मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ ओव्या १0१ ते २००
सकळ मंत्रांची जननी । जे द्विजन्मा करी तत्क्षणीं ।
गायत्रीच्या मंत्रग्रहणीं । ब्राह्मणपणीं अधिकारू ॥१॥
जी सर्व मंत्रांची माता, जी तत्काल ब्राह्मणाला द्विजपणा देतें, त्या गायत्रीच्या मंत्राचें ग्रहण केलें असतां ब्राह्मणांना ब्राह्मणपणाचा अधिकार प्राप्त होतो १.
जे सकळ मंत्रांचा राजा । जे वांट्या आली असे द्विजा ।
जिचेनि धाकें द्विजपूजा । मज अधोक्षजा करणें पडे ॥२॥
जिचेनि धाकें द्विजपूजा । मज अधोक्षजा करणें पडे ॥२॥
जी सर्व मंत्रांचा राजा आहे, जी ब्राह्मणांच्या वाट्यास आली आहे, जिच्या धाकानें मला श्रीकृष्णालाही ब्राह्मणांची पूजा करणे भाग पडतें २.
ते गायत्री स्वभावतां । आली असे ब्राह्मणांच्या हाता ।
तिची उपेक्षा करितां । लौल्यें दरिद्रता पावले ॥३॥
तिची उपेक्षा करितां । लौल्यें दरिद्रता पावले ॥३॥
ती गायत्री ब्राह्मणांच्या हाती सहज आली आहे. तिची लोभिष्टपणानें उपेक्षा करून ब्राह्मण दरिद्रदशा पावले आहेत ३.
गायत्रीनिष्ठ जो ब्राह्मण । त्याचे मस्तकीं मी वंदीं चरण ।
मंत्रीं गायत्री श्रेष्ठ जाण । वेद प्रमाण ये अर्थीं ॥४॥
मंत्रीं गायत्री श्रेष्ठ जाण । वेद प्रमाण ये अर्थीं ॥४॥
गायत्रीवर निष्ठा ठेवणारा जो ब्राह्मण असतो, त्याचे चरण मी शिरसावंद्य करतो. मंत्रांमध्यें गायत्रीमंत्र श्रेष्ठ आहे अशाबद्दल वेद प्रमाण आहेत ५.
गायत्री रिघाल्यावीण कांहीं । इतर मंत्रां रिघमू नाहीं ।
मुख्यत्वें गायत्रीच्या ठायीं । ते लागले पाहीं सकळ मंत्र ॥५॥
मुख्यत्वें गायत्रीच्या ठायीं । ते लागले पाहीं सकळ मंत्र ॥५॥
गायत्री मंत्राचा प्रवेश झाल्यावांचून इतर मंत्रांना वेदांत प्रवेश करण्यास मुळीं वावच नव्हता. मुख्यतः गायत्री मंत्राच्या ठिकाणी ते सर्व मंत्र वसती करून राहिले आहेत ५.
नव्हतां गायत्रीसंबंध । मुखीं रिघों न शके वेद ।
इतर मंत्रां केवीं संवाद । वेदां वंद्य गायत्री ॥६॥
इतर मंत्रां केवीं संवाद । वेदां वंद्य गायत्री ॥६॥
गायत्री मंत्राचा संबंध नसेल तर ब्राह्मणांच्या मुखांत वेद शिरूंच शकणार नाहीत. मग इतर मंत्रांची गोष्ट काय सांगावी ? तात्पर्य, वेदांना गायत्री वंद्य आहे ६.
गायत्रीचें गुह्य परम । चिन्मात्रैक परब्रह्म ।
तो मंत्र ब्राह्मणासीच सुगम । परी तेही वर्म चुकले ॥७॥
तो मंत्र ब्राह्मणासीच सुगम । परी तेही वर्म चुकले ॥७॥
गायत्री मंत्रांतील अत्यंत गुह्य म्हणजे एक ज्ञानस्वरूप परब्रह्मच होय. तो मंत्र ब्राह्मणांनाच सुलभ आहे. पण तेसुद्धा त्यांतील वर्म चुकले ७.
एवं गायत्रीमंत्र ब्रह्मपूर्ण । सकळ सिद्धींचें कारण ।
शैववैष्णवमंत्रग्रहण । तेणें त्वरित जाण सत्त्वशुद्धी ॥८॥
शैववैष्णवमंत्रग्रहण । तेणें त्वरित जाण सत्त्वशुद्धी ॥८॥
अशा प्रकारें गायत्री मंत्र हा पूर्ण ब्रह्मस्वरूप आहे व सर्व सिद्धींना उत्पन्न करणारा आहे. शैव किंवा वैष्णव मंत्रांचे ग्रहण केले, तरीसुद्धा गायत्रीमंत्रानेंच तत्काल सत्त्वशुद्धि होते ८.
सत्त्वशुद्धीचे परिपाटीं । शैववैष्णवमंत्रकोटी ।
तेणें सत्त्वशुद्धी उठाउठीं । होय निजात्मदृष्टी साधकां ॥९॥
तेणें सत्त्वशुद्धी उठाउठीं । होय निजात्मदृष्टी साधकां ॥९॥
सत्त्वाची शुद्धि झाल्यावर त्याच्यामागून कोट्यवधि शैवमंत्र किंवा वैष्णवमंत्र प्राप्त होतात, आणि त्या सत्त्वशुद्धीनेंच साधकांना तत्काळ आत्मदृष्टि प्राप्त होते ९.
मंत्रग्रहणविचार । उद्धवा जाण हा साचार ।
आतां बोलिला जो संस्कार । तोही प्रकार परियेसीं ॥११०॥
आतां बोलिला जो संस्कार । तोही प्रकार परियेसीं ॥११०॥
उद्धवा ! मंत्रग्रहण करण्याचा हा खरा विचार आहे हें तूं लक्षांत ठेव. आतां संस्कार असें ज्याला म्हणतात तो प्रकार ऐक ११०.
मनाचे संकल्पविकल्प । तोडावया अतिसाक्षेप ।
येचि अर्थींचा खटाटोप । महासाटोप जो मांडीं ॥११॥
येचि अर्थींचा खटाटोप । महासाटोप जो मांडीं ॥११॥
मनाचे संकल्प व विकल्प तोडावयाच्या उत्कट इच्छेनें त्याचविषयींचा प्रयत्न जो मोठ्या नेंटानें सुरू करतो ११.
संकल्पु उठूंचि न लाहे । जेथें उठी तेथें ठेंचित जाये ।
विवेकाचेनि बळें पाहे । मोकळु होये मनाचा ॥१२॥
विवेकाचेनि बळें पाहे । मोकळु होये मनाचा ॥१२॥
त्याला आधी संकल्प उत्पन्नच होत नाही. आणि कदाचित् उत्पन्न झालाच तर तो त्याला जेथल्या तेथेच ठेचून टाकीत असतो. तो निरंतर विचारदृष्टीनेंच पाहात असतो, म्हणून तो मनानेंही मोकळा असतो १२.
परमात्मनिष्ठापरवडी । अखंड मनाची मोडी पाडी ।
उसंत घेवों नेदी अर्धघडी । स्मरणनिरवडी मन राखे ॥१३॥
उसंत घेवों नेदी अर्धघडी । स्मरणनिरवडी मन राखे ॥१३॥
परमात्मनिष्ठेच्या भरांत तो निरंतर मनाला मोडूनच काढतो, त्याच्याशिवाय मनाला अर्धघटकाही मोकळे राहूं देत नाही. स्मरणाच्या कौशल्यांतच मन गुंतवून ठेवतो १३.
वैराग्यबळें दमी मन । तेणें भेणें करी हरिचिंतन ।
दासी नुल्लंघी स्वामीचें वचन । तैसें स्मरणाधीन मन करी ॥१४॥
दासी नुल्लंघी स्वामीचें वचन । तैसें स्मरणाधीन मन करी ॥१४॥
तो वैराग्याच्या बळानें मनाचें दमन करतो, आणि त्याच्या भयानेंच हरीचें चिंतन करीत राहतो. धन्याचा शब्द जसा दासी उल्लंघन करीत नाही, त्याप्रमाणे तो आपलें मनही ईश्वरनामस्मरणाधीन करून ठेवतो १४.
इंद्रियें पाहती नाना पदार्थां । मन न पाहे आणिका अर्था ।
जागृतीं स्वप्नीं स्वभावतां । अखंडतां हरि स्मरे ॥१५॥
जागृतीं स्वप्नीं स्वभावतां । अखंडतां हरि स्मरे ॥१५॥
इंद्रियें अनेंक प्रकारच्या पदार्थांना पाहात असतात, परंतु मन हे दुसऱ्या कोणत्याच विषयाला पाहात नाही. तें जागृतीमध्यें व स्वप्नामध्येंसुद्धा स्वभावतःच अखंड हरीचें स्मरण करीत असतें १५.
ऐशा संस्कारें संस्कारिलें मन । निमिषोन्मेषीं हरिचिंतन ।
श्वासोच्छ्वासांचे गमनागमन । सोहंध्यान त्या ठायीं ॥१६॥
श्वासोच्छ्वासांचे गमनागमन । सोहंध्यान त्या ठायीं ॥१६॥
अशा संस्कारानें मन संस्कृत झाले म्हणजे ते निमिषानिमिषाला हरीचेंच चिंतन करीत राहातें. श्वासोच्छासांचें जाणेंयेणें होत असतें त्यांतसुद्धा 'परब्रह्म तें मीच' हें ध्यान असते १६.
स्वाभाविक स्मरणादरु । या नांव आत्मसंस्कारु ।
हा सत्त्ववृद्धीचा प्रकारु । शारङ्गधरु बोलिला ॥१७॥
हा सत्त्ववृद्धीचा प्रकारु । शारङ्गधरु बोलिला ॥१७॥
साहजिकच भगवंताच्या नामस्मरणाचा आदर असणें, ह्यालाच आत्मसंस्कार असें म्हणतात. हाच सत्ववृद्धीचा प्रकार श्रीकृष्णानें सांगितला १७.
आत्मशुद्धीचें महाकारण । बोलिलों तें हें दशलक्षण ।
साधकीं सेवावया जाण । विशद निरूपण म्यां केलें ॥१८॥
साधकीं सेवावया जाण । विशद निरूपण म्यां केलें ॥१८॥
आत्मशुद्धीचें जें मुख्य कारण, तेंच हें दहा लक्षणांनी तुला सांगितले. साधकांनीही त्याचे सेवन करावे म्हणून मीही त्याचें अधिक स्पष्टीकरण केलें १८.
जेणें खवळला वाढे तमोगुण । तें तमोवृद्धीचें दशलक्षण ।
केवळ त्यागावया जाण । तेंही निरूपण सांगेन ॥१९॥
केवळ त्यागावया जाण । तेंही निरूपण सांगेन ॥१९॥
आता जेणेंकरून तमोगुण खवळून वाढतो, त्या तमोवृद्धीचीही दहा लक्षणे आहेत. त्यांचा निखालस त्याग करावा म्हणून तेंही निरूपण सांगतों १९.
तेथींचा आगम आभिचारिक । वेदविरुद्ध मार्ग देख ।
वारुणी माध्वी मद्योदक । आवश्यक सेविती ॥१२०॥
वारुणी माध्वी मद्योदक । आवश्यक सेविती ॥१२०॥
त्यांतील शास्त्र आभिचारिद्ध असतें. तो मार्ग वेदविरुद्ध होय. त्यांत दारू, मद्य, ताडी ही हटकून ग्रहण करतात १२०.
जे उभयभ्रष्ट पाखंडी । वेषधारी वृथा मुंडी ।
त्याचें संगतीची अतिगोडी । जेथ अपरवडी विधिवेदां ॥२१॥
त्याचें संगतीची अतिगोडी । जेथ अपरवडी विधिवेदां ॥२१॥
जे इहलोक व परलोक ह्यांपासून भ्रष्ट झालेले, पाखांडी, नाना प्रकारची सोंगें घेणारे व मस्तकाचें मुंडण केलेले असतात, त्यांच्या संगतीची मोठी आवड असते; आणि ज्यांत वेदविधींना विरोधी प्रकार असतात २१.
द्वेष चोहटा कां परद्वार । तेथेंचि बैसका निरंतर ।
काळ तों त्यासी मध्यरात्र । तैं व्यापार कर्माचा ॥२२॥
काळ तों त्यासी मध्यरात्र । तैं व्यापार कर्माचा ॥२२॥
द्वेष, जुवा किंवा परदारा, ही दुर्व्यसनें असतील तेथेंच कायमची बैठक असते, आणि त्याला वेळ तर ऐन मध्यरात्रीची ! त्या वेळीं त्या कर्माचा विधि चालावयाचा ! २२.
क्रियारंभु जारणमारण । मोहन स्तंभन उच्चाटण ।
कां करावें वशीकरण । हें कर्म जाण तामस ॥२३॥
कां करावें वशीकरण । हें कर्म जाण तामस ॥२३॥
त्या कर्माचा आरंभ म्हणजे जारण, मारण, मोहन, स्तंभन, उच्चाटन, किंवा वशीकरण करावें. हे सर्व कर्म तामस होय असें समज २३.
जन्म म्हणिजे दीक्षाग्रहण । प्रेतभूतपिशाचविद्या जाण ।
करितां प्रेतभूतआराधन । प्रेतजन्म जाण तामसां ॥२४॥
करितां प्रेतभूतआराधन । प्रेतजन्म जाण तामसां ॥२४॥
जन्म म्हणजे दीक्षाग्रहण होय. म्हणून प्रेतभूतपिशाचविद्येनें प्रेतभूतांचें आराधन केलें म्हणजे तामसांनाही प्रेताचाच जन्म प्राप्त होतो २४.
जेथ तमोगुण प्रधान । तो क्रोधयुक्त पुरुष जाण ।
सदा शत्रूचें करी ध्यान । करावया हनन उद्यतू ॥२५॥
सदा शत्रूचें करी ध्यान । करावया हनन उद्यतू ॥२५॥
ज्याच्या अंगीं तमोगुण प्रामुख्यानें असतो, तो पुरुष क्रोधयुक्त होऊन निरंतर शत्रूचाच ध्यास घेतो व त्याचा घात करावयालाच उद्युक्त असतो २५.
तामसी मंत्र मुकी मैळी । अथवा उच्छिष्टचांडाळी ।
कां प्रेतदेवता कंकाळी । मंत्रशैली हे तेथें ॥२६॥
कां प्रेतदेवता कंकाळी । मंत्रशैली हे तेथें ॥२६॥
त्याचे मंत्र तामसी असतात, आणि देवता पाहिल्या तर मुकी, मैळी (घाणेरडी), उष्टी चांडाळीण किंवा प्रेताची देवता कंकाळी म्हणून असते ती. आणि त्यांची मंत्रयोजनाही अशीच ! २६.
संस्कार दगड माती । माझें घर हे माझी क्षिती ।
स्वप्नीं निजेला घाली भिंती । एवढी आसक्ती गृहाची ॥२७॥
स्वप्नीं निजेला घाली भिंती । एवढी आसक्ती गृहाची ॥२७॥
दगडमातीचा संस्कार करून बांधलेलें घर माझें, ही जमीन माझी, हाच निरंतर ध्यास. निजल्यावर स्वप्नांतसुद्धा भिंती घालीत असतो, एवढी घराची आसक्ति ! २७.
घर करावया अशक्त । तरी त्या खिंडोराआंत ।
सदा दगडमाती राखत । नांदतें तेथ येवों नेदी ॥२८॥
सदा दगडमाती राखत । नांदतें तेथ येवों नेदी ॥२८॥
घर बांधण्याचेंसुद्धा सामर्थ्य नसलें, तरी त्या बखळीच्या आंत नेहमीं दगडमाती राखीत असतो. चिटपांखरूंसुद्धा तेथे राहावयाला येऊं देत नाही २८.
देहालागीं गेह करणें घडे । तें देह कष्टवी अतिदुर्वाडें ।
तामससंस्कारें रोकडें । केवळ वेडें गृहासक्तीं ॥२९॥
तामससंस्कारें रोकडें । केवळ वेडें गृहासक्तीं ॥२९॥
ज्या देहासाठी घर बांधावें लागतें, त्या देहालाही तो दुःसह कष्ट देत असतो. तामस संस्काराच्या योगानें घराच्या आसक्तीनें तो केवळ वेडाच बनलेला असतो २९.
गृहासक्तीचा व्यापारू । जो मरणान्त न सोडी नरू ।
तो जाण तामस संस्कारू । त्याचा संसारू तो माती ॥१३०॥
तो जाण तामस संस्कारू । त्याचा संसारू तो माती ॥१३०॥
गृहाच्या लोभाची खटपट जो पुरुष मरेपर्यंत सोडीत नाही, तोच त्याचा तामस संस्कार होय. आणि त्याचा संसार म्हणजे माती १३०.
जेणें थोरावे तमोगुण । तें हें जाण दशलक्षण ।
ऐक राजसाचें चिन्ह । त्याचें भिन्न स्वरूप ॥३१॥
ऐक राजसाचें चिन्ह । त्याचें भिन्न स्वरूप ॥३१॥
ज्याच्या योगानें तमोगुण बळावतो, त्यांची ही दहा लक्षणे आहेत. आतां राजसाचें स्वरूप ऐक. त्याचें स्वरूप याच्याहून निराळें असतें ३१.
करावें सत्त्वाच्या अंगीकारा । त्यागावा तमोगुण दुसरा ।
पुढें चाविरा मागें लातिरा । ऐक तिसरा रजोगुण ॥३२॥
पुढें चाविरा मागें लातिरा । ऐक तिसरा रजोगुण ॥३२॥
सत्त्वगुणाचा स्वीकार करावा, आणि दुसरा जो तमोगुण त्याचा त्याग करावा. आतां पुढून चावरा आणि मागून लाथा मारणारा असा तिसरा रजोगुण ऐक ३२.
हो कां शाहाणी सिंदळी नारी । ते पुरुषाचें मन बरें धरी ।
मग ठकोनि जाय व्यभिचारीं । तैसी परी रजोगुणा ॥३३॥
मग ठकोनि जाय व्यभिचारीं । तैसी परी रजोगुणा ॥३३॥
हें पहा, शहाणी आणि शिंदळ स्त्री असते, ती आपल्या पतीचें मन प्रसन्न ठेविते, आणि मग त्याला फसवून व्यभिचाराकरितां बाहेर जाते. त्याप्रमाणेंच हा रजोगुण आहे ३३.
जैसें कां कुचर घोडें । बरें दिसें परी आडवीं अडे ।
कांहीं केल्या न चले पुढें । मागिलीकडे सरों लागे ॥३४॥
कांहीं केल्या न चले पुढें । मागिलीकडे सरों लागे ॥३४॥
ज्याप्रमाणें एखादें अडेल तट्टूं दिसण्यांत मोठे छान दिसते, पण रस्त्यामध्यें अडते आणि आडवाटेंत शिरतें ; आणि मग काहीं केलें तरी पुढें पाऊल म्हणून टाकीतच नाही, मागें मागेंच सरूं लागतें ३४;
तैसी रजोगुणाची स्थिती । त्यागू न संभवे कल्पांतीं ।
धर्म करितो केवळ स्फीती । मनीं आसक्ती कामाची ॥३५॥
धर्म करितो केवळ स्फीती । मनीं आसक्ती कामाची ॥३५॥
त्याप्रमाणेंच रजोगुणाची स्थिति आहे. त्यामध्यें कल्पान्त येऊन ठेपला तरी त्याग घडण्याचा संभवच नाही. असा मनुष्य धर्म करतो, तो केवळ दांभिक भावानेंच करतो, आणि मनांत कामाची आसक्ति असते ३५.
सर्वस्व घ्यावया संवचोरू । सवें धांवे होऊनि नफरू ।
तैसा रजोगुणाचा विचारू । कामनासंसारू वाढवी ॥३६॥
तैसा रजोगुणाचा विचारू । कामनासंसारू वाढवी ॥३६॥
सोबतीनें चालत असलेला चोर, सर्वस्व लुटण्याकरितां चाकर होऊन बरोबर धावत असतो. त्याचप्रमाणे रजोगुणाचाही प्रकार आहे. तोही इच्छेचा संसार वाढवीत असतो ३६,
धर्म करी कामासक्ती । केलें भोगवी निश्चितीं ।
पाडी जन्ममरणआवर्तीं । कदा कल्पांतीं सुटेना ॥३७॥
पाडी जन्ममरणआवर्तीं । कदा कल्पांतीं सुटेना ॥३७॥
त्यामुळे मनुष्य कामाच्या आसक्तीनें धर्म करतो, केलेलें कर्म निश्चयपूर्वक उपभोगून घेतो, आणि त्यामुळे तो स्वतःलाच जन्ममरणाच्या भोवऱ्यांत पाडतो. कधी कल्पांतीसुद्धा त्यांतून सुटत नाही ३७.
सात्त्विक तरले माझेनि भजनें । तामस तरले मद्विरोधध्यानें ।
राजसाचें जन्ममरणधरणें । रजोगुणें उठीना ॥३८॥
राजसाचें जन्ममरणधरणें । रजोगुणें उठीना ॥३८॥
सात्त्विक लोक माझ्या भजनानें तरून जातात. तामस असतात ते माझ्या विरोधभक्तीनें तरून जातात. परंतु राजसांचे जन्ममरणांतील भ्रमण रजोगुणामुळें कधी सुटतच नाही ३८.
जेणें प्रबळ वाढ रजोगुणा । त्या सांगेन मी दशलक्षणां ।
केवळ त्यागावया काम्यकल्पना । या निरूपणा अवधारीं ॥३९॥
केवळ त्यागावया काम्यकल्पना । या निरूपणा अवधारीं ॥३९॥
रजोगुणाची वाढ ज्याच्या योगानें प्रबळ होते, ती दहा लक्षणें तुला सांगतों. काम्यकल्पना निखालस सोडून देण्याकरितां हेंही निरूपण ऐक ३९.
राजसाचें प्रवृत्तिशास्त्र । जें केवळ कामनापर ।
जेणें होय इहामुत्र । तेथें अत्यादर राजसा ॥१४०॥
जेणें होय इहामुत्र । तेथें अत्यादर राजसा ॥१४०॥
राजस लोकांचें जें शास्त्र तें केवळ प्रवृत्तिपर असतें. तें केवळ वासनामय असतें. ज्याच्या योगानें इहलोकीं व परलोकीं सुख मिळेल त्यासाठींच राजस माणसाला नेहमीं अत्यंत आदर असतो १४०.
आप म्हणिजे तें तंव जळ । वेळा वाळा सुपरिमळ ।
कर्पूरयुक्त अतिशीतळ । प्रिय प्रबळ तें राजसा ॥४१॥
कर्पूरयुक्त अतिशीतळ । प्रिय प्रबळ तें राजसा ॥४१॥
आप म्हणजे केवळ पाणी. पण त्यालाच वेलदोड्याचा व वाळ्याचा उत्तम सुगंध येत असेल, त्यांत कापुराचाही वास असेल, व अत्यंत थंडगार असें असेल, तेंच राजसाला अत्यंत प्रिय असते ४१.
प्रजासंगति त्याची ऐक । राजवर्गीं सभानायक ।
व्यवहारीं चतुर अतिरंजक । प्रवृत्तिलोक प्रिय त्यासी ॥४२॥
व्यवहारीं चतुर अतिरंजक । प्रवृत्तिलोक प्रिय त्यासी ॥४२॥
आतां तो कोणाची संगत धरतो तें ऐक. राजासारखे लोक, सभापति, व्यवहारांत चतुर, लोकांचें अत्यंत चित्तरंजन करणारे, असे प्रवृत्तिपर लोक असतील तेच त्याला आवडत असतात ४२.
राजद्वारीं कां सभेमाझारीं । बैसावें पारीं अथवा वेव्हारीं ।
कां मंडपतोरणाभीतरीं । सन्मानें करी उपविष्ट ॥४३॥
कां मंडपतोरणाभीतरीं । सन्मानें करी उपविष्ट ॥४३॥
राजदरबारांत किंवा सभेत, पारावर किंवा मोठी व्यापारी देवघेव चालते अशा ठिकाणीं, किंवा मंडप व तोरणें लावलेलीं असतील त्यांत तो मोठ्या सन्मानानें जाऊन बसतो ४३.
वेळु न गमे जैं घरिंच्या घरीं । तैं क्रमी चौहाटा नगरीं ।
कां बैसे बुद्धिबळांवरी । अत्यादरीं सादर ॥४४॥
कां बैसे बुद्धिबळांवरी । अत्यादरीं सादर ॥४४॥
जेव्हां घरच्या घरांत वेळ जाईनासा होतो, तेव्हां शहरांतील एखाद्या अड्डयावर जाउन बसतो, नाहीतर बुद्धिबळाचा डाव खेळण्यास मोठ्या आवडीनें तयार होऊन बसतो ४४.
ऐक रजोगुणाची वेळ । सूर्योदयाउपरी जो काळ ।
कां राजस जे सांजवेळ । ते ते काळ प्रिय त्यासी ॥४५॥
कां राजस जे सांजवेळ । ते ते काळ प्रिय त्यासी ॥४५॥
आतां रजोगुणाची वेळ ऐक. सूर्योदय झाल्यानंतर जो काळ असेल तो, किंवा संध्याकाळची वेळ ही राजस होय. ह्या वेळा त्याला मोठ्या प्रिय ! ४५.
राजसांचें सकाम कर्म । धनधान्यार्थ करिती धर्म ।
वासना ते पशुपुत्रकाम । स्वप्नीं निष्काम नेणती ॥४६॥
वासना ते पशुपुत्रकाम । स्वप्नीं निष्काम नेणती ॥४६॥
राजस लोकांचें सर्व कृत्य लोभिष्टपणाचें असतें. धनधान्य प्राप्त व्हावें म्हणून ते धर्म करतात. पशु-पुत्र असावे हीच त्यांची नेहमींची वासना. ते निरिच्छपणा स्वप्नांतसुद्धा जाणत नाहींत ४६.
राजसांसी काम गहन । कामासक्ती दीक्षाग्रहण ।
तेंचि त्यांचें जन्म जाण । सदा ध्यान स्त्रियेचें ॥४७॥
तेंचि त्यांचें जन्म जाण । सदा ध्यान स्त्रियेचें ॥४७॥
राजसांना इच्छा मोठी दांडगी असते. कामाच्या आसक्तीसाठींच दीक्षा घ्यावयाची, तेंच त्यांचें जन्म हें लक्षांत ठेव. त्यांना निरंतर स्त्रियेचाच ध्यास असतो ४७.
मंत्र घ्यावा अभिलाखें । जेणें सन्मान होय लौकिकें ।
ज्याचा सुगरावा थोर देखे । तो मंत्र आवश्यकें आदरी ॥४८॥
ज्याचा सुगरावा थोर देखे । तो मंत्र आवश्यकें आदरी ॥४८॥
मंत्र घ्यावयाचा तो मनात काहीतरी अभिलाप धरून घ्यावयाचा. जेणेंकरून आपला सन्मान होईल, आपली प्रतिष्ठा वाढेल आणि ज्याचा गुण मोठा अलौकिक दिसेल, असला मंत्र तो अत्यंत आदरपूर्वक अवश्य ग्रहण करतो ४८.
संस्कार अतिराजस । शरीरभोगांचे विलास ।
नाना परिमळ बहुवस । उत्तम वास सुधूत ॥४९॥
नाना परिमळ बहुवस । उत्तम वास सुधूत ॥४९॥
त्याचा संस्कार तर अतिशयच राजस असतो. त्यांत शरीरभोगाचेच विलास असावयाचे. परोपरीचे अनेक सुगंध, आणि धुवून अगदी स्वच्छ केलेली वस्त्रें, हींच त्याला नेहमीं आवडत असतात ४९.
संस्काराची अंतरनिष्ठा । लौकिकीं व्हावी देहप्रतिष्ठा ।
माझी आज्ञा वंद्य वरिष्ठां । सभेचे चौहाटां मी पूज्य ॥१५०॥
माझी आज्ञा वंद्य वरिष्ठां । सभेचे चौहाटां मी पूज्य ॥१५०॥
पोटांतील हेतु हाच कीं, माझा लौकिक वाढून लोकांनीं मला गादीतक्याशीं बसवावें, माझी आज्ञा मोठमोठ्या लोकांनी शिरसावंद्य करावी, आणि भर सभेत लोकांनी मलाच मान द्यावा १५०.
रजोगुण दशलक्षण । उद्धवा त्याची ही वोळखण ।
राजसासी जन्ममरण । सर्वथा जाण सोडीना ॥५१॥
राजसासी जन्ममरण । सर्वथा जाण सोडीना ॥५१॥
उद्धवा ! रजोगुणाची जी दहा लक्षणे आहेत, त्यांचे स्वरूप हें. म्हणून राजस लोकांना जन्ममरण सर्वस्वी कधीच सुटत नाही ५१.
सात्त्विक त्याग करी विवेकनिष्ठें । तामस त्याग करी कडकडाटें ।
राजसासीं त्याग न घडे स्पष्टें । द्रव्यदारालोभिष्टें लोभाळू ॥५२॥
राजसासीं त्याग न घडे स्पष्टें । द्रव्यदारालोभिष्टें लोभाळू ॥५२॥
सात्त्विक मनुष्य विवेकावर निष्ठा ठेवून त्याग करतो, तामस असतो तो रागाच्या झपाट्यानें त्याग करतो, परंतु राजस हा कनक-कांतेला लोभाविष्ट झालेला असल्यामुळे त्याला खरा त्याग म्हणून कधीच घडत नाही ५२.
तिहीं गुणांचें लक्षण । म्यां सांगितलें भिन्न भिन्न ।
तिहींचें सर्वसाधारण । सांगेन चिन्ह तें ऐक ॥५३॥
तिहींचें सर्वसाधारण । सांगेन चिन्ह तें ऐक ॥५३॥
या तीन गुणांचे लक्षण मी तुला निरनिराळ्या प्रकारानें सांगितले. आतां तिहींचे सर्वसाधारण स्वरूपही सांगतों ऐक ५३.
तत्तत्सात्त्विकमेवैषां यद् यद् वृद्धाः प्रचक्षते ।
निंदन्ति तामसं तत्तद् राजसं तदुपेक्षितम् ॥ ५ ॥
निंदन्ति तामसं तत्तद् राजसं तदुपेक्षितम् ॥ ५ ॥
[श्लोक ५] श्रेष्ठ लोक ज्यांची प्रशंसा करतात, ते सात्त्विक समजावेत, ज्यांची उपेक्षा करतात ते राजस आणि ज्यांची निंदा करतात, ते तामस समजावेत. (५)
विवेकवृद्ध वृद्धाचारें । ज्यातें स्तविती अत्यादरें ।
तें तें सात्त्विक जाण खरें । निजनिर्धारे निश्चित ॥५४॥
तें तें सात्त्विक जाण खरें । निजनिर्धारे निश्चित ॥५४॥
विचारानें ज्यांची बुद्धि परिपक्व झाली आहे असे वाडवडील जें आचरण करतात, ज्याची लोक अत्यंत आदरानें स्तुति करतात, तें तें खरोखर सात्त्विक कृत्य होय, असे माझे ठाम मत आहे ५४.
विवेकियाचे अनुवादा । ज्या पदार्थांची करिती निंदा ।
ते ते जाण तामसबाधा । माझ्या निजबोधा मानलें ॥५५॥
ते ते जाण तामसबाधा । माझ्या निजबोधा मानलें ॥५५॥
विचारवंतांच्या उपदेशानें ज्या गोष्टींची लोक निंदा करतात, ती ती तमोगुणाची पीडा होय असें माझ्या मनाला वाटतें ५५.
ज्यातें स्तवित ना निंदित । जीवें भावें उपेक्षित ।
तें राजस जाण निश्चित । बाधा अद्भुत तयाची ॥५६॥
तें राजस जाण निश्चित । बाधा अद्भुत तयाची ॥५६॥
ज्याची कोणी स्तुतीही करीत नाहीं, कोणी निंदाही करीत नाहीं, मनापासून उपेक्षा मात्र करतात, तें कृत्य खरोखर राजस होय, हें लक्षांत ठेव. त्याची बाधा फार कठीण ! ५६.
जैसें कां विखें रांधिलें अन्न । वरिवरी गोड अंतरीं मरण ।
तैसा जाण राजस गुण । अतर्क्य बंधन तयाचें ॥५७॥
तैसा जाण राजस गुण । अतर्क्य बंधन तयाचें ॥५७॥
ज्याप्रमाणें विष घालून शिजविलेलें अन्न वरून वरून गोड लागतें, परंतु त्याच्या आंत मरण असतें, त्याप्रमाणें हा राजस गुण आहे असें समज. त्याचें बंधन मोठें विलक्षण असतें ५७.
राजसासी ज्ञानबोधू । करितां थोंटावला वेदू ।
त्याचे उपदेशीं ब्रह्मा मंदू । माझेनेही बोधू न करवे ॥५८॥
त्याचे उपदेशीं ब्रह्मा मंदू । माझेनेही बोधू न करवे ॥५८॥
राजसाला ज्ञानोपदेश करतां करतां वेदसुद्धा टेकीस आला. त्याला उपदेश करतांना ब्रह्मदेवसुद्धा थकला. खुद्द माझ्यानेंसुद्धा त्याला उपदेश करवत नाही ५८.
याचिलागीं रजोगुण । विवेकी सांडिला उपेक्षून ।
उपेक्षेचें हेंच कारण । तुज म्यां जाण सांगीतलें ॥५९॥
उपेक्षेचें हेंच कारण । तुज म्यां जाण सांगीतलें ॥५९॥
याचकरितां विचारी लोकांनी रजोगुण उपेक्षा करून फेंकून दिला आहे. त्याला दूर लोटण्याचें हेंच कारण. तुलाही मी तें सांगितलें ५९.
यालागीं सात्त्विक सेवन । साधकीं अवश्य करावें जाण ।
सात्त्विकसेवनाचा गुण । तुज मी संपूर्ण सांगेन ॥१६०॥
सात्त्विकसेवनाचा गुण । तुज मी संपूर्ण सांगेन ॥१६०॥
म्हणून साधकांनी सात्त्विकाचेंच सदासर्वदा अवश्य सेवन करीत असावे. त्या सात्त्विकसेवनाचा संपूर्ण गुण तुला मी आतां सांगतों ऐक १६०.
सात्त्विकान्येव सेवेत पुमान् सत्त्वविवृद्धये ।
ततो धर्मस्ततो ज्ञानं यावत् स्मृतिरपोहनम् ॥ ६ ॥
ततो धर्मस्ततो ज्ञानं यावत् स्मृतिरपोहनम् ॥ ६ ॥
[श्लोक ६] माणसाने सत्त्वगुणाच्या वृद्धीसाठी सात्त्विक पदार्थांचेच सेवन करावे त्यामुळे धर्म वाढून ज्ञान उत्पन्न होईल आणि ज्ञानामुळे आत्मसाक्षात्कार होऊन सर्व प्रकारचे संशय नाहीसे होतील. (६)
सात्त्विक द्रव्यें सेवितां । सत्त्ववृद्धी होय तत्त्वतां ।
सत्त्ववृद्धी पुरुषीं होता । धर्म स्वभावतां प्रवर्ते ॥६१॥
सत्त्ववृद्धी पुरुषीं होता । धर्म स्वभावतां प्रवर्ते ॥६१॥
सात्त्विक पदार्थांचे सेवन केलें असतां खरोखरच सत्वगुणाची वृद्धि होते आणि पुरुषामध्यें सत्त्वगुणाची वृद्धि झाली असतां धर्माकडे आपोआपच प्रवृत्ति होते ६१.
धर्मप्रवृत्ति माझें भजन । माझ्या भक्तिउल्हासें जाण ।
भक्तांसी मी होयें प्रसन्न । तैं स्वभावें ज्ञान प्रकाशे ॥६२॥
भक्तांसी मी होयें प्रसन्न । तैं स्वभावें ज्ञान प्रकाशे ॥६२॥
धर्मप्रवृत्तीनें माझें भजन घडतें, आणि माझ्या भक्तीचा उल्हास वाढला कीं भक्तांना मी प्रसन्न होतों, त्या वेळीं ज्ञानही आपोआप प्रगट होतें असें समज ६२.
तत्त्वमस्यादि वाक्यव्युत्पत्ती । ते गुरुद्वारा ज्ञानाची प्राप्ती ।
तरी सत्त्वशुद्धित्वें धर्म भक्ती । कोणे अर्थीं सेवावी ॥६३॥
तरी सत्त्वशुद्धित्वें धर्म भक्ती । कोणे अर्थीं सेवावी ॥६३॥
'तत्त्वमसि' इत्यादि जीं वाक्यें आहेत, त्यांचा अर्थ गुरूच्या द्वारानें कळून ज्ञानप्राप्ति होते, तर मग सत्त्वशुद्धीनें कोणत्या हेकरितां धर्मभक्ति केली पाहिजे? ६३.
ऐसा विकल्प जरी तूं धरिसी । उद्धवा ऐक त्याही विचारासी ।
यथार्थ सांगेन तुजपाशीं । सत्त्वशुद्धीसी उपयोगू ॥६४॥
यथार्थ सांगेन तुजपाशीं । सत्त्वशुद्धीसी उपयोगू ॥६४॥
उद्धवा ! असा जर तूं मनामध्यें विकल्प धरशील, तर त्याचा विचारही ऐक. सत्त्वशुद्धीचा उपयोग काय, तोही मी तुला यथार्थ रीतीनें सांगेन ६४,
केवळ सत्त्वशुद्धीविण । जाहल्या गुरुवाक्याचें श्रवण ।
तें पां हाटगाण्याऐसें जाण । अनोळखपण स्वस्वरूपा ॥६५॥
तें पां हाटगाण्याऐसें जाण । अनोळखपण स्वस्वरूपा ॥६५॥
सत्त्वशुद्धि झाल्याशिवाय, केवळ गुरुवाक्याचेंच श्रवण घडलें, तर ते बाजारांतल्या कलकलाटाप्रमाणें होय. त्यानें कधी आत्मस्वरूपाची ओळख व्हावयाची नाहीं ६५.
आंधळें उपजलें जे कुशीं । स्तनपान करी अहर्निशीं ।
परी तें न देखे माउलीसी । दशा तैशी उपदेशा ॥६६॥
परी तें न देखे माउलीसी । दशा तैशी उपदेशा ॥६६॥
आंधळे पोर जिच्या पोटीं जन्मास येतें, तें रात्रंदिवस तिचें स्तनपान करीत राहातें. पण त्याला आई म्हणून कसली असतें ती दृष्टीसही पडत नाहीं. तशीच त्या उपदेशाची स्थिति असते ६६.
इंद्रियें सचेतनमेळीं । भगवंत सर्वांतें प्रतिपाळी ।
त्यातें न देखती विषयांधळीं । अतिअंध झालीं चित्तशुद्धीविण ॥६७॥
त्यातें न देखती विषयांधळीं । अतिअंध झालीं चित्तशुद्धीविण ॥६७॥
प्रत्येक इंद्रियांत सजीवपणा ठेवून भगवान् हा सर्वांचाच प्रतिपाळ करीत असतो. परंतु विषयानें आंधळी झालेली माणसें त्याला पहात नाहीत. त्यांच्या चित्ताची शुद्धीच झालेली नसल्यामुळें त्यांना कांहींच दिसत नाहीं ६७.
अजागळां लोंबते जाण । मिथ्या भाषण म्हणती ते स्तन ।
त्यापरी सत्त्वशुद्धीविण । वृथा जाण उपदेश ॥६८॥
त्यापरी सत्त्वशुद्धीविण । वृथा जाण उपदेश ॥६८॥
शेळीच्या गळ्यांत चामडें लोंबत असतें, त्याला 'स्तन' असें खोटेंच म्हणत असतात. त्याचप्रमाणे सत्वाची बुद्धि झाल्याशिवाय उपदेश हाही व्यर्थ होय १८.
वाहते उदकीं लिहिले लेख । तळीं अक्षर नुमटे एक ।
तेवीं सत्त्वशुद्धीविण देख । निजज्ञान सुटंक प्रकटेना ॥६९॥
तेवीं सत्त्वशुद्धीविण देख । निजज्ञान सुटंक प्रकटेना ॥६९॥
वाहत्या पाण्यावर अक्षरें लिहिलीं तर त्या पाण्याच्या पृष्ठभागावर एक अक्षरसुद्धा उमटत नाहीं. त्याप्रमाणें आत्मज्ञानही सत्त्वशुद्धीशिवाय स्पष्टपणें प्रगट होत नाहीं ६९.
झाल्या आपादतां सत्त्वशुद्धी । जंव प्रकटेना धर्मबुद्धी ।
तंव निजज्ञानाची नव्हे सिद्धी । जेवीं ग्रहणामधीं चंद्रमा ॥१७०॥
तंव निजज्ञानाची नव्हे सिद्धी । जेवीं ग्रहणामधीं चंद्रमा ॥१७०॥
पूर्णपणें सत्त्वशुद्धि झाली असतांही जोंपर्यंत धर्मबुद्धि प्रगट होत नाहीं, तोंपर्यंत, ग्रहणांत ज्याप्रमाणें चंद्र दिसावयाचा नाही, त्याप्रमाणें आत्मज्ञानाचीही सिद्धि व्हावयाची नाहीं १७०.
ऐकतां हरिकथाश्रवण । बाष्प रोमांच स्वेद रुदन ।
रुका वेंचितां जाय प्राण । तेथेंही ब्रह्मज्ञान प्रकटेना ॥७१॥
रुका वेंचितां जाय प्राण । तेथेंही ब्रह्मज्ञान प्रकटेना ॥७१॥
हरिकथाश्रवण करूं लागलें कीं, कंठ भरून यावयाचा, आंगावर रोमांच उभे रहावयाचे, आंगाला घाम यावयाचा, रडूं लागावयाचें; पण एक पै खर्चण्याचा वेळ आला कीं प्राणच जावयाचा ; असें ज्याचें वर्तन असेल त्याच्या ठिकाणींही ब्रह्मज्ञान प्रगट व्हावयाचें नाहीं ७१.
हृदयींचा लोभ जंव न तुटे । तंव निश्चयज्ञान कैंचे भेटे ।
सत्त्वशुद्धिधर्मू जैं प्रकटे । तैं निजज्ञाननेटें सुपंथीं लागे ॥७२॥
सत्त्वशुद्धिधर्मू जैं प्रकटे । तैं निजज्ञाननेटें सुपंथीं लागे ॥७२॥
अंत:करणांतील लोभ जोंपर्यंत सुटला नाहीं, तोंपर्यंत खरें ज्ञान कसें मिळणार ? जेव्हां सत्त्वशुद्धि आणि धर्म हीं दोन्ही स्पष्ट दिसूं लागतील, तेव्हांच तो आत्मज्ञानाच्या जोरदार प्रेरणेनें योग्य मार्गाला लागतो ७२.
ते चालतां धर्मपंथीं । जै माझी भक्ति होय सांगाती ।
तैं चोरांची न पडे गुंती । शीघ्रगती मज पावे ॥७३॥
तैं चोरांची न पडे गुंती । शीघ्रगती मज पावे ॥७३॥
त्या धर्ममार्गानें वागत असतांही जर माझी भक्ति सोबतीला असेल तरच चोरांपासून अडवणूक होत नाहीं, व झटदिशीं तो मला येऊन मिळतो ७३.
ते भक्तीचा सांडितां सांगातू । पुढील अनोळख महापंथू ।
तेथ कामक्रोध करिती घातू । विकल्पआवर्तू बुडविती ॥७४॥
तेथ कामक्रोध करिती घातू । विकल्पआवर्तू बुडविती ॥७४॥
त्या भक्तीची संगत सोडून दिली असतां पुढील राजमार्गसुद्धा ओळखत नाहींसे होतात. तेव्हां काम-क्रोध घात करण्याला प्रवृत्त होतात आणि विकल्परूप भोंवरे असतात ते बुडवितात ७४.
भाग्येंवीण माझी भक्ती । प्राण्यासी नव्हे गा सांगाती ।
जिचे संगें चालतां पंथीं । अल्पही गुंती पडेना ॥७५॥
जिचे संगें चालतां पंथीं । अल्पही गुंती पडेना ॥७५॥
अरे ! भाग्याशिवाय माझी भक्ति प्राण्यांच्या संगतीला असत नाहीं. ज्या भक्तीच्या संगतीनें मार्ग चालूं लागलें असतां यत्किंचितही अडचण पडत नाहीं ७५.
माझे भक्तीसवें महाशूर । नांवाणिगे नवविध वीर ।
सन्नदबद्ध सदा समोर । महाझुंझार निजबोधें ॥७६॥
सन्नदबद्ध सदा समोर । महाझुंझार निजबोधें ॥७६॥
माझ्या भक्तीबरोबर मोठे शूर व नांवाजलेले असे नऊ प्रकारचे वीर असतात. ते युद्धाला सज झालेले असून सदोदित शत्रूच्या समोर उभे राहतात. आत्मज्ञानाच्या योगानें ते मोठे योद्धे बनले आहेत ७६.
यालागीं माझे भक्तीविण । सहस्त्रधा केल्या श्रवण मनन ।
माझी प्राप्ति नव्हे जाण । भजनें पूर्ण मत्प्राप्ती ॥७७॥
माझी प्राप्ति नव्हे जाण । भजनें पूर्ण मत्प्राप्ती ॥७७॥
म्हणून माझ्या भक्तीशिवाय हजारों प्रकारांनीं श्रवण व मनन केलें असतांही माझी प्राप्ति होत नाही. भजनानेंच माझी पूर्ण प्राप्ति होते ७७.
सर्व भूतीं भगवद्भावो । या नांव मुख्यभक्ति पहा हो ।
ते सांगाती झालिया स्वयमेवो । कामक्रोधमोहो न शकती बाधूं ॥७८॥
ते सांगाती झालिया स्वयमेवो । कामक्रोधमोहो न शकती बाधूं ॥७८॥
अहो ! सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी भगवंताचीच भावना ठेवणे ह्याचंच नांव माझी श्रेष्ठ भक्ति होय. ती स्वत:च सोबतीण झाली म्हणजे काम, क्रोध, मोह हे पीडा देऊं शकत नाहींत ७८.
साक्षेपें नेऊनि घागरी । पालथी घातल्या गंगासागरीं ।
जळबिंदु रिघेना भीतरीं । तैशी परी महावाक्या ॥७९॥
जळबिंदु रिघेना भीतरीं । तैशी परी महावाक्या ॥७९॥
मोठ्या अगत्यानें घागर नेऊन ती गंगेत किंवा समुद्रात उपडी बुडविली असतां तींत पाण्याचा एक थेंबसुद्धा शिरत नाहीं, त्याप्रमाणेंच महावाक्याचीही गोष्ट आहे ७९.
यालागीं अत्यादरेंसीं जाण । धर्मयुक्त माझें भजन ।
करितां मी होय प्रसन्न । मत्प्रसादें ज्ञान प्रकाशे ॥१८०॥
करितां मी होय प्रसन्न । मत्प्रसादें ज्ञान प्रकाशे ॥१८०॥
म्हणून अत्यंत आदरानें आणि धर्मशील बुद्धीनें माझे भजन केलें असतां मी प्रसन्न होतो, आणि माझ्या प्रसादानेंच ज्ञान प्रकाशित होतें १८०.
लोभ ठेऊनि अर्थस्वार्थीं । कोरडी करितां माझी भक्ती ।
मी प्रसन्न नव्हें श्रीपती । जाण निश्चितीं उद्धवा ॥८१॥
मी प्रसन्न नव्हें श्रीपती । जाण निश्चितीं उद्धवा ॥८१॥
उद्धवा ! असें न करता अर्थावर आणि स्वार्थावरच लोभदृष्टि ठेवून माझी कोरडीच भक्ति केली असतां मी लक्ष्मीपति प्रसन्न होत नाहीं, हें निश्चित समज ८१,
जो धनें मनें काया वचनें । वेंचूनि भजे मजकारणें ।
त्यासीच म्यां प्रसन्न होणें । जेवीं चंद्रकिरणें चकोरा ॥८२॥
त्यासीच म्यां प्रसन्न होणें । जेवीं चंद्रकिरणें चकोरा ॥८२॥
जो धन, मन, शरीर, वाणी ही झिजवून माझं भजन करतो, त्यालाच, जसा चंद्रकिरणांनी चकोर प्रसन्न होतो, तसा मी प्रसन्न होतों, ८२.
व्याली धेनु वत्सा वोरसे । तेवीं मी तुष्टें अतिसंतोषें ।
तेवीं माझेनि प्रसादवशें । माझें ज्ञान प्रकाशे मद्भक्तां ॥८३॥
तेवीं माझेनि प्रसादवशें । माझें ज्ञान प्रकाशे मद्भक्तां ॥८३॥
व्यालेली गाय जशी वत्साला स्नेहभरित होऊन दूध देतें, त्याप्रमाणें अत्यंत संतोषानें मीही प्रसन्न होतो. त्या माझ्या प्रसादाच्या योगानेंच माझे ज्ञान माझ्या भक्तांना प्रगट होते ८३.
सगुण सुंदर आणि पतिव्रता । अतिशयें पढियंती होय कांता ।
तिसी सर्वस्व दे न मागतां भर्ता । तेवीं मी मद्भक्तां प्रसन्न ॥८४॥
तिसी सर्वस्व दे न मागतां भर्ता । तेवीं मी मद्भक्तां प्रसन्न ॥८४॥
मोठी सद्गुणी, सुंदर आणि पतिव्रता असून पतीला अत्यंत आवडणारी स्त्री असेल तर तिचा पति तिनें न मागतांच तिला सर्वस्व देतो, त्याप्रमाणें मी माझ्या भक्तांना प्रसन्न होतो ८४,
माझेनि प्रसादें प्रकाशे ज्ञान । श्रुति स्मृती नांव म्हणती जाण ।
सविलास अविद्यानिरसन । 'अपोहन' या नांव ॥८५॥
सविलास अविद्यानिरसन । 'अपोहन' या नांव ॥८५॥
माझ्याच प्रसादानें जें ज्ञान प्रगट होतें, त्यालाच 'श्रुति' व 'स्मृति' अशी नांवे देतात हें लक्षांत ठेव. आणि सहज लीलेनें अविद्येचा नाश होतो, त्याचे नांव 'अपोहन' (दोन्ही शरीरांना कारणभूत अशा गुणांचे निरसन ) ८५.
गुणास्तव देह जाण । देहास्तव उपजे ज्ञान ।
तेणें ज्ञानें गुणनिर्दळण । देहनिरसन न घडे म्हणसी ॥८६॥
तेणें ज्ञानें गुणनिर्दळण । देहनिरसन न घडे म्हणसी ॥८६॥
गुणांपासून देह उत्पन्न होतो, आणि देहापासून ज्ञान उत्पन्न होतें, पण त्याच ज्ञानानें गुणांचा नाश होतो, तेव्हां देहाचे काही निरसन होत नाहीं असें म्हणशील ८६.
हे गोष्टी तूं म्हणसी कुडी । कीं पक्षी आपुले पांख मोडी ।
नारळ नारळीतें तोडी । स्वमांसाची गोडी व्याघ्र चाखे ॥८७॥
नारळ नारळीतें तोडी । स्वमांसाची गोडी व्याघ्र चाखे ॥८७॥
कारण पक्षी आपलेच पंख तोडून टाकील, किंवा नारळच नारळीला तोडील, किंवा वाघ आपल्या मांसाची गोडी आपणच चाखील, ही गोष्ट खोटी असें तूं म्हणशील ८७.
हें न घडतें जैं घडों बैसे । तैं देहींचेनि ज्ञानें गुणदेह नासे ।
हा विकल्पू धरिसी मानसें । ऐक अनायासें तो निरासू ॥८८॥
हा विकल्पू धरिसी मानसें । ऐक अनायासें तो निरासू ॥८८॥
हें कधीं न घडणारेंच जर घडून येईल तर देहांतील ज्ञानानें गुणांचा आणि देहाचा नाश होईल. असा जर तुझ्या मनात विकल्प येईल, तर त्याचेंही निराकरण सहज ऐकून ठेव ८८.
वेणुसङ्घर्षजो वह्निर्दग्ध्वा शाम्यति तद्वनम् ।
एवं गुणव्यत्ययजो देहः शाम्यति तत्क्रियः ॥ ७ ॥
एवं गुणव्यत्ययजो देहः शाम्यति तत्क्रियः ॥ ७ ॥
[श्लोक ७ ] माणसाने सत्त्वगुणाच्या वृद्धीसाठी सात्त्विक पदार्थांचेच सेवन करावे त्यामुळे धर्म वाढून ज्ञान उत्पन्न होईल आणि ज्ञानामुळे आत्मसाक्षात्कार होऊन सर्व प्रकारचे संशय नाहीसे होतील. (६)
दैवें वायूच्या कल्लोळीं । परस्परें वेळूजाळीं ।
स्वजातिकांचणीं इंगळी । पेटली ते होळी वनाची करी ॥८९॥
स्वजातिकांचणीं इंगळी । पेटली ते होळी वनाची करी ॥८९॥
दैवयोगानें वाऱ्याच्या सोसाट्यांत वेळूंच्या रानामध्यें ते वेळु परस्परांवर घांसले जातात व अशा रीतीनें त्यांच्या स्वजातीयांच्या घर्षणानें ठिणगी पडते, आणि ती पेटून सर्व वनाची होळी करून टाकते ८९.
अग्नि उपजला जे कांडीं । तेंही कांडें जाळूनि सांडी ।
वनीं नुरवूनियां काडी । स्वयें राखोंडी होऊनि विझे ॥१९०॥
वनीं नुरवूनियां काडी । स्वयें राखोंडी होऊनि विझे ॥१९०॥
त्याच्या ज्या कांड्यांत अग्नि उत्पन्न होतो, तें कांडेंसुद्धा तो जाळून खाक करतो. तो त्या वनांतील एक काडीसुद्धा शिल्लक ठेवीत नाहीं; आणि स्वतःही राख होऊन विझून जातो १९०.
तेवीं वैराग्याभ्यासवायूंनीं । होतां त्रिगुणांची कांचणी ।
तेथें प्रकटला ज्ञानाग्नी । अविद्यावनीं दाहकू ॥९१॥
तेथें प्रकटला ज्ञानाग्नी । अविद्यावनीं दाहकू ॥९१॥
त्याप्रमाणें वैराग्याच्या अभ्यासरूप वायूनें त्रिगुणांचे घर्षण होतांच तेथे ज्ञानरूप अग्नि उत्पन्न होतो, आणि तो अविद्यारूप वनाला जाळणारा होतो ११.
तो हरिगुरुकृपा खवळला । वृत्तिरूपें प्रज्वळला ।
देहद्वयेंसीं लागला । प्रवर्तला गुणांतें जाळूं ॥९२॥
देहद्वयेंसीं लागला । प्रवर्तला गुणांतें जाळूं ॥९२॥
तो हरिरूप गुरूच्या कृपेनें धडाडतो, वृत्तीच्या रूपानें भडकतो, आणि दोन्ही देहांना लागून गुणांना जाळावयास प्रवृत्त होतो ९२.
जळाल्या आषातृष्णेच्या पाळी । जळालीं कामलोभांची कोल्हीं ।
क्रोधव्याघ्राची होळी झाली । आगी लागली मदगजा ॥९३॥
क्रोधव्याघ्राची होळी झाली । आगी लागली मदगजा ॥९३॥
तेव्हां आशेच्या आणि तृष्णेच्या झुंडी जळून जातात, कामलोभरूप कोल्हीं जळून जातात, क्रोधरूप वाघाची होळी होते, आणि मदरूपी हत्तीही पेटूं लागतो ९३.
जाळिली स्नेहाची आरांटी । जाळिली असत्याची बोरांटी ।
जाळिला मोहअजगरू उठाउठी । जाळिला शेवटीं काळविट काळू ॥९४॥
जाळिला मोहअजगरू उठाउठी । जाळिला शेवटीं काळविट काळू ॥९४॥
स्नेहाचें कांटेरी झुडुप जळून जातें, असत्यरूप बोरीचे कांटे जळून जातात, मोहरूप अजगर तर तत्काळ जळून जातो, आणि शेवटी काळरूप काळवीटही जळून जातो ९४.
उठिला अहंकाराचा सोरू । धरितां न धरे अनिवारू ।
तोही जाळिला दुर्धरू । वणवा चौफेरू कोंडला ॥९५॥
तोही जाळिला दुर्धरू । वणवा चौफेरू कोंडला ॥९५॥
इतक्यांत अहंकाररूप डुकर उठतो. कितीही पाठलाग केला तरी तो सापडत नाही, इतका तो अनिवार होतो. पण तो विक्राळरूपी डुकर देखील जळून जातो. इतका तो वणवा चहूं बाजूंनीं पसरलेला असतो ९५.
पळूनि जावयापुरता । अणुभरी ठावो नुरेचि रिता ।
एवं जळाला तो पळतपळतां । अहंसोरु सर्वथा निमाला ॥९६॥
एवं जळाला तो पळतपळतां । अहंसोरु सर्वथा निमाला ॥९६॥
पळून जाण्यापुरती एक अणुभरसुद्धा सुटी जागा राहात नाहीं; अशा रीतीनें अहंतारूप रानडुकर पळता पळतांच जळून जातो व पूर्णपणे मरतो ९६.
नवल अग्नीचें विंदाण । आपणिया जाळी आपण ।
दाहकशक्तीतें जाळून । स्वस्वरूपीं जाण उपरमे ॥९७॥
दाहकशक्तीतें जाळून । स्वस्वरूपीं जाण उपरमे ॥९७॥
अग्नीचें लाघव मोठें विलक्षण आहे. तो आपणच आपल्यालासुद्धा जाळून घेतो ! इतकेच नव्हे, तर तो दाहकशक्तीलासुद्धा जाळून टाकून आपल्या स्वस्वरूपांत जाऊन स्थिर होतो ९७.
ऐसें ऐकोनि निरूपण । उद्धवासी विस्मयो गहन ।
जनास केवढी नागवण । आप आपणिया आपण वोढवली ॥९८॥
जनास केवढी नागवण । आप आपणिया आपण वोढवली ॥९८॥
हें निरूपण ऐकून उद्धवाला मोठें आश्चर्य वाटलें. तो म्हणाला, लोकांवर केवढा हा संकटप्रसंग आपोआप ओढवला आहे ! ९८.
नश्वरदेहाचिये साठीं । पाविजे परब्रह्माची पुष्टी ।
ते सांडूनियां करंटीं । विषयनिष्ठीं मरमरों मरती ॥९९॥
ते सांडूनियां करंटीं । विषयनिष्ठीं मरमरों मरती ॥९९॥
ह्या नश्वर देहापासून परब्रह्माचा आनंद प्राप्त होतो. असें असतां तो सोडून देऊन दुर्दैवी लोक विषयांवरच लुब्ध होऊन मर मर मरतात ! ९९.
सात्त्विकसेवनें सत्त्ववृद्धी । तेणें अलभ्य लाभे सिद्धी ।
ते सांडोनियां दुर्बुद्धी । विषयविधीं रातले ॥२००॥
ते सांडोनियां दुर्बुद्धी । विषयविधीं रातले ॥२००॥
सात्विक सेवनानें सत्त्वाची वृद्धि होतें, आणि तेणेंकरून दुर्मिळ अशा सिद्धीचा लाभ होतो. पण ती सिद्धि सोडून देऊन दुर्बुद्धि लोक विषयाच्या विधीमध्येंच रममाण होतात ! २००.
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ ओव्या १ ते १००
एकनाथी भागवत अध्याय १३ ओव्या १0१ ते २००
एकनाथी भागवत अध्याय १३ ओव्या २०१ ते ३००
एकनाथी भागवत अध्याय १३ ओव्या ३०१ ते ४००
एकनाथी भागवत अध्याय १३ ओव्या ४०१ ते ५००
एकनाथी भागवत अध्याय १३ ओव्या ५०१ ते ६००
एकनाथी भागवत अध्याय १३ ओव्या ६०१ ते ७००
एकनाथी भागवत अध्याय १३ ओव्या ७०१ ते ७८१
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...