मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २१ ओव्या १0१ ते २००

    जो काळ दुर्भिक्षासी आला । जो कां ज्वरादिदोषीं दूषिला ।

    जो काळ चोराकुलित झाला । तो काळ बोलिला अकर्मक ॥ १ ॥
    ज्या काळांत दुष्काळ येतो, तापाची सांथ वगैरे येऊन जो काळ दूषित झालेला असतो, ज्या काळांत चोरांचा सुळसुळाट असतो, तो काळही कर्म करण्यास योग्य नव्हे १. 


    जे काळीं क्रोध संचरला । जेथ तमोगुण क्षोभला ।
    निद्राआलस्यें व्यापिला । तो काळ बोलिला अकर्मक ॥ २ ॥
    ज्या वेळेला राग आलेला असतो, किंवा तमोगुण खवळलेला असतो, निद्रेनें आणि आळसाने ज्यांत ठाणे दिलेले असते, तो काळही कर्म करण्यास योग्य नव्हे असे म्हणतात २.


    अकस्मात सुखसंपदा । कां अभिनव वार्ता एकदा ।
    कां लंघिजे भल्याची मर्यादा । तो काळ सर्वदा अकर्मक ॥ ३ ॥
    अकस्मात् सुखसंपदा मिळाली; किंवा कधीं न ऐकलेली गोष्ट कानांवर आली, किंवा सज्जनांच्या मर्यादेचा भंग झाला, तर तो काळ कर्म करण्याला कधीच योग्य नव्हे ३.


    कां मार्गीं विषमता । पंथ क्रमिजे चालतां ।
    तेथ पडे दुर्धर्षता । तो काळ तत्त्वतां अकर्मक ॥ ४ ॥
    किंवा वाट चालतांना मार्गामध्ये काहीं संकट आले, त्यामुळे जीवावर येऊन बेतले, तर तो काळही खरोखर कर्म करण्यास योग्य नव्हे ४.


    जे काळीं द्रव्यलोभ दारुण । जे काळीं चिंता गहन ।
    केव्हां विकल्पें भरे मन । तो काळ जाण अकर्मक ॥ ५ ॥
    ज्या वेळी द्रव्याचा अतिशय लोभ सुटतो, ज्या वेळेस जिवाला अत्यंत काळजी वाटते, विकल्पाने जेव्हां मन भरून जाते, त्या वेळीही कर्म करणे उचित नव्हे ५.


    ऐशी काळाची अकर्मकता । तुज म्यां सांगितली तत्त्वतां ।
    आतां द्रव्याची शुद्धाशुद्धता । ऐक सर्वथा सांगेन ॥ ६ ॥
    अशा प्रकारे कर्माला अनुचित काल कोणता तें तुला बरोबर सांगून दिले. आता द्रव्याची शुद्धाशुद्धताही सविस्तर सांगतों ऐक ६.


    द्रव्यस्य शुद्ध्यशुद्धी च द्रव्येण वचनेन च ।
    संस्कारेणाथ कालेन महत्त्वाल्पतयाऽथवा ॥ १० ॥
    [श्लोक १०] पदार्थांची शुद्धी किंवा अशुद्धी, द्रव्य, वचन, संस्कार, काल, अधिकपणा किंवा कमीपणा यांमुळेही होते. (१०)


    पुरुषें गोमूत्र सेवितां । तत्काळ पावे पवित्रता ।
    तेंचि ताम्रपात्रें घेतां । ये अपवित्रता तत्काळ ॥ ७ ॥
    पुरुषाने गोमूत्र प्राशन केले असतां तत्काळ पवित्रता येते; पण तेच तांब्याच्या भांड्यांतून घेतले असतां तत्काळ अपवित्र होते ७.


    पुरुषें जळ प्रोक्षितां । पुष्पांसी ये पवित्रता ।
    तेंचि पुरुषें अवघ्राणीतां । अपवित्रता पुष्पासी ॥ ८ ॥
    पुरुषाने जलप्रोक्षण केले असतां पुष्पांना पवित्रता येते ; तेंच फूल पुरुषाने हुंगले तर त्याला अपवित्रता येते ८.


    अग्नीची सेवा करितां । द्विजासी परम पवित्रता ।
    तोचि द्विज अग्निहोत्रें जाळितां । ये अपवित्रता अग्नीसी ॥ ९ ॥
    अग्नीची सेवा केली असतां ब्राह्मणाला पवित्रता येते; पण तोच ब्राह्मण अग्निहोत्राने जाळला असता त्या अग्नीला अपवित्रता येते ९.


    दर्भीं पिंड ठेवितां पवित्र । पिंडस्पर्शें दर्भ अपवित्र ।
    ऐशी शुद्ध्यशुद्धी विचित्र । बोले धर्मशास्त्र श्रुत्यर्थें ॥ ११० ॥
    दर्भावर पिंड ठेवला असतां तो पवित्र होतो, परंतु पिंडाचा स्पर्श झाल्याने दर्भ अपवित्र होतात. श्रुतीला अनुसरून धर्मशास्त्र वस्तूची शुद्धयशुद्धि अशी विचित्र सांगते ११०.


    जे वस्तु संशयापन्न । त्याच्या शुद्धीसी ब्राह्मणवचन ।
    ज्यांचे वचन प्रमाण । हरिहर जाण मानिती ॥ ११ ॥
    जी वस्तु संशयापन्न असते, तिच्या शुद्धीला ब्राह्मणवचन पुरे होते. कारण, ब्राह्मणवचन हरिहरांनासुद्धा मान्य होते ११.


    घृतसंस्कारें शुद्ध अन्न । होमसंस्कारें नवधान्य ।
    अग्निसंस्कारें लवण । पवित्र जाण शास्त्रार्थें ॥ १२ ॥
    तुपाच्या संस्काराने अन्न शुद्ध होतें होमाच्या संस्कारानें नवधान्ये शुद्ध होतात; आणि अग्नीच्या संस्काराने मीठ पवित्र होते, असा शास्त्रार्थ आहे १२.


    राकारापुढें मकार । मांडूनि करितां उच्चार ।
    जिणोनि पापांचा संभार । होय तो नर शुद्धात्मा ॥ १३ ॥
    'रा' ह्या अक्षरापुढे 'म' अक्षर घालून उच्चार केला तर पातकांचा भार नाहीसा होऊन तो पुरुष शुद्धात्मा होतो १३.


    त्याचि मकारापुढें द्यकार । ठेवूनि करितां उच्चार ।
    अंगीं आदळे पाप घोर । तेणें होय नर अतिबद्ध ॥ १४ ॥
    त्याच मकारापुढे ' द्य , अक्षर ठेवून उच्चार केला असतां घोर पातक येऊन डोक्यावर आदळते. आणि तेणेकरून तो पुरुष अत्यंत बद्ध होतो १४ .


    रजस्वला शुद्ध चरुर्थाहानीं । मेघोदक शुद्ध तिसरे दिनीं ।
    वृद्धिसूतक दहावे दिनीं । काळ शुद्धपणीं या हेतू ॥ १५ ॥
    रजस्वला ही चौथ्या दिवशी शुद्ध होते, मेघोदक तिसऱ्या दिवशी शुद्ध होते. वृद्धि किंवा सुतक दहाव्या दिवसानंतर निवृत्त होते. अशा रीतीने कालाची शुद्धता आहे १५.


    पूर्व दिवशींचें जें अन्न । तें काळेंचि पावे गा दूषण ।
    ज्यासी आलें शिळेपण । तें अन्न जाण अशुद्ध ॥ १६ ॥
    आधल्या दिवशींचें अन्न काळानेच दूषित होते. आणखी ज्याला शिळेपणा आला, ते अन्नही अशुद्ध ठरतें १६.


    तैसें नव्हे घृतपाचित । तें बहुत काळें तरी पुनीत ।
    जें विटोनि विकारी होत । तें अपुनीत काळेंचि ॥ १७ ॥
    तुपात तळलेल्या अन्नाची गोष्ट मात्र तशी नाही. ते पुष्कळ दिवसपर्यंतही शुद्ध राहाते. जें विटून जाऊन आंबते, ते तत्काळ अपवित्रच होते १७.


    जें सांचवणीं अल्प जळ । त्यासी स्पर्शला चांडाळ ।
    तें अपवित्र गा सकळ । नये अळुमाळ स्पर्श करूं ॥ १८ ॥
    जें सांचवणीचे व थोडेसे पाणी असेल. त्याला चांडाळाने स्पर्श केला, तर तें निखालस अपवित्र होते. त्याला मुळीच स्पर्श करूं नये १८.


    तेंचि निर्झर कां अक्षोभ जळ । तेथ स्पर्शल्याही चांडाळ ।
    त्यासी लागेना तो विटाळ । तें नित्य निर्मळ पवित्र ॥ १९ ॥
    पण तेच पाणी झऱ्याचे किंवा डोहातले असेल तर त्याला चांडाळाने स्पर्श केला तरी त्याला विटाळ होत नाही. ते नित्य निर्मळ व पवित्रच असते १९.


    अल्प केलिया स्वयंपाक । त्यासी जैं आतळे श्वान काक ।
    तैं तें सांडावें निःशेख । अपवित्र देख तें अन्न ॥ १२० ॥
    थोडा स्वयंपाक केलेला असला आणि त्याला कुत्रे किंवा कावळा शिवला तर तो साराच्या सारा स्वयंपाक टाकून दिला पाहिजे. कारण, तें अन्न अपवित्र होतें १२०.


    तोचि सहस्त्रभोजनाचा पाक । त्यासी आतळल्या श्वान कां काक ।
    सांडावें जेथ लागलें मुख । येर अन्न निर्दोख भोजनी ॥ २१ ॥
    तोच स्वयंपाक सहस्रभोजनाचा असून त्याला कुत्रे किंवा कावळा शिवेल, तर त्यांचे तोंड ज्या ठिकाणी लागलेले असेल तेवढे अन्न काढून टाकावे. बाकीच्या अन्नाचे भोजन करण्यांत दोष नाही २१.


    शक्त्याअशक्त्या अथवा बुद्ध्या समृद्ध्या च यदात्मने ।
    अघं कुर्वन्ति हि यथा देशावस्थानुसारतः ॥ ११ ॥
    [श्लोक ११] शक्ती आणि असमर्थता, बुद्धी आणि वैभव यांनुसार जे दोष उत्पन्न होतात, त्यांचा ठिकाणी आणि अवस्था पाहूनच विचार केला जातो. (११)


    झालिया चंद्रसूर्यग्रहण । शक्तें स्नान न करितां दूषण ।
    बाळक वृद्ध आतुर जन । न करितां स्नान दोष नाहीं ॥ २२ ॥
    चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण आले असतां, निरोग्याने स्नान न केल्यास त्याला दोष लागतो; परंतु बालक, वृद्ध आणि रोगी ह्यांनी स्नान न केले तरी दोष नाही २२.


    पुत्र जन्मलिया देख । स्वगोत्रज जे सकळिक ।
    त्यांसी जाण आवश्यक । बाधी सूतक दहा दिवस ॥ २३ ॥
    पुत्र जन्मला असतां सारे भाऊबंद असतात, त्यांना दहा दिवस सुतकाची (सुवेराची) बाधा अवश्य आहे २३.


    तेंचि स्थळांतरीं पुत्रश्रवण । सूतकाअंतीं झाल्या जाण ।
    त्या सूतकाचें बंधन । न बाधी जाण सर्वथा ॥ २४ ॥
    तेच देशांतर असून सुतक संपल्यावर पुत्रजन्म झाल्याचे कळेल, तर त्याला सुतक पाळण्याचे मुळींच बंधन नाही २४.


    पूर्वदिनीं गोत्रज मरे । तें स्वगोत्रीं सूतक भरे ।
    येरे दिवशीं दुसरा जैं मरे । तैं सूतकें सूतक उतरे दोहींचेंही ॥ २५ ॥
    आधल्या दिवशी एखादा भाऊबंद मरण पावला तर त्याच्या गोत्रजांना सुतक येते. पण दुसऱ्या दिवशी जर दुसरा कोणी मेला, तर पहिल्या सुतकांतच दुसऱ्याचे सुतक फिटून जातें २५.


    जेणें घेतलें होय विख । त्यासी सर्पु लाविलिया देख ।
    तेणें विखें उतरे विख । तेवीं सूतकें सूतक निवारे ॥ २६ ॥
    ज्याने विष घेतलेले असते त्याला जर साप चावविला, तर त्याच्या विषाने पहिले विष उतरते. त्याप्रमाणे सुतकानेच सुतक नष्ट होतें २६.


    जें बुद्धीपूर्वक केलें आपण । तें अवश्य भोगावें पापपुण्य ।
    जें बुद्धीसी नाही विद्यमान । तें अहेतुकपणें बाधिना ॥ २७ ॥
    आपण जें बुद्धिपूर्वक पाप किंवा पुण्य केलेले असते, त्याचे फळ अवश्य भोगावे लागते, परंतु जें बुद्धीला माहीत नसते, ते अहेतुकपणाने झालेले असल्यामुळे बाधक होत नाहीं २७.


    आपुलें जें अंतःकरण । त्यासी पवित्र करी निजज्ञान ।
    हे 'बुद्धीची शुद्धि' जाण । विवेकसंपन्न वैराग्यें ॥ २८ ॥
    आपलें जें अंत:करण आहे, त्याला आत्मज्ञान पवित्र करतें; हीच विवेकयुक्त वैराग्याची 'बुद्धीची शुद्धि' होय २८.


    जो धनवंत अतिसंपन्न । त्यासी जुनें वस्त्र अपावन ।
    शिविलें दंडिलें तेंही जाण । नव्हे पावन समर्था ॥ २९ ॥
    जो धनाढ्य म्ह० अत्यंत श्रीमंत असेल त्याने जुनें वस्त्र परिधान करणे अपवित्र होय. शिवलेले किंवा दंड भरलेले धोतरही श्रीमंतांना पवित्र नव्हे २९.


    तेंचि दुर्बळाप्रति जाण । अतिशयें परम पावन ।
    हे वेदवाद अतिगहन । स्मृतिकारीं जाण प्रकाशिले ॥ १३० ॥
    तेंच गरिबाला अतिशय पवित्र होते. हें वेदांतील रहस्य फार खोल आहे. तें स्मृतिकारांनी विशद करून ठेवले आहे १३०.


    समर्थासी असाक्षी भोजन । तें जाणावें अशुद्धान्न ।
    दुर्बळासी एकल्या अशन । परम पावन श्रुत्यर्थें ॥ ३१ ॥
    कोणी पंक्तीला न घेतां श्रीमंतांनी जेवणें तें अशुद्ध अन्न म्हणून समजावें; पण गरिबाने एकट्याने जेवणे हे अत्यंत पवित्र असें वेदानेंच म्हटले आहे ३१.


    स्वयें न करितां पंचयज्ञ । भोजन तें पापभक्षण ।
    सकळ सुकृतासी नागवण । जैं पराङ्मुेखपण अतिथीसी ॥ ३२ ॥
    पंचमहायज्ञ न करतां भोजन केले असतां पातक भक्षण केल्याप्रमाणे आहे. अतिथीला विन्मुख दवडला तर साऱ्या पुण्यावर पाणी पडते ! ३२.


    स्वग्रामीं सर्वही स्वाचार । ग्रामांतरीं अर्थ आचार ।
    पुरीं पट्टणीं पादमात्र । मार्गीं कर्मादर संगानुसारें ॥ ३३ ॥
    आपल्या गांवांत राहात असतांना सारे आचार पाळावे; परगांवीं गेलें असतां अर्धे आचार करावे ! एखाद्या शहरांत किंवा नगरांत गेले असतां एकचतुर्थांश आचार पाळावे. आणि मार्गामध्ये म्ह० प्रवासांत संगतीच्या लोकानुसार कर्म करीत असावें (आग्रह धरूं नये) ३३.


    विचारोनि देशावस्था । हे धर्ममर्यादा तत्त्वतां ।
    याहूनि अन्यथा करितां । दोष सर्वथा कर्त्यासी ॥ ३४ ॥
    देशकाळाचा व परिस्थितीचा विचार करूनच ही मर्यादा धर्मशास्त्राने लावून दिली आहे. याहून भिन्न आचरण केले असतां कर्त्याला सर्वथा दोषच लागेल ३४.


    पाटव्य असतां स्वदेहासी । कर्म न करी तो महादोषी ।
    रोगें व्यापिल्या शरीरासी । कर्मकर्त्यासी अतिदोष ॥ ३५ ॥
    देहांत कर्म करण्याचे सामर्थ्य असून जो कर्म करणार नाही त्याला मोठा दोष लागतो; तसेच शरीर रोगाने व्यापलेले असतां कर्म करणारा अतिशय दोषी होतो ३५.


    पूर्वीं द्रव्याद्रव्यशुद्धी । सांगितली यथाविधी ।
    तेचि मागुतेनि प्रतिपादी । धर्मशास्त्रसिद्धी वेदोक्त ॥ ३६ ॥
    आतापर्यंत वस्तूंची शुद्धि व अशुद्धि विधिपूर्वक सांगितली. तीच वेदोक्त धर्मशास्त्राला धरून पुन्हा प्रतिपादन करतात ३६.


    धान्यदार्वस्थितन्तूनां रसतैजसचर्मणाम् ।
    कालवाय्वग्निमृत्तोयैः पार्थिवानां युतायुतैः ॥ १२ ॥
    [श्लोक १२] शक्ती आणि असमर्थता, बुद्धी आणि वैभव यांनुसार जे दोष उत्पन्न होतात, त्यांचा ठिकाणी आणि अवस्था पाहूनच विचार केला जातो. (११)


    शूद्र प्रतिग्रहाचें धान्य । एकरात्रीं शुद्ध जाण ।
    स्त्रुक्स्त्रुवादिकाष्ठभाजन । जलप्रक्षालनें शुद्धत्व ॥ ३७ ॥
    शुद्रानें दान दिलेले धान्य एक रात्रीने शुद्ध होते.  स्त्रुक्, स्त्रुवा  इत्यादि जी लाकडाची पात्रे असतात, ती पाण्याने धुतली म्हणजे शुद्ध होतात ३७.


    व्याघ्रनख गजदंत । अपवित्र जंव स्नेहयुक्त ।
    जेव्हा होती स्नेहतीत । अतिपूनीत ते काळीं ॥ ३८ ॥
    वाघाची नखे आणि हस्तिदंत हे ओलसर असतात तोपर्यंत अशुद्ध होत. तेच वाळले की अत्यंत पवित्र होतात ३८.


    पट्टतंतु स्वयें पुनीतु । वायूनें शुद्ध ऊर्णातंतु ।
    वस्त्रतंतु जळाआंतु । होय पुनीतु प्रक्षाळिल्या ॥ ३९ ॥
    रेशमाचे धागे मूळचेच शुद्ध असतात. लोकरीचे तंतू वायूनें शुद्ध होतात, आणि कापसाच्या वस्त्राचे तंतु पाण्यांत धुतले म्हणजे शुद्ध होतात ३९.


    गोक्षीर पवित्र कांस्यमृत्पात्रीं । तेंचि अपवित्र ताम्रपात्रीं ।
    ताम्र पवित्र आम्लेंकरीं । आम्ल लवणांतरीं पवित्र ॥ १४० ॥
    गाईचे दूध कांशाच्या भांड्यात किंवा मडक्यात ठेवल्याने पवित्र होते ; तेच तांब्याच्या भांड्यात ठेवले तर अपवित्र होतें. चिंच वगैरे आंबट पदार्थाने ताबें स्वच्छ होते  व मिठानें आंबट पदार्थ शुद्ध होतात १४०.


    घृत पवित्र अग्निसंस्कारीं । अग्नि पवित्र ब्राह्मणमंत्रीं ।
    ब्राह्मण पवित्र स्वाचारीं । पवित्रता आचारीं वेदविधीं ॥ ४१ ॥
    तूप हे अग्निसंस्काराने शुद्ध होतें; अग्नि ब्राह्मणाच्या मंत्रांनी पवित्र होतो, ब्राह्मण स्वधर्माचरणाने पवित्र होतो; आणि धर्माचरण वेदविधीनें पवित्र होतें ४१.


    वेद पवित्र गुरुमुखें । गुरु पवित्र निजात्मसुखें ।
    आत्मा पवित्र गुरुचरणोदकें । पवित्र उदकें द्विजचरणीं ॥ ४२ ॥
    वेद गुरुमुखाने पवित्र होतो, गुरु आत्मानंदाने पवित्र होतो, आत्मा (जीव) गुरुचरणोदकानें पवित्र होतो, आणि उदक ब्राह्मणांच्या चरणाने पवित्र होतें ४२.


    पृथ्वी पवित्र जळसंस्कारीं । जळ पवित्र पृथ्वीवरी ।
    चर्म पवित्र तैलेंकरीं । तेल चर्मपात्रीं पवित्र ॥ ४३ ॥
    सडासंमार्जनाने पृथ्वी पवित्र होते : मातीने जल पवित्र होते : तेलाने चामडे पवित्र होते; आणि चामड्याच्या पात्रांत ठेवल्याने तेल पवित्र होतें ४३.


    व्याघ्रादि जें मृगाजिन । इयें स्वभावें पवित्र जाण ।
    अग्निसंस्कारें सुवर्ण । पवित्रपण स्वभावें ॥ ४४ ॥
    व्याघ्रांबर, कृष्णाजिन वगैरे चामडी मुळचींच पवित्र असतात असे समज. अग्निसंस्काराने सुवर्ण सहजच पवित्र होते ४४.


    एवं इत्यादि परस्परीं । शुचित्व बोलिलें स्मृतिशास्त्रीं ।
    आतां मळलिप्त झालियावरी । त्यांचेही अवधारीं शुचित्व ॥ ४५ ॥
    अशा प्रकारें परस्पर पदार्थांनी परस्परांस पवित्रपणा येत असल्याचे स्मृतिशास्त्रांत सांगितले आहे. आता मलानें लिप्त झाल्यानंतर त्याला कसा पवित्रपणा येतो तो ऐक ४५.


    अमेध्यलिप्तं यद्येन गन्धं लेपं व्यपोहति ।
    भजते प्रकृतिं तस्य तच्छौचं तावदिष्यते ॥ १३ ॥
    [श्लोक १३] जर एखाद्या वस्तूला एखादा अशुद्ध पदार्थ चिकटला तर ज्या कृतीने त्या पदार्थाचा वास किंवा लेप जाईल आणि ती वस्तू पूर्वीप्रमाणे होईल, तेव्हा ती शुद्ध समजावी. (१३)


    पात्र पीठ कां आसन । अमेध्यलिप्त झाल्या जाण
    त्या गंधाचें निःशेष क्षालन । तेणें पवित्रपण तयासी ॥ ४६ ॥
    भांडे, चौरंग किंवा कसलेही आसन अमंगल पदार्थानें लिप्त झाले असता त्याची दुर्गधी जाईपर्यंत त्यास धुतले की पवित्रपणा येतो ४६.


    नाभीखालता ज्याच्या शरीरा । अमेध्यलेप लागल्या खरा ।
    ते ठायींचा गंधु जाय पुरा । ऐसें धुतल्या त्या नरा शुचित्व लाभे ॥ ४७ ॥
    शरीराला नाभीच्या खाली अमंगल पदार्थाचा लेप लागला असेल त्या ठिकाणची दुर्गंधी निखालस जाईपर्यंत धुतले म्हणजे त्या पुरुषाला पवित्रता येते ४७.


    नाभीवरतें अमेध्यलेपन । अवचटें झालिया जाण ।
    तैं करावें मृत्तिकास्नान । तेणें पावन तो पुरुष ॥ ४८ ॥
    नाभीच्यावर अकस्मात् अमंगल पदार्थाचा लेप लागला, तर मृत्तिकास्नान करावें; म्हणजे तो पुरुष पवित्र होतो ४८.


    मळ धुतल्या तत्काळ जाती । परी त्या गंधाची होय निवृत्ती ।
    प्रकृति पावे जैं निजस्थिती । 'मळनिष्कृति' त्या नांव ॥ ४९ ॥
    मळ धुतले म्हणजे तत्काळ जातात; पण त्याचा वास जाईल तेव्हांच ते अंग पहिल्याप्रमाणे होते आणि त्याचंच नांव 'मलनिष्कृति' ४९ . 


    बाह्य पदार्थ निवृत्तिनिष्ठें । वेद बोलिला या खटापटें ।
    आतां कर्त्याचें शुचित्व प्रकटे । ते ऐक गोमटे उपाय ॥ १५० ॥
    बाह्य पदार्थांच्या मलनिवृत्तीसाठींच वेदाने एवढे सांगण्याची खटपट केली. आतां कर्त्यांच्या पवित्रतेसंबंधाने उत्तम उपाय सांगतो ते ऐक १५०.


    स्नानदानतपोऽवस्थावीर्यसंस्कारकर्मभिः ।
    मत्स्मृत्या चात्मनः शौचं शुद्धः कर्माचरेद्‌द्विजः ॥ १४ ॥
    [श्लोक १४] स्नान, दान, तपश्चर्या, वय, सामर्थ्य, संस्कार, कर्म आणि माझे स्मरण केल्याने चित्ताची शुद्धी होते यांद्वारा शुद्ध होऊन ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनी आपल्या विहित कर्मांचे आचरण करावे. (१४)


    गर्भधानादि अन्नप्राशन । ते बाल्यावस्था संपुर्ण ।
    चौल तें कुमारावस्था जाण । ब्राह्मणपण उपनयनें ॥ ५१ ॥
    गर्भाधानापासून अन्नप्राशन संस्कार होतात ती बाल्यावस्था होय. चौल संस्कार होतो ती कुमारावस्था होय. आणि उपनयनसंस्काराने ब्राह्मणपणा येतो ५१.


    कर्मभूमिकेलागीं स्नान । द्रव्यशुद्धीलागीं कीजे दान ।
    वैराग्यलागीं तप जाण । कर्माचरण जडत्वत्यागा ॥ ५२ ॥
    कर्माधिकार येण्यासाठी स्नान करावें ;  द्रव्यशुद्धीसाठी दान करावें: वैराग्यासाठी तप करावें; आणि आलस्य जाण्यासाठी कर्म करावें ५२.


    माझिया भजनीं दृढबुद्धि । त्या नांव जाण 'वीर्यशुद्धि' ।
    माझेनि स्मरणें 'चित्तशुद्धि' । जाण त्रिशुद्धि उद्धवा ॥ ५३ ॥
    माझ्या भजनाच्या ठिकाणी दृढबुद्धि असणे ह्याचें नांव 'वीर्यशुद्धि'; आणि माझ्या अविरत स्मरणाने 'चित्तशुद्धि' निश्चयेंकरून प्राप्त होते ५३.


    ऐसऐेसिया विधीं । ब्राह्मण जे कां सुबुद्धी ।
    सबाह्य पावावया शुद्धी । वेद उपपादी स्वकर्में ॥ ५४ ॥
    जे बुद्धिमान् ब्राह्मण असतील त्यांनी अशा अशा रीतीने अंतर्बाह्य शुद्ध व्हावे, म्हणून वेदानें आपआपली कमैं सांगितली आहेत ५४. 


    मंत्रस्य च परिज्ञानं कर्मशुद्धिर्मदर्पणम् ।
    धर्मः संपद्यते षड्‌भिरधर्मस्तु विपर्ययः ॥ १५ ॥
    [श्लोक १५] गुरूमुखाने ऐकून योग्य तर्‍हेने जाणून घेतल्याने मंत्राची आणि मला समर्पित केल्याने कर्माची शुद्धी होते उद्ववा ! अशा रीतीने देश, काल, पदार्थ, कर्ता, मंत्र आणि कर्म या सहा गोष्टी शुद्ध असल्यास धर्म आणि अशुद्ध असल्यास अधर्म होतो. (१५)


    मंत्रशुद्धि मंत्रार्थज्ञानें । कर्मशुद्धि ब्रह्मार्पणें ।
    इयें कर्त्याचे शुद्धीकारणें । साही लक्षणें वेदु बोले ॥ ५५ ॥
    मंत्रार्थज्ञानाने मंत्रशुद्धि होते; ब्रह्मार्पणाने कर्मशुद्धि होते ; कर्त्याच्या शुद्धीसाठीही सहा लक्षणे वेदाने सांगितली आहेत ५५.


    देश-काळ-द्रव्यसंपन्नता । मंत्र-कर्म-निरुज कर्ता ।
    या साहींच्या शुद्धावस्था । स्वधर्मता फलोन्मुख ॥ ५६ ॥
    देश, काल, द्रव्यसंग्रह, मंत्र, कर्म आणि निरोगी कर्ता ह्या  सहांच्या अवस्था शुद्ध असल्या म्हणजे स्वधर्म हा फलद्रूप होतो ५६.


    जें द्रव्य पावे दीनांचे आर्ता । कां माझिया निजभक्तां ।
    या नांव 'द्रव्यपवित्रता' । जाण तत्त्वतां निश्चित ॥ ५७ ॥
    अनाथ, दीन लोकांच्या संकटसमयीं जें द्रव्य पोचतें, किंवा माझ्या भक्ताकडे जातें, तीच खरोखर 'द्रव्याची पवित्रता' होय ५७.


    धर्मशास्त्रार्थें शुद्ध धन । कष्टें मिळवूनियां आपण ।
    धनलोभीं ठेविल्या प्राण । अवघेंचि जाण अशुद्ध ॥ ५८ ॥
    स्वतः कष्टाने मिळविलेले द्रव्य धर्मशास्त्रानुसार शुद्ध होय; पण धनलोभांत जीव गुंतलेला असला तर ते सारें द्रव्य अशुद्ध होय ५८.


    या नांव 'द्रव्यशुद्धता' । ऐक मंत्राची पवित्रता ।
    जेणें मंत्रें पाविजे मंत्रार्था । शुद्ध सर्वथा तो मंत्र ॥ ५९ ॥
    ह्यालाच द्रव्याची शुद्धि म्हणतात. आता मंत्राची पवित्रता ऐक, ज्या मंत्राने मंत्राचा अर्थ साध्य होतो, तोच मंत्र सर्वथा शुद्ध होय ५९.


    जेथ केलिया मंत्रग्रहण । अंगीं चढता वाढे अभिमान ।
    कां जेथ जारण-मारण-उच्चाटण । तें मंत्र जाण अपवित्र ॥ १६० ॥
    जो मंत्र घेतला असतां अंगामध्ये चढता अभिमान वाढतो, किंवा ज्यांत जारण मारण उच्चाटण इत्यादि असते, ते मंत्र अपवित्र होत १६०.


    या नांव 'मंत्रशुद्धि' जाण । ऐक कर्माचें लक्षण ।
    जेणें कर्में तुटे कर्मबंधन । तें कर्माचरण अतिशुद्ध ॥ ६१ ॥
    ह्याप्रमाणे 'मंत्रशुद्धि' सांगितली. आतां कर्माचे लक्षण ऐक. तर ज्या कर्माच्या योगाने कर्मबंधन तुटते, तें कर्माचरण अत्यंत शुद्ध होय ६१.


    स्वयें करितां कर्माचरण । जेणें खवळें देहाभिमान ।
    कर्त्यासी लागे दृढ बंधन । तें कर्म जाण अपवित्र ॥ ६२ ॥
    स्वतः कर्माचरण करीत असतां ज्यांत देहाभिमान खवळतो, आणि कर्त्याचे बंधन अधिक दृढ होते, तें कर्म अपवित्र होय ६२.


    जेणें कर्में होय कर्माचा निरास । तें शुद्ध कर्म सावकाश ।
    जेथ समबुद्धि सदा अविनाश । तो 'पुण्यदेश' उद्धवा ॥ ६३ ॥
    ज्या कर्माने कर्माचा निरास होतो, तेंच कर्म खरोखर शुद्ध होय, आणखी उद्धवा! जेथें सदासर्वदा अविनाश समबुद्धि असते, तो देश पुण्यवंत होय ६३.


    जरी सुक्षेत्रीं केला वास । आणि पराचे देखे गुणदोष ।
    तो देश जाणावा तामस । अचुक नाश कर्त्यासी ॥ ६४ ॥
    सुक्षेत्रांतही वास केला, आणि तेथेही दुसऱ्याचे गुणदोष दिसू  लागले, तर तो देशही तामस म्हणून समजावा. त्याच्या योगाने कर्त्यांचा अचूक नाश होतो ६४.


    अन्य क्षेत्रीं देखिल्या दोष । त्याचा सुक्षेत्रीं होय नाश ।
    सुक्षेत्रीं देखिल्या दोष । तो न सोडी जीवास कल्पांतीं ॥ ६५ ॥
    अन्य क्षेत्रांत दोष पाहिले तर त्यांचा उत्तम क्षेत्रांत नाश होतो; परंतु उत्तम क्षेत्रांतच दोष पाहिले तर ते मात्र कल्पांतीही जीवाला सोडीत नाहीत ६५, 


    जेथ उपजे साम्यशीळ । तो देश जाणावा निर्मळ ।
    चित्त सुप्रसन्न जे वेळ । तो 'पुण्यकाळ' साधकां ॥ ६६ ॥
    जेथें ऐक्यभाव उत्पन्न होतो, तो देश निर्मळ म्हणून समजावा; आणि चित्त सुप्रसन्न असलेली जी वेळ, तोच साधकाचा पुण्यकाळ जाणावा ६६.


    स्वभावें शुद्ध ब्राह्ममुहूर्त । तेथही क्षोभल्या चित्त ।
    तोही काळ अपुनीत । जाण निश्चित वेदार्थ ॥ ६७ ॥
    'ब्राह्ममुहूर्त ' म्हणजे पहाटेची (अखेरची पांच घटका रात्रीची) वेळ ही स्वभावतःच शुद्ध होय. त्यांतही चित्तक्षोभ होईल तर तोही काळ खरोखर अपवित्र होय, असें वेदार्थांचे म्हणणे आहे ६७.


    येथ जो कां कर्मकर्ता । त्याची गेलिया कर्मअतहंता ।
    पुढें कर्म चाले स्वभावतां । हे 'पवित्रता कर्त्याची' ॥ ६८ ॥
    आता जो कर्मकर्ता असतो त्याची कर्मांची अहंता नष्ट झाली, तरच तें कर्म स्वाभाविकपणे चालते. हीच कर्त्याची पवित्रता होय ६८.


    येथ जो म्हणे ' अहं कर्ता ' । तो पावे अतिबद्धता ।
    हे कर्त्याची अपवित्रता । देहअरहंता अभिमानें ॥ ६९ ॥
    त्यांत जो कोणी 'मीच कर्ता' असें म्हणेल, तो अत्यंत बद्ध होतो. देहअहंतेच्या अभिमानामुळे कर्ता अपवित्र होतो ६९.


    धर्मधर्माचे साही प्रकार । हें वेदार्थाचें तत्त्वसार ।
    येही धर्मीं मुक्त होय नर । अधर्मीं अपवित्र अतिबद्ध ॥ १७० ॥
    ह्याप्रमाणे धर्माधर्माचे सहा प्रकार आहेत. हेच वेदार्थांच्या तत्त्वांतील सार आहे. याच धर्मानें पुरुष मुक्त होतो, व अधर्मानें अपवित्र होऊन मोठे बंधन पावतो १७०.


    गुणदोषांचें लक्षण । सांगतां अतिगहन ।
    येथ गुंतले सज्ञान । अतिविचक्षण पंडित ॥ ७१ ॥
    ह्याप्रमाणे गुणदोषांचे लक्षण सांगू लागले तर फार खोल आहे. त्यांत मोठमोठे ज्ञानी, अत्यंत चतुर पंडितसुद्धा घोटाळ्यांत पडतात ७१.


    क्वचिद्गु"णोऽपि दोषः स्याद्दोषोऽपि विधिना गुणः ।
    गुणदोषार्थनियमस्तद्‌भिदामेव बाधते ॥ १६ ॥
    [श्लोक १६] शास्त्रविधिनुसार गुणही दोष ठरतो आणि दोषही गुण ठरतो एकाच वस्तूविषयी हा गुणदोषांचा नियम पाहिला तर लक्षात येते की, हे गुणदोष वास्तविक नसून कल्पित आहेत. (परंतु शास्त्राने सांगितलेले असल्याने त्यांना प्रामाण्य आहे). (१६)


    ज्याचा मानिजे उत्तम गुण । तोचि दोष होय परतोन ।
    एवं कर्मचि कर्मासी जाण । दोष दारुण उपजवी ॥ ७२ ॥
    एखाद्याचा एक गुण उत्तम म्हणावा तर तोच फिरून दोष ठरतो! याप्रमाणे कर्मच कर्मामध्ये भयंकर दोष उत्पन्न करते ७२.


    कर्मीं मुख्यत्वें गा आचमन । हें कर्मशुद्धीचें निजकारण ।
    तेंचि दक्षिणाभिमुखें केल्या जाण । दोष दारुण उपजवी ॥ ७३ ॥
    कर्मामध्ये आचमन करणें हें मुख्य आहे. कारण हेच कर्म शुद्धीचे मूळ होय; पण तेंच दक्षिणेस तोंड करून केल्यास मोठा दोष उत्पन्न होतो ७३.


    कानींची जेणें जाय तिडिक । तेंचि मुखीं घालितां देख ।
    होय अत्यंत बाधक । प्राणांतिक अतिबाधा ॥ ७४ ॥
    कानाची तिडीक ज्याने कमी होते. तेच (औषध) तोंडांत घातल्यास अतिशय पीडा होऊन प्राणांतिक समय प्राप्त होतो ७४.


    आचमनीं माषमात्र जीवन । घेतल्या होईजे पावन ।
    तेंचि अधिक घेतां जाण । सुरापानसम दोष ॥ ७५ ॥
    आचमन करतांना उडीद बुडेल इतकेच पाणी घेतल्यास तो पुरुष पवित्र होतो; पण तेच अधिक घेतल्यास मद्यपानाचा दोष लागतो ! ७५. 


    फणस खातां लागे गोड । तें जैं अधिक खाय तोंड ।
    तैं शूळ उठे प्रचंड । फुटे ब्रह्मांड अतिव्यथा ॥ ७६ ॥
    फणस खातांना गोड लागतो, पण तोच जर तोंडाने अधिक खाल्ला, तर पोटांत कळ उठून ब्रह्मांड फुटून जाईल इतका भयंकर त्रास होतो ७६.


    सूर्यपूजनीं पुण्य घडे । तेथ जैं बेलपत्र चढे ।
    तैं पुण्य राहे मागिलीकडे । दोष रोकडे पूजकां ॥ ७७ ॥
    सूर्याची पूजा केल्याने पुण्य लागते, पण त्यांतच जर बेलाचे पान वाहिले तर पुण्य लागावयाचे बाजूलाच राहन पूजा करणाराला हटकून पातक मात्र लागते ७७.


    ऐसा कर्मीं कर्मविन्यास । गुण तोचि करी दोष ।
    कोठें दोषांचाही विलास । पुण्य बहुवस उपजवी ॥ ७८ ॥
    असा कर्मातच कर्माचा विधिनिषेध प्रकार असतो. केव्हां केव्हां गुण असतो तोच दोष होतो; तसेंच कोठे कोठे दोषानेही पुष्कळ पुण्य लागते ७८.


    चोराकुलितमार्गीं जाण । ब्राह्मण करितां प्रातःस्नान ।
    तो नेतां कर्म त्यागून । दोषचि परी गुण गंभीर होय ॥ ७९ ॥
    (उदाहरणार्थ)- चोरांनी भरलेल्या मार्गामध्ये प्रातःस्नान करीत असलेल्या ब्राह्मणाला तें कर्म न करूं देता जर दुसरीकडे नेले तर तो दोषच, पण मोठा गुण होतो ७९.


    सर्पगरळेचें जीवन । ब्राह्मणें करितां प्राशन ।
    तें पात्र घेतां हिरोन । दोषचि परी गुण गंभीर होय ॥ १८० ॥
    सर्पाने  गरळ टाकलेले पाणी, ब्राह्मण पीत असतां, ते त्याचे भांडे जर हिसकून घेतले, तर तो दोष असूनही मोठा गुण होतो १८०.


    गृहस्थासी अग्निहोत्र गुण । तोचि संन्याशासी अवगुण ।
    ब्राह्मणीं विहीत वेदमंत्रपठण । शूद्रासी जाण तो दोष ॥ ८१ ॥
    अग्निहोत्र करणे हा गृहस्थाचा गुण आहे; पण तेच संन्याशाने केल्यास दोष होतो. वेदमंत्र पठण करणे हा ब्राह्मणाचा विहित गुण आहे; पण तोच शूद्राला दोषकारक होतो ८१.


    विषयनिवृत्तीलागीं सुगम । गुणदोषांचा केला नेम ।
    हें नेणोनि वेदाचें वर्म । विषयभ्रम भ्रांतासी ॥ ८२ ॥
    विषयापासून निवृत्ति व्हावी म्हणून गुणदोषांचे सुगम नियम करून ठेवले आहेत. हे वेदांतील वर्म न कळल्यामुळे भ्रांतिष्ट लोकांना विषयाचा भ्रम पडतो ८२.


    जंव भ्रांति तंव कर्मप्रवृत्ती । तेथ गुणदोषांची थोर ख्याती ।
    जेवीं कां खद्योत लखलखिती । आंधारे रातीं सतेज ॥ ८३ ॥
    जोपर्यंत भ्रांति असते, तोपर्यंत कर्मप्रवृत्ति असते. अंधेऱ्या रात्रींतच काजवे चमकत असतात, त्याप्रमाणे अज्ञान स्थितींत गुणदोषांचा पगडा फार मोठा असतो ८३.


    तेवीं गुणदोषांमाजीं जाण । अवश्य अंगी आदळे पतन ।
    तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ८४ ॥
    गुणदोषांमध्ये पतन हें अवश्य येऊन माथ्यावर आदळते. त्याच अर्थाचे निरूपण श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत ८४.


    समानकर्माचरणं पतितानां न पातकम् ।
    औत्पत्तिको गुणः सङ्गो न शयानः पतत्यधः ॥ १७ ॥
    [श्लोक १७] सुरापानासारखे कर्म पापजनक असले तरी ते पतितांसाठी पातक ठरत नाही. (यतीसाठी स्त्रीसंग हा दोष असला तरी) गृहस्थांसाठी तो आवश्यक गुण आहे जे जमिनीवरच झोपले आहेत, ते तेथून कोठे पडतील ? (त्याचप्रमाणे पतित हे दुराचरणाने आणखी पतित ते काय होतील ?). (१७)


    स्वकर्म पतित जाहले जाण । डोंब भिल्ल कैवर्तक जन ।
    त्यांसी मद्यपानादिदोषीं जाण । नाहीं पतन पतितांसी ॥ ८५ ॥
    महार, भिल्ल, मच्छिमार हे आपल्या कर्मानेंच पतित झालेले आहेत, तशा पतितांना मद्यपानादि दोषांपासून अधिक पतन नाही ८५.


    जें नीळीमाजीं काळें केलें । त्यासी काय बाधावें काजळें ।
    कां अंधारासी मसीं मखिलें । तेणें काय मळलें तयाचें ॥ ८६ ॥
    निळीत बुडवून काळे करून टाकलेल्या वस्त्राला काजळ आणखी काळें तें काय करणार? किंवा अंधारालाच शाईने माखले, तर त्याचे अधिक काय मळणार? ८६.


    जो स्वभावें जन्मला चांडाळ । त्यासी कोणाचा बाधी विटाळ ।
    हो कां काळें करवें काजळ । ऐसें नाहीं बळ कीटासी ॥ ८७ ॥
    त्याप्रमाणे स्वतःच जो चांडाळकुळांत जन्मास आला, त्याला कोणाचा विटाळ-बांधणार ? काजळाला आणखी काळे करण्याची शक्ति कीटाला नसते ८७.


    निर्जीवा दीधलें विख । तेणें कोणासी द्यावें दुःख ।
    तेवीं पतितासी पातक । नव्हे बाधक सर्वथा ॥ ८८ ॥
    निर्जीवाला विष दिले, तर ते त्याला काय दुःख देणार ? त्याप्रमाणे पतिताला पातक हे कधीच बाधक होत नाही ८८.


    जो केवळ खालें निजेला । त्यासी पडण्याचा भेवो गेला ।
    तेवीं देहाभिमाना जो आला । तो नीचाचा झाला अतिनीच ॥ ८९ ॥
    जो निखालस खालींच निजलेला असतो, त्याला पडण्याचे भयच नसते. त्याप्रमाणे ज्याला देहाचा अभिमान चढतो, तो नीचाहूनही नीच होतो ८९.


    रजतमादि गुणसंगीं । जो लोलंगत विषयांलागीं ।
    त्यासी तिळगुळादि कामभोगीं । नव्हे नवी आंगीं देहबुद्धी ॥ १९० ॥
    रजतमादि गुणांच्या संगतीनें जो विषयलपट होऊन राहातो, त्याला तिळगुळासारख्या सुखोपभोगाने काही नवी देहबुद्धि वाढते असें नाहीं १९०.


    जो कनकबीजें भुलला । तो गाये नाचे हरिखेला ।
    परी संचितार्थ चोरीं नेला । हा नेणेचि आपुला निजस्वार्थ ॥ ९१ ॥
    जो धोत्र्याचे बी खाऊन बरळू लागतो, तो रंगांत येऊन गाऊं नाचू लागतो; पण गांठीस असलेले द्रव्य चोरीस गेले, याची त्याला दादही नसते ९१.


    तेवीं देहाभिमानें उन्मत्त । अतिकामें कामासक्त ।
    तो नेणे बुडाला निजस्वार्थ । आपुला अपघात देखेना ॥ ९२ ॥
    त्याप्रमाणे देहाभिमानाने जो उन्मत्त होतो, अत्यंत विषयलोलुपतेनें जो कामासक्त होतो, त्याला आपल्या स्वार्थाची हानि झालेली समजत नाही व आपला घात झालेलाही कळत नाहीं ९२.


    ज्यासी चढला विखाचा बासटा । त्यासी पाजावी सूकरविष्ठा ।
    तेवीं अतिकामी पापिष्ठा । म्यां स्वदारानिष्ठा नेमिली ॥ ९३ ॥
    ज्याला विषाचा अंमल चढलेला असतो, त्याला डुकराची विष्टा पाजतात; त्याप्रमाणे अत्यंत विषयलोलुप अशा पातकी लोकांना मी स्वपत्नीनिष्ठत्वाची मर्यादा करून दिली आहे ९३.


    ज्यासी विख चढलें गहन । त्यासी सूकरविष्ठेचें पान ।
    हें ते काळींचें विधान । स्वयें सज्ञान बोलती ॥ ९४ ॥
    कारण, ज्याला अतिशय विष चढलेले असते, त्याला डुकराच्या विष्ठेचे औषध त्या कालापुरते दिले पाहिजे, असें ज्ञाते लोक सांगतात ९४.


    तेवीं जेथवरी स्त्रीपुरुषव्यक्ती । तेथवरी स्वेच्छा कामासक्ती ।
    त्याची करावया निवृत्ति । स्वदारास्थिति नेमिली वेदें ॥ ९५ ॥
    त्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष व्यक्ति जोपर्यंत आहेत, तोपर्यंत विषयलंपटाचा 'स्वेच्छाचार' हा चालावयाचाच, त्याला आळा पडावा म्हणून वेदानें स्वपत्नीनिष्ठा लावून दिली आहे ९५.


    वेदें निरोप दिधला आपण । तैं दिवारातीं दारागमन ।
    हेंही वेदें नेमिलें जाण । स्वदारागमन ऋतुकाळीं ॥ ९६ ॥
    तथापि वेदानें आज्ञा दिली म्हणून लोक आपल्या स्त्रीशीसुद्धा अहोरात्र गमन करतील, म्हणून वेदानेंच निर्बंध घातला आहे की, फक्त ऋतुकाळीच गमन केले पाहिजे ९६.


    तेथ जन्मलिया पुत्रासी । 'आत्मा वै पुत्रनामाऽसी' ।
    येणें वेदवचनें पुरुषासी । स्त्रीकामासी निवर्तवी ॥ ९७ ॥
    त्यांतही पुत्र जन्मास आला असतां 'आत्मा वै पुत्रनामासि' ह्या वाक्याने वेदाने स्त्रीकामापासून परावृत्त केलें आहे ९७.


    निःशेष विष उतरल्यावरी । तो सूकरविष्ठा हातीं न धरीं ।
    तेवीं विरक्ति उपजल्या अंतरीं । स्वदारा दूरी त्यागिती ॥ ९८ ॥
    कारण निखालस विष उतरल्यावर तो डुकराची विष्ठा हातांतसुद्धा घेत नाही ; त्याप्रमाणे अंत:करणांत विरक्ति उत्पन्न झाली असतां स्वस्त्रीचाही दूर त्याग करतात ९८.


    यापरी विषयनिवृत्ती । माझ्या वेदाची वेदोक्ती ।
    दावूनि गुणदोषांची उक्ती । विषयासक्ती सांडावी ॥ ९९ ॥
    अशा प्रकारे विषयाची निवृत्तिच वेदांत सांगितली आहे. ती वेदोक्ति गुणदोष दाखवून विषयावरची आसक्तिच सोडावयास लावते ९९.


    यतो यतो निवर्तेत विमुच्येत ततस्ततः ।
    एष धर्मो नृणां क्षेमः शोकमोहभयापहः ॥ १८ ॥
    [श्लोक १८] ज्या ज्या पदार्थांपासून मनुष्याचे चित्त निवृत्त होते, त्या त्या वस्तूच्या बंधनातून तो मुक्त होतो हा निवृत्तिरूप धर्मच माणसांसाठी परम कल्याणाचे साधन आहे कारण हा शोक, मोह आणि भय नाहीसा करणारा आहे. (१८)


    माझिया वेदाचें मनोगत । विषयीं व्हावें निवृत्त ।
    यालागीं गुणदोष दावित । विषयत्यागार्थ उपावो ॥ २०० ॥
    विषयापासून निवृत्त व्हावें हाच माझ्या वेदाचा हेतु आहे, म्हणून विषय सोडण्यासाठीच गुणदोष दाखविण्याचा उपाय योजलेला आहे २००. 

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...