मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
एकनाथी भागवत अध्याय २७ ओव्या १0१ ते २००
वाळुवेची जे केली मूर्ती । ती नांव 'सिकतामूर्ति' म्हणती ।
तेही पूज्य गा निश्चितीं । सुवर्णमूर्तीसमान ॥ १०१ ॥
वाळूची मूर्ति करितात तिला 'सिकतामूर्ति' म्हणतात. तीही सोन्याच्या मूर्तीप्रमाणेच पूज्य होय १.
मूर्ति 'रत्नमयी' सोज्ज्वळ । हिरा मरकत इंद्रनीळ ।
पद्मराग मुक्ताफळ । या मूर्ति केवळ अतिपूज्य ॥ १०२ ॥
पद्मराग मुक्ताफळ । या मूर्ति केवळ अतिपूज्य ॥ १०२ ॥
रत्नाची सुंदर मूर्ति, हिऱ्याची, पाचेची, नीलमण्याची, पद्मरागाची, किंवा मोत्याची मूर्ति, ह्या मूर्तीही अत्यंत पूज्य होत २.
मूर्तीमाजीं अतिप्राधान्य । 'मनोमयी' मूर्ति पावन ।
जिचें करितां उपासन । समाधान साधकां ॥ १०३ ॥
जिचें करितां उपासन । समाधान साधकां ॥ १०३ ॥
सर्व मूतीमध्ये अत्यंत श्रेष्ठ मूर्ति म्हटली म्हणजे 'मनोमय' मूर्ति. ती अत्यंत पवित्र होय. तिची उपासना केली असतां साधकांना अत्यंत समाधान प्राप्त होते ३.
तेंचि प्रतिमापूजाविधान । स्थावरजंगमलक्षण ।
तेही अर्थींचे निरूपण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥ १०४ ॥
तेही अर्थींचे निरूपण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥ १०४ ॥
आता त्या प्रतिमांचे पूजाविधान व चल-अचल लक्षण ह्याविषयींचेही निरूपण श्रीकृष्ण स्पष्ट करून सांगतात ४.
चलाचलेति द्विविधा प्रतिष्ठा जीवमन्दिरम् ।
उद्वासावाहने न स्तः स्थिरायामुद्धवार्चने ॥ १३ ॥
उद्वासावाहने न स्तः स्थिरायामुद्धवार्चने ॥ १३ ॥
[श्लोक १३] स्थिर आणि अस्थिर अशा दोन प्रकारच्या प्रतिमा हे माझे मंदिर होय उद्धवा ! स्थिर प्रतिमेची पूजा करताना दररोज आवाहन आणि विसर्जन करू नये. (१३)
अचेतनाचेतनप्रकार । जडातें जीववी साचार ।
'जीव' शब्दें चिन्मात्र । मुख्य परमेश्वर बोलिजे ॥ १०५ ॥
'जीव' शब्दें चिन्मात्र । मुख्य परमेश्वर बोलिजे ॥ १०५ ॥
अचेतनाला चेतनत्व देणारा, जडाला जीवत्व देणारा-' जीवत्व म्हणजे चिन्मात्रत्व-असा जो तोच मुख्यत्वे परमेश्वर समजावा ५.
भक्तभावार्थें साचार । त्या जीवाचें निजमंदिर ।
प्रतिमा जंगम-स्थावर । आगमशास्त्रसंमतें ॥ १०६ ॥
प्रतिमा जंगम-स्थावर । आगमशास्त्रसंमतें ॥ १०६ ॥
शुद्ध भक्तिभावाने निर्माण केलेलं जीवाचें निज मंदिर म्हणजे आगमशास्त्राच्या संमतीने स्थापन केलेल्या स्थावर-जंगम प्रतिमा समजाव्या ६.
तेथें स्थावरमूर्तिपूजन । साधकें करितां आपण ।
न लगे आवाहनविसर्जन । तेथ अधिष्ठान स्वयंभ ॥ १०७ ॥
न लगे आवाहनविसर्जन । तेथ अधिष्ठान स्वयंभ ॥ १०७ ॥
त्यांत साधकानें ' स्थावर ' मूर्तीचे पूजन केले असता, त्याचे आवाहन किंवा विसर्जन करावे लागत नाही. त्यांत स्वयंभूच अधिष्ठान असते ७.
अस्थिरायां विकल्पः स्यात् स्थण्डिले तुभवेद्द्वयम् ।
स्नपनं त्वविलेप्यायामन्यत्र परिमार्जनम् ॥ १४ ॥
स्नपनं त्वविलेप्यायामन्यत्र परिमार्जनम् ॥ १४ ॥
[श्लोक १४] अस्थिर प्रतिमेच्या बाबतीत आवाहनविसर्जन करावे किंवा करू नये परंतु वाळूच्या प्रतिमेचे मात्र केले पाहिजे माती, चित्र इत्यादी प्रतिमांवर फुलाने पाणी शिंपडावे इतर सर्व प्रकारच्या मूर्तींना मात्र स्नान घालावे. (१४)
जंगम प्रतिमांच्या ठायीं । आवाहनविसर्जन पाहीं ।
एकीं आहे एकीं नाहीं । ऐक तेही विभाग ॥ १०८ ॥
एकीं आहे एकीं नाहीं । ऐक तेही विभाग ॥ १०८ ॥
'जंगम' प्रतिमांतसुद्धा आवाहनविसर्जन काहींमध्ये असते व काहींमध्ये नसते. तोही प्रकार ऐक ८.
शालग्राममूर्तीसी जाण । स्वयंभ माझें अधिष्ठान ।
तेथ आवाहनविसर्जन । सर्वथा जाण लागेना ॥ १०९ ॥
तेथ आवाहनविसर्जन । सर्वथा जाण लागेना ॥ १०९ ॥
शालिग्रामाच्या मूर्तीमध्ये माझे स्वयंभूच अधिष्ठान असते; त्यामुळे शालिग्रामाला आवाहन व विसर्जन मुळींच लागत नाही ९.
शालग्रामाचा कुटका । ज्याचे पूजेसी आहे फुटका ।
तेथ परमात्मा निजसखा । सर्वदा देखा नांदत ॥ ११० ॥
तेथ परमात्मा निजसखा । सर्वदा देखा नांदत ॥ ११० ॥
शालिग्रामाचा फुटका तुकडा सुद्धा ज्याच्या पूजेला असेल, तेथे निज सखा परमात्मा सदा सर्वकाल नांदत असतो असे समजावें ११०.
इतर मूर्ती जंगमा जाण । तेथ आवाहनविसर्जन ।
साक्षेपें करावें आपण । हें विधिविधान आगमोक्त ॥ १११ ॥
साक्षेपें करावें आपण । हें विधिविधान आगमोक्त ॥ १११ ॥
ह्याशिवाय इतर जंगम म्ह. चलमूर्ति आहेत, त्यांना आवाहन व विसर्जन लागू आहे. ते आपण साक्षेपाने करावें. हेंच आगमोक्त विधिविधान होय ११.
स्थंडिलीं मूर्तिआवाहन । सर्वेंचि पूजांतीं विसर्जन ।
हें उभय भावनाविधान । स्थंडिलीं जाण आवश्यक ॥ ११२ ॥
हें उभय भावनाविधान । स्थंडिलीं जाण आवश्यक ॥ ११२ ॥
स्थंडिलावर. काढलेल्या मूर्तीचे आवाहन करावें व पूजा होतांच विसर्जन करावे. हे दोन प्रकारचे भावनाविधान स्थंडिलावर करणे अवश्य आहे १२.
आपले हृदयींचा चिद्घन । मूर्तीमाजीं कीजे आवाहन ।
पूजांतीं करूनि विसर्जन । देव हृदयीं जाण ठेवावा ॥ ११३ ॥
पूजांतीं करूनि विसर्जन । देव हृदयीं जाण ठेवावा ॥ ११३ ॥
हृदयांतील चिद्घन परमात्म्याचेच मूर्तीमध्ये आवाहन करावे आणि पूजा झाल्यावर त्याचे विसर्जन करून देवाला पुन्हा हृदयामध्ये ठेवावें १३.
एथ आपणचि ब्रह्म परिपूर्ण । हेंचि व्हावया निजस्मरण ।
आवाहनविसर्जनें जाण । निजात्मआठवण साधका ॥ ११४ ॥
आवाहनविसर्जनें जाण । निजात्मआठवण साधका ॥ ११४ ॥
यांत आपणच परिपूर्ण ब्रह्म आहोत हेच निजस्मरण होण्याकरिता आवाहनविसर्जन करावयाचे असते. यायोगें साधकाला आत्मस्वरूपाची आठवण राहाते १४.
हा आगमींचा निजात्मभावो । आपणचि आपला देवो ।
आपला आपण पूजक पहा हो । हा निजात्म-आठवो निजपूजे ॥ ११५ ॥
आपला आपण पूजक पहा हो । हा निजात्म-आठवो निजपूजे ॥ ११५ ॥
आगमशास्त्रांतील गूढार्थही हाच आहे की, आपणच आपला देव आहों व आपणच आपला पूजक आहों; अशी आपल्या पूजेमध्ये आपल्याच आत्मस्वरूपाची ओळख होते १५.
'देव होऊनि देव पूजिजे' । हें निजात्मता गोड खाजें ।
उपासनाकांड-व्याजें । उद्धवासी दीजे श्रीकृष्णें ॥ ११६ ॥
उपासनाकांड-व्याजें । उद्धवासी दीजे श्रीकृष्णें ॥ ११६ ॥
देव होऊनच देवाची पूजा करावी, हेच आत्मस्वरूपाचे गोड खाज असून उपासनाकांडाच्या रूपाने श्रीकृष्णांनी उद्ध्वाला देऊन सोडलें १६.
हे निजात्मता निजगोडी । प्रतिपदीं न लभतां रोकडी ।
उपासना-तडातोडी । कोण कोरडी सोशील ॥ ११७ ॥
उपासना-तडातोडी । कोण कोरडी सोशील ॥ ११७ ॥
ही आत्मस्वरूपाची खरी गोडी पावलोपावली जर न मिळेल, तर उपासनेची कोरडी खटपट कोण सोसणार ? १७.
हें आगमींचें निजगुह्य जाण । प्रतिपदीं सुखसंपन्न ।
साधक स्वयें होती चिद्घन । तें हें उपासन उद्धवा ॥ ११८ ॥
साधक स्वयें होती चिद्घन । तें हें उपासन उद्धवा ॥ ११८ ॥
हेच आगमशास्त्रांतील गूढ रहस्य आहे. बा उद्धवा ! ह्यायोगे साधक हे पावलोपावली सुखसंपन्न होऊन आपोआप चिद्घन बनतात; अशी ही उपासना आहे १८.
ऐसें ऐकतां कृष्णवचन । उद्धव स्वानंदें झाला पूर्ण ।
धांवोनि धरिले श्रीकृष्णचरण । म्हणे समूळ निरूपण मज सांग ॥ ११९ ॥
धांवोनि धरिले श्रीकृष्णचरण । म्हणे समूळ निरूपण मज सांग ॥ ११९ ॥
हे कृष्णाचे भाषण ऐकतांच उद्धव आनंदाने उचंबळून गेला; त्याने जाऊन श्रीकृष्णाचे पाय धरले आणि मला ते निरूपण साद्यन्त सांगावें, असें म्हणाला १९,
तंव देव म्हणे स्थिर राहें । जें हें आगमोक्त गुह्य आहे ।
तें माझे कृपेंवीण पाहें । प्राप्त नोहे साधकां ॥ १२० ॥
तें माझे कृपेंवीण पाहें । प्राप्त नोहे साधकां ॥ १२० ॥
तेव्हां श्रीकृष्ण म्हणाले की, थांब, हें जें आगमोक्त गुह्य आहे तें साधकांना माझ्या कृपेशिवाय प्राप्त व्हावयाचें नाहीं १२०.
आगमोक्त गुह्य गहन । असो हें माझें गुप्तधन ।
तुवां पुशिलें पूजाविधान । ऐक सावधान उद्धवा ॥ १२१ ॥
तुवां पुशिलें पूजाविधान । ऐक सावधान उद्धवा ॥ १२१ ॥
हे आगमोक्त गुह्य फार गहन आहे. तें माझें गुप्त धन आहे. ते असो. उद्धवा ! तूं पूजाविधान विचारलेंस, तेच नीट लक्ष देऊन ऐक २१.
लेप्या लेख्या ज्या मूर्ति जाण । त्यांसीं करावेनां स्नान ।
इतरां मूर्तीसी स्नपन । यथाविधान करावें ॥ १२२ ॥
इतरां मूर्तीसी स्नपन । यथाविधान करावें ॥ १२२ ॥
( मागें सांगितलेल्या) लेप्या आणि लेख्या मूर्ति यांना स्नान घालू नये. इतर मूर्तींना यथाविधि स्नान घालावें २२.
द्रव्यैः प्रसिद्धैर्मद्यागः प्रतिमादिष्वमायिनः ।
भक्तस्य च यथालब्धैर्हृदि भावेन चैव हि ॥ १५ ॥
भक्तस्य च यथालब्धैर्हृदि भावेन चैव हि ॥ १५ ॥
[श्लोक १५] प्रतिमा इत्यादींध्ये सुप्रसिद्ध पदार्थांनी माझी पूजा करावी परंतु निष्काम भक्तांनी मिळेल त्या वस्तूंनी पूजा करावी किंवा हृदयामध्ये मानसिक पूजा करावी. (१५)
पूजक सकाम होय चांग । तैं पूजाद्रव्य व्हावें साङ्ग ।
पूजासाधन झालिया व्यंग । फळ निर्व्यग उपजेना ॥ १२३ ॥
पूजासाधन झालिया व्यंग । फळ निर्व्यग उपजेना ॥ १२३ ॥
पूजक जर सकाम म्ह. फळाची इच्छा करणारा असेल तर, पूजासाहित्य यथासाङ्ग पाहिजे. पूजेच्या साहित्यांत व्यंग पडेल तर फळही निर्व्यंग मिळावयाचें नाहीं २३.
भक्त निष्काम वाडेंकोडें । तैं पूजाद्रव्याचें सांकडें ।
सर्वथा कांहीं न पडे । भक्तभाव आवडे भगवंता ॥ १२४ ॥
सर्वथा कांहीं न पडे । भक्तभाव आवडे भगवंता ॥ १२४ ॥
भक्त निष्काम असून त्याला पूजेची आवड असेल, तर त्याला पूजाद्रव्याचे तेवढे संकट सोसावे लागत नाही. कारण भगवंताला ( उपचारापेक्षा ) भावच आवडत असतो २४.
तेथ अनायासें जें प्राप्त । तेणें भगवंत होय तृप्त ।
तोचि पूजायाग यथोक्त । जाण निश्चित उद्धवा ॥ १२५ ॥
तोचि पूजायाग यथोक्त । जाण निश्चित उद्धवा ॥ १२५ ॥
अशा वेळी अनायासाने जे काय मिळेल, तेवढ्यानेच भगवान् संतुष्ट होतो. उद्धवा ! तोच पूजायाग यथोक्त होय २५.
निष्कामवृत्तीं फल मूल । दूर्वांकुर कां निर्मळ जळ ।
इतकेन पूजायाग सकळ । होय अविकळ मद्भावें ॥ १२६ ॥
इतकेन पूजायाग सकळ । होय अविकळ मद्भावें ॥ १२६ ॥
निष्काम वृत्ति असली म्हणजे फल, मूल, दूर्वा, किंवा निर्मळ पाणी एवढ्यानेच म्ह. सद्भावानेच सगळा पूजायाग सफळ होतो २६.
जेथ माझा सद्भाव दृढ । तेथ उपचारांचा कोण पाड ।
भक्तांचा भावाचि मज गोड । तेणें सुख सुरवाड मद्भक्तां ॥ १२७ ॥
भक्तांचा भावाचि मज गोड । तेणें सुख सुरवाड मद्भक्तां ॥ १२७ ॥
जेथे माझा भाव दृढ असतो, तेथे इतर उपचारांची काय प्रतिष्ठा ? भक्तांचा भावच मला गोड वाटतो, त्यायोगें माझ्या भक्तालाही महासुखाचा लाभ होतो २७.
बाह्य उपचार जे कांहीं । ते प्रतिमामूर्तिपूजेसी पाहीं ।
मानसपूजेचे तंव ठायीं । वाणी नाहीं उपचारां ॥ १२८ ॥
मानसपूजेचे तंव ठायीं । वाणी नाहीं उपचारां ॥ १२८ ॥
जे काहीं बाह्योपचार करावयाचे, ते प्रतिमामूर्तीच्या पूजेलाच लागतात; मानसपूजेमध्ये तर ह्या उपचारांना कांहींच तोटा नाही. २८.
तेथ मनचि होय माझी मूर्ती । मनोमय उपचारसंपत्ती ।
निर्लोभें जें मज अर्पिती । तेणें मी श्रीपती संतुष्ट ॥ १२९ ॥
निर्लोभें जें मज अर्पिती । तेणें मी श्रीपती संतुष्ट ॥ १२९ ॥
तेथे मनच माझी मूर्ति होते, आणि उपचाराचे साहित्यही मनोमयच असते. पण ही उपचारसंपत्ति सुद्धा मला निर्लोभपणानें अर्पण करीत असतात. त्यामुळे मी श्रीपति संतुष्ट होतो २९.
प्रतिमादि अष्टौ पूजास्थान । यथोक्त पूजेचें विधान ।
तुज मी साङ्ग सांगेन । ऐक सावधान उद्धवा ॥ १३० ॥
तुज मी साङ्ग सांगेन । ऐक सावधान उद्धवा ॥ १३० ॥
(असो) प्रतिमादि आठ पूजास्थाने आहेत, त्यांचेही यथोचित पूजाविधान मी तुला सांगतो. तर उद्धवा ! ती तूं लक्ष देऊन ऐक १३०.
स्नानालङ्करणं प्रेष्ठमर्चायामेव तूद्धव ।
स्थण्डिले तत्त्वविन्यासो वह्नावाज्यप्लुतं हविः ॥ १६ ॥
स्थण्डिले तत्त्वविन्यासो वह्नावाज्यप्लुतं हविः ॥ १६ ॥
[श्लोक १६] हे उद्धवा ! मूर्तीलाच स्नान, वस्त्र, अलंकार इत्यादी घालावेत स्थंडिलावर मंत्रांनी अंगदेवता आणि प्रमुख देवतांची स्थापना करून पूजा करावी तसेच अग्नीमध्ये पूजा करावयाची असेल, तर तूपमिश्रित हविर्द्रव्याच्या आहुती द्याव्यात. (१६)
प्रतिमामूर्ति पूजास्थान । ते मूर्तीस जें महास्नपन ।
या नांव बोलिजे 'स्नान' । साङ्ग भूषण मुकुटादी ॥ १३१ ॥
या नांव बोलिजे 'स्नान' । साङ्ग भूषण मुकुटादी ॥ १३१ ॥
प्रतिमामूर्ति हें एक पूजास्थान आहे. त्या मूर्तीला जो महाभिषेक करितात, त्यालाच 'स्नान' असे म्हणतात. मुगुट आदिकरून सर्व प्रकारचे अलंकार तिला घालावेत ३१.
जे लोकीं उत्तम प्रकार । कां आपणासी जे प्रियकर ।
जे जे अनर्घ्य अळंकार । तेणें श्रद्धा मी श्रीधर पूजावा ॥ १३२ ॥
जे जे अनर्घ्य अळंकार । तेणें श्रद्धा मी श्रीधर पूजावा ॥ १३२ ॥
लोकांत जे उत्तम प्रकार असतात किंवा आपणाला जे अतिशय आवडतात किंवा लोकांत अत्यंत मौल्यवान् म्हणून अलंकार असतात, ते घेऊन त्यांनी श्रद्धापूर्वक श्रीहरीची पूजा करावी ३२.
स्न्नान भोजन अलंकार । साङ्ग पूजा सपरिकर ।
हा प्रतिमापूजाप्रकार । ऐक विचार स्थंडिलाचा ॥ १३३ ॥
हा प्रतिमापूजाप्रकार । ऐक विचार स्थंडिलाचा ॥ १३३ ॥
स्नान, भोजन, अलंकार इत्यादि सर्वोपचारांसहित यथासांग पूजा करणे हाच प्रतिमापूजेचा प्रकार होय. आतां स्थंडिलाचा विचार ऐक ३३.
स्थडिलीं जे पूजास्थान । तेथ तत्त्वांचें धरोनि ध्यान ।
करावें तत्त्वविन्यासलेखन । पूजाविधान या हेतू ॥ १३४ ॥
करावें तत्त्वविन्यासलेखन । पूजाविधान या हेतू ॥ १३४ ॥
स्थंडिलावर जें पूजास्थान असते, तेथे तत्त्वांचे ध्यान करून त्यावर तत्वविन्यासाचे लेखन करावे. हेच त्याचें पूजाविधान होय ३४.
आत्मतत्त्वादि तत्त्वविवंच । स्थंडिली विवंचूनि साच ।
हृदय शिर शिखा कवच । नेत्र अस्त्र दिशंच निजपूजा ॥ १३५ ॥
हृदय शिर शिखा कवच । नेत्र अस्त्र दिशंच निजपूजा ॥ १३५ ॥
आत्मतत्त्वादिकांच्या विचाराचा स्थंडिलावर खरोखर विचार करून हृदय, मस्तक, शिखा, कवच, नेत्र, अस्त्र, इत्यादि काढून त्यांचे दिशाबंधन करून पूजा करावी ३५.
अग्नीचे ठायीं जें पूजन । तेथ माझें करूनि ध्यान ।
आज्यप्लुत हविहवन । हें पूजाविधान अग्नीचें ॥ १३६ ॥
आज्यप्लुत हविहवन । हें पूजाविधान अग्नीचें ॥ १३६ ॥
अग्नीच्या ठिकाणी जी पूजा करायची, तेथे माझे ध्यान करून घृतपूर्ण आहुति देऊन होम करणे हें अग्नीचें पूजाविधान होय ३६.
अग्नि देवांचें वदन । येणें विश्वासें संपूर्ण ।
हविर्द्रव्य करितां हवन । 'अग्निपूजन' या हेतू ॥ १३७ ॥
हविर्द्रव्य करितां हवन । 'अग्निपूजन' या हेतू ॥ १३७ ॥
अग्नि हा देवाचे मुख आहे अशा पूर्ण श्रद्धेनें हविर्द्रव्याचे हवन करणे हेच 'अग्निपूजन' होय ३७.
सूर्याच्या ठायीं प्रकाशमान । मंडळात्मा सूर्यनारायण ।
तेथ सौरमंत्रें उपस्थान । पूजाविधान या हेतू ॥ १३८ ॥
तेथ सौरमंत्रें उपस्थान । पूजाविधान या हेतू ॥ १३८ ॥
सूर्यामध्ये प्रकाशमान होणारा मंडळात्मा जो सूर्यनारायण, त्याचे सौरमंत्रानें पूजा व स्तवन करावे. हेच 'सूर्य' पूजाविधान होय ३८.
विचारितां श्रुतीचा अर्थ । 'आपोनारायण' साक्षात् ।
येथ पूजाविधान यथोक्त । जळीं जळयुक्त तर्पण ॥ १३९ ॥
येथ पूजाविधान यथोक्त । जळीं जळयुक्त तर्पण ॥ १३९ ॥
श्रुतीच्या अर्थाचा विचार केला असतां 'आप' म्ह. पाणी हें साक्षात नारायणस्वरूपच आहे. त्याचे यथोचित पूजाविधान म्हटले म्हणजे जलामध्येच जलानें तर्पण करणे हे होय ३९.
'हृदयीं' जें माझें पूजास्थान । तेथें मनें मनाचें अर्चन ।
मनोमय मूर्ति संपूर्ण । पूजाविधान मानसिक ॥ १४० ॥
मनोमय मूर्ति संपूर्ण । पूजाविधान मानसिक ॥ १४० ॥
'हृदयामध्ये' जें माझें पूजास्थान आहे, तेथें मनानेच मनाची पूजा करावयाची. मूर्ति सारी मनोमयच आणि पूजाविधीही सारा मानसिकच १४०.
माझें मुख्यत्वें अधिष्ठान । ब्रह्ममूर्ति जे 'ब्राह्मण' ।
तेथील जें पूजाविधान । आज्ञापालन दासत्वें ॥ १४१ ॥
तेथील जें पूजाविधान । आज्ञापालन दासत्वें ॥ १४१ ॥
माझें मुख्य अधिष्ठान म्हटले म्हणजे ब्रह्ममूर्ति 'ब्राह्मण' होत. त्यांचे दासत्वाने आज्ञापालन करणे हेच त्यांचे पूजाविधान होय ४१.
ब्रह्मासी ज्याचेनि ब्रह्मपण । तो सद्गुरु' माझें पूजास्थान ।
सर्वार्थीं श्रेष्ठ पावन । तेथील पूजन तें ऐसें ॥ १४२ ॥
सर्वार्थीं श्रेष्ठ पावन । तेथील पूजन तें ऐसें ॥ १४२ ॥
ब्रह्मालाही ज्याच्यामुळे ब्रह्मपण येते, तो 'सद्गुरु' तर माझें सर्वोपरी श्रेष्ठ व पवित्र पूजास्थान होय. त्याचे पूजन तें असें ४२
जीवें सर्वस्वेंसीं आपण । त्यासी रिघावें अनन्य शरण ।
त्याच्या वचनासी प्राण । निश्चयें जाण विकावा ॥ १४३ ॥
त्याच्या वचनासी प्राण । निश्चयें जाण विकावा ॥ १४३ ॥
आपण सर्वस्वी जिवाभावाने त्याला अनन्य शरण जाणे आणि त्याच्या वचनाला प्राण विकणे ४३.
गुरूची नीचसेवा सेवन । आवडीं करणें आपण ।
हेंचि तेथील पूजाविधान । येणें सुखसंपन्न साधक ॥ १४४ ॥
हेंचि तेथील पूजाविधान । येणें सुखसंपन्न साधक ॥ १४४ ॥
गुरूची अगदी हलकी सेवाही आवडीने करणे हेच त्याचे पूजाविधान होय. ह्यानेच साधकांना खरे सौख्य प्राप्त होते ४४.
सद्गुरुसेवा करितां पाहीं । ब्रह्मसायुज्य लागे पायीं ।
गुरुसेवेपरतें कांहीं । श्रेष्ठ नाहीं साधन ॥ १४५ ॥
गुरुसेवेपरतें कांहीं । श्रेष्ठ नाहीं साधन ॥ १४५ ॥
सद्गुरूची सेवा केली असतां ब्रह्मसायुज्य पायीं लागते. गुरूसेवेपेक्षा श्रेष्ठ असे दुसरे साधन काहींच नाही ४५.
सद्गुरुस्वरूप तें जाण । अखंडत्वें ब्रह्म पूर्ण ।
तेथें आवाहन विसर्जन । सर्वथा आपण न करावें ॥ १४६ ॥
तेथें आवाहन विसर्जन । सर्वथा आपण न करावें ॥ १४६ ॥
सद्गुरूचे स्वरूप हें अखंड पूर्ण ब्रह्म आहे. तेथे आपण आवाहन व विसर्जन कधीही करूं नये ४६.
निष्कपटभावें संपूर्ण । सद्गुरूसी जो अनन्य शरण ।
त्याचे मीही वंदीं चरण । येथवरी जाण तो धन्य ॥ १४७ ॥
त्याचे मीही वंदीं चरण । येथवरी जाण तो धन्य ॥ १४७ ॥
पूर्ण निष्कपट भावानें सद्गुरूला जो अनन्य शरण जातो, त्याचे मीसुद्धा चरण वंदन करतो, इतका तो धन्य होतो ४७.
निर्लोभभावें सहज । पूजितां तोषे अधोक्षज ।
त्या भावाचें निजगुज । स्वयें यदुराज सांगत ॥ ४८ ॥
त्या भावाचें निजगुज । स्वयें यदुराज सांगत ॥ ४८ ॥
निर्लोभ भावाने सहज पूजा केली असतां भगवंताला संतोष होतो. त्या भावाचे रहस्य श्रीकृष्ण सांगतात ४८.
सूर्ये चाभ्यर्हण प्रेष्ठं सलिले सलिलादिभिः ।
श्रद्धयोपाहतं प्रेष्ठं भक्तेन मम वार्यपि ॥ १७ ॥
भूर्यप्यभक्तोपहृतं न मे तोषाय कल्पते ।
गन्धो धूपः सुमनसो दीपोऽअन्नाद्यं च किं पुनः ॥ १८ ॥
श्रद्धयोपाहतं प्रेष्ठं भक्तेन मम वार्यपि ॥ १७ ॥
भूर्यप्यभक्तोपहृतं न मे तोषाय कल्पते ।
गन्धो धूपः सुमनसो दीपोऽअन्नाद्यं च किं पुनः ॥ १८ ॥
[श्लोक १७ / १८] सूर्याला अर्घ्य, उपस्थान अत्यंत प्रिय आहे तसेच पाण्यामध्ये पाण्याने तर्पण इत्यादीचे मला प्रिय आहे अभक्ताने मला पुष्कळ काही दिले तरी त्याने मी संतुष्ट होत नाही परंतु माझ्या भक्ताने मला श्रद्धने पाणी सुद्धा अर्पण केले तरी मला ते अत्यंत आवडते तर मग गंध फुले, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी अर्पण केले, तर काय सांगावे. (१७-१८)
माझ्या ठायीं अतिप्रीतीं । श्रद्धायुक्त अनन्य भक्तीं ।
भक्त 'भावें' जळ अर्पिती । तेणें मी श्रीपति सुखावें ॥ १४९ ॥
भक्त 'भावें' जळ अर्पिती । तेणें मी श्रीपति सुखावें ॥ १४९ ॥
माझ्या ठिकाणी अत्यंत प्रेम धरून श्रद्धायुक्त अनन्य भक्तीने जे भक्त मला नुसते उदक अर्पण करतात, त्यांच्या त्या उदकानेंही मी श्रीपति संतुष्ट होतो ४९.
तो जळबिंदु यथासुखें । म्यां मुखीं झेलिजे आदिपुरुखें ।
तंव भक्तभावाचेनि हरिखें । मी सुखरूप सुखें सुखावें देख ॥ १५० ॥
तंव भक्तभावाचेनि हरिखें । मी सुखरूप सुखें सुखावें देख ॥ १५० ॥
तो जलबिंदु मी आदिपुरुषही मोठ्या प्रेमाने तोंडांत झेलून घेतो, तेव्हा मी मूळचा सुखस्वरूप, पण भक्तभावाच्या हर्षाने मी अधिक सुखी होतो १५०.
माझें त्रैलोक्यासी सुख । ऐसा मीही सुखरूप देख ।
त्या मज होय परम संतोख । भाविकांचें उदक सेवितां ॥ १५१ ॥
त्या मज होय परम संतोख । भाविकांचें उदक सेवितां ॥ १५१ ॥
त्रैलोक्याला माझ्यापासून सुख, असा मी सुखाचा सागर; त्या मला भाविकांचे उदक प्यालें असतां परम संतोष होतो ५१.
त्या जळबिंदूचिया साठीं । रमा नावडे गोमटी ।
ब्रह्मा जन्मला माझे पोटीं । तोही शेवटी नावडे ॥ १५२ ॥
ब्रह्मा जन्मला माझे पोटीं । तोही शेवटी नावडे ॥ १५२ ॥
त्या जलबिंदू इतकी माझी सुंदर लक्ष्मीसुद्धा मला आवडत नाहीं; ब्रह्मदेव माझ्या पोटी जन्मलेला आहे, पण तोसुद्धा शेवटी आवडत नाही ५२.
भाविकांचेनि उदकलेखें । मज वैकुंठही झालें फिकें ।
शेषशयनींचीं निद्रासुखें । त्यांचींही तुकें उतरलीं ॥ १५३ ॥
शेषशयनींचीं निद्रासुखें । त्यांचींही तुकें उतरलीं ॥ १५३ ॥
भक्तांच्या जलबिंदूपुढे मला माझे वैकुंठही फिकें वाटते; शेषावर शयन करण्याचे जे सौख्य तेही त्याच्या पासंगाला पुरत नाही ५३.
भाविकांच्या उदकापुढें मज आणिक कांहीं नावडे ।
तेथही गंधादि पूजा जोडे । नैवेद्य चोखडे रसयुक्त ॥ १५४ ॥
तेथही गंधादि पूजा जोडे । नैवेद्य चोखडे रसयुक्त ॥ १५४ ॥
भाविकांच्या उदकापुढे मला दुसरे काही आवडत नाही; त्यांतच आणखी गंधादिक पूजा केली व षड्रसान्नाचा नैवेद्य मिळाला ५४,
ते पूजेचिये सुखप्राप्ती । उपमा नाहीं त्रिजगतीं ।
ऐसा भाविकांचिये भक्तीं । मी श्रीपती सुखावें ॥ १५५ ॥
ऐसा भाविकांचिये भक्तीं । मी श्रीपती सुखावें ॥ १५५ ॥
तर त्या पूजेच्या सुखाला त्रिभुवनांत उपमाच नाही. इतका भाविकांच्या मतीने मी श्रीपति सुखावतों ५५.
भावें करितां भगवद्भक्ती । 'मी कृतकृत्य झालों निश्चितीं ।
ऐशिया निश्चियें जो भावार्थी । त्याचेचि जळें संतृप्ति मज होय ॥ १५६ ॥
ऐशिया निश्चियें जो भावार्थी । त्याचेचि जळें संतृप्ति मज होय ॥ १५६ ॥
भाव धरून भगवद्भक्ति केली असता आपण खरोखरच कृतकृत्य होतो असा ज्याचा निश्चय असेल, त्याच्याच उदकानेंही मी तृप्त होतों ५६.
येर जो अभक्त दंभस्थितीं । जीवीं द्रव्याशा बाह्य विरक्ती ।
लौकिकप्रतिष्ठेपुरती । माझी भक्ति जो मिरवी ॥ १५७ ॥
लौकिकप्रतिष्ठेपुरती । माझी भक्ति जो मिरवी ॥ १५७ ॥
इतर जो ढोंगी भक्त असतो, पोटांत द्रव्याची आशा आणि बाहेर विरक्ति; लोकांमध्ये प्रतिष्ठा वाढण्यापुरतीच जो माझी भक्ति मिरवितो ५७,
ऐशिया अभक्ताचिया स्थितीं । छत्र चामर गजसंपत्ती ।
मज अर्पितांही अभक्तीं । सुखलेश चित्तीं उपजेना ॥ १५८ ॥
मज अर्पितांही अभक्तीं । सुखलेश चित्तीं उपजेना ॥ १५८ ॥
अशा अभक्ताने छत्र, चामर किंवा गजान्तलक्ष्मीही अर्पण केली तरी माझ्या चित्तांत मुखाचा लेशही उपजत नाही ५८.
क्षीरसागर निवडी राजहंस । तेथ निसूं दीधला कापुस ।
तेवीं अभक्तभजनीं संतोष । मी हृषीकेश पावोना ॥ १५९ ॥
तेवीं अभक्तभजनीं संतोष । मी हृषीकेश पावोना ॥ १५९ ॥
दूध आणि पाणी निवडून काढणाऱ्या राजहंसापुढे पिंजण्यासाठी कापूस ठेवला असतां जसें त्याला सुख वाटणार नाही, त्याप्रमाणे अभक्तांच्या भजनपूजनाने मी हृषीकेश संतोष पावत नाही ५९.
कागाची गायनकळा । जेवीं तोषेना किन्नरशाळा ।
तेवीं अभक्ताची भजनलीला । माझी चित्कळा तोषेना ॥ १६० ॥
तेवीं अभक्ताची भजनलीला । माझी चित्कळा तोषेना ॥ १६० ॥
कावळ्याची गायनकला पाहून ज्याप्रमाणे किन्नरांच्या शाळेला संतोष होत नाही, त्याप्रमाणे अभक्तांची भजनलीला पाहून माझी ज्ञानकळा संतोष पावत नाही १६०.
जेवीं रजस्वलेचें पक्वान्न । उत्तम परी तें अतिहीन ।
तेवीं अभक्तांचें भजन । कदा जनार्दन स्पर्शेना ॥ १६१ ॥
तेवीं अभक्तांचें भजन । कदा जनार्दन स्पर्शेना ॥ १६१ ॥
विटाळशीचें पक्वान्न कितीही उत्तम असले तरी ते अति अमंगल; त्याप्रमाणे अभक्तांच्या भजनाला जनार्दन कधीं स्पर्शही करीत नाही ६१.
ज्या भजना नातळे नारायण । ऐसें जें अभक्तांचें भजन ।
तेणें भजनें जनार्दन । अणुमात्र जाण तोषेना ॥ १६२ ॥
तेणें भजनें जनार्दन । अणुमात्र जाण तोषेना ॥ १६२ ॥
ज्या भजनाला नारायण स्पर्श करीत नाही, असें जें अभक्तांचे भजन, त्या भजनाने जनार्दनाला यत्किंचितही संतोष होत नाही ६२.
एवं भक्ताभक्तभजनमार्ग । दावूनि अधिकाराचे भाग ।
आतां समूळ पूजामार्ग । साङ्ग श्रीकृष्ण सांगत ॥ १६३ ॥
आतां समूळ पूजामार्ग । साङ्ग श्रीकृष्ण सांगत ॥ १६३ ॥
याप्रमाणे भक्त आणि अभक्त यांचे मार्ग व त्यांच्या अधिकारांचे विभाग दाखवून दिले. आतां साद्यन्त पूजामार्गच श्रीकृष्ण सांगत आहेत ६३.
शुचिः सम्भृतसम्भारः प्राग्दर्भैः कल्पितासनः ।
आसीनः प्रागुदग्वार्चेदर्चायामथ संमुखः ॥ १९ ॥
आसीनः प्रागुदग्वार्चेदर्चायामथ संमुखः ॥ १९ ॥
[श्लोक १९] उपासकाने आधी पूजेची सामग्री एकत्रित करून ठेवावी नंतर पूर्वेकडे टोक असलेले कुशासन अंथरून, पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून त्यावर बसावे मूर्ती स्थिर असेल तर तिच्यासमोर बसावे नंतर पूजा करावी. (१९)
करूनि मलस्नान आपण । वैदिक तांत्रिक मंत्रस्नान ।
सारूनि नित्यविधान । 'शुचित्वपण' या नांव ॥ १६४ ॥
सारूनि नित्यविधान । 'शुचित्वपण' या नांव ॥ १६४ ॥
शरीरशुद्धीचे स्नान झाल्यानंतर वैदिकतांत्रिक मंत्रस्नान करावें व नित्यविधि उरकावा, याचे नांव 'शुचिर्भूतपणा' ६४.
मग देवपूजासंभार । शोधूनि करावे पवित्र ।
यथास्थानीं पूजाप्रकार । गंधादि उपचार ठेवावे ॥ १६५ ॥
यथास्थानीं पूजाप्रकार । गंधादि उपचार ठेवावे ॥ १६५ ॥
नंतर देवपूजेचे साहित्य शोधून पवित्र करावें; आणि मग गंधादिक पूजेची सामग्री जेथच्या तेथे ठेवावी ६५.
श्वेतकंबल चैलाजिन । पूर्वदर्भाग्रीं आसन ।
पूर्वामुख बैसावें आपण । अथवा जाण उदङ्मुख ॥ १६६ ॥
पूर्वामुख बैसावें आपण । अथवा जाण उदङ्मुख ॥ १६६ ॥
पांढरी कांबळ, मृगचर्म आणि पूर्वाभिमुख दर्भाग्र आसन घालून त्यावर पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसावे ६६.
स्थावरमूर्ती पूजितां देख । आसन करावें मूर्तिसंमुख ।
हा आसनविधि निर्दोख । पूजान्यासादिक हरि सांगे ॥ १६७ ॥
हा आसनविधि निर्दोख । पूजान्यासादिक हरि सांगे ॥ १६७ ॥
स्थावर मूर्तीची पूजा करतांना आपले आसन मूर्तीच्या समोर घालावे. हा निर्दोष आसनविधि होय. आतां पूजान्यासादिक श्रीकृष्ण सांगतात ६७.
कृतन्यासः कृतन्यासां मदर्ची पाणिना मृजेत् ।
कलशं प्रोक्षणीयं च यथावदुपसाधयेत् ॥ २० ॥
कलशं प्रोक्षणीयं च यथावदुपसाधयेत् ॥ २० ॥
[श्लोक २०] प्रथम अंगन्यास आणि करन्यास करावे नंतर मूर्तीमध्ये मंत्रन्यास करून हाताने निर्माल्य काढून मूर्ती पुसून घ्यावी नंतर भरलेला कलश, प्रोक्षणपात्र इत्यादींची पूजा करावी. (२०)
विधियुक्त घालूनि आसन । गुरूसी करावें नमन ।
परमगुरु-परमेष्ठीसी जाण । करावें अभिवंदन अतिप्रीतीं ॥ १६८ ॥
परमगुरु-परमेष्ठीसी जाण । करावें अभिवंदन अतिप्रीतीं ॥ १६८ ॥
याप्रमाणे विधियुक्त आसन घालून गुरूला नमस्कार करावा; परमगुरु (गुरुचा गुरु) व परमेष्ठीगुरु (परमगुरूचा गुरु) यांनाही अत्यंत प्रेमाने अभिवंदन करावें ६८.
जो मंत्र प्राप्त आपणांस । त्या मंत्राचे देहीं करावे न्यास ।
मंत्रमूर्ति आणोनि ध्यानास । पूजा 'मानस' करावी ॥ १६९ ॥
मंत्रमूर्ति आणोनि ध्यानास । पूजा 'मानस' करावी ॥ १६९ ॥
जो मंत्र गुरूकडून मिळाला असेल त्या मंत्राचे देहावर न्यास करावेत. आणि मंत्रमूर्ति ध्यानात आणून मानसपूजा करावी ६९.
जे मूर्ति आली ध्यानासी । तेचि आणावया प्रतिमेसी ।
हातीं धरोनिया अर्चेसी । करावें न्यासासी प्रतिमाअंगीं ॥ १७० ॥
हातीं धरोनिया अर्चेसी । करावें न्यासासी प्रतिमाअंगीं ॥ १७० ॥
जी मूर्ति ध्यानात आणली असेल तीच प्रतिमेत आणण्यासाठी प्रतिमेला हातात धरून तिच्या अंगावरही न्यास करावेत १७०.
कलश आणि प्रोक्षणी जाण । साधावीं यथाविधान ।
जळें करोनिया पूर्ण । दूर्वादि चंदन द्रव्ययुक्त ॥ १७१ ॥
जळें करोनिया पूर्ण । दूर्वादि चंदन द्रव्ययुक्त ॥ १७१ ॥
कलश आणि प्रोक्षणपात्र (पंचपात्र इ.) योग्य ठिकाणी ठेवून, ती पाण्याने भरून, त्यांत दूर्वा, गंध, इत्यादि पूजाद्रव्ये घालावीत ७१.
तदद्भिर्देवयजनं द्रव्याण्यात्मानमेव च ।
प्रोक्ष्य पात्राणि त्रीण्यद्भिस्तैस्तैर्द्रव्यैश्च साधयेत् ॥ २१ ॥
प्रोक्ष्य पात्राणि त्रीण्यद्भिस्तैस्तैर्द्रव्यैश्च साधयेत् ॥ २१ ॥
[श्लोक २१] प्रोक्षणपात्रातील पाण्याने पूजेची सामग्री आणि आपले शरीर यांवर प्रोक्षण करावे त्यानंतर पाद्य, अर्घ्य व आचमनासाठी, कलशामधून तीन पात्रात पाणी भरून घेऊन त्यात योग्य त्या वस्तू घालाव्यात. (२१)
तें प्रौक्षणपात्रींचें जळ । नखोदकें न करूनी निर्मळ ।
तेणें पूजसंभार सकळ । कुशाग्रें केवळ प्रोक्षावा ॥ १७२ ॥
तेणें पूजसंभार सकळ । कुशाग्रें केवळ प्रोक्षावा ॥ १७२ ॥
त्या प्रोक्षणपात्रांतील जलांत बोटांची नखें न बुडवितां सारी पूजासामग्री त्या जलाने फक्त दर्भांच्या शेंड्याने प्रोक्षण करावी ७२.
तेणेंचि प्रोक्षावें देवसदन । आपणासी करावें प्रोक्षण ।
प्रोक्षोनि देवपूजास्थान । पूजाविधान मांडावें ॥ १७३ ॥
प्रोक्षोनि देवपूजास्थान । पूजाविधान मांडावें ॥ १७३ ॥
त्यांनेच देवघरही प्रोक्षण करावें; स्वतःला प्रोक्षण करून घ्यावें व देवपूजेची जागा (देव्हारा वगैरें ) प्रोक्षण करून पूजेला आरंभ करावा ७३.
पाद्य-अर्घ्य-आचमनीयें । तदर्थ मांडावीं पात्रत्रयें ।
जळें पूर्ण करूनि पाहें । भिन्न द्रव्य आहे पात्रत्रयासी ॥ १७४ ॥
जळें पूर्ण करूनि पाहें । भिन्न द्रव्य आहे पात्रत्रयासी ॥ १७४ ॥
पाद्य , अर्ध्य , आणि आचमनीय ह्याकरितां तीन पात्रे मांडावीत व त्यात पाणी भरून त्या तिन्ही पात्रांत भिन्न भिन्न पदार्थ घालावेत ७४.
श्यामाक-दूर्वा-अब्ज-विष्णुक्रांता । 'पाद्यपात्रीं' हे द्रव्यशुद्धता ।
गंध पुष्प फल अक्षता । एवं कुशाग्रता 'अर्घ्यपात्रीं' ॥ १७५ ॥
गंध पुष्प फल अक्षता । एवं कुशाग्रता 'अर्घ्यपात्रीं' ॥ १७५ ॥
सावे, दूर्वा, कमळ व विष्णुक्रांत ही 'पाद्यपात्रांतील शुद्ध द्रव्ये होत. गंध, फूल, फल, अक्षता व दार्भाग्रे ही अर्ध्य पात्रांत घालणेची शुद्ध द्रव्ये होत ७५.
एळा वाळा जातीफळ । लवंग कर्पूर कंकोळ ।
'आचमनपात्रीं' हा देव्यमेळ । शुद्ध जळ समायुक्त ॥ १७६ ॥
'आचमनपात्रीं' हा देव्यमेळ । शुद्ध जळ समायुक्त ॥ १७६ ॥
वेलदोडे, वाळा, जायफळ, लवंग, कापूर व कंकोळ हे 'आचमनीय' पात्रांत घालणेचे शुद्ध पदार्थ होत ७६.
पाद्यार्घ्याचमनीचार्थं त्रीणि पात्राणि देशिकः ।
हृदा शीर्ष्णाथ शिखाया गायत्र्या चाभिमन्त्रयेत् ॥ २२ ॥
हृदा शीर्ष्णाथ शिखाया गायत्र्या चाभिमन्त्रयेत् ॥ २२ ॥
[श्लोक २२] पूजा करणार्याने यानंतर तिन्ही पात्रे अनुक्रमे हृदयमंत्र, शिरोमंत्र आणि शिखामंत्राने अभिमंत्रित करून शेवटी गायत्रीमंत्राने तीनही अभिमंत्रित करावीत. (२२)
गुरुमंत्रदीक्षा जैसी ज्यासी । तोचि निजमार्ग शिष्यासी ।
तेणें पाद्यादि तिहीं पात्रांसी । संप्रदायेंसी मांडावे ॥ १७७ ॥
तेणें पाद्यादि तिहीं पात्रांसी । संप्रदायेंसी मांडावे ॥ १७७ ॥
गुरुमंत्राची दीक्षा असेल, तोच मार्ग शिष्याने धरून गुरुसंप्रदायाप्रमाणे, पाद्यादि तिन्ही पात्रे मांडावीत ७७.
पाद्य द्यावें हृदयमंत्रें । अर्घ्य अर्पावें शिरोमंत्रे ।
आचमन द्यावें शिखामंत्रें । गुरुसंस्कारें आगमोक्त ॥ १७८ ॥
आचमन द्यावें शिखामंत्रें । गुरुसंस्कारें आगमोक्त ॥ १७८ ॥
हृदयमंत्राने पाद्य द्यावें; शिरोमंत्र म्हणून अर्घ्य अर्पण करावें व शिखामंत्राने आचमनीय द्यावें. आगमोक्त गुरुसंस्कार असेल त्याप्रमाणे हे करावें ७८,
तेंचि तिनी पात्रें जाण । गायत्रीमंत्रें आपण ।
अभिमंत्रोनियां पूर्ण । देवार्पण करावीं ॥ १७९ ॥
अभिमंत्रोनियां पूर्ण । देवार्पण करावीं ॥ १७९ ॥
ही तिन्ही पात्रे आपण गायत्रीमंत्राने अभिमंत्रण करून देवाला अर्पण करावीत ७९.
गुरुसंप्रदाय नेटक । यालागीं त्यातें 'देशिक' ।
स्वयें बोलिला यदुनायक । दीक्षाविवेक निजद्रष्टा ॥ १८० ॥
स्वयें बोलिला यदुनायक । दीक्षाविवेक निजद्रष्टा ॥ १८० ॥
गुरुसांप्रदायाने पवित्र झाला असल्याकारणाने, आत्मद्रष्टा व दीक्षेचा विवेक जाणणारा जो श्रीकृष्ण त्याने स्वतः त्या पूजकाला 'देशिक' असे म्हटले आहे १८०.
आगमशास्त्रींचा निजमार्ग । भूतशुद्धि प्राणप्रतिष्ठायोग ।
तेणेंचि अन्वयें श्रीरंग । श्लोकार्थें साङ्ग सांगत ॥ ८१ ॥
तेणेंचि अन्वयें श्रीरंग । श्लोकार्थें साङ्ग सांगत ॥ ८१ ॥
आगमशास्त्राचा निजमार्ग, भूतशुद्धि, आणि प्राणप्रतिष्ठेचा योग, यासंबंधाने श्रीकृष्ण पुढील श्लोकार्थाने सर्व काही सांगतात ८१.
पिण्डे वाय्वग्निसंशुद्धे हृत्पद्मस्थां परां मम ।
अणवीं जीवकलां ध्यायेन्नादांते सिद्धभाविताम् ॥ २३ ॥
अणवीं जीवकलां ध्यायेन्नादांते सिद्धभाविताम् ॥ २३ ॥
[श्लोक २३] यानंतर प्राणायामाने प्राणवायू आणि शरीरातील अग्नी शुद्ध करून हृदयकमलामध्ये, सूक्ष्म अशा माझ्या श्रेष्ठ जीवकलेचे ध्यान करावे जिचे सिद्धांनी ॐकारातील नादाच्या शेवटी ध्यान केले आहे. (२३)
वायुबीजें आवाहूनी । पिंगला प्राण पूरूनि ।
तोचि कुंभकें स्तंभूनि । मात्राधारणीं धरावा ॥ १८२ ॥
तोचि कुंभकें स्तंभूनि । मात्राधारणीं धरावा ॥ १८२ ॥
वायुबीजानें आवाहन करून पिंगलानाडीने प्राण पूर्ण करून (उजव्या नाकपुडीने श्वास आंत घेऊन ) कुंभकानें तोच थांबवून मात्राधारणेनें धरावा (उदाहरणार्थ--पूरक चार मात्रांनी केला तर कुंभक १६ मात्रांनी व रेचक ८ मात्रांनी करावा) ८२.
वायु जो धारणा धरावा । तो जंव फुटेना अव्हासव्हा ।
तंवचि वरी निरोधावा । मग रेचावा शनैः शनैः ॥ १८३ ॥
तंवचि वरी निरोधावा । मग रेचावा शनैः शनैः ॥ १८३ ॥
वायु जो कोंडून धरावयाचा तो बाहेर भलत्याच मार्गाने जाणार नाही तोपर्यंतच थांबवून धरावा, आणि मग हळूहळू बाहेर सोडावा ८३.
ऐसें करितां प्राणधारण । स्वयें कल्पावें शरीरशोषण ।
शरीर शोषलें मानूनि जाण । देहदहन मांडावें ॥ १८४ ॥
शरीर शोषलें मानूनि जाण । देहदहन मांडावें ॥ १८४ ॥
असा प्राणायाम करीत असतां आपलें शरीर क्षीण झाले आहे अशी आपणच कल्पना करावी. अशा प्रकारे शरीर शुष्क झाले आहे असे मानून त्याचे दहन करूं लागावें ८४.
आदारस्थित जो अग्नी । तो अग्निबीजें चेतवूनी ।
तोचि देह लावूनि दहनीं । भस्म मानूनी निजदेह ॥ १८५ ॥
तोचि देह लावूनि दहनीं । भस्म मानूनी निजदेह ॥ १८५ ॥
मूलाधारचक्रामधील अग्नि अग्निमंत्राने जागृत करून तो आपल्या देहाला लावून त्याने आपला देह जळून भस्म झाला अशी कल्पना करावी ८५.
देह दहनें अतिसंतप्त । तेथ चंद्रबीजें चंद्रामृत ।
आणोनि निववाये समस्त । नवा देह तेथ कल्पावा ॥ १८६ ॥
आणोनि निववाये समस्त । नवा देह तेथ कल्पावा ॥ १८६ ॥
देह अग्नीनें अत्यंत तप्त झाला असें मानून चंद्राच्या बीजाने चंद्रामृत आणून तें सारें शरीर गारीगार करावें. आणि आपला देह नवाच झाला आहे अशी कल्पना करावी ८६.
देह कल्पावा जो एथ । पूर्ण पाटव्य इंद्रिययुक्त ।
त्याच्या हृदयपद्माआंत । अण्वी जीवकळा तेथ पहावी माझी ॥ १८७ ॥
त्याच्या हृदयपद्माआंत । अण्वी जीवकळा तेथ पहावी माझी ॥ १८७ ॥
यांत जो देह नवीन कल्पावयाचा तो, सर्व इंद्रियांनी युक्त, निरोगी व कार्यक्षम असा असावा, आणि त्याच्या हृदयकमलांत माझी 'अण्वी' म्ह. सूक्ष्म जीवकला आहे ती पहावी ८७.
माझी जीवकळा परम । सूक्ष्माहूनि अति सूक्ष्म ।
यालागीं 'अण्वी' तिचें नाम । विश्रामधाम जगाचें ॥ १८८ ॥
यालागीं 'अण्वी' तिचें नाम । विश्रामधाम जगाचें ॥ १८८ ॥
ती माझी श्रेष्ठ जीवकला सूक्ष्माहूनही अत्यंत सूक्ष्म आहे म्हणूनच तिला 'अण्वी' असे म्हणतात. तीच सर्व जगाचे विश्रांतिस्थान आहे ८८.
अकार उकार मकारस्थिती । यांतें प्रकाशे अण्वी जीवज्योती ।
ते तंव शब्दाहूनि परती । योगीं नादांतीं लक्षिजे ॥ १८९ ॥
ते तंव शब्दाहूनि परती । योगीं नादांतीं लक्षिजे ॥ १८९ ॥
अकार, उकार व मकार यांसही अण्वी जीवज्योतिच प्रकाशित करते. ती तर शब्दाहूनही परती (पलीकडे) असल्यामुळे योगी लोक नादाच्या शेवटी तिला पाहतात ८९.
ते देहीं सबाह्य परिपूर्ण । असोनि सूक्ष्मत्वें अलक्ष्य जाण ।
तीतें हृत्पद्मीं योगिजन । लक्षिती आसनप्राणायामें ॥ १९० ॥
तीतें हृत्पद्मीं योगिजन । लक्षिती आसनप्राणायामें ॥ १९० ॥
देहामध्ये ती अंतर्बाह्य परिपूर्ण भरलेली आहे, पण सूक्ष्मत्वामुळे भासत नाही. तिला योगी लोक आसन-प्राणायामादिकांच्या योगाने हृदयकमलांत पाहातात १९०.
ते अण्वी जीवकळा अव्यक्त । तीतेंकरोनियां व्यक्त ।
योगी निजभावनायुक्त । हृदयीं चिंतित महामूर्ती । १९१ ॥
योगी निजभावनायुक्त । हृदयीं चिंतित महामूर्ती । १९१ ॥
ती अण्वी जीवकला अव्यक्त असते, तिला योगी लोक आत्मनिष्ठेने व्यक्त करून तिची महामूर्ति हृदयामध्ये चिंतन करतात ९१.
'नार' जीवसमूह जाण । त्यांचे जें आयतनस्थान ।
ते महामूर्ति श्रीनारायण । हृदयीं सज्जन चिंतिती ॥ १९२ ॥
ते महामूर्ति श्रीनारायण । हृदयीं सज्जन चिंतिती ॥ १९२ ॥
'नार' म्ह. जीवसमुदाय, त्याचें जें 'आयतन' म्ह, आधारस्थान, तीच श्रीनारायणाची महामूर्ति; तिचें सज्जन लोक हृदयामध्ये चिंतन करितात ९२.
तयाऽऽत्मभूतया पिण्डे व्याप्ते संपूज्य तन्मयः ।
आबाह्यर्चदिषु स्थाप्य न्यस्ताङ्गं मां प्रपूजयेत् ॥ २४ ॥
आबाह्यर्चदिषु स्थाप्य न्यस्ताङ्गं मां प्रपूजयेत् ॥ २४ ॥
[श्लोक २४] भगवंतांचा तेजोमय अंश माझ्या हृदयात आहे त्या आत्मस्वरूप जीवकलेने सगळे शरीर व्यापून गेल्यावर मानसिक उपचारांनी तिची पूजा करावी त्यानंतर तन्मय होऊन आवाहन करावे आणि प्रतिमा इत्यादींमध्ये तिची स्थापना करावी नंतर मंत्रांनी प्रतिमेवर न्यास करून माझी पूजा करावी. (२४)
जेवीं गृह प्रकशी दीपस्थिती । तेवीं देह प्रकाशी जीवज्योती ।
ते सांगोपांग माझी मूर्ती । हृदयीं चिंतिती साकार ॥ १९३ ॥
ते सांगोपांग माझी मूर्ती । हृदयीं चिंतिती साकार ॥ १९३ ॥
दिवा ज्याप्रमाणे घराला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे जीवज्योति ही देहाला प्रकाशित करते. ती माझी सांगोपांग साकार मूर्ति हृदयामध्ये चिंतितात ९३.
जेवीं तूप तूपपणें थिजलें । तेंचि अवर्ण वर्णव्यक्ती आलें ।
तेवीं चैतन्य माझें मुसावलें । लीलाविग्रहें झालें साकार ॥ १९४ ॥
तेवीं चैतन्य माझें मुसावलें । लीलाविग्रहें झालें साकार ॥ १९४ ॥
तूप तूपपणाने थिजलें म्हणजे तें रंगहीन असताही रंगरूपास चढते, त्याप्रमाणेच माझे चैतन्य मुसावून लीलेने साकार झाले आहे ९४.
ऐशी ते माझी सगुण मूर्ती । चिन्मात्रतेजें हृदयदीप्ती ।
तिनें व्यापूनि देहाची स्थिती । चित्तीं निजभक्ती उपजवी ॥ १९५ ॥
तिनें व्यापूनि देहाची स्थिती । चित्तीं निजभक्ती उपजवी ॥ १९५ ॥
अशी ती माझी सगुण मूर्ति चिन्मात्र तेजाने हृदयाला प्रकाशित करते. तीच सर्व देह व्यापून मनामध्ये भक्ति उत्पन्न करते ९५.
देह जड मूढ अचेतन । तेथ मूर्ति प्रकटोनि चिद्घन ।
अचेतना करोनि सचेतन । करवी निजभजन उल्हासें ॥ १९६ ॥
अचेतना करोनि सचेतन । करवी निजभजन उल्हासें ॥ १९६ ॥
देह हा जड, मूढ व अचेतन आहे. त्यांत चिन्मय मूर्ति प्रगट होऊन अचेतनाला सचेतन करून उल्हासाने भजन करविते ९६.
जेवीं हरणुलीचें सोंग जाण । हरिणीरूपें नाचे आपण ।
तेवीं भक्तभावें नारायण । भजनपूजन स्वयें कर्ता ॥ १९७ ॥
तेवीं भक्तभावें नारायण । भजनपूजन स्वयें कर्ता ॥ १९७ ॥
हरणाचे घेतलेले सोंग, ज्याप्रमाणे हरणाच्याच रूपाने नाचत असते, त्याप्रमाणे भक्ताच्या रूपानें, भजनपूजन करणारा स्वतः नारायणच होय ९७.
यापरी अभेदभजन । मूर्ति पूजितां चिद्घन ।
पूज्य पूजक हे आठवण । सहजें जाण मावळे ॥ १९८ ॥
पूज्य पूजक हे आठवण । सहजें जाण मावळे ॥ १९८ ॥
ह्याप्रमाणे चिन्मय -चिद्घन मूर्तीची पूजा केली असतां अभेदभक्ति उत्पन्न होते; आणि पूज्य व पूजक ही आठवण सहजच मावळून जाते ९८.
मावळल्या हा भजनभेद । उल्हासे भक्तीचा अभेदबोध ।
हा गुरुमार्ग अतिशुद्ध । प्रिय प्रसिद्ध मजलागीं ॥ १९९ ॥
हा गुरुमार्ग अतिशुद्ध । प्रिय प्रसिद्ध मजलागीं ॥ १९९ ॥
हा भजनभेद नाहीसा झाला की, भक्तीचा अभेदबोध वाढत जातो. हाच अत्यंत शुद्ध, प्रसिद्ध व मला प्रिय असा गुरुमार्ग आहे ९९.
जेथ माझी अभेदभक्ती । तेथ मी सर्वस्वें श्रीपती ।
आतुडलों भक्तांच्या हातें । स्वानंदप्रीती उल्हासें ॥ २०० ॥
आतुडलों भक्तांच्या हातें । स्वानंदप्रीती उल्हासें ॥ २०० ॥
जेथे माझी अभेद भक्ति असते, तेथे मी स्वानंदप्रेमाच्या उल्हासाने सर्वस्वी भक्तांच्या अधीन होतो २००.
महत्वाचे संग्रह
वॉलपेपर

Loading...