मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २१ ओव्या ४०१ ते ५००

    जेवीं कां विष्ठा भक्षी सूकर । उपेक्षी कस्तुरी कापुर ।

    तेवीं सूक्ष्मवेदाचें निजसार । सकाम नर उपेक्षिती ॥ १ ॥
    डुक्कर ज्याप्रमाणे कस्तूरी वा कापूर टाकून विष्ठाच खात बसते, त्याप्रमाणे सूक्ष्मवेदाचें जें  अंतरंग त्याची सकाम पुरुष उपेक्षा करितात १.


    मी निजानंद हृदयाआंत । त्या मज उपेक्षूनि भ्रांत ।
    कामासक्तीं लोलंगत । द्वारें वोळंगत नीचांचीं ॥ २ ॥
    मी निजानंदस्वरूपी प्रत्येकाच्या हृदयांतच राहात असतां, भ्रांतिष्ट लोक कामासक्तीने लोलिंगत होऊन नीचांचे उंबरठे झिजवीत असतात २.


    त्या हृदयस्थ देवाचें ध्यान । नित्य योग्यासी निदिध्यासन ।
    सम करोनि प्राणापान । सदा अनुसंधान नादाचें ॥ ३ ॥
    योगी लोक मात्र त्या हृदयस्थ देवाचें ध्यान करीत असतात, त्याचा त्यांना निदिध्यास लागलेला असतो, प्राणापान सम करून ते निरंतर नादाचें अनुसंधान ठेवतात ३.


    माझें वेदतत्त्व जें कां गुप्त । प्रणवरूपें हृदयाआंत ।
    योगीसदा अनुभवित । त्यांचे स्वरूप निश्चित अवधारीं ॥ ४ ॥
    माझें वेदरहस्य जें  गुप्त म्हणून आहे, ते प्रणवरूपाने हृदयाच्या आंतच आहे ; योगी सर्वकाळ त्याचा अनुभव घेतात. त्याचे निश्चितस्वरूप सांगतों ऐक ४.


    जैसा कमळमृणाळबिसतंत । तैसा लूक्ष्म नाद अत्यंत ।
    नाभीपासोनि ब्रह्मरंध्रांत । ओंकार स्वरांत लक्षिती ॥ ५ ॥
    कमळाच्या देठांतील कोमल तंतूप्रमाणे हा अत्यंत सूक्ष्म नाद नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत असलेला ओंकारस्वरूपाने लक्षितात ५.


    ऐसा ओंकाराच्या स्वराआंत । नाभीपासोनि ब्रह्मरंध्रांत ।
    सूक्ष्म नादाचा निजतंत । योगधारणा राखत महायोगी ॥ ६ ॥
    अशा प्रकारच्या नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत ओंकाररूपाने चालणारा जो सूक्ष्म नादरूपी तंतु, तो महायोगी योगधारणेनें अनुसंधानांत राखतात ६.


    हाचि नाद पैं प्रस्तुत । लौकिकीं असे भासत ।
    दोंही कर्णीं देतां हात । तोचि घुमघुमित निजनादु ॥ ७ ॥
    हाच नाद लोकांत दोन्ही कानांवर दोन हात ठेवले म्हणजे घुमघुमत असलेला ऐकू येतो ७.


    योगी म्हणती 'अनाहत शब्द' । वेदांती म्हणती 'सूक्ष्म नाद' ।
    आम्ही म्हणों हा 'शुद्धवेद' । असो अनुवाद हा नांवांचा ॥ ८ ॥
    योगी लोक ह्याला ' अनाहतशब्द ' म्हणतात. वेदांती लोक ह्यालाच 'सूक्ष्मनाद ' असें म्हणतात, व आम्ही ह्याला 'शुद्ध वेद ' असे म्हणतों. पण हा नांवाचा अनुवाद असू द्या ८.


    ऐशिया स्वतःसिद्ध वेदापाशीं । श्रद्धा नुपजेचि प्राणियांसी ।
    यालागीं सूक्ष्म वेद स्थूलतेसी । म्यां जनहितासी आणिला ॥ ९ ॥
    अशा स्वत:सिद्ध वेदावर मनुष्याची श्रद्धा बसत नाहीं; म्हणून तो सूक्ष्मवेदच मी लोककल्याणाकरिता स्थूलरूपाला आणला ९.


    तोचि स्थूलत्वें झाला प्रकट । ते प्रकट होती वेदवाट ।
    दृष्टांतेंकरूनि स्पष्ट । तुज मी चोखट सांगेन ॥ ४१० ॥
    हा जो स्थूलरूपाने प्रगट झालेला वेद, तोच वेदाचा प्रसिद्ध मार्ग बनला. तेच दृष्टांताने तुला अगदी स्पष्ट करून सांगतों ऐक ४१०.


    ऐसें बोलिला श्रीनिवास । तेणें उल्हासला हृदयहंस ।
    म्हणे मजकारणें हृषीकेश । अत्यंत सौरस निरूपणीं ॥ ११ ॥
    असें श्रीकृष्ण बोलले त्यामुळे उद्धवाच्या आत्म्याला मोठा संतोष झाला. आणि म्हणाला, श्रीकृष्ण माझ्यासाठी फारच सुरस निरूपण करताहेत ११.


    मजवरी बहुत स्न्नेहाळ । मज उद्धारावया गोपाळ ।
    निरूपणीं सुकाळ । अतिसरळ अमृतरसु ॥ १२ ॥
    माझ्यावर फारच प्रेम असल्यामुळे केवळ माझा उद्धार करण्याकरितांच श्रीकृष्ण हे निरूपणाचा सुकाळ करून त्यांत अमृताहूनही गोड रस भरीत आहेत १२.


    ऐसें उद्धवाचें बोलणें ऐकोनी । काय बोलिला सारंगपाणी ।
    म्हणे मी तोचि निरूपणीं । सांगेन तुजलागोनी उद्धवा ॥ १३ ॥
    उद्धवाचे भाषण ऐकून श्रीकृष्ण काय म्हणाले ? ते म्हणाले की, उद्धवा ! तोच (वेद) आतां तुला मी निरूपणामध्ये सांगून देतो १३.


    यथोर्णनाभिर्हृदयादूर्णामुद्वमते मुखात् ।
    आकाशाद्घोिषवान्प्राणो मनसा स्पर्शरूपिणा ॥ ३८ ॥
    छन्दोमयोऽमृतमयः सहस्त्रपदवीं प्रभुः ।
    ओंकाराठद्व्य ञ्जितस्पर्शस्वरोष्मान्तःस्थभूषिताम् ॥ ३९ ॥
    विचित्रभाषाविततां छन्दोभिश्चतुरुत्तरैः ।
    अनन्तपारां बृहतीं सृजत्याक्षिपते स्वयम् ॥ ४० ॥
    [श्लोक ३८-४०] कोळीकीटक हृदयात उत्पन्न होणारे तंतू आपल्या तोंडातून बाहेर काढतो, त्याप्रमाणे अमृतमय, वेदमय प्रभू प्राणाच्या उपाधीने नादवान होऊन, मनाला निमित्त करून हृदयाकाशातून ॐकारापासून हजारो प्रकारची वैखरी वाणी प्रगट करतो ती वाणी 'स्पर्श'. ('क' पासून 'म' पर्यंत व्यंजने), स्वर. ('अ' पासून 'औ' पर्यंत) ऊष्म. (श, ष, स, ह) आणि अंतःस्थ. (य, र, ल, व) या वर्णांनी विभूषित झालेली आहे तीमध्ये उत्तरोत्तर चार चार वर्णांनी वाढत जाणारे छंद आहेत आणि तिचा वेगवेगळ्या भाषांच्या रूपाने विस्तार झाला आहे तिचा पार लागणे कठीण आहे तोच प्रभू ती वाणी प्रलयकाली स्वतःमध्ये विलीन करून घेतो. (३८-४०)


    ऊर्णनाभि म्हणिजे कांतणी । ते जेवीं निजमुखापासूनी ।
    तंतु काढी अतिसूक्ष्मपणीं । तेवीं निर्गुणीं 'ओंकार' ॥ १४ ॥
    ऊर्णनाभि म्हणजे कांतीण (कोळी), ती जशी आपल्या तोंडांतून अतिशय बारीक असे तंतु काढते, त्याप्रमाणेच निर्गुणामधून ओंकाराचा धागा निघतो १४.


    तो ओंकार होतां सप्राण । सहजस्वभावें गा जाण ।
    झाला 'हिरण्यगर्भ' अभिधान । आपणिया आपण वेदाज्ञा ॥ १५ ॥
    तो ओंकार आपल्या स्वभावधर्मानुसार 'सप्राण' म्ह. सचेतन होतांच 'हिरण्यगर्भ ' संज्ञक होतो असें वेदांत सांगितले आहे १५.


    'प्रभु' म्हणजे ऐश्वर्यख्याति । अचिंत्यानंत त्याची शक्ति ।
    तो छंदोमय वेदमूर्ती । जाण निश्वितीं उद्धवा ॥ १६ ॥
    उद्धवा ! तोच 'प्रभु' म्ह. ऐश्वर्ययुक्त स्वामी होय. त्याची शक्ति अचिंत्यानंत आहे. आणि तोच छंदोमय वेदमूर्ति होय असें तूं जाण १६.


    तो अविनाशी वास्तवस्थिती । नित्य सुखमय सुखमूर्ती ।
    तेणें सप्राण नादाभिव्यक्ति । मनःशक्ती चेतवी ॥ १७ ॥
    तो वस्तुतः अविनाशी असून नित्य सुखमय व सुखमूर्तिच आहे. तो प्राणोपाधि घेऊन नादरूपाने मनःशक्तीला जागृत करतो १७.


    चेतविली जे मनःशक्ती । होय स्पर्श-स्वर-वर्ण कल्पिती ।
    वेदाज्ञ 'बृहती' म्हणती । जिचा अपरिमिती विस्तार ॥ १८ ॥
    ही जी जागृत केलेली मनःशक्ति असते, तीच स्पर्श-स्वर-वर्ण यांना निर्माण करते. हिलाच वेदवेत्ते पुरुष 'बृहती' असे म्हणतात. कारण हिचा विस्तार अपरिमित आहे १८.


    ते स्वरवर्णसंवलित मंत्र । हृदयाकाशीं विचित्र ।
    सहस्त्रशाखीं विस्तार । वाढली अपार वैखरी ॥ १९ ॥
    ते स्वरांनी व वर्णांनी युक्त असलेले मंत्र, हृदयाकाशामध्ये विलक्षण रीतीनें हजारों शाखांनी विस्तार पावतात. याप्रमाणे वैखरी वाणीचा विस्तार अपरंपार वाढला आहे १९.


    स्वरवर्णादि उच्चारीं । वेदधिष्ठान वैखरी ।
    ते उपजली जेणेंकरी । तेही परी सांगेन ॥ ४२० ॥
    स्वर आणि वर्ण इत्यादिकांच्या उच्चाराने वेदांना अधिष्ठान असणारी वैखरी वाणी कशी उत्पन्न झाली, तोही प्रकार सांगतों ऐक २० .


    मात्रात्रयमिळणीं लोक । ओंकार बोलती आवश्यक ।
    हा ओंकार अलोलिक । अतिसूक्ष्म देख देहस्थ ॥ २१ ॥
    अ-उ-म या तीन मात्रा एकत्र झाल्या म्हणजे लोक त्याला 'ओंकार' म्हणतात. हा ओंकार अलौकिक असून अत्यंत सूक्ष्म रूपाने देहांतच असतो २१.


    त्याचि ओंकारासी प्राणसंगती । आधारादि चक्रीं ऊर्ध्वगती ।
    तेथ वाचांची होय अभिव्यक्ती । परा-पश्यंती-मध्यमा ॥ २२ ॥
    त्याच ओंकाराला प्राणाच्या संगतीनें मूलाधारादि चक्रामध्ये ऊर्ध्वगति  सुरू होते, तेव्हां परा, पश्यंती, मध्यमा वाणींची अभिव्यक्ति होते २२.


    परावाचेच्या अभ्यंतरीं । जन्मे पश्यंती ज्येष्ठकारी ।
    मध्यमा जन्मे तिच्या उदरीं । एवं परस्परीं जन्मती ॥ २३ ॥
    परा वाणीच्या आंत 'पश्यंती' श्रेष्ठत्वाने जन्मास येते. तिच्या पोटीं 'मध्यमा' जन्मास येते. अशा त्या एकमेकींपासूनच उत्पन्न होतात २३.


    तैशाचि येरीतें येरी । नोसंडोनि क्षणभरी ।
    चालती उपरांउपरी । चक्रींच्या चक्रांतरीं समवेत ॥ २४ ॥
    त्याचप्रमाणे त्या एकमेकींना सोडून कधीं एक क्षणभरही राहात नाहीत. त्या एकमेकींना घेऊन एक चक्र ओलांडलें म्हणजे दुसरें चक्र 


    'आधारचक्रीं' परा वाचा । 'स्वाधिष्ठानीं' जन्म पश्यंतीचा ।
    'मणिपूरीं' हूनि 'विशुद्धी' चा । ठायीं मध्यमेचा रिगुनिगू ॥ २५ ॥
    व दुसरे ओलांडले म्हणजे तिसरे चक्र, अशा रीतीने वर वरच चढत जातात २४.


    तेथोनियां मुखद्वारीं । वाचा प्रकाशे वैखरी ।
    तैं स्वर-वर्ण-उच्चारीं । नानामंत्रीं गर्जत ॥ २६ ॥
    'मूलाधार' चक्रामध्ये परा वाचा उत्पत्र होते. 'स्वाधिष्ठान' चक्रामध्ये पश्यंतीचा जन्म होतो, आणि 'मणिपूर' चक्रापासून 'विशुद्धी ' चक्रापर्यंत  मध्यमेची जा-ये चालत असते २५.


    तेचि स्वर आणि वर्ण । सांगेन 'स्पर्श' व्यक्तिलक्षण ।
    'अंतस्थ' 'ऊष्म' कोण कोण । विभागलक्षण अवधारीं ॥ २७ ॥
    तेथून मुखाच्या द्वारें वैखरी' वाणी प्रगट होते. तेव्हा ती स्वरवर्ण यांच्या उच्चाराने अनेक मंत्ररूपाने गर्जत असते २६.


    केवळ 'अ क च ट त प' देख । हे ककारादि पंच पंचक ।
    स्पर्शवर्णाचें रूपक । अक्षरें निष्टंक पंचवीस ॥ २८ ॥
    त्याच स्वरांमध्ये आणि वर्णामध्ये 'स्पर्श' वर्ण कोणते, 'अंतस्थ' वर्ण कोणते, व 'ऊष्म वर्ण कोणते, यांचा विभाग तूं ऐक २७.


    सवर्णें गर्जतां उच्चार । ते अकारादि सोळाही स्वर ।
    'य र ल व' यांचा विचार । जाण साचार 'अंतस्थ' ॥ २९ ॥
    केवळ अ ते अः हे स्वर ; कवर्ग, चवर्ग, टवर्ग, तवर्ग व पवर्ग अशी पांच वर्णांची पांच पंचके म्हणजे पंचवीस अक्षरें, यांना स्पर्शवर्ण म्हणतात २८.


    'श ष स ह' हे वर्ण चारी । 'ऊष्म' बोलिजे शास्त्रकारीं ।
    विसर्गादि अनुस्वारीं । 'अंअः' वरी विभागु ॥ ४३० ॥
    ज्यांच्या साहाय्यानेच वर्णाचा नीट उच्चार होतो ते अकारादिक सोळा 'स्वर' होत. य, र, ल, व यांना 'अंतस्थ' वर्ण म्हणतात २९.


    येथ बावन्नावी मातृका एक । केवळ 'क्ष' कारु गा देख ।
    यांतु सानुनासिक निरनुनासिक । जाणति लोक शास्त्रज्ञ ॥ ३१ ॥
    आणि श, ष, स, ह या चार वर्णाना शास्त्रकार 'उष्म ' वर्णं म्हणतात. अ-अ: हे अनुस्वार व विसर्गविभाग होत ४३०.


    एवं स्वरवर्णविधिउच्चारीं । लौकिकी वैदिकी भाषावरी ।
    वेदशास्त्रार्थप्रकारीं । वाढली वैखरी शब्दचातुर्यें ॥ ३२ ॥
    ह्यांत क्षकार ही केवळ बावन्नावी  मातृका होय. यांत आणि आणखी निरनुनासिक व सानुनासिक हे भेद असलेले शास्त्रज्ञ लोक जाणतातच ३१.


    बोलेंचि गा बोलाप्रती । चाळूनि नाना उपपत्ती ।
    बोलें बोल निगृहिती । युक्तिप्रयुक्ती साधुनी ॥ ३३ ॥
    अशा प्रकारे स्वर व वर्ण यांच्या यथाशास्त्र उच्चाराने व वेदशास्त्रांच्या अर्थप्रकारांनी लौकिक आणि वैदिक भाषा विस्तारलेली आहे. ३२.


    ऐशिया नानाशब्दकुसरीं । अत्यंत विस्तरिली वैखरी ।
    तेचि चौं चौं अक्षरीं । वाढवूनि धरी नाना छंदें ॥ ३४ ॥
    शब्दांच्या नाना प्रकारच्या उपपत्ति लावून, युक्तिप्रयुक्तीनें शब्दानेच शब्दाचे खंडन करितात ३३.


    वाढतां चतुरक्षरभेदें । उत्तरोत्तर नाना छंदें ।
    वाढविलीं स्वयें वेदें । निजज्ञान बोधें बोलूनि ॥ ३५ ॥
    अशा नानाप्रकारच्या शब्दकौशल्याने ही वैखरी वाणी अतिशयच विस्तारली आहे. तीच चार चार चार अक्षरांनी वाढून तिचेच अनेक छंद झाले आहेत ३४.


    अतएव अनंत अपार । अर्थतां शब्दतां अतिसुस्तर ।
    माझ्या शब्दज्ञानाचा पार । सुरनर नेणती ॥ ३६ ॥
    अशा प्रकारे उत्तरोत्तर चार चार अक्षरांच्या वाढण्याने नवे नवे अनेक छंद साधून वेदाने आपल्या ज्ञानाचा बोध बोलून दाखविला  आहे ३५.


    ऐशी वैखरीची अनंतशक्ती । यालागीं म्हणिजे ते 'बृहती' ।
    इच्या विस्ताराची गती । स्वयें नेणती शिव स्त्रष्टा ॥ ३७ ॥
    म्हणूनच ती वैखरी वाणी अनंत आणि अपार आहे. शब्दतः व अर्थतः ती अत्यंत कठिण आहे. माझ्या शब्दज्ञानाचा अंतपार सुरांनरांनाही लागत नाही ३६.


    हिरण्यगर्भत्वें स्वयें जाण । जीव-शिव-अंतर्यामीलक्षण ।
    माझी वेदाज्ञा प्रकाशी आपण । जिचें नामाभिधान 'वैखरी' ॥ ३८ ॥
    वैखरीची अशी अनंत शक्ति आहे, म्हणूनच तिला 'बृहती' असे म्हणतात. हिच्या विस्ताराची मर्यादा शंकर व ब्रह्मदेवही जाणत नाहीत ३७.


    जो मी वेदात्मा श्रीहरी । तो वेदु या रीतीं विस्तारीं ।
    स्वयें विस्तारोनि संहारीं । मर्यादेवरी स्वकाळें ॥ ३९ ॥
    स्वतः हिरण्यगर्भाच्या रूपाने जीव, शिव आणि अंतर्यामी यांना माझी वेदाज्ञा प्रगट करते. तिचंच नामाभिधान 'वैखरी' ३८.


    मागां बोलिलीं छंदें जाण । त्या छंदांचें निजलक्षण ।
    स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । जो वेदाचें कारण निजस्वरूप ॥ ४४० ॥
    जो वेदात्मा श्रीहरि, तो मी अशा रीतीने वेदाचा विस्तार करतो. स्वत:च विस्तार करून त्याची ठरीव मर्यादा संपल्यावेळी त्याचा संहारही मीच करतों ३९.


    गायत्र्युष्णिगनुष्टप् च बृहती पङ्‌क्तिरेव च ।
    त्रिष्टब्जगत्यतिच्छन्दो ह्यत्यष्ट्यतिजगद्विराट् ॥ ४१ ॥
    पूर्वी छंद सांगून दिले त्या छंदाचें निज लक्षण, वेदाचे कारण जो परमात्मा श्रीकृष्ण तो स्वत:च सांगत आहे ४४०.


    सकळ छंदांचें अधिष्ठान । मुख्य गायत्री छंद जाण ।
    त्या गायग्री छंदाचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥ ४१ ॥
    [श्लोक ४१] काही छंद पुढीलप्रमाणे आहेत गायत्री, उष्णिक, अनुष्टुभ्‌, बृहती, पंक्ती, त्रिष्टुभ, जगती, अतिच्छंद, अत्यष्टी अतिजगती आणि विराट. (४१)


    आठाअठां अक्षरीं त्रिपद । गणितां जेथ यती शुद्ध ।
    त्या नांव 'गायत्री' छंद । हें वेदानुवाद निजबीज ॥ ४२ ॥
    'गायत्री छंद' हा सर्व छंदांचे मुख्य अधिष्ठान होय. त्या गायत्री छंदाचे लक्षण तुला सविस्तर सांगतों ऐक ४१.


    हें वेदाचें निजजिव्हार । ब्रह्मज्ञानाचें परपार ।
    परमानंदाचें सोलींव सार । जाण साचार गायत्री ॥ ४३ ॥
    आठ आठ अक्षरांचे तीन चरण आणि मोजतांना  ज्यांत शुद्ध यति (विराम) येतो, त्याला गायत्री छंद असें म्हणतात. वेदोक्तींतील हेच काय ते मुख्य बीज होय ४२.


    हें चैतन्याचें जीवन । मज गोप्याचें गुप्तधन ।
    जेथ जीवशिवां समाधान । तें हें छंद जाण गायत्री ॥ ४४ ॥
    वेदाचे रहस्य, ब्रह्मज्ञानाचे परतीर, आणि परमानंदाचे सोलीव सार तीच ही गायत्री होय ४३.


    ये छंदींचे एक एक अक्षर । अक्षराचें निजसार ।
    सच्चिदानंदाचें निजभांडार । जाण साचार गायत्री ॥ ४५ ॥
    ही चैतन्याचे जीवन व माझ्या गुप्ताचे गुप्तधन आहे. ज्यांत जीवा-शिवाचे समाधान होते, तोच हा गायत्री छंदच होय ४४.


    करितां गयत्रीचें अनुष्ठान । विश्वामित्र झाला ब्राह्मण ।
    मी कृष्ण वंदीं त्याचे चरण । माझाही तो गुरु जाण रामावतारीं ॥ ४६ ॥
    ह्या छंदांतील एक एक अक्षर हे अक्षराचे म्ह० परब्रह्माचे सार आहे आणि गायत्री ही खरोखर सच्चिदानंदाचे भांडारच आहे असे समज ४५,


    यालागीं सकळ छंदीं प्राधान्य । मुख्यत्वें गायत्री छंद जाण ।
    इतर छंद होती पावन । कासे लागोन पैं इच्या ॥ ४७ ॥
     गायत्रीचे अनुष्ठान करूनच विश्वामित्र क्षत्रियाचा ब्राह्मण झाला. मी कृष्णसुद्धा त्याचे चरण वंदन करतो. रामावतारी तो माझाही गुरु होता ४६.


    गायत्रीछंदाचें अंगीकारीं । त्यासी मिळाल्या अक्षरें चारी ।
    'उष्णिक्' छंदाची थोरी । त्याचिवरी ठसावे ॥ ४८ ॥
    याकरितां सकळ छंदांमध्ये मुख्यत: गायत्री छंदच श्रेष्ठ आहे, हिच्या कासेला लागूनच इतर छंद पावन होतात असें तूं समज ४७.


    उष्णिक् छंदाचे अंगीकारीं । त्यासी मिळाल्या ।
    अक्षरें चारी । 'अनुष्टप्' छंदाची थोरी । त्याचिवरी ठसावे ॥ ४९ ॥
    गायत्री छंदांतील अक्षरें जमेस धरून त्यांत आणखी चार अक्षरे मिळविली, तर त्यापेक्षा मोठा 'उष्णिक ' छंद उत्पच होतो ४८.


    अनुष्टप् छंदाचे अंगीकारीं । आणीक मिळाल्या अक्षरें चारी ।
    'बृहती' छंदाची थोरी । त्याचिवरी ठसावे ॥ ४५० ॥
    उष्णिक छंदांतील अक्षरें जमेस धरून त्यात आणखी चार अक्षरे मिळविली की, त्याच्याहीपेक्षा मोठा असा 'अनुष्टुप् छंद उत्पन्न होतो ४९.


    एवं 'पंक्ति' 'त्रिष्टप्' 'जगती' । 'अत्यष्टि' 'अतिजगती' ।
    चौं चौं अक्षरांचे अधिकप्राप्तीं । छंदें वेदोक्तीं विभाग ॥ ५१ ॥
    अनुष्टुप् छंदांतील अक्षरें जमेस धरून त्यांत आणखी चार अक्षरें चढविली की, त्याहूनही मोठा असा 'बृहती' छंद होतो ४५०.


    ऐशिया चतुरक्षरमिळणीं । नाना छंदांचिया श्रेणी ।
    वेदरायाची राजधानी । मंत्रध्वनीं गर्जती ॥ ५२ ॥
    अशाच प्रकारें  'पंक्ति- त्रिष्टुप्- जगती- अत्यष्टि- अतिजगती' इत्यादि छंद, चार चार अक्षरें अधिक घातल्याने वेदवाणीच्या विभागाचे छेद होतात ५१.


    तेथ अक्षरमर्यादा न करवे । शाखांची मर्यादा न धरवे ।
    अर्थता वाच्यता नेणवें । वेद वैभवें दुर्ज्ञेय ॥ ५३ ॥
    अशी चार चार अक्षरे अधिक घालून अनेक छंदांच्या पंक्ति तयार होतात. आणि वेदराजाची राजधानी त्या मंत्रध्वनीने गर्जत असते ५२.


    किं विधत्ते किमाचष्टे किमनूद्य विकल्पयेत् ।
    इत्यस्या हृदयं लोके नान्यो मद्वेद कश्चन ॥ ४२ ॥
    त्यांतील अक्षरांची मोजदाद करता येत नाही; शाखांचा पत्ता लागत नाही, अर्थज्ञान आणि शब्दज्ञानही समजत नाही. याप्रमाणे वेदाचे वैभव अगम्य आहे ५३.


    कर्मकांडविधिनिषेधीं । कोण अर्थ त्यागार्थ निंदी ।
    कोण तो अर्थ प्रतिपादी । स्वहितबुद्धी साधकां ॥ ५४ ॥
    [श्लोक ४२] ती वेदवाणी कर्मकांडामध्ये कशाचे विधान सांगते, उपासनाकांडामध्ये कोणकोणत्या देवतांचे वर्णन करते आणि ज्ञानकांडामध्ये कशाकशाचा अनुवाद करून कोणाकोणाचा निषेध करते, याचे रहस्य माझ्याखेरीज अन्य कोणीही जाणत नाही. (४२)


    मंत्रकांडें मंत्रमूर्ती । सांगोपांग सायुधस्थिती ।
    उपासना-उपास्ययुक्ती । किमर्थ भक्ती करविली ॥ ५५ ॥
    कर्मकांडांतील विधिनिषेध सांगतांना वेद कोणत्या अर्थांची त्यागासाठी निंदा करितो, व साधकाच्या हितबुद्धीने कोणत्या अर्थाचे प्रतिपादन करितो ५४, 


    ज्ञानकांड त्रिशुद्धी । कोण पदार्थ निषेधी ।
    कोण्या अर्थातें प्रतिपादी । निजबुद्धी बोधुनी ॥ ५६ ॥
    मंत्रकांडाने सर्व मंत्रमूर्ति सांगून आयुधांचे प्रकार, उपासना व उपास्य इत्यादि भाग दाखवून देऊन भक्ति कशासाठी करविली आहे ५५, 


    एवं वेदाचें अचळ मूळ । विधिविधानेसीं मुख्य फळ ।
    जाणावया गा केवळ । नाहीं ज्ञानबळ सुरनरां ॥ ५७ ॥
    ज्ञानकांडांत खरोखर कोणत्या पदार्थाचा निषेध केला आहे? आणि कोणत्या अर्थाचे प्रतिपादन करून आत्मज्ञानाचा उपदेश केला आहे ? ५६ 


    या वेदार्थातें तत्त्वतां । मीचि एक सर्वज्ञ ज्ञाता ।
    माझे कृपेवीण सर्वथा । हें न येचि हाता ब्रह्मादिकां ॥ ५८ ॥
    याप्रमाणे वेदाचे अढळ असलेलें मूळ कोणते? किंवा विधिविधानासाहवर्तमान मुख्य फळ कोणते ? हे जाणण्याइतके ज्ञान मनुष्यांना तर काय, देवांनासुद्धा नाही ५७.


    तेथ उद्धवाचें मनोगत । देवो जाणे वेदींचा इत्यर्थ ।
    तरी भक्तकृपाळू श्रीकृष्णनाथ । मजही तो अर्थ दयेनें सांगों ॥ ५९ ॥
    खरोखरच हा वेदार्थाला खऱ्या रीतीने जाणणारा मीच एक सर्वज्ञ ज्ञाता आहे. माझ्या कृपेशिवाय हा अर्थ महादेवादिकांच्यासुद्धा हाताला यावयाचा नाही ५८.


    हा उद्धवाचा निजभावो । जाणों सरला देवाधिदेवो ।
    तो वेदार्थाचा अभिप्रावो । श्लोकान्वयो पहा हो सांगत ॥ ४६० ॥
    हे ऐकून उद्धचाच्या मनांत आले की, वेदांतील खरें खरें अर्थस्वारस्य एका देवालाच माहीत आहे. आणि श्रीकृष्ण हे भक्ताविषयीं कृपाळू  आहेत, तेव्हां ते माझ्यावरही दया करून तो अर्थ मला सांगोत ५९.


    मां विधत्तेऽभिधत्ते मां विकल्प्यापोह्यते त्वहम् ।
    एतावान् सर्ववेदार्थः शब्द आस्थाय मां भिदाम् ।
    मायामात्रमनुद्यान्ते प्रतिषिद्ध्य् प्रसीदति ॥ ४३ ॥
    हा उद्धवाच्या मनातील हेतु जाणून देवाधिदेव तो सांगावयाला पुढे सरले. आणि तो वेदार्थातील सारांश श्लोकरूपाने सांगू लागले ६० .


    इति श्रीमद्भा्गवते महापुराणे पारमहंस्यां
    संहितायां एकादशस्कन्धे एकविंशोऽध्यायः ॥ २१ ॥
    [श्लोक ४३] वेद कर्मकांडामध्ये यज्ञरूपाने माझेच विधान करतात, उपासनाकांडात मलाच देवता म्हणतात ज्ञानकांडात माझ्याखेरीज अन्य वस्तूंचे वर्णन करून "नेति नेति" या वाक्यांच्याद्वारे अन्य सर्व वस्तूंचा निषेधही करतात सर्व वेदांचा अर्थ एवढाच आहे अशा प्रकारे वदे माझ्यामध्येच भेद निर्माण करून ही सगळी माया आहे, असे म्हणून शेवटी भेदाचा निषेध करून वेद प्रसन्न होतात. (४३)


    माझी पावावया स्वरूपसिद्धी । मलिनाचिया चित्तशिद्धी ।
    वेद स्वधर्म प्रतिपादीं । त्यागावी निषेधीं विषयातें ॥ ६१ ॥
    माझ्या स्वरूपाची प्राप्ति होण्यासाठी, मलिनचित्त लोकांची चित्तशुद्धि होण्याकरितां वेदानें स्वधर्माचे प्रतिपादन केले आहे. आणि निषेध सांगून विषयांचा त्याग करविला आहे ६१.


    तेथ अग्निहोत्रादि विधान । यज्ञान्त कर्माचरण ।
    तें चित्तशुद्धीचें कारण । वैराग्य दारुण उपजवी ॥ ६२ ॥
    त्यांत अग्निहोत्रादि विधान व यज्ञातील कर्माचरण हें  चित्तशुद्धीला मोठे कारणीभूत आहे. त्याच्या योगानें कडकडीत वैराग्य उत्पन्न होते ६२.


    दारुण वैराग्यउीत्पत्ती । इहामुत्रविषयनिवृत्ती ।
    तेव्हा साधकास माझी प्राप्ती । सहजस्थिती स्वभावें ॥ ६३ ॥
    कडकडीत वैराग्य उत्पन्न झालें व इहपर विषयांची निवृत्ति झाली, म्हणजे साधकाला सहजस्थितीने माझी प्राप्ति होते ६३.


    एवं कर्मकांडचिये स्थिती । विधिनिषेध वेदोक्ती ।
    साधकांसी माझी प्राप्ती । जाण निश्चितीं या हेतू ॥ ६४ ॥
    अशा प्रकारे कर्मकांडामध्ये वेदवाणीने सांगितल्याप्रमाणे विधिनिषेध पाळले असता चित्तशुदि होऊन साधकाला माझी प्राप्ति होते ६४.


    विषयीं परम बाधा देखती । परी त्यागीं नाहीं सामर्थ्यशक्ती ।
    ऐशिया साधकांप्रती । वेदें मद्भयक्ती द्योतिली ॥ ६५ ॥
    आता ज्यांना विषयामध्ये बाधकता आहे हे समजते, परंतु त्यांचा त्याग करण्याचे सामर्थ्य नसते. अशा साधकांसाठी वेदाने माझी भक्ति प्रगट केली आहे ६५.


    येथ मंत्रमूर्ति-उपासन । माझे सगुण अनुष्ठान ।
    तेथ करितां अनन्यभजन । रजतम जाण नासती ॥ ६६ ॥
    ह्यांत मंत्र-मूर्तीची उपासना, माझे सगुण रूपाचे अनुष्ठान आणि एकनिष्ठेनें भजन ही केली असतां रजोगुण व तमोगुण नाश पावतात ६६.


    मग केवळा सत्त्ववृत्तीं । श्रवणकीर्तनीं अतिप्रीती ।
    तेणें मद्भा्वो सर्वांभूतीं । माझी चौथी भक्ती तेणें होय ॥ ६७ ॥
    मग निखालस सत्त्ववृत्तिच शिल्लक राहते. त्यामुळे श्रवणकीर्तनामध्ये अत्यंत प्रेम जडते, आणि सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी माझीच भावना उत्पन्न होऊन तिच्या योगाने माझ्या चौथ्या भक्तीचा लाभ होतो ६७.


    आतुडल्या माझी चौथी भक्ती । मद्भंक्तां नावडे मुक्ती ।
    अद्वैत भजनाचिया प्रीतीं । धिक्कारिती कैवल्य ॥ ६८ ॥
    माझी चौथी भक्ति हाती आली की, माझ्या भक्तांना मुक्ति सुद्धा आवडत नाही; अद्वैत भजनाच्या पुढे ते मोक्षाचा सुद्धा धिकार करतात ६८.


    अद्वैतबोधें करितां भजन । मी अनंत अपार चिद्घलन ।
    भक्तीमाजीं आकळें जाण । ये मद्रूपण मद्भचक्तां ॥ ६९ ॥
    अद्वैतबोधाने माझे भजन केले असता अनंत, अपार व चिद्घन  स्वरूप असा मी भक्तांना वश होतों, आणि माझ्या भक्तांना मद्रूप प्राप्त होते ६९.


    तेव्हा भज्य-भजक-भजन । पूज्य-पूजक-पूजन ।
    साध्य-साधक-साधन । अवघें आपण स्वयें होय ॥ ४७० ॥
    त्या वेळी भज्य, मजक आणि भजन : पूज्य, पूजक आणि पूजन; साध्य, साधक आणि साधन : ही सारी तो स्वतःच होतो ४७०.


    माझी ऐश्वर्यसामर्थ्यशक्ती । तेही ये निजभक्तांच्या हातीं ।
    अद्वैतभजनाचिया प्रीतीं । मत्पदप्राप्ती मद्भाक्तां ॥ ७९ ॥
    माझे ऐश्वर्य, सामर्थ्य आणि शक्ति माझ्या भक्तांच्या हाती येतात. अद्वैतभजनाच्या प्रेमानेंच माझ्या भक्तांना माझ्या पदाची प्राप्ति होते ७१. 


    मी देव तो भक्त शुद्ध । हा बाहेरी नांवाचाचि भेद ।
    आंतुवट पाहतां बोध । सच्चिदानंद निजऐंक्यें ॥ ७२ ॥
    मी देव आणि तो भक्त , हा बाहेरून नावाचाच भेद राहतो; अंतस्थ रीतीने पाहिलें तर दोघेही निजात्मज्ञानामुळे सच्चिदानंदस्वरूपच असतो ७२.


    हे उपासनाकांडस्थिती । साधकीं करूनि माझी भक्ती ।
    यापरी पावले माझी प्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ७३ ॥
    उद्धवा ! उपासनाकांड तें हेंच होय. अशा प्रकारे साधक माझी भक्ति करून निश्चयाने मलाच पावतात ७३.


    'मायाप्रतिबिंबित' चैतन्य । त्वंपदार्थें वाच्य जाण ।
    ज्याच्या अंगीं जीवभिधान । अविद्या जाण उपजवी ॥ ७४ ॥
    (आता ज्ञानकांडाची उपपत्ति सांगतात )-मायाप्रतिबिंबित जें चैतन्य, ज्याचा 'त्वं ' या पदार्थाने उल्लेख करतात; त्याला अविद्येमुळे 'जीव' संज्ञा प्राप्त होते ७४.


    जेवीं स्वप्रामाजीं आपण । आन असोनि देखे अन ।
    तेवीं आविद्यकत्वें जाण । 'जीवपण' एकदेशी ॥ ९५ ॥
    स्वप्नांत  ज्याप्रमाणे आपण एक असतां अनेकत्वाने दिसतो, त्याप्रमाणे अविद्येमुळे आलेलें हें जीवत्व एकदेशीय आहे ७५.


    जें 'मायासंवलित' चैतन्य । जो योगजन्य जगत्कारण ।
    जो सर्वद्रष्टा सर्वज्ञ । सदा संपन्न ऐश्वर्यें ॥ ७६ ॥
    दुसरे, मायासंवलित (मायाप्रतिबिंबित नव्हे) चैतन्य, जो योगजन्य : असून जगदुत्पत्तीला कारण, जो सर्वद्रष्टा, सर्वज्ञ, सदा सर्वकाल ऐश्वर्यसंपन्न ७६, 


    जो सकळ कर्मांचा कर्ता । तो कर्ताचि परी अकर्ता ।
    ज्याचे अंगीं स्वभावतां । नित्यमुक्तता स्वयंभ ॥ ७७ ॥
    जो सर्व कर्माचा कर्ता ; व कर्ता असूनही अकर्ता ; आणि ज्याच्या अंगी स्वभावतःच स्वयंभू नित्यमुक्तता असते ७७, 


    ज्याची अकुंठित सहजसत्ता । जो परमानंदें सदा पुरता ।
    ज्यासी ईश्वरत्वें समर्थता । हे जाण वाचकता तत्पदार्थाची ॥ ७८ ॥
    ज्याची नैसर्गिक अकुंठित सत्ता; जो परमानंदाने सदा परिपूर्ण ; जो ईश्वर असल्यामुळे सर्वसमर्थ ; तो (शिव) 'तत् ' पदार्थाचा वाच्यार्थ होय ७८. 


    जीवाचें सांडोनियां अज्ञानत्व । शिवाचें सांडूनि सर्वज्ञत्व ।
    दोंहीचें शोधित जें लक्ष्यत्व । ऐक्यें निजतत्त्व साधिती ॥ ७९ ॥
    त्या जीवाचा अज्ञानपणा सोडून व शिवाचा सर्वज्ञपणाही टाकून दोहोंमधील शोधून काढलेले जे सार (लक्ष्यार्थतत्त्व ) त्याच्याशींच ऐक्यता पावून आपला हेतु साधतात ७९.


    लग्नीं नोवरा निमासुरा । तोचि गेलिया देशावरा ।
    विदेशीं देखिला एकसरा । तारुण्यमदभरा संपन्न ॥ ४८० ॥
    लग्नांत वयाने लहान असलेला सुंदर नवरा देशांतराला गेला, आणि काही काळाने तोच अकस्मात् परदेशांत तारुण्याने संपन्न झालेला दृष्टीस पडला ४८०, 


    ते काळींची त्यजूनि बाल्यावस्था । आजिची नेघूनि तारुण्यता ।
    पत्नी अनुसरे निजकांता । निजस्वरूपतास्वभावें ॥ ८१ ॥
    तर त्यावेळची बाल्यदशा टाकून व आजची तारुण्यदशाही सोडून त्याच्या मूळ स्वरूपास अनुलक्षून त्याची पत्नी जशी त्यास अनुसरते ८१, 


    तेवीं त्वंपदतत्पदवाच्यार्थ । दोंहीचा सांडावा निश्चितार्थ ।
    ऐक्यें अंगीकारावा लक्ष्यार्थ । हा ज्ञानकांडार्थ उद्धवा ॥ ८२ ॥
    त्याप्रमाणे उद्धवा ! ' त्वंपद' आणि 'तत्पद' ह्या दोहोंचाही लौकिकार्थ म्ह० वाच्यार्थ सोडून द्यावा, आणि ऐक्यभावाने जें  दिसून येईल, त्याचा म्ह० लक्ष्यार्थाचा स्वीकार करावा, हा ज्ञानकांडांतील इत्यर्थ होय ८२.


    जीवशिवांचेनि ऐक्यें जाण । माझे चित्स्वरूपीं समाधान ।
    स्वयें पाविजे आपण । हें ज्ञानकांड संपूर्ण बोलिलें वेदें ॥ ८३ ॥
    जीवाचे आणि शिवाचे ऐक्य करून माझ्या चित्स्वरूपामध्ये आपण स्वतः समाधान पावावे. हे वेदाने संपूर्ण ज्ञानकांडांत सांगितले आहे ८३.


    वेदा आदि-मध्य-अवसानीं । मातें लक्षितीं कांडें तीनी ।
    तोचि अर्थ उपसंहारूनी । ग्रंथावसानीं हरि बोले ॥ ८४ ॥
    वेदांतील तिन्ही काडे आदि-मध्य-अंती मलाच लक्षीत असतात. हाच अर्थ ग्रंथाच्या शेवटीं उपसंहार करतांना श्रीकृष्ण सांगत आहे ८४.


    उद्धवा वेदाचें वचन । अर्थगंभीर अतिगहन ।
    तेथ शिणतां ऋषिजन । अर्थावसान अलक्ष्य ॥ ८५ ॥
    उद्धवा ! वेदांचे भाषण अर्थगांभीर्याने फार खोल असल्यामुळे अत्यंत गहन आहे. त्याविषयी अनेक ऋषींनी पुष्कळ परिश्रम केले तरी त्यांना खरा अर्थ कळला नाहीं ! ८५.


    तें वेदार्थाचें निजसार । माझे गुह्य ज्ञानभांडार ।
    तुज म्यां सांगितलें साचार । पूर्वापरअंविरोधें ॥ ८६ ॥
    तेच वेदार्थांचे सार म्ह० माझें गुप्त ज्ञानभांडार मी तुला पूर्वापर विरोध न येऊ देतां सविस्तर सांगितले ८६.


    तें ऐकोनि देवाचें उत्तर । उद्धव चमत्कारला थोर ।
    तेंचि वेदाचें निजसार । पुढती श्रीधर सांगो कां ॥ ८७ ॥
    हे देवाचे भाषण ऐकून उद्धवाला चमत्कार वाटला व तो मनांत म्हणाला की, हे वेदाचें सार देव पुढे का सांगत नाहीत ? ८७.


    पान्हा लागतांचि तोंडीं । दोहक वांसरूं आंखुडी ।
    त्यापरी अतिआवडीं । स्वयें चडफडी उद्धव ॥ ८८ ॥
    वासराचे तोंड लागून गाईला पान्हा फुटला की, धार काढणारा वासराला आंखडून ठेवतो, त्याप्रमाणे हा अत्यंत आवडीचा विषय असून देवांनी मध्येच का बंद केला ? म्हणून उद्धव मनामध्ये अगदी चरफडूं लागला ८८. 


    जेवीं कां पक्षिणीपुढें । चारा घ्यावयाचे चाडें ।
    पिलें पसरीं चांचुवडें । तेवीं कृष्णाकडे उद्धवु ॥ ८९ ॥
    पक्षिणीच्या पुढे चारा घ्यावा म्हणून पिलें जशी चोंचा पसरतात, त्याप्रमाणे उद्धवही श्रीकृष्णापुढे आ करून बसला ८९.


    तें उद्धवाचें मनोगत । जाणोनियां श्रीअनंत ।
    सकळ वेदार्थ संकळित । ग्रंथांतीं सांगत निजसारंश ॥ ४९० ॥
    तो उद्धवाचा हेतु लक्षात आणून श्रीकृष्ण वेदाचा अर्थ संक्षेपानें ग्रंथाच्या शेवटी सारांशाने सांगत आहेत ४९०.


    नानाशाखीं अतिप्रसिद्ध । त्रिकांडीं वाढला जो वेद ।
    तेथील नाना शब्दीं हाचि बोध । जो मी अभेद परमात्मा ॥ ९१ ॥
    अनेक शाखांमध्ये अत्यंत प्रसिद्ध असा जो त्रिकांडात्मक वाढलेला वेद, त्यांतील साऱ्या शब्दांमध्ये बोध हाच की, अभेद परमात्मा जो मी ९१, 


    त्या मातें धरोनि हातीं । त्रिकांडीं चालिल्या श्रुती ।
    त्या श्रुत्यर्थाची उपपत्ती । यथास्थितीं सांगेन ॥ ९२ ॥
    त्या मला हातीं धरून श्रुति ह्या तीन कांडांमध्ये चालत आहेत. त्या श्रुत्यातील सारांश मी तुला नीट रीतीने सांगतों ऐक ९२.


    मी कर्मादिमध्यअंचतीं । मी कर्मकर्ता क्रियाशक्ती ।
    कर्मफळदाता मी श्रीपती । हा इत्यर्थ निश्चितीं 'कर्मादिकांडीचा' ॥ ९३ ॥
    कर्माच्या आदीं, मध्य व अंती मीच; कर्मकर्ता व क्रियाशक्ति मीच; कर्माचे फळ देणारा श्रीपति मीच; हाच काय तो कर्मकांडांतील इत्यर्थ होय ९३.


    मंत्रमूर्ति आणि मंत्रार्थ । तेही मीचि गा निश्चित ।
    पूज्य पूजक पूजा समस्त । मजव्यतिरिक्त आन नाहीं ॥ ९४ ॥
    मंत्रमूर्ति आणि मंत्रार्थ तोही खरोखर मीच; पूज्य, पूज्यक व पूज्य ही सारीही मीच , माझ्याशिवाय दुसरे काहीही नाहीं ९४.


    देवें देवोचि पूजिजे । देव हो‍ऊनि देवा भजिजे ।
    हें वेदींचें विजबीज माझें । हेंचि आगमीं बोलिजे मुख्यत्वें ॥ ९५ ॥
    देवानेच देवाची पूजा करावी; देव होऊनच देवाला भजावें च वेदांतील माझें रहस्य व हेच आगमांनीही सांगितले आहे ९५.


    मीच देवो मीचि भक्त । पूजोपचार मी समस्त ।
    मीचि मातें पूजित । हे इत्थंभूत 'उपासना' ॥ ९६ ॥
    मीच देव आणि मीच भक्त, सारें पूजेचे साहित्यही मीच माझी मीच पूजा करतो. हीच इत्थंभूत 'उपासना' होय ९६.


    हें उपासनाकांडींचें निजसार । आगमशास्त्रींचें गुह्य भांडार ।
    माझ्या निजभक्तांचें वस्तीचें घर । ते हे साचार उपासना ॥ ९७ ॥
    वेदाच्या उपासनाकांडांतील मुख्य सार तें हेच; आगमशास्त्रांतील गुप्त भांडार हेच; माझ्या भक्तांचे खरोखर वस्तीचें जें घर तीच ही उपासना होय ९७.


    'ज्ञानकांड' तें अलौलिक । वेद आपला आपण द्योतक ।
    अवघा संसाराचि काल्पनिक । तेथ वेद नियामक कोणे अर्थें ॥ ९८ ॥
    'ज्ञानकांड' तर फारच विलक्षण आहे. त्यांत वेद हा आपला आपणच द्योतक होतो. सारा संसारच जर मुळी काल्पनिक, तर 'वेद हे नियामक' असे कोणत्या अर्थान म्हणावें ? ९८.


    वोस घरास वस्तीस पहा हो । निर्जीव पाहुणा आला राहों ।
    त्याचा कोण करील वोठवो । तैसा भावो वेदाज्ञे ॥ ९९ ॥
    अहो! असें पहा! ओसाड घरांत निर्जीव पाहुणा राहावयाला आला, तर त्याचे आदरातिथ्य कोण करणार? तीच दशा वेदाज्ञेची आहे ९९.


    [ श्रुति-'एकमेवाद्वितीयं ब्रह्म, नेह नानास्ति किंचन' ]
    खांबसूत्रावरील पुतळीसी । तीतें बोडिलें जेवीं शिसीं ।
    तेथें नाहीं निघणें पुढारे केंसीं । तेवीं शुद्धीं वेदासी ठाव नाहीं ॥ ५०० ॥
    कळसूत्रांतील बाहुली घेऊन तिचे मुंडण केले, तर तिच्या डोक्यावर पुन्हा काही केस उगवावयाचे नाहीत. त्याचप्रमाणे शुद्ध ब्रह्मामध्येही वेदाला ठाव नाही ५००. 

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...