मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
एकनाथी भागवत अध्याय २७ ओव्या ५०१ ते ६००
न लगे जन्म कर्म मरण । त्यासी विकारी करी कोण ।
वस्तु अविकारी परिपूर्ण । यापरी जाण उद्धवा ॥ ५०१ ॥
निबिड दाटल्या अज्ञान । आत्मा नाहीं न करवे जाण ।
प्रखर झालियाही ज्ञान । आत्मा नवा जाण नुपजवे ॥ ५०२ ॥
ज्ञानाज्ञानीं अलिप्त । आत्मा निर्विकार नित्य ।
येचि अर्थीं सदृष्टांत । असे सांगत श्रीकृष्ण ॥ ५०३ ॥
यथा हि भानोरुदयो नृचक्षुषां
तमो निहन्यान्न तु सद्विधत्ते ।
एवं समीक्षा निपुणा सती मे
हन्यात्तमिस्रं पुरुषस्य बुद्धेः ॥ ३४ ॥
डोळां नांदते दृष्टीसी । तम अवरोधी तियेसी ।
सूर्य उगवूनि तमातें निरसी । परी नवे दृष्टीसी नुपजवी ॥ ५०४ ॥
तेवीं अविद्या क्षोभूनि सबळ । आत्मा नाहीं न करवेच केवळ ।
पुरुषबुद्धीस आणोनि पडळ । मिथ्या द्वैतजाळ दाखवी ॥ ५०५ ॥
तेथ पावल्या शुद्ध ज्ञानासी । अविद्या मळ मात्र निरसी ।
परी नवें उपजवावया आत्म्यासी । सामर्थ्य ज्ञानासी असेना ॥ ५०६ ॥
आत्मा निजप्रकाशेंसीं । ज्ञानाज्ञानातें प्रकाशी ।
तें ज्ञानाज्ञान परमात्म्यासी । कदाकाळेंसीं स्पर्शेना ॥ ५०७ ॥
ज्ञानाज्ञानविकार । अविद्यांतःपाती साचार ।
आत्मा अविद्येहूनि पर । नित्य निर्विकार या हेतू ॥ ५०८ ॥
रात्री नाहीं सूर्यासी । मा दिवसु काय आहे त्यासी ।
तेवीं ज्ञानाज्ञान आत्म्यासी । कदाकाळेंसी स्पर्शेना ॥ ५०९ ॥
आत्मा निर्विकार स्वयंज्योती । अलिप्त ज्ञानाज्ञानस्थिति ।
त्या स्वरूपाची सहज प्राप्ती । उद्धवाप्रती हरी सांगे ॥ ५१० ॥
एष स्वयंज्योतिरजोऽप्रमेयो
महानुभूतिः सकलानुभूतिः ।
एकोऽद्वितीयो वचसां विरामे
येनेषिता वागसवश्चरन्ति ॥ ३५ ॥
‘एष स्वयंज्योति’ चें व्याख्यान । परमात्मा स्वप्रकाशघन ।
साधक तद्रूप आपण । अभिन्नत्वें जाण सर्वदा ॥ ५११ ॥
आत्मा परिपूर्ण निजपूर्णता । त्यासी वेगळीं कैंचीं मातापिता ।
यालागीं आत्म्यासी जन्मकथा । जाण सर्वथा असेना ॥ ५१२ ॥
त्रिगुणांचे त्रिविध मळ । हे मिथ्या मायिक समूळ ।
आत्म्यासी न लागती अळुमाळ । यालागीं ‘निर्मळ’ निजात्मा ॥ ५१३ ॥
‘अप्रमेय’ म्हणिपे तें ऐका । ऐसा तैसा इतुका तितुका ।
पैल तो अमका । प्रमाण देखा कदा नव्हे ॥ ५१४ ॥
काळा गोरा सांवळा । निळा धवळा पिंवळा ।
एथ तेथ दूरी जवळा । या प्रमाणांवेगळा परमात्मा ॥ ५१५ ॥
‘महानुभूति’ पदव्याख्यान । आत्मा अखंडदंडायमान ।
निजीं निजरूपें समसमान । स्वानंदघन सर्वदा ॥ ५१६ ॥
तेथ देश काळ वर्तमान । ध्येय ध्याता अथवा ध्यान ।
ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान । हेंही जाण असेना ॥ ५१७ ॥
नाम-रूप-जात-गोत । क्रियाकार्मासी अलिप्त ।
जन्ममरण कैंचें तेथ । वस्तु सदोदित स्वानंदें ॥ ५१८ ॥
तेथ वृद्धी आणि ऱ्हास । आदिमध्यान्तविलास ।
परिपाकादि विन्यास । यांचाही प्रवेश असेना ॥ ५१९ ॥
म्हणशी पूर्वोक्त धर्मस्थिती । तेथ न रिघे कैशा रीतीं ।
‘सकळानुभूति’ या पदोक्तीं । वस्तु सर्वार्थीं अलिप्त ॥ ५२० ॥
या रीतीं धर्म आणि अधर्म । सकळ भूतांचें क्रियाकर्म ।
प्रकाशक मी आत्माराम । यासी अलिप्त परम परमात्मा ॥ ५२१ ॥
गंगाजळा आणि मद्यासी । आकाश व्याप्त असोनि त्यांसी ।
परी तें अलिप्त दोंहीसीं । तेवीं ज्ञानाज्ञानासी परमात्मा ॥ ५२२ ॥
जेथ ज्ञानाज्ञानाचा अभावो । तेथ कर्माकर्मा कैंचा ठावो ।
‘सकळानुभूति’ या नांव पहा हो । अभेदान्वयो स्वानंदें ॥ ५२३ ॥
ऐसा परमात्मा परमानंद । सजातीय-विजातीय-स्वगतभेद ।
नसोनियां वस्तु शुद्ध । जाण प्रसिद्ध निजबोधें ॥ ५२४ ॥
‘विजातीय भेद’ मी देह म्हणणें । ‘सजातीय भेद’ मी जीवपणें ।
‘स्वगत भेद’ मी ब्रह्म स्फुरणें । हे तिनी नेणें परमात्मा ॥ ५२५ ॥
तेथ ऊणखूण लक्ष्यलक्षण । युक्तिप्रयुक्ती प्रमाण ।
हेंही सर्वथा न रिघे जाण । ब्रह्म परिपूर्ण एकाकी ॥ ५२६ ॥
ऐसें एकाकी परब्रह्म । निजगुह्याचें गुह्य उत्तम ।
हें जाणे तो सभाग्य परम । त्यासी भवभ्रम न बाधी ॥ ५२७ ॥
तो देहीं असतांचि जाण । त्यासी न बाधी देहगुण ।
कदा न बाधी कर्माचरण । जन्ममरण बाधीना ॥ ५२८ ॥
ऐकोनि ऐशिया ज्ञानासी । तें स्वरूप स्पष्ट सांग म्हणसी ।
तरी तेथ रिगमु नाहीं वाचेसी । श्रुति शब्देंसीं परतल्या ॥ ५२९ ॥
जेथ अतिविवेकसंपन्न । बुद्धि प्रवेशेना आपण ।
सवेगपणें न पवे मन । ते वस्तु वाचेअधीन सर्वथा नव्हे ॥ ५३० ॥
खुंटली शास्त्रांची व्युत्पत्ती । दर्शनें अद्यापि विवादती ।
श्रुति परतल्या ‘नेति नेति’ । तेथ वचनोक्ती विरामु ॥ ५३१ ॥
धरोनि जाणिवेची हांव । शब्दज्ञानें घेतली धाव ।
परी वस्तूचें एकही नांव । घ्यावया जाणीव न सरेचि ॥ ५३२ ॥
एवं विचारितां साचार । परादि वाचा नव्हे उच्चार ।
यालागीं वस्तु ‘परात्पर’ । क्षराक्षराअतीत ॥ ५३३ ॥
जे सर्वावयवीं सर्वदा शून्य । शेखीं शून्यही नव्हे आपण ।
शून्यप्रकाश चिद्घन । वस्तु परिपूर्ण एकत्वें ॥ ५३४ ॥
तेथ रिघावया वचनोक्तीं । शब्दें साधिल्या नाना युक्ती ।
त्या चिदाकाशीं मावळती । जेवीं कां उगवतां गभस्ती खद्योत ॥ ५३५ ॥
खद्योत सूर्यासी खेवं देता । तैं वस्तु येती वचनाचे हाता ।
वस्तूपाशीं शब्दाच्या कथा । जाण तत्त्वतां हारपती ॥ ५३६ ॥
सूर्योदय झालिया पाहीं । खद्योत शोधितां न पडे ठायीं ।
तेवीं वस्तुप्राप्ति पाविजे जिंहीं । तैं मागमोस नाहीं शब्दांचा ॥ ५३७ ॥
हो कां आंधारिये रातीं । ज्यांची दीपें चाले क्रियास्थिती ।
तेथ झालिया सूर्योदयप्राप्ती । तेचि उपेक्षिती दीपातें ॥ ५३८ ॥
तेवीं शाब्दिका ज्ञानयुक्तीं । अनुतापें ब्रह्म विवंचिती ।
ज्यासी झाली ब्रह्मप्राप्ती । तेचि उपेक्षिती शब्दातें ॥ ५३९ ॥
जंव जंव शब्दाचा अभिमान । तंवतव दूरी ब्रह्मज्ञान ।
तेचि अर्थींचें उपलक्षण । ऐक निजखूण उद्धवा ॥ ५४० ॥
कन्या द्यावया वरासी । माता पिता बन्धु ज्योतिषी ।
मेळवूनियां सुहृदांसी । कन्या वरासी अर्पिती ॥ ५४१ ॥
तेथ भर्तारसंभोगसेजेपाशीं । जवळी मातापितासुहृदेंसीं ।
असणें हाचि अवरोध तिसी । पतिसुखासी प्रतिबंध ॥ ५४२ ॥
तेवीं योग्यता चातुर्य जाण । शब्दज्ञानें ज्ञातेपण ।
जवळी असतां ब्रह्मज्ञान । सर्वथा जाण हों न शके ॥ ५४३ ॥
जेवीं डोळां अल्प कण न समाये । तेवीं ब्रह्मीं कल्पना न साहे ।
यालागीं निर्विकल्पें पाहें । ब्रह्मज्ञान होये सुटंक ॥ ५४४ ॥
समस्त ज्ञानाचा उपरम । सकळ वचनांचा विराम ।
तैंचि पाविजे परब्रह्म । ऐसें पुरुषोत्तम बोलिला ॥ ५४५ ॥
जें नाकळे बुद्धीच्या ठायीं । जें मनासी नातुडे कंहीं ।
जें वचनासी विषयो नव्हे पाहीं । प्रमाणाचे पायीं पावलें न वचे ॥ ५४६ ॥
यापरी वस्तु न पडे ठायीं । तरी ते वस्तुचि म्हणशी नाहीं ।
ऐसें उद्धवा कल्पिसी कांहीं । ऐक ते विषयीं सांगेन ॥ ५४७ ॥
( मूळ श्लोकींचें पद ) ‘येनेषिता वागसवश्चरंति ॥’
येथें देहेंद्रियाप्राण । हे जड मूढ अचेतन ।
त्यांसी चेतवी आत्मा चिद्घन । तेंही उपलक्षण अवधारीं ॥ ५४८ ॥
आत्मप्राभा ‘दृष्टी’ प्रकाशे । परी आत्मा दृष्टीसी न स्पर्शे ।
आत्मा दृष्टीसबाह्य असे । परी दृष्टीसी न दिसे अदृश्यत्वें ॥ ५४९ ॥
आत्मसत्ता ऐकती ‘श्रवण’ । श्रवणांसी आत्मा नातळे जाण ।
श्रवणां सबाह्य असोनि पूर्ण । श्रवणविषय जाण नव्हेचि आत्मा ॥ ५५० ॥
‘वाचा’ आत्मसत्ता उठीं । आत्मा नातळे वाचिका गोठी ।
वस्तु शब्दाचे पाठीं पोटीं । तो शब्द शेवटीं नेणें वस्तु ॥ ५५१ ॥
‘मन’ आत्मसत्तें चपळ । मना सबाह्य आत्मा केवळ ।
तो मनासी नातळे अळुमाळ । मनासी अकळ निजत्मा ॥ ५५२ ॥
‘चित्त’ चेतवी चिद्धन । चित्सत्ता चित्तासी चितन ।
चित्ता सबाह्य चैतन्य पूर्ण । तरी चित्तासी चैतन्य कळेना ॥ ५५३ ॥
आत्मसंयोगें ‘अहं’ उल्हासे । अहंता आत्मा कदा न स्पर्शे ।
अहंतासबाह्य आत्मा असे । परी तो आत्मा न दिसे अहंकारें ॥ ५५४ ॥
आत्मप्रभाप्रकशविधीं । प्रकाशिली ‘विवेकबुद्धी’ ।
बुद्धी आत्मा नेणे त्रिशुद्धी । आत्मा बुद्धी-सबाह्य ॥ ५५५ ॥
आत्मप्रभा ‘प्राण’ चळे । परी प्राणासी आत्मा नातळे ।
प्राण-सबाह्य आत्ममेळें । तरी प्राणासी न कळे परमात्मा ॥ ५५६ ॥
उद्धवा तूं यापरी पाहें । जड जयाचेनि वर्तताहे ।
तो आत्मा स्वतःसिद्ध आहे । नाहीं नोहे कल्पांतीं ॥ ५५७ ॥
यापरी आत्मा स्वतःसिद्ध । भेद नांदवूनि अभेद ।
द्वंद्व प्रकाशोनि निर्द्वंद्व । हा निजात्मबोध दृढ केला ॥ ५५८ ॥
एवं आत्मा निर्द्वंद्व अद्वैतें । तो आहे नाहीं म्हणावया येथें ।
कोणी नुरेचि गा म्हणतें । आत्मा निजात्मते परिपूर्ण ॥ ५५९ ॥
आत्मा निजात्मता सदोदित । संसार तेथ आरोपित ।
येचि श्रीकृष्णनाथ । असे सांगत श्लोकार्थें ॥ ५६० ॥
एतावानात्मसम्मोहो यद्विकल्पस्तु केवले ।
आत्मन्नृते स्वमात्मानमवलम्बो न यस्य हि ॥ ३६ ॥
आत्मा केवळ नित्यमुक्त । त्रिगुण गुणांसी अतीत ।
नभाहूनि अतिअलिप्त । सदोदित पूर्णत्वें ॥ ५६१ ॥
ब्रह्म अखंडदंडायमान । सर्वदा स्वानंदघन ।
ऐसें अलिप्तीं प्रपंचभान । तो मिथ्या जाण आरोपु ॥ ५६२ ॥
आरोपासी अधिष्टान । स्वयें परमात्मा आपण ।
यालागीं प्रपंचाचें भान । तेथेंचि जाण आभासे ॥ ५६३ ॥
परमात्म्याहूनि भिन्न । प्रपंचासी नाहीं स्थान ।
यालागीं उत्पत्ति स्थिति निदान । तेथेंचि जाण आभासे ॥ ५६४ ॥
जेवीं दोराचा सर्प पाहीं । दोरावेगळा न दिसे कंहीं ।
दोर सर्प झालाचि नाहीं । तरी त्याच्या आभासे ॥ ५६५ ॥
तेवीं निर्विकल्प पूर्ण ब्रह्म । नातळे रूप नाम गुण कर्म ।
तरी त्याच्या ठायीं मनोभ्रम । प्रपंच विषम परिकल्पी ॥ ५६६ ॥
जेवीं दोरीं भासे मिथ्य सर्प । तेवीं ब्रह्मीं मिथ्या भवारोप ।
तेथ सुखदुःख भयकंप । तोही खटाटोप मायिक ॥ ५६७ ॥
एवं प्रपंचाचें मिथ्या भान । वस्तु शुद्धत्वें स्वानंदघन ।
हें निर्दुष्ट केलें निरूपण । ब्रह्म परिपूर्ण अद्वय ॥ ५६८ ॥
एवं नाना युक्ती सुनिश्चित । ब्रह्म साधिलें अबाधित ।
हें न मानिती जे पंडित । तें मत खंडित श्रीकृष्ण ॥ ५६९ ॥
यन्नामाकृतिभिर्ग्राह्यं पञ्चवर्णमबाधितम् ।
व्यर्थेनाप्यर्थवादोऽयं द्वयं पण्डितमानिनाम् ॥ ३७ ॥
वेदवेदांप्रतिपाद्य एथ । सकळ शस्त्रार्थाचें निजमथित ।
ब्रह्म अद्वय सदोदित । म्यां सुनिश्चित नेमिलें ॥ ५७० ॥
तें हें माझें निजमत । उपेक्षूनियां जे पंडित ।
ज्ञातेपणें अतिउन्मत्त । अभिमानयुक्त पांडित्यें ॥ ५७१ ॥
त्या पंडितांचें पांडित्यमत । प्रपंच प्रत्यक्ष अनुभूत ।
तो मिथ्या मानोनियां एथ । कैंचें अद्वैत काढिलें ॥ ५७२ ॥
अद्वैतासी नाहीं गांवो । जेथ तेथ जरी पाहों जावों ।
अद्वैता नाहीं नेमस्त ठावो । यालागीं पहा हो तें मिथ्या ॥ ५७३ ॥
रूप नाम गुण कर्म । पंचभूतें भौतिकें विषम ।
चतुर्वर्ण चारी आश्रम । सत्य परम मानिती ॥ ५७४ ॥
सत्य मानावयां हेंचि कारण । मनोभ्रमें भ्रमलें जाण ।
ज्ञानाभिमानें छळिले पूर्ण । आपण्या आपण विसरले ॥ ५७५ ॥
मुख्य मानिती विषयसुख । विषयार्थ पुण्य करावें चोख ।
स्वर्ग भोगावा आवश्यक । हें सत्य देख मानिती ॥ ५७६ ॥
विषय सत्य मानिती परम । हें देहाभिमानाचें निजवर्म ।
तेणें सज्ञान केले अधम । मरणजन्म भोगवी ॥ ५७७ ॥
पुढती स्वर्ग पुढती नरक । पुढती जननीजठर देख ।
यापरी पंडित लोक । केले ज्ञानमूर्ख अहंममता ॥ ५७८ ॥
त्यांचे ज्ञान तें वेदबाह्य । सर्वथा नव्हे तें ग्राह्य ।
जैसें अंत्यजाचें अन्न अग्राह्य । तैसे तें होय अतित्याज्य ॥ ५७९ ॥
ज्ञानाभिमानियाचा विचार । तें अज्ञानाचें सोलींव सार ।
तयाचा जो निजनिर्धार । तो जाण साचार महामोहो ॥ ५८० ॥
तयाचा जो निजविवेक । इंद्रावणफळाऐसा देख ।
वरी साजिरें आंत विख । तैसा परिपाक ज्ञानाभिमानियांचा ॥ ५८१ ॥
नामरूपात्मक प्रपंच । मिथ्या मायिकत्वें आहाच ।
ज्ञानाभिमानी मानूनि साच । वृथा कचकच वाढविती ॥ ५८२ ॥
प्रपंचरचनेची कुसरी । आपण जैं मानावी खरी ।
तैं देहबुद्धि वाजलीं शिरीं । दुःखदरिद्रीं निमग्न ॥ ५८३ ॥
त्यांची योग्यता पाहतां जाण । गायत्रीतुल्य वेदपठण ।
सकळ शास्त्रें जाणे पूर्ण । श्रुति पुराण इतिहास ॥ ५८४ ॥
अतिनिःसीम वक्तेपण । समयींचें समयीं स्फुरे स्फुरण ।
तेणें वाढला देहाभिमान । पंडितंमन्य अतिगर्वीं ॥ ५८५ ॥
नेणे अद्वैतसमाधान । तरी योग्यतागर्व गहन ।
निजमताचा मताभिमान । प्राणान्तें जाण सांडीना ॥ ५८६ ॥
पंडितंमन्यांचे बोलणें । अवचटें नायकावें दीनें ।
जे नागवले देहाभिमानें । त्यांचेनि सौजन्यें अधःपात ॥ ५८७ ॥
विषभक्षित्याचा पांतीकर । अत्याग्रहें झाला जो नर ।
त्यासी अप्रार्थितां मरणादर । अतिदुर्धर जीवीं वाजे ॥ ५८८ ॥
यालागीं न धरावी ते संगती । त्यांसी न करावी वदंती ।
कदा नव जावें त्यांप्रती । ते त्याज्य निश्चितीं जीवेंभावें ॥ ५८९ ॥
त्यांचे न लागावें बोलीं । त्यांचे न चालावें चालीं ।
जे ज्ञानाभिमानभुली । मुकले आपुली हितवार्ता ॥ ५९० ॥
ते नाणावे निजमंदिरा । स्वयें न वचावें त्यांच्या द्वारा ।
त्यांसी न पुसावें विचारा । जे अभिमानद्वारा नाडले ॥ ५९१ ॥
त्यांसी न ह्वावी हाटभेटी । कदा न देखावे निजदृष्टीं ।
ते त्याज्य गा उठाउठीं । जेवीं धर्मिष्ठीं परनिंदा ॥ ५९२ ॥
वेदशास्त्रांचा मथितार्थ । जो कां अद्वैत परमार्थः ।
तो ज्यांसी नावडे निजस्वार्थ । चाविरा अनर्थ त्यांपाशीं ॥ ५९३ ॥
यालागीं त्यांची संगती । साक्षेपें सांडावी निश्चितीं ।
साधकाचे योगस्थिति । अंतरायनिवृत्ती हरि सांगे ॥ ५९४ ॥
योगिनोऽपक्क योगस्य युञ्जतः काय उत्थितैः ।
उपसर्गैर्विहन्येत तत्रायं विहितो विधिः ॥ ३८ ॥
योगी प्रवर्तल्या योगभ्यासीं । योग संपूर्ण नव्हतां त्यासी ।
उपसर्ग येती छळावयासी । तेंचि हृषीकेशी सांगत ॥ ५९५ ॥
शरीरीं एखादा उठे रोग । कां खवळे विषयाची लगबग ।
अथवा सभ्रांत उपसर्ग । कां योगभंग विकल्पें ॥ ५९६ ॥
ज्ञानाभिमान सबळ उठी । तेणें गुणदोषीं बैसे दिठी ।
परापवादाची चावटी । त्याची एकांतगोष्टी निजगुज ॥ ५९७ ॥
देहीं शीतळता उभडे । कां उष्णता अत्यंत चढे ।
किंवा वायु अव्हाटीं पडे । कां क्षुधा वाढे अनिवार ॥ ५९८ ॥
विक्षेप कषाय वोढवती । परदारपरद्रव्यासक्ती ।
इत्यादि उपसर्ग येती । उपाय श्रीपति तदर्थ सांगे ॥ ५९९ ॥
योगधारणया कांश्चित्दासनैर्धारणान्वितैः ।
तपोमन्त्रौषधेः कांश्चिदुपसर्गान्विनिर्दहेत् ॥ ३९ ॥
देहीं शीतळता वाढल्या जाण । तीस निवारी अग्निधारण ।
देहीं उष्मा चढल्या पूर्ण । सोमधारण उच्छेदी ॥ ६०० ॥