मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    वसुबारसेची कहाणी


    आटपाट नगर होत. तिथं एक कुणब्याची म्हातारी होती. तिला एक सून होती. गाईगुरं होती, ढोरं म्हशी होत्या, गव्हाळीं मुगाळीं वांसरं होतीं. एके दिवशीं काय झालं? आश्विनमास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशीं म्हतारी सकाळीं उठली. शेतावर जाऊं लागली.

    सुनेला हाक मारली, ‘मुली मुली, इकडे ये” सून आली. ‘काय’ म्हणून म्हणाली. तशी म्हातारी म्हणाली. “मी शेतावर जातें. दुपारी येईन. तूं माडीवर जा, गव्हाचे मुगांचे दाणे काढ, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव.” असं सांगितलं. आपण निघून शेतावर गेली. सून माडीवर गेली. गहूं मूग काढून ठेवले. खालीं आली. गोठ्यांत गेली. गव्हाळीं मुगाळीं वासरं उड्या मारीत होती, त्यांना ठार मारलं, चिरलं व शिजवून ठेवून सासूची वाट पहात बसली.

    दुपार झाली. तशी सासू घरी आली. सुनेनं पान वाढलं. सासूनं देखिलं. तांबडं मांस दृष्टिस पडलं. तिनं ;हे कायं’ म्हणून सूनेला पुशिलं. सुनेनं सर्व हकीकत सांगितली. ‘तुम्ही सांगितलं तसं केलं’ म्हणाली. सासू घाबरली. न समजता सूनेकडून चुकी घडली, म्हणून तशीच उठली. देवापाशी जाऊन बसली. प्रार्थना केली, “देवा, हा सुनेच्या हातून अपराध घडला. तिला ह्याची क्षमा कर. गाईंची वासरं जिवंत कर. असं न होईल तर संध्याकाळीं मी आपला प्राण देईन.” असा निश्चय केला. देवापाशीं बसून राहिली. देवानं तिचा एकनिश्चय पाहिला. निष्कपट अंतःकरण देखिलं. पुढं संध्याकाळीं गाई आल्या. हंबरडे फोडूं लागल्या. तशी देवाला चिंता पडली. ‘हिचा निश्चय ढळणार नाही’ असं देवाला वाटले. मग देवानं काय केलं?

    गाईंची वासरं जिवंत केली, तीं उड्या मारीत मारीत प्यायला गेलीं. गाईचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला. सुनेला आश्चर्य वाटलं. तसा सर्वांना आनंद झाला. नंतर म्हातारीनं गाईगोर्‍ह्यांची पूजा केली. स्वयंपाक जेवली, आनंदी झाली. असे तुम्ही आम्ही होऊं.

    ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी, देवाब्राह्मणाचे द्वारीं, पिंपळाच्या पारीं, गाईंच्या गोठी सुफळ संपूर्ण.

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...