मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
एकनाथी भागवत अध्याय २८ ओव्या ६०१ ते ७००
वायु अव्हाटल्या अवचितां । तैं देहीं वायु भरावा पुरता ।
वायु मेळवुनि वायुआंतौता । अणिती निजपंथा अभ्यासबळें ॥ ६०१ ॥
वायु क्षोभोनि सकोप । जैं जठरावरी पडे झडप ।
तैं क्षुधा खवळे अमूप । तृप्तीचें रूप उठीना ॥ ६०२ ॥
तेथ मोकळा सांडूनि प्राण । अपान वाढवावा आपण ।
तो जठरा आलिया जाण । तेथ क्षोभला प्राण सहजिचि ये ॥ ६०३ ॥
तेथ प्राणापानऐक्यता । सहजें ये साधकांच्या हाता ।
मग षट्चक्रें भेदितां । क्षणही सर्वथा लागेना ॥ ६०४ ॥
तेव्हां सतरावियेचें अमृतपान । साधकांसी फावे संपूर्ण ।
यापरी क्षुधानिर्दळण । येणें जाण साधिती ॥ ६०५ ॥
परदारा परद्रव्यासक्ती । हे पापकर्माची फळप्राप्ती ।
याची करावया निवृत्ती । तपश्चर्या निश्चितीं उद्धवा ॥ ६०६ ॥
भावें करितां मंत्रानुष्ठान । तेणे वैराग्य उपजे जाण ।
वैराग्यें विषयनिर्दळण । सहजें जाण साधकां ॥ ६०७ ॥
शुद्ध मंत्राचें पुरश्चरण । करी विघ्नांचें निर्दळण ।
तेथ पिशाचबाधासंचरण । घेऊनि प्राण स्वयें पळे ॥ ६०८ ॥
शरीरीं संचरल्या व्याधी । त्यातें निर्दळी दिव्य औषधी ।
मनाचा छेदावया आधी । योग त्रिशुद्धीं साधवा ॥ ६०९ ॥
तेथ साधल्या योगसिद्धी । समूल निर्दळी आधिव्याधी ।
सकळ विघ्नांतेंही छेदी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥ ६१० ॥
हें किती सांगूं भिन्न । भावें करितां माझें ध्यान ।
सकळ उपसर्गां निर्दळण । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ ६११ ॥
कांश्चिन्ममानुध्यानेन नामसंकीर्तनादिभिः ।
योगेश्वरानुवृत्त्या वा हन्यादशुभदाञ्छनैः ॥ ४० ॥
आधिव्याधींसीं सकळ विघ्न । विकल्प विकर्म देहाभिमान ।
ज्ञानाभिमानेंसीं दहन । करी ध्यानलक्षण उद्धवा ॥ ६१२ ॥
माझिया ध्यानाचे परिपाठीं । उपसर्ग पळती उठाउठी ।
शोधितां विघ्न न पडे दृष्टी । निर्द्वंद्व सृष्टी साधकां ॥ ६१३ ॥
माझा लागल्या ध्यानभावो । उपसर्गाचा नुरेचि ठावो ।
सकळ विघ्नांचा अभावो । विकल्प वावो स्वयें होती ॥ ६१४ ॥
म्हणशी ‘घालोनि आसन । एकाग्र करोनियां मन ।
कैं ठसावेल तुझें ध्यान । तैं साधकां विघ्न बाधीना’ ॥ ६१५ ॥
असो न टके माझें ध्यान । तैं सोपा उपाव आहे आन ।
माझें करितां नामकीर्तन । विघ्ननिर्दळण हरिनामें ॥ ६१६ ॥
जेथ नामाचा घडघडाट । तेथ उपसर्गा न चले वाट ।
महाविघ्नांचा कडकडाट । करी सपाट हरिनामें ॥ ६१७ ॥
अखंड माझी नामकीर्ती । ज्याच्या मुखास आली वस्ती ।
त्या देखोनि विघ्नें पळती । उपसर्गां शांती निःशेष ॥ ६१८ ॥
माझ्या नामाचा निजगजर । पळवी महापापसंभार ।
उपसर्गां नुरवी थार । नाम सधर हरीचें ॥ ६१९ ॥
अवचटें घेतां माझें नाम । सकळ पातकां करी भस्म ।
जेथ अखंड माझें गुणनामकर्म । तेथ विघ्नसंभ्रम स्पर्शेना ॥ ६२० ॥
माझे नामकीर्तीचे पवाडे । ज्याची वाचा अखंड पढे ।
विघ्नें न येती तयाकडे । जेवीं सूर्यापुढें आंधार ॥ ६२१ ॥
माझे नामकीर्तीवीण येथें । ज्याचें तोंड न राहे रितें ।
तो नागवे महाविघ्नांतें । जेवीं पतंगातें हुताशु ॥ ६२२ ॥
नामकीर्ती दाटुगी होये । हें विश्वासें मानलें आहे ।
ते नाम सुखीं केवीं राहे । करावें काये म्हणशील ॥ ६२३ ॥
मुखीं नामनिर्वाह व्हावा । यालागीं करावी साधुसेवा ।
संतसेवनीं सद्भावो जीवा । तेथ नव्हे रिघावा विघ्नांसी ॥ ६२४ ॥
सद्भावें धरिल्या सत्संगती । त्या संगाचिये निजस्थिती ।
मुखीं ठसावे नामकीर्ती । विकल्प चित्तीं स्फुरेना ॥ ६२५ ॥
मुखीं हरिनामाची गोडी । संतसेवेची अतिआवडी ।
तयाची गा प्रतापप्रौढी । उपसर्गकोडी निर्दळी ॥ ६२६ ॥
सधकांसी पाठिराखा । संत झालिया निजसखा ।
तैं महाविघ्नांचिया मुखा । विभांडी देखा क्षणार्धें ॥ ६२७ ॥
सेवितां साधूचें चरणोदक । अतिशुद्ध होती साधक ।
तेणें शुद्धत्वें महादोख । समूळ देख निर्दळी ॥ ६२८ ॥
साधूंच्या चरणतीर्थापाशीं । सकल तीर्थें येती शुद्धत्वासी ।
भावें सेविती त्या तीर्थासी । ते उपसर्गांसी नागवती ॥ ६२९ ॥
वंदितां साधुचरणरज । साधकांचें सिद्ध होय काज ।
निर्दळूनि विघ्नांचें बीज । स्वानंद निज स्वयें भोगिती ॥ ६३० ॥
निजभाग्यगतीं अवचितां । संतचरणरेणु पडल्या माथां ।
तो कळिकाळातें हाणे लाथा । तेथ विघ्नांची कथा ते कोण ॥ ६३१ ॥
निधडा शूर निजबळेंसीं । धुरां निजशस्त्र देऊनि त्यासी ।
युद्धीं थापटिलिया पाठीसी । तो विभांडी परांसी तेणें उल्हासें ॥ ६३२ ॥
तेवीं सद्भावें सत्संगती । मुखीं अखंड नामकीर्ती ।
भावें करितां संतांची भक्ती । महाबाधा निर्दळिती साधक ॥ ६३३ ॥
कीर्ति भक्ती सत्संगती । हे त्रिवेणी लाभे ज्याप्रती ।
त्यासी उपसर्ग नातळती । पावन त्रिजगती त्याचेनी ॥ ६३४ ॥
माझी भक्ती आणि नामकीर्ती । यांची जननी सत्संगती ।
तो सत्संग जोडल्या हातीं । विघ्नें न बाधिती साधकां ॥ ६३५ ॥
योग याग आसन ध्यान । तप मंत्र औषधी जाण ।
साधितां न तुटे देहाभिमन । तो सत्संग जाण निर्दळी ॥ ६३६ ॥
योगादि सर्व उपायीं जाण । निवारिती अल्पविघ्न ।
विघ्नांचा राजा देहाभिमान । तो त्यांचेनि जाण ढळेना ॥ ६३७ ॥
तो दुर्धर देहाभिमान । ज्ञातेपणीं अतिदारुण ।
याचे समूळ निर्दळण । सत्संग जाण स्वयें करी ॥ ६३८ ॥
नेणपणाचा अभिमान । तत्काळ जाय निघोन ।
तैसा नव्हे ज्ञानाभिमान । चाविरा जाण जाणिवा ॥ ६३९ ॥
त्याही अभिमनाचें निर्दळण । सत्संग निजांगें करी आपण ।
यालागीं सत्संगासमान । आन साधन असेना ॥ ६४० ॥
एकाचेनि निजमतें । अजरामर करावें देहातें ।
तेहीं योगादि साधनांतें । मूर्खमतें साधिती ॥ ६४१ ।
केचिदेहमिमं धीराः सुकल्पं वयसि स्थिरम् ।
विधाय विविधोपायैरथ युञ्जन्ति सिद्धये ॥ ४१ ॥
देहो तितुका प्रारब्धाधीन । त्यासी प्रारब्धें जन्ममरण ।
त्या देहासी अजरामरपण । पामर जन करूँ पाहती ॥ ६४२ ॥
त्या प्रारब्धाचें सूत्र पूर्ण । सर्वदा असे काळाधीन ।
यालागीं काळकृत जन्ममरण । सर्वांसी जाण सर्वदा ॥ ६४३ ॥
चौदा कल्प आयुष्य जोडी । त्या मार्कंडेयासी काळ झोडी ।
युगांतीं लोम झडे परवडी । त्या लोमहर्षाची नरडी मुरडिजे काळें ॥ ६४४ ॥
चतुर्युगसहस्त्र संख्येसी । तो दिवस गणिजे ब्रह्मयासी ।
जो स्रजिता सकळ सृष्टीसी । त्यासी काळ ग्रासी स्वबळें ॥ ६४५ ॥
स्त्रजित्या ब्रह्मयासी काळ पिळी । पाळित्या विष्णूतें काळ गिळी ।
प्रलयरुद्राचीही होळी । काळ महाबळी स्वयें करी ॥ ६४६ ॥
यापरी काळ अति दुर्धर । नेणोनि अविवेकी नर ।
वांछिती काळजयो पामर । देह अजरामर करावया ॥ ६४७ ॥
जें जें दिसे तें ते नासे । हे काळसत्ता जगासी भासे ।
तरी अजरामरत्वाचें पिसें । मूर्ख अतिप्रयासें वांछिती ॥ ६४८ ॥
थिल्लरींचा तरंग जाण । वांच्छी अजरामरण ।
तंव थिल्लरासचि ये मरण । तेथ वांचवी कोण तरंग ॥ ६४९ ॥
तेवी संसारचि नश्वर । त्यांतील देह अजरामर ।
करूं वाछिती पामर । उपायीं अपार शिणोनी ॥ ६५० ॥
देह जाईल तरी जावो । परी जीव हा चिरंजीव राहो ।
तदर्थ कीजे उपावो । तैसें अमरत्व पहा हो नरदेहा ॥ ६५१ ॥
देह केवळ नश्वर । त्यातें अविवेकी महाधीर ।
करूं म्हणती अजरामर । उपायीं अपार शिणोनी ॥ ६५२ ॥
केवळ काळाचें खाजें देहो । तो अमर करावया पहा हो ।
जो जो कीजे उपावो । तो तो अपावो साधकां ॥ ६५३ ॥
एवं मूढतेचे भागीं । देहाच्या अमरत्वालागीं ।
शिणोनि उपायीं अनेगीं । हठयोगी नागवले ॥ ६५४ ॥
परकायाप्रवेशार्थ जाण । शिणले साधितां प्राणधारण ।
एवं धरितां देहाभिमान । योगीजन नाडले ॥ ६५५ ॥
देहाचें नश्वरपण । जाणोनियां जे सज्ञान ।
ते न धरिती देहाभिमान् । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ ६५६ ॥
न हि तत्कुशलादृत्यं तदायासो ह्यपार्थक ।
अन्तवत्त्वाच्छरीरस्य फलस्येव वनस्पतेः ॥ ४२ ॥
विचरिता हा संसार । समूळ अवघा नश्वर ।
तेथ देहाचा अजरामर । ज्ञाते आदर न करिती ॥ ६५७ ॥
देहअजरामरविधीं । ज्ञाता सर्वथा न घाली बुद्धी ।
देहीं साधिल्या ज्या सिद्धी । त्याही त्रिशुद्धी बाधिका ॥ ६५८ ॥
देह तापल्या ज्वरादि तापें । तदर्थ मरणभयें कांपे ।
तेथ शीतळ आणिल्याही साक्षेपें । तेणेंही रूपें मरणचि ॥ ६५९ ॥
मिथ्या देहींचा देहाभिमान । सदा भोगवी जन्ममरण ।
तो अजरामर करितां जाण । देहबंधन दृढ झालें ॥ ६६० ॥
साधोनियां योगसाधन । दृढ केलें देहबंधन ।
देहींच्या सिद्धी भोगितां जाण । अधःपतन चुकेना ॥ ६६१ ॥
हो कां ज्ञानार्थ योग साधितां । प्रसंगें सिद्धी आलिया हाता ।
त्याही त्यागाव्या तत्त्वतां । निजस्वार्थालागूनि ॥ ६६२ ॥
ज्याची चाल रायापाशीं । लांच हाता ये तयासी ।
तेणेंचि पावे अपमानासी । तेवीं साधकासी घातका सिद्धि ॥ ६६३ ॥
वृक्षासी मोडूनि आलिया फळें । त्या फळासी वृक्ष नातळे ।
तेवीं आलिया सिद्धीचे सोहळे । वैराग्यबळें त्यागावे ॥ ६६४ ॥
कोरडेनि वैराग्यबळें । त्याग कीजे तो आडखळे ।
त्याग विवेकवैराग्यमेळें । तैं सिद्धीचे सोहळे तृणप्राय ॥ ६६५ ॥
आंधळें हातिरूं मातले । पतन न देखे आपुले ।
तेवीं अविवेकें त्याग केले । ते ते गेले अधःपाता ॥ ६६६ ॥
मूळीं देहचि नश्वर एथ । तेथींच्या सिद्धी काय शाश्वत ।
ऐसे विवेकवैराग्ययुक्त । होती अलिप्त देहभोगा ॥ ६६७ ॥
एथ देह तितुका अनित्य । आत्मा एक नित्य सत्य ।
हें जाणोनि विवेकयुक्त । जडले निश्चित आत्माभ्यासीं ॥ ६६८ ॥
योगं निषेवतो नित्यं कायश्चेत्कल्पतामियात् ।
तच्छ्द्दध्यान्न मतिमान्योगम्रुत्सृज्य मत्परः ॥ ४३ ॥
योग साधितां परमार्थ । सिद्धी वश्य झालिया हाता ।
त्या त्यागाव्या तत्त्वतां । निजहितार्था लागूनी ॥ ६६९ ॥
सिद्धी त्यागितां न वचती । भोगबळें गळां पडती ।
तरी ते सांडूनि योगस्थिती । माझे भजनपंथीं लागावें ॥ ६७० ॥
माझिये भक्तीच्या निजमार्गीं । रिगमु नाहीं विघ्नांलागीं ।
मी भक्तांच्या प्रेमभागीं । रंगलों रंगीं श्रीरंग ॥ ६७१ ॥
सद्भावें करितां माझी भक्ती । भक्तांसी नव्हे विघ्नप्राप्ती ।
भक्त-सबाह्य मी श्रीपती । अहोरातीं संरक्षीं ॥ ६७२ ॥
करितां भगवद्भजन । भक्तांसी बाधीना विघ्न ।
ते भक्तीचें महिमान । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ६७३ ॥
योगचर्यामिमां योगी विचरन् मदपाश्रयः ।
नान्तरायैर्विहन्येत निस्पृहः स्वसुखानुभूः ॥ ४४ ॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
एकादशस्कन्धे अष्टाविंशोऽध्यायः ॥ २८ ॥
अनन्यप्रीतीं मज शरण । सर्वभूतीं मद्भावन ।
अभेदबुद्धीं माझें भजन । त्यासी सर्वथा विघ्न बाधीना ॥ ६७४ ॥
माझ्या भक्ताचे उपसर्ग । सकळ निर्दळीं मी श्रीरंग ।
ज्यासी अनन्य भजनयोग । त्यासी माझें निजांग वस्तीसी ॥ ६७५ ॥
जेथ विघ्न धांवे भक्तांकडे । तेथ तत्काळ माझी उडी पडे ।
निवारीं निजभक्तांचें सांकडे । तीं लळिवाडें पैं माझीं ॥ ६७६ ॥
तीं लळीवाडें म्हणशी कैसीं । त्यांचे सांकडें मी सदा सोशीं ।
राजा दंडितां प्रल्हादासी । म्यां सर्वथा त्यासी रक्षिलें ॥ ६७७ ॥
संकट मांडिलें अंबरीषासी । तैं म्यां अपामानिलें दुर्वासासीं ।
दाही गर्भवास मी स्वयें सोशीं । उणें भक्तांसी येऊं नेदीं ॥ ६७८ ॥
बाधा होतां गजेंद्रासी । म्यां हातीं वसवूनि सुदर्शनासी ।
उडी घालूनि त्यापाशीं । निमिषार्धेंसीं सोडविला ॥ ६७९ ॥
द्रौपदीचिये अतिसांकडीं । सभेसी करितां ते उघडी ।
म्यां निजांगें घालूनि उडी । वस्त्रांच्या कोडी पुरविल्या ॥ ६८० ॥
द्रौपदीचिया हातीं देतां वस्त्रघडी । नेसतां दिसेल ते उघडी ।
यालागीं मी लवडसवडीं । नेसलीं लुगडीं स्वयें झालों ॥ ६८१ ॥
दावाग्नीं पीडितां गोपाळ । निजमुखीं म्यां गिळिली ज्वाळ ।
एथवरी भक्तांची कळवळ । मज सर्वकाळ उद्धवा ॥ ६८२ ॥
द्रौण्यस्त्राचे बाधेहातीं । म्यां गर्भीं रक्षिला परीक्षिती ।
गोकुळ पीडितां सुरपती । म्यां धरिला हातीं गोवर्धन ॥ ६८३ ॥
वांचवावया अर्जुनासी । दिवसा लपविलें सूर्यासी ।
हार पतकरूनि रणभूमीसी । सत्य भीष्मासी म्यां केलें ॥ ६८४ ॥
ऐसा मी भक्तसहाकारी । नित्य असतां शिरावरी ।
भक्तांसी विघ्न कोण करी । मी श्रीहरि रक्षिता ॥ ६८५ ॥
जे अनुसरले मद्भक्तीसी । मी विघ्न लागों नेदें त्या भक्तांसी ।
निजांग अर्पोनियां त्यांसी । निजीं निजसुखेंसीं नांदवीं ॥ ६८६ ॥
भावें करितां माझी भक्ती । साधकां स्वसुखाची प्राप्ती ।
तेथें इच्छेंसीं कामलोभ जाती । माझी सुखस्थिति मद्भक्तां ॥ ६८७ ॥
म्हणसी भक्तांसी देहांतीं । होईल निजसुखाची प्राप्ती ।
तैशी नव्हे चौथी भक्ती । देहीं वर्तती स्थिति सुखरूप ॥ ६८८ ॥
देह राहो अथवा जावो । परी सुखासी नाहीं अभावो ।
यापरी मद्भक्त पहा हो । सुखें सुखनिर्वाहो भोगिती ॥ ६८९ ॥
भक्त वर्ततां दिसती देहीं । परी ते वर्तती ठायीं ।
मी अवघाचि त्यांच्या हृदयीं । सर्वदा पाहीं नांदत ॥ ६९० ॥
भक्त निजबोधें मजभीतरी । मी निजांगें त्यां आंतबाहेरी ।
एवं निजसुखाच्या माजघरीं । परस्परीं नांदत ॥ ६९१ ॥
मी देव तो एक भक्त । हेही बाहेरसवडी मात ।
विचारितां आंतुवटा अर्थ । मी आणि भक्त एकचि ॥ ६९२ ॥
तूप थिजलें विघुरलें देख । तेवीं मी आणि भक्त दोनी एक ।
मज भक्तासी वेगळिक । कल्पांतीं देख असेना ॥ ६९३ ॥
मी तो एकचि एथें । हेंही म्हणावया नाहीं म्हणतें ।
यापरी मिळोनि मातें । भक्त निजसुखातें पावले ॥ ६९४ ॥
तो हा ब्रह्मज्ञानाचा कळसु । अध्याय जाण अठ्ठाविसु ।
बाप विंदानी हृषीकेशु । तेणें देउळासी कळसु मेळविला ॥ ६९५ ॥
जेवीं अळंकारी मुकुटमणी । तेवीं अठ्ठाविस ब्रह्मज्ञानीं ।
श्रीकृष्ण भक्तांची निजजननी । तो उद्धवालागोनी शृंगारी ॥ ६९६ ॥
माता उत्तम अलंकारकोडीं । अपत्य शृंगारी अतिआवडीं ।
तेवीं उत्तमोत्तम ज्ञाननिरवडी । उद्धव कडोविकडीं शृंगारिला ॥ ६९७ ॥
मातेसी आवडे निपटणें । तेवीं उद्धव वृद्धपणींचें तानें ।
श्रीकृष्ण त्याकारणें । गुह्यज्ञानें शृंगारी ॥ ६९८ ॥
माता बाळकातें शृंगारी । तें लेणें मागुतें उतरी ।
उद्धव शृंगारिला श्रीहरी । तें अंगाबाहेरी निघेना ॥ ६९९ ॥
अंगीं लेणें जडलें अलोलिक । तेणें उद्धव झाला अमोलिक ।
पायां लागती तिनी लोक । ब्रह्मादिक पूजिती ॥ ७०० ॥