मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
एकनाथी भागवत अध्याय २९ ओव्या ६०१ ते ७००
॥ आशंका ॥
धर्मार्थकाममोक्षांप्रती । साधने असतीं नेणों किती ।
तुवां हें एकचि श्रीपती । कैशा रीतीं प्रतिपादिलें ॥ ६०१ ॥
उद्धवा साधनें जीं आनान । ते अभक्त सोशिती आपण ।
माझ्या भक्तांसी गा जाण । मीच साधन सर्वार्थीं ॥ ६०२ ॥
ज्ञाने कर्मणि योगे च वार्तायां दण्डधारणे ।
यावानर्थो नृणां तात तावांस्तेऽहं चतुर्विधः ॥ ३३ ॥
मोक्षालागीं ‘ज्ञान’ साधन । धर्मालागीं ‘स्वधर्माचरण’ ।
स्वामित्वालागीं ‘दंडधारण’ । ‘अर्थोद्यम’ जाण जीविकावृत्तीं ॥ ६०३ ॥
इहामुत्र कामभोग । तदर्थ करिती ‘योगयाग’ ।
चहूं पुरुषार्थीं हा चांग । साधनप्रयोग अभक्तां ॥ ६०४ ॥
ऐसें सोशितां साधन । सहसा सिद्धी न पवे जाण ।
अनेक विकळता दूषण । माजीं छळी विघ्न देवांचें ॥ ६०५ ॥
तैसें मद्भक्तांसी नव्हे जाण । माझें करितां अनन्यभजन ।
चारी पुरुषार्थ येती शरण । पायां सुरगण लागती ॥ ६०६ ॥
उद्धवा जे मज अनन्यशरण । त्यांचा धर्म अर्थ मीचि पूर्ण ।
त्यांचा काम तोही मीचि जाण । मोक्षही संपूर्ण मी त्यांचा ॥ ६०७ ॥
अभक्तां भोगक्षयें पुनरावृत्ती । भक्तांसी भोग भोगितां नित्यमुक्ती ।
एवढी माझ्या भक्तीची ख्याती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ६०८ ॥
ऐशी ऐकतां देवाची मात । उद्धव प्रेमें वोसंडला अद्भुत ।
तेणें प्रेमें लोधला कृष्णनाथ । हर्षे बोलत तेणेंसी ॥ ६०९ ॥
उद्धव तुझे चारी पुरुषार्थ । तो मी प्रत्यक्ष भगवंत ।
ऐसें बोलोनि हर्षयुक्त । हृदयाआंत आलिंगी ॥ ६१० ॥
हर्षें देतां आलिंगन । कृष्ण विसरला कृष्णपण ।
उद्धव स्वानंदीं निमग्न । उद्धवपण विसरला ॥ ६११ ॥
कैसें अभिनव आलिंगन । दोघांचें गेलें दोनीपण ।
पूर्ण चैतन्य स्वानंदघन । परिपूर्ण स्वयें झाले ॥ ६१२ ॥
तेथ विरोनि गेला हेतु । वेदेंसहित बुडाली मातु ।
एकवटला देवीं भक्तु । एकीं एकांतु एकत्वें ॥ ६१३ ॥
तेथ मावळले धर्माधर्म । क्रियेसहित उडालें कर्म ।
भ्रम आणि निर्भ्रम । या दोंहीचें नाम असेना ॥ ६१४ ॥
भेद घेऊनि गेला अभेदा । बोध घेऊनि गेला निजबोधा ।
आनंद लाजला आनंदा । ऐशिया निजपदा उद्धव पावे ॥ ६१५ ॥
मी जाहलो परब्रह्म । हाही मुख्यत्वें जेथ भ्रम ।
कृष्णालिंगनाचा हा धर्म । जाहला निरूपम निजवस्तु ॥ ६१६ ॥
यावरी कृष्ण सर्वज्ञ । सोडोनियां आलिंगन ।
ऐक्यबोधें उद्धवासी जाण । निजभक्तपण प्रबोधी ॥ ६१७ ॥
तेव्हं उद्धव चमत्कारला । अतिशयें चाकाटला ।
परम विस्मयें दाटला । तटस्थ ठेला ते काळीं ॥ ६१८ ॥
मग म्हणे हे निजात्मता । स्वतःसिद्ध जवळी असतां ।
जनासी न कळे सर्वथा । साधकांच्या हाता चढे केवीं ॥ ६१९ ॥
तें उद्धवाचें मनोगत । जाणोनियां श्रीकृष्णनाथ ।
तदर्थींचा सुनिश्चित । असे सांगत उपाय ॥ ६२० ॥
मर्त्यो यदा त्यक्तसमस्तकर्मा
निवेदितात्मा विचिकीर्षितो मे ।
तदामृतत्वं प्रतिपद्यमानो
मयाऽऽत्मभूयाय च कल्पते वै ॥ ३४ ॥
जें बोलिलीं धर्मार्थकाममोक्षार्थं । ते साधनें सांडूनि समस्त ।
जे अनन्यभावें मज भजत । विश्वासयुक्त निजभावें ॥ ६२१ ॥
त्यांसी हे स्वरूपस्थिती । जे त्वां भोगिली आत्मप्रतीती ।
ते तत्काळ होय प्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ६२२ ॥
धर्मार्थकामवासना । असोनि लागल्या मद्भजना ।
तरी तेही पुरवूनियां जाणा । सायुज्यसदना मी आणीं ॥ ६२३ ॥
भक्तांसी स्वधर्मकर्मावस्था । तेही लाविल्या भजनपंथा ।
स्वधर्मकर्मीं अकर्मात्मता । माझिया निजभक्तां उद्बोधीं मी ॥ ६२४ ॥
भक्त वांछी भोगकाम । भोग भोगोनि होय निष्काम ।
ऐशिया निजबोधाचें वर्म । मी आत्माराम उद्बोधीं ॥ ६२५ ॥
भक्त मागे अर्थसंपन्नता । त्याचे गांठी धन नसतां ।
माझीं षड्गुणैश्वर्यसमर्थता । वोळंगे तत्त्वतां त्यापाशीं ॥ ६२६ ॥
सर्व भूतीं माझी भक्ती । भक्त भजे अनन्यप्रीतीं ।
तैं चारी मुक्ती शरण येती । मद्भक्तां मुक्ती स्वतःसिद्ध ॥ ६२७ ॥
वैद्य धडपुडा पंचानन । नाना रोगियांची वासना पोखून ।
मागे तें तें देऊनि अन्न । वांचवी रसज्ञ रसप्रयोगें ॥ ६२८ ॥
तेवीं धर्मार्थकामवासना । भक्तांच्या पोखनियां जाणा ।
मी आणीं सायुज्यसदना । तेही विवंचना सांगितली ॥ ६२९ ॥
नाना साधनाभिमान । सांडूनियां जो ये मज शरण ।
त्यासीही स्वरूपप्राप्ती पूर्ण । उद्धवा जाण सुनिश्चित ॥ ६३० ॥
भक्त सकाम जरी चित्तीं । तो जैं करी अनन्यभक्ती ।
तैं काम पुरवूनि मी दें मुक्ती । भक्तां अधोगती कदा न घडे ॥ ६३१ ॥
बाळकें थाया घेऊनि कांहीं । मिठी घातल्या मातेच्या पायीं ।
धन वेंचोनि अर्पी तेंही । परी जीवें कांहीं मारीना ॥ ६३२ ॥
तेवीं माझी करितां अनन्यभक्ती । जो जो काम भक्त वांछी चित्तीं ।
तो तो पुरवूनि मी दें मुक्ती । परी अधोगती जावों नेदीं ॥ ६३३ ॥
देखोनि बाळकाची व्यथा । जेवीं सर्वस्वें कळवळी माता ।
तेवीं निजभक्तांची अवस्था । मजही सर्वथा सहावेना ॥ ६३४ ॥
काम पुरवूनि द्यावया मुक्ती । काय माझे गांठी नाहीं शक्ती ।
मी भक्तकैवारी श्रीपती । त्यासी अधोगती कदा न घडे ॥ ६३५ ॥
माझें नाम अवचटें आल्या अंतीं । रंक लाहे सायुज्यमुक्ती ।
मा माझी करितां अनन्यभक्ती । भक्तां अवगती मग कैंची ॥ ६३६ ॥
माझा भक्त जयाकडे कृपें पाहे । तोही माझी भक्ति लाहे ।
मा मद्भक्ता अवगती होये । हा बोल न साहे मजलागीं ॥ ६३७ ॥
सोसूनियां गर्भवासासी । म्यां मुक्त केल अंबर्षी ।
विदारूनि हिरण्यकशिपूसी । प्रल्हादासी रक्षिलें ॥ ६३८ ॥
चक्र घेऊनियां हातीं । म्यां गर्भीं रक्षिला परीक्षिती ।
तो मी भक्तांसी अधोगती । कदा कल्पांतीं होऊं नेदीं ॥ ६३९ ॥
माझिये भक्ताचेनि नांवें । तृण तेंही म्यां उद्धरावें ।
भक्तां केवीं अवगती पावे । जे जीवेंभावें मज भजले ॥ ६४० ॥
काया वाचा मन धन । अवंचूनि अनन्यशरण ।
त्यांचा योगक्षेम जाण । मी श्रीकृष्ण स्वयें सोशीं ॥ ६४१ ॥
ऐसा अनन्यभक्तीचा महिमा । सांगतां उत्साह पुरुषोत्तम ।
तेणें उद्धवासी लोटला प्रेमा । स्वेद रोमां रवरवीत ॥ ६४२ ॥
ऐकोनि भक्तीचें महिमान । देखोनि उद्धवाचें प्रेम पूर्ण ।
श्रीशुक सुखावला आपण । स्वानंदपूर्ण डोलत ॥ ६४३ ॥
हरिखें म्हणे परीक्षिती । धन्य हरिभक्त त्रिजगतीं ।
ज्यांसी सर्वार्थीं मुक्ती । स्वमुखें श्रीपती बोलिला ॥ ६४४ ॥
जैसें भक्तीचें महिमान । तैसेंचि उद्धवाचें प्रेम गहन ।
हें उद्धवाचें प्रेमलक्षण । श्रीशुक आपण सांगत ॥ ६४५ ॥
श्रीशुक उवाच-
स एवमादर्शितयोगमार्गः
तदोत्तमश्लोकवचो निशम्य ।
बद्धाञ्जलिः प्रीत्युषरुद्धकण्ठो
न किञ्जिदूचेऽश्रुपरिप्लुताक्षः ॥ ३५ ॥
विष्टभ्य चित्तं प्रणयावघूर्णं
धैर्येण राजन् बहु मन्यमानः ।
कृताञ्जलिः प्राह यदुप्रवीरं
शीर्ष्णा स्पृशंस्तच्चरणारविन्दम् ॥ ३६ ॥
जो ज्ञानियांचा ज्ञाननिधी । जो निजबोधाचा उदधी ।
जो आनंदाचा क्षीराब्धी । तो श्रीशुक स्वानंदीं तोषला बोले ॥ ६४६ ॥
ऐक बापा परीक्षिती । श्रवणसौभाग्यचक्रवर्ती ।
ज्यातें सुर नर असुर वानिती । ज्याची कीजे स्तुती महासिद्धीं ॥ ६४७ ॥
ज्यातें वेद नित्य गाती । योगिवृंदी वानिजे कीर्ती ।
तेणें श्रीकृष्णें स्तविली भक्ती । परम प्रीतीं अचुंबित ॥ ६४८ ॥
अनन्यभक्तिपरतें सुख । आन नाहींच विशेख ।
सर्व सारांचें सार देख । मद्भक्ति चोख सुरवरादिकां ॥ ६४९ ॥
भक्तियोगाचा योगमार्ग । समूळ सप्रेम शुद्ध साङ्ग ।
स्वमुखें बोलिला श्रीरंग । तें उद्धवें चांग अवधारिलें ॥ ६५० ॥
ऐकतां भक्तीचें निरूपण । उद्धवाचें द्रवलें मन ।
नयनीं अश्रु आले पूर्ण । स्वानंदजीवन लोटलें ॥ ६५१ ॥
शरीर जाहलें रोमांचित । चित्त जाहलें हर्षयुक्त ।
तेणें कंठीं बाष्प दाटत । स्वेदकण येत सर्वांगीं ॥ ६५२ ॥
प्राण पांगुळला जेथींचा तेथ । शरीर मंदमंद कांपत ।
नयन पुंजाळले निश्चित । अर्धोन्मीलित ते जाहले ॥ ६५३ ॥
औत्सुक्याचे अतिप्रीतीं । स्वानंदी समरसे चित्तवृत्ती ।
उद्धवदेहाची विरतां स्थिती । प्रारब्धें निश्चितीं तें राखिलें ॥ ६५४ ॥
जळीं नांव उलथतां पूर्ण । जेवीं दोर राखे आवरून ।
तेवी मावळतां उद्धवपण । प्रारब्धें जाण राखिलें ॥ ६५५ ॥
धैर्याचेनि अतिसामर्थ्यें । आवरूनि प्रेमाचें भरितें ।
मी कृतकृत्य जाहलों एथें । हेंही निश्चितें मानिलें ॥ ६५६ ॥
श्रीकृष्णें उद्धरिलें मातें । ऐशिया मानूनि उपकारातें ।
काय उतरायी होऊं मी यातें । ऐसे निजचित्तें विचारी ॥ ६५७ ॥
गुरूसी चिंतामणि देवों आतां । तो चिंता वाढवी चिंतिलें देतां ।
गुरूंनीं दिधलें अचित्यार्था । तेणें उत्तीर्णता कदा न घडे ॥ ६५८ ॥
गुरूसी कल्पतरु देवों जातां । तो कल्पना वाढवी कल्पिलें देतां ।
गुरूनें दिधली निर्विकल्पता । त्यासी उत्तीर्णता तेणें नव्हिजे ॥ ६५९ ॥
गुरूसी देवों स्पर्शमणी । तो स्पर्शें धातु करी सुवर्णी ।
ब्रह्मत्व गुरूचरणस्पर्शनीं । त्यासी नव्हे उत्तीर्णी परीसही देतां ॥ ६६० ॥
गुरूसी कामधेनु देऊं आणोनी । ते कामना वाढवी अर्थ देऊनी ।
गुरु निष्काम निर्गुणदानी । त्याचे उत्तीर्णी कामधेनु नव्हे ॥ ६६१ ॥
त्रिभुवनींची संपत्ति चोख । गुरूसी देतां ते मायिक ।
जेणें दिधली वस्तु अमायिक । त्यासी कैसेनि लोक उतरायी होती ॥ ६६२ ॥
देहें उतरायी होऊं गुरूसी । तंव नश्वरपण या देहासी ।
नश्वरें अनश्वरासी । उत्तीर्णत्वासी कदा न घडे ॥ ६६३ ॥
जेणें अव्हाशंख दीधला आवडीं । त्यासी देऊनि फुटकी कवडी ।
उत्तीर्णत्वाची वाढवी गोडी । तैशि परवडी देहभावा ॥ ६६४ ॥
जीवें उतरायी होऊं गुरूसी । तंव जीवत्वचि मिथ्या त्यासी ।
जेणें दिधलें सत्य वस्तूसी । मिथ्या देतां त्यासी लाजचि कीं ॥ ६६५ ॥
जेणें दिधलें अनर्घ्य रत्नासी । वंध्यापुत्र देवों केला त्यासी ।
तेवीं मिथ्यत्व जीवभावासी । उत्तीर्णत्वासी कदा न घडे ॥ ६६६ ॥
काया वाचा मन धन । गुरूसी अर्पितां जीवप्राण ।
तरी कदा नव्हिजे उत्तीर्ण । हें उद्धवें संपूर्ण जाणितलें ॥ ६६७ ॥
जेथें अणुमात्र नाहीं दुःख । ऐसें दिधलें निजसुख ।
त्या गुरूसी उतरायी देख । न होवें निःशेख शिष्यांसी ॥ ६६८ ॥
यालागीं मौनेंचि जाण । उद्धवें घातलें लोटांगण ।
श्रीकृष्णाचे श्रीचरण । मस्तकीं संपूर्ण वंदिले ॥ ६६९ ॥
मागां श्रीकृष्णें पुशिलें पहा हो । उद्धवा तुझा गेला कीं शोकमोहो ।
तेणें उद्धवासी जाहला विस्मयो । उत्तर द्यावया ठावो न घडेचि ॥ ६७० ॥
आतां वंदोनि श्रीचरण । कृतांजली धरोनि जाण ।
उत्तर द्यावया आपण । श्रीकृष्णवदन अवलोकी ॥ ६७१ ॥
जेवीं सेवितां चंद्रकर । चकोर तृप्तीचे दे ढेंकर ।
तेवीं उद्धव कृष्णसुखें अतिनिर्भर । काय प्रत्युत्तर बोलत ॥ ६७२ ॥
उद्धव उवाच-
विद्रावितो मोहमहान्धकरो
य आश्रितो मे तव संनिधानात् ।
विभावसोः किन्नु समीपगस्य
शीतं तमो भीः प्रभवन्त्यजाद्य ॥ ३७ ॥
जो अकळदेवचूडामणी । जो यादवांमाजीं अग्रगणी ।
जो अविद्यारात्रीचा तरणी । जो शिरोमणी ब्रह्मवेत्त्यां ॥ ६७३ ॥
ऐशिया श्रीकृष्णाप्रती । स्वानंदाचिये निजस्फूर्तीं ।
उद्धवें सांगतां निजस्थिती । त्यामाजीं करी स्तुती आद्यत्वें हरीची ॥ ६७४ ॥
मज तंव विचारितां । ब्रह्मा सर्वांचा आदिकर्ता ।
तोही नारायणनाभीं तत्त्वतां । होय जन्मता ‘अज’ नामें ॥ ६७५ ॥
तो तूं कमळनाभि नारायण । मायासंवलित ब्रह्म जाण ।
ते मायेचें तूं आद्यकारण । आद्यत्व पूर्ण तुज साजे ॥ ६७६ ॥
अविद्येच्या महारात्रीं । अडकलों होतों मोहअंधारीं ।
तेथूनि काढावया बाहेरीं । आणिकांची थोरी चालेना ॥ ६७७ ॥
तेथ तुझेनि वचनभास्करें । नासोनि शोकमोहअंधारें ।
मज काढिलें जी बाहेरें । चमत्कारें संनिधें तुझ्या ॥ ६७८ ॥
तुझिये संनिधीपाशीं । ठाव नाहीं अविद्येसी ।
तेथ मोहममता कैसी ग्रासी । हृषीकेशी तुज असतां ॥ ६७९ ॥
अंधारी राती अतिगहन । तेथ शीतें पीडिला जो संपूर्ण ।
त्यासी आतुडलिया हुताशन । शीत तम जाण तत्काळ पळे ॥ ६८० ॥
तो अग्नि सेवितां स्वयें सदा । शीततमांची भयबाधा ।
पुढती बाधों न शके कदा । तेवीं गोविंदा संनिधीं तुझ्या ॥ ६८१ ।
तेवीं शोकमोहममतेशीं । माया जन बांधे भवपाशीं ।
ते तुझिये संनिधीपाशीं । जाती आपैसीं हारपोनी ॥ ६८२ ॥
मरणजन्मां अपाये । मागां अनेक सोशिले स्वयें ।
ज्यासी तुझी संनिधी होये । त्यासी तें भवभये समूळ मिथ्या ॥ ६८३ ॥
तुझे संनिधीपाशीं जाण । समूळ मायेचें निर्दळण ।
तेचि अर्थीचें निरूपण । उद्धव आपण सांगत ॥ ६८४ ॥
प्रत्यर्पितो मे भवतानुकम्पिना
भृत्याय विज्ञानमयः प्रदीपः ।
हित्वा कृतज्ञस्तव पादमूलं
कोऽन्यत्समीयाच्छरणं त्वदीयम् ॥ ३८ ॥
तुझी संनिधिमात्र देख । समूळ अज्ञानासी घातक ।
हेंचि मुख्यत्वें आवश्यक । भक्त सात्त्विक जाणती ॥ ६८५ ॥
असो इतरांची गोष्टी । म्याहीं अनुभविलें निजदृष्टीं ।
अविद्या निरसावया सृष्टीं । सत्संगती लाठी सर्वार्थीं ॥ ६८६ ॥
सत्संगाहीमाजीं जाण । तुझी संगती अतिपावन ।
तुवां उद्धरावया दीनजन । हें निजात्मज्ञान प्रकाशिलें ॥ ६८७ ॥
माझें निमित्त करूनि जाण । उद्धरावया दीन जन ।
त्यांचें निरसावया अज्ञान घन । ज्ञानदीप पूर्ण प्रज्वळिला ॥ ६८८ ॥
उपदेशार्थ श्रद्धास्थिती । हेचि टवळें पैं निश्चितीं ।
तेथें बोधिका ज्या निजात्मयुक्ती । तेंचि टवळ्यांप्रती स्नेह पूर्ण ॥ ६८९ ॥
विवेकवैराग्यधारण । हेंचि तेथील वाती जाण ।
तेथ प्रज्वळिला ज्ञानघन । चित्प्रभापूर्ण महादीप ॥ ६९० ॥
नैराश्य तेंचि वैराग्यधारण । तेथें प्रज्वळे ज्ञनदीप पूर्ण ।
आशां तेंचि माल्हवण । गडद संपूर्ण पडे तेथें ॥ ६९१ ॥
तो दीप कर्णद्वारीं ठेविला । तंव सबाह्य प्रकाश जाहला ।
अज्ञानअंधार निर्दळिला । स्वयें प्रबळला सद्रूपें ॥ ६९२ ॥
तेणें सबाह्यसत्प्रकाशें । तुझी पदवी प्रकट दिसे ।
ऐसें निजरूप हृषीकेशें । अनायासें मज अर्पिलें ॥ ६९३ ॥
तुवां अंतर्यामित्वें आपुलें । स्वरूप पूर्वींच मम अर्पिलें ।
तें तुवांच माझारी आच्छादिलें । भजन आपुलें प्रकटावया ॥ ६९४ ॥
तुझ्या निजभजनाचें लक्षण । सर्वभूतीं भगवद्भजन ।
तेणें तूं साचार संतोषोन । अर्पिलेंचि ज्ञान अर्पिसी पुढती ॥ ६९५ ॥
वाढवूनि निजभजन । माझें मज अर्पिसी ज्ञान ।
या नांव ‘प्रत्यर्पण’ । साधु सज्ञान बोलती ॥ ६९६ ॥
वाढवूनि आपुली भक्ती । माझें ज्ञान दिधलें माझे हातीं ।
दिधलें तेथ माया पुढती । विकल्पवृत्ती स्पर्शेना ॥ ६९७ ॥
जे दिधली स्वरूपस्थिती । ते आच्छादेना कदा कल्पांतीं ।
यापरी गा श्रीपती । कृपा निश्चितीं तुवां केली ॥ ६९८ ॥
यापरी तूं अतिकृपाळू । निजदासांलागी दयाळू ।
त्या तुज सांडूनियां बरळू । आनासी गोवळू भजों धांवे ॥ ६९९ ॥
त्यजूनि स्वामी हृषीकेशु । आना भजेल तो केवळ पशु ।
पशूंहीमाजीं तो रासभेशु । ज्यासी नाहीं विश्वासु हरिभजनीं ॥ ७०० ॥