मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    भावार्थ रामायण बालकाण्ड

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय तिसरा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय तिसरा
    संत एकनाथ महाराज ,भावार्थ रामायण

    ॥ श्रीसद्‌गुरु रामचंद्राय नमः ॥

    कौसल्या, सुमित्रा व कैकेयी यांच्याकडून प्रसाद भक्षण :

    कैकेयी धरोनि पोटेसीं । कौसल्या संबोखी तियेसी ।
    तूं का व्यर्थ दुःखी होसी । आम्हां दोघींसी दुःख एक ॥१॥
    एकोदरा सख्या बहिणी । दो दुस्सर पाटणी नांदती सख्या ॥२॥
    दोघीं नाही नित्य भेटी । दोघी नाही नित्य गोष्टी ।
    दोघीं नाहीं नित्य दृष्टी । मिथा चावटी सख्यत्वाची ॥३॥
    दोघी नाही नित्य संबंध । दोघीं नाही नित्य संवाद ।
    दोघीं नाहीं नित्य बोध । तो सख्यसंबंध अति मिथ्या ॥४॥
    दोघीं नाहीं एक सुख । त्या सख्या मानिती मूर्ख ।
    तूं एक करिसी व्यर्थ दुःख । आम्हां निजसुख एकत्वें ॥५॥
    आम्हां तुम्हां एक आहेवपण । आम्हां तुम्हां एक निजभूषण ।
    आम्हां तुम्हां एक निजमंडन सख्यपण एकत्वें आम्हां तुम्हां ॥६॥
    आम्हां तुम्हां एक सांगात । आम्हां तुम्हां एक भोगार्थ ।
    आम्हां तुम्हां एक कांत । सख्य सख्यार्थ आम्हां तुम्हां ॥७॥
    आम्हां तुम्हां एक नाहो । आम्हां तुम्हां एक सभा् वो ।
    आम्हा तुम्हा एकात्मस्नेहो आम्हां एक भोगभुवन ॥ ८ ॥
    A line is missing here
    आम्ही एकें सुखें संपन्न । सत्य सखेपण आम्हां तुम्हां ॥९॥
    आम्हां नित्यत्वें चाळिता । आम्हां एक नित्यत्वें प्रतिपाळिता ।
    आम्हां एक नित्यत्वें न्याहाळिता । हे नित्य सख्यता आम्हां तुम्हां ॥१०॥
    आम्हां तुम्हां एक गोसावी । आम्हां तुम्हां एक निववी ।
    आम्हां तुम्हां एक जीववी । हे सत्य पदवी सख्याची ॥११॥
    आम्हां तुम्हां एक पांचभौतिक । एकचि हस्तपादादिक ।
    आम्हां तुम्हां देखणें एक । हें अलोलिक निजसख्य ॥१२॥
    आम्हां तुम्हां एक नाथ । सत्यत्वें जाण दशरथ ।
    तूं खेद करितेसी व्यर्थ । ऐक वृत्तांत साजणी ॥१३॥
    पुढिलांचे देखोनि दुःख । सुख मानिता परम मूर्ख ।
    परांचे निरसोनि असुख । द्यावे सुख शुद्धत्वें ॥१४॥
    परदुःखें होय सुखी । तो ब्रह्मराक्षस तिहीं लोकीं ।
    सदा निंद्य शास्त्रमुखीं । शुद्ध सात्विकी तो नव्हे ॥१५॥
    तूं राहसी अपुत्रपणीं । आम्ही सुख पावों पुत्रपणीं ।
    तैं पूर्वज पडती पतनीं । तो दोष त्रिभुवनीं न समाये ॥१६॥
    उपजला पुत्र देऊं जातां । तो पोसणा म्हणती तत्त्वता ।
    साधूं दोघींच्या निजस्वार्था । अवंचकता परमार्थ ॥१७॥


    उदकस्य रसः चैत्यं अन्नस्य स्वादरो रसः ।
    आनुकूल्यं रसः स्त्रीणां मित्रस्य अवंचको रसः ॥१॥


    उदकाची गोडी शीतळता । अन्नाची गोडी आर्द्रता ।
    स्त्रियांची गोडी अनुकूलता । अवंचकता मित्रगोडी ॥१८॥
    आम्ही तुम्ही सख्या बहिणी । ऐसी बोलिजे कहाणी ।
    ते करून दावावी करणी । येर बोलणी अति मिथ्या ॥१९॥
    जैसें बोले तैसें करी । त्यातें वंदिजे हरहरीं ।
    येर ते व्यर्थ बोलाची ज्ञानफरारी । तो संसारी पढतमूर्ख ॥२०॥
    जैसा बोले तैसा क्रियार्थ । या नांव मुख्य परमार्थ ।
    येर बोलणें ते व्यर्थ । विषयस्वार्थ परमार्थी ॥२१॥


    कौसल्या व सुमित्रा स्वतःच्या प्रसादातील अर्धा भाग कैकेयीला देतात :


    माझें बोलणे सत्य सांग । माझ्या भागाचा अर्धभाग ।
    साजणी गुएई वो सवेग । दोघींचे अभंग सख्यत्व येणें ॥ २२ ॥
    ऐकतां कौसल्येचें वचन । कैकेयीस जालें समाधान ।
    करूनि सुद्धाचमन । भागार्थ घे आपण स्वानंदें ॥ २३ ॥
    मृत पावे अमृतपान । तृषिता मुखीं निज जीवन ।
    अंधा उघडले लोचन । तैसें वचन कौसल्येचें ॥ २४ ॥
    रंका लाधलें निधान । अकर्मी पावे ब्रह्मज्ञान ।
    दुष्काळिया मिळे मिष्टान्न । तैसें वचन कौसल्येचें ॥ २५ ॥
    कौसल्येची बुद्धि समान । समत्वें भागविभाग आपण ।
    कैकेयीसी दे विभागून । सुखसंपन्न समत्वें ॥ २६ ॥
    भाग देतां कैकेयीसी । कौसल्या अति उल्हासी ।
    सवतीभाव नाहीं मानसीं । देत उल्हासीं निजभाग ॥ २७ ॥
    जैसी कौसल्येची विधी । तैसीच सुमित्रेची सद्बुगद्धी ।
    बाप सत्संगाची सिद्धी । दे अर्धार्ध निजभाग ॥ २८ ॥
    सत्संगाचें निजमहिमान । कौसल्या देत आपणासमान ।
    कौसल्येसंगें सुमित्रा जाण । दे आपण भागार्ध ॥ २९ ॥
    सुष्ठु मैत्री कौसल्येसीं । म्हणोनि सुमित्रा म्हणणें तियेसी ।
    तेणें सुमित्रा भावेंसी । दे कैकेयीसी भागार्ध ॥ ३० ॥
    जैसा संग होय ज्यासी । तैसी बुद्धि होय त्यासी ।
    कौसल्यासंगे सुमित्रा तैसी । दे कैकेयीसी भागार्ध ॥ ३१ ॥


    ऋषींना आनंद :


    ऐकोनि कौसल्येचा वचनार्थ । देखोनि भागदानींच नि स्वार्थ ।
    वसिष्ठ आनंदें नाचत । स्वयेंडुल्लत स्वानंदें ॥ ३२ ॥
    करितां भागप्राशन । उदरा आला रघुनंदन ।
    धन्य अयोध्या-राजभुवन । तेथें स्वानंदघन क्रीडेल ॥ ३३ ॥
    उभवोनी स्वानंदाची गुढी । नारदाची पडे उडी ।
    नाचूं लागे आवडी । सूर्यवंशा गाढी दशा आली ॥ ३४ ॥
    सुटेल देवांची बांधवडी । तुटेल नवग्रहांची बेडी ।
    मुक्ति सुरवाडेल गाढी । सुख सुरवाडी पाल्हेजेल ॥ ३५ ॥
    माझ्या वाल्मीकीचें वचन । जालें प्रत्यक्षप्रमाण ।
    राम प्रगटला निजनिधान । धन्य जन अयोध्येचे ॥ ३६ ॥
    लंकेपुडें युद्ध दारुण । राम करील रणकंदन ।
    तें मी देखेन आपण । हरिखें उड्डाण करी नारद ॥ ३७ ॥
    जेविव्याची चवी जेविता जाणे । तेवीं वसिष्ठनारदांचे नाचणें ।
    तें सुख तिहींच भोगणें । येरीं पाहणें टकमकां ॥ ३८ ॥
    विभांडक आनंए मनीं । कौसल्या सत्वशिरोमणी ।
    इचेनि पावन जाली अवनी । धन्य त्रिभुवनीं कौसल्या ॥ ३९ ॥
    जृष्यशृंग तये वेळीं । सुखावला सुखकल्लोळीं ।
    उड्डाण करोनि दे आर्ळी । कौसल्या भूतळीं आणील राम ॥ ४० ॥
    कौसल्येचा शुद्ध भावो । ते भावीं प्रकटला रामरावों ।
    धन्य दशरथ महाबाहों । गर्भान्वयो अलोलिक ॥ ४१ ॥
    विस्मय करिती ऋषीश्वर । तटस्थठेले सुरवर ।
    अवघे करिती जयजयकार । भागिला रघुवीर चतुर्थ भागीं ॥ ४२ ॥
    मुख्य द्वेष सवतीमत्सरासी । तो मत्सर नाहीं कौसल्येसी।
    म्हणोनि श्रीराम आला कुसी । त्या गर्भासी अवधारा ॥ ४३ ॥
    सवती मत्सर कैकेयीसी । म्हणोनि हारविलें निजभागासी ।
    शुद्ध भाव कौसल्येसी । तिच्या गर्भासी श्रीराम ॥ ४४ ॥
    एक ताट आलें जञशेषीं । तेथेचि गर्भ निश्चयेसीं ।
    तो विभागला चतुर्थ भागेंसी । चतुर्विध त्यासी बोलिजे ॥ ४५ ॥
    मुख्यार्थ कौसल्येपासी । तद्भंजनार्ध जाणा सुमित्रेसी ।
    दोनी अर्धार्ध कैकेयीसी । स्वतंत्र भाग तिसी असेचिना ॥ ४६ ॥
    पुढां पोटीं होती पुत्र । ते तिचे नव्हती स्वतंत्र ।
    यालागीं बोलिजे परतंत्र । कैकेयीचरित्र नावडे त्यांसीं ॥ ४७ ॥
    असो पुढील कथेसी । वसिष्ठें पाचारोनि तिघींसी ।
    देवोनि भाग विभागासी । म्हणे विलंबासी करूं नये ॥ ४८ ॥


    कैकेयीचा उद्वेग व याचे परिणाम :


    दोघीं निजभागप्राशन । केलें न लगतां दर्शन ।
    कैकेयी भागप्राशन । करितां उद्विग्न ते जाली ॥ ४९ ॥
    दोनी अर्ध जंव घोंटी । तंव ते बैसले कंठीं ।
    गिळूं जातां अति संकष्टीं । गोंटितां घोटी गोंटेना ॥ ५० ॥
    भाग तिचे नव्हते स्वतंत्र । परभाग गिळूं न शके वक्त्र ।
    पांढरे जाले तिचे नेत्र । वमनोद्‌गार ते जाली ॥ ५१ ॥
    पराचें ओझें वाहणें । तें आपणासी होय उबगवाणें ।
    तेवीं परभाग घोंटिता तिणें । जीवे प्राणें घोंटेना ॥ ५२ ॥
    विभागें रोधली तिची घांटी । ऐसें वसिष्ठें देखिली दृष्टी ।
    मंत्रोदक देऊन उठाउठी । तेणें घोटी विभाग ॥ ५३ ॥
    सेवितां ते मंत्रोदक । फिटली शंका पावली सुख ।
    पुत्रगर्भाचा संतोष । आत्यंतिक ते पावे ॥ ५४ ॥
    साधु सतां निजनिकट । भलतें निवारे संकट ।
    गर्भमंडित जालें पोट । सुख उद्भ ट कैकेयीसी ॥ ५५ ॥
    हरपले सांपडे रत्न । मरत्या घडे अमृतपान ।
    तेवीं वसिष्ठोदकें जाण । सुख परम कैएयीसी ॥ ५६ ॥


    सत्संगमहिमा :


    यालागी सत्संगती । दुःख नव्हे ना अधोगती ।
    सत्संगाची परम ख्याती । नेणों किती उद्धरले ॥ ५७ ॥

    सत्संगेन हि दैतेया यातुधानाः खगा मृगाः ।
    गंधर्वा राक्षसा नागां सिद्धचारणगुह्यकाः ॥ २ ॥

    दैत्यदानव राक्षसृष्टी । गण गंधर्व मृग पक्षी पुष्टी ।
    सिद्ध चारण गुह्यक कोटी । उद्धरले सृष्टी सत्संगें ॥ ५८ ॥
    मनुष्यलोकींची गोष्टी । सत्संग लाधल्यापाठीं ।
    उद्धरले कोट्यनुकोटी । सभाग्य सृष्टी सत्संगें ॥ ५९ ॥
    धन्य धन्य तो दशरथ । ज्यासी सत्संग पुरोहित ।
    त्याची काठी मानी आदित्य । तो घरांत निजसखा ॥ ६० ॥
    तेणें विसिष्ठें आपण । तिघींस करविलें पिंडप्राशन ।
    एका विनवी जनार्दन । गर्भावधारण अवधारा ॥ ६१ ॥
    स्वस्ति श्री भावार्थरामायणेबालकांडे एकाकारटीकायां
    पिंडप्राशनं नाम तृतीयो‍धायः ॥
    ॥ श्लोक २ ॥ ओंव्या ६२ ॥ एवं ६४ ॥

    भावार्थ रामायण बालकाण्ड

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय पहिला

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय दुसरा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय तिसरा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय चौथा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय पाचवा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय सहावा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय सातवा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय आठवा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय नववा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय दहावा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय अकरावा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय बारावा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय तेरावा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय चौदावा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय पंधरावा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय सोळावा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय सतरावा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय अठरावा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय एकोणिसावा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय विसावा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय एकविसावा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय बाविसावा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय तेवीसावा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय चोविसावे

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय पंचविसावा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय सव्विसावा

    भावार्थ रामायण बालकाण्ड अध्याय सत्ताविसावा

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...