मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २२ ओव्या ६०१ ते ७००

    राजस कर्म ब्रह्मीं अर्पिती । ते दैत्यही भगवद्भ क्त होती ।

    जे रजउत्कर्षें भोग वांछिती । ते असुर होती महायोद्धे ॥ १ ॥
    तर जे लोक राजस कर्म ब्रह्मार्पण करतात, ते दैत्यांत जन्मास येऊनही भगवद्गक्त होतात. आणि जे रजोगुणाच्या उत्कर्षाने सुखोपभोगाची इच्छा करतात, ते महायोद्धे असे असुर होतात १.


    रजोगुणें स्वकर्माचरण । तेणें कर्में जन्मती ब्राह्मण ।
    रजतारतम्यें जाण । चारी वर्ण जन्मती ॥ २ ॥
    जे रजोगुणानेच स्वकर्माचरण करतात, ते त्या कर्मानंच ब्राह्मणजन्म पावतात. आणि याच रजोगुणाच्या कमीजास्त मानाने चारही वर्ण जन्मास येतात २.


    तामसाचे संगतीं जाण । करितां तमिष्ठ कर्माचरण ।
    तेणें क्षोभला जो तमोगुण । तो नीच योनी दारुण उपजवी ॥ ३ ॥
    तामसाच्या संगतीने तामस कर्माचरण केले, तर त्यामुळे जो तमोगुण क्षुब्ध होतो, तो भयंकर अशा नीच योनीत जन्मास घालतो ३, 


    भूत प्रेत पिशाचक । तिर्यग्योनि असंख्य ।
    वृक्ष पर्वत पाषाण देख । या योनी अनेक भोगवी ॥ ४ ॥
    व भूत, प्रेत, पिशाच, पशु, पक्षी, पाषाण, इत्यादि अगणित योनी भोगावयास लावतो ४.


    आशंका - कर्म त्रिगुणात्मक साचार । परी कर्मफळभोक्ता ईश्वर ।
    हा वेदशास्त्रें विचार । केला निर्धार तुम्हींही ॥ ५ ॥
    [आशंका] - कर्म हैं खरोखर त्रिगुणात्मक आहे, परंतु कर्मफळांचा भोक्ता ईश्वर आहे, हा निश्चय वेदशास्त्रांच्या आधाराने आपणही केलाच ५.


    देहसाक्षित्वें आत्मा निराळा । ऐसा गतश्लोकीं केला निर्वाळा ।
    जैं कर्मफळभोक्ता कर्मावेगळा । तैं कर्मफळा केवीं भोगी ॥ ६ ॥
    देहाचा साक्षीभूत जो आत्मा तो निराळाच आहे, असा गेल्या श्लोकांत आपणच सिद्धांत ठरविला. तेव्हा कर्मफळाचा भोक्ता जर कर्माहून वेगळा आहे, तर तो कर्मफळाला भोगतो कसा ? ६.


    ऐसें आशंकेचें अंतर । जाणोनियां शार्ङ्‌गधर ।
    तेचि अर्थींचें उत्तर । विशद साचार सांगत ॥ ७ ॥
    अशा प्रकारच्या आशंकेनें युक्त असे उद्धवाचे अंत:करण जाणून श्रीकृष्ण त्याच अर्थाचे उत्तर खरोखर विशद करून सांगत आहेत ७.


    नृत्यतो गायतः पश्यन् यथैवानुकरोति तान् ।
    एवं बुद्धिगुणान्पश्यतन्ननीहोऽप्यनुकार्यते ॥ ५२ ॥
    [श्लोक ५२] जेव्हा मनुष्य एखाद्याला नाचतानागाताना पाहून स्वतःसुद्धा त्याचे अनुकरण करू लागतो, त्याप्रमाणे जीव स्वतः निष्क्रिय असूनही बुद्धीच्या गुणांचे अनुकरण करू लागतो. (५२)


    कलाकुशल सभानायक । त्यापुढें रंग होता कौतुक ।
    गात्या नाचत्याचे तालथाक । स्वयें देख अनुकरे ॥ ८ ॥
    सभापति कलाकुशलतेंत निपुण असला आणि त्याच्यापुढे मोठ्या आनंदाने नाचरंग होऊ लागला, तर त्या गाणाराच्या व नाचणाराच्या तालसुराप्रमाणे तोही ताल धरतो ८.


    तेंचि अनुकार म्हणशी कैसें । प्रकृति केवळ जडांशें ।
    जाणपण आत्म्यासी असे । येणें विन्यासें भोक्ता म्हणती ॥ ९ ॥
    आता  तो ताल कसा धरिला जातो असें म्हणतील, तर प्रकृति ही केवळ जडाचा अंश आहे, आणि आत्मा हा जाणता आहे. म्हणूनच त्याला भोक्ता असें म्हणतात ९.


    सभेसी बैसल्या निश्चळा । रंगींच्या अनुकरे थाकताळा ।
    तेवीं प्रकृति पुरुष वेगळा । तो प्रकृतीची लीळा अनुकरे ॥ ६१० ॥
    सभेंत  स्वस्थ बसलेला असतो, तो सुद्धा नृत्यगायनांतील तालसुरांप्रमाणे ठेके देत असतो. त्याप्रमाणे प्रकृतीहुन पुरुष हा वेगळा असूनही प्रकृतीच्या लीलेला अनुसरतो ६१०.


    आशंका - प्रकृतिच्छंदें अनुकारता । गुणकर्मांचा फळभोक्ता ।
    आत्मा झाला जैं तत्त्वतां । तैं नित्यमुक्तता भंगली ॥ ११ ॥
    [आशंका] - प्रकृतीच्या नादाने तिचे अनुकरण करणारा आत्मा जर खरोखर गुणकर्माचा भोक्ता होईल, तर त्याची नित्यमुक्तता नाहीशी होईल ११.


    जो करी कर्मफळस्वादन । त्यासी लागे कर्मबंधन ।
    कर्मास्तव जन्ममरण । आत्म्यासी जाण लागलें ॥ १२ ॥
    कारण जो कर्मफळाचा उपभोग घेईल, त्यालाच कर्माचे बंधन लागेल, आणि त्या कर्मापासून आत्म्यालाही जन्ममरण लागलें असें म्हणावे लागेल १२.


    नित्यमुक्त अविकारी । या गोष्टी राहिल्या दूरी ।
    आत्मा जाहला संसारी । गुणविकारीं अतिबद्ध ॥ १३ ॥
    आणि तसे झाले तर आत्मा हा नित्यमुक्त व विकारातीत आहे, ह्या गोष्टी लांबच राहिल्या. अर्थात् आत्मा हा संसारी, गुणविकारी आणि अत्यंत बद्ध असा झाला १३.


    उद्धवा तूं ऐसऐशी । आशकां झणीं धरिशी ।
    आत्मा अलिप्त गुणकर्मांसी । दृष्टांतेंसीं हरि सांगे ॥ १४ ॥
    उद्धवा ! अशी तूं शंका कदाचित् घेशील . परंतु आत्मा हा गुणकर्मापासून अलिप्त आहे, हेच श्रीकृष्ण आणखी दृष्टान्ताने सांगतात १४.


    यथाम्भसा प्रचलता तरवोऽपि चला इव ।
    चक्षुषा भ्राम्यमाणेन दृश्यते भ्रमतीव भूः ॥ ५३ ॥
    यथा मनोरथधियो विषयानुभवो मृषा ।
    स्वप्नदृष्टाश्च दाशार्ह तथा संसार आत्मनः ॥ ५४ ॥
    [श्लोक ५३-५४] जलाशयामधील पाणी हलण्याने त्यात प्रतिबिंबित झालेली झाडेसुद्धा हालत असल्यासारखी दिसतात किंवा डोळे फिरविले असता पृथ्वीसुद्वा फिरताना दिसते, किंवा जसे मनातील विचार अथवा स्वप्नातील पाहिलेले पदार्थ सर्वथैव खोटे असतात, त्याचप्रमाणे, हे उद्धवा ! आत्म्याचा विषयानुभवरूप संसारसुद्धा खोटा आहे. (५३-५४)


    जेवीं गंगातीरींचा तरू । जळीं वाहतां देखे नरू ।
    तेवीं मायागुणानुकारू । भासे विकारू आत्मत्वीं ॥ १५ ॥
    ज्याप्रमाणे एकादा मनुष्य नदीच्या काठावर असलेला वृक्ष पाण्यातून वहात जात आहे असे पाहतो, त्याप्रमाणे मायेच्या गुणाच्या संसर्गानं आत्म्याच्या ठिकाणीही विकार असल्याचा भास होतो १५.


    ज्याचे डोळां भवंडी सबळ । तो भंवतां देखे भूमंडळ ।
    तेवीं मायिक विकारमेळ । मिथ्या केवळ आत्म्यासी ॥ १६ ॥
    ज्याच्या डोळ्यांना अतिशय भोवंड येते, त्याला सारी पृथ्वीच फिरत आहे असे भासते. त्याप्रमाणे या मायेच्या विकारांचा जो समुदाय आहे, तो आत्म्यालाही मिथ्याच आहे १६.


    जो अश्वारूढ हो‍ऊनि पाहे । जळीं प्रवाहासंमुख राहे ।
    तो देखे मी जळीं प्रवाहें । ऐसा मिथ्या होये अनुभवू ॥ १७ ॥
    जो घोड्यावर बसून पाण्याच्या ओघाच्या समोर राहून पाहतो, त्याला आपण पाण्यांतच वहावतो आहों असा भास होत असतो १७.


    तेवीं आत्मा नित्य निर्विकार । तेथ मायावी गुणसंभार ।
    कल्पनायोगें साचार । मानिती नर मनोमय ॥ १८ ॥
    त्याप्रमाणे आत्मा हा नित्य निर्विकारच आहे व त्यांत अनेक गुण आहेत ते मायात्मक आहेत. ते खरोखर कल्पनामयच असल्यामुळे मनोमय असतांही लोक खरेच मानितात १८. 


    आब्रह्यस्तंबपर्यंत । नाना योनी विकारवंत ।
    कर्म क्रिया फळभोग येथ । जाण निश्चित मनोजन्य ॥ १९ ॥
    ब्रह्मदेवापासून तो गवताच्या काडीपर्यंत ज्या असंख्य योनी आहेत, त्या विकारवंतच आहेत आणि त्यांत कर्म, क्रिया, फळाचे भोग हे सारे खरोखर मनापासूनच उत्पन्न झालेले आहेत १९.


    ऐसें सांगतां हरि सांवळा । तेणें उल्हास उद्धवजीवाला ।
    तया आनंदाच्या कल्लोळां । उद्धवचि लीला पोखित ॥ ६२० ॥
    घनश्याम जे श्रीकृष्ण त्यांनी याप्रमाणे सांगितले. तेव्हां उद्धवाच्या अंत:करणाला अतिशय आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरांत उद्धवही तशाच लीला करूं लागला ६२०.


    निववावया उद्धवाचा ताप । स्वयें सांगे तो विश्वतोमुख ।
    जेणें उद्धवां बहु हरिख । तेंचि श्रीकृष्ण देख सांगतसे ॥ २१ ॥
     उद्धवाच्या मनाचा ताप दूर करावा म्हणूनच सर्वज्ञ असे श्रीकृष्ण स्वतः ज्ञानोपदेश करीत होते. यामुळे उद्धवाला जेणेकरून आनंद होईल असेंच निरूपण श्रीकृष्ण करीत असत २१.


    आत्मा निजमुक्त अविकारी । तो संकल्पें कीजे विकारी ।
    असंसारी परीसंसारी । मनोविकारीं मानिजे ॥ २२ ॥
    आत्मा हा नित्यमुक्त व अविकृतच आहे. तो संकल्पानेच विकारी झाला असे वाटते. तो खरोखर असंसारीच आहे. पण मनोविकारांनीच त्याला संसारी असें मानितात २२.


    ऐसें दुजयावीण कांहीं । कथा वार्ता सांगतां नाहीं ।
    एक श्रोता दुसरा वक्ता पाहीं । यालागीं येही उपाये ॥ २३ ॥
    अशा प्रकारे तेथे दुसरे कोणीच नसल्यामुळे कथा वार्ता कांहींच सांगता येत नाही. श्रोता आणि वक्ता दोन असतील तरच तसे करता येईल २३.


    जेवीं एकटा क्रमेना पंथ । मी राजा करी मनोरथ ।
    परचक्र कल्पूनि तेथ । होय उद्यत युद्धासी ॥ २४ ॥
    ज्याप्रमाणे एकटांच मनुष्य चालतांना कंटाळला, आणि त्याला वाट सरेनाशी झाली, म्हणजे तो आपण राजाच आहो असें मनोराज्य चालवितो आणि तेथें परचक्र आले आहे अशी कल्पना करून युद्धाला तयार होतो २४.


    तो युद्धआ्वेश कडकडाट । तेणें सत्राणें उडे उद्भ>ट ।
    अडखळूनि आदळे पोट । म्हणे मी घायवट पडिलों कीं ॥ २५ ॥
    आणि त्या युद्धाचें त्याला इतकें स्फुरण येते की, सांगतां सोय नाही. त्या हिरहिरीसरशी तो ताड ताड उड्या मारू लागतो. इतक्यांत पाय कशाला तरी अडखळून पडतो व पोट आपटते, तेव्हां म्हणतो की मी जखमी होऊन पडलों २५.


    मिथ्या भ्रमें पडला भुली । चालतां चालतां मृगजळीं ।
    उतरावया पैलतीरीं । बुडी वहिली देतसे ॥ २६ ॥
    अशा प्रकारे तो खोट्याच  भ्रमाने तो भ्रांतीत पडतो, आणि चालता चालतां मृगजळांतून पलीकडे जाण्याकरितां तत्काल त्यांत बुडी देतो २६.


    गंधर्वनगरीं प्रचंड । माड्या सोपे उदंड ।
    क्षणामाजीं विरस चंड । वितंड करी निर्वाळा ॥ २७ ॥
    किंवा आकाशांत मोठमोठाले ढग उठले म्हणजे त्यांत हवे तितके सोपे व माड्या दिसू लागतात, परंतु जोराचा वारा सुटला की एका क्षणांत तेथे शून्याकार होऊन जातो २७.


    तेवीं संसार हा काल्पनिक । तेथील सुख आणि दुःख ।
    मिथ्या केवळ मायिक । जाण निष्टंक निजभक्तां ॥ २८ ॥
    त्याप्रमाणे संसार हाच मुळी काल्पनिक असल्यामुळे त्यांतील सुखदुःखही माझ्या भक्तांना केवळ मायिकच वाटते २८.


    दाशार्हवंशीं जन्मलासी । तूं उत्तम दशा पावलासी ।
    यालागीं म्हणे हृषीकेशी । उद्धवासी दाशार्ह ॥ २९ ॥
     दाशार्ह  वंशामध्ये जन्म घेऊन तूं उत्तम स्थितीला पोचला आहेस, म्हणून श्रीकृष्णांनी उद्धवाला ' दाशार्ह ' असे म्हटले २९.


    जेवीं का स्वप्नभोग जाण । स्वप्नीं सत्य मानी आपण ।
    तेवीं संसार हा दीर्घ स्वप्न । मायिक जाण मिथ्यात्वें ॥ ६३० ॥
    स्वप्नांतील सुखापभोग असतात ते ज्याप्रमाणे आपण स्वप्नांमध्ये खरेच मानितों, त्याप्रमाणे संसार हें  एक दीर्घ स्वप्नच आहे; म्हणून ते मिथ्या व केवळ मायिक होय ६३०.


    जागा झालिया स्वप्न वृथा । निरहंकारीं संसार मिथ्या ।
    हे ब्रह्मज्ञानाची मुख्य कथा । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ३१ ॥
    जागे झाले म्हणजे स्वप्न खोटें, त्याप्रमाणे निरहंकारामध्ये संसारही मिथ्याच आहे. उद्धवा ! हीच काय ती ब्रह्मज्ञानांतील मुख्य गोष्ट आहे हे लक्षात ठेव ३१.


    संसार तो कल्पनामात्र । आत्मा निर्विकार चिन्मात्र ।
    जेवीं मृगजळ भरी भास्कर । तेवीं संसार करी आत्मा ॥ ३२ ॥
    सूर्य ज्याप्रमाणे मृगजल भरतो, त्याप्रमाणेच आत्मा हा संसार करतो. यावरून संसार हा केवळ कल्पनामय असून आत्मा हा निर्विकार व ज्ञानरूप आहे ३२.


    उद्धवा तूं म्हणशी आतां । ऐकतां तुझे मुखींची कथा ।
    संसार मिथ्या तत्त्वतां । तरी साधनावस्था कां सोसावी ॥ ३३ ॥
    ह्यावरून उद्धवा ! तूं आतां कदाचित् असें म्हणशील की, हे तुझ्या तोंडचे भाषण ऐकून संसार हा सर्व मिथ्याच आहे, मग साधन करावयाच्या भरीला तरी का पडावें ? ३३.


    जेवीं वंध्यापुत्राचें लग्न । करावया कोणी न करी यत्‍न ।
    कां मृगजळीं बांधोनि धरण । पाट जाण कोणी काढीना ॥ ३४ ॥
    वांझोटीच्या मुलाचे लग्न करावयाला जसे कोणी झटत नाही, किंवा मृगजळाचे धरण बांधून त्याचा कोणी पाट काढीत नाही ३४.


    तेवीं मिथ्या संसारबंधन । तेथ श्रवण मनन चिंतन ।
    विवेक वैराग्य ज्ञान ध्यान । वृथा कां जन सोशिती ॥ ३५ ॥
    त्याप्रमाणे संसारबंधनच जर मुळी मिथ्या आहे, तर मग श्रवण, मनन, चिंतन, विवेक, वैराग्य, ध्यान, यांचा खटाटोप तरी लोक व्यर्थ कां  करितात ३५.


    उद्धवा बागुलाचें भय खोटें । परी बाळकासी सत्य वाटे ।
    तेवीं मिथ्या संसारकचाटें । जीवीं प्रकटे बद्धता ॥ ३६ ॥
    उद्ध्वा ! बागुलाचे भय पाहूं गेलें तर खोटेंच असते, पण मुलाला ते खरेंच वाटत असते. त्याप्रमाणे संसाराच्या खोट्या संकटानेंच जीवाला बंधन प्राप्त होते ३६.


    तेचि अर्थींचा दृष्टांत । स्वयें श्रीकृष्ण सांगत ।
    मिथ्या सांसरिक येथ । भ्रमें बाधीत भ्रांतासी ॥ ३७ ॥
    त्याच अर्थाचा दृष्टान्त श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत. कारण, संसारासंबंधी जी दुःखे आहेत, ती भ्रमिष्ट लोकांना भ्रमानेंच पीडा देत असतात ३७.


    अर्थें ह्यविद्यमानेऽपि संसृतिर्न निवर्तते ।
    ध्यायतो विषयानस्य स्वप्नेऽनर्थागमो यथा ॥ ५५ ॥
    [श्लोक ५५] जशी स्वप्नातील अनर्थपरंपरा ते पाहात असेपर्यंत नाहीशी होत नाही, त्याचप्रमाणे विषय खरे नसूनही जो जीव त्यांचेच चिंतन करीत राहातो, तोपर्यंत त्याचे हे संसारचक्र थांबत नाही. (५५)


    विचारें पाहतां मिथ्या स्वप्न । तेथील विषयसेवन ।
    सुखदुःखें बाधिती गहन । ऐक लक्षण तयाचें ॥ ३८ ॥
    विचाराने पाहिले तर स्वप्नं  हें मिथ्याच असते, तरी त्यांतील विषयाच्या सेवनाने सुखदुःखांची अत्यंत बाधा होते. त्याचाही प्रकार ऐक ३८.


    स्वप्नीं पुत्रलाभ राजसन्मान । तेणें सुखें ओसंडे आपण ।
    कां झालिया धनहरण । तेणें दुःखे दारुण आक्रंदे ॥ ३९ ॥
    स्वप्नांत पुत्र होतो किंवा राजा सत्कार करतो, पण त्याच आनंदाने स्वप्न पहाणारा आपणही फुगत असतो. किंवा त्यांतच आपले सारे द्रव्य गेले तर त्या दुःखानेही आपण रडू लागतो ३९.


    त्यासी जागें न करितां । स्वप्नसुखदुःखबाधकता ।
    निवर्तेना सर्वथा । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ६४० ॥
    ह्याकरितां उध्दवा ! त्याला जर आपण जागे केले नाही, तर स्वप्नांतील ती सुखदुःखांची पीडा खरोखर कधीच सुटत नाहीं हें  लक्षात ठेव ६४०.


    तेवीं विषयासक्त जन । ज्यांसी अखंड विषयध्यान ।
    ज्यांचें विषयीं सदा मन । देहाभिमान गोंवीत ॥ ४१ ॥
    त्याप्रमाणे जे लोक विषयासक्त असतात, ज्यांना निरंतर विषयाचेच ध्यान असते, देहाभिमान हा ज्यांचे मन सदासर्वदा विषयांतच गोंवीत असतो ४१. 


    तयांसी देखावया उपावो । जयां विषयसक्ति होय वावो ।
    येचि अर्थींचा दृष्टांत पहा वो । स्वयें सांगे देवो उद्धवासी ॥ ४२ ॥
    त्यांना ज्या उपायांनी विषयासक्ति नाहीशी होईल असे उपाय कोणते? अहो ! ह्याच अर्थाचा दृष्टान्त स्वतः श्रीकृष्ण उद्धवाला सांगत आहेत ४२.


    न करितां श्रवण मनन । न साधितां विवेकज्ञान ।
    न धरितां वैराग्य पूर्ण । भवभय जाण तुटेना ॥ ४३ ॥
    श्रवण व मनन केले नाही, विचाराने ज्ञान साधले नाही, किंवा परिपूर्ण वैराग्य धरले नाही, तर संसाराचे भय तुटत नाही ४३.


    संसार मिथ्या तोंडें म्हणतां । न तुटे सुखदुःखभयव्यथा ।
    जन्ममरणादि अवस्था । अहंममता सुटेना ॥ ४४ ॥
    पण संसार हा मिथ्या आहे असे फक्त तोंडानेच म्हटल्याने काही सुखदुःखांचे भय तुटत नाही, किंवा जन्ममरणांचा फेरा व अहंममता काही सुटत नाहींत ४४.


    ऐसे अज्ञान जन । तिंहीं अवश्य करावें साधन ।
    विवेकें वैराग्य धरितां पूर्ण । भवबंधन निवारे ॥ ४५ ॥
    असे जे अज्ञानी लोक असतील, त्यांनी अवश्य साधन करावें. विवेकाने परिपूर्ण वैराग्य धारण केले म्हणजे संसारबंधन नष्ट होतें ४५.


    यालागीं उद्धवा जाण । सकळ साधनांचे कारण ।
    जेणें हाता चढे ब्रह्मज्ञान । तें वैराग्य पूर्ण साधावें ॥ ४६ ॥
    याकरितां उद्धवा! सर्व साधनांचे मूळ आणि ज्याच्या योगाने ब्रह्मज्ञान हाताला चढतें तें वैराग्य पूर्णपणे साध्य करावें ४६.


    ऐक विरक्तीची मागी । जैशी धढधडीत आगी ।
    तैसें वैराग्य व्हावें अंगीं । तैं प्राप्तीलागीं अधिकारू ॥ ४७ ॥
    आतां विरक्तीचा मार्ग कसा असतो तो ऐक. तर आग जशी धडाडते, त्याप्रमाणे अंगांत वैराग्य बाणले पाहिजे. तेव्हांच ब्रह्मप्राप्तीसाठी अधिकार प्राप्त होतो ४७.


    ऐसे मुमुक्षु जे पुरते । परम कृपेचेनि हातें ।
    सद्‌गुरु थापटोनि ज्यांतें । करी अद्वैतें जागृत ॥ ४८ ॥
    असे जे कोणी पूर्ण मुमुक्षु असतात, व ज्यांना पूर्ण कृपेच्या हाताने सद्गुरु थापटून जागे करतात ४८, 


    ज्यासी देहादिभेदपुष्टी । मिथ्या माया गुणत्रिपुटी ।
    ब्रह्मानंदें कादली सृष्टी । स्वप्नवत् दृष्टीं संसारू ॥ ४९ ॥
    ज्यांना देहादिकांच्या अभेद भावाने पुष्टि येते, मायेच्या गुणांची त्रिपुटी मिथ्या भासते, ब्रह्मानंदाने सृष्टि भरून जाते, व ज्यांच्या दृष्टीला संसार केवळ स्वप्नवत् भासू लागतो ४९, 


    येव्हडी ही परम प्राप्ती । वैराग्यविवेकें चढे हातीं ।
    तेंचि वैराग्य उद्धवप्रती । स्वयें श्रीपती सांगत ॥ ६५० ॥
    एवढा अप्रतिम लाभ ज्या वैराग्यविवेकाने हाती लागतो, तेंच वैराग्य उद्ध्वाला स्वतः श्रीकृष्ण सांगत आहेत ६५०.


    तस्मादुद्धव मा भुङ्क्ष्व विषयानसदिन्द्रियैः ।
    आत्माग्रहणनिर्भातं पश्य वैकल्पिकं भ्रमम् ॥ ५६ ॥
    [श्लोक ५६] म्हणून उद्धवा ! या नाठाळ इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेऊ नकोस आत्म्याच्या अज्ञानामुळे भासणारा हा भेदभ्रम आहे, असे समज. (५६)


    विषयांची जे आसक्ती । ते बाधक परमार्थप्राप्ती ।
    विषय सांडीं सांडीं निश्चितीं । परतोनि हातीं नातळें ॥ ५१ ॥
    विषयाची असक्ति असते. तीच परमार्थप्राप्तीला बाधक होते. ह्याकरिता खरोखर विषयच सोडून दे, आणि पुन्हा त्यांना हातही लावू नको ५१.


    आसक्त वृत्ति इंद्रिययोग । अतिलोलुप्यें विषयभोग ।
    तोचि मुख्यत्वें भवरोग । यालागीं त्याग करावा ॥ ५२ ॥
    वृत्ति आसक्त झाली म्हणजे ती इंद्रियांना चिकटून बसते, आणि तिला अत्यंत लुब्ध झाल्याने विषयाचे भोग भोगावेसे वाटतात. हाच संसाराचा मोठा रोग होय. ह्याकरिता त्याचा त्याग करावा ५२.


    विखें रांधिलें परमान्न । तें ग्रासमात्र हरी प्राण ।
    विष एकदां मारक जाण । विषय पुनःपुनः मारक ॥ ५३ ॥
    उत्तम पक्वान्न असले, आणि त्यांत विष घातलेले असले, तर त्याचा एक घास खाल्ला तरी प्राण जातो. पण विषाने एकदाच प्राण जातो, आणि विषय हे पुन्हा पुन्हा जीव घेत असतात ५३.


    म्हणसी प्रारब्धें भोग येती । ते त्यागिले केंवी जाती ।
    विषयत्यागाची युक्ती । वैराग्यस्थिती घडे केवीं ॥ ५४ ॥
    आतां तूं म्हणशील की, प्रारब्धानुसार भोग येत असतात, याकरिता त्यांचा त्याग कसा घडेल ? आणि विषयत्यागाचा उपाय सांपडून वैराग्य कसे प्राप्त होईल? ५४.


    प्रारब्धें विषयभोग येती । ते साधका दुःखरूप होती ।
    वणवां मृगें आहाळती । तैशी स्थिती भोगणें ॥ ५५ ॥
    प्रारब्धानेंच विषयभोग येतात, आणि तेच साधकाला दुःख देतात. वणव्यांत सांपडलेली हरणे जशी होरपळतात, त्याप्रमाणेच त्यांनाही ती स्थिति भोगावी लागते ५५.


    व्याघ्रमुखीं सांपडे गाये । तैसा भोगी चरफडीत जाये ।
    ऐसेनि अनुतापें पाहें । वैराग्य होये अनिवार ॥ ५६ ॥
    वाघाच्या तोंडात गाय सांपडल्याप्रमाणे तो विषय भोगणारा जेव्हा चरफडतो, तेव्हां त्या अनुतापाने अनिवार वैराग्य उत्पन्न होते ५६.


    वैराग्य जाहलिया धडपुडें । सद्‌गुरुकृपा हाता चढे ।
    तेणें गुरुकृपाउजियेडें । संसार उडे द्वंद्वेंसीं ॥ ५७ ॥
    खरें खरे वैराग्य उत्पन्न झाले, की सद्गुरूची कृपा हाती लागते आणि गुरुकृपेच्या प्रभावानेंच द्वंद्वासहवर्तमान सारा संसार नाहीसा होतो ५७.


    झालिया गुरुकृपा सुगम । सर्वत्र ठसावे परब्रह्म ।
    तेथ जन्ममरण कैंचे कर्म । भवभ्रम असेना ॥ ५८ ॥
    गुरुकृपा साध्य झाली, की जिकडे तिकडे परब्रह्मच दिसू लागते. मग तेथें कर्म कशाचं, आणि जन्ममरण तरी कशाचें? संसाराच्या भ्रमाचे सारें नांवच नाहीसे होते ५८.


    तेथ वाती लावूनि पाहतां । संसार दिसेना मागुता ।
    जेवीं निभ्रमें पाहों जातां । न लगे हाता रज्जुसर्प ॥ ५९ ॥
    त्या वेळी दिवा लावून पाहिले तरी फिरून संसार म्हणून कसला तो दिसत नाही. ज्याप्रमाणे भ्रम नाहीसा झाल्यानंतर पाहूं गेलें असतां दोरीचा साप हाती लागत नाही ५९, 


    भवंडिचेनि वेगवशें । भिंगोरी नीट उभी दिसे ।
    तेवीं भ्रमाचेनि आवेशें । संसार भासे सत्यत्वें ॥ ६६० ॥
    किंवा भिंगरी वेगाने गरगरां फिरत असली म्हणजे ती सारखी उभीच आहे असे वाटते, त्याप्रमाणे भ्रमाचा बहर असतो तोपर्यंत संसार हाच खरा असा भास होतो ६६०.


    केवळ जो निबिड भ्रम । संसार हें त्याचें नाम ।
    येर्‍हवीं निखिल परब्रह्म । तेथ जन्मकर्म असेना ॥ ६१ ॥
    निखालस परिपूर्ण जो भ्रम असतो, त्याचंच नांव संसार. बाकी परब्रह्म पाहिले तर ते शुद्धच आहे. तेथें जन्मही नाही आणि कर्मही नाही ६१.


    ऐसें जरी झालें ब्रह्मज्ञान । तरी प्रारब्ध भोगावें गा जाण ।
    जेवीं कुलाल भांडें ने आपण । परी चक्रभ्रमण राहेना ॥ ६२ ॥
    अशा प्रकारचे ब्रह्मज्ञान जरी प्राप्त झाले, तरी कुंभाराने मडके काढून नेले असतांही त्याचे चाक जसे फिरतच असते, त्याप्रमाणे प्रारब्ध भोग हे भोगावेच लागतात ६२.


    वृक्ष समूळ उपडल्या जाण । उपडितां न वचे सार्द्रपण ।
    तेवीं होतांचि ब्रह्मज्ञान । प्रारब्ध जाण सोडीना ॥ ६३ ॥
    वृक्ष हा मुळासकट उपटून काढता येतो, पण त्याचा ओलेपणा असतो तो काही उपटून काढता येत नाही. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान झाले तरी प्रारब्ध कांही त्याला सोडीत नाहीं ६३.


    त्या प्रारब्धाचिये गती । विषयभोग जरी येती ।
    तेथ उपावो न करावा निवृत्ती । निजशांती साहावें ॥ ६४ ॥
    त्या प्रारब्धानुसार जर विषयभोग येऊन अंगावर पडले, तर त्याचा प्रतिकार करण्याच्या खटपटीत पडूं नये. शांतवृत्तीने ते सारे सहन करावे ६४.


    विषयभोग आलियाही जाण । निजशांति धरोनि संपूर्ण ।
    सुखें वर्तती साधुजन । विवेकसंपन्न क्षमावंत ॥ ६५ ॥
    जे विवेकसंपन्न व  क्षमाशील साधु असतात, ते विषयभोग आले तरी अंगामध्ये परिपूर्ण शांति ठेवून आनंदाने वागत असतात ६५.


    हाता आलिया निजशांती । संसार बापुडा तो किती ।
    तेचि शांतीची स्थिती । स्वयें श्रीपती सांगत ॥ ६६ ॥
    शांतीच हातांत आली, तर मग संसार तो बिचारा किती? त्याच शांतीचे लक्षण स्वतः श्रीकृष्ण सांगतात ६६.


    जें निजशांतिचें कल्याण । जेणें जीव पावे समाधान ।
    तें अतिगोड निरूपण । दों श्लोकीं श्रीकृष्ण सांगत ॥ ६७ ॥
    शांतीने आपलें जें कल्याण होते, ज्याच्या योगाने जीवाला समाधान प्राप्त होते, त्याचे अत्यंत गोड निरूपण श्रीकृष्ण दोन लोकांनी सांगत आहेत ६७.


    क्षिप्तोऽवमानितोऽसद्भिः प्रलब्धोऽसूयितोऽथवा ।
    ताडितः सन्निबद्धो या वृत्त्या वा परिहापितः ॥ ५७ ॥
    निष्ठितो मूत्रितो वाज्ञैर्बहुधैवं प्रकम्पितः ।
    श्रेयस्कामः कृच्छ्रगत आत्मनाऽऽत्मानमुद्धरेत् ॥ ५८ ॥
    श्लोक ५७-५८] दुर्जनांनी धक्के मारून बाहेर हाकलले, अपमान केला, उपहास केला, निंदा केली, मारपीट केली, बांधून ठेवले, उपजीविकेचे साधन काढून घेतले, अंगावर थुंकले, मूत्रविसर्जन केले किंवा निरनिराळ्या प्रकारे त्रास देऊन चित्त विचलित करण्याचा प्रयत्‍न केला किंवा अशा तर्‍हेचे कोणतेही संकट असले, तरी ज्याला आपले कल्याण करून घेण्याची इच्छा आहे, त्याने आपल्या विवेकबुद्धीने त्या अडचणींपासून स्वतःचे रक्षण करावे. (५७-५८)


    देहाभिमानी तामस जन । अतिदुष्ट जे दुर्जन ।
    तिंहीं साधूंसी करितां छळण । शांतीस्तव सज्जन क्रोधी नव्हती ॥ ६८ ॥
    देहाभिमान बाळगणारे असे जे तामसी, अत्यंत दुष्ट व दुर्जन असतात, त्यांनी साधूंचा छळ केला, तरी त्या साधूंजवळ शांति असल्यामुळे ते कधीही क्रोधाच्या आधीन होत नाहीत ६८.


    अल्पउपद्रवीं जाण । न येती क्रोधा सज्ञान ।
    तैसें नव्हे अतिनिर्वाण । पीडा दारुण करितांही ॥ ६९ ॥
    जे ज्ञानसंपन्न असतात, ते अल्पस्वल्प उपद्रवानें क्रोधाला येत नाहीत. किंवा त्यांचा अतिशय छळ केला, तरीही ते अत्यंत कोपायमान होत नाहीत ६९.


    कायिक वाचिक मानसिक । त्रिविध पीडा देतां देख ।
    साधु निजशांतीं नेटक । जाणोनि विवेक ते साहती ॥ ६७० ॥
    कायिक, वाचिक आणि मानसिक अशा तीन प्रकारच्या पीडा आहेत. परंतु साधु पुरुष आपल्या शांतवृत्तींतच अढळ असल्यामुळे ते सर्व विवेक जाणून सहन करतात ६७०.


    उजू बोलतां शुद्ध युक्ती । आक्षोपूनि हेडाविती ।
    झिडकावूनियां निर्भर्त्सिती । अपमानिती सभेसी ॥ ७१ ॥
    साधूंनी केवळ युक्तीने सरळ भाषण केले तरी लोक त्यावर आक्षेप घेऊन त्यांचा उपहास करतात, त्यांना झिटकारून त्यांची निर्भसना करतात, इतकेच नव्हे, तर भर सभेतही त्यांचा अपमान करतात ७१.


    शब्दीं शब्दाचे करूनि छळ । म्हणती दुष्ट दुर्जन दुःशीळ ।
    अपवित्र अमंगळ । नष्ट चांडाळ हा एक ॥ ७२ ॥
    शब्दांनीच शब्दच्छळ करून हा दुष्ट आहे, दुर्जन आहे, दुःशील आहे. अपवित्र भाडे, अमंगल आहे, नष्ट चांडाळ आहे, असे म्हणतात ७२.


    ऐशा दुर्जनांच्या दुष्टोक्ती । साधु साहे निजशांती ।
    ते शांतीची उपपत्ती । विवेकस्थिती अवधारीं ॥ ७३ ॥
    अशी दुर्जनांनी किती जरी दुष्ट भाषणे केली, तरी साधु आपल्या शांत वृत्तीनें तें सर्व सहन करीत असतो. ती शांति उत्पन्न होण्याचे कारण, आणि विवेकाचे स्वरूप ही ऐक ७३. 


    पराची जिव्हा वोठ हालती । माझ्या अंगीं ते न रुपती ।
    यालागीं क्रोध न ये चित्तीं । निजशांती ढळेना ॥ ७४ ॥
    दुसऱ्याची जीभ आणि ओठ हालतात ते काही माझ्या आंगांत रुतत नाहीत, असा त्याचा समज असल्यामुळे त्याच्या मनांत क्रोध म्हणून येतच नाही. आणि त्याची शांतीही ढळत नाहीं ७४.


    सभेसी सन्मानें पूजितां । लोटूनि घातला खालता ।
    हाणोनियां चरण्घाता । नेला परता अपमानें ॥ ७५ ॥
    सभेत सन्मानाने त्याची पूजा केली, किंवा बैठकीवरून खाली लोटून दिले, किंवा त्याला लाथा मारल्या, त्याचा अपमान करून पलीकडे ढकलला ७५, 


    सन्मानें जेथ पूजूं नेती । तेथ केवळ असे क्षिती ।
    अपमानें जेथ लोटिती । तेथही क्षिती तेचि पैं ॥ ७६ ॥
    तरी तो म्हणतो की, जेथे माझा सन्मान करून पूजा करावयाला नेतात, तेथेही पृथ्वीच असते, आणि अपमान करून जेथें ढकलून देतात, तेथेही तीच पृथ्वी असते ७६.


    येथ मान अपमान । कल्पना मनाची जाण ।
    ऐसेनि विवेकें सज्जन । द्वेषीना जन निजशांती ॥ ७७ ॥
    अशा प्रसंगी मान झाला किंवा अपमान झाला तरी ती केवळ मनाची कल्पनाच होय. असा विचार करून सज्जन असतो तो शांत वृत्तीमुळे कोणाचाच द्वेष करीत नाही ७७. 


    प्रलोभूनि नाना युक्ती । धनें ठकवूनियां निर्भर्त्सिती ।
    धनलोभ केवळ अधःपाती । त्याची निवृत्ती जिंहीं केली ॥ ७८ ॥
    अनेक प्रकारच्या युक्तींनी साधूला लोभाच्या पाठीमागे लावून फसवितात व त्याचे द्रव्य घेऊन आणखी वर निर्भत्सना करितात, तेव्हां साधु असे समजतो की, द्रव्यलोभ हा निखालस अधःपाताला नेणारा आहे, म्हणून ते द्रव्यच ज्यांनी नेलें  ७८, 


    त्यांसी निंदितांचि जाण । दोषी होइजे आपण ।
    यालागीं क्रोधा न ये मन । शांति संपूर्ण ढळेना ॥ ७९ ॥
    त्यांची निंदा केली तर आपणालाही दूषणच लागेल. म्हणून त्याच्या मनाला क्रोध येत नाही व पूर्ण शांतींत अंतर पडत नाही ७९.


    शुद्ध बोलती शास्त्रार्थ । अर्थ तितुका अनर्थ ।
    त्या अनर्था जो करी निवृत्त । त्यातें द्वेषित ते मूर्ख ॥ ६८० ॥
    साधु अशी समजूत करून घेतो की, 'अर्थ आहे तितका अनर्थ' असा तर स्पष्ट शास्त्रार्थच सांगतात. मग त्या अनर्थापासून साधूला जो निवृत्त करितो, त्याचा द्वेष करितात ते मूर्ख होत ६८०.


    सद्‌गुणीं दोष आरोपिती । नानापरी निंदा करिती ।
    तेणें हित मानिती चित्तीं । तारक निश्चितीं हे माझे ॥ ८१ ॥
    अज्ञानी लोक सद्गुणांवर दोषारोप करतात, अनेक प्रकारची निंदा करतात, आणि त्यांतच आपले हित आहे असें मनांत समजतात, तेच माझे खरोखर तारक होत ८१.


    मातेचे जे करतळ । ते वरिवरी क्षाळिती बाह्य मळ ।
    हे जनक माझे केवळ । सबाह्य मळ सकळ जिव्हाग्रें धुती ॥ ८२ ॥
    मातेचे हात माझ्या आंगावरील बाहेरचा मळ तेवढाच धुवून काढतात, पण हे तर माझ्या बापासमान होत. कारण हे माझा आंतला व बाहेरचा. मळही जिव्हाग्राने धुवून काढतात ८२.


    ऐशियांचें करितां छळण । हितास नाडिजे आपण ।
    कोणाचे न बोले दोषगुण । तेणें शांति जाण थोरावे ॥ ८३ ॥
    अशांचा छळ केला, तर आपणच आपल्या हितावर पाणी सोडल्यासारखे होईल, असा विचार करून तो साधु कोणाचे दोष किंवा गुण उच्चारीत नाही. म्हणूनच त्याच्या आंगांत शांति वाढलेली असते ८३.


    चाले जेणें जीविकास्थिती । धन धान्य क्षेत्र वृत्ती ।
    छळें बळें हिरोनि नेती । तेणेंही चित्तीं क्षोभ नुपजे ॥ ८४ ॥
    ज्याच्या योगाने उपजीविका चालते, ते द्रव्य , धान्य किंवा शेतवाडी छळ करून बलात्कारानें कोणी हिसकावून घेतली, तरीसुद्धा साधूच्या मनात राग उत्पन्न होत नाही ८४.


    येथ लाभालाभ दैवाधीन । त्यासी देतेंघेतें तेंचि जाण ।
    यालागीं द्वेषीना जन । शांतीचा गुण न सांडी ॥ ८५ ॥
    इहलोकांत लाभ होणे किंवा न होणे हे केवळ दैवाधीन आहे, त्यांना देणारे किंवा नेणारे तेंच आहे, असे म्हणून तो कोणाचाच द्वेष करीत नाही आणि शांतीचा गुण सोडीत नाही ८५.


    वृत्ति घेऊनि उगे नसती । अन्यायी म्हणॊनि बांधिती ।
    एक तोंडावरी थुंकिती । एक माथां मुतती अतिदुष्ट ॥ ८६ ॥
    बरें, दुष्ट लोक साधूची शेतवाडी घेऊन देखील गप्प बसत नाहीत. तो मोठा अन्यायी आहे असे ठरवून त्याला बांधितात, कोणी तोंडावर थुकतात व जे कोणी अत्यंत दुष्ट असतात ते डोक्यावर मुततात ८६.


    एक ताडिती पाडिती । एक नानापरी गांजिती ।
    तरी अंगींची ढळेना शांती । विवेक सांगाती सज्जना ॥ ८७ ॥
    कोणी मारतात, कोणी पाडतात, कोणी अनेक प्रकारचा छळ करतात. पण सज्जनांजवळ निरंतर विवेक असल्यामुळे त्यांच्या आंगची शांति ढळत नाही ८७.


    थुंका आणि जें मूत । तें देहाचिमाजीं उपजत ।
    देहींचें देहास लागत । क्षोभ तेथ कोण मानी ॥ ८८ ॥
    थुका आणि मूत हें  जे आहे ते देहापासूनच उत्पन्न होते, आणि ते देहांतले देहालाच लागते, त्याचा राग कोण मानितो? ८८.


    थुंका आणि जें मूत । जैसें देहीं उपजे देहाचें अपत्य ।
    देहाचें देहावरी खेळत । दुःख तेथ कोणांचें ॥ ८९ ॥
    थुंका आणि मूत ही देहापासूनच जसें मूल उत्पन्न व्हावे त्याप्रमाणे उत्पन्न होतात आणि ती देहाची देहावरच खेळतात. त्यांत दुःख कसले ? ८९.


    धरितां मारितां म्हणे देख । देहो तितुका पांचभौतिक ।
    मारिता मारिजता दोनी एक । कोणाचें दुःख कोणासी ॥ ६९० ॥
    साधूला कोणी धरले किंवा मारले तर तो म्हणतो की, 'हे पहा ! देह आहे तितका पंचमहाभूतांपासून झालेला आहे. अर्थात् मारणारा आणि मार खाणारा दोन्ही एकच होत. तेव्हां कोणी कोणाचे दुःख मानावे ?' ६९०. 


    ऐशी सविवेकें ज्यासी शांती । चारी मुक्ती त्याच्या दासी होती ।
    त्याचा अंकिला मी श्रीपती । यावरी प्राप्ती ते कायी ॥ ९१ ॥
    अशा विचाराने ज्याला शांति प्राप्त होते, त्याच्या चारीही मुक्ति दासी होऊन राहतात. मी प्रत्यक्ष श्रीकृष्णही त्याचा चाकर होतो. यापेक्षा अधिक लाभ तो कोणता ? ९१.


    तेथ केवळ जो मोक्षार्थी । तेणें सर्वस्वें पाळावी शांती ।
    ते दुःखसागरावर्तीं । होय तारिती सुखरूप ॥ ९२ ॥
    त्यांत जो केवळ मोक्षार्थीच आहे, त्याने तर सर्वस्वेकरून शांति पाळावी. म्हणजे दुःखरूप समुद्राच्या भोवऱ्यातून तीच सुखरूपतेने तारील ९२.


    वैराग्य योग ज्ञान ध्यान । त्याचें फळ तें शांति जाण ।
    ते शांति साधूनि संपूर्ण । आपणिया आपण उद्धरिती ॥ ९३ ॥
    वैराग्य, योग, ज्ञान किंवा ध्यान यांचे जें फळ  तीच शांति होय. ती शांति पूर्णपणे साध्य करून साधु आपला आपणच उद्धार करून घेतात ९३.


    यालागीं उद्धवा जाण । साहोनि द्वंद्वांचें काठिण्य ।
    शांति साधूनि संपूर्ण । ब्रह्म परिपूर्ण पावावें ॥ ९४ ॥
    ह्याकरिता उद्धवा ! असे समज की, शीत-उष्ण, सुख-दुख इत्यादि द्वंद्वांतील कठिणपणा आहे तो सहन करून परिपूर्ण शांति साधावी आणि पूर्णब्रह्मस्वरूपाला पोचावें ९४.


    पूर्ण ब्रह्म पावल्यापाठीं । जन्ममरणाची खुंटे गोठी ।
    परमानंदें पडे मिठी । भवभयाची तुटी तैं होय ॥ ९५ ॥
    पूर्णब्रह्माला पोचल्यानंतर जन्ममरणाची गोष्टच खुंटते; आगि परमानंदाची मिठी पडली की, त्याच वेळी संसारभय नष्ट होते ९५.


    ऐकोनि श्रीकृष्णाचे बोला । उद्धव अत्यंत चाकाटला ।
    द्वंद्वबाध जो ऐकिला । तो न वचे साहिला आम्हांसी ॥ ९६ ॥
    हें  श्रीकृष्णाचे भाषण ऐकून उद्धव अतिशय चकित झाला. तो म्हणाला, ही जी एवढा वेळ सुखदुःखादि द्वंद्वांची पीडा ऐकली, ती आपल्याला काही सहन होणार नाही ९६.


    ऐकिल्या नाहीं ये शांतीच्या गोष्टी । मा केवीं देखिजेल दृष्टीं ।
    ऐशी शांति ज्याच्या पोटीं । तो पुरुष सृष्टीं नसेल ॥ ९७ ॥
    असल्या ह्या शांतीच्या गोष्टी आपण कधी कानांनी ऐकलेल्यासुद्धा नाहीत, मग डोळ्यांनी कशा पहाणार? अशी शांति ज्याच्या अंतःकरणांत राहील, असा तो पुरुष या साऱ्या पृथ्वींतसुद्धा नसेल ९७.


    मागें ऐकिली ना देखिली । ऐशी शांति त्वां कैंची काढिली ।
    हे ऐकतां तुझी बोली । भयें दचकली बुद्धि माझी ॥ ९८ ॥
    हे कृष्णा ! पूर्वी कधी ऐकिली , नाहीं की पाहिली नाही अशी ही शांति तूं काढलीस तरी कोठून ? हें तुझे भाषण ऐकून माझी बुद्धि तर भयाने अगदी गांगरून गेली आहे ९८.


    ऐशी शांति ज्यासी आहे । तो मागें झाला ना पुढें होये ।
    देवो बोलिला निजनिर्वाहें । तें दुःसह होये आम्हांसी ॥ ९९ ॥
    अशी शांति ज्याला लाभली आहे, असा मागे कोणी झाला नाही व पुढे कोणी व्हावयाचाही नाही. देवांनी जो निग्रह सांगितला तो आम्हांला साधणे परम दुर्घट आहे ९९.


    ज्या सांगीतले द्वंद्वांसी । ते अतिदुःसह योगियांसी ।
    केवीं साहवे आम्हांसी । तेंचि देवासी पूसत ॥ ७०० ॥
    ज्या द्वंद्वाचे वर्णन तूं सांगितलेंस, तें द्वंद्व योग्यालासुद्धा सहन होणे कठीण. मग आम्हांला कसे सहन होईल ? तेंच देवाला विचारीत आहे ७००.

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...