' ब्राह्मण । 'सत्त्वरजें' क्षत्रिय जाण ।
    'रजतमें' वैश्यवर्ण । शूद्र ते जाण 'तमोनिष्ठ' ॥ ८२ ॥
    सत्त्वगुण प्रधान असला म्हणजे ब्राह्मण होतात; सत्त्व आणि रज यांच्या मिश्रणानें क्षत्रिय होतात; रज आणि तम यांच्या मिश्रणाने वैश्य उत्पन्न होतात. आणि शूद्र ते केवळ तमोगुणनिष्ठ असतात ८२.


    तेचि ब्राह्मणादि चारी वर्ण । त्यांचें प्रकृतींचे लक्षण ।
    वेगळें वेगळेंचि पैं जाण । स्वयें नारायण सांगत ॥ ८३ ॥
    ब्राह्मण आदिकरून चारही वर्ण आणि त्यांच्या स्वभावाचे लक्षण वेगवेगळे स्वतः श्रीकृष्ण पुढील श्लोकांत सांगतात ८३.


    शमो दमस्तपः शौचं सन्तोषः क्षान्तिरार्जवम् ।
    मद्‍भक्तिश्च दया सत्यं ब्रह्मप्रकृतयस्त्विमाः ॥ १६ ॥
    [श्लोक १६] शम, दम, तपश्चर्या, पवित्रता, संतोष, क्षमाशीलता, सरळपणा, माझी भक्ती, दया आणि सत्य हे ब्राह्मणवर्णाचे स्वाभाविक धर्म होत. (१६)


    उद्धवासी म्हणे श्रीकृष्ण । ब्राह्मणप्रकृति दशलक्षण ।
    तुज मी सांगेन निरूपण । तें सावधान अवधारीं ॥ ८४ ॥
    श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, ब्राह्मणांच्या स्वभावांत दहा लक्षणे असतात. त्याचे वर्णन मी तुला सांगतों लक्ष देऊन श्रवण कर ८४.


    मनादि ज्ञानेंद्रियवृत्ती । बाह्य दृष्टीं परिचारस्थिती ।
    ते आवरूनि विवेकयुक्तीं । आत्मप्रतीति धरावी ॥ ८५ ॥
    मन आदिकरून ज्ञानेंद्रियांच्या ज्या वृत्ति आहेत. त्या बाह्यदृष्टीनेच नेहमी वावरत असतात; त्यांना विवेकानें आवरून आत्मस्वरूपांत स्थिर व्हावे ८५.


    तेचि वृत्तीचें धरणें ऐंसें । कृष्णसर्पाचें मुख धरणें जैसें ।
    तो वेढे उकली जंव आपैसें । तव धारणासौरसें नेहटावा ॥ ८६ ॥
    आतां तशी वृत्ति सावरून धरणे म्हणजे कृष्णसर्पांचे तोंड आवळून धरण्याप्रमाणेच आहे. तो घातलेले वेढे आपोआपच सोई लागेपर्यंत त्याचे तोंड आवळीत  असावें ८६.


    तेवीं वैराग्यप्रतापवशें । गुरुवचनाचेनि विश्वासें ।
    अंतरवृत्तीतें नेहटावें ऐसें । जंव ये आत्मासमरसें निजात्मता ॥ ८७ ॥
    त्याप्रमाणे वैराग्याच्या सामर्थ्याने आणि गुरुवचनाच्या विश्वासाने आत्मस्वरूपात ऐक्य होईपर्यंत अंतवृत्तीला नेटीत असावें ८७.


    मुख्य करूनि गुरुवचन । तदर्थी बुद्धि निमग्न ।
    तत्प्रवण होय मन । 'शम' तो जाण या नांव ॥ ८८ ॥
    गुरुवचन हेच मुख्य धरून त्यातच बुद्धीला निमग्न करून सोडणे आणि मनालाही तल्लीन करणे ह्याचेंच नांव 'शम' हे लक्षात ठेव ८८.


    ब्राह्मणप्रकृतिमाजीं जाण । हें स्वाभाविक निजलक्षण ।
    या नांव गा शमगुण । ऐक निरूपण दमाचें ॥ ८९ ॥
    ब्राह्मणाच्या प्रकृतीमध्ये हा गुण स्वभावसिद्धच असतो. त्याच सणाला 'शम' असे नाव आहे. आतां दमाचे निरूपण ऐक ८९.


    विषयप्रवृत्ति प्रचंड । कर्मेंद्रियांचें बळ बंड ।
    विधीनें त्यांचें ठेंवूनि तोंड । सैरा वितंड विचरों नेदी ॥ ९० ॥
    विषयप्रकृति बलवत्तर असते : आणि कर्मेंद्रियांचे बंड दांडगे असतें , ह्याकरितां शास्त्रविधीने त्यांचे तोंड ठेचून त्यांना सैरावैरा भडकूं देऊ नये ९०.


    वेदविधीचेनि हातें । देहनिर्वाहापुरतें ।
    खाणें जेवणें इंद्रियांतें । तो जाण येथें 'दम' गुण ॥ ९१ ॥
    वेदविधीच्या द्वारे देहाच्या निर्वाहापुरतें मात्र इंद्रियांना जेवणखाण द्यावयाचे, हा 'दमगुण' होय ९१.


    तेथ शम तो जाण मुख्य राजा । दमादि इतर त्याच्या प्रजा ।
    ते दोनी सांगितले वोजा । ऐक तिजा तपोनेमु ॥ ९२ ॥
    त्यांत 'शम' हा मुख्य राजा आहे व 'दम' वगैरे त्याच्या प्रजा आहेत असे समजावे. हे दोन्ही यथायोग्य रीतीने तुला सांगितले. आता तिसरा जो 'तपोनियम' तोही ऐक ९२.


    शमें ज्ञानेंद्रियौपशमु । तेचि कर्मेंद्रियां मुख्य दमु ।
    याहीवरी वेदोक्त कर्मु । तें ज्ञान परमु गौरवाचें ॥ ९३ ॥
    शमाने ज्ञानेंद्रियांना शांति आणि दमाने कर्मेद्रियांना शांति प्राप्त होते. यानंतर म्ह. शमदमानंतर वेदोक्त कर्म करणे, ते ज्ञान फारच प्रशंसनीय होय ९३.


    शरीरशोषणा नांव तप । तें प्रारब्धभोगानुरूप ।
    हृदयीं हरि चिंतणें सद्रूप । हें मुख्य तप तपांमाजीं ॥ ९४ ॥
    व्रतादिकांच्या योगानें शरीरशोषण करणे ह्याचे नांव 'तप'; पण तें प्रारब्धानुरूप घडत असते. वस्तुतः हृदयामध्ये श्रीहरीचें सत्स्वरूप चिंतन करणे हेच सर्व तपांमध्ये श्रेष्ठ तप होय ९४.


    जो वर्ततां स्वधर्मस्थितीं । हरितें विसंबेना निजवृत्ती ।
    जो निजात्मनिश्चयो चित्तीं । अहोराती विवंचित ॥ ९५ ॥
    जो स्वधर्माने वागत असून हरीला अंत:करणांत विसरत नाहीं, जो अहोरात्र मनामध्ये आत्मस्वरूपनिश्चयाचीच विवंचना करीत असतो ९५.


    जेवीं लोभिया वाहे धन । कां तरुणालागीं तरुणी जाण ।
    तैसें निजात्मविवंचन । जयाचें मन सदा करी ॥ ९६ ॥
    लोभी ज्याप्रमाणे नेहमी द्रव्याचेच चिंतन करतो, किंवा तरुण स्त्री ज्याप्रमाणे तरुणाचेच चिंतन करते, त्याप्रमाणे ज्याचे 'मन' सदासर्वदा आत्मस्वरूपाचाच विचार करीत राहतें ९६.


    त्या नांव गा तपोनिष्ठ । हें तपांमाजी तप वरिष्ठ ।
    ब्राह्मणप्रकृतीमाजीं श्रेष्ठ । 'तप' तें उद्‍भट या नांव ॥ ९७ ॥
    त्यालाच 'तपोनिष्ठ' म्हणतात. हे तप सर्व तपांमध्ये श्रेष्ठ होय. ब्राह्मणस्वभावांतील ह्या श्रेष्ठ गुणालाच 'उज्ज्वल तप' असे म्हणतात ९७.


    ऐक 'शौचा' चा निचार । तो आहे द्विप्रकार ।
    अंतरि ज्ञाननिर्धार । बाह्य आचार वेदोक्त ॥ ९८ ॥
    आतां शौचाचा म्हणजे पवित्रतेचा विचार ऐक. त्यामध्ये दोन प्रकार आहेत; अंत:करणामध्ये ज्ञानाचा निश्चय आणि बाहेर वेदोक्त आचार ९८.


    बाह्य मळाचें क्षाळण । मृज्जलादि वेदविधान ।
    आंतर मळाचें निर्दळण । आत्मज्ञान निजनिष्ठा ॥ ९९ ॥
    शरीरावर बाह्य मळ असतात, त्यांचे क्षालन वेदविधानाप्रमाणे मृत्तिका व जल इत्यादिकांनी करावे आणि आत्मज्ञाननिष्ठेनें अंत:करणांतील मल धुऊन काढावेत ९९.


    शुद्ध शौचाचें निर्मळपण । मुख्यत्वें उद्धवा हेंचि जाण ।
    आतां संतोषाचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥ १०० ॥
    उद्धवा! ह्याप्रमाणे अंतर्बाह्य निर्मलपणा मिळवणे हेच शौचाचे मुख्य लक्षण होय. आतां संतोषाचेही संपूर्ण लक्षण सांगतों ऐक १००. 

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...