मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    ५२ अध्यायी गुरूचरित्र - Guru Charitra 52 Adhyay in Marathi

    गुरूचरित्र अध्याय बारावा - ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

    श्रीगुरू म्हणती जननीसी । आम्हां ऐसा निरोप देसी । अनित्य शरीर तूं जाणसी । काय भरंवसा जीवित्वाचा ॥१॥

    श्लोक ॥ अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वतः । नित्यं सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसंग्रहः ॥२॥

    टीका ॥ एखादा असेल स्थिरजीवी । त्यासी तुझी बुद्धि बरवी । अनित्य देह विभवोभावीं । पुढें कवणा भरंवसा ॥३॥

    देह म्हणिजे क्षणभंगुर । नाहीं राहिले कवण स्थिर । जंववरी दृढ असेल शरीर । पुण्यमार्गे रहाटावें ॥४॥

    जो असेल मृत्यूसी जिंकीत । त्याणें निश्चयावें शरीर नित्य । त्यासि तुझा उपदेश सत्य । म्हणे करीन धर्म पुढें ॥५॥

    अहोरात्रीं आयुष्य उणें । होत असतें क्षणक्षणें । करावा धर्म याचिकारणें । पूर्ववयेसीं परियेसा ॥६॥

    अल्पोदकीं जैसा मत्स्य । तैसें मनुष्य अल्पायुष्य । जंववरी असे प्राणी सुरस । धर्म करावा परियेसा ॥७॥

    जैसा सूर्याचा रथ चाले । निमिष होतां शीघ्रकाळें । बावीस सहस्त्र गांव पळे । तैसें आयुष्य क्षीण होय ॥८॥

    पर्जन्य पडतां वृक्षावरी । उदक राहे पर्णाग्रीं । स्थिर नव्हे अवधारीं । पडे भूमीवरी सवेंचि ॥९॥

    तैसें शरीर नव्हे स्थिर । जीवित्वा मरण निर्धार । यौवन अथवा होतांचि जर । कलेवर हें नश्य जाणा ॥१०॥

    याचि कारणें देहासी । विश्वासूं नये परियेसीं । मृत्यु असे हा सहवासी । धर्म करावा तात्काळीं ॥११॥

    पिकलें पान वृक्षीं जैसें । लागलें असें सूक्ष्मवेशें । तैसेंचि शरीर हें भरंवसें । केधवां पडेल न कळे जाणा ॥१२॥

    एखादा नर कळंतरासी । द्रव्य देतो परियेसी । दिवसगणना करी कैसी । तैसा यम काळ लक्षीतसे ॥१३॥

    जैशा समस्त नदी देखा । समुद्रासी घेऊनि जाती उदका । परतोनि न येती जन्मभूमिका । तैसें आयुष्‍य न परते ॥१४॥

    अहोरात्री जाती पळोन । ऐसें निश्चयें जाणोन । पुण्य न करिती जे जन । ते पशुसमान परियेसा ॥१५॥

    जया दिवशीं पुण्य घडलें नाहीं । वृथा गेला दिवस पाहीं । तया यमासि करुणा नाहीं । करावें पुण्य तात्काळ ॥१६॥

    पुत्र दारा धन गोधन । आयुष्‍य देह येणें-गुण । जे जन निश्चित म्हणती जाण । ते पशूसम परियेसीं ॥१७॥

    जैसी सुसरी मनुष्यासी । भक्षिती होय परियेसीं । तैसें या शरीरासी । वृद्धाप्य भक्षी अवधारा ॥१८॥

    याकारणें तारुण्यपणीं । करावें पुण्य विद्वज्जनीं । आम्हां कां हो वर्जिसी जननी । काय बुद्धि बरवी असे ॥१९॥

    जो यमाचा असेल इष्‍ट । त्याणें करावा आळस हट्ट । अमरत्वें असेल जो सुभट । त्याणें पुढें धर्म करावा ॥२०॥

    संसार म्हणजे स्वप्नापरी । जैसें पुष्‍प असे मोगरी । सवेंचि होय शुष्कापरी । तयासम देह जाणा ॥२१॥

    जैसी विजू असे लवत । सवेंचि होय अव्यक्त । तैसें-प्राय देह होत । स्थिर नोहे परियेसा ॥२२॥

    ऐसें नानापरी देखा । बोधिता झाला जननीजनकां । विस्मय करिती सभालोक । बाळक केवीं तत्त्व सांगतो ॥२३॥

    ऐकोनि पुत्राचें वचन । माता करीतसे नमन । देवा निरोपिलें ज्ञान । विनंति माझी परिसावी ॥२४॥

    तुवां निरोपिलें आम्हांसी । पुत्र चवघे होतील ऐसी । विश्वास नव्हे गा मानसीं । कुळदेवता पुत्रराया ॥२५॥

    जंववरी होय एक सुत । तंववरी रहावें समीपत । निरोप नेदीं तंववरी सत्य । म्हणोनि विनवी तयेवेळीं ॥२६॥

    माझें वचन अव्हेरुनि । जरी जाशील निघोनि । प्राण देईन तत्क्षणीं । हा निश्चय अवधारीं ॥२७॥

    पुत्र नव्हसी तूं आम्हांसी । आमुचें कुळदैवत होसी । सत्य करीं गा वचनासी । बोल आपुले दातारा ॥२८॥

    ऐकोनि मातेचें वचन । श्रीगुरू बोलती हांसोन । आमचे बोल सत्य जाण । तुझें वाक्य निर्धारीन पां ॥२९॥

    तुतें होतांचि पुत्र दोनी । निरोप द्यावा संतोषोनि । मग न राहें ऐक जननी । बोल आपुले सत्य करीं ॥३०॥

    संवत्सर एक तुझ्या घरीं । राहूं माते निर्धारीं । वासना पुरतील तुझ्या जरी । मग निरोप दे मज ॥३१॥

    ऐसी करुनियां निगुती । राहिले श्रीगुरु अतिप्रीतीं । वेदाभ्यास शिकविती । शिष्यवर्गा बहुतांसी ॥३२॥

    नगरलोक विस्मय करिती । अभिनव झालें ऐसें म्हणती । बाळ पहा हो वर्षे साती । वेद चारी सांगतसे ॥३३॥

    विद्वानांहूनि विद्वान विद्यार्थी । तीनी वेद पढती । षट्‌शास्‍त्री जे म्हणविती । तेही येती शिकावया ॥३४॥

    येणेंपरी तया घरीं । राहिले गुरु प्रीतिकरीं । माता झाली गरोदरी । महानंद करीतसे ॥३५॥

    नित्य पूजिती पुत्रासी । ठेवूनि भाव कुळदैवत ऐसी । निधान लाधे एखाद्यासी । काय सांगों संतोष त्यांचा ॥३६॥

    तंव नवमास जाहली अंतर्वत्‍नी । माता झाली प्रसूती । पुत्र झाले युग्‍म ख्याती । अतिसुंदर परियेसा ॥३७॥

    पुत्र झाले उल्हास थोर । मातापित्या संतोष फार । आशीर्वचन असे गुरू । असत्य केवीं होईल ॥३८॥

    याकारणें गुरुवचन । सत्य मानावें विद्वज्जनें । जैसें असेल अंतःकरण । तैसें होईल परियेसा ॥३९॥

    ऐशापरी वर्ष एक त्रिमासी झाले ते बाळक । खेळवीतसे माता ऐक । आले श्रीगुरू तयांजवळी ॥४०॥

    जननी ऐक माझे वचना । झाली तुझी मनकामना । दोघे पुत्रनिधाना । पूर्णायुषी आहेति जाण ॥४१॥

    आणखी होतील दोघे कुमारक । त्यानंतर कन्या एक । असाल नांदत अत्यंत सुख । वासना पुरतील तुझी जाणा ॥४२॥

    आतां आमुतें निरोपावें । जाऊं आम्ही स्वभावें । संतोषरुपी तुम्हीं व्हावें । म्हणोनि निरोप घेती तयेवेळीं ॥४३॥

    संतोषोनि मातापिता । चरणांवरी ठेविती माथा । स्वामी आमुच्या कुळदेवता । अशक्‍य आम्ही बोलावया ॥४४॥

    न कळे आम्हां स्वरुपज्ञान । तुझें स्वरुप नकळे कवणा । मायामोहें वेष्‍टोन कामना । नेणोंचि महिमान तुझें ॥४५॥

    मायाप्रपंचें वेष्‍टोनि । तुतें जरी सुत म्हणोनि । एके समयीं निष्‍ठुर बोलों वचनीं । क्षमा करणें स्वामिया ॥४६॥

    सहभोजन-शयनासनीं । तुतें गांजों भुकेजोनि । कडे न घेंचि उबगोनि । क्षमा करीं गा देवराया ॥४७॥

    तारक आमुचे वंशासी । बापा तूं अवतरलासी । प्रदोषपूजा फळासी । आली मातें स्वामिया ॥४८॥

    आतां आम्हां काय गति । सांगा स्वामी कृपामूर्ती । जननमरण यातनयाती । कडे करावें दातारा ॥४९॥

    सगरांवरी जैसी गंगा । तैसा तुवां आलासि चांगा । पावन केलेंसि माझे अंगा । उभयकुळें बेचाळीस ॥५०॥

    आम्हां ठेविसी कवणेपरी । या धुरंधर संसारीं । तुझें दर्शन नोहे तरी । केवीं वांचों प्राणात्मजा ॥५१॥

    ऐकोनि मातापितयांचें वचन । बोलती श्रीगुरू आपण । जे जे समयीं तुमचें मन । स्मरण करील आम्हांसी ॥५२॥

    स्मरण करितां तुम्हांजवळी । असेन जननी मी तात्काळीं । न करावी चिंता वेळोवेळीं । म्हणोन भाक देतसे ॥५३॥

    आणिक कन्या पुत्र तीनी । होतील ऐक तूं भवानी । दैन्य नाहीं तुमच्या भुवनीं । सदा श्रीमंत नांदाल ॥५४॥

    जन्मांतरीं परमेश्वरासी । पूजा केली तुवां प्रदोषीं । याची महिमा आहे ऐसी । जन्मोजन्मीं श्रियायुक्त ॥५५॥

    इह सौख्य होय ऐक । देहांतीं जाणा परम लोक । पूजा करितां पिनाक । पुनर्जन्म तुम्हां नाहीं ॥५६॥

    तुवां आराधिला शंकर । आम्हां करविला अवतार । वासना पुरेल तुझा भार । आम्हां निरोप दे आतां ॥५७॥

    पुनर्दर्शन तुम्हांसी । होईल ऐका वर्षे-तीसीं । जावोनि बदरीवनासी । म्हणोनि निघती तये वेळीं ॥५८॥

    निरोप घेवोनि तये वेळां । श्रीगुरू निघाले अवलीळा । नगरलोक येती सकळा । मातापिता बोळविती ॥५९॥

    म्हणती समस्त नगरनारी । तपासी निघाला ब्रह्मचारी । होईल पुरुष अवतारी । मनुष्यदेही दिसतसे ॥६०॥

    एक म्हणती पहा हो नवल । तपासी निघाला असे बाळ । मातापिता सुखें केवळ । निरोप देती कौतुकें ॥६१॥

    कैसें यांचें अंतःकरण । जैसा हो कां पाषाण । मन करुनि निर्वाण । बोळविताति पुत्रासी ॥६२॥

    एक म्हणती नव्हे बाळ । होईल त्रिमूर्तीचा अवतार केवळ । अनुमान नव्हे हा निश्चळ । वेद केवीं म्हणतसे ॥६३॥

    सात वर्षांचें बाळक देखा । वेद म्हणतो अखिल शाखा । मनुष्यमात्र नव्हे ऐका । ऐसें म्हणती साधुजन ॥६४॥

    ऐसें म्हणोनि साधुजन । करिताति साष्‍टांगीं नमन । नानापरी स्तोत्रवचन । करिते झाले अवधारा ॥६५॥

    नमन करोनि सकळिक । आले आपुले गृहांतिक । पुढें जाती जननीजनक । पुत्रासवें बोळवीत ॥६६॥

    निजस्वरुप जननियेसी । दाविता झाला परियेसीं । श्रीपादश्रीवल्लभ-द्त्तात्रेयासी । देखते झाले जनकजननी ॥६७॥

    त्रयमूर्तीचा अवतार । झाला नरहरी नर । निजरुपें दिसे कर्पूरगौर । पाहतां नमिलें चरणासी ॥६८॥

    जय जया जगद्गुरु । त्रयमूर्तीचा अवतारु । आमुचें पुण्य होतें थोरू । म्हणोनि देखिले तुमचे चरण ॥६९॥

    तू तारक विश्वासी । आम्हां उद्धरिलें विशेषीं । पुनर्दर्शन आम्हांसी । द्यावें म्हणोनि विनविती ॥७०॥

    ऐसें म्हणोनि मातापिता । चरणांवरी ठेविती माथा । अलिंगिती श्रीगुरुनाथा । स्नेहभावेंकरुनियां ॥७१॥

    संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । आश्वास केला अतिप्रीतीं । पुनर्दर्शन हो निश्चितीं । देईन म्हणती तये वेळीं ॥७२॥

    ऐसें तयां संभाषोनि । निरोप घेतला तत्क्षणीं । परतोनि आली जनकजननी । येती संतोषोनि मंदिरांत ॥७३॥

    वरदमूर्ति श्रीगुरुराणा । निघाला जावया बदरीवना । पातला आनंदकानना । वाराणसी क्षेत्रासी ॥७४॥

    अविमुक्त वाराणसी पुरी । क्षेत्र थोर सचराचरीं । विश्वेश्वर अवधारीं । अनुपम्य असे त्रिभुवनीं ॥७५॥

    राहूनियां तया स्थानीं । अनुष्‍ठिती गुरुशिरोमणी । विश्वेश्वराचे दर्शनीं । पूजा करिती आत्मारामासी ॥७६॥

    येणेंपरी तया स्थानीं । क्वचित्काळ श्रीगुरुमुनि । अष्‍टांगयोगेंकरुनि । तप करिती परियेसा ॥७७॥

    तया काशीनगरांत । तापसी असती आणिक बहुत । संन्यासी यती अवधूत । तप करिती दारुण ॥७८॥

    तयांत श्रीगुरू ब्रह्मचारी । योगाभ्यासधुरंधरीं । करिताति ; तपस्वी येरी । अभिनव करिती मनांत ॥७९॥

    म्हणती पहा हो ब्रह्मचारी । तप करितो नानापरी; कैसें वैराग्य याचे उदरीं । निर्लिप्‍त असे परियेसा ॥८०॥

    शरीरस्वार्थ नाहीं यासी । योग्य होय हा संन्यासीं । स्नान करितो त्रिकाळेसीं । मणिकर्णिका तीर्थांत ॥८१॥

    ऐसें स्तोत्र नित्य करिती । समस्त संन्यासी येती । वृध्द होता एक यति । ‘कृष्णसरस्वती’ नामें ॥८२॥

    तो केवळ ब्रह्मज्ञानी । तपस्वी असे महामुनि । सदा देखोनियां नयनीं । स्नेहभावें भावीतसे ॥८३॥

    म्हणे समस्त यतीश्वरांसी । न म्हणा नर ब्रह्मचारीसी । अवतारपुरुष अतितापसी । विश्ववंद्य दिसतसे ॥८४॥

    वयसा धाकुटा म्हणोनि । नमन न कराल तुम्ही मुनी । प्रख्यात मूर्ति हा त्रिभुवनीं । आम्हां वंद्य असे देखा ॥८५॥

    वार्धक्यपणें आम्ही यासी । वंदितां दुःख सकळांसी । विशेष आम्ही संन्यासी । मूर्ख लोक निंदिती ॥८६॥

    याकारणें आम्ही यासी । विनवूं, परोपकारासी । संन्यास देता, समस्तांसी । भक्ति होईल स्थिर मनीं ॥८७॥

    लोकानुग्रहानिमित्त । हा होय गुरु समर्थ । याचे दर्शनमात्रें पुनीत । आम्ही परियेसा ॥८८॥

    याकारणें बाळकासी । विनवूं आम्ही विनयेसीं । आश्रम घ्यावा संन्यासी । पूजा करुं एकभावें ॥८९॥

    म्हणोनि आले तया जवळीं । विनविताति मुनी सकळी । ऐक तापसी स्तोममौळी । विनंति असे परियेसा ॥९०॥

    लोकानुग्रहाकारणें । तुम्हीं आतां संन्यास घेणें । आम्हां समस्तां उद्धरणें । पूजा घेणें आम्हां करवीं ॥९१॥

    या कलियुगीं संन्यास म्हणोन । निंदा करिती सकळै जन । स्थापना करणार कवण । न दिसती भूमीवरी ॥९२॥

    श्लोक ॥ यज्ञदानं गवालंभं संन्यासं पलपैतृकम्‌ । देवराच्च सुतोत्पत्तिं कलौ पंच विवर्जयेत्‌ ॥९३॥

    टीका ॥ यज्ञ दान गवालंभन । संन्यास घेतां अतिदूषण । पलपैतृक भ्रातांगना । करुं नये म्हणताति ॥९४॥

    करितां कलियुगांत । निषिद्ध बोलती जन समस्त । संन्यासमार्ग सिद्धांत । वेदसंमत विख्यात ॥९५॥

    पूर्वी ऐसें वर्तमानीं । निषेध केला सकळही जनीं । श्रीशंकराचार्य अवतारोनि । स्थापना केली परियेसा ॥९६॥

    तयावरी इतुके दिवस । चालत आला मार्ग संन्यास । कलि प्रबळ होतां नाश । पुनरपि निंदा करिताती ॥९७॥

    आश्रमाचा उद्धार । सकळ जनां उपकार । करावा कृपासागर । म्हणती सकळ मुनिजन ॥९८॥

    ऐकोनि त्यांची विनंति । श्रीगुरुमुनि आश्रय घेती । वृद्ध कृष्णसरस्वती । तयापासूनि परियेसा ॥९९॥

    ऐसें म्हणतां सिद्धमुनि । विनवीतसे नामकरणी । संदेह होतो माझे मनीं । कृपानिधि मुनिराया ॥१००॥

    म्हणती श्रीगुरू तोचि जगद्गुरू । त्यातें झाला आणिक गुरु । त्रयमूर्तीचा अवतारु । कवणेपरी दिसतसे ॥१॥

    सिद्ध म्हणे शिष्यासी । सांगेन याची स्थिति कैसी । पूर्वी श्रीरघुनाथासी । झाला वसिष्‍ठ केवीं गुरु ॥२॥

    आठवा अवतार श्रीकृष्णदेवासी । सांदीपनी जाहला गुरु कैसी । अवतार होतांचि मानुषीं तयापरी रहाटावें ॥३॥

    याकारणें श्रीगुरुमूर्ती । गुरु केला तो कृष्णसरस्वती । बहुकाळींचा होता यति । म्हणोनि त्यातें मानिलें ॥४॥

    शिष्य म्हणे सिद्धासी । स्वामी कथा निरोपिलीसी । वृद्ध कृष्णसरस्वतीसी । गुरु केलें म्हणोनियां ॥५॥

    समस्त यतीश्वरांहून । तयासि दिधला बहुमान । कृष्णसरस्वती तो पूर्वी कोण । कोण गुरुचें मूळपीठ ॥६॥

    विस्तारुनि आम्हांसी । निरोपावें कृपेसीं । त्याणें माझे मानसीं । संतोष होईल स्वामिया ॥७॥

    ऐसें शिष्य विनवितां । तंव सांगे विस्तारता । मूळपीठ आद्यंता । गुरुसंतति परियेसा ॥८॥

    आदिपीठ ‘शंकर’ गुरु । तदनंतर ‘विष्णु’ गुरु । त्यानंतर ‘चतुर्वक्‍त्र’ गुरु । हें मूळपीठ अवधारीं ॥९॥

    तदनंतर ‘वसिष्‍ठ’ गुरु । तेथोनि ‘शक्ति’, ‘पराशरु’ । त्याचा शिष्य ‘व्यास’ थोरु । जो कां अवतार विष्णूचा ॥११०॥

    तयापासूनि ‘शुक’ गुरु जाण । ‘गौडपादाचार्य’ सगुण । आचार्य ‘गोविंद’ तयाहून । पुढें आचार्य तो ‘शंकर’ जाहला ॥११॥

    तदनंतर ‘विश्वरुपाचार्य’ । पुढें ‘ज्ञानबोधीगिरिय’ । त्याचा शिष्य ‘सिंहगिरिय’ । ‘ईश्वरतीर्थ’ पुढें झाले ॥१२॥

    तदनंतर ‘नृसिंहतीर्थ’ । पुढें शिष्य ‘विद्यातीर्थ’ । ‘शिवतीर्थ’, ‘भारतीतीर्थ’ । गुरुसंतति अवधारीं ॥१३॥

    मग तयापासोनि । ‘विद्यारण्य’ श्रीपादमुनि । ‘विद्यातीर्थ’ म्हणोनि । पुढें झाला परियेसा ॥१४॥

    त्याचा शिष्य ‘मळियानंद’ । ‘देवतीर्थसरस्वती’ वृंद । तेथोनि ‘सरस्वतीयादवेंद्र’ । गुरुपीठ येणेंपरी ॥१५॥

    यादवेंद्र मुनीचा शिष्य । तोचि ‘कृष्णसरस्वती’ विशेष । बहुकाळींचा संन्यासी । म्हणोनि विशेष मानिती ॥१६॥

    येणेंपरी श्रीगुरुनाथ । आश्रम घेती चतुर्थ । संन्यासमार्गस्थापनार्थ । श्रीनृसिंहसरस्वती ॥१७॥

    समस्त वेदांचा अर्थ । सांगता झाला श्रीगुरुनाथ । म्हणोनि वंदिती समस्त । तया काशी नगरांत ॥१८॥

    ख्याति केली अतिगहनी । तया वाराणसीभुवनीं । यति समस्त येऊनि । सेवा करिती श्रीगुरुची ॥१९॥

    मग निघाले तेथोनि । बहुत शिष्य-समवेत मुनि । उत्तरतीर्थ बदरीवनीं । अनंत तीर्थे पहावया ॥१२०॥

    सव्य घालूनि मेरुसी । तीर्थे नवखंड क्षितीसी । सांगतां विस्तार बहुवसी । ऐक शिष्या नामकरणी ॥२१॥

    समस्त तीर्थे अवलोकीत । सवें शिष्य-यतींसहित । भूमिप्रदक्षिणा करीत । आले गंगासागरासी ॥२२॥

    सिद्ध म्हणे नामांकिता । समस्त चरित्र सांगतां । विस्तार होईल बहु कथा । म्हणोनि तावन्मात्र सांगतों परियेसीं ॥२३॥

    समस्त महिमा सांगावयासी । शक्ति कैंची आम्हांसी । अनंत महिमा त्रैमूर्तीसी । गुरुचरित्र परियेसीं ॥२४॥

    गंगासागरापासाव । तटाकयात्रा करीत देव । प्रयागस्थानीं गुरुराव । येते झाले परियेसा ॥२५॥

    तया स्थानीं असतां गुरू । आला एक द्विजवरु । ‘माधव’ नामें असे विप्रु । श्रीगुरुसी भेटला ॥२६॥

    ब्रह्मज्ञान तयासी । उपदेश केला प्रीतीसीं । चतुर्थाश्रम तयासी । देते झाले परियेसा ॥२७॥

    नाम ‘माधवसरस्वती’ । तया शिष्यातें ठेविती । तयावरी अतिप्रीती । शिष्यांमध्यें परियेसा ॥२८॥

    सिद्ध म्हणे नामकरणी । शिष्य झाले येणेगुणीं । अखिल यतीनामकरणी । सांगेन ऐका एकचित्तें ॥२९॥

    गंगाधराचा नंदनु । सांगे गुरुचरित्र कामधेनु । ऐकतां होय महाज्ञानु । लाधे चारी पुरुषार्थ ॥१३०॥

    इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे श्रीगुरुचातुर्थाश्रमग्रहणं-गुरुपरंपरा-कथनं नाम द्वादशोऽध्यायः ॥१२॥

    श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

    ५२ अध्यायी गुरूचरित्र - Guru Charitra 52 Adhyay in Marathi

    ५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय पहिला

    गुरूचरित्र अध्याय दुसरा - ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri...

    गुरूचरित्र अध्याय तिसरा - ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri...

    गुरूचरित्र अध्याय चौथा - दत्त जन्म - ॥ श्री गुरूचर...

    गुरूचरित्र अध्याय पाचवा - ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri...

    गुरूचरित्र अध्याय सहावा - ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri...

    गुरूचरित्र अध्याय सातवा - ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri...

    गुरूचरित्र अध्याय आठवा - ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri ...

    गुरूचरित्र अध्याय नववा - ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri ...

    गुरूचरित्र अध्याय दहावा - ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri...

    गुरूचरित्र अध्याय अकरावा - ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shr...

    गुरूचरित्र अध्याय बारावा - ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shr...

    गुरूचरित्र अध्याय तेरावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri ...

    गुरूचरित्र अध्याय चौदावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri ...

    गुरूचरित्र अध्याय पंधरावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri...

    गुरूचरित्र अध्याय सोळावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri ...

    गुरूचरित्र अध्याय सतरावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri ...

    गुरूचरित्र अध्याय अठरावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri ...

    गुरूचरित्र अध्याय एकोणीसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Sh...

    गुरूचरित्र अध्याय विसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri ...

    गुरूचरित्र अध्याय एकविसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shr...

    गुरूचरित्र अध्याय बाविसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shr...

    गुरूचरित्र अध्याय तेविसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shr...

    गुरूचरित्र अध्याय चोविसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shr...

    गुरूचरित्र अध्याय पंचविसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Sh...

    गुरूचरित्र अध्याय सव्विसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Sh...

    गुरूचरित्र अध्याय सत्ताविसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ ...

    गुरूचरित्र अध्याय अठ्ठाविसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ ...

    गुरूचरित्र अध्याय एकोणतिसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ S...

    गुरूचरित्र अध्याय तिसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri ...

    गुरूचरित्र अध्याय एकतिसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shr...

    गुरूचरित्र अध्याय बत्तिसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Sh...

    गुरूचरित्र अध्याय तेहेतिसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ S...

    गुरूचरित्र अध्याय चौतिसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shr...

    गुरूचरित्र अध्याय पस्तीसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Sh...

    गुरूचरित्र अध्याय छत्तिसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Sh...

    गुरूचरित्र अध्याय सदोतीसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Sh...

    गुरूचरित्र अध्याय अडोतीसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Sh...

    गुरूचरित्र अध्याय एकोणचाळीसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥...

    गुरूचरित्र अध्याय चाळीसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shr...

    गुरूचरित्र अध्याय एक्केचाळीसावा ॥ श्री गुरूचरित्र ...

    गुरूचरित्र अध्याय बेचाळीसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ S...

    गुरूचरित्र अध्याय त्रेचाळीसावा - गुरुचरित्र मराठी

    गुरूचरित्र अध्याय चव्वेचाळीसावा - गुरुचरित्र मराठी

    गुरूचरित्र अध्याय पंचेचाळीसावा - गुरुचरित्र मराठी

    गुरूचरित्र अध्याय शेहेचाळीसावा - गुरुचरित्र मराठी

    गुरूचरित्र अध्याय सत्तेचाळीसावा - गुरुचरित्र मराठी

    गुरूचरित्र अध्याय अठ्ठेचाळीसावा - गुरुचरित्र मराठी

    गुरूचरित्र अध्याय एकोणपन्नासावा - गुरुचरित्र मराठी

    गुरूचरित्र अध्याय पन्नासावा - गुरुचरित्र मराठी

    गुरूचरित्र अध्याय एक्कावन्नावा - गुरुचरित्र मराठी

    गुरूचरित्र अध्याय बावन्नावा - अवतर्णिका - गुरुचरित...

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...