मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    संत नामदेव पाळणा

    अहो त्रिभुवना माझारीं । भूवैकुंठ पंढरी । चंद्रभागा सरोवरीं । विटेवरी नीट उभा ॥१॥
    उभा कैवल्य नायक । द्दष्टी सन्मुख पुंडलीक । ज्याचे ब्रम्हादिक सेवक । इतरां कोण पाड ॥२॥
    सुरंग रंगें चरणतळें । रातलीं रातोत्पळें । जिंकिलीं माणिक निळें । मज पाहतां बाई ॥३॥
    पद अंकुश पताका । ध्वज वज्रांकित रेखा । तेथें लक्ष्मी रतली देखा । सिंधुतनया बाई ॥४॥
    अनुपम्यगे माय अनुपम्य सार । परब्रम्ह वो साकार । मंत्रमय त्रिअक्षर । विठ्ठलनाम बाई ॥५॥
    तें गा प्रत्यक्ष ध्यान । सर्व सुखाचें निधान । द्दष्टीं पाहतांचि मन । माझें परतेना ॥६॥
    न लोगे पातयासी पातें । लक्ष लागलें निरुतें । सुख झालें बा मनातें । तें मी काय सांगों वो माय ॥७॥
    मन इंद्रयें वेधलीं । घर वृत्तिचें रिघालीं । काय स्वानंदा मुकलीं । वेगळेपणें ॥८॥
    पदद्वयाची ठेवणी । इंद्रनीळ गुल्फमणी । गंगा मिरवत चरणीं । वांकी तोडर पायीं ॥९॥
    सरळ अंगोळियावरी । नखें वर्तुळ साजिरीं । चंद्र देखोनि अंबरीं । झाला कळाहीन ॥१०॥
    पोटरीया जानु जंघ । मर्गजमणीचे ते स्तंभ । कैसें वोळलें स्वयंभू । ओघ जैसे कालिंदीचे ॥११॥
    पितांबर माळ गांठीं । रत्नकिळा बरवंटीं । विद्युल्लतेच्या थाटीं । जैशा मेघमंडळीं ॥१२॥
    वीरकंकणें मनगटीं । काडोवांडीं मुद्रिका दाटी । माज सामावे जो मुठीं । वरी कटी कटिसूत्र ॥१३॥
    नाभीं सरोज गहन । ब्रम्हयाचें जन्मस्थान । वरी त्निवळी लक्षण । कैसें शोभे रोमराजीं ॥१४॥
    काय वाणूं तें उदर । सांठवलें चराचर । ब्रम्हगोळ निरंतर । जया रोमरंध्रीं ॥१५॥
    तनु मृदु शाम निर्मळ । प्रभा दिसती सोज्वळ । जेवीं ओळलेंसे जळ । जैसें घनमंडळीं ॥१६॥
    शुद्ध चंदन पातळ । आंगीं चर्चिला निर्मळ । जेवीं इंद्रनीळ किळ । गुल्फ मोतियांचे ॥१७॥
    पदक बाहुभूषणें । नवरत्नांचें खेवणें । कैसें सर्वां झालें पणें । लेणें लेणियासी ॥१८॥
    कौस्तुभ मिरवे कंठीं । माजी रत्नांचिये दाटी । तेथें सुरवरांच्या द्दष्टी । भाळलिया ॥१९॥
    श्रवणीं कुंडलें झळती । जैशा विजुवा तळपती । कंठींमाळ वैजयंती । सह तुळसी दळेसी ॥२०॥
    विशाल नयन द्दष्टी । ठेऊनियां नासापुटीं । दावी योग कसवटी । योगीयांसी गे माये ॥२१॥
    लिंग स्वयंभू शीर स्थळीं । रश्मी मुगुट झळाळी । वेटी मोरपिसातळीं । मृग नाभी तिळक ॥२२॥
    स्मित अधर सुरेख । कैसनी मासूर मुख । तेथें मदन पर्यंक । कोटी कुरवंडया ॥२३॥
    विष्णुदास नामा जिवें । ओंवाळी सर्व भावें । अनुभव अनुभवें । अनुभविजें सदा ॥२४॥

    संत नामदेवांचे पाळणे समाप्त​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...