मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
एकनाथी भागवत अध्याय २७ ओव्या २०१ ते ३००
जेवीं कां अफाट मेघजळा । धरण बांधोनि घालिजे तळां ।
तेवीं मज अनंताचा एकवळा । अभेदभजनाला आतुडे ॥ २०१ ॥
ज्याप्रमाणे अपरंपार पावसाच्या पाण्याला धरण बांधून तलावांत साठवावे, त्याप्रमाणे अभेद भजनाच्या योगानें मज अनंताशी ऐक्य साधले जातें १.
अडवीं वर्षलें सैरा जळ । तेणें नुपजेचि उत्तम फळ ।
तेंचि तळां भरलिया प्रबळ । तेणें पिकती केवळ राजागरें ॥ २०२ ॥
तेंचि तळां भरलिया प्रबळ । तेणें पिकती केवळ राजागरें ॥ २०२ ॥
अरण्यांत पुष्कळसा पाऊस पडला तरी, त्याने काही उत्तम फळ येणार नाहीं; पण तेच पावसाचे पाणी तळ्यांत साठवून ठेवले तर त्याने रायभोग तांदळाची शेते सुद्धा पिकतील २.
तैसें माझें स्वरूप वाडेंकोडें । अभेदक्तांमाजीं आतुडे ।
तैं ब्रह्मानंदें गोंधळ पडे । शीग चढे भक्तीची ॥ २०३ ॥
तैं ब्रह्मानंदें गोंधळ पडे । शीग चढे भक्तीची ॥ २०३ ॥
त्याप्रमाणे माझे अनंत अपार स्वरूप प्रेमपूर्वक अभेद भावनेच्या भक्तांमध्येच सांपडते. तेव्हां ब्रह्मानंदाला ऊत येऊनच भक्ति शिखराला पोचते ३.
अभेदभक्तांच्या द्वारपाशीं । तीर्थें येती पवित्र व्हावयासी ।
सुरनर लागते पायांसी । मी हृषीकेषी त्यांमाजीं ॥ २०४ ॥
सुरनर लागते पायांसी । मी हृषीकेषी त्यांमाजीं ॥ २०४ ॥
अभेद भावनेच्या भक्ताच्या दाराशी तीही पवित्र होण्यासाठी येतात. देव व मानव त्याच्या पायीं लागतात व मी भगवानही त्याच्यापाशीच असतो ४.
अभेदभक्तांपाशीं देख । सकळ तीर्थें होती निर्दोख ।
बक्तीचें माहेर तें आवश्यक । मजही सुख त्यांचेनी ॥ २०५ ॥
बक्तीचें माहेर तें आवश्यक । मजही सुख त्यांचेनी ॥ २०५ ॥
अभेद भावनेच्या भक्तापाशीं सारी तीर्थे येऊन निर्दोष होतात. ते भक्तीचे माहेर होत. मलाही त्यांच्यामुळेच सुख होतें ५.
अभेद जे क्रियास्थिती । या नांव माझी उत्तम भक्ती ।
ऐसा अतिउल्हासें श्रीपती । उद्धवाप्रती बोलत ॥ २०६ ॥
ऐसा अतिउल्हासें श्रीपती । उद्धवाप्रती बोलत ॥ २०६ ॥
अभेद भक्तीची क्रिया "कर्मासबाह्य मजदेखत" तिचंच नांव 'उत्तम भक्ति' असें मोठ्या उल्हासाने श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाला ६.
अभेदभक्ती वाडेंकोडें । श्रीकृष्ण सांगे उद्धवापुढें ।
कथा राहिली येरिकडे । तेंही धडफुडें स्मरेना ॥ २०७ ॥
कथा राहिली येरिकडे । तेंही धडफुडें स्मरेना ॥ २०७ ॥
श्रीकृष्ण उद्धवापुढे अभेद भक्ति मोठ्या आवडीने सांगत असतां कथाभाग एकीकडेच राहिला, ह्याची त्यांना आठवण राहिली नाहीं ७.
देव विसरला निरूपण । तंव उद्धवासी बाणली खूण ।
तोही विसरला उद्धवपण । कृष्णा कृष्णपण नाठवे ॥ २०८ ॥
तोही विसरला उद्धवपण । कृष्णा कृष्णपण नाठवे ॥ २०८ ॥
देव निरूपण विसरले, पण उद्धवाला भक्तीची खूण बाणली. तोही आपले उद्धवपण विसरला; आणि कृष्णालाही कृष्णपणा आठवेनासा झाला ८.
अभेदभजनाचा हरिख । देव भक्त झाले एक ।
दोघां पडोनि ठेलें ठक । परम सुख पावले ॥ २०९ ॥
दोघां पडोनि ठेलें ठक । परम सुख पावले ॥ २०९ ॥
अभेद भजनाच्या हर्षानें देव आणि भक्त एकच झाले. दोघेही स्तब्ध होऊन बसले व परम सुखी झाले ९.
उद्धव निजबोधें परिपूर्ण । तरी पूजाविधानप्रश्न ।
एथ करावया काय कारण । ऐशी आशंका मन कल्पील ॥ २१० ॥
एथ करावया काय कारण । ऐशी आशंका मन कल्पील ॥ २१० ॥
उद्धव हा आत्मज्ञानाने इतका पुर्ण होता, मग त्याला पूजाविधानाचा प्रश्न करण्याचे कारण काय ? अशी शंका मनांत येईल २१०.
तरी उद्धवाच्या चित्तीं । उगा राहतांचि श्रीपती ।
जाईल निजधामाप्रती । यालागीं प्रश्नोक्ती तो पुसे ॥ २११ ॥
जाईल निजधामाप्रती । यालागीं प्रश्नोक्ती तो पुसे ॥ २११ ॥
तर उद्धवाच्या मनात असे की, आपण जर उगीच बसलो तर तो निजधामास निघून जाईल. म्हणून तो प्रश्न विचारूं लागला ११.
उपासनाकांड गुह्यज्ञान । आगमोक्तपूजाविधान ।
उद्धवमिषें श्रीकृष्ण । वेदार्थ आपण स्वयें बोले ॥ २१२ ॥
उद्धवमिषें श्रीकृष्ण । वेदार्थ आपण स्वयें बोले ॥ २१२ ॥
उपासनाकांडांतील गुप्त ज्ञान, आगमोक्त पूजाविधान, वगैरे वेदाचा अर्थ उद्धवाच्या निमित्ताने श्रीकृष्ण आपणच बोलू लागले १२.
सकळ वेदार्थ शास्त्रविधी । ग्रंथीं श्रीकृष्ण प्रतिपादी ।
जैसी श्रद्धा तैसी सिद्धी । व्हावया त्रिशुद्धी साधकां ॥ २१३ ॥
जैसी श्रद्धा तैसी सिद्धी । व्हावया त्रिशुद्धी साधकां ॥ २१३ ॥
खरोखर साधकांची जशी श्रद्धा असेल तशीच सिद्धि प्राप्त व्हावी म्हणून वेदार्थातील सारा शास्त्रविधि श्रीकृष्ण ह्या ग्रंथामध्ये प्रतिपादन करीत आहेत १३.
असो हे ग्रंथव्युत्पत्ती । ऐकता अद्वैतभक्ती ।
उद्धव निवाला निजचित्तीं । तेणें श्रीपति सुखवला ॥ २१४ ॥
उद्धव निवाला निजचित्तीं । तेणें श्रीपति सुखवला ॥ २१४ ॥
हे ग्रंथाविषयी बोलणे असो. पण अद्वैतभक्ति ऐकता ऐकतां उद्धव मनामध्ये तृप्त झाला; त्यामुळे श्रीकृष्णालाही समाधान वाटले १४.
संतोषें म्हणे श्रीकृष्ण । उद्धवा होईं सावधान ।
पूढील पूजाविधान । तुज मी सांगेन यथोक्त ॥ २१५ ॥
पूढील पूजाविधान । तुज मी सांगेन यथोक्त ॥ २१५ ॥
श्रीकृष्ण आनंदाने म्हणाले, उद्धवा! नीट लक्ष दे. पुढील यथोक्त पूजाविधान तुला मी सांगतों १५.
पूज्य पूजक एकात्मता ध्यान । करोनियां दृढ धारण ।
तेंचि बाह्य पूजेलागीं जाण । करावें आवाहन प्रतिमेमाजीं ॥ २१६ ॥
तेंचि बाह्य पूजेलागीं जाण । करावें आवाहन प्रतिमेमाजीं ॥ २१६ ॥
पूज्य व पूजक ह्यांच्या एकात्मतेचे ध्यान दृढ करून, त्याचेंच बाह्य पूजेकरितां प्रतिमेत आवाहन करावें १६.
प्रतिमेसंमुख आपण । आवाहनमुद्रा दाखवून ।
माझी चित्कळा संपूर्ण । प्रतिमेसी जाण भावावी ॥ २१७ ॥
माझी चित्कळा संपूर्ण । प्रतिमेसी जाण भावावी ॥ २१७ ॥
आपण प्रतिमेच्या समोर बसून आवाहनमुद्रा दाखवून माझी सारी चित्कला त्या प्रतिमेत आली आहे अशी भावना करावी १७.
तेव्हां मूर्तीचें जडपण । निःशेष न देखावें आपण ।
मूर्ति भावावी चैतन्यघन । मुख्य 'आवाहन' या नांव ॥ २१८ ॥
मूर्ति भावावी चैतन्यघन । मुख्य 'आवाहन' या नांव ॥ २१८ ॥
त्या वेळी मूर्तीचा जडपणा आपण यत्किंचितही मनांत आणूं नये; मूर्ति चैतन्यरूप आहे असेंच मानावं. ह्याचंच नांव मुख्य 'आवाहन' १८.
गुरुमुखें मंत्र निर्दोष । तेणें मंत्रें मूर्तींसी न्यास ।
करावे सर्वांगीं सावकाश । शास्त्रविन्यास आगमोक्त ॥ २१९ ॥
करावे सर्वांगीं सावकाश । शास्त्रविन्यास आगमोक्त ॥ २१९ ॥
गुरूच्या मुखाने मिळालेला मंत्र निर्दोष होतो. ह्याकरित त्या मंत्राने मूर्तीच्या सर्वांगावर, आगमशास्त्रोक्त सर्व न्यास सावकाश करावेत १९.
एवं आवाहन संस्थापन । सन्निधि सन्निरोधन ।
संमुखीकरण स्वायतन । या मुद्रा आपण दावाव्या ॥ २२० ॥
संमुखीकरण स्वायतन । या मुद्रा आपण दावाव्या ॥ २२० ॥
अशा प्रकारें आवाहन, संस्थापन, संनिधि सन्निरोधन, संमुखीकरण, स्वायतन ह्या मुद्रा आपण दाखवाव्या २२०
अवगुंठन संकलीकरण । या अष्टौ मुद्रा दावूनि जाण ।
मग होऊनि सावधान । पूजाविधान मांडावें ॥ २२१ ॥
मग होऊनि सावधान । पूजाविधान मांडावें ॥ २२१ ॥
(मागील ओवींतील सहा) तसेंच अवगुंठन संकलीकरण मिळून आठ मुद्रा दाखवून मग नीट लक्ष लावून आरंभ करावा २१.
पाद्योपस्पर्शार्हणादीनुपचारान्प्रकल्पयेत् ।
धर्मादिभिश्च नवभिः कल्पयित्वाऽऽसनं मम ॥ २५ ॥
पद्ममष्टदलं तत्र कर्णिकाकेसरोज्ज्वलम् ।
उभाभ्यां वेदतन्त्राभ्यां मह्यं तूभयसिद्धये ॥ २६ ॥
धर्मादिभिश्च नवभिः कल्पयित्वाऽऽसनं मम ॥ २५ ॥
पद्ममष्टदलं तत्र कर्णिकाकेसरोज्ज्वलम् ।
उभाभ्यां वेदतन्त्राभ्यां मह्यं तूभयसिद्धये ॥ २६ ॥
[ श्लोक २५/२६] माझ्यासाठी धर्म इत्यादी नऊ गुणांनी युक्त आसन तयार करावे त्या आसनावर एक अष्टदळ कमळ तयार करून त्याचा मध्यभाग पिवळा करावा त्यावर मूर्ती ठेवून पाद्य, आचमनीय, अर्घ्य इत्यादी उपचार अर्पण करावेत याप्रमाणे भोग आणि मोक्ष प्राप्त होण्यासाठी वैदिक आणि तांत्रिक मंत्रांनी माझी पूजा करावी. (२५-२६)
स्नानमंडप कल्पूनि जाण । तेथ आणावा देव चिद्घन ।
पाद्य अर्घ्य आचमन । मधुपर्क-विधान करावें ॥ २२२ ॥
पाद्य अर्घ्य आचमन । मधुपर्क-विधान करावें ॥ २२२ ॥
स्नानमंडपाची कल्पना करून तेथें चित्स्वरूप देवाला आणावे, आणि पाद्य, अर्घ्य, आचमन, मधुपर्क, इत्यादि विधान करावें २२.
अभ्यंग अंगमर्दन । पुरुषसूक्तें थथोक्त स्न्नान ।
पीतांबरपरिधान । स्नानमंडपीं जाण देवासी ॥ २२३ ॥
पीतांबरपरिधान । स्नानमंडपीं जाण देवासी ॥ २२३ ॥
अभ्यंगानें अंगमर्दन करून पुरुषसूक्ताने यथोक्तस्नान घालावे आणि स्नानाच्या मंडपातच देवाला पीतांबर नेसवावा २३.
इतर यथोक्त पूजन । करावें सिंहासनीं संपूर्ण ।
तें आसन पीठावरण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ २२४ ॥
तें आसन पीठावरण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ २२४ ॥
इतर यथोक्त पूजन सारे सिंहासनावर करावें. तें आसन व पीठावरण (म्हणजे पीठाला वेष्टून राहणाऱ्या देवता) श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत २४.
सिंहासनीं आवरणक्रम । आधारप्रकृति-कूर्म क्षेम ।
क्षीराब्धि श्वेतद्वीप कल्पद्रुम । मनोरम भावावा ॥ २२५ ॥
क्षीराब्धि श्वेतद्वीप कल्पद्रुम । मनोरम भावावा ॥ २२५ ॥
सिंहासनावरील आवरणक्रम म्हटला म्हणजे आधारशक्ति, मूलप्रकृति, क्षीराब्धि, श्वेतद्वीप व तेथील मनोरम कल्पवृक्ष इत्यादिकांची त्या ठिकाणी भावना करावी २५.
त्या तळीं रत्नमंडप नेटक । त्यामाजीं विचित्र पर्यंक ।
त्या मंचकाचा विवेक । यदुनायक सांगत ॥ २२६ ॥
त्या मंचकाचा विवेक । यदुनायक सांगत ॥ २२६ ॥
त्याच्याखाली सुरेख रत्नखचित मंडप; त्यांत सुवर्णाचा मंचक म्ह. पलंग कल्पावा. त्या पलंगाचा विचार श्रीकृष्ण सांगतात २६.
धर्म ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । हेचि माचवे अतिवर्य ।
अधर्म अज्ञान अनैश्वर्य । अवैराग्येंसीं पाय गातें चारी ॥ २२७ ॥
अधर्म अज्ञान अनैश्वर्य । अवैराग्येंसीं पाय गातें चारी ॥ २२७ ॥
धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे त्या मंचकाचे चार पाय होत. अधर्म, अज्ञान, अनैश्वर्य व अवैराग्य ही त्या मंचकाच्या चौकटीची चार आडवी लाकडे होत २७.
ईश्वरतत्त्व निजसूत । गुणागुणीं वळोनि तेथ ।
मंचक विणिला अचुंबित । योगयुक्त महामुद्रा ॥ २२८ ॥
मंचक विणिला अचुंबित । योगयुक्त महामुद्रा ॥ २२८ ॥
ईश्वर तत्त्व हे सूत, ते त्यांत गुणागुणांनी वळून हा मंचक योगयुक्त महामुद्रेनें मजबूत विणला आहे असें कल्पावें २८.
त्या मंचकावरी शेषपुटी । शोभे अतिशयेंसीं गोमटी ।
सहस्रफणीं मणितेज उठी । छत्राकार पृष्टीं झळकत ॥ २२९ ॥
सहस्रफणीं मणितेज उठी । छत्राकार पृष्टीं झळकत ॥ २२९ ॥
त्या मंचकावर अत्यंत सुंदर व शोभिवंत असें शेषाचे वेटोळे असून पाठीमागे छत्रासारख्या लागलेल्या हजार फणा त्यांतील रत्नांच्या दिव्यतेजानें झळकत असतात २९;
शेषपुटीमाजीं निर्मळ । विकासलें रातोत्पळ ।
सकर्णिक अष्टदळ । शोभे कमळ मनोहर ॥ २३० ॥
सकर्णिक अष्टदळ । शोभे कमळ मनोहर ॥ २३० ॥
शेषाच्या वेटोळ्यामध्ये देठासह निर्मळ लाल कमळ उमललें आहे, त्याला आठ पाकळ्या असून ते मनोहरपणाने शोभते २३०,
सत्शक्ति कमळकंदमूळ । ज्ञाननाळ त्याचें सरळ ।
प्रकृति अष्टधा जे सबळ । तेंचि अष्टदळ कमळाचें ॥ २३१ ॥
प्रकृति अष्टधा जे सबळ । तेंचि अष्टदळ कमळाचें ॥ २३१ ॥
सत्-शक्ति हें त्या कमलकंदाचे मूळ, व ज्ञान हा त्याचा सरळ देंठ, आणि अष्टधा प्रकृति ह्या त्या कमळाच्या आठ पाकळ्या होत ३१.
ऐसें कमळ अतिसुंदर । षड्विकार तेचि केसर ।
वैराग्यकर्णिका सधर । मघमघी थोर सुवासें ॥ २३२ ॥
वैराग्यकर्णिका सधर । मघमघी थोर सुवासें ॥ २३२ ॥
असें तें अत्यंत सुंदर कमळ असून षड्विकार हे त्याचे केसर होय; आणि वैराग्य हा त्यांतील घमघमीत मकरंद होय ३२.
पूर्वादि कमळदळीं जाणा । देवता न्यासाव्या त्या त्या स्थाना ।
विमळा उत्कर्षणी आणि ज्ञाना । क्रियाशक्ती जाणा चौथी पैं ॥ ३३ ॥
विमळा उत्कर्षणी आणि ज्ञाना । क्रियाशक्ती जाणा चौथी पैं ॥ ३३ ॥
पूर्वादि अष्ट दिशांच्या कमळदळांमध्ये त्या त्या देवतांचा न्यास करावा. विमळा, उत्कर्षिणी, ज्ञाना आणि चौथी क्रियाशक्ति ३३.
योगा प्रह्वी सत्या ईशाना । कर्णिका योजिजे मध्यस्थाना ।
कल्पूनि अनुपम रचना । अनुग्रहा जाणा स्थापावी ॥ २३४ ॥
कल्पूनि अनुपम रचना । अनुग्रहा जाणा स्थापावी ॥ २३४ ॥
त्याचप्रमाणे योगा, प्रव्ही , सत्या आणि ईशाना अशा अष्टशक्तींची स्थापना करावी. याप्रमाणे अनुपम कल्पनेने रचलेल्या कमलाच्या मध्यभागी नवव्या अनुग्रहेची स्थापना करावी ३४.
आत्मा अंतरात्मा परमात्मा । हा संमुखभाग देवोत्तमा ।
सत्त्व रज आणि मोह तमा । पुरुषोत्तम पृष्ठिभाग ॥ २३५ ॥
सत्त्व रज आणि मोह तमा । पुरुषोत्तम पृष्ठिभाग ॥ २३५ ॥
आत्मा, अंतरात्मा, आणि परमात्मा हा देवोत्तमाचा पुढचा भाग होय. सत्त्व, रज, मोह, तम हा त्या पुरुषोत्तमाचा पृष्ठभाग होय ३५.
ऐशापरी पीठन्यास । आगमोक्त सावकाश ।
करूनियां हृषीकेश । सिंहासनास आणावा ॥ २३६ ॥
करूनियां हृषीकेश । सिंहासनास आणावा ॥ २३६ ॥
ह्याप्रमाणे सावकाश आगमोक्त पीठन्यास करून देवाधिदेवाला सिंहासनावर आणावें ३६,
छत्र आणि युग्म चामर । नाना वाद्यें जयजयकार ।
दावूनि पीठ मुद्रा सधर । आसनीं श्रीधर बैसवावा ॥ २३७ ॥
दावूनि पीठ मुद्रा सधर । आसनीं श्रीधर बैसवावा ॥ २३७ ॥
छत्र आणि दोन चवऱ्या यांसह नानाप्रकारच्या वाद्यांच्या जयजयकारयुक्त गजरांत पीठ व मुद्रा नीट दाखवून श्रीहरीला आसनावर बसवावें ३७.
मज सर्वगतासी आवाहन । मज अधिष्ठानासी आसन ।
मज निर्विकारासी जाण । दाविती आपण विकारमुद्रा ॥ २३८ ॥
मज निर्विकारासी जाण । दाविती आपण विकारमुद्रा ॥ २३८ ॥
मी सर्वव्यापी असता मला आवाहन; मज सर्वाधिष्टानाला आसन; मला निर्विकाराला विकार-मुद्रा दाखवितात ३८.
मज चिद्रूपालागीं लोचन । निःशब्दा कल्पिती श्रवण ।
मज विश्वमुखासी वदन । निमासुरें जाण भाविती ॥ २३९ ॥
मज विश्वमुखासी वदन । निमासुरें जाण भाविती ॥ २३९ ॥
मज ज्ञानस्वरूपाला डोळे; निःशब्दाला कान व मला विश्वतोमुखाला सुंदर मुख आहे अशी कल्पना करितात ३९.
मी विश्वांघ्री दों पायीं चालत । मज विश्वबाहूसी चारी हात ।
मज सर्वगतातें एथ । स्थान भावित एकदेशी ॥ २४० ॥
मज सर्वगतातें एथ । स्थान भावित एकदेशी ॥ २४० ॥
मी विश्वपाद असतांना दोन पायांनी चालतों; मला विश्वबाहूला चार हात; आणि सर्वगताला एकदेशी स्थान कल्पितात २४०.
मज निरुपचारासी उपचार । मज विदेहासी अळंकार ।
मज सर्वसमाना अरिमित्र । भावना विचित्र भाविती ॥ २४१ ॥
मज सर्वसमाना अरिमित्र । भावना विचित्र भाविती ॥ २४१ ॥
मज निरुपचाराला उपचार; मज विदेहाला अलंकार व सर्वत्र सम असणाराला शत्रु-मित्र; अशा विचित्र कल्पना करतात ४१.
मज अकर्त्या कर्मबंधन । अजासी जन्मनिधन ।
नित्यतृप्तासी भोजन । निर्गुणा सगुण भाविती ॥ २४२ ॥
नित्यतृप्तासी भोजन । निर्गुणा सगुण भाविती ॥ २४२ ॥
मज अकर्त्याला कर्मबंधन; अजन्म्याला जन्म-निधन; नित्यतृप्ताला भोजन; आणि निर्गुणाला सगुण अशी कल्पना करतात ४२.
या अवघियांचा अभिप्रावो । उपासनाकांडनिर्वाहो ।
जैस जैसा भजनभावो । तैसा मी देवो तयांसी ॥ २४३ ॥
जैस जैसा भजनभावो । तैसा मी देवो तयांसी ॥ २४३ ॥
ह्या साऱ्यांचे तात्पर्य हेच की, उपासनाकांडाचा निर्वाह व्हावा. उपासकांचा जसा भाव असतो, तसा मी देव त्यांना होतो ४३.
मी अवाप्त सकळकाम । परी भक्तप्रेमालागीं सकाम ।
जैसा भक्तांचा मनोधर्म । तैसा पुरुषोत्तम मी तयां ॥ २४४ ॥
जैसा भक्तांचा मनोधर्म । तैसा पुरुषोत्तम मी तयां ॥ २४४ ॥
मी पूर्णकाम असतांही भक्ताच्या प्रेमासाठी सकाम होतों; भक्तांचा जसा मनोभाव असतो, त्याप्रमाणेच मी पुरुषोत्तम त्यांना दिसतो ४४.
भक्त जैसा भावी मातें । मी तैसाचि होयें त्यातें ।
तो जें जें अर्पी भावार्थे । तें अर्पे मातें सहजचि ॥ २४५ ॥
तो जें जें अर्पी भावार्थे । तें अर्पे मातें सहजचि ॥ २४५ ॥
भक्त जशी माझी भावना करतो, तसाच मी त्याला होतो. तो जें जें मला भावार्थाने अर्पण करतो, तें तें मला सहजच पोचते ४५.
मी सर्वत्र भरलों असें । तेथ जो जेथ मज उद्देशें ।
भक्त भावार्थें अर्पुं बैसे । तें अर्पे अनायासें सहजें मज ॥ २४६ ॥
भक्त भावार्थें अर्पुं बैसे । तें अर्पे अनायासें सहजें मज ॥ २४६ ॥
मी सर्वत्र भरलेलाच आहे; भक्त मला उद्देशून भक्तीने अर्पण करावयाला जेथे बसेल, तेथे मला तें अनायासें सहजच अर्पण होतें ४६.
मी सर्वत्र देवाधिदेव । तैसा प्राणीयांचा नव्हे भाव ।
यालागीं भक्तांचा जेथ सद्भाव । तेथ मी देव सहजेंचि ॥ २४७ ॥
यालागीं भक्तांचा जेथ सद्भाव । तेथ मी देव सहजेंचि ॥ २४७ ॥
मी देवाधिदेव सर्वत्र आहेच, अशी दरोबस्त प्राण्यांची भावना होत नाहीं; म्हणून भक्तांचा जेथे भाव असतो, तेथे सहजच मी देव प्रगट होतो ४७.
यालागें वडेंकोडें । भक्तभावार्थ मज आवडे ।
भक्तभावाहूनि पुढें । वैकुंठ नावडे क्षीराब्धीही ॥ २४८ ॥
भक्तभावाहूनि पुढें । वैकुंठ नावडे क्षीराब्धीही ॥ २४८ ॥
तात्पर्य भक्ताचा भावार्थ मला फार आवडतो; भक्ताच्या भावार्थापुढे मला वैकुंठ किंवा क्षीराब्धीसुद्धा आवडत नाही ४८.
भक्तभावार्थाचीं भूषणें । अंगीं बाणावया श्रीकृष्णें ।
म्यां निर्गुणेंही सगुण होणें । भावार्थगुणें भक्तांच्या ॥ २४९ ॥
म्यां निर्गुणेंही सगुण होणें । भावार्थगुणें भक्तांच्या ॥ २४९ ॥
भक्तांच्या भावार्थाचे अलंकार घालण्यासाठी मला निर्गुण श्रीकृष्णाला सगुण रूप घ्यावे लागते. हे सर्व भक्तांच्या भावार्थासाठी ४९.
यालागीं मी अजन्मा जन्में । अकर्माही करीं कर्में ।
अनामा मी धरीं नामें । भक्त मनोधर्में तरावया ॥ २५० ॥
अनामा मी धरीं नामें । भक्त मनोधर्में तरावया ॥ २५० ॥
ह्याकरितांच मी अजन्मा असूनही जन्म घेतों; अकर्मा असूनही कर्म करतों; अनामा असूनही भक्ताला त्यांच्या मनोधर्मानुसार तारण्यासाठी नामें धारण करतों २५०.
निर्गुणीं लागल्या मन । मनचि होय चैतन्यघन ।
सगुणीं ठसावल्या मन । साधक श्रीकृष्ण स्वयें होती ॥ २५१ ॥
सगुणीं ठसावल्या मन । साधक श्रीकृष्ण स्वयें होती ॥ २५१ ॥
निर्गुणाच्या ठिकाणी मन लागले असतां तें चैतन्यरूप होऊन जाते; आणि सगुण स्वरूपांतच मन गढून गेले असता साधक स्वत:च श्रीकृष्णरूप होतात ५१.
निर्गुणाचा बोध अटक । यालागीं उपासनविवेक ।
सगुणमूर्ति भावूनि देख । तरले साधक अनायासें ॥ २५२ ॥
सगुणमूर्ति भावूनि देख । तरले साधक अनायासें ॥ २५२ ॥
निर्गुणाचें ज्ञान होणे फार कठीण आहे, म्हणून ही उपासनेची योजना आहे. सगुण मूर्तीची भावना करून साधक अनायासें तरून जातात ५२.
हे आगमोक्त उपासनविधी । येणें भोगमोक्ष उभयसिद्धी ।
साधक पावती त्रिशुद्धी । मी कृपानिधि संतुष्टें ॥ २५३ ॥
साधक पावती त्रिशुद्धी । मी कृपानिधि संतुष्टें ॥ २५३ ॥
हे उपासनाविधीचे आगमोक्त विधान सांगितले. यायोगें साधकांना भोग व मोक्ष दोन्हीही साध्य होतात व मी कृपानिधि परमात्मा संतुष्ट होतों ५३.
तेंचि उपासनाविधिविधान । मागां सांगतां पूजन ।
देव सिंहासनीं बैसल्या पूर्ण । पुढें आवरणपूजा ऐक ॥ २५४ ॥
देव सिंहासनीं बैसल्या पूर्ण । पुढें आवरणपूजा ऐक ॥ २५४ ॥
मागे पूजाविधान सांगतांना पूजेसाठी देव सिंहासनावर आणून बसवावा असे सांगितले. त्यानंतर आवरणपूजा कशी करावी ते सांगतों ऐक ५४.
सुदर्शनं पाञ्चजन्यं गदासीषुधनुर्हलान् ।
मुसलं कौस्तुभं मालां श्रीवत्सं चानुपूजयेत् ॥ २७ ॥
मुसलं कौस्तुभं मालां श्रीवत्सं चानुपूजयेत् ॥ २७ ॥
[श्लोक २७] सुदर्शन चक्र, पांचजन्य शंख, कौमोदकी गदा, खड्ग, बाण, धनुष्य, नांगर, मुसळ या आठ आयुधांची आठ दिशांना पूजा करावी व कौस्तुभमणी, वैजयंतीमाला आणि श्रीवत्सचिन्हाची वक्षःस्थळावर पूजा करावी. (२७)
अण्वी जीवकळेसी 'देहावरण' । सिंहासनीं 'शक्त्यावरण' ।
सुदर्शनादि आयुधावरण' । आपुलीं आपण हरि सांगे ॥ २५५ ॥
सुदर्शनादि आयुधावरण' । आपुलीं आपण हरि सांगे ॥ २५५ ॥
अण्वी-जीवकलेला देहावरण, सिंहासनावर शक्तीचे आवरण, आणि सुदर्शनादि आयुधावरणे श्रीकृष्ण आपली आपणच सांगत आहेत ५५.
सतेज धार सुदर्शन । शंख शोभे पांचजन्य ।
नंदक तो खड्ग जाण । गदा गहन कौमोदकी ॥ २५६ ॥
नंदक तो खड्ग जाण । गदा गहन कौमोदकी ॥ २५६ ॥
लखलखीत तीक्ष्ण धारेचे 'सुदर्शन'; शोभिवंत 'पांचजन्य' शंख ; 'नंदक' नावाचे खङग ; आणि 'कौमोदकी' नावाची प्रचंड गदा ५६,
शार्ङ्ग-धनुष्य अतिसबळ । सुवर्णपुंखें बाण सरळ ।
हल आणि मुसळ । आयुधें प्रबळ पूजावीं ॥ २५७ ॥
हल आणि मुसळ । आयुधें प्रबळ पूजावीं ॥ २५७ ॥
अत्यंत बळकट असें ' शान्ग ' नांवाचे धनुष्य; सुवर्णमय बुंधाचे सरळ बाण; 'नांगर' आणि 'मुसळ'; ह्या प्रबळ आयुधांचीही पूजा करावी ५७.
या आठवी भुजा सायुधा सरळा । कंठी कौस्तुभ वनमाळा ।
कांसे कशिला पिंवळा । घनसांवळा शोभत ॥ २५८ ॥
कांसे कशिला पिंवळा । घनसांवळा शोभत ॥ २५८ ॥
सशस्त्र सरळ आठ हात ; गळ्यामध्ये कौस्तुभमणि आणि वनमाला ; कमरेखाली नेसलेला पिवळा पीतांबर; यांनी मेघासारखी श्यामवर्ण सुंदर मूर्ति कल्पावी ५८.
ब्रह्मण्यदेव रमानाथ । ब्राह्मणाचा चरणघात ।
हृदयीं अलंकार मिरवत । शोभा अद्भुत तेणें शोभे ॥ २५९ ॥
हृदयीं अलंकार मिरवत । शोभा अद्भुत तेणें शोभे ॥ २५९ ॥
साक्षात् लक्ष्मीचा पति, पण ब्राह्मणाने मारलेली लाथ, अलंकार म्हणून हृदयावर मिरविणारा ब्राह्मणभक्त देव त्या श्रीवत्सचिन्हाने विलक्षणच शोभा पावतो. (त्या श्रीवत्साची पूजा करावी) ५९.
चिद्रत्नांच्या अळंकारीं । गुण काढोनियां बाहेरी ।
वोविली वैजयंती कुसरी । ते हृदयावरी रुळत ॥ २६० ॥
वोविली वैजयंती कुसरी । ते हृदयावरी रुळत ॥ २६० ॥
चिद्रत्नाच्या अलंकारामधील गुण बाहेर काढून मोठ्या कुशलतेने ओवलेली वैजयंतीमाळाही हृदयावर रुळत आहे २६०.
यापरी साळंकार सायुध । शंखचक्रपद्मेसीं अगाध ।
ऐसा शोभला स्वयंबोध । नारदादि संनिध तिष्ठती सदा ॥ २६१ ॥
ऐसा शोभला स्वयंबोध । नारदादि संनिध तिष्ठती सदा ॥ २६१ ॥
ह्याप्रमाणे सालंकार आणि सायुध; शंख, चक्र, पद्मादिकांसहवर्तमान अद्भुत दिसणारा असा स्वयंबोध (स्वयंप्रकाश) भगवान् : ज्याच्याजवळ नारदादिक सदोदित उभे असतात ६१.
यापरी साळंकार सायुध । पूज्य पूजोनियां गोविंद ।
मग पूजावे पार्षद । ऐक विशद सांगेन ॥ २६२ ॥
मग पूजावे पार्षद । ऐक विशद सांगेन ॥ २६२ ॥
ह्याप्रमाणे अलंकारांसहवर्तमान व आयुधांसहवर्तमान पूज्य जो श्रीहरि त्याची पूजा करून मग त्याच्या परिवाराची पूजा करावी. ते पार्षदही तुला विशद करून सांगतों, ऐक ६२.
नन्दं सुनन्दं गरुडं प्रचण्डं चण्डमेव च ।
महाबलं बलं चैव कुमुदं कुमुदेक्षणम् ॥ २८ ॥
दुर्गां विनायकं व्यासं विष्वक्सेनं गुरून् सुरान् ।
स्वे स्वे स्थाने त्वभिमुखान् पूजयेत्प्रोक्षणादिभिः ॥ २९ ॥
महाबलं बलं चैव कुमुदं कुमुदेक्षणम् ॥ २८ ॥
दुर्गां विनायकं व्यासं विष्वक्सेनं गुरून् सुरान् ।
स्वे स्वे स्थाने त्वभिमुखान् पूजयेत्प्रोक्षणादिभिः ॥ २९ ॥
[श्लोक २८-२९] ननंद, सुनंद, प्रचंड, चंड, महाबल, बल, कुमुद आणि कुमदेक्षण या आठ पार्षदांची आठ दिशांना, गरूडाची समोर, दुर्गा, विनायक, व्यास आणि विष्वक्सेन यांची चार कोपर्यात स्थापना करून पूजा करावी डावीकडे गुरूंची, पूर्वादी दिशांमध्ये क्रमाने इंद्र इत्यादी आठ लोकपालांची आपल्याकडे तोंड करून स्थापना करावी व प्रोक्षण, अर्घ्य इत्यादी अर्पण करून पूजा करावी. (२८-२९)
नंद सुनंद देवापाशीं । गरुड सदा तिष्ठे दृष्टीसी ।
चंड प्रचंड दोनी बाहींसीं । अहर्निशीं तिष्ठती ॥ २६३ ॥
चंड प्रचंड दोनी बाहींसीं । अहर्निशीं तिष्ठती ॥ २६३ ॥
नंद आणि सुनंद हे नेहमी देवापाशी असतात. गरुड तर नेहमी डोळ्यांसमोर उभाच असतो. चंड व प्रचंड हे दोहों बाजूला दोघे रात्रंदिवस उभे असतात ६३.
बळ आणि महाबळ । सुमुख संज्ञें अवधानशीळ ।
कुमुद कुमुदाक्ष केवळ । पाठीसी प्रबळ बळें उभे ॥ २६४ ॥
कुमुद कुमुदाक्ष केवळ । पाठीसी प्रबळ बळें उभे ॥ २६४ ॥
बळ आणि महाबळ हे नेत्रसंकेतानेच आज्ञा झेलण्यास तत्पर असतात; आणि कुमुद व कुमुदाक्ष हे महासामर्थ्यवान् दोघे पाठीशी उभे असतात ६४.
गरुड दृष्टीं तिष्ठे आपण । येर नंदादि जे अष्टौ जन ।
ते अष्टौ दिशांप्रति जाण । पार्षदावरण हरिनिकटीं ॥ २६५ ॥
ते अष्टौ दिशांप्रति जाण । पार्षदावरण हरिनिकटीं ॥ २६५ ॥
गरुड हा डोळ्यांसमोरच उभा असतो; आणि बाकीचे नंदादिक जे आठ असामी ते आठ दिशांकडे असतात. ह्याप्रमाणे श्रीहरीच्या संनिध असणारें हें पार्षदावरण होय ६५.
दुर्गा विनायक जाण । व्यास आणि विष्वक्सेन ।
चहूं कोनीं चारी स्थापून । करावें पूजन देवाभिमुख ॥ २६६ ॥
चहूं कोनीं चारी स्थापून । करावें पूजन देवाभिमुख ॥ २६६ ॥
ह्याशिवाय दुर्गा, विनायक, व्यास आणि विष्वक्सेन चार कोपऱ्याला चौघे स्थापन करून देवाच्यासमोरच त्यांचेही पूजन करावें ६६.
मूळमूर्तीसी अभिन्नाकारु । गुरु आणि परमगुरु ।
परमेष्ठिगुरूसी एकाकारु । पूजाप्रकारु करावा ॥ २६७ ॥
परमेष्ठिगुरूसी एकाकारु । पूजाप्रकारु करावा ॥ २६७ ॥
मूळ मूर्तीशी एकरूप असणारे गुरु व परमगुरु यांचे परमेष्ठी गुरुशी ऐक्य धरून पूजन करावें ६७.
इंद्रादि अष्टौ लोकपाळ । आह्वानूनियां सकळ ।
स्थापूनि अष्टौ दिशा केवळ । तेही तत्काळ पूजावे ॥ २६८ ॥
स्थापूनि अष्टौ दिशा केवळ । तेही तत्काळ पूजावे ॥ २६८ ॥
तसेच इंद्रादिक अष्ट लोकपाळ या सर्वाचे आवाहन करून त्यांचीही आठ दिशांना स्थापना करावी व त्यांचेही त्या वेळी पूजन करावें ६८.
गुरु-दुर्गादिक लोकपाळ । पूजावे सांगोपांग सकळ ।
प्रोक्षणपाद्यादि अविकळ । पूजा निश्चळ करावी ॥ २६९ ॥
प्रोक्षणपाद्यादि अविकळ । पूजा निश्चळ करावी ॥ २६९ ॥
गुरु-दुर्गादिक व अष्ट लोकपाळांची, प्रोक्षण-पाद्य इत्यादि उपचारांनी निश्चळ मनाने यथासांग पूजा करावी ६९.
तेचि पूजेचे पूजोपचार । कोण कोण पैं प्रकार ।
साही श्लोकीं शार्ङ्गधर । संक्षोपाकार सांगत ॥ २७० ॥
साही श्लोकीं शार्ङ्गधर । संक्षोपाकार सांगत ॥ २७० ॥
त्या पूजेला उपचार कोणते व प्रकार किती ते पुढील सहा श्लोकांत श्रीकृष्ण संक्षेपाने सांगतात २७०.
चन्दनोशीरकर्पूरकुङ्कुमागुरुवासितैः ।
सलिलैः स्नापयेन्मन्त्रैर्नित्यदा विभवे सति ॥ ३० ॥
स्वर्णघर्मानुवाकेन महापुरुषविद्यया ।
पौरुषेणापि सूक्तेन सामभीरजनादिभिः ॥ ३१ ॥
सलिलैः स्नापयेन्मन्त्रैर्नित्यदा विभवे सति ॥ ३० ॥
स्वर्णघर्मानुवाकेन महापुरुषविद्यया ।
पौरुषेणापि सूक्तेन सामभीरजनादिभिः ॥ ३१ ॥
[श्लोक ३०-३१] ऐपत असेल तर दररोज चंदन, वाळा, कापूर, केशर आणि अगुरू इत्यादी सुगंधित वस्तूंनी सुवासित केलेल्या पाण्याने मला स्नान घालावे आणि त्यावेळी स्वर्णघर्मानुवाक, महापुरूषविद्या, पुरूषसूक्त आणि राजनादी साममंत्रांनी अभिषेक करावा. (३०-३१)
एळा वाळा कर्पूर । चंदन कुंकुम केशर ।
त्यांमाजीं मेळवूनि अगर । धूपिलें नीर स्न्नपनासी ॥ २७१ ॥
त्यांमाजीं मेळवूनि अगर । धूपिलें नीर स्न्नपनासी ॥ २७१ ॥
वेलची, वाळा, कापूर, चंदन, कुंकू, केशर, यांत कृष्णागर मिळवून त्याने सुवासिक केलेले पाणी स्नानाला घ्यावे ७१.
सुवासित सपरिकर । गंगाजळ अतिपवित्र ।
शंखमुद्रापुरस्कार । शंखीं तें नीर भरावें ॥ २७२ ॥
शंखमुद्रापुरस्कार । शंखीं तें नीर भरावें ॥ २७२ ॥
सुवासिक केलेलें अत्यंत पवित्र गंगाजळ शंखामध्ये शंखमुद्रा दाखवून भरावे ७२.
ऐसें जळ घेऊनि शुद्ध । आपस्तंबशाखेचें प्रसिद्ध ।
'सुवर्णधर्मनुवाक' पद । तेणें अभिषेक विशद मज करावा ॥ २७३ ॥
'सुवर्णधर्मनुवाक' पद । तेणें अभिषेक विशद मज करावा ॥ २७३ ॥
असें शुद्ध जळ घेऊन आपस्तंब शाखेतील 'सुवर्णधर्म.' हा प्रसिद्ध अनुवाक म्हणून त्याने नीट अभिषेक करावा ७३.
अथवा केवळ 'पुरुषसूक्त' । 'रुद्राभिषेक' 'विष्णुसूक्त' ।
इंहीं मंत्रीं मंत्रोक्त । देवासीं यथोक्त स्नान द्यावें ॥ २७४ ॥
इंहीं मंत्रीं मंत्रोक्त । देवासीं यथोक्त स्नान द्यावें ॥ २७४ ॥
अथवा नुसतें पुरुषसूक्त, रुद्राभिषेक, किंवा विष्णुसूक्त या मंत्रांनी देवाला स्नान घालावें ७४.
कां सामवेदींचें गायन । त्यामाजीं सामनीराजन ।
तेणेंहीकरूनियां जाण । देवासी स्नान करावें ॥ २७५ ॥
तेणेंहीकरूनियां जाण । देवासी स्नान करावें ॥ २७५ ॥
किंवा सामवेदांतील गायन गाउन अर्थात त्यांतील राजनादि सामें गाऊन तेणेंकरून देवाला स्नान घालावें ७५.
असल्या वैभवसंपन्न । नित्य द्यावें हें महास्नान ।
नातरी पर्वविशेषें जाण । करावें आपण जयंत्यादिकीं ॥ २७६ ॥
नातरी पर्वविशेषें जाण । करावें आपण जयंत्यादिकीं ॥ २७६ ॥
द्रव्यानुकूलता असल्यास अशा थाटाने रोज महाभिषेक करावा. नाही तर विशेष पर्वाच्या दिवशी किंवा जयंतीउत्सवादिकांचे वेळी असें स्नान घालीत असावें ७६.
आगमोक्त सुलक्षण । 'महापुरुषविद्या' पूर्ण ।
तेणेंही करूनि आपण । देवासी स्नान करावें ॥ २७७ ॥
तेणेंही करूनि आपण । देवासी स्नान करावें ॥ २७७ ॥
आगमशास्त्रांत सांगितल्याप्रमाणे सुलक्षण अशी महापुरुषविद्या (जितं ते पुण्डरीकाक्ष.) इत्यादिकीकरूनही देवाला स्नान घालावें ७७.
देवासी पूर्ण झालिया स्नान । करावें मंगळनीरांजन ।
मग वस्त्रें अलंकार भूषण । देवासी आपण अर्पावीं ॥ २७८ ॥
मग वस्त्रें अलंकार भूषण । देवासी आपण अर्पावीं ॥ २७८ ॥
देवांचे स्नान संपूर्ण झाले म्हणजे मंगलारती करावी. आणि मग देवाला वस्त्रें , भूषणे, इत्यादींनी अलंकृत करावें (शृंगारावे) ७८.
वस्त्रोपवीताभरणपत्रस्रग्गन्धलेपनैः ।
अलङ्कुर्वीत सप्रेम मद्भक्तो मां यथोचितम् ॥ ३२ ॥
अलङ्कुर्वीत सप्रेम मद्भक्तो मां यथोचितम् ॥ ३२ ॥
[श्लोक ३२] माझ्या भक्ताने वस्त्र, यज्ञोपवीत, अलंकार घालावेत केशराने वेलबुट्टी काढावी फुलांचा हार, चंदन इत्यादी प्रेमपूर्वक मला वाहून सुशोभित करावे. (३२)
देवो स्वरूपें घनसांवळा । कांसे कसावा सोनसळा ।
हेमसूत्र अर्पूनि गळां । रत्नमेखळा बाणावी ॥ २७९ ॥
हेमसूत्र अर्पूनि गळां । रत्नमेखळा बाणावी ॥ २७९ ॥
देव हा वर्णाने मेघासारखा श्याम म्ह. सांवळा आहे. त्याच्या कमरेला जरी-पीतांबर नेसवावा, गळ्यात सुवर्णयज्ञोपवीत घालून कंबरेत रत्नजडित कडदोरा घालावा. ७९.
वांकीअंदुवांचा गजर । चरणीं नूपुरांचा झणत्कार ।
मुकुटकुंडले मनोहर । हृदयीं गंभीर महापदक ॥ २८० ॥
मुकुटकुंडले मनोहर । हृदयीं गंभीर महापदक ॥ २८० ॥
वांकी आणि तोरड्या ह्यांचा गजर; पायांत धुंगरूंचा शणत्कार; मस्तकावर मनोरम मुगुट व कानांत कुंडलें; आणि हृदयावर सुंदर महापदक २८०.
जडित मोतिलग पत्रवेली । अतिशोभित दिसे निढळीं ।
तिलक पिंवळा तयातळी । कंठी झळाळी कौस्तुभ ॥ २८१ ॥
तिलक पिंवळा तयातळी । कंठी झळाळी कौस्तुभ ॥ २८१ ॥
कपाळावर (मुकुटाच्या खाली) रत्नजडित मोत्यांची वेल, त्याच्याखाली लावलेला पिवळा गंधाचा टिळा; आणि गळ्यांत झळकणारा कौस्तुभमणि ८१.
बाहीं बाहुवटे वीरकंकणें । करमुद्रिका रत्नखेवणें ।
पीतांबर झळके कोणें मानें । रविबिंब तेणें लाजविलें ॥ २८२ ॥
पीतांबर झळके कोणें मानें । रविबिंब तेणें लाजविलें ॥ २८२ ॥
भुजांवर बाहुटे व वीरकंकणे ; बोटांत रत्नजडित आंगठ्या; आणि पीतांबराची झांक तर अशी की, त्या तेजापुढे सूर्यतेजही फिके पडेल ८२.
सांवळें अंगीं गोमटी । शुभ्र चंदनाची शोभे उटी ।
सुमनमाळा वीरगुंठीं । होत घरटीं मधुकरां ॥ २८३ ॥
सुमनमाळा वीरगुंठीं । होत घरटीं मधुकरां ॥ २८३ ॥
देवाच्या सावळ्या अंगावर शुभ्र चंदनाची लावलेली उटी शोभते आहे; मस्तकावरील केसांच्या झुपक्यावर गुंडाळलेल्या पुष्पांच्या माळा, ज्यांवर भ्रमर घरटी करूं पाहात आहेत ८३.
वैजयंती वनमाळा । आपाद रुळे गळां ।
घवघवीत दिसे डोळां । घनसांवळा शोभत ॥ २८४ ॥
घवघवीत दिसे डोळां । घनसांवळा शोभत ॥ २८४ ॥
वैजयंती व वनमाळा पायांपर्यंत लोंबत आहेत व नेत्रांना त्या कशा घवघवीत दिसताहेत. अशा रीतीने तो मेघश्याम देव शोभत आहे ८४.
एवं वस्त्रालंकारभूषणीं । स्वयं पूजावा शार्ङ्गपाणी ।
प्प्जेहूनियां मनीं । श्रद्धा कोटिगुणीं असावी ॥ २८५ ॥
प्प्जेहूनियां मनीं । श्रद्धा कोटिगुणीं असावी ॥ २८५ ॥
याप्रमाणे वस्त्रालंकारभूषणांनी श्रीहरीची पूजा करावी. पण पूजेपेक्षाही कोट्यवधि पट अधिक श्रद्धा मनात असावी ८५,
भक्त असो अतिसंपन्न । अथवा हो कां अतिनिर्धन ।
जेथ शुद्ध श्रद्धा संपूर्ण । तेथ नारायण संतुष्टे ॥ २८६ ॥
जेथ शुद्ध श्रद्धा संपूर्ण । तेथ नारायण संतुष्टे ॥ २८६ ॥
भक्त अतिशय श्रीमान् असो, अतिशय दरिद्री असो; जेथे शुद्ध आणि परिपूर्ण श्रद्धा असते, तेथेंच नारायण संतुष्ट होतो ८६.
सकळ पूजेचें कारण । मुख्य श्रद्धाचि गा प्रमाण ।
अत्यंत श्रद्धे जो संपन्न । तो देवाचा पूर्ण पढियंता ॥ २८७ ॥
अत्यंत श्रद्धे जो संपन्न । तो देवाचा पूर्ण पढियंता ॥ २८७ ॥
सर्व पूजेमध्ये श्रद्धा हीच मुख्य प्रमाण आहे. अत्यंत श्रद्धायुक्त असतो तोच देवाचा अत्यंत आवडता होतो ८७.
पाद्यमाचमनीयं च गन्धं सुमनसोऽक्षतान् ।
धूपदीपोपहार्याणि दद्यान्मे श्रद्धयार्चकः ॥ ३३ ॥
धूपदीपोपहार्याणि दद्यान्मे श्रद्धयार्चकः ॥ ३३ ॥
[श्लोक ३३] उपासकाने श्रद्धापूर्वक मला पाद्य, आचमन, चंदन, फुले, अक्षता, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी वस्तू अर्पण कराव्यात. (३३)
एवं मूर्ति शृंगारिल्या पूर्ण । द्यावें पाद्य अर्घ्य आचमन ।
देऊनि मथुपर्कविधान । करावें पूजन श्रद्धयुक्त ॥ २८८ ॥
देऊनि मथुपर्कविधान । करावें पूजन श्रद्धयुक्त ॥ २८८ ॥
अशा प्रकारें मूर्ति पूर्णपणे श्रृंगारली म्हणजे पाद्य, अर्घ्य व आचमन यावे आणि मधुपर्कविधान देऊन श्रद्धायुक्त पूजा करावी ८८.
गंधाक्षता शुद्ध सुमन । धूप दशांग दीपदान ।
दीपावली नीराजन । श्रद्धा मदर्चन साधकां ॥ २८९ ॥
दीपावली नीराजन । श्रद्धा मदर्चन साधकां ॥ २८९ ॥
गंध, अक्षता, चांगली चांगली फुलें, दशांग धूप, दीपदान, नीरांजन, इत्यादि साहित्याने साधकांनी पूर्ण श्रद्धेने माझी पूजा करावी ८९.
गुडपायससर्पींषि शष्कुल्यापूपमोदकान् ।
संयावदधिसूपांश्च नैवेद्यं सति कल्पयेत् ॥ ३४ ॥
संयावदधिसूपांश्च नैवेद्यं सति कल्पयेत् ॥ ३४ ॥
[श्लोक ३४] शक्य असेल तर गूळ, खीर, तूप, करंज्या, अनरसे, मोदक, हलवा, दही, वरण इत्यादी विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. (३४)
झाल्या घूप दीप नीरांजन । देवासी वोगरावें भोजन ।
नानापरीचें पक्वान्न । अन्न सदन्न रसयुक्त ॥ २९० ॥
नानापरीचें पक्वान्न । अन्न सदन्न रसयुक्त ॥ २९० ॥
धूप, दीप, नीरांजन वगैरे दाखवून झाले म्हणजे देवास भोजन अर्पण करावे. त्यात नाना प्रकारची पक्वान्ने व षड्रसयुक्त अन्न असावे २९०.
मांडा साकरमांडा गुळवरी । शष्कुल्या अमृतफळें क्षीरधारी ।
दुधामाजीं आळिली क्षीरी । वाढिली परी वळिवट ॥ २९१ ॥
दुधामाजीं आळिली क्षीरी । वाढिली परी वळिवट ॥ २९१ ॥
मांडे, साखरमांडे, गुळवरी, करंज्या, अमृतफळे, बासुंदी, दुधांत बोटवे घालून आटीव दुधाची क्षीर ९१.
मधुवडा कोरवडा । लाडू तिळवयांचा जोडा ।
रुची आला अंबवडा । ठायापुढां वाढिंनला ॥ २९२ ॥
रुची आला अंबवडा । ठायापुढां वाढिंनला ॥ २९२ ॥
घारगे, कोरवडे, लाडू, तिळांचे लाडू, तसेंच अंबवडे वगैरे पदार्थ पुढे वाढावेत ९२.
पत्रशाकांची प्रभावळी । भात अरुवार जिरेसाळी ।
सूप सोलींव मुगदाळी । गोघृत परिमळीं सद्यस्तप्त ॥ २९३ ॥
सूप सोलींव मुगदाळी । गोघृत परिमळीं सद्यस्तप्त ॥ २९३ ॥
शाकभाज्या दुसऱ्या ओळीला; मध्यंतरी जिरेसाळी मऊ भात, त्यावर सोलीव मुगांच्या डाळीचे पिवळें धमक वरण व घमघमित सुवासाचे गाईचे लोणकढत तूप ९३ ;
सांजा सडींव गुळयुक्त । एळा मिरें घालूनि आंत ।
पाक केला घ्रुतमिश्रित । सेवितां मुखांत अरुवार ॥ २९४ ॥
पाक केला घ्रुतमिश्रित । सेवितां मुखांत अरुवार ॥ २९४ ॥
गूळ घालून उत्तम सडून केलेला सांजा, त्यांत वेलची मिरी घालून व तुपांत परतून मऊ केलेला, तोंडांत घालतांच अरुवार लागणारा असा ९४ ;
कथिका तक्राची गोमटी । आम्ररसें भरली वाटी ।
शिखरणी केळांची वाडिली ताटीं । देखोनि लाळ घोंटी अमरेंद्र ॥ २९५ ॥
शिखरणी केळांची वाडिली ताटीं । देखोनि लाळ घोंटी अमरेंद्र ॥ २९५ ॥
त्याचप्रमाणे ताकाची उत्तम कढी; आंब्याच्या रसाने भरलेली वाटी आणि ताटांत केळ्याची वाढलेली शिखरण, जी पाहून इंद्रानेसुद्धा लाळ घोटावी ९५.
दधि दुग्ध साय साकर । नैवेद्या वाढिले परिकर ।
देव न पाहे उपचार । श्रद्धा श्रीधर तृप्त होय ॥ २९६ ॥
देव न पाहे उपचार । श्रद्धा श्रीधर तृप्त होय ॥ २९६ ॥
तसेंच दही, दूध, साय, साखर, इत्यादि पदार्थही नैवेद्याला वाढावे. परंतु हे लक्षात ठेवावें की, देव काही उपचारांकडे लक्ष देत नाही; तो श्रद्धेनेच तृप्त होतो ९६.
सामर्थ्य असलें करावयासी । तरी हे परवडी प्रतिदिवशीं ।
नैवेद्य अर्पावे देवासी । ना तरी पर्वविशेषीं अर्पावे ॥ २९७ ॥
नैवेद्य अर्पावे देवासी । ना तरी पर्वविशेषीं अर्पावे ॥ २९७ ॥
करावयाला सामर्थ्य असेल तर इतके प्रकार रोज करून देवाला नैवेद्य अर्पण करावा. नाही तर विशेष पर्वणीच्या दिवशी अर्पण करावेत ९७.
उपास्यमूर्ति जे साचार । ते जयंतीस सविस्तर ।
पर्वविशेषीं उपचार । पूजा अपार हरि सांगे ॥ २९८ ॥
पर्वविशेषीं उपचार । पूजा अपार हरि सांगे ॥ २९८ ॥
खरोखरच आपली जी उपास्य मूर्ति असेल, तिच्या जयंतीच्या दिवशी व विशेष पर्व असेल त्या दिवशी अर्पण करणेचे पूजोपचार श्रीहरि सांगत आहेत ९८.
अभ्यङ्गोन्मर्दनादर्श दन्तधावाभिषेचनम् ।
अनाद्यगीतनृत्यादि पर्वणि स्युरुतान्वहम् ॥ ३५ ॥
अनाद्यगीतनृत्यादि पर्वणि स्युरुतान्वहम् ॥ ३५ ॥
[श्लोक ३५] भगवंतांच्या मूर्तीचे दात घासावेत, तेल व उटणे लावून अभ्यंग स्नान घालावे अंग चोळावे आरसा दाखवावा, नैवेद्या दाखवावा आणि सामर्थ्य असेल तर दररोज किंवा उत्सवाच्या वेळी नृत्य, गीते इत्यादी सादर करावीत. (३५)
पर्वे बोलिलीं आगमोक्तीं । अथवा वार्षिक पर्वे येती ।
कां निजमूर्तीची जयंती । ते पूजा श्रीपति स्वयें सांगे ॥ २९९ ॥
कां निजमूर्तीची जयंती । ते पूजा श्रीपति स्वयें सांगे ॥ २९९ ॥
आगमशास्त्रांत सांगितलेली पर्वे किंवा इतर वार्षिक पर्वे येतात तीं, अथवा आपल्या उपास्य मूर्तीची जयंती येते त्या दिवशींची पूजा श्रीकृष्ण स्वतः सांगतात ९९,
दंतधावन उद्वर्त्तन । मूर्तिसी द्यावें अभ्यंजन ।
पंचामृते करूनि स्नपन । विचित्राभरण पूजावी ॥ ३०० ॥
पंचामृते करूनि स्नपन । विचित्राभरण पूजावी ॥ ३०० ॥
दंतधावन, उद्वर्तन, अभ्यंजन हे मूर्तीला देऊन पंचामृताचें स्नान घालावे व नाना प्रकारच्या आभरणांनी तिची पूजा करावी ३००.
महत्वाचे संग्रह
वॉलपेपर

Loading...