मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ ओव्या १ ते १००

    ​ओवी : श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
    ॐ नमो सद्‌गुरु चतुरक्षरा । चतुरचित्तप्रबोधचंद्रा ।
    'जनार्दना' सुरेंद्रइंद्रा । ज्ञाननरेंद्रा निजबोधा ॥१॥
    हे ओंकारस्वरूपी चतुरक्षरी देवा ! हे चतुरांच्या चित्ताला आल्हाद देणाऱ्या प्रबोधचंद्रा ! हे इंद्राच्याही इंद्रा, जनार्दना ! हे ज्ञाननरेंद्रा, निजबोधरूपा ! तुला नमस्कार असो १.

    ओवी : तुझी करितांचि गोठी । प्रगटसी पाठींपोटीं ।
    सन्मुख ठसावसी दृष्टी । हृदयगांठी छेदूनी ॥२॥
    तुझी गोष्ट काढली की, तूं आंतून व बाहेरूनही प्रगट होतोस. हृदयाची गांठ (चिदचिद्‌ग्रंथि) तोडून दृष्टीसमोर उभा राहतोस २.


    ओवी : छेदूनि विषयवासना । स्वयें प्रगटसी जनार्दना ।
    भवअभवभावना । नेदिसी मना आतळों ॥३॥
    हे जनार्दना ! विषयवासनेचा उच्छेद करून तूं स्वतः प्रगट होतोस आणि संसार किंवा असंसार ह्यांची भावना मनाला शिवू देत नाहींस ३.


    ओवी : आतळतां तुझे चरण । आकळलें राहे मन ।
    सहज देशी समाधान । आनंदघन अच्युता ॥४॥
    तुझ्या चरणांचा स्पर्श झाला की, मन हें स्थिर होऊन राहते. आणि मग हे आनंदघना अच्युता ! तूं सहज समाधान देतोस ४.


    ओवी : ऐशिया जी गुरुनाथा । समसाम्यें चरणीं माथा ।
    पुढील परिसावी जी कथा । जेथ वक्ता श्रीकृष्णु ॥५॥
    अशा हे गुरुनाथा ! तुमच्या चरणांवर एकात्मभावानें मस्तक ठेवतों; आणि विनंति करतों की, पुढील कथा जीत प्रत्यक्ष श्रीकृष्णाचेंच भाषण आहे ती श्रवण करावी ५.


    ओवी : उद्धवें विनविलियावरी । कृपा कळवळला श्रीहरी ।
    निजज्ञान अतिविस्तारीं । बोधकुसरीं सांगतु ॥६॥
    उद्धवानें विनंति केली तेव्हां श्रीकृष्णाच्या मनांत कृपा उत्पन्न होऊन त्यास गहिवर आला आणि त्यानें मोठ्या कौशल्यानें आत्मज्ञान विशद करून सांगण्यास आरंभ केला ६.


    ओवी : होतें कृष्णाचे मानसी । 'मज गेलिया निजधामासी ।
    माझें निजज्ञान कोणापासीं । अतियत्नेंसीं ठेवावें'॥७॥
    कृष्णाच्या मनांतही हेच होते, की मी निजधामाला गेल्यावर माझें निजज्ञान म्हणून जे आहे, ते यत्नपुरःसर कोणापाशी ठेवावें ? ७.


    ओवी : तंव देखिली उद्धवाची अवस्था । सुख जाहलें श्रीकृष्णनाथा ।
    वैराग्ययुक्त उपदेशिता । होय सर्वथा निजज्ञान ॥८॥
    इतक्यांत उद्धवाचीही कळकळ दृष्टी पडली व श्रीकृष्णाला फारच संतोष झाला, म्हणून त्यानें वैराग्ययुक्त संपूर्ण आत्मज्ञानाचा उपदेश करण्यास आरंभ केला ८.


    ओवी : एवं वांचवावया उद्धवासी । कृष्ण ब्रह्मज्ञान उपदेशी ।
    शाप न बाधी ब्रह्मवेत्यांसी । हें हृषीकेशी जाणतु ॥९॥
    उद्धवाला ब्रह्मशापांतून वाचविण्यासाठी ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणे जरूर होते; कारण, ब्रह्मवेत्याला काही शापाची बाधा होत नाही, हे श्रीकृष्ण जाणत होता ९.


    ओवी : ब्रह्मउपदेशाची हातवटी । उपदेशूं जाणे जगजेठी ।
    वैराग्य उपजवी उठाउठीं । जेणें पडे मिठी निजतत्वीं ॥१०॥
    ब्रह्मज्ञानाचा उपदेश मनांत कसा ठसवावा, ह्याची हातोटी पूर्णपणे माहीत होती. म्हणून ज्याच्या योगानें आत्मतत्त्वालाच मिठी पडेल, असें वैराग्य तो हां हां म्हणतां उत्पन्न करीत असे १०.


    ओवी : नव्हतां वैराग्य दारुण । उपदेशु केला तो वृथा जाण ।
    हे श्रीकृष्णचि जाणे खूण । वैराग्यविंदान बोलतु ॥११॥
    तत्त्व चांगल्या रीतीनें सांगितले, पण प्रखर वैराग्य उत्पन्न झाले नाही, तर केलेला उपदेश व्यर्थ होतो, ही खूण कृष्णाला माहीत होती, म्हणून त्यानें वैराग्याचे तत्त्व सुंदर रीतीनें सांगितले ११.


    ओवी : पहिलें उद्धवाच्या बोलासी । अनुमोदन दे हृषीकेशी ।
    तेणें अन्वयें सावकाशीं । ज्ञानवैराग्य त्यासी बोलतु ॥१२॥
    कृष्णांनी प्रथमतः उद्धवाच्या भाषणाला अनुमोदन दिले. आणि मग त्यावरूनच संदर्भासंदर्भानें हळूहळू ज्ञानवैराग्यासंबंधी तो बोलू लागला १२.


    ओवी : श्रीभगवानुवाच -
    यदात्थ मां महाभाग तच्चिकीर्षितमेव मे ।
    ब्रह्माभवो लोकपालाः स्वर्वासं मेऽभिकाङ्‌क्षिणः ॥ १ ॥
    [श्लोक १]-श्रीकृष्ण म्हणाले हे उद्धवा ! तू मला जे म्हणालास, तेच मी करू इच्छितो ब्रह्मदेव, शंकर, इंद्र इत्यादी लोकपालांनासुद्धा मी त्यांच्या लोकात यावे, असे वाटते. (१)


    ओवी : जो वेदांचा वेदवक्ता । जो ज्ञानियांचा ज्ञानदाता ।
    तो श्रीकृष्णु म्हणे भाग्यवंता । ऐकें निजभक्ता उद्धवा ॥१३॥
    जो वेदांचा वेदवक्ता व ज्ञान्यांचा ज्ञानदाता, तो श्रीकृष्ण म्हणाला-भाग्यवान् भक्ता उद्धवा ऐक १३.


    ओवी : जें तूं बोलिलासी भावयुक्त । तें वचन तुझें सत्य सत्य ।
    तेचिं माझें मनोगत । जाण निश्चित निर्धारें ॥१४॥
    तूं हें भावयुक्त भाषण केलेस तें तुझें भाषण एकवार नव्हे, त्रिवार सत्य आहे आणि खरोखर माझा मनोदयही तसाच आहे १४.


    ओवी : माझी अवस्था जाश्वनीळा । ब्रह्मादिदेवां सकळां ।
    येथ आले होते मिळोनि मेळा । लोकपाळांसमवेत ॥१५॥
    माझी अवस्था म्हणजे उत्कंठा शंकर ब्रह्मदेव इत्यादि सार्‍या देवांना कशी लागली आहे, लोकपाळांसहवर्तमान त्यांचा घोळकाच्या घोळका येथे येऊन गेला १५,


    ओवी : येऊनि माझी घेतली भेटी । अपेक्षा जे होती पोटी ।
    पुशिली माझ्या प्रयाणाची गोठी । जेणें तुज मोठी अवस्था ॥१६॥
    त्यांनी माझी भेट घेतली, आणि माझ्या पोटांत जी इच्छा होती ती प्रयाणकालाची गोष्ट त्यांनी विचारली, म्हणून तुला अत्यंत वाईट वाटत आहे १६.


    ओवी : म्यां वेगीं यावें वैकुंठा । हे समस्तांसी उत्कंठा ।
    आदिकरून नीळकंठा । सुरवरिष्ठां झालीसे ॥१७॥
    शंकर आदिकरून सर्व देवांना मी लौकर वैकुंठास यावे अशी उत्कंठा लागून राहिली आहे १७.
    ज्यालागीं ब्रह्मेनि प्रार्थिलें । तें देवकार्य म्यां संपादिलें ।
    अवतार नटनाट्य धरिलें । ज्येष्ठत्व दिधलें बळिभद्रा ॥१८॥
    पूर्वी ज्यासाठी ब्रह्मदेवानें प्रार्थना केली होती, ते देवांचे कार्य मी सिद्धीस नेले. मनुष्यरूप धारण करून बळरामाला मोठेपण दिले १८;


    ओवी : ज्येष्ठकनिष्ठभावना । दोघांमाजीं नाहीं जाणा ।
    कृष्णा आणि संकर्षणा । एकात्मता निजांशें ॥१९॥
    पण उभयतांमध्यें लहानमोठेपणाची मुळीसुद्धा भावना नाही. कृष्णामध्यें आणि बळरामामध्यें निजांशानें एकात्मताच होती १९.

    ओवी : उरलें असे आमुचें कुळ । शापनिर्दग्ध केवळ ।
    अन्योन्यविग्रहें सकळ । कलहमूळ नासेल ॥२०॥
    आतां शापाग्नीनें दग्ध झालेले आमचें कुल बाकी राहिलेले आहे, तेही परस्परांत कलह होऊन नाशाला जाईल २०.


    ओवी : भूमि मागोनि समुद्रापाशीं । म्यां रचिलें द्वारकेसी ।
    मज गेलिया निजधामासी । तो सातवे दिवसीं बुडवील ॥२१॥
    मी समुद्रापासून जमीन मागून घेऊन द्वारका वसविली. मी निजधामास गेलों की, तो ती सातव्याच दिवशी बुडवून टाकील २१.

    ओवी : ऐकें उद्धवा हितगोष्टी । म्यां सांडलिया हे सृष्टि ।
    थोडियाचि काळापाठीं । नष्टदृष्टी जन होती ॥२२॥
    हे उद्धवा ! तुला हिताची गोष्ट सांगतों ऐक, मी हे जग सोडून गेलों की, पाठीमागें थोड्याच दिवसांत लोक नष्टबुद्धि होतील २२.


    ओवी : अधर्म वाढेल प्रबळ । लोक होतील नष्ट अमंगळ ।
    ते अमंगळतेचें मूळ । ऐक समूळ सांगेन ॥२३॥
    अतिशय अधर्म माजून राहील, लोक नष्ट आणि अमंगल होतील. त्या अमंगलतेचे कारण समूळ सांगतो ऐक २३.


    ओवी : मज नांदतां ये सृष्टीं । कलि उघडूं न शके दृष्टी ।
    मज गेलियापाठीं । तो उठाउठीं उठेल ॥२४॥
    मी जोपर्यंत ह्या सृष्टीमध्यें वावरतों आहे, तोपर्यंत कलीची डोळा उघडून पाहण्याची प्राज्ञा नाही; पण मी गेलों की तो लागलाच चवताळून उठेल २४.


    ओवी : कलि वाढेल अतिविषम । ब्राह्मण सांडितील स्वधर्म ।
    स्वभावें नावडे दानधर्म । क्रियाकर्म दंभार्थ ॥२५॥
    कलीचें दुर्धर प्राबल्य झाले म्हणजे ब्राह्मण आपला स्वधर्म टाकून देतील; दानधर्म मुळीच नकोसा होऊन केवळ ढोंग दाखविण्याकरतां क्रियाकर्मे करतील २५.

    ओवी : म्यां सांडिलिया महीतळी । प्रबळ बळें वाढेल कळी ।
    आजीच तुवां निघिजे तत्काळीं । जंव तो कळी नातळे ॥२६॥
    मी पृथ्वीचा पृष्ठभाग सोडला की, कलि अतिशय माजेल. ह्याकरतां त्या कलीनें भूमीला जोपर्यंत स्पर्श केला नाही, तोपर्यंत आजच्या आज तूं निघण्याची तयारी कर २६.


    ओवी : कळी आतळेल जेव्हां । जनीं अधर्मु वाढेल तेव्हां ।
    कुविद्येच्या उठती हांवा । सैंघ धांवा निंदेच्या ॥२७॥
    कलि जेव्हां संचार करील तेव्हां लोकांत अधर्म वाढेल, कुविद्येची बंडें उठतील, आणि निंदेच्या शर्यतीच सुरू होतील २७.


    ओवी : न लभे स्वार्थाची कवडी । तरी करिती निंदेच्या कोडी ।
    ऐसी कलियुगीं वस्ती कुडी । तुवां अर्ध घडी न रहावें ॥२८॥
    कवडीचासुद्धा स्वार्थ लाभणार नाही, पण निंदेचे डोंगर उभारतील, अशी कलियुगांतील वाईट वस्ती आहे, करतां तूं अर्ध घटका येथे राहूं नकोस २८.

    ओवी : उद्धवा तूं यालागीं । येथोनि निघावें वेगीं ।
    एकलाचि आंगोवांगीं । हितालागीं सर्वथा ॥२९॥
    ह्यासाठी उद्धवा ! आपल्या कल्याणाकरतां तूंही येथून एकटाच लोकर निघून जा २९.


    ओवी : धनधान्यसमृद्धीसीं । सांडावें स्वजनगोत्रजांसी ।
    भ्रातादुहितानिजभगिनींसी । स्त्री-पुत्रासी त्यजावें ॥३०॥
    धन्यधान्यांची कोठारे असतील तरी ती टाकून दे; आप्त इष्ट असतील त्यांना सोड; आपल्या भाऊबहिणी, बायका, मुले ह्यांचीही आशा धरूं नको ३०.


    ओवी : स्नेहो ठेवूनि घरदारीं । अंगें तूं जरी निघालासि बाहेरी ।
    तरी तो त्यागूचि कठिण भारी । अनर्थकारी होईल ॥३१॥
    घरादारांत आशा ठेवून तूं नुसत्या शरीरानेंच बाहेर निघालास, तर तो त्यागच मोठा कठीण व अनर्थकारक होईल ३१.


    ओवी : आधीं समूळ स्नेहो सांडावा । पाठीं अभिमानुही दंडावा ।
    वासनाजटाजूट मुंडावा । मग सांडावा आश्रमु ॥३२॥
    पहिल्यांदा स्नेह समूळ सोडून द्यावा; पाठीमागून अभिमानालाही दंडण करावें; नंतर वासनारूप जटाजूटाचे मुंडण करावे आणि मग आश्रमांतून बाहेर पडावे ३२.


    ओवी : 'स्नेहो कैसेनि सांडे । अभिमानु कैसेनि दंडे'।
    हें तुज वाटेल सांकडें । तरी रोकडें परियेसीं ॥३३॥
    आतां स्नेह कसा तुटेल ? अभिमानाला, दंड कसा लागेल ? हे तुला संकट वाटत असेल तर तेही सांगतो ऐक ३३.


    ओवी : माझें स्वरूप जें सर्वगत । तेथ ठेवोनियां चित्त ।
    सावधानें सुनिश्चित । राहावें सतत निजरूपीं ॥३४॥
    सर्वव्यापी जे माझें स्वरूप आहे तेथे चित्त ठेवून, निश्चयानें आणि सावधपणानें त्या आत्मस्वरूपांतच निरंतर राहावें ३४.


    ओवी : तये स्वरूपीं चित्ता । निर्धारेंसीं धारणा धरितां ।
    निजभावें तन्मयता । तद्रूपता पावेल ॥३५॥
    त्या व्यापक स्वरूपामध्यें निश्चयानें धारणा ठेवली. म्हणजे त्या निजभावाच्या योगें चित्त तन्मय होऊन त्याला तद्‌रूपता प्राप्त होते ३५.


    ओवी : भृंगी जड कीटी मूढ । ध्यानें तद्रूप होय दृढ ।
    अभ्यासीं कांहीं नाहीं अवघड । तो अभ्यास गूढ विशद केला ॥३६॥
    भृंगी ही जड असते व आळी ही मूढच असते. तरी दृढ ध्यानानें ती तद्‌रूप होते. तात्पर्य, अभ्यास केला म्हणजे काहींच अवघड नाही. तो गूढ अभ्यास मी तुला स्पष्ट सांगितला ३६.


    ओवी : माझें स्वरूप ज्ञानघन । ध्याता जीवु स्वयें सज्ञान ।
    या स्थितीं करितां ध्यान । सहजें जाण तद्रूप ॥३७॥
    माझें स्वरूप तर ज्ञानघनच आहे आणि ध्यान करणारा जीवही सज्ञानच असतो. त्यामुळें अशा रीतीनें ध्यान केल्यानें तोही तद्‌रूपच होतो ३७.


    ओवी : तेथ समसाम्यें समस्त । समत्व पावेल चित्त ।
    तेणें समभावें निश्चित । तेथींचा तेथ रहावें ॥३८॥
    तेथें सारी समदृष्टीच होत असल्यानें चित्तही समत्वालाच प्राप्त होते; तो समभावच निश्चयानें वाढवून जेथल्या तेथे राहावें ३८.


    ओवी : आधीं गृहाश्रमातें त्यागावें । मग म्यां म्हणसी कोठें राहावें ।
    ऐसें मानिसील स्वभावें । तेविखीं बरवें परियेसीं ॥३९॥
    आधीं गृहस्थाश्रमाला सोडावें, आणि मग मी कोठे राहावें, असें तुझ्या मनांत येणे स्वाभाविक आहे. तर त्याविषयीही नीट ऐक ३९.


    ओवी : स्वरूपसाम्यें समदृष्टी । समभावें विचरें सृष्टीं ।
    निवासस्थानांची आटाटी । सर्वथा पोटीं न धरावी ॥४०॥
    स्वरूपसाम्यानें समदृष्टि होते; त्या समदृष्टीनेंच तूं सृष्टीत फिरत राहा. राहण्याच्या स्थानासाठी तूं मनांत काळजी अथवा योजना करूं नकोस ४०.


    ओवी : जेथ अल्प काळ वसती घडे । त्या ठायाचा अभिमान चढे ।
    वसतिस्थान ऐसें कुडें । वस्तीचें सांकडें सर्वथा न धरीं ॥४१॥
    थोडा काळ जरी एके ठिकाणी वस्ती घडली, तरी त्या स्थानाचा अभिमान चढतो. ह्याप्रमाणें वसतिस्थान खोटें आहे, ह्याकरतां स्थानाची खटपट तूं मुळीच करूं नको ४१.


    ओवी : तूं सर्वीं सर्वगत होसी । सर्वाधार सर्वदेशी ।
    ऐसा मी होऊन मज पावसी । न हालतां येसी निजधामा ॥४२॥
    तूं सर्वी सर्वगत, सर्वाधार व सर्वदेशी झालास म्हणजे मी होऊन मला पावशील, आणि न हालतांचालतां निजधामाला येशील ४२.


    ओवी : 'मज निजधामा न्यावें'। होतें पुशिलें उद्धवें ।
    तें निजबोधस्वभावें । स्वयें केशवें सांगितलें ॥४३॥
    मला निजधामाला न्यावे असे उद्धवानें विचारले होते, तो उपाय आत्मबोधाच्या रूपानें स्वतः श्रीकृष्णानें सांगितला ४३.


    ओवी : न करितां हे उपायस्थिती । सर्वथा न घडे माझी प्राप्ती ।
    मग तूं निजधामाप्रती । कैशा गती येशील ॥४४॥
    असा उपाय जर केला नाही, तर माझी प्राप्ति कधीच व्हावयाची नाही. मग तूं निजधामाला कशा रीतीनें येणार ? ४४.


    ओवी : गरुडीं वाऊनि वेगेंसीं । न्यावें निजधामा म्हणसी ।
    गति तेथ नाहीं पाखांसी । गम्य गरुडासी तें नव्हे ॥४५॥
    गरुडावर बसवून मला लौकर निजधामाला न्यावे असें म्हणशील, पण पंखाची गति येथे नसल्यामुळें गरुडाला तेथे जातांच येत नाहीं ४५.


    ओवी : सांडूनि उभय पक्षांसी । साधक पावती मद्रूपासी ।
    पक्षाभिमान असे गरुडासी । गमन त्यासी तेणें नव्हे ॥४६॥
    म्हणून साधक आहेत ते उभय पक्ष सोडून देऊनच मद्‌रूपाला पावतात. पण गरुडाला पक्षाभिमान आहे, म्हणून त्याला तेथे जाता येत नाहीं ४६.


    ओवी : म्हणसी न्यावें घेवोनि खांदीं । मज खांदाचि नाहीं त्रिशुद्धी ।
    तुज न सांडितां अहंबुद्धी । गमनसिद्धी तेथ नाहीं ॥४७॥
    आतां तूं म्हणशील की, मला खांद्यावरून घेऊन जा, पण मला खरोखर खांदाच नाही. ह्याकरतां अहंबुद्धि सोडल्याशिवाय तुला तेथें जातां येणार नाहीं ४७.


    ओवी : न त्यागितां अहंभावस्थिती । केल्या नाना उपाययुक्ती ।
    तेणें निजधामाप्रती । नव्हे गती सर्वथा ॥४८॥
    अहंभाव न सोडतां कितीही उपाय आणि कितीही युक्तिप्रयुक्ति केल्या, तरी निजधामांत प्रवेश व्हावयाचा नाहीं ४८.


    ओवी : जें जें देखसी साकार । तें तें जाण पां नश्वर ।
    तेचि विखींचा निर्धार । करीं साचार निजबोधें ॥४९॥
    साकार म्हणून जेवढे जेवढें तूं पाहतोस, तेवढे सारें नाशवंत आहे. ह्या गोष्टीचा तूं निजबोधानें निश्चय कर ४९.
    जें जें 'दृष्टीं' देखिलें । तें तें दृष्यत्वें वाळिलें ।

    ओवी : जें जें 'श्रवणा' गोचर झालें । तेंही वाळिलें शब्दत्वें ॥५०॥
    दृष्टीनें जें जें पाहावें तें तें दृश्यत्वामुळेच नाहीसे होते, कानाला जें जें कळते ते ते शब्दत्वानें लयास जातें ५०.


    ओवी : जें जें 'वाचा' वदे । तें तें वाळिजे जल्पवादें ।
    वाचिक सांडविलें वेदें । 'नेति' शब्दें लाजिला ॥५१॥
    वाणी जें जें बोलते, तें तें वितंडवादानें बुडते. म्हणून वेदानें बोलणेच सोडून देऊन 'नेति' शब्दानेंच तो लाजून गेला ५१.


    ओवी : जें जें 'संकल्पें' आकळिलें । तें तें कल्पित पैं झालें ।
    जें जें 'अहंकारा' आलें । तें तें वाळिलें विजातीय ॥५२॥
    मनाच्या संकल्पानें हें आकलन केले, तें कल्पितच होऊन बसलें ! आणि अहंकाराला जे विषय झाले, ते विजातीयत्वामुळें फुकट गेले ५२.


    ओवी : जें जें 'इंद्रियां' गोचरें । तें तें जाण पां नश्वरें ।
    हें नित्यानित्यविचारें । केलें खरें निश्चित ॥५३॥
    इंद्रियांना जेवढे गोचर होते, तेवढें सारें नश्वर असते. ह्याप्रमाणें नित्यानित्यविचारानें निश्चित केले आहे ५३.


    ओवी : तोही 'नित्यानित्यविवेक' । जाण पां निश्चित मायिक ।
    एवं मायामय हा लोक । करी संकल्प सृष्टीतें ॥५४॥
    पण तो नित्यानित्यविवेक सुद्धा मायिकच आहे हे लक्षात ठेव. मिळून हा सारा लोक मायामयच आहे. आणि माया संकल्प सृष्टीच उत्पन्न करते ५४.


    ओवी : जेव्हडा देखसी संसार । तेव्हडा मायिक व्यवहार ।
    हा वोळख तूं साचार । धैर्यनिर्धार धरोनी ॥५५॥
    संसार म्हणून जेवढा तुझ्या दृष्टीस पडतो, तेवढा सारा मायिक व्यवहार आहे, ह्याप्रमाणें तूं खरोखर धैर्याचा निर्धार धरून त्याला ओळख (मनांतून पक्के समज) ५५.


    ओवी : जैशी स्वप्नींची राणीव । केवळ भ्रमचि जाणीव ।
    तैसेंचि जाण हें सर्व । भववैभवविलास ॥५६॥
    स्वप्नांतील राज्य ज्याप्रमाणें केवळ भ्रमाचेच होते, असे प्रत्ययास येते; त्याप्रमाणेच हा सारा संसारांतील वैभवाचा विलास मायिक आहे, लक्षात ठेव ५६.
    परमात्मेंसी जो विभक्त । तो पुरुष बोलिजे 'अयुक्त' ।
    त्यासी नानात्वें भेदु भासत । निजीं निजत्व विसरोनी ॥५७॥
    परमात्म्याशी जो विभक्त असतो, त्या पुरुषाला 'अयुक्त' असे म्हणतात. आपल्या एकमेवाद्वितीय अद्वैत आत्मस्वरूपाची ओळख विसरल्यामुळें त्याला अनेकत्वानें भेद भासू लागतो ५७.


    ओवी : त्या विसराचेनि उल्हासें । मिथ्या भेदु सत्यत्वें भासे ।
    त्या भेदाचेनि आवेशें । अवश्य दिसे गुणदोषु ॥५८॥
    त्या विस्मृतीच्या भरांत मिथ्या भेद सत्यत्वानें भासतो; आणि भेददृष्टीच्या आवेशांत गुणदोष हटकून दिसू लागतात ५८.


    ओवी : जरी भेदूचि नाहीं । तरी गुणदोष कैंचा पाहीं ।
    दिसावया ठावोचि नाहीं । शुद्धाचे ठायीं सर्वथा ॥५९॥
    मुळी जर भेदच नाही, तर शुद्ध वस्तूच्या ठिकाणी गुणदोष दिसावयाला जागाच राहात नाहीं ५९.


    ओवी : यालागीं भेदाच्या उद्‌भटीं । गुणदोषदृष्टी उठी ।
    तेथें कर्माकर्मत्रिपुटी । भेददृष्टी ठसावे ॥६०॥
    भेदाच्या जोरानेंच गुणदोषदृष्टी उत्पन्न होते, व कर्माकर्माची त्रिपुटी भेददृष्टीमुळेच दृढावते ६०.


    ओवी : भेदें थोर केलें विषम । कर्म अकर्म विकर्म ।
    जन्ममरणादि धर्म । निजकर्म प्रकाशी ॥६१॥
    भेदानें मोठे वाईट केलेले आहे. तो कर्म, अकर्म, विकर्म, जन्ममरणादि धर्म आणि स्वकर्म प्रकाशित करतो ६१.


    ओवी : कर्में विकर्में नरकयातना । काम्यकर्में स्वर्गु जाणा ।
    कर्मेंचि करूनि कर्ममोचना । समाधाना पाविजे ॥६२॥
    कर्मानें आणि विकर्मानें नरकयातना भोगाव्या लागतात; आणि कामनिक कर्मानें स्वर्ग प्राप्त होतो; करतां कर्म करूनच कर्ममुक्त होऊन समाधान प्राप्त करून घ्यावे ६२.


    ओवी : येथ म्हणती 'कर्म' कोण । 'अकर्माचें' काय लक्षण ।
    'विकर्माचा' कवण गुण । तेंही संपूर्ण परिस पां ॥६३॥
    आतां तूं म्हणशील की, कर्म ते कोणते ? अकर्माचे लक्षण काय ? विकर्माचा गुण कोणता ? तर तेही सारें ऐक ६३.


    ओवी : काया वाचा अथवा मन । करिजे तितुकें 'कर्म' जाण ।
    सूक्ष्म स्फूर्तीचें जें भान । तें मूळ जाण कर्माचें ॥६४॥
    कायेने, वाचेनें आणि मनानें जें जें कांहीं करावें, तें तें कर्म होय; आणि सूक्ष्म स्फूर्तीचे हें भान, ते कर्माचे मूळ होय ६४.


    ओवी : मनसा वाचा देहीं । सर्वथा कर्मबीज नाहीं ।
    'अकर्म' म्हणिजे तें पाहीं । न पडे ठायीं देहवंता ॥६५॥
    मनांत, वाणीत किंवा देहांत कर्माचें बीज मुळीच उत्पन्न न होणे असें जें 'अकर्म,' ते देहाभिमानवंताला कधीच घडणार नाहीं ६५.


    ओवी : जें कर्मावेगळें सर्वांगें । जेथ कर्म लावितांही न लगे ।
    जें नव्हे कर्मठाजोगें । तें जाण सवेगें 'अकर्म' ॥६६॥
    जे सर्वोपरी कर्माहून वेगळे, ज्याला कर्म लावू गेले तरी सुद्धा लागत नाही, जे कर्मठाजोगें नव्हे, तेच खरोखर 'अकर्म' होय असे समज ६६.


    ओवी : विधिनिषेधजोडपाडें । जेथ विशेष कर्म वाढे ।
    'विकर्म' त्यातें म्हणणें घडें । थोर सांकडें पैं याचें ॥६७॥
    विधिनिषेधाची पर्वा न करता जेथे विशेष कर्म वाढते, त्याला 'विकर्म' असे म्हणतात. हे मोठे संकटांत घालणारे आहे ६७.


    ओवी : कर्म सर्वसाधारण । तेंचि विकारातें पावलें जाण ।
    उठिले विधिनिषेध दारुण । 'विकर्म' जाण तें म्हणिपें ॥६८॥
    सर्वसाधारण कर्म असते तेच विकृत होऊन त्यांत मोठमोठाले विधिनिषेध उत्पन्न झाले, म्हणजे त्याला 'विकर्म' असे म्हणतात ६८.


    ओवी : जें विधीसी नातुडे । तें निषेधाचे अंग चढे ।
    करितां चुके ठाके विकळ पडे । तेंही रोकडें 'निषिद्धचि' ॥६९॥
    जे विधीला अनुसरून होत नाही, ते निषेधाकडे वळते हे उघड आहे.जे आचरीत असतां चूक होते किंवा त्यांत खंड पडतो, अथवा त्यांत विकलता उत्पन्न होते, तेही खरोखर 'निषिद्ध' च होय ६९.


    ओवी : ऐसें कर्म विकारलें । तें 'विकर्म' पदें वाखाणिलें ।
    एवं कर्माकर्म दाविलें । विभाग केले तुजलागीं ॥७०॥
    अशा विकारयुक्त कर्माचें 'विकर्म' ह्या पदानें स्वरूप दाखवून दिले. ह्याप्रमाणें कर्माकर्माचे विभाग तुला स्पष्ट दर्शविले ७०.


    ओवी : जीवासी आविद्यक उत्पत्ती । त्याचीं कर्में आविद्यकें होतीं ।
    श्रीधरव्याख्यानाची युक्ती । तेही उपपत्ती परियेसीं ॥७१॥
    जीवाची उत्पत्तिच प्रथम अविद्येमुळें झालेली असल्यानें त्याची कर्मेंही अविद्यात्मकच होत असतात. आतां श्रीधरस्वामींनी केलेल्या व्याख्यानाची युक्तिही सांगतों ती, ऐकून ठेव. ७१


    ओवी : अविद्यायुक्त जीव परम । त्यासी नित्यक्रिया तेंचि 'कर्म' ।
    नित्य न करणें तें 'अकर्म' । 'विकर्म' तें निषिद्ध ॥७२॥
    जीव हा परम अविद्यायुक्त आहे. नित्यक्रिया हेच त्याचे 'कर्म'; नित्यकर्म न करणे तेच 'अकर्म' आणि निषिद्ध कर्म तें 'विकर्म' होय ७२.


    ओवी : ऐशी कर्माकर्मविकर्मत्रिपुटी । भेदानुरूपें वाढली सृष्टीं ।
    तेथ गुण-दोषबुद्धीच्या पोटीं । भेददृष्टी वाढती ॥७३॥
    अशी भेदानुरूप कर्माकर्मविकांची त्रिपुटी सृष्टीमध्यें वाढत असते, तेव्हां गुणदोषबुद्धीच्या पोटामध्यें भेददृष्टीही प्रबल होते ७३.


    ओवी : अभेदीं भेदु कैसा उठी । जेणें गुणदोषीं नांदे दृष्टी ।
    विधिनिषेधीं पाडी गांठी । तेही गोठी परियेसीं ॥७४॥
    ज्याच्या योगानें गुणदोषामध्येंच दृष्टि राहते व विधिनिषेधांच्या गांठी पडतात, तो भेद अभेदामध्यें उत्पन्न तरी कसा होतो ? असें म्हणशील तर तीही गोष्ट ऐक ७४.


    ओवी : पुरुष एकला एकु असे । तोचि मनोरथपूजे बैसे ।
    ध्येय-ध्याता-ध्यानमिसें । वाढवी पिसें भेदाचें ॥७५॥
    पुरुष हा एकीएक असतो, पण जेव्हां तो मनोरथाच्या पूजेला (मानसपूजेला) बसतो, तेव्हां ध्येय, ध्याता आणि ध्यान ह्यांच्या निमित्तानें भेदाचे वेड माजवितो ७५.


    ओवी : तेथे नानापरीचे उपचार । पूजासामाग्रीसंभार ।
    ऐसा एकपणीं अपार । भेदु साचार वाढवी ॥७६॥
    तेथे नाना प्रकारचे उपचार, पूजेच्या साहित्याचा संभार वगैरे कल्पीत असतो. याप्रमाणें एकपणामध्येंच तो मनस्वी भेद वाढवितो ७६.


    ओवी : तेथ 'ध्येय' उत्तम म्हणे जाण । 'ध्याता' नीच होये आपण ।
    तदंगें 'ध्यान' गौण । गुणदोष जाण वाढवी ॥७७॥
    तेथे ध्येय ते 'उत्तम' म्हणतो आणि ध्याता जो आपण त्याला 'नीच' मानतो, यामुळें ध्यान 'गौण' होऊन गुणदोषांना वाढविते ७७.


    ओवी : ध्यानीं गुणदोष विचित्र । ध्येय म्हणे परम पवित्र ।
    ध्याता आपण होये अपवित्र । शौचाचारदोषत्वें ॥७८॥
    ध्यानामध्यें विचित्र गुणदोष आहेत; ध्येय आहे ते 'परमपवित्र' म्हणतो. आणि आपले आचरण पवित्र नाहीं म्हणून ध्याता आपण अपवित्र असा होतो ७८.


    ओवी : एवं ध्यानाचिये दृष्टीं । आपणचि आपुल्या पोटीं ।
    गुणदोषांची त्रिपुटी । भेददृष्टी वाढवी ॥७९॥
    अशा प्रकारें ध्यानाच्या दृष्टीनें आपणच आपल्या पोटामध्यें गुगदोषाची त्रिपुटी आणि भेदष्टि वाढवितो ७१.


    ओवी : ध्येय-ध्याता-ध्यान । आघवाची आहे आपण ।
    तें सांडोनियां जाण । गुणदोषलक्षण वाढवी ॥८०॥
    खरोखर ध्येय, ध्याता आणि ध्यान सारे आपणच असतां ते सोडून देऊन गुगदोषांचे स्वरूप मात्र वाढवीत बसतो ८०.


    ओवी : उद्धवा हे अवघी सृष्टी । वाढली असे भेददृष्टीं ।
    तेणें भेदें उठाउठी । कर्मत्रिपुटी वाढविली ॥८१॥
    उद्धवा ! ही सारी सृष्टि भेददृष्टीनें वाढलेली आहे; आणि त्या भेदामुळेच कर्माची त्रिपुटीही त्याच्या मागोमाग वाढली ८१.


    ओवी : जंव जंव भेदाचा जिव्हाळा । जंव जंव विषयांचा सोहळा ।
    पाळिजे इंद्रियांचा लळा । तंव तंव आगळा संसारु ॥८२॥
    भेदाचा जिव्हाळा जसा जसा वाढतो, किंवा विषयांचे प्रेम जसे जसे वाढते अथवा इंद्रियांचा लळा जसा जसा पुरविला जातो, तसा तसा संसार हा वाढतच असतो ८२.


    ओवी : सापा पाजिजे पीयूख । तेंचि परतोनि होय विख ।
    तैसें इंद्रियां दीजे जंव जंव संतोख । तंव तंव दुःख भोगिजे ॥८३॥
    सापाला अमृत पाजले तर फिरून विषच व्हावयाचे. त्याप्रमाणें इंद्रियांना जो जों संतोष द्यावयास जावें, तो तो दुःख मात्र भोगावे लागते ८३.
    यालागी इंद्रियांच्या द्वारीं । विषयो नेदावा चतुरीं ।
    जेवीं विषें रांधिली क्षीरधारी । सांडिजे दुरी न चाखतां ॥८४॥
    ह्याकरतां शहाण्यानें इंद्रियांच्या द्वारांत विषयाला जाऊंच देऊं नये. ज्याप्रमाणें विषांत शिजविलेली खीर, तोंडांतसुद्धा न घालतां फेकून द्यावयाची असते ८४.


    ओवी : घमघमित अमृतफळें । वरी सर्पें घातलिया गरळें ।
    तें न सेविती काउळे । सेवनीं कळे निजघातु ॥८५॥
    किंवा रसरसलेल्या अमृतफळांवर सर्पानें गरळ टाकले असता ती कावळे खात नाहीत; कारण तसे करण्यांत आपला घात आहे, हे त्यांस कळते. ८५.


    ओवी : तैसें सेवितां विषयांसी । कोण गोडी मुमुक्षासी ।
    प्रतिपदीं । आत्मघातासी । अहर्निशीं देखती ॥८६॥
    त्याचप्रमाणें विषयांचे सेवन करतांना मुमुक्षूंना गोडी कशी वाटणार ? रात्रंदिवस आणि पावलोपावली त्यांत आत्मघात असल्याचे त्यांना दिसत असते ८६.


    ओवी : आत्मघातु न देखती । ते विषयी विषयो सेविती ।
    जैशी दिवाभीता मध्यराती । असतां गभस्ति मध्यान्हीं ॥८७॥
    ज्यांना त्यांतील आत्मघात दिसत नाही, असे विषयी लोकच विषयांचे सेवन करतात. ज्याप्रमाणें सूर्य भर दोनप्रहरी मस्तकावर असतांही घुबडाला मध्याह्न रात्र वाटते ८७.


    ओवी : तैसेंचि विषयसेवन । मुमुक्षांसी घडे जाण ।
    तेणें न चुके जन्ममरण । आत्मपतन तयांचें ॥८८॥
    त्याचप्रमाणें विषयसेवनानें मुमुक्षूची स्थिति होते. कारण, त्याच्या योगानें जन्ममरण तर चुकत नाहीच, पण उलट त्यांचे आत्मपतन मात्र होते ८८.


    ओवी : म्हणसी 'प्राणियांची स्थिती । विषयावरी निश्चितीं ।
    विषयत्यागें केवीं राहती' । ते सुगम स्थिती अवधारीं ॥८९॥
    'प्राण्यांचे जीवित्व खरोखर विषयांवरच अवलंबून असते, विषयांचा त्याग करून ते कसे जगतील ?' असें म्हणशील तर त्याचाही सुगम मार्ग सांगतों ऐक ८९.


    ओवी : असतां इंद्रियांचा नेमु । करी चित्ताचा उपरमु ।
    ऐसा दोंहीपरी सुगमु । उत्तमोत्तमु हा त्यागु ॥९०॥
    इंद्रियांचा विधिनियमानें निग्रह केला असतां, चित्त शांत होते. ह्याप्रमाणें इंद्रियांचा व मनाचा निग्रह, ह्या दोन्ही मार्गानें हा त्याग उत्तमोत्तम व सोपा होतो ९०.


    ओवी : इंद्रियें असोतु विषयांवरी । मन रिघों नेदी त्यांभीतरी ।
    हाही त्यागु सर्वांपरी । योगेश्वरीं बोलिजे ॥९१॥
    इंद्रियें विषयांवर असेनात का, परंतु मन मात्र त्यांत शिरूं देऊं नये, हाही सर्वतोपरी त्यागच आहे, असे मोठमोठे योगीही म्हणतात ९१.


    ओवी : मनासी विषयांचें बळ । विषयध्यासें तें चपळ ।
    नव्हे म्हणती तें निश्चळ । ऐक समूळ तो उपावो ॥९२॥
    'मनाला विषयाचे बळ असल्यामुळें विषयाच्या ध्यासानें ते चंचल होते, ते निश्चळ कधी व्हावयाचे नाही,' असें म्हणशील तर त्याचाही उपाय ऐक ९२.


    ओवी : माझें स्वरूप सर्वगत । मनाबाहेरी आणि आंत ।
    जेथ जेथ जाईल चित्त । तेथ तेथ तें असे ॥९३॥
    माझें स्वरूप सर्वव्यापी आहे. ते मनाच्या आंतही असते आणि बाहेरही असते. जेथे जेथें मन जाईल तेथे तेथें तें असतेच ९३.


    ओवी : मजवेगळें जावयासी । ठावो नाहीं पैं चित्तासी ।
    स्वदेशीं हो परदेशीं । अहर्निशीं मज आंतु ॥९४॥
    माझ्याशिवाय चित्ताला जावयाला दुसरी जागाच नाही. ते स्वदेशी असो, की परदेशांत जावो, रात्रंदिवस माझ्या आंतच असते ९४.


    ओवी : ऐसें निजरूप संतत । पाहतां थोरावेल चित्त ।
    त्या चित्तामाजीं आद्यंत । पाहें समस्त हें जग ॥९५॥
    असे निरंतर आत्मस्वरूपच पाहात राहिले म्हणजे तेंच चित्त सर्वव्यापक होईल. मग त्या चित्तामध्यें हे सारे जग आदीपासून अंतापर्यंत तुला दिसूं लागेल ९५.


    ओवी : अथवा जीवस्वरूप तुझें चांग । त्यामाजीं पाहतां हें जग ।
    जगचि होईल तुझें अंग । अतिनिर्व्यंग निश्चित ॥९६॥
    अथवा तुझें जीवस्वरूपही चांगलेच आहे, त्यांतच जर हें सारे जग पाहूं लागलास, तर जगच तुझें निर्व्यंग अंग होऊन राहील ९६.


    ओवी : चरें आणि अचरें । लहानें कां थोरें ।
    जीवरूपीं सविस्तरें । पाहें निर्धारे हें जग ॥९७॥
    चर आणि अचर, लहान आणि थोर असें जें म्हणून आहे ते सारे आपल्या जीवरूपांत पाहात जा ९७.


    ओवी : म्हणसी जीवु तो एकदेशी । त्यामाजीं केवीं पहावें जगासी ।
    त्यासी ऐक्यता करीं मजसीं । जेवीं कनकेंसीं अळंकार ॥९८॥
    तूं म्हणशील की, जीव हा एकदेशी आहे त्यांत सारे जग कसे पाहावें ? तर सोनें आणि अलंकार हे जसे एकरूप आहेत, त्याप्रमाणें जीवाची माझ्याशी ऐक्यता कर म्हणजे झाले ९८.


    ओवी : चिंतितां कीटकी भिंगुरटी । तेचि ते होऊन उठी ।
    तैसा तूं उठाउठीं । होईं निजदृष्टीं निजतत्व ॥९९॥
    कीटकानें भिंगुरटीचा ध्यास घेतला, म्हणजे तो भिंगुरटीच होऊन बाहेर पडतो, त्याप्रमाणें तूंही तत्काल आत्मदृष्टीनें आत्मतत्त्वच होऊन जाशील ९९.


    ओवी : हो कां सैंधवाचा खडा । पडल्या सिंधूमाजिवडा ।
    तो होवोनि ठाके त्याएवढा । तैसा तूं रोकडा मी होसी ॥१००॥
    अरे ! मिठाचा खडा समुद्रांत पडला असतां तो समुद्राएवढाच होऊन राहतो, त्याप्रमाणें तूंही तत्काल मद्‌रूप होऊन राहशील १००.

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...