मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ ओव्या ४०१ ते ५००

    ऐसा प्रत्यक्ष अनुभवू । स्वयें बोलताहे जीवू ।

    हा म्हणाल जीवाचा स्वभावू । ऐक अभिप्रावू सांगेन ॥१॥
    जसा प्रत्यक्ष अनुभव स्वतः जीवच बोलत असतो. हा जीवाचा स्वभावच आहे असें म्हणाल, तर त्यांतील अभिप्राय सांगतों ऐक १.


    यर्हि संसृतिबंधोऽयं आत्मनो गुणवृत्तिदः ।
    मयि तुर्ये स्थितो जह्यात् त्यागस्तद् गुणचेतसाम् ॥ २८ ॥
    [श्लोक २८] ज्याअर्थी हे बुद्धीमुळे उत्पन्न झालेले बंधन आत्म्याला तिन्ही अवस्थांत बांधून टाकते म्हणून साधकाने तुरीय अवस्थास्वरूप माझ्यामध्ये राहून बुद्धीचे बंधन तोडावे त्यामुळे विषय व चित्त या दोन्हींचाही परस्परसंबंध तुटतो. (२८)


    जो डोल्हारां बैसे यथासुखें । तो न हालतां हाले तेणें हरिखें ।
    उंच नीच खाय झोंके । निजकौतुकें हिंदोळे ॥२॥
    जो खुशाल झोंपाळ्यावर बसलेला असतो, तो आपण न हालतांही त्या झोपाळ्याच्या हालण्यानेंच हालतो, त्या आनंदानें वरखाली झोंके खातो, व आपल्याच हौसेनें झोंपाळ्याबरोबर हालत राहतो २.


    हिंदोळतांही प्रबळ । डोल्हाराचि अतिचंचळ ।
    बैसला तो निजनिश्चळ । मानी केवळ मी हालतों ॥३॥
    तो मोठमोठाले झोंके घेत असला तरी त्या वेळी वस्तुतः केवळ झोंपाळाच जलद हालत असतो, आणि बसणारा असतो तो आपल्या ठिकाणी स्थिरच असतो. तो फक्त मी हालतों असें मानतो ३.


    जीवासी झाली तैशी वानी । अहंममतेच्या अभिमानीं ।
    तिनी अवस्था स्वयें मानी । जेवीं कां स्वप्नीं गृहदारा ॥४॥
    जीवाला तशीच अवस्था झालेली आहे. ज्याप्रमाणे स्वप्नामध्यें घर, बायको, वगैरे सर्व आपलींशींच वाटतात, त्याप्रमाणें अहंममतेच्या अभिमानानेंच तिन्ही अवस्था मीच भोगतों असें तो मानतो १.


    हो कां लोखंडकाम घडतां । लोहाचे घाय अग्नीचे माथां ।
    प्रत्यक्ष दिसती वाजतां । लोहतादात्मतासंयोगें ॥५॥
    लोखंडाचे काम घडवितांना लोखंडाचें अग्नीशी तादात्म्य झाल्यामुळें लोखंडावर घातलेले घाव प्रत्यक्ष विस्तवाच्याच माथ्यावर बसलेले दिसतात ५;


    तेणें अग्निसंगें वाडेंकोडें । लोहकामचि घडे मोडे ।
    परी अग्नीसी घडमोड न घडे । तेणें पडिपाडें जीवू येथें ॥६॥
    त्या अग्नीच्या संगतीनेंच खरोखर लोखंडाचें काम घडतें आणि मोडतें; परंतु अग्नि हा घडतही नाहीं आणि मोडतही नाही. त्याच रीतीनें जीवही, येथें राहिलेला असतो ६.


    जेवीं अग्निवीण लोह न घडे । तेवीं आत्मसंयोगेंवीण पुढें ।
    बुद्धि केवळ जड वेडें । कर्मक्रिया नातुडे सर्वथा ॥७॥
    ज्याप्रमाणें अग्नीशिवाय लोखंड घडत नाहीं, त्याप्रमाणें आत्म्याच्या संयोगाशिवाय बुद्धि ही केवळ जड व वेडी आहे. आत्म्याशिवाय तिला कोणतीच कर्मक्रिया कधींही करतां येणार नाहीं ७.


    लोह घडवूनि अग्नि न घडता । कर्म करवूनि जीव अकर्ता ।
    तरी वृत्तिसंगें तदात्मता । अहंकर्ता हें मानी ॥८॥
    लोखंड घडवूनही अग्नि हा कांहीं घडविणारा नसतो. त्याप्रमाणें कर्म करवूनही जीव अकर्ताच असतो. तरीपण वृत्तीबरोबर त्याचें तादात्म्य झाल्यामुळे 'कर्ता तो मीच' असें मानतो. ८.


    जीव आपुले प्रकाशता । झाला वृत्तीतें प्रकाश करिता ।
    वृत्ति जीवासी नानावस्था । निजस्वभावता देतसे ॥९॥
    जीवानें आपल्या प्रकाशानें वृत्तीला प्रकाशित केलें आहे आणि ती वृत्तीच ह्या जीवाला अनेक प्रकारच्या अवस्था आपल्या स्वभावानुरूप देत असते ९.


    सूर्यें प्रकाशिलें जळ । जळें केलें प्रतिमंडळ ।
    खळाळ चंचळ निश्चळ । कांपे चळचळ जळकंपें ॥४१०॥
    सूर्यामुळेंच पाणी प्रकाशित होतें, त्या पाण्यानेंच सूर्याचें प्रतिबिंब तयार केलें आहे, आणि त्या पाण्याच्या खळाळीप्रमाणें, किंवा चंचलतेप्रमाणें किंवा स्थिरपणाप्रमाणें तें सूर्याचें प्रतिबिंब पाण्याच्या कंपानुसार चळचळां कांपतें किंवा स्थिर रहातें ४१०.


    सूर्याची गगनीं नित्य वस्ती । तो जळें आणिला अधोगती ।
    तेवीं वृत्तीचि या निजख्याती । मुक्तांतें दाविती बद्ध करूनी ॥११॥
    सूर्याचें राहणें नेंहमी आकाशांत आहे, त्याला पाण्यानें खालीं आणिलें ! त्याप्रमाणें वृत्तीही या आपल्या नांवालौकिकाप्रमाणें मुक्तांनाही बद्ध करून दाखविते ११.


    आत्म्यानें प्रकाशिली वृत्ती । वृत्तीनें आत्म्यासी जीवप्राप्ती ।
    जीवा जीवत्वें देहासक्ती । सुखदुःखप्राप्ती तेणें भोगी ॥१२॥
    आत्म्यानें वृत्तीला प्रकाशित केलेलें असतें; पण त्याच वृत्तीमुळें आत्म्याला जीवपणा येतो, त्या जीवाला जीवपणामुळें देहाची ममता जडते, आणि त्यामुळेंच तो प्राप्त झालेल्या सुखदुःखांचा उपभोग घेतो १२.


    एवं वृत्तीचिया संगती । वाढली विषयांची आसक्ती ।
    तेणें संसारबंधप्राप्ती । झाली निश्चितीं जीवासी ॥१३॥
    तात्पर्य, वृत्तीच्या संगतीनेंच विषयांची आसक्ति वाढते, आणि त्यामुळेंच खरोखर जीवाला संसारबंधन प्राप्त होतें १३.


    हो कां गुणचित्त-विषयासक्ती । जरी झाली जीवासी बंधप्राप्ती ।
    तरी आवरावी विषयवृत्ती । वैराग्ययुक्तीं गुरुकृपा ॥१४॥
    अशा रीतीनें गुण आणि चित्त ह्यांच्या विषयासक्तीनें जरी जीवाला बंधन प्राप्त झालें, तरी वैराग्यभावनेंनें व गुरूच्या कृपेनें विषयवृत्ति आवरीत असावें १४.


    ऐक गुरुकृपेची मातू । तिहीं अवस्थांमाजीं सततू ।
    जो मी तुरीय गुणातीतू । ते अभ्यासीं लावितू निजबोधें ॥१५॥
    आतां गुरुकृपेची गोष्ट ऐक. जो मी निरंतर तिन्ही अवस्थांमध्यें ज्ञानस्वरूप आणि गुणांपासून अलिप्त, त्या मला ती गुरुकृपा आत्मज्ञानाच्या योगेंकरूनच अभ्यासाकडे वळविते १५.


    नवल अभ्यासाची गोठी । विषयवृत्तीच्या पाठींपोटीं ।
    मज तुरीयातें दावी दिठी । बोधपरिपाटी निजबोधें ॥१६॥
    अभ्यासाची गोष्ट तर काही विलक्षणच आहे ! तो आत्मज्ञानानें उपदेशाच्या रूपानें विषयवृत्तीच्या मागेंपुढें माझें ज्ञानस्वरूपच दृष्टीला दाखवीत असतो १६.


    मी तुरीय तंव संततु । सर्वीं असे सर्वगतु ।
    शिष्यवृत्तीसी मजआंतु । गुरु निजस्वार्थु दाखवी ॥१७॥
    मी तर सदोदित ज्ञानस्वरूपच आहे. मी सर्वांमध्यें सर्वस्वी व्यापलेला आहे. त्यामुळें गुरु हा शिष्याच्या वृत्तीला माझ्या आंत आत्महितच दाखवून देतो १७.


    सुतावेगळें लुगडें । करूं जातां गा उघडें ।
    तेथ क्रियाचि लाजोनि बुडे । मागें पुढें सूतचि ॥१८॥
    अरे ! लुगडें हें सुताहून पूर्णपणें निराळें करण्याचा प्रयत्न करूं लागलें असतां त्या ठिकाणीं ती कृतीच लाजून नष्ट होते. कारण त्याच्या आंतबाहेर सर्व सूतच असतें १८.


    तेवीं साधकासी जाण । विषयांचें विषयभान ।
    माझे स्वरूपीं नव्हेचि भिन्न । चैतन्यघन मीचि मी ॥१९॥
    त्याप्रमाणे साधकांना में विषयांचे भान असतें, तेंही माझ्या स्वरूपांत भिन्न असत नाहीं. कारण सर्व ज्ञानाचें स्वरूप माझा मीच आहे १९.


    तेथ नामरूपवर्णभेद । नाहीं कर्म कर्ता विधिवाद ।
    बुडाले प्रणवेंसीं वेद । केवळ शुद्ध मी एक ॥४२०॥
    त्यांत नाम, रूप, वर्ण यांचा भेद नाहीं. किंवा कर्म, कर्ता अथवा कर्माचा वादही नाही. ॐकारासहवर्तमान ज्यांत वेद बुडाले, असा केवळ शुद्ध एक मीच आहें ४२०.


    तेथें भ्रमेंसहित पळाली भ्रांती । क्रियेसहित गळाली प्रवृत्ती ।
    लाजा विराली निवृत्ती । स्वस्वरूपीं वृत्ती विनटली ॥२१॥
    तेथून भ्रमासहवर्तमान भ्रांति पळून गेली, क्रियेसहवर्तमान प्रवृत्ति गळून पडली, निवृत्ति लज्जेनेंच विरून गेली, आणि वृत्ति स्वस्वरूपामध्यें एकरूप होऊन राहिली २१.


    सूर्योदयो जाहल्यापाठीं । समूळ अंधारातें घोंटी ।
    खद्योताची नळी निमटी । नक्षत्रकोटी तत्काळ गिळी ॥२२॥
    सूर्योदय झाला की तो अंधाराला सर्वस्वी गिळून टाकतो, काजव्याला तर गळा दाबून ठार करून टाकतो, व नक्षत्रांचे समुदाय त्वरित नाहींसे करतो २२.


    तेवीं माझी स्वरूपप्राप्ती । मायेची मावळे स्फूर्ती ।
    लाजा विसरे प्रवृत्तिनिवृत्ती । नित्यतृप्ती स्वानंदें ॥२३॥
    त्याप्रमाणें माझ्या स्वरूपाची प्राप्ति झाली कीं, मायेची स्फूर्तीच मावळते, प्रवृत्ति आणि निवृत्ति लज्जेनें नाहीशा होतात, आणि आत्मानंदानें नित्य तृप्तीच होते २३.


    ऐशी माझ्या स्वरूपाची गोडी । जैं साधकां लागे धडफुडी ।
    तैं चित्त विषयातें सांडी । विषयो वोसंडी चित्तातें ॥२४॥
    अशी माझ्या स्वरूपाची गोडी जेव्हां साधकांना पूर्णपणे लागून राहते, तेव्हां चित्तही विषयांना सोडितें आणि विषयही चित्ताला सोडतो २४.


    जीं देंठीं वाढलीं फळें । तींचि परिपाकाचे वेळे ।
    होती देंठावेगळें । देंठू तो फळें धरीना ॥२५॥
    देंठाला लागून जीं फळें वाढतात, तींच पिकावयाच्या वेळेला देंठापासून वेगळीं होतात. देंठही तीं फळें धरीत नाहीं २५.


    कां मंथूनि काढिलें नवनीत । तें परतोनि घातल्या ताकाआंत ।
    तें ताकेंसी होय अलिप्त । तैसें चित्त विषयांसी ॥२६॥
    किंवा दहीं घुसळून लोणी काढलें, आणि तें पुन्हा ताकांत घातलें तर तें ताकापासून निराळें राहतें. त्याप्रमाणें चित्तही विषयांपासून अलिप्त राहतें २६.


    पावल्या माझी स्वरूपता । दैव बळें विषयो देतां ।
    चित्तासी नुपजे विषयावस्था । स्वभावतां अलिप्त ॥२७॥
    माझें स्वरूप प्राप्त झालें असतां दैव बलात्कारानें त्याला विषयोपभोग देऊं लागलें, तरी त्याच्या चित्ताला विषयवासना उत्पन्न होत नाहीं. कारण तें स्वभावतःच अलिप्त असतें २७.


    एवं साधिल्या माझा योगू । चित्तविषयांचा वियोगू ।
    सहजेंचि होय चांगू । हा सुगम सांगू उपावो ॥२८॥
    अशा प्रकारें माझा योग साधला असतां आपोआपच उत्तम रीतीनें चित्त आणि विषय ह्यांचा वियोग होतो. ह्याचा सुलभ उपाय सांगतों २८.


    येथें झणें आशंका धराल देख । स्वरूप शुद्ध अवघें एक ।
    तेथें कैंचें बाध्यबाधक । काय साधक साधिती ॥२९॥
    आतां पहा ! ह्यांतसुद्धा कदाचित तुम्ही शंका घ्याल कीं, स्वरूप हें सर्वत्र एकच भरलेले असून शुद्ध आहे. तेथे बाध्य आणि बाधक कशाचें ? अर्थात त्या वेळीं साधक साधतात तरी काय ? २९.


    ऐशाही संधीमाजीं जाण । अहंता बंधाचें कारण ।
    त्याचें सांगेन मी लक्षण । सावधान परियेसीं ॥४३०॥
    पण अशा संधींतही अहंता हीच बंधनाला कारण होतें, त्याचेही लक्षण मी सांगतों, नीट लक्ष देऊन ऐक ४३०.


    अहङ्कारकृतं बन्धं आत्मनोऽर्थविपर्ययम् ।
    विद्वान्निर्विद्य संसार चिन्तां तुर्ये स्थितस्त्यजेत् ॥ २९ ॥
    [श्लोक २९] मी, माझे या अहंकारानेच बंधन निर्माण होते त्याच्यामुळेच आत्म्याच्या वास्तविक सच्चिदानंद रूपाचा लोप होतो म्हणून हे जाणणार्‍याने विरक्त होऊन विषयांची चिंता सोडून तुरीय अवस्थेतच असावे. (२९)


    जेथ मुहूर्तमात्र वसती घडे । त्या ठायाचा अभिमान चढे ।
    ऐसें अभिमानाचें सांकडें । पाहें पां रोकडें कौतुक त्याचें ॥३१॥
    जेथें एक क्षणभर वस्ती होते, त्या ठिकाणचासुद्धा मनुष्याला अभिमान चढतो. इतकें अभिमानाचें व्यसन असते. हें त्याचें कौतुक प्रत्यक्षच पहा म्हणजे झालें ३१.


    बुद्धि अहंकार अळुमाळ । उठतां शुद्धासी करी शबळ ।
    तेणें देहयोगें धरिल्या बळ । करी तत्काळ विपरीत ॥३२॥
    यत्किंचित् अहंकार उत्पन्न झाला तरीदेखील बुद्धि पवित्र मनुष्यालाही मायाग्रस्त करून सोडते. तो अहंकार देहाच्या संगतीनें प्रबळ झाला की तत्काळ काहीतरी विरुद्ध परिणाम करतो ३२.


    अहंकार खवळल्या जाण । करी आनंदाचें आच्छादन ।
    बुडे परमात्मस्फूर्तीचें स्फुरण । देहाचें मीपण वाढवी ॥३३॥
    अहंकार खवळला असतां तो आनंदाला लोपवून टाकितो. त्यामुळे परमात्मस्फूर्तीचें स्फुरण नाहींसें होतें आणि तो अभिमान देहाचा मीपणा मात्र वाढवितो ३३.


    जेवीं कूर्मीच्या पिलियां । चक्षुरमृतें तृप्ती तयां ।
    तेंचि मातेसि चुकलिया । मग भुकेलिया कर्दमू सेवी ॥३४॥
    ज्याप्रमाणें कासवीचीं पिलें असतात त्यांना आईच्या नयनामृतानेंच तृप्ति होत असते ; पण आईपासून त्या मुलाची चुकामूक झाली आणि मग त्याला भूक लागली म्हणजे तें चिखलच खाऊं लागतें ! ३४.


    तेवीं खुंटलिया आनंद‍अभिव्यक्ती । जीवासी वाढे विषयासक्ती ।
    कामिनीकामा पंगिस्त होती । चिंता चित्तीं विषयांची ॥३५॥
    त्याप्रमाणें आनंदाचा विकास थांबला की, जीवाची विषयासक्ति वाढतें, आणि तें स्त्रीविषयक वासनेंच्या आधीन होतात. त्यांच्या चित्तामध्यें नेंहमी विषयांचीच चिंता राहाते ३५.


    विसरला आपुलें पूर्णपण । धनालागीं अतिहीन दीन ।
    मी देहवंत परिच्छिन्न । ऐसा देहाभिमान दृढ होय ॥३६॥
    असा मनुष्य आपणच परिपूर्ण आहोंत हें विसरतो आणि द्रव्यासाठी अतिशय लाचार होतो. मर्यादित देहाकार तोच मी असा दृढ देहाभिमान त्याला होऊन बसतो ३६.


    तेणें कर्माकर्मांचे आघात । नाना नरकयातना होत ।
    जन्ममरणादि आवर्त । तेणें दुःखी होत अतिदुःखें ॥३७॥
    त्यामुळें कर्माकर्मांचे आघात बसून अनेक प्रकारच्या नरकयातना होतात, आणि जन्मभरणादिकांच्या भोवऱ्यात सांपडून त्या महान् दुःखानें तो व्याकुळ होतो ३७.


    भोगितां दुःखयातना । त्रासु उपजे ज्याच्या मना ।
    न साहवे भववेदना । तेणें देहाभिमाना सांडावें ॥३८॥
    त्या दुःखयातना भोगतांना ज्याच्या मनाला त्रास उत्पन्न होतो, व संसाराची वेदना ज्याला सोसवत नाही, त्यानें देहाभिमानाला सोडून द्यावें ३८.


    अभिमान सांडितां न संडे । हेंचि दुर्घट थोर मांडे ।
    यालागीं साधनाचें सांकडें । सोसणें पडे साधकां ॥३९॥
    परंतु हा देहाभिमान सोडावयाला गेलें तरी सुटत नाहीं. हेंच मोठें संकट उत्पन्न होतें. म्हणूनच साधकांना साधनाचें संकट सोसणें भाग पडतें ३९.


    जें जें करावें साधन । साधनीं रिघे साधनाभिमान ।
    धांवणें नागवी संपूर्ण । साधनीं विघ्न होय तैसें ॥४४०॥
    परंतु जें जें साधन करावें, त्या साधनांत साधनाभिमान उत्पन्न होतो. ज्याप्रमाणें लुटारूंचें धांवणें आलें म्हणजे ते सर्वस्व लुबाडून नेतात, त्याप्रमाणें साधनांत अहंकार हा विघ्नरूप होतो ४४०.


    ऐक साधकांचें साधन । वेदोक्त स्वधर्माचरण ।
    साधावें वैराग्य पूर्ण । माझें भजन अतिप्रीतीं ॥४१॥
    आतां साधकांचे साधन ऐक. तें असें कीं, वेदोक्त स्वधर्माचरण करावें, पूर्ण वैराग्य साधावें आणि अत्यंत प्रेमानें माझें भजन करावें ४१.


    तत्काळ जावया देहाभिमान । अखंड माझें नामस्मरण ।
    गीत नृत्य हरिकीर्तन । सर्वांभूतीं समान मद्‍भावो ॥४२॥
    देहाभिमान तत्काळ जाण्यासाठीं माझें अखंड नामस्मरण करीत रहावें. गायन, नृत्य, ह्यांनी युक्त असें हरीचें कीर्तन करावें; आणि सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी समान मत्स्वरूप भावना ठेवावी ४२.


    मद्‍भावें भूतें समस्त । सर्वदा पाहतां सतत ।
    मी तुरीय जो सर्वगत । ते ठायीं चित्त प्रवेशे ॥४३॥
    सर्व भूतें मत्स्वरूपच आहेत अशा भावनेनें सदासर्वदा पहात असलें म्हणजे ज्ञानस्वरूप व सर्वव्यापी असा जो मी, त्या माझ्यामध्यें चित्त प्रवेश करितें ४३.


    तिहीं अवस्थांमाजीं मी सतत । तिहीं अवस्थांतें मी प्रकाशित ।
    तिहीं अवस्थांहूनि अतीत । तो जाण निश्चित मी तुरीयू ॥४४॥
    मी निरंतर तिन्ही अवस्थांमध्यें राहातो. तिन्ही अवस्थांना मी प्रकाशित करतों. पण तिन्ही अवस्थाहुनही जो निराळा तोच मी खरोखर ज्ञानस्वरूप आहे ४४.


    तिहीं गुणांहूनि परता । चौथेपणेंवीण चौथा ।
    तो मी तुरीय जाण तत्त्वतां । ते ठायीं चित्ता जो ठेवी ॥४५॥
    तीन गुणांच्याही पलीकडचा, चौथेपणाशिवायच चौथा, तो मी खरोखर ज्ञानस्वरूप आहे. त्या माझ्यामध्यें जो आपलें चित्त ठेवतो ४५,


    तेथें ठेवितां चित्ता । जीवू पावे मद्‌रूपता ।
    निमाली सांसारिक चिंता । विषयावस्था बुडाली ॥४६॥
    त्यानें तेथें चित्त ठेवलें असतां जीव हा मत्स्वरूपच होतो, आणि संसारासंबंधीं चिंता नाहीशी होऊन विषयावस्था बुडूनच जाते ४६.


    तेव्हां चित्त चिंता चिंतन । विषयवासना अभिमान ।
    या अवघियांचें होय शून्य । मी स्वानंदघन स्वयें प्रकटें ॥४७॥
    त्या वेळी चित्त, चिंता आणि चिंतन; विषयवासना व अभिमान; ह्या सर्वांचा नाश होऊन स्वानंदघन असा मी स्वत:च प्रगट होतो ४७.


    न तुटतां भेदाचें भेदभान । जो म्हणवी मी सज्ञान ।
    वृथा धरी ज्ञानाभिमान । तोही अज्ञान तें ऐका ॥४८॥
    द्वैताची भेदभावना तुटली नसतांच जो स्वतःला ज्ञानी असें म्हणवितो, आणि व्यर्थ ज्ञानाचा अभिमान बाळगतो, तोही अज्ञानीच होय. कसें तें ऐका ४८.


    यावन्नानार्थधीः पुंसो न निवर्तेत युक्तिभिः ।
    जागर्त्यपि स्वपन्नज्ञः स्वप्ने जागरणं यथा ॥ ३० ॥
    [श्लोक ३०] मनुष्य जोपर्यंत हा अनेकत्वाचा भ्रम युक्तीयुक्तीने नाहीसा करीत नाही, तोपर्यंत जो जागृत असूनही अज्ञाननिद्रेत झोपलेलाच समजावा त्याचे हे जागेपण स्वप्नातल्या जागेपणासारखेच मिथ्या होय. (३०)


    नाना वर्ण नाना व्यक्ती । नाना गोत्रें नाना जाती ।
    अधमोत्तमविधानस्थिती । भेदु चित्तीं दृढ भासे ॥४९॥
    अनेक वर्ण, अनेक व्यक्ति, निरनिराळी गोत्रें, निरनिराळ्या जाती, अधम व उत्तम असे विधींचे प्रकार, यांमुळे चित्तामध्यें दृढतर भेद उत्पन्न होतो ४९.


    मी काळा गोरा सांवळा । मी सज्ञानत्वें आगळा ।
    माझी उत्तम पवित्र लीळा । मी कुळें आगळा सत्कुलीन ॥४५०॥
    काळा मी, गोरा मी, काळासांवळा मी, उत्तम ज्ञानानें श्रेष्ठ तो मी, उत्तम पवित्र कृति माझीच, माझे कुल श्रेष्ठ व मी उत्तम कुलवान ४५०,


    ऐशी झाल्या भेदप्राप्ती । पाहतां अभेदपरा श्रुती ।
    साधकां शास्त्रार्थयुक्तीं । भेदनिवृत्ती ज्यां नव्हेचि ॥५१॥
    असा भेदाभेद मनांत उत्पन्न झाला असतां, अद्वैत सांगणारी श्रुति पाहून किंवा शास्त्रार्थाच्या युक्ति ऐकूनही ज्या साधकांच्या मनातील भेदाची निवृत्ति होणार नाही ५१,


    त्याचा व्यर्थ ज्ञानाभिमान । त्याचें व्यर्थ कर्माचरण ।
    तो जागाचि निजेला जाण । जागेपण त्या नाहीं ॥५२॥
    त्याचा ज्ञानाभिमान व्यर्थ होय, त्याचें कर्माचरण व्यर्थ होय. तो जागा असतांनाच निजलेला म्हणून समजावे. त्याला जागेपणाच नाही ५२.


    दृढ जो कां देहाभिमान । तेंचि कनकबीजसेवन ।
    करूनि थोर भ्रमला जाण । अविद्या दीर्घ स्वप्नभेदु देखे ॥५३॥
    जो दृढ देहाभिमान बाळगणे, तेंच जणू काय धोत्र्याचें बीज होय. तें सेवन करून मनुष्य अत्यंत भ्रमात पडला म्हणजे अविद्यारूप लांबलचक स्वप्न पहात बसतो ५३.


    वोसणतां बोली न लभे अर्थू । तेवीं पठणमात्रें परमार्थू ।
    श्रुतिशास्त्रांचा निजशास्त्रार्थू । नव्हेचि प्राप्तु तयांसी ॥५४॥
    झोंपेंत बरळलेल्या शब्दांनी कांहीं अर्थ निघत नाहीं, त्याप्रमाणें केवळ पठण केलें असतां परमार्थ प्राप्त होत नाहीं. इतकेंच नव्हे, तर श्रुतिशास्त्रांचा खरा शास्त्रार्थही त्यांना समजत नाही ५४.


    वेदाध्ययन नित्य करिती । अरण ब्राह्मण सूत्र निरुक्ती ।
    नव्हेचि कामक्रोधनिवृत्ती । पठणें परमप्राप्ती कदा न घडे ॥५५॥
    नित्य वेदाध्ययन करतात; अरण, ब्राह्मण, सूत्र, निरुक्त म्हणतात; पण कामक्रोधांची जर निवृत्ति होत नाही, तर त्या पठणानें परमार्थाची प्राप्ति कधींच व्हावयाची नाहीं ५५.


    देहाभिमानें भेददृष्टी । पढतां श्रुतिशास्त्रांच्या कोटी ।
    परमार्थेंसीं नव्हे भेटी । भेददृष्टी न वचतां ॥५६॥
    देहाभिमान धरून आणि भेददृष्टि ठेवून कोट्यवधि वेदशास्त्रें पठण केलीं असतांही, भेददृष्टि गेली नाहीं तर परमार्थाची भेट व्हावयाची नाहीं ५६.


    जो कां स्वप्नींचे स्वप्नीं जागा जाहला । स्वप्नीं वेदशास्त्र पढिन्नला ।
    जागा म्हणतां असे निजेला । तैसा व्यवहारू झाला शास्त्रज्ञांसी ॥५७॥
    जो स्वप्नांतल्या स्वप्नांतच जागा होतो व स्वप्नांतच वेदशास्त्र पढतो; तो जागा आहे म्हटलें तरी निजलेलाच होय. त्याप्रमाणेंच शास्त्रज्ञांचा व्यवहार होतो ५७.


    देहाभिमानेंसीं भेदभान । निःशेष जंव न वचे जाण ।
    तंववरी नव्हे निजज्ञान । अत्यंत बंधन तो भेद ॥५८॥
    देहाभिमानासह सर्व भेदभावना जोंपर्यंत पूर्णपणे गेली नाही, तोंपर्यंत आत्मज्ञान प्राप्त व्हावयाचें नाहीं. कारण भेद हाच मोठें बंधन होय ५८.


    सनकादिकांची आशंका । घेऊनि देव बोले देखा ।
    वेदविभाग नेटका । सकळ लोकां कळे तैसा ॥५९॥
    सनकादिकांचीच शंका लक्षात घेऊन सर्व लोकांस नीट कळेल अशा रीतीनें वेदाचा विभाग नीट रीतीनें देव सांगूं लागला ५९.


    स्वयें प्रकाशोनि सकळ भेदू । गर्जत उठी तुझा वेदू ।
    भेद वेदेंचि प्रतिपाद्यू । वेदानुवादू नव्हे मिथ्या ॥४६०॥
    (ती आशंका अशी) सर्व भेद स्वत:च प्रगट करून तुझा वेद गर्जना करीत उठलेला आहे. भेद हा मुळीं वेदानेंच प्रतिपादन केलेला आहे, आणि वेदाचें म्हणणें तर खोटें असत नाहीं ४६०.


    वेदवचन तें तात्त्विक । मानावें पैं आवश्यक ।
    हे तुझीच शिकवण देख । तो वेद लटिक म्हणावा कैसा ॥६१॥
    वेदाचें वचन हेंच खरें आहे, तें अवश्य मान्य केलेंच पाहिजे, असें तुझेंच सांगणे आहे. तेव्हां तो वेद लटका कसा म्हणावा ? ६१.


    वेदाज्ञेचा परम नेम । वेदें प्रतिपाद्य क्रियाकर्म ।
    वेदबळें वर्णाश्रम । निज स्वधर्म चालविती ॥६२॥
    वेदाज्ञेचा नियम म्हणजे सर्वांत श्रेष्ठ. वेदानेंच क्रिया व कर्म ह्यांचे प्रतिपादन केलेले आहे. सर्व वर्णाश्रम आपले स्वधर्म वेदाच्याच बळावर चालवितात ६२.


    वेद म्हणे जो लटिक । जो वेदबाह्य आवश्यक ।
    हें तूंचि बोलिलासी देख । तो वेद लटिक केवीं मानूं ॥६३॥
    वेद लटका असें जो म्हणेल, तोच खरोखर वेदबाह्य होय, हे तूंच सांगितले आहेस. तो वेद खोटा असें कसें मानूं ? ६३.


    ऐशी मानाल आशंका । तोहीविषयीं मीचि देखा ।
    वेदवादाच्या विवेका । विभाग नेटका सांगेन ॥६४॥
    (आशंकेचे उत्तर)-अशीही शंका घ्याल तर त्याविषयी मीच तुम्हांला वेदवचनांतील निरनिराळ्या भागांचा विचार नीट सांगतों ६४.


    अविद्याभेद सबळ ज्यासी । वेदू नियामक म्यां केला त्यासी ।
    मद्‌रूपीं अभेदता ज्या भक्तासी । मिणधा त्यापाशीं वेदवादु ॥६५॥
    अविद्यात्मक भेद ज्याच्यापाशी प्रबळ झालेला असतो, त्यालाच मी हा वेदाचा नियम लावून दिलेला आहे. परंतु ज्या भक्ताला माझ्या स्वरूपांत पूर्ण ऐक्य लाभलेलें असतें, त्याच्यापाशी वेदवचनें लाचार होतात ६५.


    वेद तितुकाही त्रिगुण । अभेदभजनें भक्त निर्गुण ।
    त्यासी वेदाचें नियामकपण । न चले जाण ममाज्ञा ॥६६॥
    वेद म्हणून जितका आहे तितका तीन गुणांनी व्याप्तच आहे, आणि अभेदभजनानें भक्त हा निर्गुण झालेला असतो, तेव्हा त्याला माझ्या आज्ञेमुळे वेदाचे निर्बंध मुळींच चालत नाहींत ६६.


    रायाचा जिवलग सेवकू । त्यासी द्वारपाळ नव्हे नियामकू ।
    कां दासीस लागल्या राजांकू । तीस मानी लोकू प्रधानादि ॥६७॥
    राजाचा जिवलग नोकर असला, तर त्याला दारांतला पहारेकरी कधीं अटकाव करीत नाही. किंवा एखाद्या दासीला जर राजाची मांडी बसावयाला मिळाली, तर मोठे मोठे प्रधानादि लोकसुद्धा तिला मान देतात ६७.


    निजकन्येसी शिकवी माता । लाज धरावी लोकांदेखतां ।
    एकांतीं मीनल्या कांता । लाज सर्वथा सोडावी ॥६८॥
    आपल्या कन्येला आईसुद्धा शिकवीत असतें कीं, लोकांच्या देखत मात्र नवऱ्याविषयीं लाजावें, परंतु एकांतात पतीची गांठ पडली असतां सर्व लाज सोडून द्यावी ६८.


    सबळ भेदांचें भेदमान । तंव दुर्लंघ्य वेदवचन ।
    अभेद भक्त माझे जाण । वेदविधान त्यां न बाधी ॥६९॥
    भेदांची भेदभावना प्रबळ असते, तोंपर्यंतच वेदाचें वचन दुर्लंघ्य असतें. पण माझें जें अभेदभावना धरणारें भक्त असतात, त्यांना कोणतेंच विधान बाधक होत नाहीं ६९.


    आशा तेचि अविद्याबाधू । छेदिल्या बाधीना वेदवादू ।
    जेवीं सूर्योदयापुढें चांदू । होय मंदू निजतेजें ॥४७०॥
    ज्याप्रमाणें सूर्योदयापुढे चंद्र आपल्या तेजानें फिका पडतो, त्याप्रमाणें आशा हीच अविद्यारूपानें बाधक होतें, तीं छेदून टाकलीं असतां वेदवाद बाधत नाहीं ४७०.


    असत्त्वाद् आत्मनोऽन्येषां भावानां तत्कृता भिदा ।
    गतयो हेतवश्चास्य मृषा स्वप्नदृशो यथा ॥ ३१ ॥
    [श्लोक ३१] वास्तविक या विश्वात आत्म्याव्यतिरिक्त अन्य कोणतीही देहादिक वस्तू सत्य नाही म्हणून स्वप्न पाहाणार्‍याच्या सर्व क्रिया जशा खोट्या असतात, त्याप्रमाणे अज्ञानी माणसाचेसुद्धा खोट्या देहाच्या आश्रयाने असणारे वर्णाश्रमधर्म त्यामुळे मिळणार्‍या स्वर्गादी गती आणि त्यांना कारण असणारी कर्मे हे सर्व खोटेच आहे. (३१)


    गुरुकृपा जो सज्ञान । त्यासी देहाचें अबाधित भान ।
    मिथ्या प्रपंचाचें दर्शन । कर्में कर्तेपण त्या नाहीं ॥७१॥
    गुरुकृपेच्या योगानें जो ज्ञानसंपन्न होतो, त्याला देहाची भावना बाधक होत नाहीं. त्याला प्रपंचाचें दर्शन मिथ्या होतें, आणि त्यानें कर्मे केली तरी त्यायोगानें त्याच्याकडे कर्तेपणा येत नाहीं ७१.


    अविद्या द्योतिले वर्णाश्रम । तेथींचे आविद्यक क्रियाकर्म ।
    तेथील जो वेदोक्त धर्म । तो अविद्याभ्रम अज्ञाना ॥७२॥
    वर्ण आणि आश्रम हें अज्ञानानेंच निर्मिलेलें आहेत. तेव्हां त्यांतील क्रियाकर्मही अज्ञानात्मकच असतें, म्हणून त्या वर्णाश्रमांतील जो वेदोक्त धर्म तो अज्ञान्यालाच अविद्येनें भ्रम उत्पन्न करतो ७२.


    सज्ञान भक्तांच्या ठायीं । ते अविद्या निःशेष नाहीं ।
    मा वेदविधान तेथें पाहीं । रिघावया कायी कारण ॥७३॥
    परंतु ज्ञानसंपन्न भक्त असतात त्यांच्या ठिकाणी तीं अविद्या मुळींच नाहीं. मग त्यांच्यामध्यें वेदाचें विधान शिरण्याचें कारण काय ? ७३.


    आंबा सफळित जव असे । तंव नेटेंपाटें राखण बैसे ।
    फळ हाता आल्या आपैसें । राखण वायसें राहेना ॥७४॥
    आंब्याला जोंपर्यंत फळे आलेली असतात, तोंपर्यंतच त्याला दक्षतेनें राखण राहाते. पण फळें हाती आली की, आपोआपच राखण निष्फळ उरून उठतें ७४.


    तेवीं अविद्येचें जंव बंधन । तंव वेदाचें वेदविधान ।
    अविद्या नाशिलिया जाण । विधीनें तें स्थान सोडिलें ॥७५॥
    त्याप्रमाणें जोंपर्यंत अज्ञानाचें बंधन आहें, तोंपर्यंत वेदाचें विधान आहें. तें अज्ञानच नाहींसें झालें असतां वेदविधीनें तें ठिकाण सोडलेंच म्हणून समजावें ७५,


    अविद्या जाऊनि वर्ततां देहीं । देहाचा देहत्वें हेतु नाहीं ।
    हें म्हणाल न घडेच कांहीं । ऐक तेंही सांगेन ॥७६॥
    अज्ञान नष्ट होऊन देहानें वागू लागलें असतां देहपणा हा देहाचा हेतूच राहत नाहीं, पण हें कांहीं घडावयाचेंच नाहीं असें म्हणाल तर तेंही सांगतों, ऐका ७६.


    स्वप्नींचें देहादि प्रपंचभान । स्वप्नाचमाजीं सत्य जाण ।
    जागें होतां तें अकारण । संस्कारें स्वप्न दिसतांही ॥७७॥
    स्वप्नांतील देहादिक प्रपंचाचा भास स्वप्नामध्येंच काय तो खरा असतो. काही संस्कारानें स्वप्न पडूनही जागे झाल्यावर तें सर्वच निष्कारण असें वाटतें ७७.


    स्वप्नीं राज्यपद पावला । कां व्याघ्रमुखीं सांपडला ।
    अथवा धनादिलाभ झाला । रत्‍नें पावला अनर्घ्यें ॥७८॥
    एखादा मनुष्य स्वप्नामध्यें राज्यपद पावला, किंवा वाघाच्या तोंडांत सांपडला, अथवा त्याला द्रव्यादिकांचा लाभ झाला, अमूल्य रत्नें मिळाली ७८,


    तेथींचें सुख दुःख हरिख । जागत्यासी नाहीं देख ।
    तेवीं सज्ञानासी आविद्यक । नोहे बाधक निजबोधें ॥७९॥
    तरी तेथचें सुख, दुःख किंवा हर्ष जागा झाल्यावर नाही. त्याप्रमाणें ज्ञात्यालाही आत्मज्ञानाच्या योगानें अज्ञानात्मक असें कांहींच बाधक होत नाहीं ७९.


    देहीं असोनि विदेहस्थिती । ऐशा बोधसाधिका ज्या युक्ती ।
    स्वयें सांगेन म्हणे श्रीपती । भेदाची उत्पत्ती छेदावया ॥४८०॥
    देहामध्यें असूनच विदेहस्थिति धारण करतां येईल अशा ज्या ज्ञानदायक युक्ति आहेत, त्या भेदाचा नाश करण्याकरितां तुम्हांला आता मी स्वतःच सांगतों असें श्रीकृष्ण म्हणाला ५८०.


    यो जागरे बहिरनुक्षणधर्मिणोऽर्थान् ।
    भुङ्क्ते समस्तकरणैहृदि तत्सदृक्षान् ।
    स्वप्ने सुषुप्त उपसंहरते स एकः ।
    स्मृत्यन्वयात्त्रिगुणवृत्तिदृगिन्द्रियेशः ॥ ३२ ॥
    [श्लोक ३२] जो बाल्य, तारूण्य इत्यादी अवस्थांच्या रूपाने वारंवार बदलणार्‍या देहादी पदार्थांना आपल्या इंद्रियांनी जागृत अवस्थेत उपभोगतो, तोच स्वप्नावस्थेत त्यांसारख्याच वासनामय पदार्थांचा मनाने उपभोग घेतो आणि गाढ निद्रेच्या वेळी तोच हे सर्व विषय आवरून ठेवतो अशा प्रकारे या तीनही अवस्थांचा अनुभव घेणारा साक्षी इंद्रियांचा स्वामी, चेतन आत्मा एकच आहे "ज्याने स्वप्न पाहिले, जो गाढ झोपला होता, तोच मी जागा आहे," या प्रत्यभिज्ञेवरून आत्म्याची एकता सिद्ध होते. (३२)


    तिहीं अवस्थांच्या ठायीं । आत्मा एकचि असे देहीं ।
    तोचि देहाच्या ठायीं विदेही । साक्षी पाहीं सर्वांचा ॥८१॥
    तिन्ही अवस्थांमध्यें देहांत आत्मा हा एकच असतो. तोच देहामध्यें विदेही असून सर्वांचा साक्षी आहे ८१.


    मी बाळ तोचि झालों तरणा । आतां आलों म्हातारपणा ।
    ऐशा वयसांचे साक्षीपणा । आपण आपणा देखतू ॥८२॥
    मी मूल होतों तोच तरणा झालों, आणि आतां म्हातारपणाला आलों, अशी वयाची साक्ष आपली आपणच पहात असतों ८२.


    जागृतीसी नाना भोग । सविस्तर भोगी अनेक ।
    तेचि स्वप्नामाजीं साङ्ग । निजहृदयीं चांग विस्तारी ॥८३॥
    जागृतीमध्यें असतांना नानाप्रकारचे सुखोपभोग अनेक प्रकारांनी पाहिजे तसे भोगतो, आणि तेच सर्व स्वप्नामध्यें आपल्या हृदयांत नीट रीतीनें पसरतो ८३.


    जागृतिभोगाचा संस्कारू । तोचि स्वप्नामाजीं विस्तारू ।
    मनोमय विश्वाकारू । निजहृदयीं वेव्हारू वाढवी ॥८४॥
    जागृतीमध्यें भोगाचा जो संस्कार घडलेला असतो, त्याचाच स्वप्नामध्यें विस्तार होतो. स्वप्नामध्यें मनोमयच विश्व उत्पन्न करून आपल्या हृदयामध्यें त्याचाच व्यवहार वाढवितो ८४,


    गज तुरंग खर नर । गिरि दुर्ग पुर नगर ।
    विशाळ सरिता समुद्र । वासनेचें वैचित्र्य स्वप्नीं देखे ॥८५॥
    हत्ती, घोडे, गाढव, पुरुष, पर्वत, किल्ले, पुरें, नगरें, मोठमोठ्या नद्या, समुद्र, इत्यादि वासनेंचे वैचित्र्य स्वप्नामध्यें पाहतो ८५.


    नाहीं जागृती नाहीं स्वप्न । अंतःकरणही करोनि लीन ।
    सुषुप्तिकाळीं तोचि जाण । अहंकारेंवीण उरलासे ॥८६॥
    तोच सुषुप्तीमध्यें जागृतीही नाहीं आणि स्वप्नही नाहीं, अशा स्थितीत अंतःकरणही लीन करून अहंकाराशिवाय राहतो ८६.


    विश्वाभिमानी इंद्रियवृत्ती । तेणें तो देखतसे जागृतीं ।
    तैजस अभिमानी अविद्यावृत्ती । स्वप्नस्थिती तो देखे ॥८७॥
    विश्वाभिमानी असतो तो आपला देह तोच मी व हे विषय माझे अशा वृत्तीचा असतो. त्या वृत्तीनें तो जागृतीमध्यें नेंहमी पहात असतो. तैजस अभिमानी असतो तो अज्ञानवृत्तीचा असतो, म्हणून तो स्वप्नस्थिति पहात असतो ८७.


    प्राज्ञ अभिमानी मूढवृत्ती । तो देखतसे सुषुप्ती ।
    एक आत्मा तिहींप्रती । न घडे निश्चितीं म्हणाल ॥८८॥
    प्राज्ञ अभिमानी प्रवृत्तीचा असतो, म्हणून तो सुषुप्ति अवस्था पहातो. आता एकच आत्मा ह्या तिन्ही अवस्थांत राहणें खरोखर घडणार नाहीं असें म्हणाल ८८,


    तिहीं अवस्थांचे अभिमानी । म्हणाल देखणे भिन्न तिनी ।
    तरी एक आत्मा द्रष्टेपणीं । उरला निदानीं तें ऐका ॥८९॥
    आणि तिन्ही अवस्था पाहणारे तिन्ही अभिमानी भिन्न भिन्न असतील असें म्हणाल, तर एकच आत्मा सरतेशेवटी द्रष्टेपणानें उरतो. तो कसा ? तें ऐका ८९.


    पहिला जो कां मी जागता । तेणें म्यां देखिली स्वप्नावस्था ।
    तोचि मी सुखें निजेला होता । या तिनी अवस्था स्वयें मी जाणें ॥४९०॥
    पहिला जो मी जागणारा, त्या मी स्वप्नावस्था पाहिली, आणि तोच मी सुखानें निजलोंही होतो. ह्यावरून ह्या तिन्ही अवस्था मी स्वतः जाणतों ४९०.


    जेणें जे देखिली नाहीं । तो ते अवस्था सांगेल कायी ।
    यालागीं तिहीं अवस्थांचे ठायीं । आत्मा पाहीं अनुस्यूत ॥९१॥
    ज्यानें जी अवस्था पाहिलीच नाहीं, तो ती अवस्था सांगू शकेल काय ? यावरूनच तिन्ही अवस्थांमध्यें आत्मा हा एकसारखाच भरलेला आहे ९१.


    जागृतीं इंद्रियां देखणेपण । स्वप्नीं देखणें तें तंव मन ।
    सुषुप्ति गाढ मूढ अज्ञान । कैंचें देखणेपण आत्म्यासी ॥९२॥
    जागृतीमध्यें इंद्रियांना पहाण्याचें सामर्थ्य असतें, स्वप्नामध्यें तर मन पाहणारें असतें, आणि सुषुप्तीमध्यें पूर्णपणे मूढ अज्ञानच असतें. तेथे आत्म्याला देखणेपण कशाचें ? ९२.


    येही आशंकेचें वचन । ऐका द्विज हो सावधान ।
    मन इंद्रियें जडें जाण । देखणेपण त्यां कैंचें ॥९३॥
    ब्राह्मण हो ! ह्याही शंकेचें उत्तर सावधान चित्तानें ऐका. मन आणि इंद्रियें ही जडच आहेत. त्यांना पाहण्याचें सामर्थ्य तें कशाचें ? ९३.


    जो मनाचा चाळकू । जो इंद्रियांचा प्रकाशकू ।
    जो सुषुप्तीचा द्योतकू । साक्षित्वें एकू तो आत्मा ॥९४॥
    जो मनाचा चालक, जो इंद्रियांचा प्रकाशक, जो सुषुप्तीचा द्योतक, तो साक्षित्वानें असणारा एक आत्माच होय ९५.


    म्हणाल सुषुप्ती आत्मा नाहीं । बोलणें न घडे कांहीं ।
    मी सुखें निजेलों होतों पाहीं । हें कोणाचे ठायीं जाणवे ॥९५॥
    आतां सुषुप्तीमध्यें आत्मा मुळींच नाहीं असें म्हणाल, तर तें बोलणें मुळींच शोभत नाहीं. कारण, मी मोठ्या आनंदांत निजलों होतो, ही जाणीव कोणाच्या ठिकाणी होतें ? ९५.


    प्रकृतिकार्याहूनि परता । देहादि अवस्थांतें प्रकाशिता ।
    गुण‍इंद्रियांचा नियंता । जाण तत्त्वतां तो आत्मा ॥९६॥
    तर प्रकृतिकार्याहून निराळा, देहादि अवस्थांना प्रकाशित करणारा, आणि गुण व इंद्रिये ह्यांचें नियमन करणारा तोच खरोखर आत्मा होय ९६.


    इंद्रियें आत्मा नव्हती हा नेम । त्यांचें सदा एकदेशी कर्म ।
    आत्मा सर्वकर्ता सर्वोत्तम । करोनि निष्कर्म सर्वदा ॥९७॥
    इंद्रिये आत्मा नव्हेत हा नियमच आहे. कारण त्याचे कर्म नेहमी एकदेशी असतें, आणि आत्मा तर सर्वकर्ता सर्वोत्तम असून सदासर्वदा कर्मे करून निष्कर्म आहे ९७.


    मन आत्मा नव्हे तें ऐक वर्म । संकल्पविकल्प त्याचें कर्म ।
    आत्मा निर्विकल्प निरुपम । विश्रामधाम जगाचें ॥९८॥
    मन हा कांहीं आत्मा नव्हे, त्यांतील वर्म ऐक. संकल्प आणि विकल्प हें मनाचे कर्म आहे, आणि आत्मा हा निर्विकल्प, निरुपम असा असून जगाच्या विश्रांतीचें स्थान आहे ९८.


    जो सुषुप्तिसुखभोगसाक्षी । जो देखणेपणें तिहीं लोकीं ।
    तो मी आत्मा गा एकाकी । जाण निष्टंकीं निश्चित ॥९९॥
    जो सुषुप्तिसुखभोगाचा साक्षी त्रिभुवनांत पाहणें हेंच ज्याचें स्वरूप आहे, असा जो एक अद्वितीय आत्मा, तो मीच हे निश्चयपूर्वक लक्षांत ठेव ९९.


    एवं युक्तीचिया विभागलीला । परमात्मा जो एकू साधिला ।
    तो साधकांसी उपयोगा आला । योग सिद्धी नेला तेणें बळें ॥५००॥
    अशा युक्तीच्या कौशल्यानें जो एक परमात्मा साध्य करावा, तोच साधकांच्या उपयोगाला येतो, आणि त्याच्याच सामर्थ्यानें योगही सिद्धीला जातो ५००.

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...