मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ ओव्या १ ते १००
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो सद्गुरु श्रीमूर्ती । चराचर तुझी विभूती ।
विश्वात्मा विश्वस्फूर्ती । अमूर्तमूर्ती श्रीगुरुराया ॥ १ ॥
ॐ नमो सद्गुरु श्रीमूर्ती । चराचर तुझी विभूती ।
विश्वात्मा विश्वस्फूर्ती । अमूर्तमूर्ती श्रीगुरुराया ॥ १ ॥
ॐकारस्वरूप सद्गुरु श्रीमूर्तीला नमस्कार असो. हे श्रीगुरुराया ! हें सर्व चराचर तुझेच रूप आहे. विश्वाचा आत्मा तूंच, विश्वाचें स्फुरणही तूंच, आणि निराकार व साकार मूर्ति तूंच. १.
तुझे मूर्तीचे महिमान । सकळ शास्त्रां अतर्क्य जाण ।
श्रुतीने घेतलें मौन । शब्दें आण वाहिली ॥ २ ॥
श्रुतीने घेतलें मौन । शब्दें आण वाहिली ॥ २ ॥
तुझ्या स्वरूपाचा महिमा सर्व शास्त्रांना अतर्क्य आहे. तो वर्णन करितां करितां श्रुतीने मौन धारण केले; आणि तो वर्णन करणे शक्य नाही अशी शब्दांनी तर शपथच घेतली २.
आण वाहिली दृष्टांती । तुजसमान नाही दुजी स्थिती ।
जे जे योजावी उपपत्ती । ते ते विभूती पैं तुझी । ३ ॥
जे जे योजावी उपपत्ती । ते ते विभूती पैं तुझी । ३ ॥
तुझ्यासारखे दुसरे कोणतेच स्वरूप नाही अशी दृष्टांतांनीही शपथ वाहिली. जें जें सादृश्य म्हणून युक्तीने योजावयास जावें, ते ते तुझेंच स्वरूप असते ३.
तुझिया प्रभावाची ऐशी खोडी । जे दुजेपणाचें मूळ तोडी ।
मग एकपणाचे परवडी । दृष्टांत काढी कोण कोठें ॥ ४ ॥
मग एकपणाचे परवडी । दृष्टांत काढी कोण कोठें ॥ ४ ॥
तुझ्या प्रभावाची अशी एक खुबी आहे की, दुसरेपणाचें मूळच तुटते. मग सर्वत्र एकपणाच भरून राहिल्यावर त्याच्याच प्रकारचा दुसरा दृष्टांत कोण कोठे काढणार ? ४.
कोठें तुझे स्थानमान । हेंच सर्वथा न कळे जाण ।
अगाध तुझें महिमान । कैसेनि ध्यान करावें ॥ ५ ॥
अगाध तुझें महिमान । कैसेनि ध्यान करावें ॥ ५ ॥
तुझे ठावठिकाण तरी कोठे आहे हेच मुळी कळत नाही. तुझा महिमा अगाध आहे, तेव्हां ध्यान तरी धरावें कसे? ५.
हेतु मातु दृष्टांतू । न रिघे ज्यांचे शिंवे आंतू ।
तो भागवतींचा भागवतार्थू । ओंवियांआंतू बोलविशी ॥ ६ ॥
तो भागवतींचा भागवतार्थू । ओंवियांआंतू बोलविशी ॥ ६ ॥
हेतु, शब्द आणि दृष्टांत ही ज्याच्या वर्णनक्षेत्रांत शिरूच शकत नाहीत, तो श्रीमद्भागवतांतील अर्थ तूं ओव्यांच्या रूपाने बोलवितोस ६.
ते माझे मर्हाटे आरुष बोल । सद्गुरूंनी केले सखोल ।
तेथींच्या प्रेमाचे जे बोल । जाणती केवळ गुरुभक्त ॥ ७ ॥
तेथींच्या प्रेमाचे जे बोल । जाणती केवळ गुरुभक्त ॥ ७ ॥
ते माझे मराठी भाषेतील शब्द खरे म्हटले म्हणजे आर्षपणाचेच आहेत, पण सद्गुरूंनी तेच गहन करून सोडले. त्यांतील प्रेमाचा ओलावा केवळ गुरुभक्त असतील तेच जाणतात ७.
ज्यासी नाहीं गुरुचरणीं भक्ती । त्यासी कैसेनि होईल विरक्ती ।
जरी पढले श्रुतिस्मृती । शास्त्रव्युत्पत्ती केल्याही ॥ ८ ॥
जरी पढले श्रुतिस्मृती । शास्त्रव्युत्पत्ती केल्याही ॥ ८ ॥
ज्यांची गुरुचरणांवर भक्ति नाही, ते जरी वेदशास्त्र पढले असले, व शास्त्रव्युत्पत्ति शिकले असले, तरी त्यांना विरक्ति कशी होणार ? ८.
करितां साधनांच्या कोटी । साधनीं समाधान नुठी ।
झालिया सद्गुरुकृपादृष्टी । ब्रह्मत्वें पुष्टी गुरुभक्तां ॥ ९ ॥
झालिया सद्गुरुकृपादृष्टी । ब्रह्मत्वें पुष्टी गुरुभक्तां ॥ ९ ॥
कोटिशः जरी साधनें केली, तरी त्या साधनांपासून समाधान व्हावयाचे नाही. परंतु सद्गुरूची कृपादृष्टि झाली असतां गुरुभक्तांना ब्रह्मपणानेच पुष्टि प्राप्त होते ९.
तो तूं सद्गुरु श्रीजनार्दन । सकळ जगाचें अधिष्टान ।
भूतीं भूतात्मा तूं आपण । सहजें जाण समसाम्यें ॥ १० ॥
भूतीं भूतात्मा तूं आपण । सहजें जाण समसाम्यें ॥ १० ॥
तो तूं सदुरु श्रीजनार्दन, सर्व जगाचे अधिष्ठान आहेस. स्वाभाविक ऐक्यरूपाने तू स्वतःच सर्व प्राणिमात्रांमधील आत्मा आहेस १०.
समसाम्य सर्व भूतीं । ज्यांसी घडे सद्गुरुभक्ती ।
तेचि ये श्रीमहाभागवतीं । अर्थप्राप्ती प्रविष्ट ॥ ११ ॥
तेचि ये श्रीमहाभागवतीं । अर्थप्राप्ती प्रविष्ट ॥ ११ ॥
ज्यांचे सर्व प्राणिमात्रांशी ऐक्य होते, ज्यांना सद्गुरूची भक्ति घडते, तेच ह्या श्रीमहाभागवताच्या अर्थामध्ये प्रवेश करूं शकतात ११.
झालिया सद्गुरुकृपा वरिष्ठ । न करितां व्युत्पत्तीचे कष्ट ।
भागवतार्थीं होय प्रविष्ट । भक्त सुभट भावार्थीं ॥ १२ ॥
भागवतार्थीं होय प्रविष्ट । भक्त सुभट भावार्थीं ॥ १२ ॥
सद्गुरूची पूर्ण कृपा झाली असतां व्युत्पत्ति शिकण्याचे कष्ट न करताही उत्तम भावार्थी भक्त हा भागवताच्या अर्थामध्ये सहज प्रवेश करितो १२.
हृदयीं झालिया सद्भावो । भावें प्रकटे देवाधिदेवो ।
तेथें भागवताचा अभिप्रावो । सहजेंचि पहा वो ठसावे ॥ १३ ॥
तेथें भागवताचा अभिप्रावो । सहजेंचि पहा वो ठसावे ॥ १३ ॥
अंत:करणांत एकनिष्ठ भक्ति उत्पन्न झाली की, त्या भक्तीच्या योगानंच देवाधिदेव प्रगट होतो. तेव्हां भागवतांतील खरे रहस्य सहजच मनांत ठसते १३.
यालागीं करितां गुरुभक्ती । प्राप्त होईजे भागवतार्थीं ।
तेथ काव्यादि व्युत्पत्ती । नाना युक्ती किमर्थ ॥ १४ ॥
तेथ काव्यादि व्युत्पत्ती । नाना युक्ती किमर्थ ॥ १४ ॥
ह्याकरितां गुरुभक्ति केली असतां भागवताचा अर्थ नीट कळतो. तेथे काव्य इत्यादि, किंवा व्युत्पत्ति, किंवा अनेक प्रकारच्या युक्ति यांची गरज काय ? १४.
किमर्थ करावें शास्त्र ज्ञान । किमर्थ धरावें वृथा ध्यान ।
चालतें बोलतें ब्रह्म पूर्ण । सद्गुरुचरण साधकां ॥ १५ ॥
चालतें बोलतें ब्रह्म पूर्ण । सद्गुरुचरण साधकां ॥ १५ ॥
शास्त्रज्ञान तरी कशाला शिकावें ! आणि व्यर्थ ध्यान तरी कशाला धरावे ? कारण साधकांना सद्गुरूचे चरण हेंच चालतेंबोलतें पूर्ण ब्रह्म आहे १५.
वांचूनिया गुरुभजन । शिष्यासी नोहे समाधान ।
याहूनियां श्रेष्ठ साधन । नाहीं जाण सर्वथा ॥ १६ ॥
याहूनियां श्रेष्ठ साधन । नाहीं जाण सर्वथा ॥ १६ ॥
गुरुभजनावांचून शिष्याला समाधान नाही. कारण त्याच्याहून श्रेष्ठ साधन मुळीच नाहीं १६.
त्या सद्गुरुकृपापरिपाटी । एकादशीं पूर्वार्ध कोटी ।
वाखाणिली की मर्हाटी । यथार्थदृष्टीं निजबोधें ॥ १७ ॥
वाखाणिली की मर्हाटी । यथार्थदृष्टीं निजबोधें ॥ १७ ॥
त्याच सद्गुरुकृपेच्या अभ्यासाने अकराव्या स्कंधामधील पूर्वार्धांचे ज्ञान मराठी भाषेमध्ये यथामति आत्मबोधाने वर्णन केले १७.
ऊंस गाळितां रस होये । तो ठेविलिया बहुकाळ न राहे ।
त्याचा आळूनियां पाहे । गूळ होये सपिंड ॥ १८ ॥
त्याचा आळूनियां पाहे । गूळ होये सपिंड ॥ १८ ॥
ऊस गाळला की त्याचा रस होतो. तो तसाच ठेवला तर फार वेळ टिकत नाही. तो आटवून गूळ तयार करून ढेपाच बांधून ठेवाव्या लागतात १८.
तोहि ठेवितां लिगाड धरी । मग साखर कीजे रायपुरी ।
तेही घोटूनियां चतुरीं । नाबद करिजे कोरडी ॥ १९ ॥
तेही घोटूनियां चतुरीं । नाबद करिजे कोरडी ॥ १९ ॥
तो गूळ फार दिवस ठेवला तरीसुद्धा पाझरूं लागतो. ह्याकरितां त्याची रायपुरी साखर करावी लागते. मग ती साखरही घोंटून चतुर लोक स्वच्छ व कोरडी अशी खडीसाखर करतात १९.
तैसें हे श्रीभागवत जाण । मुळीं बोलिला नारायण ।
तेंचि श्रीव्यासें आपण । दशलक्षण वर्णिले ॥ २० ॥
तेंचि श्रीव्यासें आपण । दशलक्षण वर्णिले ॥ २० ॥
त्याचप्रमाणे या भागवताची गोष्ट आहे हे लक्षात ठेवा. तें भागवत प्रथमतः श्रीनारायणांनींच सांगितले, आणि त्याचीच श्रीव्यासांनी दहा प्रकारांनी फोड केली २०.
ते दशलक्षण परवडी । श्रीशुकमुखें चढली गोडी ।
तेथील कठिण पदबंधमोडी । टीका चोखडी श्रीधरी ॥ २१ ॥
तेथील कठिण पदबंधमोडी । टीका चोखडी श्रीधरी ॥ २१ ॥
श्रीशुकाच्या मुखाने ती दशलक्षणयुक्त कथा विशद झाल्यामुळे फारच गोडी चढली. त्यांतील कठीण शब्द स्पष्ट करून श्रीधरांनी त्यावर फारच उत्तम टीका केली २१.
ते श्रीधरीचें व्याख्यान । भावार्थदीपिका जाण ।
त्या भावार्थाची सद्भाव खूण । केलें निरूपण देशभाषा ॥ २२ ॥
त्या भावार्थाची सद्भाव खूण । केलें निरूपण देशभाषा ॥ २२ ॥
ती जी श्रीधरी टीका, तिलाच 'भावार्थदीपिका' असे म्हणतात. त्याच भावार्थातील रहस्य मीही भक्तिभावाने देशभाषेत म्हणजे मराठीत निरूपण केले २२.
मुळीं वक्ता एक नारायण । व्यास शुक श्रीधरव्याख्यान ।
त्यांत मुळींचे लक्षूनि गोडपण । एका जनार्दन कविकर्ता ॥ २३ ॥
त्यांत मुळींचे लक्षूनि गोडपण । एका जनार्दन कविकर्ता ॥ २३ ॥
मूळचा नारायण हा एकच वक्ता आहे. आणि त्यावर व्यास, शुक आणि श्रीधर यांनी व्याख्यान केले आहे. त्यांतील मूळच्या गोडीवर लक्ष ठेवून एकाजनार्दन ह्या काव्याचा कर्ता झाला आहे २३.
मुळीं बीज श्रीनारायण । ब्रह्मयाचे ठायीं प्रेरिलें जाण ।
तें नारदक्षेत्रीं संपूर्ण । पीक परिपूर्ण निडारलें ॥ २४ ॥
तें नारदक्षेत्रीं संपूर्ण । पीक परिपूर्ण निडारलें ॥ २४ ॥
मूळ बीज श्रीनारायणांनी ब्रह्मदेवाच्या ठिकाणी पेरले. आणि तेच नारदरूप भूमीमध्ये अत्यंत जोमदारपणे पूर्ण तयार झाले २४.
त्याचें व्यासें दशलक्षण । संपूर्ण केलें संवगण ।
शुकें परीक्षितीच्या खळां जाण । मळूनि निजकण काढिले ॥ २५ ॥
शुकें परीक्षितीच्या खळां जाण । मळूनि निजकण काढिले ॥ २५ ॥
त्याचीच दशलक्षण-भागवतरूपी कणसें व्यासाने संकलित केली. आणि शुकाचार्यांनी परीक्षितीच्या खळ्यामध्ये मळणी करून त्यांतील दाण्यांची रास केली २५.
तेंचि शास्त्रार्थें जाण । श्रीधरें निजबुद्धीं पाखडून ।
काढिले निडाराचे कण । अतिसघन सुटंक ॥ २६ ॥
काढिले निडाराचे कण । अतिसघन सुटंक ॥ २६ ॥
तेच दाणे शास्त्ररीतीने आत्मबुद्धीच्या सुपांतून श्रीधरांनी पाखडून काढून त्यांतील भरीव टवटवीत व अस्सल दाणे वेगळे निवडले २६.
त्याची पक्वान्नें चोखडी । मर्हाटिया पदमोडी ।
एका जनार्दनें केली परवडी । ते जाणती गोडी निजात्मभक्त ॥ २७ ॥
एका जनार्दनें केली परवडी । ते जाणती गोडी निजात्मभक्त ॥ २७ ॥
त्यांची मराठी शब्दरूपाने उत्तमोत्तम पक्वान्ने करून एका जनार्दनाने त्यांची रेलचेल करून सोडली आहे. आत्मभक्त असतील तेच त्यांतील गोडी जाणतील २७.
त्या श्रोत्यांचेनि अवधानें । जनार्दनकृपा सावधानें ।
पूर्वार्ध एका जनार्दनें । संपूर्ण करणें देशभाषा ॥ २८ ॥
पूर्वार्ध एका जनार्दनें । संपूर्ण करणें देशभाषा ॥ २८ ॥
त्या श्रोत्यांनी लक्ष दिल्यामुळे, आणि जनार्दनाची कृपा दक्ष असल्यामुळे एका जनार्दनाने देशी भाषेमध्ये हे पूर्वार्धं संपूर्ण केले. २८
ते प्रथमाध्यायीं अनुक्रम । वैराग्य उत्पत्तीचा संभ्रम ।
कुलक्षयासी पुरुषोत्तम । करी उपक्रम ब्रह्मशापें ॥ २९ ॥
कुलक्षयासी पुरुषोत्तम । करी उपक्रम ब्रह्मशापें ॥ २९ ॥
त्याचा अनुक्रम असा-पहिल्या अध्यायांत बैराग्याच्या उत्पत्तीचा उपक्रम असा केला आहे की, श्रीकृष्णांनी आपल्या कुलाचा क्षय करण्याकरितां ब्राह्मणांच्या शापरूपाने आरंभ केला २९.
दुसर्यापासूनि चतुर्थवरी । नारदें वासुदेवाच्या घरीं ।
निमिजायंत प्रश्नोत्तरीं । पंचाध्यायी खरी संपविली ॥ ३० ॥
निमिजायंत प्रश्नोत्तरीं । पंचाध्यायी खरी संपविली ॥ ३० ॥
दुसऱ्यापासून चौथ्या अध्यायापर्यंत नारदांनीं वसुदेवाच्या घरी जाऊन निमिजायंतीच्या प्रश्नोत्तराच्या रूपानें पंचाध्यायी संपविली ३०.
षष्ठाध्यायी श्री कृष्णमूर्ती । पाहो आलिया सुरवरपंक्ती ।
तिहीं प्रर्थिला श्रीपती । निजधामाप्रती यावया ॥ ३१ ॥
तिहीं प्रर्थिला श्रीपती । निजधामाप्रती यावया ॥ ३१ ॥
सहाव्या अध्यायांत श्रीकृष्णमूर्तीचे दर्शन घेण्याकरितां देवांच्या पंक्तीच्या पंक्ति लोटल्या. आणि त्यांनी श्रीकृष्णाला निजधामास येण्याविषयी प्रार्थना केली ३१.
ऐकोनि सुरवरांची विनंती । देखोनि अरिष्टभूत द्वारावतीं ।
उद्धवें प्रार्थिला श्रीपती । निजधामाप्रती मज नेईं ॥ ३२ ॥
उद्धवें प्रार्थिला श्रीपती । निजधामाप्रती मज नेईं ॥ ३२ ॥
ती सुरश्रेष्ठांची विनंति ऐकून आणि द्वारकेवर अरिष्ट कोसळलेले पाहून उद्धवानें, 'मलाही निजधामास न्यावे' अशी श्रीकृष्णाची विनंति केली ३२.
त्याचे प्रश्नांचे प्रश्नोत्तर । त्यागयुक्त ज्ञानगंभीर ।
सप्तमाध्यायीं शारङ्गधर । थोडेनि फार बोलिला ॥ ३३ ॥
सप्तमाध्यायीं शारङ्गधर । थोडेनि फार बोलिला ॥ ३३ ॥
त्याच्या प्रश्नांच्या उत्तरांत ज्ञानमय त्यागयुक्त असें श्रीकृष्णांनी सातव्या अध्यायांत थोडेबहुत भाषण केलें ३३.
तेथ त्यागसंग्रह लक्षण । यदुअवधूत संवादें जाण ।
चोविसां गुरूंचे प्रकरण । केलें संपूर्ण अष्टमीं नवमीं ॥ ३४ ॥
चोविसां गुरूंचे प्रकरण । केलें संपूर्ण अष्टमीं नवमीं ॥ ३४ ॥
त्या वेळी त्यागसंग्रहाच्या लक्षणाच्या निमित्ताने यदूच्या आणि अवधूताच्या संवादरूपाने चोवीस गुरूंचे प्रकरण आठव्या अध्यायांत आणि नवव्या अध्यायांत संपूर्ण केले ३४.
श्राद्धासंग्रह ज्ञानविश्वास । तेथ नाना मतांचा मतनिरास ।
दशमाध्यायी हृषीकेश । ज्ञानविलास बोलिला ॥ ३५ ॥
दशमाध्यायी हृषीकेश । ज्ञानविलास बोलिला ॥ ३५ ॥
श्रद्धा कशी धरावी, आणि ज्ञानावर कसा विश्वास ठेवावा, हे सांगून त्यांत अनेक मतांचे निरसन करण्यासाठी श्रीकृष्णांनी दहाव्या अध्यायांत ज्ञानाचा चमत्कार सांगितला ३५.
अकरावें अध्यायीं जाण । बद्धमुक्तांचे वैलक्षण्य ।
सांगूनि साधूचे लक्षण । भक्तीचे संपूर्ण दाविलें रूप ॥ ३६ ॥
सांगूनि साधूचे लक्षण । भक्तीचे संपूर्ण दाविलें रूप ॥ ३६ ॥
अकराव्या अध्यायांत बद्ध-मुक्तांचे भेद सांगून साधूचे लक्षण आणि भक्तीचे पूर्ण स्वरूप दाखवून दिले ३६.
भागवतीं बारावा अध्यावो । अतिगुह्य बोलिला देवो ।
तेथील लावितां अभिप्रावो । पडे संदेहो सज्ञाना ॥ ३७ ॥
तेथील लावितां अभिप्रावो । पडे संदेहो सज्ञाना ॥ ३७ ॥
भागवतांतील बाराव्या अध्यायांत देवांनी अत्यंत गूढ ज्ञान प्रगट केले आहे. त्यांतील रहस्य उकलतांना मोठमोठ्या ज्ञात्यांनासुद्धा संशय पडतो ३७.
बारावे अध्यायाची किल्ली । युक्तिप्रयुक्ती नातुडें बोली ।
जनार्दन कृपा माऊली । तेणें मागी दाविली ग्रंथाची ॥ ३८ ॥
जनार्दन कृपा माऊली । तेणें मागी दाविली ग्रंथाची ॥ ३८ ॥
बाराव्या अध्यायांतील गुरुकिल्ली आहे ती केवळ युक्तिप्रयुक्तीने सांगू म्हटले तर सांगतां यावयाची नाही, परंतु जनार्दनाची कृपारूप मातु:श्री जवळ होती, म्हणून तिने ग्रंथाचा मार्ग दाखविला ३८.
तें द्वादशाध्यायी निरूपण । सत्संगाचा महिमा गहन ।
कर्माचा कर्ता कोण । त्यागितें लक्षण कर्माचें ॥ ३९ ॥
कर्माचा कर्ता कोण । त्यागितें लक्षण कर्माचें ॥ ३९ ॥
त्या बाराव्या अध्यायांत संत्संगाचा अगाध महिमा, कर्माचा कर्ता कोण, त्यागबुद्धि हेच कर्माचें लक्षण होय, हा विषय आहे ३९.
तो द्वादशाध्यावो ऐकतां । ज्ञानसंलग्नता होय चित्ता ।
आडवी ठाके विषयावस्था । तेणें बाधकता साधकां ॥ ४० ॥
आडवी ठाके विषयावस्था । तेणें बाधकता साधकां ॥ ४० ॥
तो बारावा अध्याय ऐकला असतां, चित्ताला ज्ञानाचा संस्कार घडतो. पण त्यांत विषयवासना आडवी येते आणि त्यामुळे साधकांना पीडा होते ४०.
गुणवैषम्याचें लक्षण । तेणें विषयावस्था गहन ।
तेथ सत्त्वशुद्धीचें कारण । केले निरूपण त्रयोदशीं ॥ ४१ ॥
तेथ सत्त्वशुद्धीचें कारण । केले निरूपण त्रयोदशीं ॥ ४१ ॥
गुणभेदाचे लक्षण आणि त्यामुळे उत्पन्न होणारी विषयाची आवड, तसेंच सत्वशुद्धि कशी करावी त्याचा प्रकार, ह्यांचे निरूपण तेराव्या अध्यायांत केले ४१.
तेचि प्रसंगे यथोचित । चित्तविषयांचे जें प्रथित ।
उगवावया हंसगीत । सुनिश्चित सांगितलें ॥ ४२ ॥
उगवावया हंसगीत । सुनिश्चित सांगितलें ॥ ४२ ॥
नंतर त्याच उचित प्रसंगी विषयांची आणि चित्ताची सांगड कशी असते, आणि ती उकलावी कशी हे समजण्याकरितां उत्तम निर्णयात्मक हंसगीताचे कथन केले ४२.
हंसगीतीं जे निरूपिले ज्ञान । समाधिपर्यंत समाधान ।
तेंचि साधावया साधन । चवदावा आपण बोलिला देवो ॥ ४३ ॥
तेंचि साधावया साधन । चवदावा आपण बोलिला देवो ॥ ४३ ॥
हंसगीतांत जें ज्ञान सांगितले आहे व समाधीपर्यंत जे समाधान केले आहे, तेच साधन साधण्याचा मार्ग देवांनी आपण होऊन चौदाव्या अध्यायांत सांगितला ४३.
साधनांमाजी मुख्य भक्ती । सगुण तेचि माझी निर्गुण मूर्ती ।
योगयुक्त ध्यानस्थिती । बोलिला श्रीपती चतुर्दशीं ॥ ४४ ॥
योगयुक्त ध्यानस्थिती । बोलिला श्रीपती चतुर्दशीं ॥ ४४ ॥
साधनांमध्ये भक्ति हीच मुख्य आहे, सगुण स्वरूप हीच माझी निर्गुण मूर्ति होय, आणि योगयुक्त ध्यानस्थिति कशी असते तेही श्रीकृष्णांनी चौदाव्या अध्यायांत सांगितले ४४.
विविधा सिद्धींची धारणास्थिती । देवें सांगितली उद्धवाप्रती ।
सिद्धी बाधिका माझे प्राप्ती । हें पंधराव्याअंती निरूपिलें ॥ ४५ ॥
सिद्धी बाधिका माझे प्राप्ती । हें पंधराव्याअंती निरूपिलें ॥ ४५ ॥
सिद्धीसाठी ध्यानधारणा करण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. तेही श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगून आपल्या प्राप्तीला सिद्धि ह्या विघातक आहेत हे पंधराव्या अध्यायांत सांगितले ४५.
एवं पंधराध्यायी पूर्वार्ध । निरूपण झाले अतिशुद्ध ।
आतां उरलें उत्तरार्ध । तो कथासंबंध अवधारा ॥ ४६ ॥
आतां उरलें उत्तरार्ध । तो कथासंबंध अवधारा ॥ ४६ ॥
ह्याप्रमाणे पंधरा अध्यायांत पूर्वार्धाचे अत्यंत निर्मळ असें निरूपण झाले. आतां उत्तरार्ध शिल्लक राहिले आहे, त्यांतील कथेचाही संबंध ऐका ४६.
षोडशीं भगवद्विभूती । सतरा अठरा अध्यायांप्रती ।
वर्णाश्रम कर्मगती । विधानस्थिती निरूपण ॥ ४७ ॥
वर्णाश्रम कर्मगती । विधानस्थिती निरूपण ॥ ४७ ॥
सोळाच्या अध्यायांत भगवंताच्या विभूतीचे निरूपण असून सतराव्या व अठराव्या अध्यायांत वर्णाश्रमकांची माहिती व त्यांचे विधानाचे प्रकार, ह्यांचे निरूपण आहे ४७.
एकुणिसावा अध्याय गहन । ज्ञाननिर्णयाचें महिमान ।
उद्धवाचें यमनियमादि प्रश्न । सांगितलें ज्ञानपरिपाकें ॥ ४८ ॥
उद्धवाचें यमनियमादि प्रश्न । सांगितलें ज्ञानपरिपाकें ॥ ४८ ॥
एकोणिसावा अध्याय गहन आहे. त्यांत ज्ञाननिर्णयाचे माहात्म्य असून उद्धवाचे यमनियमादि प्रश्न ज्ञानात्मक उत्तरांसह सांगितले आहेत ४८.
त्या ज्ञानाधिकाराचा योग । अज्ञान ज्ञान मध्यस्थ भाग ।
विसावें अध्यायी श्रीरंग । त्रिविध विभाग बोलिला ॥ ४९ ॥
विसावें अध्यायी श्रीरंग । त्रिविध विभाग बोलिला ॥ ४९ ॥
त्या ज्ञानाच्या अधिकाराचा योग अज्ञान, ज्ञान आणि मध्यावस्था अशा तीन प्रकारांनी श्रीकृष्णांनी विसाव्या अध्यायांत सांगितला आहे ४९.
तेथ गुणदोषांची अवस्था । उद्धवें ठेविली वेदांचे माथां ।
ते वेदवादसंस्था । केली तत्त्वतां एकविसांत । ॥ ५० ॥
ते वेदवादसंस्था । केली तत्त्वतां एकविसांत । ॥ ५० ॥
पुढे उद्घवाने गुणदोषांची अवस्था वेदांच्या माथ्यावर ठेविली, तेव्हा त्या वेदवादांतील खरे खरे सात्त्विक निरूपण एकविसाव्यांत सांगितले ५०.
तेचि वेदवाद व्युत्पत्ती । तत्त्वांची संख्या किती ।
ते तत्त्वसंख्या उपपत्ती । केली श्रीपती यथान्वयें ॥ ५१ ॥
ते तत्त्वसंख्या उपपत्ती । केली श्रीपती यथान्वयें ॥ ५१ ॥
त्याच वेदवादनिरूपणाच्या प्रसंगी तत्त्वांची एकंदर संख्या किती हा प्रश्न उद्भवला. तेव्हां श्रीकृष्णांनी त्या तत्त्वसंख्येचे यथार्थ निरूपण केलें ५१.
सकळ तत्त्वांचे विवेचन । प्रकृतिपुरुषांचे लक्षण ।
जन्ममरणांचें प्रकरण । केलें निरूपण बाविसावां ॥ ५२ ॥
जन्ममरणांचें प्रकरण । केलें निरूपण बाविसावां ॥ ५२ ॥
सर्व तत्त्वांचे विवेचन, प्रकृति आणि पुरुष ह्यांचे लक्षण, आणि जन्ममरणांचे प्रकरण इतक्यांचे निरूपण बाविसाव्यांत केलें ५२.
साहोनियां परापराध । स्वयें राहावें निर्द्वंद्व ।
हा भिक्षुगीतसंवाद । केला विशद तेविसांवा ॥ ५३ ॥
हा भिक्षुगीतसंवाद । केला विशद तेविसांवा ॥ ५३ ॥
दुसऱ्याचे अपराध सहन करून स्वत: निर्द्वव राहावे अशा प्रकारचा भिक्षुगीतसंवाद तेविसाव्यामध्ये स्पष्ट केला आहे ५३.
अद्वैती राहावया स्थिती । चोविसावां सांख्यव्युत्पत्ती ।
निर्गुणापासोनि गुणोत्पत्ती । गुणक्षया अंती निर्गुण उरे ॥ ५४ ॥
निर्गुणापासोनि गुणोत्पत्ती । गुणक्षया अंती निर्गुण उरे ॥ ५४ ॥
अद्वैतामध्ये स्थिर होण्यासाठी चोविसाव्या अध्यायांत सांख्यशास्त्र सांगितले. निर्गुणापासूनच गुणांची उत्पत्ति होते; आणि गुणांचा क्षय झाला म्हणजे अखेर निर्गुणच शिल्लक राहतें ५४.
आदीं निर्गुण अंतीं निर्गुण । मध्यें भासले मिथ्या गुण ।
ये अद्वैतप्राप्तीलागीं जाण । केलें निरूपण सांख्याचें ॥ ५५ ॥
ये अद्वैतप्राप्तीलागीं जाण । केलें निरूपण सांख्याचें ॥ ५५ ॥
आधी निर्गुण असते व अंतीही निर्गुणच असते. मध्ये मिथ्याच गुणांचा भास होतो. अशा या अद्वैतप्राप्तीसाठी सांख्यशास्त्राचे निरूपण केलें ५५.
ते मिथ्यागुण प्रवृत्तियुक्त । त्रिगुणगुणांचा सन्निपात ।
बोलिला पंचविसाव्यांत । निर्गुणोक्त निजनिष्ठा ॥ ५६ ॥
बोलिला पंचविसाव्यांत । निर्गुणोक्त निजनिष्ठा ॥ ५६ ॥
ते मिथ्या गुण प्रवृत्तियुक्त असतात, त्या तीन गुणांचा परस्परांत संबंध असतो, आणि निर्गुणाच्या संबंधाने आत्मनिष्ठा कशी ठेवावी, हे पंचविसाव्यांत सांगितले आहे ५६.
सव्विसावे अध्यायाप्रती । अनिवार अनुतापाची शक्ती ।
भोगितां उर्वशी कामप्राप्तीं । पावला विरक्ती पुरूरवा ॥ ५७ ॥
भोगितां उर्वशी कामप्राप्तीं । पावला विरक्ती पुरूरवा ॥ ५७ ॥
सव्हीसाव्या अध्यायामध्ये अनुतापाची अनिवार शक्ति दाखविण्यासाठी पुरूरवा हा कामपाशांत सांपडून उर्वशीचा उपभोग घेत असताही विरक्ति पावला ही कथा सांगितली आहे ५७.
भजनक्रिया मूर्तिलक्षण । वैदिक तांत्रिक मिश्र भजन ।
या उद्धवप्रश्नांचे निरूपण । केलें संपूर्ण सत्ताविसावां ॥ ५८ ॥
या उद्धवप्रश्नांचे निरूपण । केलें संपूर्ण सत्ताविसावां ॥ ५८ ॥
भजनाचा विधि, मूर्तीचे लक्षण, वैदिक, तांत्रिक व मिश्र भजन म्हणजे काय, या उद्धवाच्या प्रश्नांचें संपूर्ण निरूपण सत्ताविसाव्यांत आहे ५८.
महायोग्यांचे योगभांडार । परम ज्ञानें ज्ञानगंभीर ।
निजसुखाचें सुखसार । केवळ चिन्मात्र अठ्ठाविसावा ॥ ५९ ॥
निजसुखाचें सुखसार । केवळ चिन्मात्र अठ्ठाविसावा ॥ ५९ ॥
मोठमोठ्या योग्यांचे योगभांडार, गहन ज्ञानाने पूर्ण भरलेला, आत्मसुखाचे केवळ सारच, असा अठ्ठाविसावा अध्याय केवळ ज्ञानविषयानेच भरलेला आहे ५९.
त्याचि अध्यायामाजीं जाण । संसार असंभवाचा प्रश्न ।
उद्धवें केला अतिगहन । त्याचेंही प्रतिवचन दिधले देवें ॥ ६० ॥
उद्धवें केला अतिगहन । त्याचेंही प्रतिवचन दिधले देवें ॥ ६० ॥
त्याच अध्यायामध्ये 'संसार हा असंभवनीय आहे' असा उद्धवाने अत्यंत गहन प्रश्न केला होता, त्याचेही प्रत्युत्तर देवाने दिले आहे ६०.
एकादशाचा निजकळसू । भक्तिप्रेमाचे अतिविलासू ।
एकुणतिसावां सुरसरसू । ज्ञानोपदेशू भक्तियुक्त ॥ ६१ ॥
एकुणतिसावां सुरसरसू । ज्ञानोपदेशू भक्तियुक्त ॥ ६१ ॥
अकराव्या स्कंधाचा केवळ कळस, आणि भक्तिप्रेमाचें अत्यंत मनोहर स्वरूप, अशा प्रकारचा अत्यंत रसाळ असा भक्तियुक्त ज्ञानोपदेश एकुणतिसाव्या अध्यायांत आहे ६१.
पुढिले दों अध्यायांआंत । स्त्रीपुत्रादि कुळाचा घात ।
होतां डंडळीना ज्ञानसमर्थ । तें प्रत्यक्षभूत हरि दावी ॥ ६२ ॥
होतां डंडळीना ज्ञानसमर्थ । तें प्रत्यक्षभूत हरि दावी ॥ ६२ ॥
त्याच्या पुढच्या दोन अध्यायांत स्त्रीपुत्रादि साऱ्या कुळाचा घात प्रत्यक्ष डोळ्यांसमोर झाला असतांही, जो ज्ञानानें समर्थ असतो, त्याचे चित्त यत्किंचितही डळमळत नाही हे श्रीकृष्णांनीच प्रत्यक्ष दाखवून दिले आहे ६२.
ब्राह्मणांचा शाप कठिण । शापें बाधिला श्रीकृष्ण ।
इतरांची कथा कोण । कुळनिर्दळण ब्रह्मशापे ॥ ६३ ॥
इतरांची कथा कोण । कुळनिर्दळण ब्रह्मशापे ॥ ६३ ॥
ब्राह्मणांचा शाप अत्यंत कठीण असतो. त्या शापानें श्रीकृष्णाला सुद्धा पीडा दिली. मग इतरांची कया काय ! ब्राह्मशापानें सर्व कुळाचे सुद्धा निर्दाळण होतें ! ६३.
ब्राह्मणांचा कोप समर्थ । सगळा समुद्र केला मूत ।
शिवाचा झाला लिंगपात । ब्रह्मक्षोभांत निमेषार्धे ॥ ६४ ॥
शिवाचा झाला लिंगपात । ब्रह्मक्षोभांत निमेषार्धे ॥ ६४ ॥
ब्राह्मणाचा कोप विलक्षण सामर्थ्यवान् असतो, सगळा समुद्रसुद्धा त्याने मूत्र करून सोडला ! ब्राह्मणांच्या क्षोभाने एका निमिषार्धात शिवाचा सुद्धा लिंगपात झाला ! ६४.
यालागीं सज्ञान अथवा मुग्ध । तिहीं न करावा ब्रह्मविरोध ।
हेंचि दावावया मुकुंद । कुलक्षयो प्रसिद्ध दाखवी ॥ ६५ ॥
हेंचि दावावया मुकुंद । कुलक्षयो प्रसिद्ध दाखवी ॥ ६५ ॥
याकरिता सज्ञान असो की अज्ञान असो; कोणीही ब्राह्मणांशी वैर करूं नये. हेच दाखविण्याकरितां श्रीकृष्णांनी प्रसिद्धपणे कुलक्षय करवून दाखविला ६५.
निजदेहासी जो करी घात । तो जराव्याध केला मुक्त ।
येथवरी ज्ञाता देहातीत । क्षमायुक्त तो सज्ञान ॥ ६६ ॥
येथवरी ज्ञाता देहातीत । क्षमायुक्त तो सज्ञान ॥ ६६ ॥
स्वतः (श्रीकृष्णा)च्याच देहाचा ज्याने घात केला, तो जराव्याधही कृष्णानें मुक्त केला. येथपर्यंत ज्ञाता असतो तो देहातीत व क्षमाशील कसा असतो हे दाखवून दिले ६६.
एकुणतीस अध्यायापर्यंत । कृष्णें उपदेशिला ज्ञानार्थ ।
पुढील दोन अध्यायांत । स्वयें दावीत विदेहत्व ॥ ६७ ॥
पुढील दोन अध्यायांत । स्वयें दावीत विदेहत्व ॥ ६७ ॥
एकुणतीस अध्यायापर्यत श्रीकृष्णांनी ज्ञानाचा उपदेश केला. त्यापुढील दोन अध्यायांत स्वतःच विदेह स्थिति दाखविली ६७.
राम अयोध्या घेऊन गेला । कृष्णें निजदेहही सांडिला ।
येणें देहाभिमान मिथ्या केला । तरावया पुढिलां मुमुक्षां ॥ ६८ ॥
येणें देहाभिमान मिथ्या केला । तरावया पुढिलां मुमुक्षां ॥ ६८ ॥
राम अयोध्येसह निजधामाला गेला, आणि कृष्णांनीही आपला देह ठेविला, ह्या कृतींनी त्यांनी पुढील मुमुक्षूंना तरावयासाठी देहाभिमान मिथ्या करून दाखविला ६८.
पंधरा अध्याय पूर्वार्ध । व्याख्यान झालें अतिशुद्ध ।
सूत्रप्राय उत्तरार्ध । दाविले विशद अध्यायार्थ ॥ ६९ ॥
सूत्रप्राय उत्तरार्ध । दाविले विशद अध्यायार्थ ॥ ६९ ॥
पंधराव्या अध्यायापर्यंत ह्या स्कंधाचे पूर्वार्ध झाले. त्यांत अत्यंत पवित्र कथन केले आहे. आणि सूत्ररूपाने उत्तरार्धातील प्रत्येक अध्यायाचे तात्पर्यही स्पष्ट दाखवून दिले ६९.
साह्य सद्गुरु जनार्दन । श्रोतीं द्यावें अवधान ।
पुढील उत्तरार्ध व्याख्यान । एका जनार्दन बोलवी ॥ ७० ॥
पुढील उत्तरार्ध व्याख्यान । एका जनार्दन बोलवी ॥ ७० ॥
सद्गुरु जनार्दन साहाय्याला आहे, ह्याकरितां श्रोत्यांनी लक्ष द्यावे. पुढच्या उत्तरार्धाचे व्याख्यानही जनार्दन एकनाथाकडून बोलवील ७०.
झालिया वसंताचे रिगवणें । वृक्ष सपुष्प सफळ तेणें ।
तेवीं जनार्दनकृपागुणें । सार्थक वचनें कवित्वाचीं ॥ ७१ ॥
तेवीं जनार्दनकृपागुणें । सार्थक वचनें कवित्वाचीं ॥ ७१ ॥
वसंताचा प्रवेश झाला की त्यायोगानें वृक्ष पुष्पं व फळे यांनी बहरून जातात. त्याप्रमाणे जनार्दनाच्या कृपाकटाक्षामुळे कवित्वांतील शब्दही फलद्रूप होतात ७१.
गगनीं उगवला अंशुमाळी । जेवीं विकासिजे नवकमळीं ।
तेवीं जनार्दनकृपामेळीं । कवित्वनमाळी विकासे ॥ ७२ ॥
तेवीं जनार्दनकृपामेळीं । कवित्वनमाळी विकासे ॥ ७२ ॥
आकाशात सूर्य उगवला म्हणजे ज्याप्रमाणे नूतन कमले प्रफुल्लित होतात, त्याप्रमाणे जनार्दनाच्या कृपेंकरून कवित्वांतील नावीन्याचे तेज विकास पावते ७२.
वेणु घेऊनियां हातें । विश्वा मोहिलें कृष्णनाथें ।
तेवीं कवीश्वर करोनि मातें । वक्ता येथें जनार्दन ॥ ७३ ॥
तेवीं कवीश्वर करोनि मातें । वक्ता येथें जनार्दन ॥ ७३ ॥
हातांत मुरली घेऊन श्रीकृष्णाने सर्व जगाला मोहून टाकिले. त्याप्रमाणे मला कवीश्वर करून हातीं धरिलें व जनार्दनच सर्व बोलत आहे ७३.
तो जनार्दनकृपाक्षीराब्धी । ज्याची कृपेसी नाहीं अवधी ।
तेणें उत्तरार्धीं प्रवेशे बुद्धी । अर्थसिद्धीसमवेत ॥ ७४ ॥
तेणें उत्तरार्धीं प्रवेशे बुद्धी । अर्थसिद्धीसमवेत ॥ ७४ ॥
त्या जनार्दनाची कृपा म्हणजे केवळ क्षीरसागर आहे. त्याच्या कृपेला मर्यादा म्हणून नाहींच, त्या जनार्दनाच्या कृपेमुळे पुढील उत्तरार्धातही अर्थसिद्धिसहवर्तमान बुद्धि प्रवेश करीत आहे ७४.
मागील कथासंगती । पंधरावे अध्यायाअंती ।
सिद्धी बाधिका माझे प्राप्ती । ऐसें श्रीपती बोलिला ॥ ७५ ॥
सिद्धी बाधिका माझे प्राप्ती । ऐसें श्रीपती बोलिला ॥ ७५ ॥
मागच्या कथेचा संदर्भ असा आहे की, पंधराव्या अध्यायाच्या शेवटी माझ्या प्राप्तीला सिद्धि या बाधक होतात असें श्रीकृष्ण म्हणाले ७५.
एवं सांडूनि सिद्धींचें ध्यान । माझे स्वरूपीं राखावें मन ।
हें ऐकोनि कृष्णवचन । उद्धवें प्रश्न मांडिला ॥ ७६ ॥
हें ऐकोनि कृष्णवचन । उद्धवें प्रश्न मांडिला ॥ ७६ ॥
म्हणजे सिद्धींवरचे ध्यान सोडून देऊन माझ्याच स्वरूपामध्ये मन ठेवावे. हे श्रीकृष्णाचे भाषण ऐकून उद्धवाने प्रश्न विचारला ७६.
उद्धव म्हणे श्रीकृष्णनाथा । विनंती अवधारीं समर्था ।
तुझ्या विभूति समस्ता । मज तत्त्वतां सांगाव्या ॥ ७७ ॥
तुझ्या विभूति समस्ता । मज तत्त्वतां सांगाव्या ॥ ७७ ॥
उद्धव म्हणाला, श्रीकृष्णनाथा ! समर्था ! माझी एक विनंति ऐक. तुझ्या खरोखर ज्या विभूति असतील त्या सर्व तूं मला सांगाव्या ७७.
श्रीउद्धव उवाच -
त्वं ब्रह्म परमं साक्षाद् अनाद्यन्तमपावृतम् ।
सर्वेषामपि भावानां त्राणस्थित्यप्ययोद्भवः ॥ १ ॥
त्वं ब्रह्म परमं साक्षाद् अनाद्यन्तमपावृतम् ।
सर्वेषामपि भावानां त्राणस्थित्यप्ययोद्भवः ॥ १ ॥
[श्लोक १ ] उद्धव म्हणाला - भगवन ! आपण स्वतः परब्रह्म आहात, आपल्याला आदी नाही की अंत नाही आपण मायेचे आवरण नसलेले अद्वितीय तत्त्व आहात सर्व पदार्थांची उत्पत्ती, स्थिती, रक्षण आणि प्रलय यांना कारणीभूत आपणच आहात उच्चनीच अशा सर्व प्राण्यांमध्ये आपण आहात. (१)
भूतभौतिकांचें तूं कारण । तुझेनि जन्म-स्थिति-निदान ।
इतुकें करोनि अकर्ता जाण । ब्रह्म परिपूर्ण तूं यालागीं ॥ ७८ ॥
इतुकें करोनि अकर्ता जाण । ब्रह्म परिपूर्ण तूं यालागीं ॥ ७८ ॥
भूत आणि भौतिक याचे कारण तूच; जन्म, स्थिति आणि लय तुझ्यामुळेच होतात; आणि इतकेही करून तू अकर्ताच आहेस, म्हणूनच तूं परिपूर्ण ब्रह्म आहेस ७८.
म्हणसी उत्पत्ति स्थिति मरण । भूतांतें प्रकृति करी जाण ।
ते प्रकृति तुझे अधीन । तुझेनि चलन प्रकृतीसी ॥ ७९ ॥
ते प्रकृति तुझे अधीन । तुझेनि चलन प्रकृतीसी ॥ ७९ ॥
आतां तूं म्हणशील की, प्राण्यांना उत्पत्ति, स्थिति व लय ही प्रकृतीच करते. पण ती प्रकृति म्हणजे माया ही तुझ्या आधीन आहे. तुझ्यामुळेच प्रकृतीला चालन प्राप्त होते ७९.
यालागीं प्रकृति ते परतंत्र । तूं परमात्मा स्वतंत्र ।
अनादि अव्यवो अपार । श्रुतींसी पार न कळेचि ॥ ८० ॥
अनादि अव्यवो अपार । श्रुतींसी पार न कळेचि ॥ ८० ॥
म्हणून ती प्रकृति परतंत्र होय. तूं परमात्मा स्वतंत्र आहेस. तूं अनादि, अव्यय आणि अपार आहेस. वेदांनासुद्धा तुझा पार लागत नाही ८०.
प्रकृतीसी तुझें आवरण । तूं अनंत गा निरावरण ।
जीवांचे स्वरूप गा तूं आपण । परी जीवपण तुज नाहीं ॥ ८१ ॥
जीवांचे स्वरूप गा तूं आपण । परी जीवपण तुज नाहीं ॥ ८१ ॥
प्रकृतीला तुझे आवरण आहे. तूं अनंत असल्यामुळे आवरणरहित आहेस. तूं स्वतः जीवांचे स्वरूप आहेस, पण तुला मात्र जीवपणा नाही ८१.
जीवू तितुका अज्ञानयुक्त । तूं ज्ञानाज्ञानातीत निश्चित ।
यालागीं ब्रह्म तूं साक्षात । अविनाशवंत अपरोक्ष ॥ ८२ ॥
यालागीं ब्रह्म तूं साक्षात । अविनाशवंत अपरोक्ष ॥ ८२ ॥
जीव तितका अज्ञानाने युक्त आहे, आणि तुं खरोखर ज्ञान व अज्ञान ह्यांहूनही पलीकडचा आहेस, म्हणूनच तुं अविनाशी व अपरोक्ष असें साक्षात् परब्रह्म आहेस ८२.
तो तूं अपरोक्ष कैसा म्हणशी । सर्वीं सर्वत्र सबाह्य असशी ।
ऐसा असोनि अतर्क्य होशीं । हृषीकेशी तें ऐक ॥ ८३ ॥
ऐसा असोनि अतर्क्य होशीं । हृषीकेशी तें ऐक ॥ ८३ ॥
तो तूं अपरोक्ष कसा ? असें म्हणशील, तर तूं सर्वामध्ये सर्वत्र अंतर्बाह्य आहेस, आणि असा व्यापलेला असूनही, श्रीकृष्णा! तूं अतर्क्य आहेस. तें ऐक ८३.
उच्चावचेषु भूतेषु दुर्ज्ञेयमकृतात्मभिः ।
उपासते त्वां भगवन् याथातथ्येन ब्राह्मणाः ॥ २ ॥
उपासते त्वां भगवन् याथातथ्येन ब्राह्मणाः ॥ २ ॥
[श्लोक २] परंतु ज्यांनी आपले मन आणि इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवली नाहीत, ते आपल्याला जाणू शकत नाहीत. ब्रह्मवेत्ते लोकच यथार्थरूपाने आपली उपासना करतात. (२)
मशकादि हिरण्यगर्भ पर्यंत । तूं सबाह्य सर्व भूतीं संतत ।
ऐशिया तूतें निश्चित । ब्राह्मण जाणत वेदार्थें ॥ ८४ ॥
ऐशिया तूतें निश्चित । ब्राह्मण जाणत वेदार्थें ॥ ८४ ॥
माशीपासून हिरण्यगर्भापर्यंत सर्व प्राणिमात्रांमध्ये निरंतर अंतर्बाह्य व्यापून असणाऱ्या अशा तुला ब्राह्मण वेदाच्या अर्थावरून निश्चितपणे जाणतात ८४.
आकळूनि उपनिषदर्थ । तुझ्या ठायीं भजनयुक्त ।
ते तुज सर्वगतातें जाणत । सुनिश्चित सर्वात्मा ॥ ८५ ॥
ते तुज सर्वगतातें जाणत । सुनिश्चित सर्वात्मा ॥ ८५ ॥
किंवा जे कोणी उपनिषदांचे यथार्थ रहस्य जाणून तुझ्या ठायीं भजनयुक्त असतात, ते सर्वव्यापी असा तूं सर्वात्मा आहेस असें निश्चितार्थाने समजतात ८५.
त्या सर्वात्म्याचा पाहतां पार । अचिंत्यानंत ऐश्वर्यधर ।
त्या तुज नेणती प्राकृत नर । ऐक विचार तयांचा ॥ ८६ ॥
त्या तुज नेणती प्राकृत नर । ऐक विचार तयांचा ॥ ८६ ॥
त्या तुज सर्वात्म्याचा अंतपार पाहूं गेले असतां तूं अचिंत्य व अनंत ऐश्वर्ययुक्त आहेस. अशा तुला जे सामान्य लोक जाणत नाहीत, त्यांचा विचार ऐक ८६.
जे मनाचे विकिले । उपस्थाचे अंकिले ।
जे रसनेचे पोसणे झाले । निद्रेनें केले घरजांवयी ॥ ८७ ॥
जे रसनेचे पोसणे झाले । निद्रेनें केले घरजांवयी ॥ ८७ ॥
जे मनाला विकलेले असतात, कामेंद्रियांचे दास बनतात, जे जिव्हेचे पोसणे होतात, आणि ज्यांना निद्रेने जणूं काय आपले घरजांवईच केलेले असते! ८७.
त्यांसी स्वतः सिद्ध स्वरूप पाहीं । सर्वगत न पडेचि ठायीं ।
निजात्मता न कळे देहीं । सदा विषयीं भूलले ॥ ८८ ॥
निजात्मता न कळे देहीं । सदा विषयीं भूलले ॥ ८८ ॥
अशा लोकांना, तुझे जे स्वतःसिद्ध व सर्वव्यापक स्वरूप, त्याची कल्पनाही होत नाही. आपल्या देहांतच आत्मस्वरूप आहे हे त्यांस कळत नाही. ते सदासर्वदा विषयांतच भुललेले असतात ८८.
विषयीं चंचळ अंतःकरण । त्यांसी नव्हे ध्यान सगुण ।
निर्गुणीं प्रवेशेना मन । अज्ञान जन केवीं तरती ॥ ८९ ॥
निर्गुणीं प्रवेशेना मन । अज्ञान जन केवीं तरती ॥ ८९ ॥
विषयांत त्यांचे अंत:करण चंचल झालेले असते. त्यांना सगुण स्वरूपाचेही ध्यान होत नाही, आणि त्यांचे मन निर्गुण स्वरूपांत शिरतच नाही. असे अज्ञानी लोक कसे तरावे? ८९.
न करितां नाना व्युत्पत्ती । न धरितां ध्यानस्थिती ।
तुझ्या उत्तमा ज्या विभूती । त्या सांग निश्चितीं भजनासी ॥ ९० ॥
तुझ्या उत्तमा ज्या विभूती । त्या सांग निश्चितीं भजनासी ॥ ९० ॥
याकरिता अनेक प्रकारची शास्त्रे न धुंडाळतां व ध्यानधारणेच्याही भरीस न पडतां त्यांना केवळ भजन करावयास मिळावें, अशा प्रकारच्या ज्या तुझ्या उत्तमोत्तम विभूति असतील त्या निश्चयेकरुन सांगाव्या ९०.
येषु येषु च भावेषु भक्त्या त्वां परमर्षयः ।
उपासीनाः प्रपद्यन्ते संसिद्धिं तद् वदस्व मे ॥ ३ ॥
उपासीनाः प्रपद्यन्ते संसिद्धिं तद् वदस्व मे ॥ ३ ॥
[श्लोक ३] मोठमोठे ऋषी आपल्या ज्या विभूतींची भक्तीने उपासना करून सिद्धी प्राप्त करून घेतात, त्या विभूती आपण मला सांगाव्यात. (३)
ज्या ज्या तुझ्या विभूती । पूर्वीं उपासिल्या संतीं ।
दृढ भावें करोनियां भक्ती । तुझी स्वरूपप्राप्ती पावलें ॥ ९१ ॥
दृढ भावें करोनियां भक्ती । तुझी स्वरूपप्राप्ती पावलें ॥ ९१ ॥
तुझ्या ज्या ज्या विभूतींची संतांनी पूर्वी दृढ भावनेने भक्ति करून उपासना केली, व तुझ्या स्वरूपाला पोचले ९१.
त्या सकळ तुझ्या विभूती । कवण स्थिती कवण व्यक्ती ।
कवण भाव कवण गती । हें निश्चितीं मज सांगा ॥ ९२ ॥
कवण भाव कवण गती । हें निश्चितीं मज सांगा ॥ ९२ ॥
त्या तुझ्या सर्व विभूति, त्यांची स्थिति कशी? त्यांची स्वरूपे कोणती? त्यांची भक्ति कशी ? त्यांपासून कोणती गति प्राप्त होते हें निश्चयेंकरून मला सांगा ९२.
म्हणसी सकळ भूतांप्रती । तूंचि वोळख माझ्या विभूती ।
तरी ते तुझी अतर्क्य स्थिती । न कळे श्रीपती आमुचेनि ॥ ९३ ॥
तरी ते तुझी अतर्क्य स्थिती । न कळे श्रीपती आमुचेनि ॥ ९३ ॥
आतां ह्यावर तूं म्हणशील की, सर्व वस्तुमात्रामध्ये माझ्या विभूति तूंच ओळख म्हणजे झाले. तर ते तुझें स्वरूप अतर्क्य आहे. श्रीकृष्णा! तें कांहीं आमच्याने ध्यानात आणवत नाहीं ९३.
गूढश्चरसि भूतात्मा भूतानां भूतभावन ।
न त्वां पश्यन्ति भूतानि पश्यन्तं मोहितानि ते ॥ ४ ॥
न त्वां पश्यन्ति भूतानि पश्यन्तं मोहितानि ते ॥ ४ ॥
[श्लोक ४] हे प्रभो ! आपण सर्व प्राण्यांचे अंतरात्मा आहात आपण त्यांच्यामध्ये स्वतःला गुप्त ठेवून लीला करीत असता आपण सर्वांना पाहाता, पंरतु जगातील प्राणी आपल्या मायेने मोहित झाल्यामुळे आपल्याला पाहात नाहीत. (४)
सर्व भूतांचा हृदयस्थ । हृदयीं असोनि गुप्त ।
त्या तूतें भूतें समस्त । न देखत देहभ्रमें ॥ ९४ ॥
त्या तूतें भूतें समस्त । न देखत देहभ्रमें ॥ ९४ ॥
सर्व प्राणिमात्रांच्या हृदयामध्ये तूंच आहेस. पण हृदयांत असूनही तूं गुप्त आहेस. देह हाच मी अशा भ्रमामुळे सर्व प्राणी तुला पहात नाहीत ९४.
त्या देहभ्रमासी देवराया । मूळकारण तुझी माया ।
तेथें तुझी कृपा झालिया । माया जाय विलया गुणेंसीं ॥ ९५ ॥
तेथें तुझी कृपा झालिया । माया जाय विलया गुणेंसीं ॥ ९५ ॥
हे देवराया! त्या देहभ्रमाला मूळ कारण तुझी माया आहे, पण त्यांतच तुझी कृपा झाली तर ती माया गुणांसहवर्तमान लयास जाते ९५.
मग सर्वत्र सर्वां ठायीं । सर्व भूतीं सबाह्य देहीं ।
तुझें स्वरूप ठायीं ठायीं । प्रकटें पाहीं सदोदित ॥ ९६ ॥
तुझें स्वरूप ठायीं ठायीं । प्रकटें पाहीं सदोदित ॥ ९६ ॥
आणि मग सर्वत्र, सर्व ठिकाणी, सर्व प्राणिमात्रांच्या देहांतही अंतर्बाह्य असें तुझेंच स्वरूप ठिकठिकाणी निरंतर व्यक्त होते ९६.
एवढें तुझे कृपेचे करणें । ते कृपा लाहिजे कवणें गुणें ।
यालागीं तुझ्या विभूती उपासणें । तुझे कृपेकारणें गोविंदा ॥ ९७ ॥
यालागीं तुझ्या विभूती उपासणें । तुझे कृपेकारणें गोविंदा ॥ ९७ ॥
एवढी तुझ्या कृपेची करणी आहे. पण ती कृपा कोणत्या गुणांनी प्राप्त होते? म्हणून हे गोविंदा! तुझी कृपा प्राप्त होण्यासाठी तुझ्या विभूतींची उपासना केली पाहिजे ९७.
याचिलागी विभूतींची स्थिती । समूळ सांगावी मजप्रती ।
तेचि अर्थींची विनंती । पुढतपुढती करीतसें ॥ ९८ ॥
तेचि अर्थींची विनंती । पुढतपुढती करीतसें ॥ ९८ ॥
म्हणूनच तुझ्या विभूतींची समग्र स्वरूपे मला सांगावीत, याच अर्थाची विनंति पुनःपुन्हा करतो आहे ९८.
याः काश्च भूमौ दिवि वै रसायां
विभूतयो दिक्षु महाविभूते ।
ता मह्यमाख्याह्यनुभावितास्ते
नमामि ते तीर्थपदाङ्घ्रिपद्मम् ॥ ५ ॥
विभूतयो दिक्षु महाविभूते ।
ता मह्यमाख्याह्यनुभावितास्ते
नमामि ते तीर्थपदाङ्घ्रिपद्मम् ॥ ५ ॥
[श्लोक ५] हे अचिंत्य ऐश्वर्यसंपन्न प्रभो ! पृथ्वी, स्वर्ग, पाताळ तसेच दिशांदिशांमध्ये आपल्या प्रभावांनी युक्त अशा ज्या ज्या विभूती आहेत, त्या आपण मला सांगाव्यात प्रभो ! मी आपल्या चरणकमलांना वंदन करतो ही सर्व तीर्थांनाही तीर्थपण देणारी आहेत. (५)
स्वर्गमृत्युपाताळ स्थिती । विस्तारल्या दशदिशांप्रती ।
त्या समस्तही तुझ्या विभूती । सांग श्रीपती मजलागीं ॥ ९९ ॥
त्या समस्तही तुझ्या विभूती । सांग श्रीपती मजलागीं ॥ ९९ ॥
श्रीकृष्णा! स्वर्ग, मृत्यु व पाताळ यांत असलेल्या व दशदिशांना विस्तारलेल्या त्या तुझ्या सर्व विभूति मला सांग ९९.
ऐसा करोनियां प्रश्न । उद्धवें घातले लोटांगण ।
सकळ तीर्थांचे जन्मस्थान । मस्तकीं श्रीचरण वंदिले ॥ १०० ॥
सकळ तीर्थांचे जन्मस्थान । मस्तकीं श्रीचरण वंदिले ॥ १०० ॥
असा प्रश्न करून उद्धृवानें लोटांगण घातलें. आणि सव तीर्थाचे जन्मस्थान असे जे श्रीकृष्णाचे चरण, त्यांवर मस्तक ठेवून वंदन केलें १००
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...