मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
एकनाथी भागवत अध्याय २८ ओव्या २०१ ते ३००
त्या संसाराची आधावती । गुणसाम्यें तोचि ‘प्रकृति’ ।
तेथ उत्पत्तिस्थिति-प्रळयार्थी । क्षोभिकाशक्ति ‘काळ’ तो झाला ॥ २०१ ॥
तो काळ आपल्या सत्ताशक्तीं । उपजवी पाळी संहारी अंतीं ।
ऐशा पुनःपुनः आवृत्ती । जेणें किती करवीत ॥ २०२ ॥
एवं संसार तो ब्रह्मस्फूर्ति । लीलाविग्रहें साकारस्थिती ।
मी विश्वेश्वर विश्वमूर्ती । बहुधा व्यक्ती मी एक ॥ २०३ ॥
यालागीं जो जो पदार्थ दिसे । तेणें तेणें रूपें आत्मा भासे ।
मजवेगळा पदार्थ नसें । हें मानी विश्वासें तो धन्य ॥ २०४ ॥
मीचि एक बहुधा व्यक्ती । वेदही साक्षी येचि अर्थीं ।
‘विश्वतश्चक्षु’ या वेदोक्तीं । श्रुति मज गाती सर्वदा ॥ २०५ ॥
ऐसें असतां नवल कैसें । जीव भुलला कल्पनावशें ।
अहंता वाढवी देहाध्यासें । तो म्हणे देव न दिसे तिहीं लोकीं ॥ २०६ ॥
सत्य मानूनि भेदभान । जीव झाला अतिअज्ञान ।
भुलला आपण्या आपण । देहाभिमान दृढ झाला ॥ २०७ ॥
देहाभिमानाचें दृढपण । तेंचि ‘बद्धतेचें लक्षण’ ।
देहाभिमानाचें निरसन । ‘मुक्तता’ जाण ती नांव ॥ २०८ ॥
समूळ मिथ्या देहाभिमान । मिथ्या भेदाचें भवभान ।
त्याचें आद्यंत निर्दळण । होतें लक्षण हरि सांगे ॥ २०९ ॥
अमूलमेतद् बहुरूपरूपितं
मनोवचःप्राणशरीरकर्म ।
ज्ञानासिनोपासनया शितेन
च्छित्वा मुनिर्गां विचरत्यतृष्णः ॥ १७ ॥
भेदरूपें भवभान । मनसा वाचा कर्म प्राण ।
देहद्वयाचें जें स्फुरण । तें निर्मूळ जाण उद्धवा ॥ २१० ॥
भेदें बहुरूप भवपटळ । विचारितां तें निर्मूळ ।
विचित्र भासावया भवजाळ । आत्म्यावेगळें स्थळ असेना ॥ २११ ॥
आत्म्याहूनि संसार भिन्नं । म्हणती ते केवळ अज्ञान ।
त्यांसी बहुरूपें भवभान । देहभिमान वाढवी ॥ २१२ ॥
त्यादेहाभिमानाचे पोटीं । कर्माकर्मांची आटाटी ।
जन्ममरणांचिया कोटी । दुःख संकटीं जीव भोगी ॥ २१३ ॥
ऐसा दुःखादाता देहाभिमान । समूळ जाणोनियां आपण ।
त्याचें करावया निर्दळण । अनुतापी पूर्ण जो स्वयें होय ॥ २१४ ॥
तेणें आचार्यउपास्ती । लाहोनि ज्ञानखड्गाची प्राप्ती ।
गुरुवाक्यसाहणेप्रती । सतेजद्युती खड्ग केलें ॥ २१५ ॥
भववृक्षाचा समूळ कंद । देहाभिमान अतिसुबद्ध ।
अद्वैतसाधनें साधक शुद्ध । तेणें समूळ छेद करावा ॥ २१६ ॥
एवं छेदूनि देहाभिमान । उरलेनि आयुष्यें जाण ।
मही विचरती सज्जन । निरभिमान निजनिष्ठा ॥ २१७ ॥
तेथ इच्छा निंदा द्वेष तृष्णा । सर्वथा नातळें पैं जाणा ।
मनचि मुकलें मनपणा । इच्छादि तृष्णा तेथ कैंची ॥ २१८ ॥आशंका ॥
समूळ संसारनिर्दळण । करी ऐसें तें ज्ञान कोण ।
त्या ज्ञानासी कोण साधन । साधल्या ज्ञान फल काय ॥ २१९ ॥
याचें समूळ श्रवण । उद्धवाचें वांछी मन ।
तें जाणोनियां श्रीकृष्ण । स्वयें निरूपण सांगत ॥ २२० ॥
ज्ञानं विवेको निगमस्तपश्च
प्रत्यक्षमैतिह्यमथानुमानम् ।
आद्यन्तयोरस्य यदेव केवलं
कालश्च हेतुश्च तदेव मध्ये ॥ १८ ॥
नित्यानित्यविवेक । या नांव ‘ज्ञान’ चोख ।
देहद्वयाचा प्रकाशक । आत्मा सम्यक जाणती ज्ञाते ॥ २२१ ॥
सेवावया स्वादरस-नव्हाळी । प्रथम उंसाचीं पानें साळी ।
मग ऊंस तोही बळें पिळी । तोही रस आळीं तैं शर्करा लाभे ॥ २२२ ॥
तेहि शर्करा परिपाकबळें । तैं साखरचि केवळें ।
केळें आणि नारेळें । करिती नाना फळें मूळींच्या गोड्या ॥ २२३ ॥
तेवीं स्थूळाचें निराकरण । लिंगदेहाचें उपमर्दन ।
अहंकाराचें निर्दळण । करूनि पूर्ण ब्रह्म पावती ज्ञाते ॥ २२४ ॥
तें ब्रह्म निर्गुण निराकार । तद्रूपें देखती चराचर ।
यापरी विवेकचतुर । वस्तूचा निर्धार जाणती ॥ २२५ ॥
यापरी गा विचक्षण । जाणती वस्तूचें लक्षण ।
या नांव पैं ‘विवेकज्ञान’ । उद्धवा जाण निश्चित ॥ २२६ ॥
वस्तु निःशब्द निर्गुण । तेथ जें श्रुतिचें स्फुरण ।
इत्थंभूत शब्दज्ञान । वेद तो जाण निगम माझा ॥ २२७ ॥
तो मी वेदरूप नारायण । यालागीं वेदवचन प्रमाण ।
श्रुत्यर्थ शब्दज्ञान । करी पावन पाठकां ॥ २२८ ॥
जाणावया निजात्मस्वरूप । देहादि विषयांचा अनुताप ।
जेणें साधक होती निष्पाप । या नांव ‘तप’ उद्धवा ॥ २२९ ॥
अनुतापें दमितां मन । होय पापाचें क्षालन ।
तेव्हां श्रुत्यर्थे आपण । कल्पी ‘अनुमान’ वस्तूचें ॥ २३० ॥
देह जड मूढ अचेतन । तेथ चेतनात्मक नारायण ।
देहाचें मानूनि मिथ्यापण । अद्वैतीं मन मुसावे ॥ २३१ ॥
तें अद्वैतप्राप्तीचें लक्षण । अनन्यभावें आपण ।
सद्गुरूसी रिघावें शरण । निरभिमान भावार्थें ॥ २३२ ॥
सद्भावें अनन्यशरण । तो गुरुकृपा पावे आपण ।
पाहोनि अधिकारलक्षण । गुरु गुह्यज्ञान उपदेशी ॥ २३३ ॥
‘सर्वही निष्टंक परब्रह्म’ । हें श्रुतिगुह्य उत्तमोत्तम ।
एथ भाग्यें जो सभाग्य परम । त्यासाचि सुगम ठसावे ॥ २३४ ॥
गुरुवचन पडतां कानीं । वृत्ति निजात्मसमाधानीं ।
विनटोनि ठेली चिद्घनीं । सुखसमाधानीं स्वानंदें ॥ २३५ ॥
तयासी पुढतीं साधन । अथवा कर्माचें कर्माचरण ।
तेथ बोलों शके कोण । वेदीं मौन घेतलें ॥ २३६ ॥
जेथ द्वंद्वाची निमाली स्फूर्ती । सकळ दुःखांची समाप्ती ।
देहीं विदेहवस्तुप्राप्ती । ‘प्रत्यक्ष’ म्हणती या नांव ॥ २३७ ॥
पुसूनियां विसराचा ठावो । आठवेंवीण नित्य आठवो ।
अखंड स्वरूपानुभवो । ‘प्रत्यक्ष’ पहा हो या नांव ॥ २३८ ॥
मी आत्मा स्वानंदकंद । ऐसा अखंडत्वें परमानंद ।
‘प्रत्यक्ष’ पदाचा हा निजबोध । स्वयें गोविंद बोलिला ॥ २३९ ॥
हाचि बोध सभाग्याकडे । श्रवणमात्रें त्या आतुडे ।
एका मननें जोडे । एका सांपडे निदिध्यासें ॥ २४० ॥
एकासी तो प्रत्यगावृत्तीं । हा बोध ठसावे चित्तीं ।
एका माझिया अद्वैतभक्तीं । मी सगळा श्रीपति आतुडें ॥ २४१ ॥
निजबोध साधावया पूर्ण । उद्धवा हें तों मुख्य साधन ।
एवं साधलिया निजज्ञान । फळ कोण तें ऐक ॥ २४२ ॥
जो मी सृष्टिआदि अनंतु । नित्यमुक्तत्वें अहेतु ।
तो मी भवमूळा मूळहेतु । सृष्टिसृजिता अच्युतु स्वलीला ॥ २४३ ॥
तेथ रजोगुणाचिये स्थिती । स्त्रष्टरूपें मीचि पुढतीं ।
अद्वैतीं दावीं अनेक व्यक्ती । सृष्टिउत्पत्तिकर्ता तो मी ॥ २४४ ॥
जैसें मूळेंवीण सफळ झाड । वाढविलें निजांगीं गोड ।
तेवीं सृष्टिसंरक्षणीं कोड । मज निचाडा चाड प्रतिपालनीं ॥ २४५ ॥
बुद्धिबळें एक काष्ठाचे पोटीं । तेथ राजा प्रधान पशु प्यादा उठी ।
त्यांसी पूर्वकर्म नाहीं गांठीं । तेवीं निष्कर्मे सृष्टिप्रकाशिता तो मी ॥ २४६ ॥
निष्कर्मे जग समस्त । सृजिता मीमांसकमत ।
ठकोनि ठेलें निश्चित । जग सदोदित निष्कर्मब्रह्म ॥ २४७ ॥
जेवीं बुद्धिबळांचा खेळ । अचेतनीं युद्ध प्रबळ ।
तेवीं लोकरक्षणीं कळवळ । सृष्टिप्रतिपाळ मी कर्ता ॥ २४८ ॥
प्रकृतीच्या जडमूढ सारी । पुरुषाचेनि सचेतन निर्धारीं ।
काळफांसे घेऊनि करीं । खेळविता चराचरीं मी एक विष्णु ॥ २४९ ॥
तेथ अचेतना झुंजारीं । न मरत्या महामारीं ।
एका जैत एक हारी । उभयपक्षांतरीं खेळविता मी ॥ २५० ॥
सोंगटीं निमालियापाठीं । कवण पुण्यात्मा चढे वैकुंठीं ।
कोण पडे नरकसंकटीं । तैसा जाण सृष्टीं बंधमोक्ष ॥ २५१ ॥
तेवीं न मोडतां एकलेपण । त्या खेळाच्या ऐसें जाण ।
जगाचें करीं मी पालन । दुजेंपण नातळतां ॥ २५२ ॥
दोराचा सर्पाकार । सबळ बळें मारी वीर ।
तैसा सृष्टीसी संहार । मी प्रळयरुद्र पैं कर्ता ॥ २५३ ॥
स्वप्नीं भासलें जग संपूर्ण । तेथूनि जागा होतां आपण ।
स्वप्न निर्दळितां कष्ट कोण । तैसा मी जाण प्रळयकर्ता ॥ २५४ ॥
सृष्टिसी उत्पत्ति स्थिति निदान । आत्मा आत्मत्वें अखंड पूर्ण ।
तेंचि स्वरूप सज्ञान । स्वानुभवें आपण होऊनि ठेलें ॥ २५५ ॥
तें निजरूप झालों म्हणणें । हेंही बोलणें लाजिरवाणें ।
तें स्वयंभ असतां ब्रह्मपणें । होणें न होणें भ्रममात्र ॥ २५६ ॥
मिथ्या दोराचा सर्पाकार । भासतां तो असे दोर ।
निवर्तल्या सर्पभरभार । दोर तो दोर दोररूपें ॥ २५७ ॥
तेवीं सृष्टीसी उत्पत्ति होतां । आत्मा जन्मेना तत्त्वतां ।
सृष्टीचा प्रतिपाळकर्ता । आत्मा सर्वथा वाढेना ॥ २५८ ॥
सृष्टीसी महाप्रळय होतां । आत्मा नायके प्रळयवार्ता ।
उत्पत्तिस्थितिनिदानता । आत्मा तत्त्वतां अविकारी ॥ २५९ ॥
एवं साधनीं सधूनि ज्ञान । साधक झाले सज्ञान ।
तें अबाधित ब्रह्म पूर्ण । स्वयें आपण होऊनि ठेले ॥ २६० ॥
अज अव्यय स्वानंदघन । साधक झाले ब्रह्म पूर्ण ।
हें ज्ञानाचें फळ संपूर्ण । उद्धवा जाण निश्चित ॥ २६१ ॥
हें ज्ञानफळ आलिया हाता । उत्पत्ति स्थिति प्रळय होतां ।
अखंड परिपूर्ण निजात्मता । ते सदृष्टांता हरि सांगे ॥ २६२ ॥
यथा हिरण्यं स्वकृतं पुरस्तात्
पश्चाच्च सर्वस्य हिरण्मयस्य ।
तदेव मध्ये व्यवहार्यमाणं
नानापदेशैरहमस्य तद्वत् ॥ १९ ॥
मुकुट कुंडले करकंकणें । न घडितां सोनें सोनेपणें ।
त्याचीं करितां नाना भूषणे । लेणेंपणें उणें नव्हेचि हेम ॥ २६३ ॥
ते मोडतां अळंकारठसे । सोनें अविकार संचलें असे ।
तेवीं उत्पत्तिस्थितिविनाशें । माझें स्वरूप चिदंशें अविनाशी ॥ २६४ ॥
माझें स्वरूप शुद्ध परब्रह्म । तेथ नाना रूप नाना नाम ।
भासतांही जग विषम । ब्रह्मरस समसाम्यें ॥ २६५ ॥
जेवीं सूर्याचे किरण । सूर्यावेगळे नव्हती जाण ।
तेवीं जग मजशीं अभिन्न । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ २६६ ॥
विज्ञानमेतत् त्रियवस्थमङ्ग
गुणत्रयं कारणकार्यकर्तृ ।
समन्वयेन व्यतिरेकतश्च
येनैव तुर्येण तदेव सत्यम् ॥ २० ॥
सत्त्वगुणें जागरण । रजोगुणें दिसे स्वप्न ।
तमोगुणें सुषुप्ति जाण । लागे संपूर्ण गाढ मूढ ॥ २६७ ॥
ऐसें तिहीं अवस्थायुक्त मन । कार्य कर्तृत्व कारण ।
त्रिविध जग भासे संपूर्ण । ब्रह्म समन्वयें जाण सदोदित ॥ २६८ ॥
मृत्तिकेवेगळा घट न दिसे । तंतूवेगळा पट न प्रकाशे ।
तेवीं मजवेगळें जग नसें । जें जें भासे तें मद्रूप ॥ २६९ ॥
जो मी तिनी गुणांतें नातळता । अवस्थात्रयातें नाकळता ।
तिंही अवस्थांतें प्रकाशिता । तो मी चवथा जाण ‘तुरीय’ ॥ २७० ॥
तिन्ही अवस्था तिन्ही गुण । दृश्य द्रष्टा आणि दर्शन ।
त्रिपुटीप्रकाशिता पूर्ण । ती मी चवथा जाण ‘तुरीय’ ॥ २७१ ॥
जो मी तुरीय सच्चिद्घन । त्या माझ्या ठायीं अवस्थागुण ।
नभीं नीळिमा मिथ्या भान । तैसे नसते जाण भासती ॥ २७२ ॥
आशंका ॥
‘तिंही अवस्थांचें ज्ञान पाहीं । देखिजे समस्तांच्या ठायीं ।
चवथें ज्ञान ‘तुरीय’ कांहीं । ऐकिलें नाहीं गोविंदा’ ॥ २७३ ॥
चौथे ज्ञान तुरीयावस्था । मिथ्या म्हणसी न विचारतां ।
तेचिविखीं विशदार्था । श्रीकृष्ण तत्त्वतां सांगत ॥ २७४ ॥ ‘व्यतिरेकतश्च’ ॥
देहादिप्रपंचव्यतिरेकता । भूतीं भूतांचा लयो पाहतां ।
लीन झालिया गुणावस्था । उरे मी चवथा ‘तुरीय’ ॥ २७५ ॥
तें एवंविध बोलों जातां । वेदीं मूग आरोगिले सर्वथा ।
हें अनुभवैकवेद्य तत्त्वतां । शब्दप्रगल्भता सरेना ॥ २७६ ॥
एथ न चले युक्तिप्रयुक्ती । न चले जाणिवेची व्युत्पत्ती ।
न चले लक्ष्यलक्षणस्थिति । गुरुकृपाप्राप्ती ‘तुरीय’ ॥ २७७ ॥
जागृत्यादि सर्वही सत्ता । सुषुप्ति सर्वही असतां ।
याचा ‘तुरीय’ मी प्रकाशिता । मजविण सर्वथा त्या भासती केवीं ॥ २७८ ॥
जो सुषुप्तीं साक्षित्व पावता । तो मी ‘तुरीय’ जाण पां चौथा ।
त्या मज सत्यस्वरूपता । केला निश्चितार्था निश्चयो वेदें ॥ २७९ ॥
त्या स्वरूपावेगळें एथ । जें भासे तें मिथ्याभूत ।
तेचि अर्थीं श्रीकृष्णनाथ । असे सांगत निजबोधें ॥ २८० ॥
न यत् पुरस्तादुत यन्न पश्चात्
मध्ये च तन्न व्यपदेशमात्रम् ।
भूतं प्रसिद्धं च परेण यद्यद्
तदेव तत्स्यादिति मे मनीषा ॥ २१ ॥
जागृतीमाजीं जें जें दिसे । तें तें जागृतीसवें नासे ।
स्वप्नीं जें जें आभासे । तें स्वप्नासरिसें मावळे ॥ २८१ ॥
जागृती स्वप्न निकार्येंसीं । दोनी हारपती सुषुप्तीपाशीं ।
सुषुप्ती हारपे जागृतीसीं । यापरी प्रपंचासी सत्यत्व नाहीं ॥ २८२ ॥
प्रपंच सृष्टीपूर्वीं नाहीं । प्रळयानंतर नुरेचि कांहीं ।
मध्येंचि आभासे जें कांहीं । तें मिथ्या पाहीं असंत ॥ २८३ ॥
प्रपंचाचें वोडंबर । नामरूपाचे उभारी भार ।
तें प्रयक्ष देखों नश्वर । गंधर्वनगर तत्प्राय ॥ २८४ ॥
पित्यादेखतां पुत्र मरे । पुत्रादेखतां पिता झुरे ।
काळें काळ अवघेंचि सरे । कोणीही नुरे क्रियेसी ॥ २८५ ॥
सागरीं जे लहरी उसासे । उसासली ते स्वयेंचि नासे ।
तेवीं नामरूपा आलें दिसे । तें अनायासें नश्वर ॥ २८६ ॥
प्रपंच हें नाममात्र । येरवीं परमात्मा मी स्वतंत्र ।
एवं संसाराचें जन्मपत्र । नेणोनि दुस्तर मानिती जीव ॥ २८७ ॥
प्रपंच ज्यापासूनि झाला । जेणें सर्वार्थीं प्रकाशिला ।
अंतीं ज्यामाजीं सामावला । तो तद्रूप संचला निजात्मा ॥ २८८ ॥
शुक्तिकारजतन्यायें जाण । प्रपंच ब्रह्मेंसीं अभिन्न ।
जें प्रपंचाचे स्फुरे स्फुरण । तें ब्रह्मचि पूर्ण उद्धवा ॥ २८९ ॥
त्या माझेनि सत्य श्रुतिस्मृती । तो मी सत्यपदीज्ञ श्रीपती ।
त्रिसत्य सत्य तुजप्रती । सांगितला निश्चितीं निजभावार्थ ॥ २९० ॥
ऐकोन देवाचें वचन । उद्धव आशंकी आपण ।
एकाचेनि मतें जाण । प्रपंच भिन्न मानिती ॥ २९१ ॥
प्रपंचासी देवो कांहीं । निजांगीं आतळला नाहीं ।
ऐसें तूं कल्पिसी कांहीं । ऐक तेविषयीं सांगेन ॥ २९२ ॥
अविद्यमानोऽप्यवभासते यो
वैकारिको राजससर्ग एषः ।
ब्रह्म स्वयंज्योतिरतो विभाति
ब्रह्मेन्द्रियार्थात्मविकारचित्रम् ॥ २२ ॥
मुख्यत्वें मन विकारी पूर्ण । त्यासी मिळूनि तिनी गुण ।
नसताचि संसार जाण । विचित्रा भरण दाखवी ॥ २९३ ॥
मन बुद्धि चित्ता अहंकार । आणि अधिष्ठाते सुरवर ।
हे सत्त्वगुणाचे विकार । जाण साचार उद्धवा ॥ २९४ ॥
रजोगुणाचीं दशेंद्रियें । पंचभूतें पंचविषये ।
तमोगुणिया जन्म होये । ते जनासी पाहें भुलविती ॥ २९५ ॥
जेवीं वोडंबरियाचा खेळ । नसताचि भासे प्रबळ ।
तेवीं त्रिगुणांचें विचित्र जाळ । मिथ्या निर्मूळ आभासे ॥ २९६ ॥
ब्रह्म स्वयें अकारण । स्वप्रकाशें प्रकाशमान ।
तेंचि प्रपंचाचें महाकारण । प्रकाशक जाण स्वयें झालें ॥ २९७ ॥
जेवीं छायामंडपींच्या नाना व्यक्ती । तद्रूप भासे दीपदीप्तीं ।
तेवीं जगदाकारें स्वयंज्योती । भासें मी चिन्मूर्ति परमात्मा ॥ २९८ ॥
एवं प्रपंचाचें जें स्फुरण । तें स्वप्रकाश ब्रह्म पूर्ण ।
हें हातवसूनि ब्रह्मज्ञान । विकल्पच्छेदन हरि सांगे । २९९ ॥
एवं स्फुटं ब्रह्म विवेकहेतुभिः
परापवादेन विशारदेन ।
छित्त्वाऽत्मसन्देहमुपारमेत
स्वानन्दतुष्टोऽखिलकामुकेभ्यः ॥ २३ ॥
पूर्वीं बोलिलों यथानिगुती । ब्रह्मज्ञान नानायुक्तीं ।
ते करतलामलकस्थिती । प्रकट प्रतीती प्रमाण ॥ ३०० ॥