मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
एकनाथी भागवत अध्याय २७ ओव्या ४०१ ते ४१८
सकळ काळ वृथा जावा । ऐसें आवडे ज्याचे जीवा ।
तेणें सारिपटादि आघवा । खेळ मांडावा अहर्निशीं ॥ ४०१ ॥
सारा वेळ व्यर्थ जावा असे ज्याच्या मनाला आवडत असेल, त्याने रात्रंदिवस सोंगट्यांचे वगैरे डाव मांडावेत १.
मी हृदयस्थ आत्माराम । स्वतःसिद्ध परब्रह्म ।
तो मी व्हावया दुर्गम । अधर्म कर्म जगासी ॥ ४०२ ॥
तो मी व्हावया दुर्गम । अधर्म कर्म जगासी ॥ ४०२ ॥
मी जो हृदयांत राहणारा आत्माराम, स्वतःसिद्ध परब्रह्म, तो मी दुर्गम होण्यासाठीच जगाला अधर्मकर्म लागलें आहे २.
तें निर्दाळावया कर्माकर्म । वर्म आहे गा अतिसुगम ।
अखंड स्मरावें रामनाम । पुरुषोत्तम अच्युत ॥ ४०३ ॥
अखंड स्मरावें रामनाम । पुरुषोत्तम अच्युत ॥ ४०३ ॥
तें कर्माकर्म नष्ट करणेचें वर्म फार सोपे आहे. पुरुषोत्तम, अच्युत, रामराम असें अखंड नामस्मरण करीत राहावे ३.
जेथें हरिनामाचा गजर । तेथ कर्माकर्मांचे संभार ।
जाळूनि नुरवीं भस्मसार । ऐसें नाम पवित्र हरीचें ॥ ४०४ ॥
जाळूनि नुरवीं भस्मसार । ऐसें नाम पवित्र हरीचें ॥ ४०४ ॥
जेथें हरिनामाचा गजर चालतो, तेथे कर्माकर्माच्या राशि साफ जळून जातात. त्यांची चिमटीभर राखसुद्धा राहात नाही. इतकें हरी नाम पवित्र आहे ४.
नाम निर्दळी पाप समस्त । हें सकळशास्त्रसंमत ।
जो विकल्प मानी एथ । तो जाण निश्चित वज्रपापी ॥ ४०५ ॥
जो विकल्प मानी एथ । तो जाण निश्चित वज्रपापी ॥ ४०५ ॥
हरीचे नाम सर्व पातकांचा नाश करते, हे सर्व शास्त्रांना संमत आहे. असे असतांही जो त्यांत संशय घेईल तो खरोखर वज्रपापी समजावा ५.
वज्रपापाचे पर्वत । निर्दळी श्रीमहाभागवत ।
तें जनार्दनकृपा एथ । झालें प्राप्त अनायासें ॥ ४०६ ॥
तें जनार्दनकृपा एथ । झालें प्राप्त अनायासें ॥ ४०६ ॥
अशा वज्रपापांचे पर्वतही श्रीमहाभागवत भस्म करून टाकते. जनार्दनाच्या कृपेनें तें मला अनायासें प्राप्त झाले आहे ६.
ते भागवतींचा पाहतां अर्थ । हरीचें नाम अतिसमर्थ ।
वर्णिलेंसे परमाद्भुत । स्वमुखें अच्युत बोलिला ॥ ४०७ ॥
वर्णिलेंसे परमाद्भुत । स्वमुखें अच्युत बोलिला ॥ ४०७ ॥
ह्या भागवतांतील अर्थ पाहिला असता हरीचें नाम अत्यंत समर्थ आहे, अशाबद्दल पराकाष्ठेचे वर्णन अच्युतानें स्वमुखाने केलेले आहे ७.
एथही जो विकल्प धरी । तो अतिअभाग्य संसारीं ।
महादुःखदोषसागरीं । विकल्पेंकरीं बुडाला ॥ ४०८ ॥
महादुःखदोषसागरीं । विकल्पेंकरीं बुडाला ॥ ४०८ ॥
येथेही जो विकल्प मानील, तो संसारामध्ये अत्यंत अभागी समजला पाहिजे. तो विकल्पामुळे महादोषांच्या दुःखसागरांत बुडाला म्हणून समजावें ८.
संकल्पविकल्पेंकरीं जाण । जनांसी झालें दृढ बंधन ।
त्या भवबंधाचें छेदन । जनार्दन निजनाम ॥ ४०९ ॥
त्या भवबंधाचें छेदन । जनार्दन निजनाम ॥ ४०९ ॥
संकल्पविकल्पामुळेच लोकांना दृढबंधन प्राप्त झाले आहे असे समज. त्या संसारबंधनाचें छेदन करावयाला एक जनार्दनाचें नामच समर्थ आहे ९.
जनार्दनाचें निजनाम । निर्दळी भवभय परम ।
तें नाम स्मरे जो सप्रेम । तो पुरुषोत्तम स्वयें होय ॥ ४१० ॥
तें नाम स्मरे जो सप्रेम । तो पुरुषोत्तम स्वयें होय ॥ ४१० ॥
केवढेही भवभय असले तरी जनार्दनाचें नाम त्याचा नाश करून टाकतें. तें नाम जो अंतर-प्रेमाने स्मरतो, तो स्वत:च पुरुषोत्तम होतो ४१०.
स्वयें होणें ब्रह्म पूर्ण । ये अर्थींचें गोड निरूपण ।
अठ्ठाविसावे अध्यायीं जाण । उद्धवा श्रीकृष्ण सांगेल ॥ ४११ ॥
अठ्ठाविसावे अध्यायीं जाण । उद्धवा श्रीकृष्ण सांगेल ॥ ४११ ॥
स्वत:च पूर्ण ब्रह्म कसे व्हावें, याविषयींचं गोड निरूपण अठ्ठाविसाव्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण उद्धवाला सांगेल ११.
ते कथा जैं श्रवणीं पडे । तैं जीवीं स्वयंभ सुख वाढे ।
मग आंतबाहेर दोंहीकडे । करी वाडेंकोडें समसाम्य ॥ ४१२ ॥
मग आंतबाहेर दोंहीकडे । करी वाडेंकोडें समसाम्य ॥ ४१२ ॥
ती कथा कानी पडली असतां जीवाला निरुपाधिक सुख प्राप्त होईल आणि आंत बाहेर दोहींकडे ते सारखे भरून राहील १२.
जे कथेचें गोडपण । जीव गेल्या न सोडी जाण ।
ऐसें रसाळ निरूपण । उद्धवासी श्रीकृष्ण सांगेल ॥ ४१३ ॥
ऐसें रसाळ निरूपण । उद्धवासी श्रीकृष्ण सांगेल ॥ ४१३ ॥
ज्या कथेची गोडी प्राण गेला तरी सोडवणार नाही, इतके रसाळ निरूपण श्रीकृष्ण उद्धवाला सांगेल १३.
श्रवणें उपजे ब्रह्मभावो । तो हा अठ्ठाविसावा अध्यावो ।
उद्धवासी देवाधिदेवो । निजकृपें पहा हो सांगेल ॥ ४१४ ॥
उद्धवासी देवाधिदेवो । निजकृपें पहा हो सांगेल ॥ ४१४ ॥
ते ऐकताच ब्रह्मभाव उत्पन्न होईल. असा तो अठ्ठाविसावा अध्याय देवाधिदेव निजकृपेनें उद्धवाला सांगणार आहे १४.
अक्षरें भरोनि अक्षररसीं । देव सांगेल उद्धवासी ।
तें निरूपण अठ्ठाविसाव्यासी । ब्रह्मसुखेंसीं लगडेल ॥ ४१५ ॥
तें निरूपण अठ्ठाविसाव्यासी । ब्रह्मसुखेंसीं लगडेल ॥ ४१५ ॥
प्रत्येक अक्षर अक्षररसानेच भरून देव उद्धवाला सांगेल; आणि ते निरूपण अठ्ठाविसाव्यांत ब्रह्मानंदाला जाऊन पोचेल १५.
ब्रह्मसुखाची सांठवण । तो हा अठ्ठाविसावा जाण ।
ते उघडूनियां उणखूण । उद्धवासी श्रीकृष्ण सांगेल ॥ ४१६ ॥
ते उघडूनियां उणखूण । उद्धवासी श्रीकृष्ण सांगेल ॥ ४१६ ॥
हा अठ्ठाविसावा अध्याय म्हणजे ब्रह्मसुखाची सांठवण आहे हे लक्षात ठेव. त्यांतील ऊणखूण उघडून श्रीकृष्ण उद्धवाला सांगेल १६
तें कृष्णउद्धवनिजज्ञान । एका विनवी जनार्दन ।
तुमचे कृपेंकरूनि पूर्ण । श्रोतां अवधान मज द्यावें ॥ ४१७ ॥
तुमचे कृपेंकरूनि पूर्ण । श्रोतां अवधान मज द्यावें ॥ ४१७ ॥
हे कृष्ण-उद्धवाचे आत्मज्ञान आहे. एकनाथ जनार्दनाला शरण होऊन विनंती करतो की, तुमच्या पूर्ण कृपेंकरून श्रोत्यांनी ह्याकडे लक्ष द्यावें १७.
श्रोतां दीधल्या अवधान । ग्रंथीं उल्हासे निरूपण ।
एका जनार्दन शरण । शिरीं श्रीचरण वंदिले ॥ ४१८ ॥
एका जनार्दन शरण । शिरीं श्रीचरण वंदिले ॥ ४१८ ॥
श्रोत्यांनी लक्ष दिले असतां ग्रंथांतील निरूपणाचा उल्हास वाढतो. म्हणून एकनाथ जनार्दनाला शरण जाऊन त्याचे चरण शिरसावंद्य करीत आहे १८.
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे,
एकाकारटीकायां सप्तविंशोऽध्यायः ॥ २७ ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक ५५ ॥ ओंव्या ४१८ ॥
एकाकारटीकायां सप्तविंशोऽध्यायः ॥ २७ ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक ५५ ॥ ओंव्या ४१८ ॥
ह्याप्रमाणे श्रीमद्भागवत-पुराणांतील एकादशस्कंधामधील श्रीकृष्ण-उद्धवसंवादाचा एकनाथकृत सत्ताविसावा अध्याय संपूर्ण झाला ॥ २७॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
महत्वाचे संग्रह
वॉलपेपर

Loading...