मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
एकनाथी भागवत अध्याय २८ ओव्या ३०१ ते ४००
वेद-विवेक-अनुमान । ब्रह्मउपदेशाचें लक्षण ।
ज्ञानाज्ञानाचें फळ पूर्ण । तुज म्यां संपूर्ण सांगितलें ॥ ३०१ ॥
तेथें देहेंद्रियांचें मिथ्यापण । देहात्मभावाचें निराकरण ।
ब्रह्म अद्वयत्वें परिपूर्ण । तेंहि गुह्य ज्ञान प्रकाशिलें ॥ ३०२ ॥
म्यां प्रकाशिलें पूर्ण ज्ञान । जें दुर्लभ दुर्गम दुष्प्राप्य जाण ।
हेंचि सिद्धांचें समाधान । हेंचि साधन साधकां ॥ ३०३ ॥
जें म्यां सांगितलें ब्रह्मज्ञान । हेंचि उपदेशशस्त्र तीक्षण ।
साधक साधूनियां पूर्ण । संशय जाण छेदिती ॥ ३०४ ॥
म्यां सांगितलें ब्रह्मज्ञान । तेथ संदेह मानी मन ।
तेणें संदेहेंसीं देहाभिमान । येणें शस्त्रें जाण् छेदिती ॥ ३०५ ॥
यापरी संदेहच्छेदन । करूनि द्वैताची बोळवण ।
निर्दाळूनियां मीतूंपण । स्वानंदीं निमग्न साधक ॥ ३०६ ॥
वर्णाश्रम कुळ जाती । जीवशिवादि पदस्थिती ।
यांची स्फुरेना अहंकृती । या नांव ‘उपरति’ उद्धवा ॥ ३०७ ॥
इहमुत्रादि फळें समस्तें । कोण कामी त्या कामातें ।
विषय विषयी विषयभोगातें । सर्वथा तेथें असेना ॥ ३०८ ।
यापरी नित्य निष्काम । साधक झाले ‘आत्माराम’ ।
परमानंदीं निमग्न परम । पावले ‘उपरम’ येणें योगें ॥ ३०९ ॥
देहेंद्रियें असतां प्राण । कैसेनि गेला देहाभिमान ।
उद्धवा ऐसें कल्पील मन । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ ३१० ॥
नात्मा वपुः पार्थिवमिन्द्रियाणि
देवा ह्यसुर्वायुजलं हुताशः ।
मनोऽन्नमात्रं धिषणा च सत्त्वं
अहङ्कृतिः खं क्षितिरर्थसाम्यम् ॥ २४ ॥
देह आत्मा नव्हे पार्थिवपणें । इंद्रियें आत्मा नव्हतीं येणें गुणें ।
तीं तंव देहाचीं उपकरणें । एकदेशीपणें व्यापार ॥ ३११ ॥
इंद्रियाधिष्ठाते देव । तेही आत्मा नव्हती सर्व ।
त्यांसी इंद्रियांचा अहंभाव । आत्मपदीं ठाव त्यां कैंचा ॥ ३१२ ॥
देह चाळिता जो प्राण । तोही आत्मा नव्हे जाण ।
प्राण केवळ अज्ञान । करी गमनागमन देहवशें ॥ ३१३ ॥
प्राण जरी आत्मा होता । तरी तो देहासवें न वचता ।
यालागीं प्राणासी निजात्मता जाण सर्वथा घडेना ॥ ३१४ ॥
आत्मा पृथ्वी नव्हे जडपणें । जळ नव्हे द्रवत्वगुणें ।
अग्नि नव्हे दाहकपणें । चंचळपणें नव्हे वायु ॥ ३१५ ॥
आत्मा नभ नव्हे शून्यपणें । मन नव्हे संकल्पगुणें ।
अंतःकरण नव्हे नश्वरलक्षणें । चित्त चिंतनें नव्हे आत्मा ॥ ३१६ ॥
आत्मा नव्हे अभिमान । त्यासी सुखदुःखांचें बंधन ।
बुद्धि आत्मा नव्हे जाण । बोधकपण तीमाजीं ॥ ३१७ ॥
आत्मा नव्हे तिनी गुण । गुणांमाजीं विकार पूर्ण ।
महत्तत्व गुणांचें कारण । तें आत्मा आपण कदा नव्हे ॥ ३१८ ॥
प्रकृति जे गुणसाम्यावस्था । तेही आत्मा नव्हे तत्त्वतां ।
आत्मदृष्टीं प्रकृति पाहतां । मिथ्या तत्त्वतां ते होय ॥ ३१९ ॥
जेथ मूळप्रकृतिचा वावो । तेथ प्रकृतिकार्यां कैंचा ठावो ।
यापरी आत्मानुभवो । निःसंदेहो भोगिती ॥ ३२० ॥
यापरी साधूनियां ज्ञान । साधकीं छेदिला देहाभिमान ।
ऐसे होऊनियां निरभिमान । सदा सुखसंपन्न साधक ॥ ३२१ ॥
एवं जे नित्य निरभिमान । त्यांसी प्रारब्धें विषयसेवन ।
करितां न बाधी दोषगुण । तेंचि निरूपण हरि सांगे । ३२२ ॥
समाहितैः कः करणैर्गुणात्मभिः
गुणो भवेन्मत्सुविविक्तधाम्नः ।
विक्षिप्यमाणैरुत किं न दूषणं
घनैरुपेतैर्विगतै रवेः किम् ॥ २५ ॥
देहेंद्रियावेगळा पाहीं । अपरोक्ष आत्मा जाणितला जिंहीं ।
त्यांसी इंद्रियनेमें लाभ कायी । विक्षेपें नाहीं हानी त्यांसी ॥ ३२३ ॥
दोराचा साप खिळोनि मंत्रीं । मंत्रवादी निःशंक धरी ।
न खिळितां जो धरी करीं । त्यासीही न करी बाधा तो ॥ ३२४ ॥
जो मृगजळीं पोहोनि गेला । तो दैवाचा कडे पडिला ।
पोहेचिना तो नाहीं बुडाला । कोरडा आला ऐलतीरा ॥ ३२५ ॥
तेवीं देहेंद्रियांचें मिथ्याभान । जाणोनि झाले ते सज्ञान ।
त्यांसी इंद्रियांचें बंधन । सर्वथा जाण अनुपेगी ॥ ३२६ ॥
जयासी माझें अपरोक्ष ज्ञान । तेणें घालोनियां आसन ।
अखंड धरितां ध्यान । अधिक उपेग जाण असेना ॥ ३२७ ॥
जेवीं मी लीलाविग्रहधारी । तेवीं तेही वर्ततां शरीरीं ।
ते इंद्रियकर्मावारीं । भवसागरीं न बुडती ॥ ३२८ ॥
अथवा तो इंद्रियसंगतीं । दैवें अनेक विषयप्राप्ती ।
भोगितांही अहोरातीं । ब्रह्मस्थिति भंगेना ॥ ३२९ ॥
स्थिति न भंगावया हेंचि कारण । माझें स्वप्रकाश स्वानंदघन ।
पावले निजधाम ब्रह्म पूर्ण । तेथ विषयस्फुरण बाधीना ॥ ३३० ॥
जेवीं सूर्य उगवोनि गगनीं । लोक सोडवी निद्रेपासूनी ।
ते कर्मीं प्रवर्तवोनी । अलिप्त दिनमणि जनकर्मा ॥ ३३१ ॥
तेवीं मी परमात्मा स्वयंजोती । प्रभा प्रकाशीं त्रिजगतीं ।
त्या जनकर्मांच्या क्रियाशक्ती । मी अलिप्त निश्चितीं निजात्मा ॥ ३३२ ॥
मुक्तासी स्त्रीपुत्रगृहसंग । तेणें वेष्टला दिसे चांग ।
म्हणसी केवीं मानूं निःसंग । तें सांगे श्रीरंग रविदृष्टातें ॥ ३३ ॥
घनैरुपेतैर्विगतै रवेः किम् ॥
उंच लक्षयोजनें रविमंडळ । बारा योजनें मेघपडळ ।
तेणें सूर्य झांकोळिला केवळ । लोक सकळ मानिती ॥ ३३४ ॥
परी सूर्य आणि आभाळासी । भेटी नाहीं कल्पांतेंसीं ।
तेवीं इंद्रियकर्म सज्ञानासी । कदाकाळेंसीं स्पर्शेना ॥ ३३५ ॥
अभ्र आच्छादी जगाचे डोळे । जग म्हणे सूर्य आच्छादिला आभाळें ।
ऐसेंचि विपरीत ज्ञान कळे । मायामेळें भ्रांतासी ॥ ३३६ ॥
तें अभ्र आल्या गेल्यापाठीं । सूर्यासी न पडे आठीवेठी ।
तेवीं गृहदारासंगासाठीं । न पडे संकटीं सज्ञान ॥ ३३७ ॥
जेवीं सूर्यातें नातळे आभाळ । तेवीं ज्ञात्यासी संग सकळ ।
इंद्रियकर्मांचा विटाळ । ज्ञात्यासी अळुमाळ लागेना ॥ ३३८ ॥
ऐक त्या ज्ञात्याचें रूप परम । तो देहीं असोनि परब्रह्म ।
यालागीं त्यासी इंद्रियकर्म । समविषय बाधीना ॥ ३३९ ॥
ज्ञाता सर्वार्थीं अलिप्त । तेंचि करावया सुनिश्चित ।
आकाश दृष्टांतें श्रीकृष्णनाथ । स्वयें सांगत साक्षेपें ॥ ३४० ॥
यथा नभो वाय्वनलाम्बुभूगुणै
गतागतैर्वर्तुगुणैर्न सज्जते ॥
तथाक्षरं सत्त्वरजस्तमोमलैः
अहंमतेः संसृतिहेतुभिः परम् ॥ २६ ॥
पृथ्वी जळ अनळ अनिळ । त्यांसी नभ व्यापक सकळ ।
परी पृथ्व्यादिकांचा मळ । नभासी अळुमाळ लागेना ॥ ३४१ ॥
नभ पृथ्वीरजें कदा न मैळे । धुरकटेना धूमकल्लोळें ।
अग्नीचेनि महाज्वाळें । कदाकाळें जळेना ॥ ३४२ ॥
वायुचेनि अतिझडाडें । आकाश कदाकाळें न उडे ।
उदकाचेनि अतिचढें । आकाश न बुडे सर्वथा ॥ ३४३ ॥
कां सूर्याचे निदाघकिरणीं । नभ घामेजेना उन्हाळेनी ।
अथवा हिमाचिया हिमकणीं । नभ कांकडोनी हिंवेना ॥ ३४४ ॥
पर्जन्य वर्षतां प्रबळ । नभ वोलें नव्हे अळुमाळ ।
यापरी नभ निर्मळ । लावितांही मळ लागेना ॥ ३४५ ॥
त्या आकाशासी अलिप्त । जें क्षराक्षरही अतीत ।
तें अक्षर परब्रह्म सदोदित । त्रिगुणातीत चिन्मात्र ॥ ३४६ ॥
जें अजरामर अविनाशी । जें प्रकाशमान स्वप्रकाशीं ।
ऐसिये वस्तूची प्राप्ती ज्यासी । अद्वयत्वेंसी फावली ॥ ३४७ ॥
जेवीं न मोडितां लागवेगें । सोनटका सोनें झाला सर्वांगें ।
तेवीं करणीवीण येणें योगें । जे झाले निजांगें परब्रह्म ॥ ३४८ ॥
त्यांसी गुणांची त्रिगुण मागी । लवितांही न लगे अंगीं ।
विषयी करितां विषयभोगीं । ते विषयसंगीं निःसंग ॥ ३४९ ॥
घटी चंद्रबिंब दिसे । तें घटासी स्पर्शेलें नसे ।
ओलें नव्हें जळरसें । देहीं जीव असे अलिप्त तैसा ॥ ३५० ॥
ते घटी कालविल्या शेण । बिंबप्रतिबिंबां नातळे जाण ।
तेवी देहींचें पापाचरण । जीवशिवस्थान ठाकीना ॥ ३५१ ॥
घटीं कालविल्या कस्तूरी । बिंबप्रतिबिंब सुवास न धरी ।
तेवीं देहींच्या पुण्याची थोरी । जीवशिवावरी पावेना ॥ ३५२ ॥
आकाश जळावयालागीं । घृते पेटविली महाआगी ।
आकाश असतां अग्निसंगीं । दाहो अंगीं लागेना ॥ ३५३ ॥
आकाश असोनि अग्निमेळें । अग्निज्वाळे कदा न जळे ।
तेवीं ज्ञाता विषयकल्लोळें । कदा काळें विषयी नव्हे ॥ ३५४ ॥
गुणांचेनि देहसंगे । योगी वर्तता येणें योगें ।
ते भोगितांही विषयभोगें । अलिप्त सर्वांगें सर्वदा ॥ ३५५ ॥
हे कळलें ज्यां भोगवर्म । ते देहीं असोन परब्रह्म ।
त्यांसी बाधीना भोगभ्रम । अक्षर परम स्वयें झाले ॥ ३५६ ॥
ते अक्षर झाले आतां । याही बोलासी ये लघुता ।
जन ज्ञानीं अज्ञानीं वर्तता । अक्षरता अभंग ॥ ३५७ ॥
ते विसरोनि ब्रह्मरूपता । मी देही म्हणवी देहअहंता ।
तेथें वाढली विषयावस्था । दृढ बद्धता तेणें झाली ॥ ३५८ ॥
ते निवारावया बद्धता । त्यजावी विषयलोलुपता ।
विषयत्यागेंवीण सर्वथा । नित्यमुक्तता घडे ना ॥ ३५९ ॥
न जोडतां नित्यमुक्तता । साधक जरी झाला ज्ञाता ।
तरी तेणें ज्ञातेपणें सर्वथा । विषयासक्तता न करावी ॥ ३६० ॥
तथापि सङ्गः परिवर्जनीयो
गुणेषु मायारचितेषु तावत् ।
मद्भक्तियोगेन दृढेन यावत्
रजो निरस्येत मनःकषायः ॥ २७ ॥
स्वरवर्णयुक्त संपूर्ण । चहूं वेदीं झाला निपुण ।
तेणें बळें विषयाचरण । करितां दारुण बाधक ॥ ३६१ ॥
सकळ शास्त्रांचें श्रवण । करतळामलक झाल्या पूर्ण ।
शब्दज्ञानाचें जें मुक्तपण । तेणेंही विषयाचरण बाधक ॥ ३६२ ॥
प्राणापनांचिया समता । जरी काळवंचना आली हाता ।
तरी विषयांची विषयावस्था । जाण सर्वथा बाधक ॥ ३६३ ॥
शापानुग्रहसमर्थ नर । आम्ही ज्ञाते मानूनि थोर ।
त्यांसही विषयसंचार । होय अपार बाधक ॥ ३६४ ॥
आसन उडविती योगबळें । दाविती नाना सिद्धींचे सोहळे ।
त्यांसही विषयांचे भोगलळे । होती निजबळें बाधक ॥ ३६५ ॥
इतरांची कोण कथा । मंत्रें मंत्रमूर्ति प्रसन्न असतां ।
त्यासीही विषयावस्था । जाण सर्वथा बाधक ॥ ३६६ ॥
किंचित् झाल्या स्वरूपप्राप्ती । ‘मी मुक्त’ हे स्फुरे स्फूर्ती ।
तथापि विषयांची संगती । त्यासीही निश्चितीं बाधक ॥ ३६७ ॥
अभिमानाचें निर्दळण । स्वयें करूनियां आपण ।
नित्यमुक्त नव्हतां जाण । विषयाचरण बाधक ॥ ३६८ ॥
जेवीं चकमकेची आगी । जाळूं न शके नाटॆलागीं ।
तेवीं ब्रह्मप्राप्ती प्रथमरंगीं । प्रपंचसंगीं विनाशे ॥ ३६९ ॥
विषय मिथ्या मायिक । ते भोगीं जंव भासे हरिख ।
तंववरी विषय बाधक । जाण निष्टंक उद्धवा ॥ ३७० ॥
तें त्यागावया विषयसेवन । निर्दळावा देहाभिमान ।
याचियालागीं माझें भजन । साक्षेपें जाण करावें ॥ ३७१ ॥
व्रत तप तीर्थ दान । करितां योग याग यजन ।
वेदशास्त्र पुराणश्रवण । तेणें देहाभिमान ढळेना ॥ ३७२ ॥
भावें करितां माझें भजन । समूळ सुटे देहाभिमान ।
भक्ती उत्तमोत्तम साधन । भक्तीआधीन परब्रह्म ॥ ३७३ ॥
ज्ञान वैराग्य निवृत्ती । धृति शांति ब्रह्मस्थिती ।
यांची जननी माझी भक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ३७४ ॥
चहूं मुक्तींहूनि वरती । उल्हासें नांदे माझी भक्ती ।
माझे भक्तीची अनिवार शक्ती । तिसी मी निश्चितीं आकळलों ॥ ३७५ ॥
माझें स्वरूप अनंत अपार । तो मी भक्तीनें आकळलों साचार ।
यालागीं निजभक्तांचें द्वार । मी निरंतर सेवितसें ॥ ३७६ ॥
भक्तीनें आकळलों जाण । यालागीं मी भक्ताअधीन ।
माझिये भक्तीचें महिमान । मजही संपूर्ण कळेना ॥ ३७७ ॥
बहुतीं करूनि माझी भक्ती । मज ते मोक्षचि मागती ।
उपेक्षूनि चारी मुक्ती। करी मद्भक्ती तो धन्य ॥ ३७८ ॥
ऐशी जेथ माझी भक्ती । तेथ पायां लागती चारी मुक्ती ।
त्यासी सर्वस्वें मी श्रीपती । विकिलों निश्चितीं भावार्थें ॥ ३७९ ॥
ते भक्तीच मुख्य ज्यास साधन । यालागीं मी त्या भक्ताअधीन ।
त्यांचे कदाकाळें वचन । मी अणुप्रमाण नुल्लंघीं ॥ ३८० ॥
ते मज म्हणती होईं सगुण । तैं मी सिंह सूकर होय आपण ।
त्यांलागीं मी विदेही जाण । होय संपूर्ण देहधारी ॥ ३८१ ॥
एका अंबरीषाकारणें । दहा जन्म म्यां सोसणें ।
अजत्वाचा भंग साहणें । परी भक्तांसी उणें येऊं नेदीं ॥ ३८२ ॥
द्रौपदी नग्न करितां तांतडी । तिळभरी हों नेदींच उघडी ।
झालों नेसविता वस्त्रें कोडी । भक्तसांकडीं मी निवारीं ॥ ३८३ ॥
तो मी भक्तसाहाकारी । अजन्मा त्यांचेनि जन्म धरीं ।
समही वर्ते अरिमित्रीं । भक्तकैवारी होऊनियां ॥ ३८४ ॥
जो माझिया भक्तां हितकारी । तो मज परम मित्र संसारीं ।
जो माझ्या भक्तांसी वैर करी । तो मी नानापरी निर्दळीं ॥ ३८५ ॥
ऐसा मी भक्तसाह्य श्रीकृष्ण । त्या माझें निजभजन ।
न करूनियां अभाग्य जन । अधःपतन पावती ॥ ३८६ ॥
म्हणशी ‘पाप असतां शरीरीं । तुझें भजन घडे कैशा परी’ ।
सकळ पापांची बोहरी । माझें नाम करी निमेषार्धें ॥ ३८७ ॥
ऐकोनि नामाचा गजर । पळे महापातकांचा संभार ।
नामापाशीं महापापासी थार । अणुमात्र असेना ॥ ३८८ ॥
माझिया निजनामापुढें । सकळ पाप तत्काळ उडे ।
तें पाप नामस्मरत्याकडे । केवीं बापुडें येऊं शके ॥ ३८९ ॥
अवचटें सूर्य अंधारीं बुडे । तरी पाप न ये भक्तांकडे ।
भक्तचरणरेणु जेथ पडे । तेथ समूळ उडे पापराशी ॥ ३९० ॥
माझें नाम ब्रह्मास्त्र जगीं । महापाप तें बापुडें मुंगी ।
नामापुढे उरावयालागीं । कस त्याचे अंगीं असेना ॥ ३९१ ॥
माझे नामाचा प्रताप ऐसा । मा माझे भक्तीची कोण दशा ।
पडलिया मद्भक्तीचा ठसा । तो नागवे सहसा कळिकाळा ॥ ३९२ ॥
यालागीं माझे भजन । निर्दळी देहाभिमान ।
माझे निजभजनेंवीण जाण । देहाभिमान तुटेना ॥ ३९३ ॥
जेणें तुटे देहाभिमान । तें कैसें म्हणशी तुझें भजन ।
अभेदभावें भक्ती पूर्ण । तेणें देहाभिमान निर्दळे ॥ ३९४ ॥
भगवद्भाव सर्वांभूतीं । या नांव गा ‘अभेदभक्ती’ ।
हे आकळल्या भजनस्थिती । अहंकृती उरेना ॥ ३९५ ॥
माझें नाम ज्याचे वदनीं । माझी कीर्ति ज्याचे श्रवणीं ।
माझा भाव ज्याचे मनीं । ज्याचे करादिचरणीं क्रिया माझी ॥ ३९६ ॥
जो जागृतीमाजीं पाहे मातें । जो स्वप्नीं देखे मज एकातें ।
जो मजवेगळें चित्त रितें । न राखे निश्चितें निजनिष्ठा ॥ ३९७ ॥
यापरी भजनस्थितीं । त्रिगुण विकार मावळती ।
तेणें अहंकाराची निवृत्ती । विषयासक्ति निर्दळे ॥ ३९८ ॥
भक्तांसी विषयसेवन । सर्वथा बाधक नव्हे जाण ।
तो विषय करी मदर्पण । तेणें बाधकपण नव्हे त्यासी ॥ ३९९ ॥
नाना साधनें विषयो त्यागिती । त्यागितां परम दुःखी होती ।
भक्त विषयो भगवंतीं अर्पिती । तेणें होती नित्यमुक्त ॥ ४०० ॥