मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ ओव्या ६०१ ते ६२८
शत्रु जिणोनियां कडाडीं । रणांगणीं उभवितां गुढी ।
शस्त्रेंसी कवच जंव न फेडी । तंव विश्रांति गाढी न पविजे ॥१॥
धडाक्यानें शत्रूला जिंकलें, आणि रणांगणांत विजयध्वज उभारला, तरी शस्त्रासहवर्तमान अंगांतलें चिलखत जोपर्यंत काढलें नाही, तोपर्यंत खरी विश्रांति मिळत नाही १.
गरोदरेसी प्रसूति होये । पुत्रजन्में सुखावली ठाये ।
तेही बारावळी जैं पाहे । तैं भोगूं लाहे पुत्रसुख ॥२॥
तेही बारावळी जैं पाहे । तैं भोगूं लाहे पुत्रसुख ॥२॥
गरोदर असलेल्या स्त्रीला प्रसूति झाली, आणि पुत्र होऊन लगेच जरी ती आनंदित झाली, तरी ती जेव्हा त्याचे बारसें पाहील, तेव्हांच पुत्राचे खरे सुख भोगू शकेल २.
पुरुष निमोनियां जाये । त्या देहाचें दहन होये ।
तरी अवशेष सुतक राहे । तें गेलिया होये निजशुद्धी ॥३॥
तरी अवशेष सुतक राहे । तें गेलिया होये निजशुद्धी ॥३॥
एखादा पुरुष मरून गेला असतां त्याच्या देहाचे दहन होते, तरी सुतक हें बाकी राहतेंच. ते जाईल तेव्हांच आपली शुद्धि होते ३.
तेवीं जावोनियां अज्ञान । उरला जो ज्ञानाभिमान ।
तोही त्यागिलिया जाण । चित्समाधान स्वानंदें ॥४॥
तोही त्यागिलिया जाण । चित्समाधान स्वानंदें ॥४॥
त्याप्रमाणें अज्ञान जाऊन जो ज्ञानाभिमान शिल्लक राहतो, तोही त्यागिला असतां स्वानंदानें आत्मसमाधान होते ४.
खैराचा शूळ तत्त्वतां मारी । मा चंदनाचा काय आन करी ।
तेवीं अभिमान दोहींपरी । बाधकता धरी ज्ञानाज्ञानें ॥५॥
तेवीं अभिमान दोहींपरी । बाधकता धरी ज्ञानाज्ञानें ॥५॥
खैराचा शूल असला म्हणजे तो खरोखर मारतो, आणि तो चंदनाचा असला म्हणून कांही निराळें करील की काय ? त्याप्रमाणेंच ज्ञानाचा किंवा अज्ञानाचा असा दोन्ही प्रकारचा अभिमान बाधकच होतो ५.
लोखंडाची बेडी तोडी । मा आवडीं सोनियाची जडी ।
चालतां तेही तैशीच आडी । बाधा रोकडी जैशी तैशी ॥६॥
चालतां तेही तैशीच आडी । बाधा रोकडी जैशी तैशी ॥६॥
लोखंडाची बेडी तोडली आणि मग मोठ्या हौसेनें सोन्याची घातली तरी चालतांना तीही तशीच अडथळा करूं लागते आणि पीडा जशीच्या तशीच राहते ६.
'ब्रह्महमस्मि' हा अभिमान । शुद्ध ब्रह्म नव्हे जाण ।
अहंपणें तेंही कठिण । तेंही लक्षण अवधारीं ॥७॥
अहंपणें तेंही कठिण । तेंही लक्षण अवधारीं ॥७॥
'ब्रह्माहमस्मि'-'ब्रह्म तेच मी'-हा अभिमान कांहीं शुद्ध ब्रह्म नव्हे, हे लक्षांत ठेव. अहंपणामुळें तेही कठीणच आहे. त्याचे लक्षणही ऐक ७.
जळापासोनि लवण होये । तें जळींचें जळीं विरोनि जाये ।
मोतीं झालें तें कठिण पाहें । उदकीं न जाये विरोनी ॥८॥
मोतीं झालें तें कठिण पाहें । उदकीं न जाये विरोनी ॥८॥
पाण्यापासून मीठ होते, आणि ते पाण्यातल्या पाण्यात विरून जाते; पण मोती पाण्यापासूनच होते तरी तें कठीण असते, म्हणून ते पाण्यांत विरून जात नाही ८.
मुक्तपणें मोला चढलें । तें वनिताअधरीं फांसा पडिलें ।
मुक्तचि परी नासा आलें । कठिण केलें अभिमानें ॥९॥
मुक्तचि परी नासा आलें । कठिण केलें अभिमानें ॥९॥
ते मुक्तपणामुळें जरी मोलाला चढले, तरी स्त्रीच्या ओठांजवळ सोन्याच्या तारेत अडकून पडते. ते मुक्त असूनही नाकाजवळ आलें, एवढा अभिमानानें कठीणपणाचा प्रसंग आणला ! ९.
तेवीं अज्ञानअभिमान आहे । तो सर्वथा तत्काळ जाये ।
ज्ञानाभिमान कठिण पाहें । गोंविताहे मुक्तत्वें ॥६१०॥
ज्ञानाभिमान कठिण पाहें । गोंविताहे मुक्तत्वें ॥६१०॥
त्याप्रमाणें अज्ञानाचा अभिमान असतो तो तत्काळ नाहीसा होतो, पण ज्ञानाभिमान मोठा कठीण आहे. तो मुक्तपणानेंसुद्धा गुंतवून पाडतो ६१०.
अपक्व घटू तत्काळ गळे । तो पृथ्वीचा पृथ्वीस मिळे ।
भाजिलें खापर अतिकाळें । पृथ्वीस न मिळे कठिणत्वें ॥११॥
भाजिलें खापर अतिकाळें । पृथ्वीस न मिळे कठिणत्वें ॥११॥
मातीची घागर कच्ची असते ती तत्काळ गळूं लागते व ती मातीस माती मिळून जाते. पण तेंच भाजलेलें खापर असूं द्या, की ते कठीण असल्यामुळें कितीही दिवस गेले तरी मातीला मिळत नाही ११.
प्रपंच अज्ञानें झाला लाठा । ज्ञानअज्ञानांचा सत्ववांटा ।
फेडूनि कांटेन कांटा । दोनी आव्हांटा सांडावे ॥१२॥
फेडूनि कांटेन कांटा । दोनी आव्हांटा सांडावे ॥१२॥
त्याप्रमाणें प्रपंच हा अज्ञानानेंच बळावलेला आहे. ह्याकरितां ज्ञान व अज्ञान ह्यांचा अभिमान सोडून काट्यानें काटा काढल्याप्रमाणें दोन्ही आडवाटेवर फेंकून द्यावी १२.
जरी सांडिले वाटेवरी । तरी अवचटें आपणासीचि बाधु करी ।
यालागीं सांडावे दूरी । निजनिर्धारीं हा त्यागू ॥१३॥
यालागीं सांडावे दूरी । निजनिर्धारीं हा त्यागू ॥१३॥
कारण, ज्ञान व अज्ञान ही दोन्ही जर वाटेवरच टाकली, तर एखाद्या वेळी ती आपल्यालाच बाधक होतील. म्हणून त्यांना दूरच फेंकून द्यावे, हाच खरा त्याग होय ११.
जेथवर अहंपण । तितुकेंही बाधक जाण ।
शुद्धाशुद्ध अभिमान । निःशेष सज्ञान सांडिती ॥१४॥
शुद्धाशुद्ध अभिमान । निःशेष सज्ञान सांडिती ॥१४॥
अहंपण म्हणून जितके आहे. तितकें बाधकच आहे. ह्याकरितां चांगला किंवा वाईट अभिमान असला तरी ज्ञाते लोक ते दोन्ही अभिमान पूर्णपणे सोडून देतात १४.
उद्धवा तुज करितां माझी भक्ती । झाली माझ्या निजपदाची प्राप्ती ।
आतां नाना साधनउपपत्ती । शास्त्रव्युत्पत्ती कां करिसी ॥१५॥
आतां नाना साधनउपपत्ती । शास्त्रव्युत्पत्ती कां करिसी ॥१५॥
उद्धवा ! तुला माझी भक्ति करूनच माझ्या पदाची प्राप्ति झालेली आहे. आतां अनेक प्रकारच्या साधनांचे उपद्व्याप व शास्त्राची वाटाघाट कशाला करतोस ? १५.
सद्भावें करितां माझें भजन । तूं झालासी ब्रह्मसंपन्न ।
आतां सद्विद्यादि सर्व साधन । शास्त्रश्रवणेंसीं सांडीं पां ॥१६॥
आतां सद्विद्यादि सर्व साधन । शास्त्रश्रवणेंसीं सांडीं पां ॥१६॥
सद्भक्तीनें माझें भजन केल्यामुळें महास्वरूप झाला आहेस. ह्याकरितां आतां सद्विद्यादिक सर्व साधनें शास्त्रश्रवणासह सोडून दे १६.
'तस्मादुद्धव उत्सृज्य' । ये श्लोकींचें हें त्यागबीज ।
विशद सांगीतलें म्यां तुज । निजगुज हृदयस्थ ॥१७॥
विशद सांगीतलें म्यां तुज । निजगुज हृदयस्थ ॥१७॥
'तस्मादुद्धव उत्सृज्य' ह्या श्लोकांतील त्यागाचे बीज हेंच आहे, तें माझें अंत:करणांतील गुह्य मी तुला स्पष्ट करून सांगितलें १७.
सकळां साधनां श्रेष्ठ साधन । शिष्यासी सद्गुरूचें भजन ।
तेणे पाविजे ब्रह्मसमाधान । सत्य जाण उद्धवा ॥१८॥
तेणे पाविजे ब्रह्मसमाधान । सत्य जाण उद्धवा ॥१८॥
शिष्याला गुरूचे भजन हेंच सर्व साधनांतील श्रेष्ठ साधन आहे. उद्धवा ! त्यानेंच खरोखर ब्रह्मसमाधान प्राप्त होते. हे सत्य आहे असे समज १८.
जो भावें भजे गुरुचरणीं । तो नांदे सच्चिदानंदभुवनीं ।
हे सत्य सत्य माझी वाणी । विकल्प कोणीं न धरावा ॥१९॥
हे सत्य सत्य माझी वाणी । विकल्प कोणीं न धरावा ॥१९॥
जो गुरुचरणाचे भक्तिभावानें भजन करतो, तो सच्चिदानंदमंदिरांत राहातो. हे माझे भाषण पूर्णपणे सत्य आहे. त्याबद्दल कोणीही विकल्प धरूं नये १९.
ऐसें बोलोनि श्रीहरी । आवडीं चारी बाह्या पसरी ।
उद्धवातें प्रीतिकरीं । हृदयीं धरी स्वानंदें ॥६२०॥
उद्धवातें प्रीतिकरीं । हृदयीं धरी स्वानंदें ॥६२०॥
असे बोलून श्रीकृष्णांनी प्रेमानें चारीही हात पसरले, आणि त्या प्रेमळ हातांनी मोठ्या आनंदानें उद्धवा पोटाशी धरलें १२०.
देवें सद्भक्ता क्षेम दीधलें । निजहृदयीं हृदय एक झालें ।
सांगणें पुसणें सहज ठेलें । बोलणें बोलें प्राशिलें ॥२१॥
सांगणें पुसणें सहज ठेलें । बोलणें बोलें प्राशिलें ॥२१॥
देवानें सद्भक्ताला आलिंगन दिल्यामुळें हृदयाशी त्याचें हृदय मिळाले, तेव्हा अर्थातच सांगणे माणि विचारणे ही दोन्ही बंद पडलीं; आणि शब्दांनीच शब्द खाऊन टाकले २१.
चहूं वाचां पडलें मौन । जीवू विसरला जीवपण ।
एका तुष्टला जनार्दन । स्वानंदघन सद्भक्तां ॥२२॥
एका तुष्टला जनार्दन । स्वानंदघन सद्भक्तां ॥२२॥
चारीही वाणींना मौन पडले; जीव जीवपणाही विसरला; आणि सद्भक्तांना केवळ स्वानंदघन असा जो एकनाथरूपी जनार्दन तोही संतुष्ट झाला २२.
तेचि सद्भक्तीचा भावार्थ । विशद बोलिला बाराव्यांत ।
निजभावें श्रीकृष्णनाथ । नित्य प्राप्त भाविकां ॥२३॥
निजभावें श्रीकृष्णनाथ । नित्य प्राप्त भाविकां ॥२३॥
त्याच सद्भक्तीचा भावार्थ बाराव्या अध्यायांत स्पष्टपणे सांगितला. तो असा की, भक्तांना त्यांच्या भक्तीनें श्रीकृष्णनाथ नेहमी प्राप्त होतो २३.
निजात्मप्राप्तीचें कारण । केवळ भावार्थचि जाण ।
भावार्थावेगळें साधन । वृथा जाण परिश्रमू ॥२४॥
भावार्थावेगळें साधन । वृथा जाण परिश्रमू ॥२४॥
आत्मप्राप्ति होण्याला कारण केवळ मुख्य भावार्थच आहे. भावार्थाशिवाय इतर साधनें हे वृथा श्रम होत असे समज २४.
जप तप यज्ञ दानें । भावार्थालागीं करणें ।
तो भावार्थ लाहिजे जेणें । धन्य जिणें तयाचें ॥२५॥
तो भावार्थ लाहिजे जेणें । धन्य जिणें तयाचें ॥२५॥
जप, तप, यज्ञ किंवा दानें भावार्थासाठींच करावयाची असतात. तो भावार्थ ज्यानें साध्य केला, त्याचा जन्म धन्य होय २५.
धन्य नरदेहाची प्राप्ती । धन्य साधूची संगती ।
धन्य धन्य ते भावार्थी । जे भगवद्भक्तीं रंगले ॥२६॥
धन्य धन्य ते भावार्थी । जे भगवद्भक्तीं रंगले ॥२६॥
नरदेहाची प्राप्ति धन्य आहे ! साधूंची संगति धन्य आहे ! आणि जे भगवद्भक्तींत रंगले, ते भावार्थी अत्यंत धन्य होत ! २६.
जे रंगले भगवत्पथा । त्यांचें चित्त विसरलें विषयावस्था ।
ते हंसगीताची कथा । उद्धव कृष्णनाथा पुसेल ॥२७॥
ते हंसगीताची कथा । उद्धव कृष्णनाथा पुसेल ॥२७॥
भगवन्मार्गात जे रंगून जातात त्यांचे चित्त विषयसुखाला विसरून जाते. ती हंसगीताची कथा उद्धव आतां श्रीकृष्णाला विचारील २७.
तें अतिरसाळ निरूपण । केवळ शुद्ध ब्रह्मज्ञान ।
श्रोतां व्हावें सावधान । एका जनार्दन विनवितू ॥६२८॥
श्रोतां व्हावें सावधान । एका जनार्दन विनवितू ॥६२८॥
तें निरूपण अत्यंत रसभरित असून केवळ शुद्ध ब्रह्मज्ञान आहे, याकरितां श्रोत्यांनीही त्याच्याकडे लक्ष द्यावें अशी एकनाथरुपी जनार्दन विनंति करीत आहे ६२८.
इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे
एकाकाराटीकायां श्रीकृष्णोद्धवसंवादे द्वादशोऽध्यायः ॥१२॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक २४ ॥ ओंव्या ६२८ ॥
एकाकाराटीकायां श्रीकृष्णोद्धवसंवादे द्वादशोऽध्यायः ॥१२॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक २४ ॥ ओंव्या ६२८ ॥
बारावा अध्याय समाप्त
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...