मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
एकनाथी भागवत अध्याय २८ ओव्या १0१ ते २००
प्रपंच मजवरी आभासे । परी मी प्रपंचामाजीं नसें ।
जेवीं मृगजळाचेनि रसें । सूर्य काळवशें भिजेना ॥ १०१ ॥
त्रिविध प्रपंचाचें जाळ । मजवरी दिसे हें निर्मूळ ।
जेवीं गगन भासे सुनीळ । परी तेथ अळुमाळ नीळिमा नाहीं ॥ १०२ ॥
‘जग प्रत्यक्ष डोळां दिसे । तें तूं निर्मूळ म्हणसी कैसे’ ।
हे आशंका मानिसी मानसें । ऐक अनायासें तो बोध ॥ १०३ ॥
इदं गुणमयं विद्धि त्रिविधं मायया कृतम् ॥ ७ ॥
एतद्विद्वान्मदुदितं ज्ञानविज्ञाननैपुणम् ।
न निन्दति न च स्तौति लोके चरति सूर्यवत् ॥ ८ ॥
अध्यात्म अधिदैव अधिभूत । हें त्रिविध जग मायाकृत ।
नसतें मजमाजीं आभासत । जाण निश्चित त्रिगुणात्मक ॥ १०४ ॥
उद्धवा चिथ्या म्हणोनि तूं एथ । झणें होशी उपेक्षायुक्त ।
येणें मद्वाक्यें साधुसंत । ज्ञानविज्ञानार्थ पावले ॥ १०५ ॥
प्रपंचाचें मिथ्या भान । तेंचि ज्ञानांचे मुख्य ज्ञान ।
येणें ज्ञानें जो सज्ञान । तोचि समान सर्वांभूतीं ॥ १०६ ॥
यालागीं हूतांचे गुणागुण । कदा न वदे निंदास्तवन ।
सूर्याचे परी जाण । विचरे आपण समसाम्यें ॥ १०७ ॥
बदरिकाश्रम उत्तरदेशीं । सेतुबंध दक्षिणेसी ।
सूर्य संमुख सर्वांसी । विमुखता त्यासी असेना ॥ १०८ ॥
सूर्य संमुख पूर्वेच्यांसी । तोचि विमुख पश्चिमेच्यांसी ।
नाहीं तेवीं मी सर्वत्र सर्वांसी । विमुखता मजसी असेना ॥ १०९ ॥
सामर्थें तम दवडूनि जाण । भूतांसी सूर्य भेटे आपण ।
तेविं जगाचे दवडूनि दोषगुण । साधुसज्जन विचरती ॥ ११० ॥
जें हें बोलिलें ज्ञानलक्षण । तेंचि सिद्धांचें पूर्णपण ।
मुमुक्षीं हें अनुसंधान । सावधान साधावें ॥ १११ ॥
हेंचि पाविजे जिजज्ञान । तेचि अर्थींचें साधन ।
उद्धवालागीं श्रीकृष्ण । स्वमुखें आपण सांगत ॥ ११२ ॥
प्रत्यक्षेणानुमानेन निगमेनात्मसंविदा ।
आद्यन्तवदसञ्ज्ञात्वा निःसङ्गो विचरेदिह ॥ ९ ॥
जे जन्मोनि नाशवंत । ते सर्वही जाण असंत ।
आसक्ति सांडोनियां तेथ । उदास विरक्त वर्तावें ॥ ११३ ॥
सटवल्याचें बारसें । कोणी न करिती उल्हासें ।
नश्वर देह वाढतां तैसें । मूर्ख मानसे सुखावती ॥ ११४ ॥
उत्पत्तिविनाशलक्षण । त्याचें देव सांगतो प्रमाण ।
नित्य भूतांचें जन्ममरण । देखिजे आपण ‘प्रत्यक्ष’ ॥ ११५ ॥
‘अनुमान’ करितां साचार । जें जें देखिजे साकार ।
मेरुपृथ्व्यादि आकार । होती नश्वर प्रळयांतीं ॥ ११६ ॥
येचि अर्थीं वेदोक्ती । नाशवंत अष्टधा प्रकृति ।
जीवभाव नासे गा प्रांतीं । गर्जती श्रुती येणें अर्थें ॥ ११७ ॥
एथ आपुलाही अनुभव असे । जड विकारी तें तें नासे ।
हें कळत असे गा आपैसें । जग अनायासें नश्वर ॥ ११८ ॥
वडील निमाले देखती । पुत्रपौत्र स्वयें संस्कारिती ।
तरी स्वमृत्यूची चिंता न करिती । पडली भ्रांती देहलोभें ॥ ११९ ॥
पुत्र पितरां पिंडदान देती । उत्तम गति त्यांची चिंतिती ।
आपुली गति न विचारितीं । नश्वर आसक्ती देहलोभें ॥ १२० ॥
आत्मा केवल प्रकाशघन । प्रपंच जड मूढ अज्ञान ।
हें ऐकोनि उद्धवें आपण । देवासी प्रश्न पूसतु ॥ १२१ ॥
उद्धव उवाच-
नैवात्मनो न देहस्य संसृतिर्द्रष्ट्टदृश्ययोः ।
अनात्मस्वदृशोरीश कस्य स्यादुपलभ्यते ॥ १० ॥
आत्मा नित्यमुक्त चिद्घन । त्यासी न घडे भवबंधन ।
देह जड मूढ अज्ञान । त्यासी संसार जाण घडेना ॥ १२२ ॥
एथ भवबंधन हृषीकेशी । सांग पां बाधक कोणासी ।
जरी तूं संसार नाहीं म्हणसी । तो प्रत्यक्ष जगासी जडलासे ॥ १२३ ॥
आत्म्यासी विचारितां जाण । भवबंधा न दिसे स्थान ।
येचि अर्थींचें न घडतेपण । उद्धव आपण सांगत ॥ १२४ ॥
आत्माव्ययोऽगुणः शुद्धः स्वयंज्योतिरनावृतः ।
अग्निवद्दारुवदचिद्देहः कस्येह संसृतिः ॥ ११ ॥
आत्मा चिद्रूप अविनाशी । गुण निर्गुण नातळे ज्यासी ।
कर्माकर्मपापपुण्यासी । ठाव त्यापाशीं असेना ॥ १२५ ॥
परादिवाचा नव्हे उच्चार । यालागीं म्हणीपें ‘परात्पर’ ।
प्रकृतिगुणीं अविकार । प्रकृतिपर परमात्मा ॥ १२६ ॥
जयाच्या स्वप्रकाशदीप्तीं । रविचंद्रादि प्रकाशती ।
प्रकाशें प्रकाशे त्रिजगती । तेजोमूर्ती परमात्मा ॥ १२७ ॥
ऐशिया आत्म्याच्या ठायीं । भवबंधन न लगे कांहीं ।
सूर्य बुडे मृगजळाच्या डोहीं । तैं आत्म्यासी पाहीं भवबंध ॥ १२८ ॥
खद्योततेजें सूर्य जळे । बागुलाभेणें काळ पळे ।
मुंगीचेनि पांखबळें । जैं उडे सगळें आकाश ॥ १२९ ॥
वारा आडखुळीला आडीं पडे । जैं थिल्लरामाजीं मेरु बुडे ।
तरी भवबंध आत्म्याकडे । सर्वथा न घडे गोविंदा ॥ १३० ॥
देहाकडे भवबंधन । मूर्खही न मानिति जाण ।
देह जड मूढ अज्ञान । त्यासी भवबंधन कदा न घडे ॥ १३१ ॥
जैं दगडाचें पोट दुखे । कोरडें काष्ठ चरफडी भुकें ।
तैं देहाकडे यथासुखें । भवबंध हरिखे लागता ॥ १३२ ॥
जैं डोंगरासी तरळ भरे । मृत्तिका नाहाणालागीं झुरे ।
कोळसेनि काळें होय अंधारें । तैं भवबंधभारें देह दाटे ॥ १३३ ॥
म्हणसी देहात्मसंगतीं । घडे भवबंधाची प्राप्ती ।
विचारितां तेही अर्थीं । न घडे श्रीपति तें ऐक ॥ १३४ ॥
आत्मास्वप्रकाश महावन्ही । देह तो जड मूढ काष्ठस्थानीं ।
तो मिळतां आत्ममिळणीं । सांडी जाळूनि तत्काळ ॥ १३५ ॥
जैं अग्निमाजीं संवादें । कापूर आठ प्रहर नांदे ।
तैं देहात्मनिजसंबंधें । देह भवबंधें नांदता ॥ १३६ ॥
म्हणसी काष्ठामाजीं अग्नि असे । परी तो काष्ठचि होऊनि नसे ।
मथूनि काढिल्या निजप्रकाशें । जाळी अनायासें काष्ठतें ॥ १३७ ॥
तेवीं आत्मा देहामाजीं असे । परी तो देहचि होऊनि नसे ।
देहप्रकाशक चिदंशे । भवबंधपिसें त्या न घडे ॥ १३८ ॥ आशंका ॥
म्हणशी ‘आत्म्याचे निजसंगतीं । जैं कळोनि जाय भूतव्यक्ती ।
तैं भूतांची वर्तती स्थिती । कैशा रीतीं’ तें ऐक ॥ १३९ ॥
छायामंडपीं दीप प्रकाशी ॥ नाचवी कागदांच्या बाहुल्यासी ।
तेच लावितां दीपासी । जाळी अनायासीं त्या व्यक्तीं ॥ १४० ॥
तेवीं आत्म्याचे स्वसत्ताशक्तीं । भूतें दैवयोगें वर्तती ।
स्वयंभू झाल्या आत्मस्थिती । भूतव्यक्ती उरेना ॥ १४१ ॥
करितां आत्म्याचें अनुसंधान । संसाराचें नुरे भान ।
तेथ भूताकृति भिन्नभिन्न । कैंच्या जाण अतिबद्ध ॥ १४२ ॥
यापरी भवबंधन । मज पाहतां मिथ्या जाण ।
भवबंधालागीं स्थान । नेमस्त जाण असेना ॥ १४३ ॥
आत्म्याच्या ठायीं ना देहीं । उभयसंबंधींही नाहीं ।
भवबंध मिथ्या पाहीं । त्यासी ठावो कोठेंही असेना ॥ १४४ ॥
कोपों नको श्रीकृष्णनाथा । माझेनि निजनिर्धारे पाहतां ।
भवबंध मिथ्या तत्त्वतां । निश्चयें चित्ता मानलें ॥ १४५ ॥
ऐकोनि उद्धवाचें वचन । हरिखें वोसंडला श्रीकृष्ण ।
माझा उद्धव झाला सज्ञान । निजात्मखूण पावला ॥ १४६ ॥
सत्य मिथ्या भवबंधन । ऐकोनि उद्धवाचें वचन ।
परमानंदें डोले श्रीकृष्ण । जीवें निंबलोण करूं पाहे ॥ १४७ ॥
आत्म्यास भवबंध नाहीं । शेखींन दिसे देहाच्या ठायीं ।
हा विवेक नेणिजे जिंहीं । त्यासी भवबंध पाहीं हरि सांगे ॥ १४८ ॥
श्रीभगवानुवाच-
यावद्देहेन्द्रियप्राणैः आत्मनः सन्निकर्षणम् ।
संसार फलवांस्तावद् अपार्थोऽप्यविवेकिनः ॥ १२ ॥
जो वर्णाश्रमांहीपरता । जो बंधमोक्षां अलिप्तता ।
जो देहद्वंद्वा नातळता । तो उद्धवहितार्था हरि बोले ॥ १४९ ॥
मी कृश स्थूळ गौर श्याम । हे देहाचे ‘देहधर्म’ ।
मी काणा मुका बहिरा परम । हे ‘इंद्रियधर्म’ इंद्रियांचे ॥ १५० ॥
क्षुधातृषादि अनुक्रम । हा प्रणांचा ‘प्राणधर्म’ ।
कामक्रोधलोभादि संभ्रम । हा ‘मनोधर्म’ मनाचा ॥ १५१ ॥
सत्त्वगुणाची ‘जागृती’ । रजोगुणें ‘स्वप्नस्फूर्ती’ ।
तमोगुणें जाड्य ‘सुषुप्ती’ । जाण निश्चितीं देहयोगें ॥ १५२ ॥
देहासी येतां मरण । ‘मी मेलों’ म्हणे तो आपण ।
देहासी जन्म होतां जाण । जन्मलेपण स्वयें मानीं ॥ १५३ ॥
इंद्रिये विषयो सेविती । ते म्यां सेविले मानी निश्चितीं ।
स्वर्गनरकभोगप्राप्ती । सत्य मानिती देहात्मता ॥ १५४ ॥
अन्न आकांक्षी प्राण । त्यातें भक्षी हुताशन ।
तत्साक्षी चिदात्मा आपण । म्हणे म्यां अन्न भक्षिलें ॥ १५५ ॥
हे अवघे माझे धर्मं । ऐसा आत्म्यासी जंव दृढ भ्रम ।
तंव मिथ्याचि अतिदुर्गम । संसार विषम भ्रमें भोगी ॥ १५६ ॥
त्या भोगाचें फळ गहन । अविश्रम जन्ममरण ।
स्वर्गनरक पापपुण्य । भ्रमें आपण सत्य मानी ॥ १५७ ॥
संसार मूळीं निर्मूळ । तोही भ्रमफळें सदाफळ ।
जो कां अविवेक्यां अतिप्रबळ । सर्वकाळ फळलासे ॥ १५८ ॥
जेथ सत्य अर्थं नाहीं । तो ‘अनर्थ’ म्हणिजे पाहीं ।
त्याचा फळभोग तोही । बाळबागुलन्यायीं भोगावा ॥ १५९ ॥ आशंका ॥
‘गगनकमळांची माळा । जैं वंध्यापुत्र घाली गळां ।
तैं संसारभोगाचा सोहळा । आत्म्याच्या जवळां देखिजे ॥ १६० ॥
ऐसें न घडतें केवीं घडे’ । तेचि अर्थींचें वाडेंकोडें ।
श्रीकृष्ण उद्धवापुढें । निजनिवाडें सांगत ॥ १६१ ॥
अर्थे ह्यविद्यमानेऽपि संसृतिर्न निवर्तते ।
ध्यायतो विषयानस्य स्वप्नेऽनर्थागमो यथा ॥ १३ ॥
सत्यार्थ नसतांही संसार । निवर्तेना अतिदुर्धर ।
येचि अर्थींचा विचार । निजनिर्धार अवधारीं ॥ १६२ ॥
वंध्यापुत्राचिया ऐसें । संसारा सत्यपण नसे ।
सत्य म्हणों तरी हा नासे । काळवशें सहजेंचि ॥ १६३ ॥
संसार जैं सत्य होता । तैं ब्रह्मज्ञानेंही न नासता ।
हा संतासंत नये म्हणतां । अनिर्वाच्या कथा पैं याची ॥ १६४ ॥
अविचारितां याचें कोड । अविवेकें हा अतिगोड ।
विषयध्यानें वाढे रूढ । संकल्प सदृढ मूळ याचें ॥ १६५ ॥
हा नसतचि परी आभासे । निद्रिता स्वप्नीं अनर्थपिसें ।
तेवीं संसार मायावशें । विषय आभासें भोगवी ॥ १६६ ॥
जंव जंव विषयसेवन । तंव तंव वाढे विषयध्यान ।
विषयध्यासें भवबंधन । सदृढ जाण उद्धवा ॥ १६७ ॥
विषयसेवनें भवबंधन । जीवासी झालें दृढ पूर्ण ।
तैं जीवन्मुक्तासी विषयभान । दैवयोगें जाण दिसताहे ॥ १६८ ॥
‘जीवन्मुक्तासी विषयप्राप्ती । तेणें बुडाली त्याची मुक्ती’ ।
ऐशी आशंका न धरीं चित्तीं । तेंचि श्रीपति विशद सांगे ॥ १६९ ॥
यथा ह्यप्रतिबुद्धस्य प्रस्वापो बह्वनर्थभृत् ।
स एव प्रतिबुद्धस्य न वै मोहाय कल्पते ॥ १४ ॥
सज्ञान आणि अज्ञान । यांसी जें विषयसेवन ।
त्यांचा अनुभव भिन्नभिन्न । तेंही लक्षण अवधारीं ॥ १७० ॥
जेवीं स्वप्नींची विषयप्राप्ती । स्वप्नस्थ साचचि मानती ।
तेचि विषय जागृतीं स्फुरती । परी सत्यप्रतीति त्यां नाहीं ॥ १७१ ॥
तेवीं अज्ञानां विषयसेवन । तेणें विषयासक्त होय मन ।
तेंचि मुक्तांप्रति विषय जाण । मिथ्या दर्शन विषयांचें ॥ १७२ ॥
नटनाट्य-लोकाचारीं । संपादी स्त्रीपुरुषव्यवहारीं ।
मुक्तासी तैशी परी । गृहदारीं नांदता ॥ १७३ ॥
कां लेंकरांच्या खेळाप्रती । तुळसीदळें घेऊनि हातीं ।
वडे मांडे क्षीर तूप म्हणती । एकीं कल्पिती अनेकत्व ॥ १७४ ॥
तेवीं जीवन्मुक्तांसी देख । जगीं विषयो अवघा एक ।
त्यासी नानात्वें भाविती लोक । परी तो अनेक देखेना ॥ १७५ ॥
दृढ धरोनि देहाभिमान । ‘मी माझें’ जें विषयस्फुरण ।
तेंच भवबंधाचें कारण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥ १७६ ॥
शोकहर्षभयक्रोधलोभमोहस्पृहादयः ।
अहंकारस्य दृश्यन्ते जन्ममृत्युश्च नात्मनः ॥ १५ ॥
देहाभिमानाचें पोटीं । अनेक दुःखांचिया कोटी ।
त्यांची संकळितें गुणगोठी । कृष्ण जगजेठी सांगत ॥ १७७ ॥
देहाभिमानाचें कार्य एथ । अद्वैतीं वाढवी द्वैत ।
इष्टानिष्टीं समस्त । जग व्याप्त तेणें कीजे ॥ १७८ ॥
नश्वरा इष्टाचा नाश देख । तेणें देहअहंता मानी दुःख ।
या नांव गा ‘शोक’ । सकळही लोक मानिती ॥ १७९ ॥
नश्वर विषयांची प्राप्ती । तेथें आल्हाद उपजे चित्तीं ।
त्या नांव ‘हर्ष’ म्हणती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १८० ॥
बळी मिळोनि समर्थ । आप्त विषयो विभांडूं पाहात ।
तेणे कासावीस होय चित्त । ‘भय’ निश्चित या नांव ॥ १८१ ॥
आप्तकामाचें अवरोधन । ज्याचेनि अणुमात्र होय जाण ।
त्याचें करूं धांवे हनन । ‘क्रोध’ संपूर्ण त्या नांव ॥ १८२ ॥
गांठी झाल्याही धनकोडी । कवडी वेंचितां प्राण सोडी ।
या नांव ‘लोभाची’ बेडी । कृपण-परवडी पुरुषाची ॥ १८३ ॥
कर्माकर्म हिताहित । इष्टानिष्ट नाठवी चित्त ।
विवेकशून्य स्तब्धता प्राप्त । ‘मोह’ निश्चित या नांव ॥ १८४ ॥
नित्य करितां विषयसेवन । मनीं विषयइच्छा गहन ।
अखंड विषयांचें ध्यान । ‘स्पृहा’ जाण ती नांव ॥ १८५ ॥
इत्यादि हे नाना गुण । अथवा कां जन्ममरण ।
आत्म्यासी संबंध नाहीं जाण । हें देहाभिमान स्वयें भोगी ॥ १८६ ॥
जागृति आणि देखिजे स्वप्न । तेथ वसे देहाभिमान ।
ते ठायीं हे दिसती गुण । सुषुप्तीस जाण गुण नाहीं ॥ १८७ ॥
जेथ वृत्ति निरभिमान । तेथ जन्ममरणादि हे गुण ।
सर्वथा नुठती जाण । गुणासी कारण अभिमान ॥ १८८ ॥
जळीं स्थळीं वायु झगटी । जळीं तरंग स्थळीं नुठी ।
तैं तरंगता जळाचे पोटीं । तेंवी शोकादि गुणकोटी अहंतेमाजीं ॥ १८९ ॥
बद्धता झाली अहंकारासी । म्हणसी मुक्ति व्हावी त्यासी ।
ते अहंता लागली जीवासी । तेंचि हृषीकेशी सांगत ॥ १९० ॥
अंत्यजाचा विटाळ ज्यासी । गंगास्न्नानें शुद्धत्व त्यासी ।
तें गंगास्न्नान अंत्यजासी । शुद्धत्वासी अनुपयोगी ॥ १९१ ॥
तेवीं अहंता जडली जीवासी । ते त्यागितां मुक्तत्व त्यासी ।
परी मुक्तत्व अहंकारासी । कल्पांतेंसी घडेना ॥ १९२ ॥
देहेन्द्रियप्राणमनोऽभिमानो
जीवोऽन्तरात्मा गुणकर्ममूर्तिः ।
सूत्रं महानित्युरुधेव गीतः
संसार आधावति कालतन्त्र ॥ १६ ॥
अनंत अपार ज्ञानघन । मायातीत आत्मा पूर्ण ।
तोचि झाला मायेचें अधिष्ठान । ‘अंतरात्मा’ जाण यालागीं म्हणिपे ॥ १९३ ॥
माया व्यापूनि अपार । यालागीं बोलिजे ‘परमेश्वर’ ।
मायानियंता साचार । यालागी ‘ईश्वर’ म्हणिपे तो ॥ १९४ ॥
तोचि अविद्येमाजीं प्रतिबिंबला । यालागीं ‘जीव’ हें नाम पावला ।
तोचि देहाध्यासें प्रबळला । ‘अहंकार’ झाला या हेतू ॥ १९५ ॥
तो संकल्पविकल्पउपाधीनें । स्वयें होऊनि ठेला ‘मन’ ।
त्यासी मनासी करावया गमन । ‘दशेंद्रियें’ जाण तोचि झाला ॥ १९६ ॥
त्या इंद्रियाचा आधार । सुखदुःखभोगांचा निकर ।
पापपुण्याचा चमत्कार । ‘देहाचा आकार’ तोचि झाला ॥ १९७ ॥
त्या देहाचें जें कारण । ‘सत्व-रजोतमगुण’ ।
ते तीन्ही गुण जाण । तोचि आपण स्वयें झाला ॥ १९८ ॥
गुणक्षोभाचें निजवर्म । झाला ‘पंचविषय’ परम ।
विषयभोगादि क्रिया कर्म । स्वयें ‘स्वधर्म’ होऊनि ठेला ॥ १९९ ॥
तिनी गुणांचें जन्मकारण । झाला ‘महत्तत्व-सूत्रप्रधान’ ।
एवं संसार अवघा जाण । ईश्वर आपण स्वयें झाला ॥ २०० ॥