मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १३०१ ते १४००

    जैसे कां नीच रंक । तैसी सेवा करी देख ।

    नीच सेवेचें अतिसुख । निर्मायिक मद्‍भजनीं ॥१॥
    ज्याप्रमाणे एखादा गरीब भिकारी असावा, त्याप्रमाणे वागून तो सेवा करतो. हलकी सेवा करण्यामध्ये त्याला मोग आनंद. माझ्या भजनामध्ये त्याला कृत्रिमपणा नाहीं १.


    अमानित्वं अदम्भित्वं कृतस्यापरिकीर्तनम् ।
    अपि दीपावलोकं मे नोपयुञ्ज्यान्निवेदितम् ॥ ४० ॥
    [श्लोक ४०] अभिमान धरू नये ढोंग करून नये त्याचबरोबर आपण केलेल्या कामांचा डांगोरा पिटू नये आपण अर्पण केलेल्या दिव्याच्या प्रकाशाचाही स्वतःसाठी उपयोग करू नये तसेच दुसर्‍या देवतेला अर्पण केलेली वस्तूही मला अर्पण करू नये. (४०)




    अपार वेंचूनि नाना अर्थ । प्रासादप्रतिष्ठा म्यां केली येथ ।
    मी एक देवाचा मोठा भक्त । न धरी पोटांत अभिमान ॥२॥
    नानाप्रकारच्या पुष्कळ संपत्ति खर्चुन मी येथें हें देवालय बांधून देवाची प्रतिष्ठा केली, मी एक मोठा भक्त आहे, असा पोटांत अभिमान धरीत नाही २.


    शुद्ध भावो नाहीं चित्तीं । खटाटोपें अहाच भक्ती ।
    ऐशी जे दांभिक स्थिती । भक्त नातळती भाविक ॥३॥
    मनांत खरी भक्ति नाही, आणि वरकरणींच खटाटोप करून भक्तीचा पसारा मांडावयाचा, अशी जी ढोंगाची कृति असते, तिला भाविक भक्त शिवतसुद्धा नाहींत ३.


    भक्तें न धरावा अभिमान । नापेक्षावा मानसन्मान ।
    न करावें दांभिक भजन । अभिलाष जाण न धरावा ॥४॥
    भक्ताने अभिमान धरूं नये, मानाची किंवा सन्मानाची इच्छा धरूं नये, दांभिक भजन कधीही करूं नये, आणि कोणत्याही विषयाचा अभिलाष बाळगू नये ४.


    अनुभव जाला तो आपण । कां देवालयीं वेंचिलें धन ।
    अथवा जें दिधलें दान । तें वाच्य जाण न करावें ॥५॥
    आपल्याला जो अनुभव आला असेल, किंवा देवालयाकडे जें द्रव्य खर्च झाले असेल, अथवा जे काय दान दिले असेल, त्याची कधीही वाच्यता करूं नये ५.


    यजमान जैं केलें बोले । तैं जें केलें तें निर्वीर्य जालें ।
    प्राणेंवीण प्रेत उरलें । तैसे झाले ते धर्म ॥६॥
    यजमान आपण केलेलें जेव्हां आपल्याच तोंडाने सांगू लागतो, तेव्हा ते केलेले सर्व निष्फळ होऊन गेले असे समजावे. प्राणाशिवाय प्रेत शिल्लक राहिलेले असते त्याप्रमाणेच ते सर्व धर्म होत ६.


    कृषीवळू पेरूनियां धान्य । सवेंचि आच्छादी आपण ।
    तैं पीक लगडूनि ये जाण । तैसें सफळ दान न बोलतां ॥७॥
    शेतकरी धान्य पेरून लागलेच ते झाकून टाकतो, तेव्हांच ते पीक जोराने येते. त्याप्रमाणे दान हे न बोलले तरच फलदायक होते ७.


    देवासी समर्पिलें आपण । कां आणिकीं केलें निवेदन ।
    तें घेऊं नये आपण । देवलकपण तो दोषु ॥८॥
    आपण देवाला काही अर्पण केलें, किंवा दुसऱ्याने देवाला काही दिले तर ते आपण घेऊ नये. तो पुजारीपणाचा दोष होतो ८.


    देवाचा प्रसाद घेतां । लोभें न घ्यावा सर्वथा ।
    आधीं वांटावा समस्ता । अल्पमात्रतां स्वयें घ्यावा ॥९॥
    देवाचा प्रसाद घेतांनासुद्धा लोभाने सर्वच आपण घेऊ नये. तो आधी सर्वांना वाटावा, आणि मग थोडासा आपण घ्यावा ९.


    दीपु समर्पिला श्रीहरि । तेणें न वर्तावें गृहव्यापारीं ।
    हें बोलिलें आगमशास्त्री । स्मृतिकारीं सज्ञानीं ॥१३१०॥
    श्रीहरीला दिवा समर्पण केला, तर त्या दिव्याच्या उजेडाने मग आपल्या घरांतील कामें करूं नयेत. पुराणांतरी आणि ज्ञानसंपन्न स्मृतिकारांनीही असेंच सांगितले आहे १३१०.


    हे तंव अवघी साधारण बाह्य पूजा । परी दृढविश्वासें भावो माझा ।
    ते भक्ति आवडे अधोक्षजा । भाविकांची पूजा भावार्थें ॥११॥
    ही सारी साधारण बाह्य पूजा झाली. पण अंत:करणांत मजवर दृढतर विश्वास व भक्ति पाहिजे. ती भक्तीच भगवंताला आवडते. भाविकांची पूजा भक्तीनेच होत असते ११.


    ऐक पां भक्तीचा इत्यर्थु । जेणें भजनें म्हणिजे भक्तु ।
    तरी जें जें उत्तम या लोकांतु । आवडता पदार्थु मज अर्पी ॥१२॥
    आतां भक्तीचे रहस्य ऐक. ज्या भजनाच्या योगाने 'भक्त' असे म्हणतात, तें भजन असे की, या लोकांत जी जी काही उत्तम व आवडती वस्तु असेल, ती ती ते मलाच अर्पण करतात १२.


    यद्यदिष्टतमं लोके यच्चातिप्रियमात्मनः ।
    तत्तन्निवेदयेन्मह्यं तदानन्त्याय कल्पते ॥ ४१ ॥
    [श्लोक ४१] जगामध्ये जी जी वस्तू आपल्याला सर्वाधिक प्रिय, सर्वात चांगली वाटत असेल, ती मला अर्पण करावी असे केल्याने ती वस्तू अनंत पटींनी फळ देणारी ठरते. (४१)




    हो कां चंद्रामृत तत्त्वतां । अवचटें आलें भक्ताचे हातां ।
    तें अवघेंचि अर्पी भगवंता । देहलोभता न सेवी ॥१३॥
    फार काय सांगावें ? पण खरोखर भक्ताच्या हाती जर अकस्मात् चंद्रामृत प्राप्त झाले, तरी तो तें सारेच भगवंताला अर्पण करतो. देहाच्या लोभाने आपण सेवन करीत नाही १३.


    देहासी यावया अमरता । तेणें लोभें सेवावें अमृता ।
    अमर अमृतपान करितां । मरती सर्वथा सकाळें ॥१४॥
    देहाला अमरत्व प्राप्त व्हावे म्हणून त्या लोभाने आपणच अमृताचे सेवन करावे, तर देवही अमृतपान करीत असून तेही सर्व यथाकाली मरतातच १४.


    नश्वर देहाचिया ममता । भक्त सेवीना अमृता ।
    तेंचि भगवंतासी अर्पितां । अक्षयता अनश्वर ॥१५॥
    म्हणून नश्वर देहाच्या ममतेने भक्त अमृताचे सेवन करीत नाही. तेंच भगवंताला अर्पण केले असतां अक्षयच अमरत्व प्राप्त होते १५.


    परिस चिंतामणि न प्रार्थितां । दैवें आलिया भक्ताच्या हातां ।
    तो लोभें न ठेवी सर्वथा । अर्पी भगवंता तत्काळ ॥१६॥
    याचना न करितांच केवळ दैवयोगाने परीस किंवा चिंतामणि भक्ताच्या हाती आला असतां तो लोभाने त्याला मुळीच आपल्याजवळ बाळगीत नाही. तत्काळ भगवंताला अर्पण करतो १६.


    लोभें कल्पतरु राखतां । कल्पना वाढे अकल्पिता ।
    तोचि भगवंती अर्पितां । निर्विकल्पता स्वयें लाभे ॥१७॥
    लोभाने कल्पतरु जतन केला असतां अकल्पितपणे इच्छा वाढते, पण तोच कल्पतरु भगवंताला अर्पण केला तर आपोआप निरिच्छता प्राप्त होते १७.


    स्वार्थें चिंतामणि राखितां । अत्यंत हृदयीं वाढवी चिंता ।
    तोचि भगवंती अर्पितां । निश्चिंतता चित्तासी ॥१८॥
    स्वार्थाने चिंतामणि जवळ बाळगला असता तो अंत:करणामध्ये अतिशय चिंताच वाढवितो. तोच भगवंताला अर्पण केला की, अंत:करणाला निश्चिंतता प्राप्त होते १८.


    कामधेनु राखतां आपण । अनिवार कामना वाढवी जाण ।
    तेचि करितां कृष्णार्पण । निरपेक्षता पूर्ण अंगीं बाणे ॥१९॥
    आपण कामधेनूचा प्रतिपाळ केला असतां ती अनिवार इच्छा मात्र वाढविते, पण तीच कामधेनु कृष्णार्पण केली असतां आंगामध्ये परिपूर्ण निरपेक्षता ठसते १९.


    लोभें स्पर्शमणि राखतां । तो वाढवी धनलोभता ।
    तोचि भगवंतीं अर्पितां । अर्थस्वार्थतानिर्मुक्त ॥१३२०॥
    आशेला गुंतून परीस जवळ केला असतां तो धनलोभाला वाढवितो, पण तोच परीस भगवंताला अर्पण केला असतां मनुष्य अर्थाच्या स्वार्थापासून मुक्त होतो १३२०.


    हो कां देशकाळ‍ऋतुमेळें । उत्तम पदार्थ अथवा फळें ।
    नवधान्यादिकें सकळें । अर्पी भावबळें मजलागीं ॥२१॥
    किंवा देशकालऋतूप्रमाणे जे जे उत्तम पदार्थ किंवा फळे उत्पन्न होतात, किंवा नवीं धान्ये पिकतात, ती सर्व भक्तिभावाने भक्त मलाच अर्पण करतात. २१.


    पोटांतूनि आवडता । प्राप्त झालिया पदार्था ।
    मजचि अर्पिती सर्वथा । लोलिंगता सांडूनी ॥२२॥
    मनापासून आवडणारा पदार्थ प्राप्त झाला असता त्याचा लोभ सोडून तो सर्व मलाच अर्पण करतात २२.


    आपुले हृदयींची आवडी । हरिचरणीं फुडी ।
    आतां नाना पदार्थांची जे गोडी । ते मजचि रोकडी अर्पिती ॥२३॥
    आपल्या मनांतली सर्व आवड त्यांनी सर्वस्वी हरिचरणांकडेच लावलेली असते. आतां त्याचप्रमाणे भिन्न भिन्न पदार्थाची जी गोडी असते, तीही ते प्रत्यक्ष मलाच अर्पण करतात २३.


    मज अनंताच्या हातीं । आवडीं अर्पिलें मद्‍भक्ती ।
    त्याचीं फळें सांगतां श्रुती । मुक्या होती सर्वथा ॥२४॥
    मज अनंताच्या हातांत माझ्या भक्तांनी आवडीने जे दिलेले असते, त्यांची फलें वर्णन करतांना वेदसुद्धा अगदी मुके होऊन जातात २४.


    मी वेदांचा वेदवक्ता । मजही न बोलवे सर्वथा ।
    त्याचें फळ तें मीचि आतां । जाण तत्त्वतां उद्धवा ॥२५॥
    मी तर वेद बोलणारा, पण मलासुद्धा ते फल खरोखर सांगता यावयाचे नाही. उद्धवा ! आता खरोखर असे समज की, त्याचे फळ म्हणजे मी स्वतःच होय २५.


    जीवाहिहोनि वरौती । माझ्या ठायीं अत्यंत प्रीती ।
    तिये नांव गा माझी भक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥२६॥
    उद्धवा ! जिवापेक्षाही ज्यास्त अशी माझ्यावर जी अत्यंत प्रीति, तिचें नांव खरोखर भक्ति, हे निश्चयपूर्वक लक्षात ठेव २६.


    तत्काळ मज पाविजे जेणें । ते माझे पूजेचीं स्थाने ।
    अतिपवित्र जें कल्याणें । तुजकारणें सांगेन ॥२७॥
    आता जेणेकरून तत्काळ मला पावतां येते, अशी त्या माझ्या पूजेची अतिशय पवित्र आणि कल्याणकारक काही स्थाने तुला सांगेन २७.


    सूर्योऽग्निर्ब्राह्मणो गावो वैष्णवः खं मरुज्जलम् ।
    भूरात्मा सर्वभूतानि भद्र पूजापदानि मे ॥ ४२ ॥
    [श्लोक ४२] हे उद्ववा ! सूर्य, अग्नी, ब्राह्मण, गायी, वैष्णव, आकाश, वायू, जल, पृथ्वी, आत्मा आणि सर्व प्राणी, ही सर्व माझ्या पूजेची ठिकाणे होत. (४२)




    एकादशीं एकादशाध्यायीं । एकादश पूजास्थानें पाहीं ।
    एका जनार्दनु तेंही । एकरूप सर्वही वर्णील ॥२८॥
    एकादश स्कंधाच्या अकराव्या अध्यायांत अकरा पूजास्थाने सांगितलेली आहेत, तीही सर्व एका जनार्दन आतां ऐक्यरूपाने वर्णन करील २८.


    सूर्य अग्नि आणि ब्राह्मण । गायी वैष्णव आणि गगन ।
    अनिळ जळ मही जाण । पूज्य आपण आपणासी ॥२९॥
    सूर्य, अग्नि, आणि ब्राह्मण, गाई, वैष्णव आणि आकाश, वायु, जल आणि पृथ्वी; ही नऊ स्थाने व आपण स्वतः हे दहावें स्थान ही आपणाला पूज्य आहेत २९.


    अकरावें पूजा स्थान । सर्व भूतें पूज्य जाण ।
    ऐक पूजेचें विधान । यथायोग्य लक्षण अवधारीं ॥१३३०॥
    सर्व पंचमहाभूतें हें अकरावें पूज्य पूजास्थान होय असे समज. आता त्यांच्या पूजेचें यथायोग्य विधान व लक्षण ही ऐक १३३०.


    सूर्ये तु विद्यया त्रय्या हविषाग्नौ यजेत माम् ।
    आतिथ्येन तु विप्राग्र्ये गोष्वङ्ग यवसादिना ॥ ४३ ॥
    श्लोक ४३] प्रिय उद्ववा ! वेदमंत्रांनी सूर्याच्या ठिकाणी माझी पूजा करावी हवनाने अग्नीमध्ये, आतिथ्याने श्रेष्ठ ब्राम्हणांमध्ये आणि चारा वगैरे घालून गाईच्या ठिकाणी माझी पूजा करावी. (४३)




    सविता माझें अधिष्ठान । माझेनि तेजें विराजमान ।
    जेणें तेजें जगाचे नयन । देखणे जाण होताती ॥३१॥
    सूर्य हे माझे अधिष्ठान आहे. ज्या तेजाच्या योगाने सर्व जगाचे डोळे पाहाण्यास समर्थ होतात, अशा माझ्याच तेजाने तो प्रकाशमान होतो ३१.


    दीपु लाविल्या गृहाभीतरीं । तो प्रकाशु दिसे गवाक्षद्वारीं ।
    तैसें माझें निजतेज अंतरीं । तें सूर्यद्वारीं प्रकाशे ॥३२॥
    घरांत दिवा लावला असता त्याचा प्रकाश खिडकीतून बाहेर दिसतो. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपांत जें माझें आत्मतेज असते, तेच सूर्याच्या रूपाने बाहेर प्रकाशमान होतें ३२.


    तो सविता मण्डळमध्यवर्ती । जाण नारायण मी निश्चितीं ।
    त्या मज सूर्याची उपास्ती । सौर सूक्ति त्रैविद्या ॥३३॥
    तो आकाशामध्ये असणारा सूर्य म्हणजे खरोखर मी नारायणच होय असें समज. त्याच माझ्या सूर्याचे सौरसूक्त व विद्या हे उपासनामंत्र होत ३३.


    ऋग्वेदादि वेद तीनी । साङ्ग सौरमंत्र जाणोनी ।
    सूर्यसूक्तें संमुख पठणीं । पूजा सज्ञानीं करावी ॥३४॥
    ऋग्वेदादि तिन्ही वेद, सर्व सौरमंत्र व सूर्यसूक्ते ही जाणून सूर्याच्या समोर पठण - करीत असता सूर्याची ज्ञानपूर्वक पूजा करावी ३४.


    हे वैदिकी उपासकता । वेदज्ञांसीचि तत्त्वतां ।
    नेणत्या योग्य नव्हे सविता । ऐसें सर्वथा न म्हणावें ॥३५॥
    पण ही वैदिकांची उपासना आहे, जे वेदांचे पठण करतात त्यांनाच ती खरोखर योग्य होय, अज्ञान्यांना सूर्याची उपासना योग्य नव्हे, असे मात्र कधीही म्हणू नये ३५.


    तत्काळ प्रसन्न होय सविता । ऐसी सुगम उपासकता ।
    तुज सांगेन आतां । सावधानता अवधारीं ॥३६॥
    आता तत्काल सूर्य प्रसन्न होईल अशी एक सुलभ उपासना तुला सांगेन, तीही सावधानपणे श्रवण कर ३६.


    सकळ वेदांची जननी । सकळ मंत्रांचा मुकुटमणी ।
    ते गायत्री उत्तमवर्णी । सकळ ब्राह्मणीं जाणिजे ॥३७॥
    सर्व वेदांची माता, सर्व मंत्रांचा मुकुटमणि, अशी जी गायत्री, ती श्रेष्ठ वर्णाच्या ब्राह्मणांनी समजून घ्यावी ३७.


    तिचा अर्थ विचारितां । तीअधीन असे सविता ।
    त्रिपदा त्रिकाळीं अर्घ्य देतां । त्रैविद्या तत्त्वतां त्या नांव ॥३८॥
    तिच्या अर्थाचा विचार केला, तर सूर्य तिच्या आधीन असतो. त्या तीन चरणांच्या गायत्रीमंत्राने तीन वेळ अर्घ्य देणे ह्यालाच खरोखर 'विद्या' असें नांव आहे ३८.


    अर्धमात्रा अर्धबिंबध्यान । त्रिपदा त्रिकाळीं अर्घ्यदान ।
    तेणें संतोषे चिद्घन । आपणासमान भक्त करी ॥३९॥
    अर्धमात्रा अर्धबिंबध्यान व त्रिपदा गायत्रीने त्रिकाल अर्ध्यप्रदान केल्याने चिद्धन परमात्म्याला संतोष होतो, आणि तो भक्ताला आपल्यासमान करतो ३९.


    हें प्रथम माझें अधिष्ठान । सूर्यपूजा याचि नांव जाण ।
    आतां अग्निपूजेचें लक्षण । साङ्ग संपूर्ण तें ऐक ॥१३४०॥
    हे माझे पहिले अधिष्ठान होय. ह्याचेच नांव सूर्यपूजा. आता अग्निपूजेचें जें लक्षण आहे, ते सविस्तर आणि संपूर्ण ऐकून घे १३४०.


    सर्वांगां मुख प्रधान । तें माझें मुख अग्नि जाण ।
    ये अर्थी वेदशास्त्रपुराण । साक्षी संपूर्ण गर्जती ॥४१॥
    सर्व अंगांमध्ये मुख हे श्रेष्ठ आहे. तें माझें मुख अग्नि आहे हे लक्षात ठेव. ह्याच अर्थाची साक्ष सर्व वेदशा व पुराणें गर्जून सांगत आहेत ४१.


    ब्राह्मण माझे आवडते । माझे मुखीं होआवया सरते ।
    म्यां लाविले अग्निसेवेतें । तेही तेथें चूकले ॥४२॥
    ब्राह्मण हे माझे आवडते, ते माझ्या मुखाने श्रेष्ठत्वाला चढावे, म्हणून मी ते अग्नीच्या सेवेला लावले, पण तेही तेथें चुकलेच ४२.


    घालूनि मजमुखीं अवदान । 'इंद्राय स्वाहा' म्हणती जाण ।
    कर्मकांडें ठकिले ब्राह्मण । शुद्ध मदर्पण चूकले ॥४३॥
    माझ्या मुखांत अवदान घालून 'इंद्राय स्वाहा' म्हणतात ! ब्राह्मण हे अशा प्रकारे कर्ममार्गाने फसले गेले, आणि मला अर्पण करण्याचा शुद्ध मार्ग ते चुकले ४३.


    केवळ मजमुखीं अर्पितां । आड आली त्यांची योग्यता ।
    इंद्र यम वरुण सविता । नाना विकल्पता अवदानीं ॥४४॥
    केवळ माझ्याच मुखांत अर्पण करीत असता त्यांची योग्यताच त्यांच्या आड आली, म्हणूनच इंद, यम, वरुण, सूर्य असे अनेक प्रकारचे विकल्प अवदानांमध्ये उत्पन्न झाले ४४.


    देवो देवी मीचि आहें । हेंही सत्य न मानिती पाहें ।
    मजवेगळा विनियोग होये । नवल काये सांगावें ॥४५॥
    देव आणि देवीही मीच आहे, हेही ते खरें मानीत नाहीत. मला सोडूनच त्यांचा सर्व विनियोग चाललेला असतो, हे आश्चर्य किती सांगावें ? ४५,


    जें जें सेविजे तिहीं लोकीं । तें तें अर्पे माझ्या मुखीं ।
    हें न मनिजे याज्ञिकीं । कर्माविखीं । विकल्पू ॥४६॥
    त्रिभुवनांतील लोकांमध्ये जे जे काही सेवन केले जाते, तें तें सारे माझ्या मुखांतच अर्पण होते, पण हे याज्ञिक लोकांनी मान्य केलेले नाही. कारण कर्माविषयी त्यांचा विकल्प असतो ४६.


    विकल्पबुद्धि ब्राह्मण । अद्यापि संशयीं पडिले जाण ।
    करूनि वेदशास्त्रपठण । शुद्ध मदर्पण न बोलती ॥४७॥
    असे ब्राह्मण हे विकल्पबुद्धि होऊन अद्यापही संशयांतच पडलेले आहेत, हे लक्षात ठेव. वेदशास्त्र पठण करूनही योग्य रीतीने मला कसें अर्पण करावे ते सांगत नाहींत ४७.


    माझें मुख वैश्वानर । येणें भावें विनटले नर ।
    सांडूनि भेद देवतांतर । मजचि साचार अर्पिती ॥४८॥
    माझें मुख तोच अग्नि, अशा भावनेने युक्त झालेले जे पुरुष नाना प्रकारच्या देवतांतरांचा भेद सोडून खरोखर मलाच अर्पण करतात ४८,


    त्याचें समिधेनीं मन तृप्त झालें । तेथही जरी हविर्द्रव्य आलें ।
    तरी माझें निजमुख सुखावलें । सर्वस्व आपुलें त्यांसी मी दें ॥४९॥
    त्यांच्या एका समिधेनेंही माझें मन तृप्त झालें असें होते, असें असतां आणखी जर दुसरे एकादें होमव्य अर्पण केले, तर मग माझ्या मुखाला अत्यंत सुख होतें. स्यांना मी आपले सर्वस्व अर्पण करतो ४९.


    मज नैराश्यतेची आस । त्यांच्या हाताची मी पाहें वास ।
    त्यांलागीं सदा सावकाश । अल्पही ग्रास जैं देती ॥१३५०॥
    मला निरिच्छेची आवड आहे, म्हणून त्या निरिच्छ लोकांच्या हाताची मी अगदी वाट पहात असतो. ते मला लहानसाही ग्रास जेव्हां देतील तेथपर्यंत त्यांच्यासाठी मी निरंतर तिष्ठत असतों १३५०.


    त्यांचेनि हातें निर्विकल्पें । मद्‍भावें जें अग्नीस अर्पे ।
    तृण काष्ठ तिळ तुपें । तें म्यां चिद्‌रूपें सेविजे ॥५१॥
    त्यांच्या निर्विकल्प हाताने माझ्या भावनेने जे अकीला अर्पण होते, तें तृण असो, काष्ठ असो, तीळ असोत की तूप असो, ते चित्स्वरूप अशा माझ्याकडून सेवन केले जाते ५१.


    यापरी अग्नीची उपास्ती । जे दुजे स्थानींची पूजास्थिती ।
    सांगीतली म्यां तुजप्रती । ब्राह्मणभक्ती अवधारीं ॥५२॥
    झाप्रमाणे अग्नीची उपासना करणे हाच जो दुसऱ्या स्थानाचा पूजाविधि आहे, तो मी तुला सांगितला. आतां ब्राह्मणभक्ति कशी करावी तें ऐक ५२.


    पूजेमाजीं अतिश्रेष्ठ जाण । शीघ्र मत्प्राप्तीचें कारण ।
    ब्राह्मण माझें पूजास्थान । अतिगहन उद्धवा ॥५३॥
    उद्धवा ! पूजेमध्ये अत्यंत श्रेष्ठ पूजा व माझ्या शीघ्र प्राप्तीचा मार्ग म्हणशील तर ब्राह्मण हें माझ्या पूजेचे अत्यंत थोर स्थान आहे ५३.


    त्यांचिया भजनाची नवलपरी । आड पडावें देखोनि दूरी ।
    मस्तक ठेवावा चरणावरी । चरणरज शिरीं वंदावे ॥५४॥
    त्यांच्या भजनाचे एक मोठे आश्चर्य आहे, ते हे की, त्यांत जे काय विघ्न म्हणून येते, ते त्यांना पाहातांच दूर पळते. म्हणून त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवावे आणि त्यांची पायधूळ शिरसावंद्य करावी ५४.


    आवाहनविसर्जनेंवीण । शालिग्रामीं माझें अधिष्ठान ।
    परी तें केवळ अचेतन । ब्राह्मण सचेतन मद्‌रूपें ॥५५॥
    आवाहन व विसर्जन ह्यांशिवाय शालिग्रामामध्ये माझे अधिष्ठान असते; पण ते शालिग्राम केवळ अचेतन असतात, आणि ब्राह्मण हे मद्रूप असून सचेतन असतात ५५.


    मी अव्यक्तरूप जनार्दन । तो मी व्यक्त ब्राह्मणरूपें जाण ।
    धरातळीं असें मी नारायण । धरामर ब्राह्मण यालागीं ॥५६॥
    मी जनार्दन वस्तुतः अव्यक्तस्वरूप आहे, पण तोच मी नारायण ह्या पृथ्वीवर ब्राह्मणरूपाने व्यक्त झालो आहे असे समज. म्हणून ब्राह्मणांना भूदेव असे म्हणतात ५६.


    ब्राह्मणमुखें वेदांसी महिमा । ब्राह्मणें यज्ञदानतपतीर्थगरिमा ।
    ब्राह्मणें देवासी परम प्रेमा । ब्रह्मत्व ब्रह्मा ब्राह्मणमुखें ॥५७॥
    ब्राह्मणांच्या मुखानेच वेदांचा महिमा वाढला आहे, ब्राह्मणांच्या योगानेंच यज्ञ, दान, तप, तीर्थ यांना श्रेष्ठत्व आले आहे, ब्राह्मणांच्या योगानेच देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम उत्पन्न होत असते आणि ब्राह्मणांच्या मुखानेच ब्रह्माला ब्रह्मत्व प्राप्त झाले आहे ५७.


    त्या ब्राह्मणांसी अपमानितां । अपमानिल्या यज्ञदेवता ।
    वेदादि तपदानतीर्था । परब्रह्म तत्त्वतां अपमानिलें ॥५८॥
    त्या ब्राह्मणांचा अपमान केला असतां यज्ञदेवतांचा अपमान केल्याप्रमाणे होते. तसेच वेद, तप, दान, तीर्थ इत्यादिकांचाही अपमान केल्यासारखे होते. फार काय, खरोखर परब्रह्माचाही अपमान होतो म्हणून समजावें ५८.


    मज त्रिलोकीं नाहीं सांठवण । मजहूनि अधिक माझे ब्राह्मण ।
    त्यामाजीं मी वेदरूप नारायण । सगळा जाण सांठवलों ॥५९॥
    त्रैलोक्यांतही माझे अंग मावत नाही असा त्रैलोक्याहून मी मोठा आहे, परंतु ब्राह्मण हे माझ्याहून मोठे आहेत. कारण त्यांच्यामध्ये मी वेदरूप नारायण सर्वच सांठवून राहिलों आहे ! ५९.


    ब्राह्मणपद हृदयीं धरितां । मज आली परम पवित्रता ।
    लक्ष्मी पायां लागे उपेक्षितां । चरणतीर्थ माथां शिवू धरी ॥१३६०॥
    ब्राह्मणाचा पाय हृदयावर धरल्यामुळेच मला मोठी पवित्रता आली आहे. लक्ष्मीची उपेक्षा केली असतांही ती माझ्या पायांजवळ बसते, आणि माझ्या चरणाचे तीर्थ शंकरही मस्तकावर धारण करतो १३६०.


    यालागीं ब्राह्मण पूज्य जाण । अंगें मी करीं चरणक्षालन ।
    त्यांचें उच्छिष्ट मी काढीं आपण । पाडू कोण इतरांचा ॥६१॥
    म्हणून ब्राह्मण हे पूज्य आहेत हे लक्षात ठेव. त्यांचे पाय धुण्याचे काम मी स्वतः करतो. मी आपण होऊन त्यांची उष्टं काढतो. मग इतरांचा पाड काय ? ६१.


    मुख्य माझें अधिष्ठान । सर्वोपचारपूजास्थान ।
    दान मान मिष्ठान्न । विधिपूजन विप्रांचें ॥६२॥
    माझे मुख्य राहण्याचे ठिकाण आणि माझी सर्व उपचारांनी पूजा करण्याचे स्थान, किंवा दान, मान, मिष्टान्न हे सर्व एका ब्राह्मणाच्या विधियुक्त पूजनांत आहे ६२.


    एका नेमू शालिग्रामाचा । एका स्थावर लिंगाचा ।
    एका नेमू गणेषाचा । एका सूर्याचा दर्शननेमू ॥६३॥
    कोणाला शालिग्रामाचा नेम असतो; कोणाला स्थापन केलेल्या लिंगाचा नेम असतो, कोणाला गणपतीचा नेम असतो, व कोणाला सूर्याचे दर्शन घेण्याचा नेम असतो ६३.


    एका नेमू तुळाषीचा । एका बांधिल्या अनंताचा ।
    नित्य नेम ब्राह्मणाचा । सभाग्य तो भाग्याचा दुर्लभ ॥६४॥
    कोणाला तुळशीचा नेम असतो, कोणाला बांधलेल्या अनंताचा नेम असतो, परंतु नित्य ब्राह्मणाचा नेम ज्याला आहे, तो भाग्याचा भाग्यवान् परम दुर्मिळ होय ६४.


    नित्य नेमस्त द्विजपूजा । षोडशोपचार करी वोजा ।
    माझे भक्तीचा तो राजा । आत्मा माझा तो एकू ॥६५॥
    जो नित्यनियमाने ब्राह्मणांची पूजा मोठ्या आवडीनें षोडशोपचारांनी करतो, तो भक्तीचा राजा, आणि तोच एक माझा आत्मा होय ६५.


    जो देवतांतरा नुपासित । जीवेंभावें ब्राह्मणभक्त ।
    त्याचा चुकवूनियां अनर्थ । निजस्वार्थ मी कर्ता ॥६६॥
    जो निरनिराळ्या देवतांची उपासना करीत नाहीं, व जीवाभावार्ने ब्राह्मणाचाच भक्त होतो. त्याचा अनर्थ चुकवून मी त्याचा स्वार्थ यशस्वी करून देतों ६६.


    ऐसे जे ब्राह्मणभक्त । त्यांच्या पायीं पृथ्वी पुनीत ।
    गंगा चरणतीर्थ वांछित । शिरीं वंदीत मी त्यांसी ॥६७॥
    असे जे ब्राह्मणांचे भक्त असतात, त्यांच्या चरणाने पृथ्वीही पुनीत होते. गंगाही त्यांच्या पायाच्या तीर्थाची इच्छा करते. मी तर त्यांना शिरसावंद्य करतों ६७.


    त्यांचे सेवेचा सेवक । मोलेंवीण मी झालों देख ।
    ब्राह्मणसेवेचें मज सुख । अलोकिक अनिवार ॥६८॥
    मी मोलाशिवायच त्यांच्या सेवेचा सेवक झालो आहे पहा ! ब्राह्मणसेवेमध्ये मला कांही अलौकिक व अनिवार सुख वाटते ६८.


    नित्यनेम द्विजपूजा । करी तो आवडे अधोक्षजा ।
    त्यालागीं पसरूनि चारी भुजा । आलिंगनीं माझा जीवू निवे ॥६९॥
    नित्यनियमानें जो ब्राह्मणांची पूजा करतो, तो भगवंताला प्रिय होतो. म्हणूनच चारही हात पसरून त्याला आलिंगन देण्यानेच माझा जीव शांत होतो ६९.


    ब्राह्मणांच्या स्नानप्रवाहतळीं । जेणें भावार्थें केली आंघोळी ।
    कोटि अवभृथें पायांतळीं । तेणें तत्काळीं घातलीं ॥१३७०॥
    ब्राह्मणांनी स्नान केलेल्या पाण्यामध्ये ज्याने भक्तिभावाने आंघोळ केली, त्याने त्या काळीच कोट्यवधि अवभृथस्नानेंही पायाखाली घातली म्हणून समजावें १३७०.


    ब्राह्मणचरणतीर्थ देखतां । पळ सुटे दोषदुरिता ।
    तें भावार्थें तीर्थ घेतां । दोष सर्वथा निमाले ॥७१॥
    ब्राह्मणाच्या पायांचे तीर्थ पाहतांच दोष आणि पातकें ह्यांना पळ सुटतो. ह्याकरितां तेंच तीर्थ भक्तिभावाने सेवन केले असतां सर्व दोष नाहीसे होतात ७१.


    जो कोणी नित्य नेमस्त । सेवी ब्राह्मणाचें चरणतीर्थ ।
    तो स्वयें झाला तीर्थभूत । त्याचेनि पुनीत जड जीव ॥७२॥
    जो कोणी नित्य नेमाने ब्राह्मणाच्या चरणांचे तीर्थ सेवन करतो, तो स्वतः तीर्थस्वरूपच होतो, आणि त्याच्या योगानेच जड जीव पुनीत होतात ७२.


    त्या ब्राह्मणाचे ठायीं जाण । अभ्यंगादि सुमन चंदन ।
    आसन भोजन धन धान्य । शक्तिप्रमाण पूजेसी ॥७३॥
    त्या ब्राह्मणाच्या ठिकाणी पूजा करतांना तैलाभ्यंग इत्यादिकांचे स्नान, पुष्पें, चंदन, आसन, भोजन व धनधान्य यथाशक्ति द्यावें ७३.


    ब्राह्मणासी प्रिय भोजन । दानीं श्रेष्ठ अन्नदान ।
    निपजवूनियां मिष्टान्न । द्यावें भोजन मद्‍भावें ॥७४॥
    ब्राह्मणाला भोजन हे प्रिय आहे, आणि सर्व दानांमध्ये अन्नदान श्रेष्ठ आहेः ह्याकरितां उत्तम उत्तम पकाने तयार करून ब्राह्मण हे माझेंच स्वरूप आहेत अशा भावनेने त्यांना भोजन द्यावे ७४.


    एक हेळसूनि देती अन्न । एक उबगल्यासाठीं जाण ।
    एक देती निर्भर्त्सून । एक वसवसोन घालिती ॥७५॥
    कोणी ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना अन्न देतात, कोणी दगदगीला कंटाळले म्हणून देतात, कोणी निर्भर्त्सना करून भोजन घालतात, आणि कोणी तर वसावसा अंगावर येऊन जेवावयास घालतात ७५.


    तैसें न करावें आपण । ब्राह्मण माझें स्वरूप जाण ।
    त्यांसी देऊनियां सन्मान । द्यावें भोजन यथाशक्ति ॥७६॥
    तसे आपण करूं नये. कारण ब्राह्मण हें माझें स्वरूप आहे हें लक्षात ठेव. त्यांचा आदरसत्कार करून त्यांना यथाशक्ति भोजन घालावें ७६.


    अज्ञान अतिथि आल्या समयीं । खोडी काढूं नये त्याच्या ठायीं ।
    तोही माझें स्वरूप पाहीं । अन्न ते समयीं अर्पावें ॥७७॥
    वेळेला एकादा अज्ञानी अतिथि आला, तर त्याच्या ठिकाणची खोडी काढू नये. तोही माझें स्वरूपच असतो, याकरितां त्याला त्या वेळी अन्न घालावें ७७.


    अतिथि जातां पराङ्मुख । त्यासवें जाय पुण्य निःशेख ।
    अन्न द्यावें समयीं आवश्यक । नातरी उदक तरी द्यावें ॥७८॥
    अतिथि विन्मुख गेला असता त्याच्याबरोबर आपले सर्व पुण्यही जाते, याकरितां त्याला वेळीच अवश्य अन्न द्यावे. निदान पाणी तरी प्यावयाला द्यावें ७८.


    ब्राह्मण बैसवूनि पंक्ती । जे कोणी पंक्तिभेद करिती ।
    ते मोलें पाप विकत घेती । त्यांसी अधोगती निश्चितीं ॥७९॥
    ब्राह्मण पंक्तीला बसवून अन्न वाढण्यामध्ये जे कोणी पंक्तिप्रपंच करतात, ते मोलाने पातकच विकत घेतात. त्यांना अधोगति निश्चितपणे प्राप्त होते ७९.


    ब्राह्मणसेवेलागीं जाण । काया वाचा मन धन ।
    यथासामर्थ्यें अवंचन । अतिथिपूजन त्या नांव ॥१३८०॥
    ब्राह्मणसेवेला शरीर, वाचा, मन, धन लावणे, व यथाशक्ति निष्कपटभाव धरणे ह्याचेच नांव अतिथिपूजन १३८०.


    त्रिपदाजपें पवित्र पूर्ण । यालागीं वेदांचें निवासस्थान ।
    ब्राह्मण माझें स्वरूप जाण । श्रेष्ठ अधिष्ठान पूजेचें ॥८१॥
    ब्राह्मण हे त्रिपदा गायत्रीमंत्राचा जप करून पूर्ण पवित्र झालेले असतात, म्हणून वेदांचेही वसतिस्थान त्यांच्या ठिकाणी असते. ब्राह्मण हे माझेच स्वरूप होत असे समज, म्हणूनच माझ्या पूजेचे श्रेष्ठ अधिष्ठानही तेच ८१.


    ब्राह्मणआज्ञेलागीं जाण । अतिसादर ज्याचें मन ।
    देणें देववणें दान । श्रद्धा संपूर्ण या नांव ॥८२॥
    ब्राह्मणांच्या आज्ञेला ज्याचे मन अत्यंत तत्पर असते, आणि जो त्यांना दान देतो व देववितो, त्याच्या त्या वृत्तीचेच नांव पूर्ण श्रद्धा ८२.


    ब्राह्मणसेवा धनेंवीण । सर्वथा न घडे ऐसें न म्हण ।
    सेवेसी श्रद्धा प्रमाण । उल्हास पूर्ण भजनाचा ॥८३॥
    ब्राह्मणाची सेवा द्रव्याशिवाय मुळीच घडावयाची नाही असे मात्र म्हणूं नये. सेवेला श्रद्धा आणि भजन करण्याचा पूर्ण उल्हास हीच मुख्य प्रमाणभूत साधने होत ८३.


    एकाची शरीरसेवा जाण । एकाचे वाचिक पूजन ।
    एकाचें मानसिक भजन । दया पूर्ण द्विजाची ॥८४॥
    कोणाची शरीरानें सेवा करावी, कोणाचे वाणीने पूजन करावे, कोणाचें मनानेच भजन करावे, कसेंही भजन केले तरी ब्राह्मणांची दया परिपूर्णच लाभते ८४.


    ब्राह्मणभक्तिलागीं जाण । हर्षनिर्भर अंतःकरण ।
    श्रद्धायुक्त उल्हासपूर्ण । आतिथ्य जाण या नांव ॥८५॥
    ब्राह्मणाच्या भक्तीसाठी अंत:करण आनंदाने भरून जाणे आणि परमश्रद्धेनें व उल्हासाने परिपूर्ण असणे ह्याचें नांव 'आतिथ्य' ८५.


    यापरी ब्राह्मणभजन । तिसरे पूजेचें अधिष्ठान ।
    हें सांगितलें जाण । गोशुश्रूषण तें ऐक ॥८६॥
    याप्रमाणे ब्राह्मणाचे भजन हे पूजेचे तिसरे अधिष्ठान आहे, ते तुला सांगितले. आतां गायत्रीसेवा ऐक ८६.


    जे गायीच्या कैवारा । घायें सहस्रबाहो केला पुरा ।
    तीन सप्तकें वसुंधरा । मुख्य धुरा म्यां मारिल्या ॥८७॥
    ज्या गाईच्या कैवाराने मी सहस्रार्जुनाला मारून ठार केले, आणि एकवीस वेळा पृथ्वीवरील मुख्य लढवय्ये असे क्षत्रिय मी मारिले ८७,


    रामावतारीं अतिमहिमान । तैं न घडेचि गोषुश्रूषण ।
    यालागीं गोकुळीं जाण । गायींचें सेवन म्यां केलें ॥८८॥
    रामावतारांत माझे माहात्म्य फार मोठे होते, पण त्यात गाईची सेवा घडली नाही म्हणून मी गोकुळांत अवतार घेऊन गाईची सेवा केली ८८;


    गायीचे सेवें झाली पुष्टी । बाळपणीं मारिले जेठी ।
    कंस चाणूर मारिले हटी । बैसविला राज्यपटीं उग्रसेन ॥८९॥
    गाईच्या सेवेनेंच मला पुष्टता प्राप्त झाली म्हणूनच लहानपणांतच मोठमोठे मल्ल मी मारून टाकले; कंस, चाणूर, ह्यांसारखे अदम्य मल्ल मारिले व उग्रसेन राज्यावर बसविला ८९;


    गायीचे सेवेची अतिगोडी । तेणें माझी कीर्ति झाली चोखडी ।
    फोडली कंसाची बांदवडी । तोडिली बेडी पितरांची ॥१३९०॥
    त्या गाईच्या सेवेची आवड मला फार आहे. त्यामुळे माझी एवढी पवित्र कीर्ति पसरली. मी कसाच्या राज्यांतले बंदिखाने फोडले आणि पितरांची बेडी काढून त्यांना मुक्त केले १३९०.


    यालागीं गायीं आणि ब्राह्मण । माझा जाण जीवप्राण ।
    माझे पूजेचें अधिष्ठान । सुलभ जाण इयें दोन्ही ॥९१॥
    म्हणून गाई आणि ब्राह्मण ही माझी जीवप्राण आहेत. ह्य दोहोंमुळेच माझ्या पूजेचे अधिष्टान सुलभ झाले आहे ९१.


    आपत्काळीं गोरक्षण । करी तो पढियंता मज जाण ।
    त्यासवें मी आपण । गोरक्षण करीतसें ॥९२॥
    जो आपत्कालांत गाईचे संरक्षण करतो, तो मला फार आवडतो. त्याच्याबरोबर मीही स्वतः गोरक्षण करूं लागतों ९२.


    गायीचे सेवेचें विधान । गोग्रास द्यावा जे तृण ।
    करावें अंगकुरवाळण । इतुकेनि प्रसन्न मी होयें ॥९३॥
    गाईच्या सेवेचे विधान असें आहे की, तिला दररोज गोग्रास द्यावा व गवत घालावें, आणि तिच्या आंगावरून हात फिरवून तिचे आंग कुरवाळावे, म्हणजे तेवव्यानेच मी प्रसन्न होतों ९३.


    निर्लोभ गायीची सेवा । करितां माझी प्राप्ति उद्धवा ।
    ऐक वैष्णवाची सेवा । पूजा सद्‍भावा विभागू ॥९४॥
    उद्धवा ! निलोभपणे गाईची सेवा केली असतां माझी प्राप्ति होते. आतां सद्‌भक्तीने वैष्णवाची पूजा कशी करावी तेही ऐक ९४.


    वैष्णवे बंधुसत्कृत्या हृदि खे ध्याननिष्ठया ।
    वायौ मुख्यधिया तोये द्रव्यैस्तोयपुरःस्कृतैः ॥ ४४ ॥
    श्लोक ४४] विष्णुभक्ताला आपला भाऊ समजून त्याचा आदर करावा ध्यान लावून हृदयाकाशात माझी पूजा करावी मुख्य प्राण समजून वायूमध्ये आणि फुले इत्यादी वाहून पाण्यामध्ये माझी आराधना करावी. (४४)




    वैष्णवसेवा अत्यंत कठिण । तेथें जाती नाहीं गा प्रमाण ।
    न म्हणावा शूद्र ब्राह्मण । भक्तिप्राधान्यभावार्थे ॥९५॥
    वैष्णवाची सेवा करणे मोठे कठीण काम आहे. तेथें जात ही प्रमाण नाही. भक्तिप्रधान भावार्थाने हा शुद्ध आहे किंवा हा ब्राह्मण आहे असा भेद मनांतच आणूं नये ९५.


    विदुर दासीपुत्र प्रसिद्धु । त्यासी आवडला गोविंदु ।
    झाला वैष्णवांमाजीं अतिशुद्धु । कैसेनि निंद्यु म्हणावा ॥९६॥
    विदुर हा दासीपुत्र असल्याचे प्रसिद्धच आहे. पण त्याला श्रीकृष्ण आवडला. तो वैष्णवांमध्ये अत्यंत भेष्ठ झाला. त्याला निंद्य कसा म्हणावा ? ९६.


    योनि जन्मला मर्कट । तो वैष्णवांमाजीं अतिश्रेष्ठ ।
    हनुमंत म्हणावया कनिष्ठ । ऐसा पापिष्ठ कोण आहे ॥९७॥
    माकडाच्या जातीत जन्माला आलेला जो मारुति, तो वैष्णवांमध्ये अत्यंत श्रेष्ठ होता. तो कनिष्ठ आहे असे म्हणण्याइतका पातकी कोण आहे ? ९७.


    राक्षसांमाजीं बिभीषण । दैत्यांमाजीं प्रह्लाद जाण ।
    भगवंतासी अनन्यशरण । वैष्णवपण तेणें त्यांसी ॥९८॥
    राक्षसांमध्ये विभीषण व दैत्यांमध्ये प्रल्हाद, हेही भगवंताला अनन्यभावाने शरण गेले, म्हणून त्या योगाने त्यांना वैष्णवपण प्राप्त झाले ९८.


    जाती उत्तम भक्तिहीन । तो वैष्णव नव्हे जाण ।
    अथवा करी दांभिक भजन । वैष्णवपण त्या नाहीं ॥९९॥
    जातीने श्रेष्ठ असून जर भक्तिरहित असेल तर तो वैष्णव नव्हे हे लक्षात ठेव. किंवा वरकरणी भजन करील तर त्यालाही वैष्णवपणा प्राप्त झाला नाही असे समजावें ९९.


    वैष्णवीं मानी जातिप्रमाण । शालिग्राम मानी पाषाण ।
    गुरूसी मानी माणुसपण । तो पापिष्ठ जाण सर्वथा ॥१४००॥
    जो वैष्णवांमध्ये जाति प्रमाण मानतो, शालिग्रामाला पाषाण समजतो, आणि गुरूला सामान्य मनुष्य समजतो, तो सर्वस्वी पातकी होय १४००.

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १ ते १००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १0१ ते २००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या २०१ ते ३००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ३०१ ते ४००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ४०१ ते ५००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ५०१ ते ६००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ६०१ ते ७००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ७०१ ते ८००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ८०१ ते ९००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ९०१ ते १०००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १००१ ते ११००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ११०१ ते १२००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १२०१ ते १३००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १३०१ ते १४००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १४०१ ते १५००

    एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १५०१ ते १५८१

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...