मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    संत भागुबाई साहित्य

    वारकरी संप्रदाय हा सर्वसमावेशक संप्रदाय असून जात-पात, पंथ-सांप्रदाय, वर्णभेद, लिंगभेद विसरून सर्व जातीपातीतील संत विठ्ठलभक्तीच्या एका धाग्याने बांधले गेले. विठ्ठलभक्ती, वारी या माध्यमातून संतांनी अद्वैतभाव आपल्या वर्तनातून वागण्या-बोलण्यातून मांडला आहे.

    ज्ञानेश्वरादी संतानी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आध्यात्मिक स्तरावर जी सामाजिक समरसतेचे क्रांती घडवून आणली त्यामुळे अठरापगड जातीतल्या संतांना आणि सामान्यजनांना भक्तीची आणि अध्यात्मिक ज्ञानार्जनाची कवाडे खुली झाली.

    संतांच्या मांदियाळीमध्ये विविध जातीतील संतांचा समावेश होतो. अनेक जातीतील संत विठ्ठलभक्तीत गुंतून गेले. उपेक्षित समजल्या जाणार्‍या जातीतील संतांनी आपले विठ्ठलप्रेम आणि दुसऱ्या बाजूला आपल्या वाट्याला आलेल्या उपेक्षित जगणं त्यामुळे समाजाकडून मिळत असलेली वागणूक याचं दुखणं त्यांच्या अभंगातून मांडलं.

    अशाच त्या काळात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या 'महार' समाजातील एक स्त्री संत म्हणून संत भागू महारीण परिचित आहेत. संत तुकाराम यांची कन्या भागीरथी तिचाही उल्लेख भागुबाई असा केला जातो. पण ह्या भागुबाई महारीण वेगळ्या. पंढरपुरातील रस्त्यांची स्वच्छता करणाऱ्या या स्री संत कवियत्रीचे काही मोजकेच अभंग उपलब्ध आहेत. बाकी त्यांच्या चरित्राचे काही संदर्भ मिळत नाहीत. दुर्लक्षित संतांपैकी त्याही एक संत.

    संत भागुबाई यांनी आपल्या मनातील दुःख मोठ्या करूणेने व्यक्त केले आहे. पांडुरंगावरील निष्ठा आणि मनात होणारी तगमग त्यांच्या अभंगातून प्रकट होते.

    त्यांच्या एका अभंगातून त्यांच्या वाट्याला आलेलं उपेक्षिताचं जगणं स्पष्ट होते. त्या अभंगात म्हणतात, रस्त्याची झाडलोट करणारी मी मला इतर भक्तांप्रमाणे देवाचे दर्शन घेता येत नाही. भागुबाई या महार समाजाच्या असल्यामुळे त्यांना देवाच्या गाभाऱ्यात प्रवेश नव्हता. हे दुःख त्यांना सतत सलत होते. मग त्या विठ्ठलालाच विनवणी करतात, आम्ही तुझ्या दर्शनाच्या अपेक्षेने आलो आहोत. देवा आता तूच आम्हाला येऊन भेट. सर्व संत देवळात गोळा झाले आहेत पण मी बाहेर तुझ्या दर्शनासाठी तळमळत आहे. तू आई आहेस आणि मी लेकरू आहे, तू मला भेटायला ये असं त्या म्हणतात. आणि तो विठ्ठल बाहेर आला आणि मला खांद्यावर उचलून घेतले एका क्षणात माझी चिंता हरपली असं भागुबाई अभंगातून म्हणतात. तो अभंग म्हणजे,

    आलो तुझ्या दर्शनासीं । भेट द्यावी बा आम्हांसी ।।
    सर्व संत हो राऊळीं । मी रे एकली तळमळी ।।
    करुणा आईक विठाई । मज बाळा भेटी देई ।।
    देव आले हो बाहेरी । मज नेलें खांद्यावरी ।।
    भागू म्हणे भेट झाली । माझी चिंता ही हरिली ।।

    वारकरी संप्रदायाने भेदाभेद, लिंगभेद विसरून समाजात समता, ममता, बंधुता निर्माण केली. त्याच समतेच्या दृष्टीने संत भागुबाई यांना संतमंडळीत स्थान आहे.
    या संत भागूबाई ज्ञानदेवांची प्रार्थना करताना म्हणतात,
    'कृपेचा सागरा । मायबापा ज्ञानेश्वरा ।।"

    अशा या संत भागुबाई यांचे चरित्र त्यांच्या वाट्याला आलेल्या जगण्याप्रमाणेच दुर्लक्षित आहे.

    राम कृष्ण हरि

    🙏🏻
    🚩
    🚩



    लेखांकन :-
    ह.भ.प. हिंदुरावमहाराज गोळे
    सातारा जिल्हा सत्संगप्रमुख,
    विश्व हिंदू परिषद.​​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...