मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
एकनाथी भागवत अध्याय २८ ओव्या ७०१ ते ७४२
निजात्मअळंकारें श्रीपती । उद्धव शृंगारिला ब्रह्मस्थितीं ।
तेणें वंद्य झाला त्रिजगतीं । त्यातें पुराणीं पढती महाकवी ॥ ७०१ ॥
गोडीमाजीं श्रेष्ठ अमृत । तेंही फिकें करूनि एथ ।
उद्धवालागीं परमामृत । श्रीकृष्णें निश्चित पाजिलें ॥ ७०२ ॥
अमर अमृतपान करिती । तेही मरणार्णवीं बुडती ।
उद्धव अक्षयीं केल श्रीपती । कथामृतीं निववूनि ॥ ७०३ ॥
तेणें तो सर्वांगीं निवाला । परमानंदीं तृप्त झाला ।
तेणें उद्धवत्वा विसरला । डोलों लागला स्वानंदें ॥ ७०४ ॥
तेव्हां स्वानंदउन्मत्तता । दुजें निर्दळी देखतां ।
संसार हाणोनि लाता । चढे माथा देवांच्या ॥ ७०५ ॥
चढोनि देवांचिया माथां । शेखीं गिळी देवभक्तता ।
मग सच्चिदानंदस्वानंदता । निजात्मता स्वयें झाला ॥ ७०६ ॥
तेथ सत्-चित्-आनंद । हाही नाहीं त्रिविध भेद ।
सदोदित परमानंद । स्वानंद शुद्ध कोंदला ॥ ७०७ ॥
नश्वर त्यागाचिये स्थिती । अनश्वरातें ‘संत’ म्हणती ।
जडाची करितां निवृत्ती । ‘चिद्रूप’ म्हणती वस्तूतें ॥ ७०८ ॥
जेथ दुःखाचा नाहीं बाधु । त्यातें म्हणती ‘आनंदु’ ।
एवं सच्चिदानंद शब्दु । ज्ञानसंबंधु मायिक ॥ ७०९ ॥
वस्तु संत ना असंत । चित् नव्हे अचित् ।
ते सुखदुःखातीत । जाण निश्चित सन्मात्र ॥ ७१० ॥
हा अठ्ठाविशींचा निजबोध । उद्धवासी तुष्टोनि गोविंद ।
देता झाला स्वानंदकंद । भाग्यें अगाध तो एक ॥ ७११ ॥
सांडोनि निजधामा जाणें । स्वयें श्रीकृष्ण ज्याकारणें ।
देता झाला निजगुह्यठेवणें । त्याचें भाग्य वानणें तें किती ॥ ७१२ ॥
जें नेदीच पित्या वसुदेवासी । जें नेदीच बंधु बळभद्रासी ।
जें नेदीच पुत्रा प्रद्युम्नासी । तें उद्धवासी दीधलें ॥ ७१३ ॥
जें नेदीच देवकीमातेसी । जें नेदीच कुंती आतेसी ।
शेखीं नेदीच यशोदेसी । तें उद्धवासी दीधलें ॥ ७१४ ॥
म्हणाल संगितलें अर्जुनासी । तोही अत्यंत पढियंता त्यासी ।
त्याहातीं उतरावया धराभारासी । युद्धीं त्त्वरेंसी उपदेशिला ॥ ७१५ ॥
तैसें नव्हे उद्धवाकडे । सावकाश निजनिवाडे ।
गुप्त ठेवणें फाडोवाडें । अवघे त्यापुढें अर्पिलें ॥ ७१६ ॥
पित्याचिया निजधनासी । स्वामित्व लाभे निजपुत्रासी ।
तेवीं श्रीकृष्णाचिया गुह्यज्ञानासी । झाला मिराशी उद्धव ॥ ७१७ ॥
पांडवांमाजीं धन्य अर्जुन । यादवांमाजीं उद्धव धन्य ।
या दोघांच्या भाग्यासमान । न दिसे आन त्रिजगतीं ॥ ७१८ ॥
सकळ साराचा निजसारांश । तो हा एकादशीं अठ्ठावीस ।
जेवीं यतींमाजीं परमहंस । तेवीं अष्टाविंश भागवतीं ॥ ७१९ ॥
जेवीं क्षीराब्धीमाजीं शेषशयन । त्यावरी जैसा नारायण ।
तेवीं भागवतामाजीं जाण । ब्रह्मपरिपूर्ण अष्टाविंश ॥ ७२० ॥
जेवीं वैकुंठ परम पावन । त्यावरी विराजे श्रीभगवान ।
तेवीं भागवतामाजीं जाण । विराजमान अष्टविंश ॥ ७२१ ॥
एवढ्या महत्त्वाचें वैभव । कृष्णकृपेनें पावला उद्धव ।
बाप निजभाग्याची धांव । ब्रह्म स्वयमेव स्वयें झाला ॥ ७२२ ॥
उद्धव झाला ब्रह्मपूर्ण । त्यासी कृष्णकृपा प्रमाण ।
तें मी वाखाणीं अज्ञान । देशभाषेने प्राकृत ॥ ७२३ ॥
अंधासी सूर्य प्रसन्न । झालिया देखे तो निधान ।
तेवीं प्रकटोनि जनार्दन । हें गुह्यज्ञान बोलवी ॥ ७२४ ॥
जनार्दन प्रकटला आतां । हें बोलणें माझी मूर्खता ।
तो स्वतःसिद्ध सदा असतां । हेंही झालों मी जाणता त्याचिया कृपा ॥ ७२५ ॥
त्याचिया कृपें ऐसें केलें । माझें मीपण निःशेष नेलें ।
नेलेंपण देखों नाहीं दीधलें । जेवीं सूर्ये केलें अंधारा ॥ ७२६ ॥
मज कृपा करील जनार्दन । हेंही नेणें मी अज्ञान ।
तेणें दयाळुवें कृपा करून । हें गुह्यज्ञान बोलविलें ॥ ७२७ ॥
निकट असतां जनार्दन । मी नेणें त्याचें महिमान ।
तेणें आपला महिमा आपण । मज मुखें जाण बोलविला ॥ ७२८ ॥
मी जें म्हणे माझें मुख । तेंही जनार्दन झाला देख ।
तेणें मुखें निजात्मसुख । बोलवी निष्टंक निजात्मसत्ता ॥ ७२९ ॥
एवं माझेनि नांवें कविता । परी जनार्दनची झाला वक्ता ।
तेणें वक्तेपणें तत्त्वतां । रसाळ कथा चालविली ॥ ७३० ॥
ब्रह्मरसें रसाळ कथा । निरूपिलें श्रीभागवता ।
त्यामाजीं ब्रह्मतल्लीनता । जाण तत्त्वतां अष्टविंश ॥ ७३१ ॥
अठ्ठाविसाव्याचें निरूपण । तें तत्त्वतां ब्रह्म परिपूर्ण ।
श्रद्धेनें करितां श्रवण । उद्धव संपूर्ण निवाला ॥ ७३२ ॥
उद्धव निवोनियां आपण । स्वयें विचारिता झाला जाण ।
म्हणे हें शुद्ध आत्मज्ञान । परी प्राप्ती कठिण अबळांसी ॥ ७३३ ॥
या चित्स्वरूपाची प्राप्ती । सुगम होय साधकांप्रती ।
पुढील अध्यायीं येचि अर्थीं । उद्धव विनंती करील ॥ ७३४ ॥
कडा फोडोनि मार्ग कीजे । कां उंचीं फरस बांधिजे ।
तेवीं सुगमें निर्गुण पाविजे । तो उपाव पुसिजे उद्धवें ॥ ७३५ ॥
ब्रह्मप्राप्तीचा सुगम उपावो । स्वयें सांगेल देवाधिदेवो ।
तो सुरस पुढील अध्यावो । साधकां पहा हो परमार्थसिद्धि ॥ ७३६ ॥
पव्हणियापरिस पायउतारा । अबळीं उतरिजे भवसागरा ।
तैसा साधकांलागीं सोपारा । उपाव पुढारा हरि सांगे ॥ ७३७ ॥
सीतेचेनि कृपा पडिभारें । सेतु बांधिजे रामचंद्रे ।
तेथ समुद्र तरतीं वानरें । जीं वनचरें अतिमंदें ॥ ७३८ ॥
तेवीं उद्धवप्रश्नप्रीतीसीं । भवाब्धिसेतु ह्रुषीकेशीं ।
बांधिला निजभक्तिउपायेंसीं । तेथ तरती आपैसीं भाविकें अबळें ॥ ७३९ ॥
कृष्णभक्ति सेतुद्वारें । तरलीं जड मूढ पामरें ।
ते भक्ती सांगिजेल यादवेंद्रें । श्रोतां सादरें परिसावी ॥ ७४० ॥
एका जनार्दना शरण । तेणें श्रोते सुप्रसन्न ।
पुढील अध्यायाचें कथन । तेणें साधक जन तरतील ॥ ७४१ ॥
सांडूनियां एकपण । एका जनार्दना शरण ।
सुगम साधे आत्मज्ञान । तें भक्तिसाधन हरि सांगे ॥ ७४२ ॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे भगवदुद्धवसंवादे परमहंससंहितायां
एकाकारटीकायां ‘परमार्थनिर्णयो’ नाम अष्टाविंशोऽध्यायः ॥ २८ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ ४४ ॥ ओव्या ॥ ७४२ ॥