मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ ओव्या ४०१ ते ५००

    ग्रासोग्रासीं हरिस्मरण । तैं अन्नचि होय परब्रह्म पूर्ण ।

    त्यासी नाहीं बाधकपण । ब्रह्मार्पण सहजेंचि ॥ ४०१ ॥
    भक्तांची भजनस्थिती । विषयीं मद्‌रूपता भाविती ।
    तेणें मावळे विषयस्फूर्ती । नव्हे ती या रीतीं बाधक ॥ ४०२ ॥
    यापरी माझें भजन । करी मनोमळक्षाळण ।
    विकारेंसी तिन्ही गुण । करी निर्दळण देहाभिमान ॥ ४०३ ॥
    ऐशी न करितां माझी भक्ती । न निर्दळितां अहंकृती ।
    करणें जे विषयासक्ती । ते जाण निश्चितीं बाधक ॥ ४०४ ॥
    नातुडतां अकर्तात्मबोध । आदरूं नये विषयसंबंध ।
    विषयाचा विषय‍उद्बोध । अति अशुद्ध बाधक ॥ ४०५ ॥
    जरी विषय मिथ्या मायिक । तरी साधकां अतिबाधक ।
    येचि अर्थीं यदुनायक । विशदार्थें देख सांगत ॥ ४०६ ॥

    यथाऽऽमयोऽसाधुचिकित्सितो नृणां
    पुनः पुनः सन्तुदति प्ररोहान् ।
    एवं मनोऽपक्व कषायकर्म
    कुयोगिनं विध्यति सर्वसङ्गम् ॥ २८ ॥

    वैद्य नेणे रोगाचें लक्षण । नेणे धातुपुष्ट कीं क्षीण ।
    नेणे पथ्य ना अनुपान । नाडीज्ञान कळेना ॥ ४०७ ॥
    त्यापासाव वोखद घेतां । पुनः पुनः वाढे व्यथा ।
    तेवीं अवैराग्यें त्याग करितां । साधकां बाधकता अनिवार ॥ ४०८ ॥
    हृदयीं नाहीं विषयनिवृत्ति । बाह्य त्यागें वाढवी विरक्ती ।
    ऐशी जे बहिर्मुद्रास्थिती । ते जाण निश्चितीं ‘कुयोग’ ॥ ४०९ ॥
    सांडोनियां भगवद्भजन । वेदविधि मार्गविहीन ।
    ऐसें जें कां त्यागलक्षण । ‘कुयोग’ संपूर्ण त्या नांव ॥ ४१० ॥
    द्रव्यदाराविषयासक्ती । दृढ वासना असतां चित्तीं ।
    बाह्य त्याग मिथ्या विरक्ती । ‘कुयोग’ निश्चितीं या नांव ॥ ४११ ॥
    आम्ही राजयोगी अतिश्रेष्ठ । म्हणोनि विषय भोगी यथेष्ट ।
    वोस पडली वैराग्यपेंठ । ‘कुयोग’ चोखट या नांव ॥ ४१२ ॥
    आपली चोरूनि विषयासक्ती । बाह्य मिरवी मिथ्या विरक्ती ।
    हेचि ‘कुयोगाची’ स्थिती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ४१३ ॥
    ऐशिया कुयोगियां जाण । पुढतीं जन्म पुढतीं मरण ।
    दुःखावर्तीं पडिले पूर्ण । सोडवी कोण तयांसी ॥ ४१४ ॥
    नव्हेचि इहलोकींचा विषयभोग । नव्हेचि परमार्थीं शुद्ध त्याग ।
    अंतरला उभय प्रयोग । दुःखभाग कुयोग्या ॥ ४१५ ॥
    परमार्थें त्यागसाधन । करितां अंतराय आलें विघ्न ।
    तयासी अवगती नव्हे जाण । जरी अनुताप पूर्ण स्वयें उपजे ॥ ४१६ ॥

    कुयोगिनो ये विहितान्तरायैः
    मनुष्यभूतैस्त्रिदशोपसृष्टैः ।
    ते प्राक्तनाभ्यासबलेन भूयो
    युञ्जन्ति योगं न तु कर्मतन्त्रम् ॥ २९ ॥

    ब्रह्मज्ञानार्थ केला त्याग । अभ्यासही मांडिला साङ्ग ।
    मध्येंचि वोढवला उपसर्ग । विघ्नें अनेग साधकां ॥ ४१७ ॥
    उपजे कामाचा अतिवेग । खवळे क्रोधाची लगबग ।
    शिष्यसुहदांचे उद्वेग । मनीं उबग स्वहिताचा ॥ ४१८ ॥
    दारारूपें उपसर्ग । देव देती पैं अनेग ।
    ऐसा अंतरायीं योगभंग । होतां अनुराग उद्धरी ॥ ४१९ ॥
    अभ्यास करितां अतिनिगुती । दैवें अंतराय योगा येती ।
    तेथ निर्वेद उपजल्या चित्तीं । तोचि अभ्यास पुढतीं करी योगी ॥ ४२० ॥
    निजयोग अभ्यासबळें । जाळी अंतरायदोष समूळें ।
    परी कर्माचीं कर्मठ जाळें । योगी कदाकाळें स्पर्शेना ॥ ४२१ ॥
    अंतरायीं योग छळितां जाण । जरी योगी पावला मरण ।
    तरी तो नव्हे कर्माधीन । हें श्लोकार्धें श्रीकृष्ण बोलिला स्वयें ॥ ४२२ ॥
    पूर्वीं करितां योगसाधन । अदृष्टगतीं अंतराय जाण ।
    योगी पावल्याही मरण । गती कोण तयासी ॥ ४२३ ॥
    अंतरायपरतंत्र । झाल्या योगी पावे जन्ममात्र ।
    तेथही नादरी कर्मतंत्र । पूर्वाभ्यासें स्वतंत्र प्रवर्ते योगी ॥ ४२४ ॥
    मार्गस्था मार्गी गुंती । पडोनियां लागली वस्ती ।
    तो येरे दिवसीं तेचि पंथीं । लागे निश्चितीं निजमार्गा ॥ ४२५ ॥
    यापरी योगिया आपण । प्राक्तनसंस्कारें जाण ।
    योगाभ्यास करी पूर्ण । परी कर्माधीन कदा नव्हे ॥ ४२६ ॥
    साधनीं असतां माझी भक्ती । तैं अणुमात्र न पडे गुंती ।
    मी भक्तकैवारी श्रीपती । राखें अहोरातीं निजभक्ता ॥ ४२७ ॥
    जेथ माझे भक्तीची आवडी । तेथ विघ्नें केवीं रिघतीं बापुडीं ।
    महाविघ्नांचिया कोडी । माझें नाम विभांडी उद्धवा ॥ ४२८ ॥
    भजनहीन योगीश्वर । अंतरायें पावे जन्मांतर ।
    तरी तो कर्मीं कर्मपर । नव्हे साचार पूर्वसंस्कारें ॥ ४२९ ॥
    ‘जे पावले जीव जीवन्मुक्ती । तेही प्रारब्धकर्में वर्तती ।
    मा योगभ्रष्ट कर्म त्यागिती । घडे कैशा रीतीं’ म्हणशील ॥ ४३० ॥
    मुक्ताचें जें मोक्षस्थान । तेंचि साधकाचें मुख्य साधन ।
    यालागीं त्या दोघांही जाण । कर्मबंधन बाधीना ॥ ४३१ ॥
    मी एक कर्मकर्ता । ऐशी ज्यास नुपजे अहंता ।
    त्यासीही जाण सर्वथा । कर्मबंधकता स्पर्शेना ॥ ४३२ ॥

    करोति कर्म क्रियते च जन्तुः
    केनाप्यसौ चोदित आनिपातात् ।
    न तत्र विद्वान् प्रकृतौ स्थितोऽपि
    निवृत्ततृष्णः स्वसुखानुभूत्या ॥ ३० ॥

    जन्मापासूनि मरणान्त । प्राणी जें जें कर्म करित ।
    तें तें कोणी एक प्राचीन एथ । असे वर्तवीत निजसत्ता ॥ ४३३ ॥
    तेथ सज्ञान आणि अज्ञान । प्राचीन कर्में कर्माधीन ।
    अज्ञानासी अहंकर्तेपण । ज्ञाते निरभिमान वर्तती कर्मीं ॥ ४३४ ॥
    म्हणसी देहीं असतां प्राण । केवीं नुठी देहाभिमान ।
    ज्ञाता स्वसुखानुभवें पूर्ण । अहंकर्तेपण त्या स्फुरेना ॥ ४३५ ॥
    दोराचे सर्पाचा महाधाक । दोर जाणितल्या नुपजे देख ।
    तेवीं अनुभविल्या ब्रह्मसुख । अहंता बाधक स्फुरेना ॥ ४३६ ॥
    ऐक योगभ्रष्टाचें लक्षण । त्याचा प्राचीनसंस्कार जाण ।
    उपजों नेदी देहाभिमान । योग संपूर्ण सिद्ध्यर्थ ॥ ४३७ ॥
    जें देहीं नित्य निरभिमान । तेचि ब्रह्मसुखें सदा संपन्न ।
    त्यांसी देहींचें कर्माचरण । सर्वथा जाण बाधीना ॥ ४३८ ॥
    ज्ञाता देहकर्मासी अलिप्त । हेंही अपूर्व नव्हे एथ ।
    तो देही असोनि देहातीत । तेंचि श्रीकृष्णनाथ स्वयें सांगे ॥ ४३९ ॥

    तिष्ठन्तमासीनमुत व्रजन्तं
    शयानमुक्षन्तमदन्तमन्नम् ।
    स्वभावमन्यत् किमपीहमानं
    आत्मानमात्मस्थमतिर्न वेद ॥ ३१ ॥

    देह उभें असतां जाण । ज्ञाता न देखे उभेंपण ।
    मा बैसल्या बैसलेंपण । मानी कोण देहाचें ॥ ४४० ॥
    परिपूर्ण ब्रह्माच्या ठायीं । उठणें बैसणें दोनी नाहीं ।
    ज्ञाता तेंचि झाला पाहीं । उठबैस कांही जाणेना ॥ ४४१ ॥
    दोराचा सर्प उपजला । भोग भोगूनि स्वयें निमाला ।
    सत्यत्व नाहीं या बोला । तैसा देहो झाला मुक्तासी ॥ ४४२ ॥
    देह दैवें असे एकदेशी । ज्ञाता सर्वीं देखे आपणासी ।
    देह जातां परदेशासी । ज्ञाता गमन मानसीं देखेना ॥ ४४३ ॥
    वस्तु वस्तुत्वें परिपूर्णपणें । तेथ कैंचें असे येणेंजाणें ।
    ज्ञाता सदा तद्‌रूपपणें । राहणेंजाणें स्पर्शेना ॥ ४४४ ॥
    ज्ञाता स्वयें रिघे शयनीं । परी शेजबाज न देखे अवनीं ।
    मी निजेलों हेंही न मनी । निजीं निजरूपपणीं सर्वदा ॥ ४४५ ॥
    ज्ञाता जेवूं बैसे निजसुखें । परी मी भुकेलों हें न देखे ।
    रसने नेणतां सर्व रस चाखे । जेवी येणें सुखें निजगोडीं ॥ ४४६ ॥
    दिसे यावत्तृम जेविला । परी तो धाला ना भुकेला ।
    तो उच्छिष्टही नाहीं झाला । शेखीं आंचवला संसारा ॥ ४४७ ॥
    जरी तो स्वभावें सांगें गोष्टी । तरी अबोलणें घाली शब्दपोटीं ।
    बोलीं अतिरसाळ गोडी उठी । तरी न सुटे मिठी मौनाची ॥ ४४८ ॥
    मी एक चतुर बोलका । हाही नुठी त्या आवांका ।
    बोल बोलों नेणे फिका । बोलोनि नेटका अबोलणा ॥ ४४९ ॥
    ज्ञाता पाहे निजात्मसुखें । माझें तुझें हेंही वोळखे ।
    परी तो डोळांचि न देखे । देखे तें आपण्यासारिखें त्रैलोक्य ॥ ४५० ॥
    तो जों दृश्य पाहों बैसे । तों दृश्याचा ठावोचि पुसे ।
    जें देखे तें आपण्याऐसें । निजात्मसौरसें जग देखे ॥ ४५१ ॥
    करूनि डोळ्यांचा अंत । ज्ञाता देखणेपणें पाहत ।
    त्या देखण्याचा निजस्वार्थ । न चढे हात वेदशास्त्रां ॥ ४५२ ॥
    जाणे शब्दींचें शब्दज्ञान । मी श्रोता हे नुठी आठवण ।
    उपेक्षूनियां देहींचे कान । करी श्रवण सर्वांगें ॥ ४५३ ॥
    यापरी स्वयें सज्ञान । हो‍ऊनियां सावधान ।
    सोलूनियां शब्दज्ञान । करी श्रवण स्वभावें ॥ ४५४ ॥
    जाणे सुवास दुर्वास । भोगीं न धरी नाकाची आस ।
    सुमना सबाह्य जो सुवास । तो भोगी सावकाश सर्वदा ॥ ४५५ ॥
    मृदुकठिणादि स्पर्श जाणे । परी मी जाणतों हें स्फुरों नेणे ।
    अंगा लागे तें निजांग करणें । हा स्पर्श भोगणें सज्ञानीं ॥ ४५६ ॥
    ज्ञाता चालता दिसे चरणीं । परी तो चालतां स्वयें अचरणी ।
    स्वेच्छा हिंडतांही अवनीं । तो ठायाहूनि ठळेना ॥ ४५७ ॥
    हस्तव्यापारीं देतां दान । मी दाता ही नुठी आठवण ।
    देतेंघेतें दान होय आपण । यापरी सज्ञान वर्तवी करा ॥ ४५८ ॥
    कायिक वाचिक मानसिक । कर्म निफजतां स्वाभाविक ।
    ज्ञाता ब्रह्मरूपें निर्दोख । देहासी देख स्पर्शेना ॥ ४५९ ॥
    अकर्तात्मनिजसत्ता । ज्ञाता सर्व कर्मीं वर्ततां ।
    न देखे कर्म-क्रिया-कर्तव्यता । निजीं निजात्मता निजबोधें ॥ ४६० ॥
    ज्ञाता नित्य निजात्मसुखें । देहीं असोनि देह न देखे ।
    तो देहकर्मीं केवीं आडके । पूर्ण परमात्मसुखें संतुष्ट ॥ ४६१ ॥
    जगासी लागलें कर्मबंधन । तेथें खातां जेवितां सज्ञान ।
    केवीं न पवे कर्मबंधन । तेंचि निरूपण हरि सांगें ॥ ४६२ ॥

    यदि स्म पश्यत्यसदिन्द्रियार्थं
    नानानुमानेन विरुद्धमन्यत् ।
    न मन्यते वस्तुतया मनीषी
    स्वाप्नं यथोत्थाय तिरोदधानम् ॥ ३२ ॥

    हो कां लौकिकाचे परी । ज्ञाता वर्ते लोकाचारीं ।
    तोही प्रपंचामाझारीं । कर्में करी लौकिकें ॥ ४६३ ॥
    परी कार्य-कर्म-कर्तव्यता । हे ज्ञात्यासी नाहीं अहंता ।
    तेणें प्रपंचामाजीं निजात्मता । निश्चयें तत्त्वतां वश्य केली ॥ ४६४ ॥
    विषयादि प्रपंचभान । सत्य मानिती अज्ञान ।
    तो प्रपंच देखती सज्ञान । ब्रह्मपूर्ण पूर्णत्वें ॥ ४६५ ॥
    साकरेचा इंद्रावणघडू । जाणा गोड नेणा कडू ।
    तैसा प्रपंचाचा पडिपाडू । लाभ आणि नाडू ज्ञानाज्ञानें ॥ ४६६ ॥
    सुवर्णाची खोटी । मूर्ख मानिती केवळ गोटी ।
    ज्ञाते घालूनियं मिठी । घेती ज्ञानदृष्टीं बहुमोलें ॥ ४६७ ॥
    तेवीं सांसारिक क्रियाकर्म । मूर्खा मूर्खपणें भासे विषम ।
    तेंचि ज्ञात्यासी परब्रह्म । स्वानंदें आराम सर्वदा ॥ ४६८ ॥
    प्रपंच खाणोनि सांडावा । मग ब्रह्मभाव मांडावा ।
    हेंही न लगे त्या सदैव । उखिताचि आघवा परब्रह्म ॥ ४६९ ।
    मिथ्या दोराचा सर्पाकार । तेथ मिळोनि अज्ञान नर ।
    नाना अनुमानीं भयंकर । सत्य साचार मानिती ॥ ४७० ॥
    तेवीं मिथ्या प्रपंचाचें भान । बाधक मानिती अज्ञान ।
    तेंचि स्वानुभवें सज्ञान । जाणती पूर्ण परब्रह्म ॥ ४७१ ॥
    जेवीं स्वप्न साच निद्रिताप्रती । तेवीं प्रपंच साच निज भ्रांती ।
    तोचि निजात्मजागृताप्रती । मिथ्या निश्चितीं निजबोधें ॥ ४७२ ॥
    मिथ्या प्रपंचाचें भान । जाणोनि झाले जे सज्ञान ।
    त्यांसी सर्व कर्मीं वर्ततां जाण । देहाभिमान कदा नुपजे ॥ ४७३ ॥
    साधकांचा साधावया स्वार्थ । पूर्वी सर्वस्वरूपें भगवंत ।
    बोलिला तेणें विकारवंत । झाला निश्चित म्हणशील ॥ ४७४ ॥
    वस्तु नव्हे विकारवंत । ते निजसाम्यें सदोदित ।
    तेचि अर्थीं श्रीकृष्णनाथ । असे सांगत निजबोधें ॥ ४७५ ॥

    पूर्वं गृहीतं गुणकर्मचित्रं
    अज्ञानमात्मन्यविविक्तमङ्ग ।
    निवर्तते तत्पुनरीक्षयैव
    न गृह्यते नापि विसृज्य आत्मा ॥ ३३ ॥

    संसार तो पूर्वदशे । अति अतर्क्य मायावशें ।
    शुद्ध वस्तु बहुधा भासे । गुणकर्मविन्यासें बहुरूप ॥ ४७६ ॥
    नाम रूप व्यक्ति वर्ण । कुळ गोत्र क्रियाचरण ।
    यापरी प्रपंच भिन्न । सत्य अज्ञान मानिती ॥ ४७७ ॥
    प्रपंच वस्तूच्या ठायीं अध्यस्त । यालागीं वस्तु तद्‌रूप भासत ।
    स्फटिक नानारंगीं अलिप्त । परी संबंधे भासत तद्‌रूप ॥ ४७८ ॥
    जग पाहतां यापरी । भिन्न भासे अज्ञानेंकरीं ।
    तेणें आत्मा म्हणती विकारी । नर अविचारी अज्ञानें ॥ ४७९ ॥
    त्या अज्ञानाची होय निवृत्ती । तैं साधकां माझी सुलभ प्राप्ती ।
    यालागीं माझी निजभक्ती । म्यां यथानिगुतीं प्रकाशिली ॥ ४८० ॥
    साधकांचा निजस्वार्थ । जेणें शीघ्र होय हस्तगत ।
    यालागीं सर्वभूतीं भगवंत । हा म्यां निजगुह्यार्थ प्रबोधिला ॥ ४८१ ॥
    हें धरोनियां अनुसंधान । भावें करितां माझें भजन ।
    तेथ मावळॆ मीतूंपण । अविद्येसीं अज्ञान समूळ मिथ्या ॥ ४८२ ॥
    तेथ दृश्य-द्रष्टा-दर्शन । त्रिगुणेंसीं कार्यकारण ।
    नुरेचि प्रपंचाचें भान । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ४८३ ॥
    तेथ नाम रूप गुण जाती । नाहीं महाभूतें भूतव्यक्ती ।
    चैतन्य पूर्ण सहजस्थिती । ब्रह्मीं ब्रह्मस्फूर्तीं असेना ॥ ४८४ ॥
    तें उंच ना ठेंगणें । मोठें ना रोड होणें ।
    उजू ना वांकुडेपणें । असों नेणे विकारी ॥ ४८५ ॥
    तेथ शीत ना उष्ण । मृदु ना कठिण ।
    कडू ना गोडपण । सुखदुःखेंवीण निर्द्वंद्व ॥ ४८६ ॥
    तेथ भेद ना अभेद । बोलतें ना निःशब्द ।
    शाहणें ना मुग्ध । देखणें ना अंध चिद्‌रूपपणें ॥ ४८७ ॥
    तें एथें ना तेथें । येतें ना जातें ।
    जवळी ना परतें । सदोदित स्वयंसिद्ध ॥ ४८८ ॥
    तें खातें ना न खातें । तें घेतें ना देतें ।
    जीतें ना मरतें । परादिपर तें परात्पर ॥ ४८९ ॥
    तें बद्ध ना मुक्त । नित्य ना अनित्य ।
    क्षोभे ना प्रसन्न होत । वस्तु सदोदित सद्‌रूपत्वें ॥ ४९० ॥
    तेथ पाप ना पुण्य । आकार ना शून्य ।
    सगुण ना निर्गुण । स्वानंदें पूर्ण सुखरूप ॥ ४९१ ॥
    सर्वभूतीं भगवद्भजन । करूनि माझे भक्तजन ।
    माझें निजरूप परिपूर्ण । स्वयें आपण हो‍ऊनि ठेले ॥ ४९२ ॥
    त्यांसी संत म्हणोनि कांहीं घेणें । अथवा असंत म्हणोनि सांडणें ।
    हें नुरेचि त्यांसी वेगळेपणें । ब्रह्मीं ब्रह्मपणें परिपूर्ण ॥ ४९३ ॥
    बद्धकाळीं बद्धता । आत्मेति घेतली नाहीं तत्त्वतां ।
    अथवा मुक्तकाळींची मुक्तता । आत्मा सर्वथा स्पर्शेना ॥ ४९४ ॥
    आत्मा अविकारी पाहीं । येणॆं निरूपणें पडे ठायीं ।
    जरी म्हणशी कळलें नाहीं । ऐक तेंही सांगेन ॥ ४९५ ॥
    आत्मा सर्वदा नित्य पाहीं । यालागीं त्यासी उत्पत्ति नाहीं ।
    ‘उत्पत्ति’ न लगे ज्याचे ठायीं । तो गर्भासी कंहीं स्पर्शेना ॥ ४९६ ॥
    गर्भजन्म ज्यासी नाहीं । त्यासी देहाचा अभाव पाहीं ।
    देहेंवीण ‘वृद्धी’ कंहीं । त्याचे ठायीं स्पर्शेना ॥ ४९७ ॥
    जो सर्वदा विदेही । कर्म न रिघे त्याच्या ठायीं ।
    कर्मेंवीण बद्धता पाहीं । आत्म्यासी कंहीं लागेना ॥ ४९८ ॥
    जो निरवयव साचार । त्यासी एकही न घडे संस्कार ।
    ज्यासी नाहीं आकार । त्यासी विकार स्पर्शेना ॥ ४९९ ॥
    जो गर्भजन्माअतीत । मरण रिघों न शके तेथ ।
    काळाचाही न लगे घात । क्षयातीत परमात्मा ॥ ५०० ॥

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...