मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
एकनाथी भागवत अध्याय २४ ओव्या ६०१ ते ६२७
सकळ संशयांचें छेदन । लिंगदेहाचें भेदन ।
करी तें सांख्ययोगज्ञान । उद्धवा जाण निश्चित ॥ १ ॥
हे उद्धवा ! जे ज्ञान सर्व संशयांचे छेदन करतें, लिंगदेहाचा भेद करिते, ते सांख्ययोगज्ञान होय असें अगदी निश्चित समज १.
अनुलोम प्रतिलोम । विवंचना वाटेल दुर्गम ।
हें न करितां सांख्य सुगम । आकळे तें वर्म सांगेन ऐक ॥ २ ॥
हें न करितां सांख्य सुगम । आकळे तें वर्म सांगेन ऐक ॥ २ ॥
आता अनुलोम आणि प्रतिलोम यांचे विवेचन फार कठीण वाटेल, पण हे विवेचन न करतांच सांख्य सुलभ रीतीने समजेल अशी युक्ति सांगतों ऐक २.
सांडूनि आकारविषमता । सर्व भूतीं भगवंतता ।
जो पाहे सद्भावता । सांख्य त्याचे हात समूळ आलें ॥ ३ ॥
जो पाहे सद्भावता । सांख्य त्याचे हात समूळ आलें ॥ ३ ॥
निरनिराळ्या आकारांत दिसणारे भेद सोडून देऊन सर्व प्राणिमात्रांत भगवंतस्वरूपच भरलेले आहे असें जो भावनापूर्वक पाहील, त्याच्या हाती समूळ सांख्य येईल ३.
कां जैसें होईल कर्माचरण । तैसें सुखेंचि हो आपण ।
मी कर्ता हें तूं न म्हण । इतुकेन ब्रह्म पूर्ण तूं होसी ॥ ४ ॥
मी कर्ता हें तूं न म्हण । इतुकेन ब्रह्म पूर्ण तूं होसी ॥ ४ ॥
किंवा कर्माचरण जसें होईल तसे आपोआप खुशाल होऊ या. मी कर्ता असें मात्र तूं म्हणू नकोस. इतके केलेस म्हणजे तू पूर्णब्रह्म होशील ४.
याहीवरती सुगमता । मज दिसेना सर्वथा ।
उद्धवा तुझे निजहितार्थ । जाण तत्त्वतां सांगीतलें ॥ ५ ॥
उद्धवा तुझे निजहितार्थ । जाण तत्त्वतां सांगीतलें ॥ ५ ॥
याहून अधिक सुलभ मार्ग मला मुळीच दिसत नाही. उद्धवा ! तुझ्या आत्मकल्याणासाठी मी तुला हें सांगितले ५.
हेंचि एक माझें वचन । विचारूनियां संपूर्ण ।
निजहितार्था आपण । अवश्य जाण करावें ॥ ६ ॥
निजहितार्था आपण । अवश्य जाण करावें ॥ ६ ॥
हेच एक माझें भाषण पूर्णपणे मनन करून आपल्या कल्याणाकरिता आपण त्याचे आचरण अवश्य करावें ६.
ऐसें बोलिला देवाधिदेवो । तेथ जडला उद्धवाचा भावो ।
निःशेष ‘अहं’ सांडितां पहा हो । ब्रह्म स्वयमेवो सहजचि ॥ ७ ॥
निःशेष ‘अहं’ सांडितां पहा हो । ब्रह्म स्वयमेवो सहजचि ॥ ७ ॥
असें देवाधिदेवांनी सांगितले तेव्हा त्याच्यावर उद्ध्वाची भक्ति जडली. अहो पहा ! नि:शेष अहंता सोडून दिली असता आपण आपोआप ब्रह्म होतों ७.
विचारितां सांख्यज्ञान । जगातें गोंवी अहंपण ।
अहंपाशीं जन्ममरण । दुःख दारुण अहंभावीं ॥ ८ ॥
अहंपाशीं जन्ममरण । दुःख दारुण अहंभावीं ॥ ८ ॥
सांख्यज्ञानाचा विचार केला असता असे दिसून येते की, सर्व जगाला अहंपणाच गोत्यात आणतो. 'अहं 'भावाजवळ जन्ममरण असते, आणि अहंभावाजवळ भयंकर दु:खही असते ८.
ऐसा अहंभावो कठिण । सांडितां न सांडे आपण ।
येचि गुंतीचें कारण । सर्वथा जाण कळेना ॥ ९ ॥
येचि गुंतीचें कारण । सर्वथा जाण कळेना ॥ ९ ॥
असा अहंभाव हा कठीण आहे. तो सोडावयाचा प्रयत्न केला तरी आपण होऊन सुटत नाही. पण त्याच्या अशा या गुंतागुंतीचे कारण काय, तें मात्र मुळीच कळत नाही ९.
हें पुसों जावें देवापाशीं । तेणें विशद सांगीतलें सांख्यासी ।
आतां आपुली गुंती आपल्यापाशीं । तेंचि आम्हासी कळेना ॥ ६१० ॥
आतां आपुली गुंती आपल्यापाशीं । तेंचि आम्हासी कळेना ॥ ६१० ॥
हे देवाला विचारावयास जावें, तर त्याने सांख्यशास्त्र स्पष्ट करून सांगितले आहे. तेव्हा आपली ही गुंतागुंत आपल्यापाशीच कशी राहिली तेच आम्हांला कळत नाही ६१०..
येचि अर्थीं श्रीकृष्ण । पंचविसावे अध्यायीं जाण ।
सगुण निर्गुणविभागें पूर्ण । गोड निरूपण सांगेल ॥ ११ ॥
सगुण निर्गुणविभागें पूर्ण । गोड निरूपण सांगेल ॥ ११ ॥
ह्याचकरितां श्रीकृष्ण पंचविसाव्या अध्यायामध्ये सगुण आणि निर्गुण ह्या दोन प्रकारांनी भेदाचें गोड निरूपण पूर्णपणे सांगेल ११.
ते सुरम रसाळ मधुर कथा । जेथ श्रीकृष्णाऐसा वक्ता ।
उद्धव शिरोमणि श्रोता । अनुपम स्वादुता ते ठायीं ॥ १२ ॥
उद्धव शिरोमणि श्रोता । अनुपम स्वादुता ते ठायीं ॥ १२ ॥
ती कथा सुरस, रसाळ आणि मधुर आहे. जेथे श्रीकृष्णासारखा सांगणारा आणि उद्धवासारखा श्रेष्ठ श्रोता, त्या ठिकाणी निरुपमच स्वाद चढलेला असणार १२.
त्या स्वादाचें गोडपण । सांगावया समर्थ श्रीकृष्ण ।
सेवावया श्रोता अतिसज्ञान । निजभक्त जाण उद्धव ॥ १३ ॥
सेवावया श्रोता अतिसज्ञान । निजभक्त जाण उद्धव ॥ १३ ॥
त्या स्वादाचे गोडपण सांगावयाला श्रीकृष्णच समर्थ आहे, आणि ती गोडी सेवन करण्याला अत्यंत ज्ञानसंपन्न असा त्याचा भक्त उद्धव श्रोता आहे १३.
ते देवभक्तसंवाद गोडी । वेदशास्त्रें न जोडे जोडी ।
आलोडितां ग्रंथकोडी । ते निजगोडी नातुडे ॥ १४ ॥
आलोडितां ग्रंथकोडी । ते निजगोडी नातुडे ॥ १४ ॥
देव आणि भक्त यांच्या त्या संवादांतील ती गोडी वेदशास्त्रांनी सुद्धा प्राप्त होणार नाही. कोट्यवधि ग्रंथांचे अवलोकन केले, तरी ती गोडी मिळावयाची नाही १४.
आतुडावया ते निजगोडी । जैं भाग्यें भावार्थें जोडे जोडी ।
भावार्थाचे निजआवडीं । जिव्हारींची गोडी देवो दे भक्तां ॥ १५ ॥
भावार्थाचे निजआवडीं । जिव्हारींची गोडी देवो दे भक्तां ॥ १५ ॥
ती खरी गोडी प्राप्त करून घ्यावयाची असेल, तर जेव्हा भाग्याने भावार्थानंच प्राप्त होईल तेव्हा होते. कारण भावार्थांच्या आवडीने देव आपल्या अंत:करणांतील गोडी आपल्या भक्तांना देतो १५.
एवं भावार्थापरतें कांहीं । देवासी आवडतें नाहीं ।
तो भावो नाहीं ज्यांचे ठायीं । ते मूर्ख पाहीं बालिश ॥ १६ ॥
तो भावो नाहीं ज्यांचे ठायीं । ते मूर्ख पाहीं बालिश ॥ १६ ॥
तात्पर्य, देवाला भावार्थाहून दुसरें कांहींच प्रिय नाही. तो भावच ज्यांच्या ठिकाणी नाही, ते मूर्ख केवळ अज्ञानी होत १६.
त्या बाळकांचा धन्य भावो । खापरें मांडूनि म्हणती देवो ।
तेथही प्रकटे देवाधिदेवो । धरिल्या निःसंदेहो विश्वास ॥ १७ ॥
तेथही प्रकटे देवाधिदेवो । धरिल्या निःसंदेहो विश्वास ॥ १७ ॥
जी मुले खापरें मांडून त्यालाच देव म्हणतात, त्या मुलांची भक्तीसुद्धा मोठी धन्य होय. आणि तेथेही निःसंशय विश्वास धरला असतां देवाधिदेव प्रगट होतो १७.
बाळकें दूध मागावयासाठीं । भावार्थें लागला देवापाठीं ।
कां क्षीराब्धि करूनि वाटी । उपमन्यावोठीं लाविली ॥ १८ ॥
कां क्षीराब्धि करूनि वाटी । उपमन्यावोठीं लाविली ॥ १८ ॥
उपमन्यु बालक दूध मागण्यासाठी भावार्थाने देवाच्या पाठीस लागला, तेव्हां क्षीरसागराचीच वाटी करून उपमन्यूच्या तोंडाला लावली १८.
एवं भाविकू देवाचा लाहणा । देवो भाविकांचा आंदणा ।
भावेंवीण देवो जाणा । कधीं कोणा न भेटे ॥ १९ ॥
भावेंवीण देवो जाणा । कधीं कोणा न भेटे ॥ १९ ॥
तात्पर्य, भाविक असतो तोच देवाचा आवडता असतो, आणि देवही भाविकांचा सेवक असतो. भावाशिवाय देव कधीच कोणाला भेटत नाही १९.
यालागीं जेथ भावार्थ । तेथचि जोडे सुखस्वार्थ ।
भावार्थ तेथ परमार्थ । साङ्ग साद्यंत सांपडे ॥ ६२० ॥
भावार्थ तेथ परमार्थ । साङ्ग साद्यंत सांपडे ॥ ६२० ॥
म्हणून जेथे भावार्थ असतो, तेथेच सुखाचा लाभ होतो. जेथे भावार्थ असतो, तेथेंच परमार्थही पूर्णपणे सांपडतो ६२०.
ऐसा वाढिविल्या भावार्थ । तेणें जोडे निर्गुणनिजस्वार्थ ।
तेचि अर्थींचा वृत्तांत । पुढिल्या अध्यायांत हरि सांगे ॥ २१ ॥
तेचि अर्थींचा वृत्तांत । पुढिल्या अध्यायांत हरि सांगे ॥ २१ ॥
अशा प्रकारे भावार्थ वाढविला तर त्या योगाने निर्गुणप्राप्तीचीही आपली इच्छा तृप्त होते. त्याच अर्थाचा वृत्तांत पुढच्या अध्यायांत श्रीकृष्ण सांगेल २१.
ते कथेचें गोडपण । अमृतास विसरवी जाण ।
ऐसें रसाळ निरूपण । सादरें श्रीकृष्ण सांगेल ॥ २२ ॥
ऐसें रसाळ निरूपण । सादरें श्रीकृष्ण सांगेल ॥ २२ ॥
ज्या कथेचे गोडपण अमृताचाही विसर पाडील, असें रसभरित निरूपण श्रीकृष्ण अगत्यपूर्वक सांगेल २२.
तें श्रीकृष्णकथापीयूख । श्रोत्याचें पावे श्रवणमुख ।
एका जनार्दनीं अतिसुख । सकौतुक व्याख्यान ॥ २३ ॥
एका जनार्दनीं अतिसुख । सकौतुक व्याख्यान ॥ २३ ॥
ते श्रीकृष्णाचे कथामृत श्रोत्यांच्या श्रवणरूपी मुखांत पडेल. एकनाथस्वरूपी जनार्दनालाही अत्यंत आनंद होऊन तो मोठ्या कौतुकाने त्याचे व्याख्यान करील २३.
श्रीभागवत अत्यादरें । श्रीकृष्णकथा सविस्तरें ।
अहेर विस्तारिले साजिरे । परमार्थाळंकारें साळंकृत ॥ २४ ॥
अहेर विस्तारिले साजिरे । परमार्थाळंकारें साळंकृत ॥ २४ ॥
श्रीभागवताने मोठ्या सन्मानाने श्रीकृष्णकथेच्या विस्ताराचा उत्तम अहेर पसरलेला आहे, आणि परमार्थरूप अलंकारानें तो शोभिवंत केलेला आहे २४.
तेणें संत सज्जन सोयरे । गौरवीन श्रवणादरें ।
एका जनार्दनकृपाकरें । आविष्करे सामर्थ्य ॥ २५ ॥
एका जनार्दनकृपाकरें । आविष्करे सामर्थ्य ॥ २५ ॥
त्या अहेराच्या श्रवणाविषयी आदर उत्पन्न करून मी आमचे आप्त जे संतसज्जन, त्यांचा गौरव करीन, एकनाथावर जनार्दनांनी कृपा केल्यामुळे तो एवढे सामर्थ्य प्रगट करीत आहे २५.
गौरविले सोयरे सज्जन । म्हणाल उपेक्षिले इतर जन ।
जो श्रीभागवतीं सावधान । तो परमार्थें जाण गौरवे ॥ २६ ॥
जो श्रीभागवतीं सावधान । तो परमार्थें जाण गौरवे ॥ २६ ॥
सोयरे जे सज्जन त्यांचाच मात्र आदरसत्कार केला, आणि इतरांची उपेक्षा केली असें म्हणाल, तर तसे नव्हे. जो श्रीभागवत लक्ष देऊन श्रवण करील, त्याचा परमार्थानेच गौरव होईल २६.
भावार्थासारिखें गौरवण । एका जनार्दन जाण ।
एका जनार्दना शरण । आपण्या आपण गौरवी ॥ ६२७ ॥
एका जनार्दना शरण । आपण्या आपण गौरवी ॥ ६२७ ॥
खरोखर भावार्थ हाच मुख्य गौरव आहे. तोच एकनाथस्वरूपी जनार्दन जाणतो, म्हणून एकनाथही जनार्दनाला शरण जाऊन आपला आपणच गौरव करून घेत आहे ६२७.
इति श्रीभागवते महापुरणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे
एकाकारटीकायां प्रकृतिपुरुषसांख्ययोगो नाम चतुर्विंशोऽध्यायः ॥ २४ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ २९ ॥ ओव्या ॥ ६२७ ॥
एकाकारटीकायां प्रकृतिपुरुषसांख्ययोगो नाम चतुर्विंशोऽध्यायः ॥ २४ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ २९ ॥ ओव्या ॥ ६२७ ॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां एकादशस्कन्धे चतुर्विंशोऽध्यायः ॥ २४ ॥ चोविसावा अध्याय समाप्त.
महत्वाचे संग्रह
वॉलपेपर

Loading...