मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १८ ओव्या ३०१ ते ३९७

    संन्यासग्रहणीं दृढबंधन । व्हावया कोण कारण ।

    तेचि विषयींचें निरूपण । स्वयें नारायण बोलिला ॥ १ ॥
    संन्यासग्रहण हेच दृढ बंधनाला हेतु होण्याचे कारण काय ? याविषयींचेंच निरूपण स्वतः श्रीकृष्ण सांगतात १.


    पूर्वश्लोकींचे तिनी चरण । येथील हें निरूपण ।
    श्रोतीं द्यावें अवधान । झणें विलक्षण कोणी म्हणे ॥ २ ॥
    आता कोणी म्हणतील की. हे सांगणे मोठे विलक्षण दिसते. तर हे पूर्वीच्या श्लोकांतील तीन चरणांच्या अर्थाचेंच निरूपण आहे. श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे २.


    ''निन्हुते मां च धर्महा ।
    अविपक्वकषायोऽस्मादमुष्माञ्च विहीयते ॥''
    तो देवांना, स्वतःला आणि आपल्या हृदयात असलेल्या मला फसविण्याचा प्रयत्‍न करीत असतो, त्याच्या वासना नष्ट झालेल्या नसतात म्हणून इहलोक आणि परलोक अशा दोन्ही लोकांना तो गमावून बसतो.


    करोनियां संन्यासग्रहण । न करी ज्ञान ध्यान साधन ।
    न करी प्रणव‍उच्चारण । अविरक्त जाण विषयार्थी ॥ ३ ॥
    संन्यास ग्रहण करून ज्ञान, ध्यान, इ. साधन करीत नाहीं; ओंकाराचा जपही करीत नाही; आणि विषयाच्या ठिकाणी वैराग्य नाही ३; 


    तेणें दारादिअभिलाषण । करिती द्रव्याचें संरक्षण ।
    आणि गोदानादि ग्रहण । पचन पाचन करविती ॥ ४ ॥
    त्यामुळे स्त्रियादिकांचा अभिलाष करून तो द्रव्याचे संरक्षण करतो, आणि गोदानादिक ग्रहण करून अर्चन अथवा यजनयाजन करवितो ४.


    मठाधिपत्याचिये बुद्धीं । धनधान्यस्नेहसमृद्धी ।
    नाना वाढवितां उपाधी । जीवात्मा त्रिशुद्धी नाडिला ॥ ५ ॥
    मठाधिपतीच्या नात्याने धनधान्य यांचा लोभ वाढून नानाप्रकारच्या उपाधि लागल्या की, जीवात्मा हा खरोखर नाडला जातो! ५.


    ऐसें करितां अधर्मपण । जीवासी लागलें दृढ बंधन ।
    जेणें इहलोकपरलोकसाधन । त्या नरदेहासी जाण नाडिलें ॥ ६ ॥
    ह्याप्रमाणे अधर्म करूं लागले असता जीवाला दृढतर बंधन मात्र प्राप्त होते. आणि ज्या नरदेहाच्या योगें इहलोक व परलोक साधता येतो, त्या नरदेहाला हा आंचवतो ६.


    चौर्‍याशीं लक्ष योनींप्रती । जैं असंख्य फेरे होती ।
    तैं नरदेहाची प्राप्ती । अवचटें पावती सभाग्य ॥ ७ ॥
     चौऱ्यांशी लक्ष योनींचे जेव्हां असंख्य फेरे होतात, तेव्हांच भाग्यवंत लोकांना अवचित नरदेह प्राप्त होतो ७.


    त्या नरदेहासी येऊनि जाण । स्वयें नागवला आपण ।
    करितां अधर्माचरण । नरक दारुण संन्याशा ॥ ८ ॥
    अशा त्या नरदेहाला येउन जर आपली आपणच बुडवणूक करून घेतली, आणि अधर्माचरण केले, तर त्या संन्याशाला नरकाचीच प्राप्ति होणार ८.


    ज्या नांव गा `आश्रम चौथा' । ज्यासी देवो वंदी माथां ।
    तेथेंही अधर्म करितां । नरकपाता पावले ॥ ९ ॥
    अरे ! 'चौथा आश्रम' असें ज्याला नांव, ज्या आश्रमाला देव शिरसावंदन करितो , त्यांतही जर अधर्म केला, तर नरकालाच जावयाचे ९.


    ज्या नरकाचे ठायीं । कोटि वर्षें बुडतां पाहीं ।
    ठावचि न लागें कंहीं । तैसे ठायीं बुडाले ॥ ३१० ॥
    ज्या नरकामध्ये कोट्यवधि वर्षे बुडाले तरी कधींही ठाव लागणार नाही, अशा ठिकाणी ते बुडतात ३१०.  


    मुख्य चतुर्थाश्रमीं हे स्थिती । तैं इतर आश्रमां कैंची गती ।
    यालागीं आश्रमधर्मयुक्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ ११ ॥
    मुख्य असा जो चतुर्थाश्रम, त्यांतील ही स्थिति; मग इतर आश्रमांची गोष्ट काय सांगावी? म्हणून स्वतःच श्रीकृष्ण त्या आश्रमधर्माची युक्ति सांगतात ११.


    भिक्षोर्धर्मः शमोऽहिंसा तप इक्षा वनौकसः ।
    गृहिणो भूतरक्षेज्या द्विजस्याऽऽचार्यसेवनम् ॥ ४२ ॥
    [श्लोक ४२] संन्याशाचे मुख्य धर्म शांती आणि अहिंसा, वानप्रस्थाचे मुख्य धर्म तपश्चर्या आणि तत्त्वविचार गृहस्थाश्रमीचे मुख्य धर्म प्राण्यांचे रक्षण व यज्ञयाग आणि ब्रह्मचार्‍याचा मुख्य धर्म गुरूंची सेवा होय. (४२)


    संन्याशासी मुख्य `शम' । सबाह्य `इंद्रियनेम' ।
    `अहिंसा' त्याचा स्वधर्म । हा परमधर्म संन्याशासी ॥ १२ ॥
    संन्याशाला शांति ही मुख्य आहे. याशिवाय अंतर्बाह्य इंद्रियांचा निग्रह पाहिजे. अहिंसा हा तर त्याचा स्वधर्मच, संन्याशाचा श्रेष्ठ धर्म तो हाच १२.


    वानप्रस्थाचा स्वधर्म । `तपप्राधान्य मंत्र होम' ।
    आतां गृहस्थाचा नेम । तिंही आश्रमां विश्रामदाता ॥ १३ ॥
    तपःप्रधान मंत्रहोम हा वानप्रस्थाचा स्वधर्म होय आणि तिन्ही आश्रमस्थांना आश्रय देऊन सुखविणे हा गृहस्थाचा नेम होय १३.


    गृहस्थ मुख्य `अग्निहोत्र' जाण । संन्यासी ब्रह्मचार्‍यांसी द्यावें अन्न ।
    करावें `भूतसंरक्षण' । तेहीं लक्षण अवधारीं ॥ १४ ॥
    अग्निहोत्र हे गृहस्थाला मुख्य आहे. त्याने संन्याशाला व ब्रह्मचाऱ्याला अन्न द्यावे आणि प्राणिमात्रांचे संरक्षण करावे. त्याचा मार्गही श्रवण कर १४.


    असिलेनि सामर्थ्यें जाण । अन्न धन वस्त्र जीवन ।
    तृण पर्ण निवासस्थान । देऊनि दीन रक्षावे ॥ १५ ॥
    गृहस्थानें  याचकाला यथाशक्ति अन्नपाणी, वस्त्रपात्र, पैसाअडका, राहण्यासाठी तृणपर्णाच्या झोपड्या बांधून देऊन गरीबगुरिबांचे रक्षण करावें १५.


    ब्रह्मचार्‍याचे स्वधर्मीं जाण । श्रद्धायुक्त `गुरुसेवन' ।
    एवं आश्रमधर्मलक्षण । मुख्यत्वें हें जाण उद्धवा ॥ १६ ॥
     आतां ब्रह्मचाऱ्याचा स्वधर्म म्हणजे श्रद्धायुक्त बुद्धीनें गुरूची सेवा करणे. उद्धवा ! याप्रमाणे आश्रमधर्माची ही मुख्य लक्षणे समजावी १६.


    गृहस्थाश्रमीं जो धर्म आहे । तो इतर आश्रमीं करूं नये ।
    इतराश्रमींचा धर्म पाहें । गृहस्थाश्रमीं होये करणीय ॥ १७ ॥
    गृहस्थाश्रमाला जो धर्म सांगितला आहे, तो इतर आश्रमीयांनी करूं नये. परंतु इतर आश्रमांतील काही धर्म गृहस्थाश्रमीयाने करण्यास हरकत नाही १७.


    ब्रह्मश्चर्यं तपः शौचं संतोषो भूतसौहृदम् ।
    गृहस्थस्याप्यृतौ गन्तुः सर्वेषां मदुपासनम् ॥ ४३ ॥
    [श्लोक ४३] फक्त ऋतुकाळीच आपल्या स्त्रीशी सहवास करणार्‍या गृहस्थाचेसुद्धा ब्रह्मचर्य, तपश्चर्या, पवित्र्य, संतोष आणि सर्व प्राण्यांबद्दल प्रेमभाव हे मुख्य धर्म होत माझी उपासना तर सर्वांनीच केली पाहिजे. (४३)


    गृहस्थें व्हावया निष्पाप । ठाके तो करावा जप तप ।
    उभय शौचांचें स्वरूप । अतिसाटोप करावें ॥ १८ ॥
    गृहस्थानें निष्पाप होण्यासाठी होईल तितका जप व तप करावें, आणि अंत:शुद्धि व बाह्यशुद्धि या दोन्ही शुद्धि अत्यावश्य साधाव्यात  १८.


    पोटींची सांडूनि कुसमुस । यथालाभें अतिसंतोष ।
    परोपकारीं अतिहव्यास । सुहृद सर्वांस स्वात्मत्वें ॥ १९ ॥
    पोटांतील तळमळ सोडून देउन, मिळेल त्यांतच अत्यंत संतोष मानावा. आपण सर्वांचे सुहृद आहोत असे समजून परोपकार करण्याचा हव्यास धरावा १९.


    गृहस्थीं ब्रह्मचर्यलक्षण । ऋतुकाळीं स्वदाराभिगमन ।
    मुख्यत्वें करावें माझें भजन । हा स्वधर्म जाण सर्वांचा ॥ ३२० ॥
    गृहस्थाश्रमांतही ब्रह्मचर्याचे लक्षण हें की, ऋतुकाळीच स्वस्त्रीशी रममाण व्हावें. मुख्यत्वेकरून माझे भजन करणे हा सर्वाचा स्वधर्म होय ३२०.


    सर्व आश्रम सर्व वर्ण । त्यांसी हाचि स्वधर्म जाण ।
    सांडोनि विषयाचें भान । माझें भजन करावें ॥ २१ ॥
    सर्व वर्णाना व सर्व आश्रमांना हाच स्वधर्म आहे की, विषयाचे भान सोडून देऊन माझे भजन करावें २१.


    करितां स्वधर्में माझी भक्ती । भक्तासी होय जे प्राप्ती ।
    तेचि सांगताहे श्रीपती । उद्धवाप्रती स्वानंदें ॥ २२ ॥
    स्वधर्माने माझीच भक्ति केली असतां भक्तांना जे काय प्राप्त होते, तेंच श्रीकृष्ण उद्धवाला आनंदाने सांगत आहेत २२.


    इति मां यः स्वधर्मेण भजेन्नित्यमनन्यभाक् ।
    सर्वभूतेषु मद्‍भावो मद्‍भक्तिं विन्दतेऽदृढाम् ॥ ४४ ॥
    [श्लोक ४४] अशा प्रकारे जो अनन्य भावाने आपल्या वर्णाश्रमधर्मांच्या द्वारा माझ्या सेवेत तत्पर आणि सर्व प्राण्यांच्या ठिकाणी माझीच भावना करतो, त्याला माझी दृढ भक्ती प्राप्त होते. (४४)


    सर्व भावें अनन्यगतीं । करितां स्वधर्में माझी भक्ती ।
    माझा भावो सर्वांभूतीं । शीघ्रगती उल्हासे ॥ २३ ॥
    सर्वोपरी एकनिष्ठेनें व स्वधर्मानं माझी भक्ति केली असता, सर्व भूतांत माझी भावना दृढतर होते २३.


    मद्‍भावो जोडल्या सर्व भूतीं । तेणें प्रकटे माझी चौथी भक्ती ।
    जिच्या पायीं चारी मुक्ती । सदा लागती स्वानंदें ॥ २४ ॥
    सर्व प्राणिमात्रांमध्ये माझी भावना होऊ लागली म्हणजे जिच्या पायांला स्वानंदानें चारही मुक्ति लागतात, अशी माझी चौथी भक्ति प्रगट होते २४.


    अनिवार अनन्यगती । सर्वस्वें ज्यासी माझी प्रीती ।
    तो लाहे माझी परमभक्ती । जेथोनि कल्पांतीं च्यवेना ॥ २५ ॥
    अनिवार एकनिष्ठेने सर्वस्वी ज्याला माझी आवड लागते त्याला माझी 'परमभक्ति प्राप्त होते व तो तिच्यापासून अथवा माझ्या परमधामापासून कल्पांतीही च्युत होत नाही २५.


    भक्त्योद्धवानपायिन्या सर्वलोकमहेश्वरम् ।
    सर्वोत्पत्त्यप्ययं ब्रह्म कारणं मोपयति सः ॥ ४५ ॥
    [श्लोक ४५] उद्धवा ! सर्व लोकांचा स्वामी, सर्वांची उत्पत्ती आणि प्रलयांचे परम कारण ब्रह्म अशा मला तो अखंड भक्तीच्याद्वारा प्राप्त करून घेतो. (४५)


    सकळ सच्चिदानंदस्थिती । जीमाजीं सांपडे मी सहजगती ।
    ती नांव माझी `परमभक्ती' । जाण निश्चितीं उद्धवा ॥ २६ ॥
    उद्धवा ! जी पूर्ण सचिदा सच्चिदानंदमय स्थिति, तिच्यामध्ये मी सहजगतीनें सांपडतो. तिचंच नाव माझी 'परमभक्ति' असें तूं निश्चित जाण २६.


    विपरीत संसाराचें भान । दिसे दृष्य-विलक्षण ।
    तेथ सदा स्वानंदपूर्ण । ते चौथी जाण भक्ती माझी ॥ २७ ॥
    ज्या अवस्थेत संसाराचे स्वरूप उलटें दिसावयास लागते : दृश्यही विलक्षण दिसते : व सर्वकाल पूर्ण स्वानंदाचा अनुभव येतो ती माझी 'चौथी भक्ति' होय २७.


    जेथ देव भक्त एक होती । एकपणें भजनस्थिती ।
    ऐशी साधकांसी प्राप्ती । ते `परमभक्ती' उद्धवा ॥ २८ ॥
    उद्धवा! जेथे देव आणि भक्त एक होऊन जातात, ऐक्यस्वरूपानेच भजन घडते, अशी जी साधकाची प्राप्ति, तीच माझी 'परमभक्ति' होय २८.


    माझी प्रकटल्या परम भक्ती । पतन नाहीं प्रळयांतीं ।
    साधक मद्‌रूपा येती । स्वरूपस्थितीं समसाम्यें ॥ २९ ॥
    अशी माझी 'परमभक्ति' प्रकट झाली की, प्रळयांतीसुद्धा पतन नाही. कारण स्वरूपस्थितीच्या समसाम्यामुळे साधक मत्स्वरूपालाच पोचतात २९.


    त्या स्वरूपाचें लक्षण । सांगताहे श्रीनारायण ।
    उत्पत्ति-स्थिति-निदान । कारणा जो चिदात्मा ॥ ३३० ॥
    त्या स्वरूपाचे लक्षण श्रीनारायण सांगतात. उत्पत्ति-स्थिति-लयाच्या कारणाचेही कारण असा तो चिदात्मा आहे ३३०; 


    जो सकळ नियंता ईश्वरु । जो विश्वात्मा विश्वंभरु ।
    जो उपनिषदांचें सारु । जो महेश्वरु जगाचा ॥ ३१ ॥
    जो सर्वांचा नियंता ईश्वर ; जो विश्वात्मा आणि विश्वंभर ; जो उपनिषदांचे सार आणि जो जगाचा महेश्वर ३१ 


    त्या पदाची पदप्राप्ती । भक्त पावले परमभक्तीं ।
    तेंचि पुढती उद्धवाप्रती । स्वानंदें श्रीपति सांगत ॥ ३२ ॥
     त्याच्या पदाला भक्त हे माझी 'परमभक्ति' करून पोचतात. तेच पुढे श्रीकृष्ण स्वानंदानें  उद्धवाला सांगत आहेत ३२.


    इति स्वधर्मनिर्णिक्तसत्त्वो निर्ज्ञातमद्‍गतिः ।
    ज्ञानविज्ञानसंपन्नो नचिरात्समुपैति माम् ॥ ४६ ॥
    [श्लोक ४६] अशा प्रकारे तो गृहस्थ आपल्या धर्मांचे पालन करून आपले अंतःकरण चांगल्या तर्‍हेने शुद्ध करून माझे स्वरूप जाणतो आणि ज्ञानविज्ञानाने संपन्न होऊन लवकरच मला प्राप्त करून घेतो. (४६)


    ऐशिया पदाची पदप्राप्ती । साधक पावले स्वधर्मस्थितीं ।
    ते स्वधर्मप्रयोजनगती । यथानिगुती सांगत ॥ ३३ ॥
    एवढ्या पदाला साधक स्वधर्मस्थितीने वागून पोंचतात. त्याच स्वधर्माचे कार्यकारण यथार्थ रीतीने भगवान सांगतात ३३.


    करितां स्वधर्मानुष्ठान । रजतमें नाशती जाण ।
    शुद्धसत्त्व अंतःकरण । तेथ माझें ज्ञान प्रकाशे ॥ ३४ ॥
    स्वधर्माचे अनुष्ठान केलें म्हणजे रज आणि तम हे नाश पावतात. आणि अंत:करण शुद्धसत्त्वयुक्त झाले म्हणजे तेथें माझें ज्ञान प्रकाशमान होते ३४.


    प्रकाशल्या माझें ज्ञान । तेणें उल्हासे माझें भजन ।
    भजनास्तव मन । विकल्पपण पैं त्यागी ॥ ३५ ॥
    आणि माझे ज्ञान प्रकाशित झाले म्हणजे माझे भजनही फैलावते आणि भजनाचा विकास झाला म्हणजे मन संकल्प विकल्प सोडून देते ३५.


    विकल्पत्यागाचिये गतीं । वैराग्यें उचंबळे विरक्ती ।
    भासे परमात्मा सर्व भूतीं । तेणें `परमभक्ती' उल्हासे ॥ ३६ ॥
    विकल्पाचा त्याग झाला की विरक्ति उचंबळून येते व सर्व प्राणिमात्रांमध्ये परमात्म्याचाच भास होऊ लागतो; आणि तेणेकरून 'परमभक्ति' विकास पावते ३६.


    उल्हासल्या परमभक्ती । भक्तासी माझी स्वरूपप्राप्ती ।
    तेचि स्वरूपाची स्वरूपस्थिती । यथानिगुतीं सांगत ॥ ३७ ॥
    परमभक्तीचा  विकास झाला की माझ्या भक्ताला मत्स्वरूपाची प्राप्ति घडते. त्याच स्वरूपाचे लक्षण यथार्थ रीतीने सांगतात ३७.


    परमात्मा परंज्योती । परब्रह्म परंज्ञप्ती ।
    परात्परतर प्रकृती । वेद बोलती `परावर' जो ॥ ३८ ॥
    परमात्मा, परंज्योति, परब्रह्म, परंज्ञप्ति, प्रकृतीहुन परात्पर व ज्याला 'परावर' म्हणतात ३८.


    अज अव्यय अक्षर । अरूप अनाम अगोत्र ।
    अलक्ष अतर्क्य अपार । अपरंपारस्वरूप ॥ ३९ ॥
    अज, अव्यय, अक्षर, अरूप, अनाम, अगोचर, अलक्ष्य, अतर्क्य , अपार आणि अनंतस्वरूप ३९; 


    ऐशी निजस्वरूपीं निजप्राप्ती । भक्त पावले स्वधर्मस्थिती ।
    जेथूनि परतलिया श्रुती । नेतिनेतीं निजनिष्ठा ॥ ३४० ॥
    अशा प्रकारची आत्म्यामधीलच आत्मस्वरूपाची प्राप्ति भक्तांना स्वधर्मस्थितीने घडून येते, 'नेति' 'नेति' असें म्हणून श्रुतीही तेथून परत फिरतात (अशा स्वस्वरूपस्थितीला भक्त पोचतात) ३४०.


    ऐसें मद्‌रूप पावल्यापाठीं । संसाराची काढिली कांटी ।
    नांवरूपांची बुडाली गोठी । पडली तुटी जन्ममरणां ॥ ४१ ॥
     ह्याप्रमाणे मत्स्वरूप झाले म्हणजे संसाराचे कुंपण तुटून जातें: नामरूपाची वार्ता लुप्त  होते व जन्ममरणाचे नावही शिल्लक राहात नाही ४१. 


    एवं स्वधर्माचेनि धर्मवशें । मीतूंपणाचें नांवचि पुसे ।
    मद्‌रूपाचेनि सामरस्यें । अनायासें मीचि जाहले ॥ ४२ ॥
    अशा प्रकारे स्वधर्माच्या आश्रयाने चालले असतां मीपणाचे नांवच पुसून जाते आणि मत्स्वरूपाशी समरस झाल्याने अनायासे ते मीच होतात ४२.


    `पूर्वीं होतों मी जीव । आतां झालों सदाशिव' ।
    हाही बुडाला आठव । ऐसा माझा अनुभव मद्‍भक्तां ॥ ४३ ॥
    पूर्वी मी जीव होतो आणि आतां शिव झालों, ह्याचीही आठवण राहात नाही. असा माझ्या भक्तांना माझा अनुभव येतो ४३.


    शून्य पडिलें संसारस्थिती । तेथ कैंची पुनरावृत्ती ।
    ऐशी मद्‍भक्तां माझी प्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ४४ ॥
    संसाराच्या अस्तित्वावरच पाणी पडते. तेथे पुनरावृत्ति कुठून ? अशी माझ्या भक्तांना माझी प्राप्ति होते ४४.


    एवं स्वधर्में मत्प्राप्ति जाण । तया स्वधर्माचें महिमान ।
    स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । सावधान परियेसा ॥ ४५ ॥
     तात्पर्य ,  स्वधर्मेंकरूनच माझी प्राप्ति होते हे लक्षात ठेव. असा त्या स्वधर्माचा महिमाच श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत. तरी लक्ष देऊन श्रवण करावा ४५.


    वर्णाश्रमवतां धर्म, एष आचारलक्षणः ।
    स एव मद्‍भक्तियुतो, निःश्रेयसकरः परः ॥ ४७ ॥
    [श्लोक ४७] मी तुला हा वर्णाश्रमांचे पालन करणार्‍यांच्या आचारधर्म सांगितला आहे हे करताना जर तो माझ्या भक्तीने संपन्न असेल, तर त्याला खात्रीने मोक्षाची प्राप्ती होते. (४७)


    अनादि जो स्वधर्माचार । जो कां मोक्षकर साचार ।
    तेणें स्वधर्में सकाम नर । लोकांतर वांछिती ॥ ४६ ॥
    अत्यंत प्राचीनकालापासून चालत आलेला जो स्वधर्माचार, जो खरोखर मोक्ष देणारा, त्याच स्वधर्माचरणाने सकाम लोक स्वर्गादि लोकांची इच्छा करतात! ४६.


    झालिया लोकांतरप्राप्ती । तेथूनि होय पुनरावृत्ती ।
    न करूनियां माझी भक्ती । स्वधर्म नाशिती सकामें ॥ ४७ ॥
    पण तो स्वर्ग मिळाला तरी तेथून मृत्युलोकावर जन्म घ्यावा लागतोच. ह्याप्रमाणे माझी भक्ति न करितां लोक सकामपणाने स्वधर्म नासून टाकतात ४७.


    ब्राह्मणा आला भद्रजाती । आम्हां न पोसवे हा निश्चितीं ।
    मग तो देऊनियां घेती । वाहावया पोथी वृद्ध ढोर ॥ ४८ ॥
    ब्राह्मणाला हत्ती दान मिळाला तर ह्याला खावयाला कोणी घालावें असें म्हणून त्याला देऊन टाकतात, आणि पोथ्या वहावयाला म्हातारा बैल घेतात ४८.


    यापरी स्वधर्म जाण । उपेक्षिती गा ब्राह्मण ।
    मग लोकांतरीं कोरान्न । मागावया कण धांवती ॥ ४९ ॥
    ह्याप्रमाणे बाह्मणलोक स्वधर्माची उपेक्षा करतात आणि स्वर्गात भिकेचे दाणे गोळा करावयाला जातात ! ४९.


    घरीं आणोनि दीघली कामधेनु । आम्हां न पोसवे म्हणूनु ।
    ताकासाठीं देती हेळसूनु । आली नागवणु ते नेणे ॥ ३५० ॥
    घरांत कोणी कामधेनु आणून दिली तर ती आम्हांला पोसवत नाही म्हणून ताकाच्या मोबदल्यांत तिला देऊन टाकतात. पण त्यांत आपली केवढी नागवण झाली हे त्यांना कळत नाही! ३५०. 


    तेवीं म्यां जाण गायत्रीमंत्र । दिधला ब्राह्मणांसी स्वतंत्र ।
    तो उपेक्षूनियां मंत्रतंत्र । शूद्राचार आचरती ॥ ५१ ॥
    त्याप्रमाणे मी ब्राह्मणांना गायत्री हा स्वतंत्र मंत्र दिला असता त्याची उपेक्षा करून भलतेच मंत्रतंत्र जपतात व ते शुद्राच्या आचाराने वागतात ! ५१.


    सौर शाक्त गाणपत्यादि जाण । नाना मंत्रदीक्षा घेती ब्राह्मण ।
    परी गायत्रीचें अनुष्ठान । एकही जाण न करिती ॥ ५२ ॥
    ब्राह्मणलोक सौर, शाक्त, गाणपत्य, इत्यादि अनेक प्रकारच्या दीक्षा घेतात; पण एकही कोणी गायत्रीचे अनुष्ठान करीत नाही! ५२.


    नाहीं गायत्रीचें अनुष्ठान । परी विपरीत झालें आन ।
    गायत्रीचें श्रेय जाण । देती ब्राह्मण द्रव्यार्थ ॥ ५३ ॥
    गायत्रीचे अनुष्ठान तर नाहीच, पण त्याहून विपरीत करतात. ते काय ? तर पैशासाठी ब्राह्मण हे गायत्रीमंत्राचें सारें श्रेयच विकत देतात ! ५३.


    गायत्रीमंत्र असोनि घरीं । तिचा भावार्थ कोणी न धरी ।
    दीक्षेलागीं मूर्खाचे द्वारीं । लोळिजे द्विजवरीं ऐसें झालें ॥ ५४ ॥
    गायत्री मंत्र घरांत असून त्याचा भावार्थ कोणी धरीत नाहीत आणि मूर्खाच्या दारात 'दीक्षा द्या ' 'दीक्षा द्या ' म्हणून ब्राह्मणच लोळत असतात! असा प्रकार झाला आहे ५४.


    शस्त्रास्त्रीं रथ सुदृढू । त्यावरी बैसविला भेडू ।
    सांडूनि पळणें मानी सुरवाडू । न शके विभांडूं रणांगण ॥ ५५ ॥
    शस्त्रास्त्रांनी भरलेला खंबीर रथ असला, आणि त्यावर नेऊन भित्रा मनुष्य बसविला, तर रथ टाकून पळून जाणे ह्यांतच तो सुख मानतो. कारण त्याला युद्ध करण्याचे मुळी सामर्थ्यच नसते ५५.


    तेवीं वेदरूप मी नारायण । ब्राह्मणहृदयीं असें जाण ।
    त्याचें नेणोनि महिमान । वेदपारायण विकिती ॥ ५६ ॥
    त्याप्रमाणे मी वेदरूपाने नारायण ब्राह्मणांच्या हृदयांतच असता, त्याचा महिमा न जाणतां वेदाचें केलेलें पारायण विकून टाकतात ! ५६.


    वांछूनियां स्वर्गफळ । नाना याग करिती प्रबळ ।
    कामकल्पना केवळ । स्वधर्म विकळ पाडिती ॥ ५७ ॥
    स्वर्गफळाची इच्छा धरून अनेक प्रचंड यज्ञ करतात. तात्पर्य सकाम कल्पना ह्या स्वधर्माला स्वतः बुडवितात ५७.


    वेदीं प्रतिपाद्य कर्मफळ । तो वेदु मिथ्या नव्हे केवळ ।
    तो वेदवाद समूळ । नेणोनि बरळ हा मानिती ॥ ५८ ॥
    ज्या वेदामध्ये कर्माचे फळ सांगितलेले आहे, तो वेद केवळ मिथ्या नव्हे ; त्या वेदांत खरे काय प्रतिपादन केलें आहे ते मुळीच न जाणतां वाटेल ती बडबडच खरी समजतात ! ५८.


    घ्यायवा वोखदाची वाटी । माता साकर दे चिमुटी ।
    तें मुख्य फळ नव्हे दृष्टीं । जावया पोटींचा महारोगु ॥ ५९ ॥
    औषधाची वाटी  घ्यावी म्हणून आई मुलाला साखरेची चिमटी देत असते; परंतु खरे पाहिले तर तो उद्देश कांहीं मुख्य नसतो. तर पोटांतला प्रबळ रोग हटावा हाच तिचा उद्देश असतो ५९.


    तेवीं वेद बोले जें फळ । तें प्रवृत्तिरोचना केवळ ।
    स्वधर्म विचारितां समूळ । चित्तमळक्षाळक ॥ ३६० ॥
    तद्वत वेदानें जें फळ सांगितले आहे, ते केवळ स्वधर्माची रुचि उत्पन्न व्हावी एवढ्याकरितांच. कारण स्वधर्म हा चित्तांतील सर्व मळ नाहीसा करणारा आहे ३६०.


    स्वधर्म सांडूनि सर्वथा । सकाम कर्में करूं जातां ।
    तेंही शिणल्यावेगळें तत्त्वतां । क्षुद्रकामता फळेना ॥ ६१ ॥
    पण स्वधर्म सोडून देऊन सकाम कर्मेच करूं गेल्यास त्यांतही कष्ट केल्याशिवाय क्षुद्र मनोरथही पूर्ण होत नाहीत ६१.


    जेणें द्रव्यें अमृत ये हाता । तें वेंचूनि मद्य घेतां ।
    अधर्म आणि उन्मत्तता । पिशाचता जग थुंकी ॥ ६२ ॥
    ज्या द्रव्याने अमृत हाती येते, तें खर्च करून मद्यच विकत घेतल्यास अधर्म होतो, माद चढतो, वेडे चाळे करतो आणि त्यामुळे सारे जग तोंडावर थुंकतें ६२.


    स्वपतीसीं काम भोगितां । परलोक पावि पतिव्रता ।
    तोचि काम परपुरुषीं करितां । अधःपाता नेतसे ॥ ६३ ॥
    आपल्या भ्रताराशींच रममाण झाले असतां पतिव्रतेला परलोक प्राप्त होतो; पण तीच परपुरुषाशी रममाण झाली तर अध:पाताला जाते ६३.


    जिह्वा दुरुक्ती बोलतां । यमप्रहार वाजती माथां ।
    तिणेंचि `राम राम' म्हणतां । हरिभक्तां यम कांपे ॥ ६४ ॥
    जिव्हा जर दुरुक्ति बोलेल तर यमाचे तडाखे मस्तकावर बसतात; पण तीच जिव्हा 'राम राम ' म्हणेल तर त्या हरिभक्तांना यमसुद्धा कांपतो ६४.


    तेवीं पावोनि उत्तम जन्म । कर्म करूनि सकाम ।
    भोगावें दुःख परम । मरण जन्म अनिवार ॥ ६५ ॥
    त्याप्रमाणे उत्तम जन्माला येऊन सकाम कर्म केले असतां अत्यंत दुःख भोगावे लागते; आणि असंख्य जन्ममृत्यु सोसावे लागतात ६५.


    तेणेंचि देहें स्वधर्म । करितां निरसे सकळ कर्म ।
    निवारे मरणजन्म । बहुतां हे वर्म कळेना ॥ ६६ ॥
    पण त्याच देहाने स्वधर्माचरण केले, तर सारेच कर्म लयास जाऊन जन्ममरणाचे फेरे चुकतात. पण हें मर्म पुष्कळ लोकांना कळत नाही ६६.


    स्वधर्में घडे भगद्‍भक्ती । ऐशी अतिगुह्य आहे व्युत्पत्ती ।
    ते मी सांगेन तुजप्रती । यथानिगुतीं उद्धवा ॥ ६७ ॥
    स्वधर्मानें भगवंताची भक्ति घडते हेच ह्यांतलें गूढ रहस्य आहे. उद्धवा ! तेच मी तुला यथार्थ रीतीने सांगेन ६७.


    स्वधर्म करणें आवश्यक । तेथें सांडणें फळाभिलाख ।
    तेंचि `मदर्पण' चोख । न करितां देख संकल्पु ॥ ६८ ॥
    स्वधर्माने वागणे अत्यंत अवश्य आहे; पण त्यांत फलाची आशा सोडली पाहिजे. म्हणजे संकल्प न करताही ते खरोखर मला अर्पण होतें ६८.


    हो कां घरिच्याचि रांजणीं । निघती मुक्ताफळांच्या श्रेणी ।
    तरी कां ताम्रपाणीं । समुद्रमिळणीं शोधावी ॥ ६९ ॥
    अरे ! घरांतल्या रांजणामध्येच मोत्यांच्या रांगा सांपडल्या, तर मग ताम्रपर्णी नदी समुद्राला मिळते तें स्थळ कशाला शोधावयास जावें ? ६९.


    आपुलेच घरींचीं झाडें । फळती कल्पतरूचेनि पाडें ।
    तरी अमरावतीचे चाडें । वृथा वेडे कां शिणती ॥ ३७० ॥
    आपल्या घरचींच झाडे जर कल्पवृक्षाप्रमाणे फलद्रूप होऊ लागली, तर अमरावतीच्या इच्छेनें वेड्यांनी कां बरें शिणावें ? ३७० 


    हो कां सद्‍गुरूंचे तीर्थ घेतां । पाविजे परम पवित्रता ।
    तरी धांवावया नाना तीर्था । विशेषता ते कायी ॥ ७१ ॥
    किंवा सद्गुरूचे तीर्थ घेतलें असतां अत्यंत पवित्रता प्राप्त होते; तर मग हिकडच्या तिकडच्या शेंकडों तीर्थाकडे धावत सुटण्यांत काय अर्थ ? " ७१. 


    कां ईश्वरत्वें पिता पूजितां । निजमोक्ष लाभे आइता ।
    तरीं भजावें देवां देवतां । कोण्या अर्था सज्ञानीं ॥ ७२ ॥
    किंवा ईश्वरभावनेने पित्याची पूजा केली, तर सहज मोक्ष प्राप्त होतो, तर मग ज्ञात्या लोकांनी देव-देवतांना कशाकरितां भजावें ? ७२.


    तेवीं स्वकर्माचि करितां । लाभे आपली निष्कर्मता ।
    ते स्वधर्मीं काम कल्पितां । जीव निजस्वार्था नाडले ॥ ७३ ॥
    तद्वत् स्वकर्म करतांनाच आपली निष्कर्मता प्राप्त होते; पण त्याच स्वधर्मामध्ये फलाची इच्छा धरली की प्राणी आपल्या खऱ्या स्वार्थाला अंतरतात ७३.


    निर्विकल्पें स्वधर्माचरण । त्या नांव माझें `शुद्ध भजन' ।
    तेणें भजनें हो‍ऊनि प्रसन्न । मी विवेक-वैराग्य-ज्ञान भक्तांसी दें ॥ ७४ ॥
    निर्विकल्प चित्ताने स्वधर्माचरण करणे याचेच नांव माझे 'शुद्ध भजन' होय. त्याभजनानेच मी प्रसन्न होऊन माझ्या भक्तांना विवेकयुक्त वैराग्य व ज्ञान देतों ७४.


    तेणेंचि ज्ञानें होय शुद्ध मती । चित्तशुद्धीमाजीं परमभक्ती ।
    ते भक्तीनें माझी परम प्राप्ती । भक्त पावती उद्धवा ॥ ७५ ॥
    त्याच ज्ञानाने बुद्धि पवित्र होते. चित्त शुद्ध झाले म्हणजे त्यांतच माझी 'परम भक्ति' उत्पन्न होते. आणखी उद्धवा ! त्या भक्तीनेच भक्तांना माझ्या श्रेष्ठ स्वरूपाची प्राप्ति होते ७५, 


    यालागीं नैराश्यें जें स्वधर्मकर्म । तेंचि माझें भजन परम ।
    तेणें भजनें भक्तोत्तम । स्वयें पुरुषोत्तम हो‍ऊनि ठाकती ॥ ७६ ॥
    म्हणून निष्काम जें  स्वधर्माचरण तेंच माझे उत्तम भजन होय. त्या भजनानेच भक्तोत्तम असतात ते स्वतःच पुरुषोत्तम होऊन राहातात ७६.


    यापरी स्वधर्मस्थितीं । लाभे आपुली निजमुक्ती ।
    तेचि म्यां तुजप्रती । यथानिगुतीं सांगितली ॥ ७७ ॥
    ह्याप्रमाणे आपल्या स्वधर्मातच आपणास मुक्ति लाभते. तोच प्रकार मी तुला इत्थंभूत सांगितला ७७.


    एतत्तेऽभिहितं साधो भवन्पृच्छति यच्च माम् ।
    यथा स्वधर्मसंयुक्तो भक्तो मां समियात्परम् ॥ ४८ ॥
    इति श्रीभागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
    एकादशस्कन्धे अष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥
    [श्लोक ४८] हे उद्ववा ! तू मला जो प्रश्न विचारला होतास, त्याचे उत्तर मी दिले आणि आपल्या धर्माचे पालन करणारा भक्त परब्रह्मस्वरूप अशा मला कशा रीतीने प्राप्त होतो, तेही सांगितले. (४८)


    उद्धवा पुसिलें त्वां मजप्रती । स्वधर्में केवीं घडे मुक्ती ।
    भक्तीनें पाविजे निजमुक्ती । तें म्यां तुजप्रती सांगितले ॥ ७८ ॥
    उद्धवा ! स्वधर्मानेच मुक्ति कशी घडते असें तूं मला विचारलें होतेंस, तर भक्तीनेंच (भक्तियुक्त स्वधर्माने ) मुक्ति प्राप्त होते हे मी तुला सांगितले ७८.


    हाता आलिया स्वधर्म । तत्काळ निरसे स्वकर्म ।
    उडोनि जाय भवभ्रम । प्राप्ती परम स्वधर्में ॥ ७९ ॥
    स्वधर्म हाती लागला की, स्वकर्म तत्काल निरास पावते आणि संसाराचा सारा भ्रम दूर होतो. याप्रमाणे स्वधर्माने परमपदाची प्राप्ति होते ७९.


    माझिया प्राप्तीलागीं स्वकर्म । नैराश्यें आचरावा स्वधर्म ।
    हें ज्यासी कळे वर्म । तया पुरुषोत्तम सदा वश्य ॥ ३८० ॥
    माझी प्राप्ति पाहिजे असेल तर स्वस्वकर्म म्ह. स्वधर्म निष्काम भावाने आचरावा. हे वर्म ज्याला कळले, त्याला पुरुषोत्तम वश झालाच म्हणून समजावें ३८०.


    स्वधर्माऐसा स्पर्शमणी । सांपडल्या निर्विकल्पपणीं ।
    तो लावितां दृश्यस्थानीं । चिन्मात्रसुवर्णीं तेज उठी ॥ ८१ ॥
    स्वधर्मासारखा परिस निर्विकल्पपणे सांपडतांच तो दृश्य पदार्थास लावला असता, ते सर्व पदार्थ चिन्मात्र सुवर्ण म्ह. ब्रह्ममयच होऊन जातात ८१.


    स्वधर्माऐसा दिनमणी । नैराश्यें उगवलिया स्वभुवनीं ।
    तो अज्ञाननिशा निरसुनी । स्वप्रकाशपणीं सदा वर्ते ॥ ८२ ॥
    स्वधर्मासारखा सूर्य निष्कामतेनें अंत:करणांत उदय पावला असतो तो अज्ञानरूप रात्र नाहीशी करून सदासर्वदा स्वप्रकाशपणानेच नांदतो ८२.


    स्वधर्माऐसें निज‍अमृत । जे निर्विकल्पें सेवूं जाणत ।
    त्यांसी जन्ममरणांचा आवर्त । मी श्रीअनंत लागों नेदीं ॥ ८३ ॥
    स्वधर्मासारखें अमृत निर्विकल्पत्वाने म्ह. निष्कामपणे ज्यांना सेवन करता येते, त्यांना मी श्रीअनंत जन्ममरणाचा भोंवरा लागूच देत नाही ८३.


    जे कां स्वधर्मीं विमुख । त्यासीं माझी प्राप्ती नाहीं देख ।
    जन्मकोटी परम दुःख । सकामें मूर्ख भोगिती ॥ ८४ ॥
    पण जे स्वधर्माला विमुख होतात, त्यांना मात्र माझी प्राप्ति होत नाही. ते मूर्ख सकामपणामुळे कोट्यवधि जन्मपर्यंत दुःसह दुःख भोगीत असतात ८४, 


    त्या स्वधर्माची अतर्क्य गोष्टी । न कळे नैष्कर्में निजदृष्टीं ।
    याचिलागीं जन्मकोटी । अतिसंकटीं जीव भोगी ॥ ८५ ॥
    त्या स्वधर्माची गोष्ट अतर्क्य  आहे. त्याची निष्कर्मता डोळ्यांना दिसत नाही. म्हणूनच प्राणी कोट्यवधि जन्मपर्यंत दुःख भोगीत राहतात ८५.


    स्वधर्में करितां स्वकर्म । जैं नैष्कर्म्यतेचें कळे वर्म ।
    तैं विभांडूनि मरणजन्म । परब्रह्म पावती ॥ ८६ ॥
    स्वधर्मानेच स्वकर्म करीत असतां निष्कामपणाचें वर्म कळले, तर ते जन्ममरणाचा फेरा चुकवून परब्रह्मस्वरूपाला पोचतात ८६.


    एवं स्वधर्म यापरी । तारक होय संसारीं ।
    स्वधर्माचे नावेवरी । तरले भवसागरीं निजभक्त ॥ ८७ ॥
    अशाप्रकारें स्वधर्म हा संसारामध्ये तारकच होतो. स्वधर्मरूप नावेवरून माझे पुष्कळ भक्त संसारसागर तरून गेले ८७.


    संसार तरले हा बोलु कुडा । स्वधर्म करितं माझिया चाडा ।
    होय भवसागर कोरडा । मी सांपडें पुढा निजात्मा ॥ ८८ ॥
    'संसार तरून गेले' हे सुद्धा बोलणे खोटेंच, कारण माझ्या प्राप्तीच्या इच्छेने स्वधर्माचे आचरण केले असतां संसारसागर मुळी कोरडाच होऊन जातो आणि मी परमात्मा त्यांना समोरच सापडतों ८८.


    ऐशी स्वधर्माची थोरी । निष्कामतेच्या निजकुसरी ।
    देवो सांगे आवडीभरीं । नानापरी प्रबोधें ॥ ८९ ॥
    निष्कामपणाच्या साहाय्याने होणाऱ्या स्वधर्माचरणाची इतकी थोरवी आहे. त्याचीच देवाला मोठी आवड असल्याने त्याने नाना प्रकारे उद्धवाला समजून सांगितले ८९.


    भक्तिप्राधान्य भागवत । मुख्य भक्ति ते स्वधर्मयुक्त ।
    येणें स्वधर्मभजनें समस्त । परम भागवत उद्धरले ॥ ३९० ॥
    भागवत हें भक्तिप्रधान आहे, त्यांतील भक्ति ही स्वधर्मयुक्त आहे. ह्या स्वधर्मभजनानेच सारे श्रेष्ठ भक्त उद्धरून गेले ३९०, 


    त्या स्वधर्मकर्माचा एकान्त । निजभजनभक्तीचा भावार्थ ।
    उद्धवासी श्रीकृष्णनाथ । स्वयें सांगत एकादशीं ॥ ९१ ॥
    त्या स्वधर्मकर्मातील रहस्य आणि आत्मभजनभक्तीचा भावार्थ श्रीकृष्णांनी स्वतः उद्धवाला अकराव्या स्कंधांत सांगितला ९१.


    त्या एकादशाच्या गोष्टी । स्वधर्मकर्माची कसवटी ।
    एका जानार्दनकृपादृष्टीं । टीका मराठी हे केली ॥ ९२ ॥
    त्या अकराव्या स्कंधांतील गोष्टी म्हणजे स्वधर्मकर्माची कसोटी आहे. श्रीजनार्दनाच्या कृपादृष्टीनेच एकनाथाने ही मराठी टीका केली आहे ९२.


    हे करणी केली जनार्दनें । मज अभंगीं घातलें तेणें ।
    शेखीं मीतूंपणाचे ठाणें । येणें निरूपणें उडविलें ॥ ९३ ॥
    ही करणी त्या जनार्दनांनीच केली, आणि कवितेत माझें नांव घातले आणि शेवटी या निरूपणाने मीतूंपणाचे ठाणेच उडवून टाकले ९३.


    उडविलें विषयीं विषयपण । उडविले भेदाचें भान ।
    उडविलें जीवशिवपण । जनीं जनार्दन तुष्टोनी ॥ ९४ ॥
    विषयांतील विषयपणाच नाहींसा केला; भेदाचे भानच उडवून टाकलें; आणि जनीं-जनार्दन संतुष्ट होऊन त्याने जीवशिवपणच उडवून लावले ९४.


    जनार्दनें जनकें तेणें । आम्हां केलें परब्रह्म खेळणें ।
    यालागीं सकळ क्रिया तेणें होणें । स्वधर्मपणें सहजेंचि ॥ ९५ ॥
    जनार्दनरूप जो पिता, त्याने आम्हांला परब्रह्म हें  खेळणेच करून टाकले. म्हणूनच त्याच्या योगाने ज्या ज्या क्रिया होतात, त्या त्या आपोआप स्वधर्मपणानेच घडतात ९५.


    सहजीं लागल्या स्वधर्म । कर्मचि होय निष्कर्म ।
    संसार होय परब्रह्म । हे कृपा परम जनार्दनीं ॥ ९६ ॥
    स्वभावतःच स्वधर्म लागला म्हणजे कर्म असते तेंच निष्कर्म होते आणि संसार असतो तोच परब्रह्म होतो. हीच जनार्दनाची मोठी कृपा होय ९६.


    यालागीं सांडूनियां एकपण । एका जनार्दन शरण ।
    स्वधर्मकर्माचें निरूपण । झालें संपूर्ण तया कृपा ॥ ९७ ॥
    ह्यास्तव एकपणा म्ह. एकनाथपणा सोडून एका हा जनार्दनाला शरण गेला. म्हणून त्यांच्या कृपेनेंच स्वधर्मकर्माचे निरूपण संपूर्ण झाले ९७.


    इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे
    एकाकारटीकायां वानप्रस्थसंन्यासधर्मनिरूपणं नाम अष्टादशोऽध्यायः ॥ ९८ ॥
    ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ओंव्या ३९७ ॥ श्लोक ॥ ४८ ॥
    इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां एकादशस्कन्धे अष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...