मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १७ ओव्या ४०१ ते ५००
इज्याध्ययनदानानि सर्वेषां च द्विजन्मनाम् ।
प्रतिग्रहोऽध्यापनं च ब्राह्मणस्यैव याजनम् ॥ ४० ॥
[श्लोक ४०] यज्ञयाग, अध्ययन आणि दान करण्याचा अधिकार सर्व द्विजांना आहे परंतु दान घेणे, अध्यापन करणे आणि यज्ञाचे पौरोहित्य करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे. (४०)
ब्राह्मणाचें षट्कर्म जाण । यजन आणि याजन ।
अध्ययन आणि अध्यापन । प्रतिग्रहो दान हें साही ॥ १ ॥
अध्ययन आणि अध्यापन । प्रतिग्रहो दान हें साही ॥ १ ॥
ब्राह्मणाने करणेची षट्कर्म म्हणजे यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, प्रतिग्रह, आणि दान अशी सहा आहेत १.
हो कां द्विजन्मे तिन्ही वर्ण । त्यांत क्षत्रिय वैश्य दोघे जण ।
त्यांस तीं कर्मीं अधिकारपण । यजन-दान-अध्ययन ॥ २ ॥
त्यांस तीं कर्मीं अधिकारपण । यजन-दान-अध्ययन ॥ २ ॥
तीन वर्ण हे द्विजन्मेच असले तरी वैश्य व क्षत्रिय यांना यजन, दान आणि अध्ययन, या तीन कर्माचाच अधिकार आहे २.
जे उत्तमजन्मे ब्राह्मण । त्यांसी षट्कर्मीं अधिकार जाण ।
तीनी परमार्थासी पूर्ण । जीविकावर्तन तीं कर्मीं ॥ ३ ॥
तीनी परमार्थासी पूर्ण । जीविकावर्तन तीं कर्मीं ॥ ३ ॥
परंतु जे उत्तम जन्माचे म्ह. ब्राह्मण असतात, त्यांनाच षट्कर्माचा. अधिकार आहे. त्यांपैकी तीन म्ह. यजन, अध्यापन व दान करणे या कर्मानी त्यांना परमार्थांची प्राप्ति होते. आणि बाकीच्या तीन कर्मानी उपजीविका चालते ३.
कोणें कर्में जीविकेसी । कोणें पाविजे परमार्थासी ।
त्या ब्राह्मणकर्मविभागासी । ऐक तुजपाशीं सांगेन ॥ ४ ॥
त्या ब्राह्मणकर्मविभागासी । ऐक तुजपाशीं सांगेन ॥ ४ ॥
कोणती कर्मे उपजीविकेला उपयोगी पडतात, आणि कोणत्या कर्मानी परमार्थांची प्राप्ति होते, त्या ब्राह्मणांच्या कर्माचे भेद तुझ्याजवळ सांगतों ऐक ४.
'यजन' तें यज्ञाचरण । 'अध्ययन' तें वेदपठण ।
'दान' जें देणें आपण । हें त्रिकर्म जाण परमार्था ॥ ५ ॥
'दान' जें देणें आपण । हें त्रिकर्म जाण परमार्था ॥ ५ ॥
'यजन' म्हणजे यज्ञ करणे ; 'अध्ययन' म्हणजे वेद पठण करणे, आणि 'दान' म्ह. दुसऱ्यास धनधान्य वस्त्रं ई. देणे, ही तीन कमैं परमार्थाचा लाभ करून देणारी आहेत ५.
गुरुत्व घेऊनि आपणें । ‘याजन’ तें याग करविणें ।
‘अध्यापन’ वेद पढवणें । स्वयें दान घेणें तो 'प्रतिग्रहो' ॥ ६ ॥
‘अध्यापन’ वेद पढवणें । स्वयें दान घेणें तो 'प्रतिग्रहो' ॥ ६ ॥
आणि आपणाकडे गुरुत्व म्ह. पुरोहितपणा घेऊन दुसऱ्याकडून यज्ञ करविणें तें 'याजन', दुसऱ्याला वेद पढविणें तें 'अध्यापन: ' आणि स्वतः दान घेणे तो 'प्रतिग्रह' होय ६.
जाहलिया सच्छिष्यसंपत्ती । इये तिहीं कर्मीं जीविकावृत्ती ।
गुरुत्वें गुरुपूजाप्राप्ती । तेणें जीविकास्थिति ब्राह्मणां ॥ ७ ॥
गुरुत्वें गुरुपूजाप्राप्ती । तेणें जीविकास्थिति ब्राह्मणां ॥ ७ ॥
चांगले चांगले शिष्य मिळाले, म्हणजे ह्या तीन कर्माच्या योगाने उपजीविका चालते. आणि गुरुपणा आला म्हणजे गुरुपूजेचा मान मिळून त्याच्या योगानेही ब्राह्मणाचा चरितार्थ चालतो ७.
क्षत्रियवैश्यद्विजन्म्यांसी । गुरुत्व बोलिलें नाहीं यांसी ।
हीं तिन्हीं कर्में त्यांसी । निषेधतेसी यालागीं ॥ ८ ॥
हीं तिन्हीं कर्में त्यांसी । निषेधतेसी यालागीं ॥ ८ ॥
क्षत्रिय आणि वैश्य हेही द्विजन्मे आहेत खरे, पण त्यांच्याकडे गुरुपणाचा अधिकार सांगितलेला नाही. म्हणून या तिन्ही कर्माचा त्यांना निषेधच सांगितलेला आहे ८.
आतां ब्राह्मणाचें लक्षण । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण ।
'मुख्य' 'मुख्यतम' 'साधारण' । त्रिविध जाण उद्धवा ॥ ९ ॥
'मुख्य' 'मुख्यतम' 'साधारण' । त्रिविध जाण उद्धवा ॥ ९ ॥
आतां ब्राह्मणाचे लक्षण स्वतः श्रीकृष्ण सांगतात की, हे उद्धवा ! त्यांत साधारण, श्रेष्ठ आणि अत्यंत श्रेष्ठ असे तीन भेद आहेत ९.
प्रतिग्रहं मन्यमानस्तपस्तेजोयशोनुदम् ।
अन्याभ्यामेव जीवेत शीलैर्वा दोषदृक् तयोः ॥ ४१ ॥
अन्याभ्यामेव जीवेत शीलैर्वा दोषदृक् तयोः ॥ ४१ ॥
[श्लोक ४१] दान घेण्यामुळे तपश्चर्या, तेज आणि यश यांचा ह्रास होतो असे वाटले, तर ब्राह्मणाने अध्यापन आणि यज्ञ करविणे याद्वारेच आपला उदरनिर्वाह करावा किंवा या दोन वृत्तींमध्येही काही दोष वाटत असेल तर धान्याची कणसे तोडल्यावर शेतात पडलेले किंवा बाजारात पडलेले दाणे वेचून त्यांवर उदरनिर्वाह करावा. (४१)
स्वधर्मनिष्ठ ब्राह्मणापाशीं । तप-तेज-धैर्य-यशोराशी ।
प्रतिग्रहो इतुकियांसी । मूळ नाशासी कारण ॥ ४१० ॥
प्रतिग्रहो इतुकियांसी । मूळ नाशासी कारण ॥ ४१० ॥
स्वधर्मनिष्ठ ब्राह्मण असतो, त्याच्यापाशीं तप, तेज, धैर्य आणि यश ह्यांचा सांठा असतो; पण प्रतिग्रह हा तितक्यांच्याही नाशाला कारणीभूत होतो ४१०.
जो स्वधर्मनिष्ठ ब्राह्मण । करी प्रतिग्रहो अंगीकरण ।
तो जाण पां 'साधारण' । हें एक लक्षण द्विजाचें ॥ ११ ॥
तो जाण पां 'साधारण' । हें एक लक्षण द्विजाचें ॥ ११ ॥
स्वधर्मनिष्ठ ब्राह्मण असून जो प्रतिग्रहाचा स्वीकार करितो. तो 'साधारण ' ब्राह्मण समजावा. हे एक ब्राह्मणाचे लक्षण होय ११.
जो प्रतिग्रह पराङ्मुख ब्राह्मण । तेणें याजन अध्यापन जाण ।
स्वधर्मेकरूनि द्रव्यार्जन । जीविकावर्तन करावें ॥ १२ ॥
स्वधर्मेकरूनि द्रव्यार्जन । जीविकावर्तन करावें ॥ १२ ॥
जो ब्राह्मण प्रतिग्रहाचा स्वीकार करीत नाही, त्याने याजन आणि अध्यापन करून स्वधर्मानेंच द्रव्य संपादन करावे आणि आपली उपजीविका चालवावी १२.
धरोनि द्रव्याशा मानसीं । न करावें यागान्त कर्मासी ।
कां सांगोनि वेदाक्षरासी । द्रव्य त्यापाशीं इच्छूं नये ॥ १३ ॥
कां सांगोनि वेदाक्षरासी । द्रव्य त्यापाशीं इच्छूं नये ॥ १३ ॥
द्रव्याची आशा मनांत धरून यज्ञाचे कर्म कोणाकडूनही करवू नये; किंवा वेदाध्ययन सांगूनही शिकणाऱ्यापासून द्रव्याची इच्छा धरूं नये १३.
करूनि वेदाक्षरदान । जो शिष्याचेंही न घे धन ।
ऐसा वैराग्यें परिपूर्ण । तो 'शुद्ध ब्राह्मण' सर्वथा ॥ १४ ॥
ऐसा वैराग्यें परिपूर्ण । तो 'शुद्ध ब्राह्मण' सर्वथा ॥ १४ ॥
जो वेदाध्ययन सांगून शिष्याकडून मुळींच द्रव्य घेत नाही, असा वैराग्याने परिपूर्ण असेल तोच 'शुद्ध ब्राह्मण' होय १४.
ऐक त्याचें जीविकावर्तन । 'शिल' कां 'उंछवृत्ती' जाण ।
ऐक त्याचेंही लक्षण । सकारण सांगेन ॥ १५ ॥
ऐक त्याचेंही लक्षण । सकारण सांगेन ॥ १५ ॥
त्याचे जीविकावर्तनही सांगतों ऐक. त्याने 'शिल' वृत्तीने किंवा 'उंछ' वृत्तीने आपला उदरनिर्वाह करावा. याचेही यथार्थ लक्षण मी सांगतों १५.
शेत संवगूनि नेल्या जाण । ते शेतीं प्राप्त कणिसें कां कण ।
ते शिलवृत्ति संपूर्ण । ऐक लक्षण उंछवृत्तीचें ॥ १६ ॥
ते शिलवृत्ति संपूर्ण । ऐक लक्षण उंछवृत्तीचें ॥ १६ ॥
शेत कापून नेल्यानंतर त्या शेतामध्ये जी कणसें किंवा दाणा सांपडतो, त्याच्यावर चरितार्थ चालविणे, त्याला 'शिलवृत्ति' असे म्हणतात. आता उंछवृत्तीचे लक्षण ऐक १६.
स्वामी नसतां सांडले जाण । ऐसे हाटवाटीं पडिले कण ।
ते वेंचूनि घेणें आपण । जीविकावर्तन तयांवरी ॥ १७ ॥
ते वेंचूनि घेणें आपण । जीविकावर्तन तयांवरी ॥ १७ ॥
बाजारांत कोणी मालक नसलेले धान्याचे दाणे सांपडतात, ते वेंचून घेऊन त्यांवर निर्वाह करावयाचा १७,
या नांव उंछवृत्ती । ब्राह्मणाची 'अतिशुद्ध' स्थिती ।
तोही प्रकार उद्धवाप्रती । स्वयें श्रीपति सांगत ॥ १८ ॥
तोही प्रकार उद्धवाप्रती । स्वयें श्रीपति सांगत ॥ १८ ॥
याचे नांव 'उंछवृत्ति' हीच ब्राह्मणाची अत्यंत पवित्र स्थिति होच. म्हणून हा प्रकारही श्रीकृष्णाने स्वतः उद्धवाला सांगितला १८.
ब्राह्मणस्य हि देहोऽयं क्षुद्रकामाय नेष्यते ।
कृच्छ्राय तपसे चेह प्रेत्यानंतसुखाय च ॥ ४२ ॥
कृच्छ्राय तपसे चेह प्रेत्यानंतसुखाय च ॥ ४२ ॥
[श्लोक ४२] ब्राह्मणाचे हे शरीर तुच्छ विषयभोग भोगण्यासाठी नसून जन्मभर कठीण तपश्चर्या करून शेवटी अनंत आनंदस्वरूप अशा मोक्षाची प्राप्ती करून घेण्यासाठीच आहे. (४२)
वर्णांमाजीं उत्तम वर्ण । त्या ब्राह्मणाचा देहो जाण ।
क्षुद्रकामार्थ निर्माण । देवें आपण नाहीं केला ॥ १९ ॥
क्षुद्रकामार्थ निर्माण । देवें आपण नाहीं केला ॥ १९ ॥
सर्व वर्णांमध्ये उत्तम वर्ण ब्राह्मण. त्या ब्राह्मणाचा देह देवाने काही क्षुद्रकामाकरितां निर्माण केलेला नाही १९.
पशुपक्ष्यादि योनींच्या ठायीं । कामावांचूनि आन नाहीं ।
तेंचि जरी ब्राह्मणाचे देहीं । तैं विशेष कायी उत्तमत्वें ॥ ४२० ॥
तेंचि जरी ब्राह्मणाचे देहीं । तैं विशेष कायी उत्तमत्वें ॥ ४२० ॥
पशुपक्ष्यादि योनीमध्ये कामाशिवाय दुसरे काही नसते. तेच जर ब्राह्मणाच्याही देहामध्ये असेल, तर त्याच्या उत्तमत्वाचे विशेष ते काय ? ४२०.
ब्राह्मणांचे देहीं जाण । करावें स्वधर्में अनुष्ठान ।
माझेनि उद्देशें संपूर्ण । तपसाधन कृच्छ्रादिकें ॥ २१ ॥
माझेनि उद्देशें संपूर्ण । तपसाधन कृच्छ्रादिकें ॥ २१ ॥
स्वधर्माचे अनुष्ठान करणे हेच ब्राह्मणाच्या देहाचे कर्तव्य होय. कृच्छ्रचांद्रायणादि तपसाधनें त्याने माझ्या प्रीत्यर्थच केली पाहिजेत २१.
मी हृदयीं धरोनि अनंत । जो पूर्णवैराग्ययुक्त ।
तपादि साधनीं सतत । सदा शिणत ब्राह्मण जे ॥ २२ ॥
तपादि साधनीं सतत । सदा शिणत ब्राह्मण जे ॥ २२ ॥
मज अनंताला अंत:करणांत धरून व पूर्ण वैराग्ययुक्त होऊन जे ब्राह्मण तपादि साधनांत निरंतर देह कष्टवितात २२,
त्यांसी देहपाताच्या अंतीं । माझ्या अनंत सुखाची प्राप्ती ।
तेथ स्वर्गसुखादि संपत्ती । मावळती तत्काळ ॥ २३ ॥
तेथ स्वर्गसुखादि संपत्ती । मावळती तत्काळ ॥ २३ ॥
त्यांना देहपातानंतर माझ्या अनंत सुखाची प्राप्ति होते. त्या वेळी स्वर्गसौख्यादि ऐश्वर्य तत्काळ लुप्त होऊन जातें २३.
ज्या सुखाचे सुखस्थितीं । स्फुरेना संसारस्फूर्ती ।
जेथूनि नाहीं पुनरावृत्ती । ते सुखप्राप्ती त्या ब्राह्मणां ॥ २४ ॥
जेथूनि नाहीं पुनरावृत्ती । ते सुखप्राप्ती त्या ब्राह्मणां ॥ २४ ॥
ज्या सुखाच्या आनंदमय स्थितीत संसाराची स्फूर्तिही स्फुरत नाही, जेथून पुन्हा जन्म होण्याची भीति नाहीशी होते, अशा सुखाची प्राप्ति त्या ब्राह्मणांना होते २४.
कृच्छ्रादि साधनयुक्तीं । ब्राह्मणां ब्रह्मसुखप्राप्ती ।
त्याचि सुखाची सुखसंपत्ती । शिलोंछवृत्ती साधकां ॥ २५ ॥
त्याचि सुखाची सुखसंपत्ती । शिलोंछवृत्ती साधकां ॥ २५ ॥
कृच्छ्रादि साधनांच्या आश्रयाने ब्राह्मणांला ज्या ब्रह्मसुखाची प्राप्ति होत असते, शिलोंछवृत्ति साधणाऱ्यांना त्याच सुखाचे वैभव प्राप्त होतें २५.
शिलोञ्छवृत्त्या परितुष्टचित्तो धर्मं महान्तं विरजं जुषाणः ।
मय्यर्पितात्मा गृह एव तिष्ठन्नातिप्रसक्तः समुपैति शान्तिम् ॥ ४३ ॥
मय्यर्पितात्मा गृह एव तिष्ठन्नातिप्रसक्तः समुपैति शान्तिम् ॥ ४३ ॥
[श्लोक ४३] जो ब्राह्मण आपल्या महान धर्मांचे निष्कामभावाने पालन करतो आणि शेतात तसेच बाजारात पडलेलेसांडलेले धान्याचे दाणे वेचून त्यांवर संतोषपूर्वक आपला उदरनिर्वाह करतो, त्याचबरोबर आपले सर्वस्व मला समर्पित करून कोठेही आसक्ती ठेवीत नाही, तो घरात राहूनही शांतिरूप असे परमपद प्राप्त करून घेतो. (४३)
शिल अथवा उंछवृत्ती । करूनि संतुष्ट चित्तवृत्ती ।
विषयवैराग्यें मत्प्राप्ती । पूजिती अतिथी मद्भावें ॥ २६ ॥
विषयवैराग्यें मत्प्राप्ती । पूजिती अतिथी मद्भावें ॥ २६ ॥
जे ब्राह्मण शिल अथवा उंछवृत्ति धारण करून आपली चित्तवृत्ति संतुष्ट ठेवतात, व विषयवैराग्याने माझी प्राप्ति करून घेतात, तसेच अतिथींचें मद्भावानें पूजन करतात २६.
अतिथि आलिया देख । प्राणांतींही नव्हे पराङ्मुख ।
नाठवे निज तहानभूक । समयीं आवश्यक दे अन्न ॥ २७ ॥
नाठवे निज तहानभूक । समयीं आवश्यक दे अन्न ॥ २७ ॥
अतिथि आला असतां प्राणांतीसुद्धा पराक्रम जाऊ देत नाहीत ; वेळेला आपली तहानभूकसुद्धा न आठवतां अतिथीला आवश्यक अन्न देतात २७.
तेथ अत्यादरेंसीं जाण । देऊनि अत्यंत सन्मान ।
यथानुशक्त्या देतां अन्न । मी जनार्दन संतुष्टें ॥ २८ ॥
यथानुशक्त्या देतां अन्न । मी जनार्दन संतुष्टें ॥ २८ ॥
अशा प्रकारे अत्यंत आदरपूर्वक व सन्मानाने यथानुशक्त्या अन्नदान करितात, त्यांच्यावर मी जनार्दन संतुष्ट होतों २८.
सांडूनियां अभिमान । सर्व जीवांसी सर्वदा लीन ।
या नांव 'महद्धर्म' जाण । शुद्ध लक्षण हें धर्माचें ॥ २९ ॥
या नांव 'महद्धर्म' जाण । शुद्ध लक्षण हें धर्माचें ॥ २९ ॥
अभिमान सोड़न देऊन सर्व प्राणिमात्रांना सदासर्वदा लीन असणे, ह्याचेच नांव ' महद्धर्म' आणि हेच धर्माचे शुद्ध लक्षण होय २९.
ऐसें जें स्वधर्माचरण । तें कर्त्यासी अतिभूषण ।
ये धर्मीं न रिघे दूषण । 'अतिशुद्धाचरण' या नांव ॥ ४३० ॥
ये धर्मीं न रिघे दूषण । 'अतिशुद्धाचरण' या नांव ॥ ४३० ॥
अशा प्रकारचे जें स्वधर्माचरण असते, तें कर्त्याला अत्यंत भूषणास्पद होते. या धर्मामध्ये दूषण देण्याला यत्किंचितही वाव राहत नाही. ह्याचंच नांव 'अति शुद्धाचरण' ४३०.
मजमाजीं रंगली चित्तवृत्ती । यालागीं विसरला गृहासक्ती ।
त्यासी गृहाश्रमीं माझी प्राप्ती । सुखसंपत्ती निजबोधु ॥ ३१ ॥
त्यासी गृहाश्रमीं माझी प्राप्ती । सुखसंपत्ती निजबोधु ॥ ३१ ॥
माझ्यामध्ये चित्तवृत्ति अगदी रंगून गेल्यामुळे घरादारावरील आसक्ति तो विसरूनच जातो, त्याला गृहस्थाश्रमामध्येच माझी प्राप्ति होते; आत्मज्ञान हीच त्याची सुखसंपत्ति होऊन राहते ३१.
निर्धनासी ऐशिया रीतीं । गृहश्रमीं माझी प्राप्ती ।
आतां सधनाचे प्राप्तीची स्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ३२ ॥
आतां सधनाचे प्राप्तीची स्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ३२ ॥
निर्धन असतात त्यांना अशा रीतीने गृहस्थाश्रमांतच माझी प्राप्ति होते. आता जे सधन असतात त्यांना माझी प्राप्ति कशी होते. ते तुला सांगतों ऐक ३२.
सधन होय जैं सज्ञान । तैं न करितां अतिसाधन ।
माझी प्राप्ती अतिसुगम जाण । ऐक लक्षण तयाचें ॥ ३३ ॥
माझी प्राप्ती अतिसुगम जाण । ऐक लक्षण तयाचें ॥ ३३ ॥
सधन असून जर सज्ञान असेल, तर त्याला फारसें साधन न करतांच माझी प्राप्ति करून घेणे अतिशय सुलभ असते, तेही लक्षण ऐक ३३.
समुद्धरन्ति ये विप्रं सीदन्तं मत्परायणम् ।
तानुद्धरिष्ये नचिरादापद्भयो नौरिवार्णवात् ॥ ४४ ॥
तानुद्धरिष्ये नचिरादापद्भयो नौरिवार्णवात् ॥ ४४ ॥
[श्लोक ४४] संकटात सापडून कष्ट सहन करीत असलेल्या माझ्या ब्राह्मण भक्ताला जे संकटातून सोडवितात, त्यांची मी ताबडतोब, समुद्रात बुडणार्यांची नाव जशी सुटका करते, तशी सर्व आपत्तींमधून सुटका करतो. (४४)
आधींच पूज्य ब्राह्मण । त्याहीवरी माझा भक्त जाण ।
माझे निजभजनें अतिसंपन्न । मद्भावें पूर्ण परिपक्व ॥ ३४ ॥
माझे निजभजनें अतिसंपन्न । मद्भावें पूर्ण परिपक्व ॥ ३४ ॥
आधी ब्राह्मण म्हटला की तो पूज्यच आहे. त्यांत आणखी तो माझा भक्त असला व माझ्या भजनाने अतिसंपन्न आणि मद्भावनेनें पूर्ण व पक्वदशेला पोचलेला असला ३४;
मागणें नाहीं सर्वथां । हा नेम माझिया निजभक्ता ।
त्यासी पीडिजे क्षुधादि व्याथा । ते निवारिता जो होय ॥ ३५ ॥
त्यासी पीडिजे क्षुधादि व्याथा । ते निवारिता जो होय ॥ ३५ ॥
तसेंच कोणापाशीं कधीच काही मागावयाचे नाही, असा माझ्या भक्ताचा नेम असतो; त्याला पीडणाऱ्या क्षुधादि व्यथेचें जो निवारण करतो ३५;
देऊनि अन्न जीवन । वस्त्र आदिकरूनि लवण ।
ऐसें वेंचूनियां निजधन । भक्तसंरक्षण जो करी ॥ ३६ ॥
ऐसें वेंचूनियां निजधन । भक्तसंरक्षण जो करी ॥ ३६ ॥
त्याला अन्न , धन, वस्त्र , पात्र, मीठ वगैरे देतो व अशा प्रकारे आपलें द्रव्य खर्ची घालून जो माझ्या भक्ताचे संरक्षण करतो ३६;
नाहीं देणें निर्भर्त्सितां । देऊनि आभार न ठेवी माथां ।
सन्मानें अतिनम्रता । जो मद्भक्तां संरक्षी ॥ ३७ ॥
सन्मानें अतिनम्रता । जो मद्भक्तां संरक्षी ॥ ३७ ॥
ते देतांना जो त्याचा तिरस्कार करीत नाही, किंवा दिले हे मी मोठे उपकार केले असेंही मानीत नाही, तर अत्यंत सन्मानानें व नम्रतेनेच माझ्या भक्ताचे रक्षण करतो ३७;
जेवीं पोटांतले कळवळेंसी । माता गोड तें दे बाळकासी ।
तेवीं सांडोनि निजस्वार्थासी । माझ्या भक्तांसी जो रक्षी ॥ ३८ ॥
तेवीं सांडोनि निजस्वार्थासी । माझ्या भक्तांसी जो रक्षी ॥ ३८ ॥
तें असें की, पोटांतील कळवळ्याने आई जसें गोड असेल तेंच मुलाला देते, त्याप्रपाणे जो आपला स्वार्थ सोडून माझ्या भक्ताचे रक्षण करतो ३८,
तैं मागें सांडूनि निजभक्ता । त्यासी मी वाहीं आपुले माथां ।
मग वैकुंठाही वरुता । त्याहीपरता पाववीं ॥ ३९ ॥
मग वैकुंठाही वरुता । त्याहीपरता पाववीं ॥ ३९ ॥
त्याला मी माझ्या भक्तालाही मागे टाकून आपल्या मस्तकावर घेतों; व नंतर त्याला वैकुंठालाच काय पण त्याच्याही वरती नेऊन ठेवतों ३९.
ज्यासी म्यां वाहिलें निजमाथां । त्यासी कोण्या अर्थाची दुर्लभता ।
जो संरक्षी माझ्या निजभक्तां । त्यासी उद्धरिता मी उद्धवा ॥ ४४० ॥
जो संरक्षी माझ्या निजभक्तां । त्यासी उद्धरिता मी उद्धवा ॥ ४४० ॥
ज्याला मी आपल्या मस्तकावर घेतले, त्याला दुर्लभ असे काय असणार? उद्धवा ! माझ्या भक्तांचें जो संरक्षण करतो, त्याचा उद्धार करणारा मी आहे ४४०.
माझे भक्तांचीं सांकडीं । जो कोणी निजांगें दवडी ।
त्यासी भवार्णवपरथडी । तत्काळ रोकडी मी पाववीं ॥ ४१ ॥
त्यासी भवार्णवपरथडी । तत्काळ रोकडी मी पाववीं ॥ ४१ ॥
माझ्या भक्तांची संकटें आपण होऊन जो दूर करील, त्याला तत्काल संसारसागराच्या पैलथडीला मी पोचवितों ४१.
जेवीं कां जळसागरीं । नाव धनवंतातें तारी ।
तेवीं भक्तरक्षका संसारीं । मी उद्धरीं उद्धवा ॥ ४२ ॥
तेवीं भक्तरक्षका संसारीं । मी उद्धरीं उद्धवा ॥ ४२ ॥
उद्धवा! नौका जशी धनवान् मनुष्याला समुद्रामधून तारून नेते, त्याप्रमाणे माझ्या भक्तांचे रक्षण करणाऱ्यांचा मी संसारांतून उद्धार करतों ४२.
यापरी धनवंत जन । जो करी भक्तसंरक्षण ।
देवकीवसुदेवांची आण । त्याचें उद्धरण मी करीं ॥ ४३ ॥
देवकीवसुदेवांची आण । त्याचें उद्धरण मी करीं ॥ ४३ ॥
ह्याप्रमाणे जो धनवान् मनुष्य माझ्या भक्ताचे संरक्षण करतो, देवकीवसुदेवाशपथ मी त्याचा उद्धार करतों ४३.
सर्वांचे आपत्तीचें निवारण । राजेनि करावें आपण ।
त्या राजधर्माचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ४४ ॥
त्या राजधर्माचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ४४ ॥
सर्वाच्या आपत्तीचे निवारण राजाने आपण होऊन करावे, त्या राजधर्माचे लक्षण स्वतः श्रीकृष्ण सांगत आहे ४४.
सर्वाः समुद्धरेद्राजा पितेव व्यसनात्प्रजाः ।
आत्मानमात्मना धीरो यथा गजपतिर्गजान् ॥ ४५ ॥
आत्मानमात्मना धीरो यथा गजपतिर्गजान् ॥ ४५ ॥
[ श्लोक ४५] जसा एक गजराज दुसर्या हत्तींचे रक्षण करतो, त्याप्रमाणे राजाने पित्याप्रमाणे आपल्या सर्व प्रजेचे कष्टांपासून रक्षण करावे, त्यांचा उद्वार करावा, आणि धीरगंभीर राहून स्वतःच स्वतःचा उद्धार करून घ्यावा. (४५)
सर्वांचें आपत्तींत रक्षण । रायें करावें आपण ।
दीन दुर्बळ ब्राह्मण । अयाचित जन शोधूनी ॥ ४५ ॥
दीन दुर्बळ ब्राह्मण । अयाचित जन शोधूनी ॥ ४५ ॥
दीन दुबळे ब्राह्मण व अयाचित भक्त असतील, त्यांचा मुद्दाम शोध करून राजाने आपत्तींमध्ये त्या सर्वाचे संरक्षण करावें ४५.
व्यसनप्राप्त निजात्मजा । पिता संरक्षणीं निघे पैजा ।
तेवीं आपत्तीपासोनि प्रजा । संरक्षणीं राजा सादर ॥ ४६ ॥
तेवीं आपत्तीपासोनि प्रजा । संरक्षणीं राजा सादर ॥ ४६ ॥
आपल्या मुलावर संकट येऊन गुदरले असतां बाप जसा त्याच्या संरक्षणासाठी कंबर बांधून निघतो, त्याप्रमाणे राजानेंही अगत्यपूर्वक प्रजेचे आपत्तीपासून संरक्षण करण्याविषयीं तत्पर असावें ४६.
करूनि प्रजांचें संरक्षण । आपुल्या आपत्तीसी आपण ।
स्वयें करावें निवारण । हा स्वधर्म जाण रायाचा ॥ ४७ ॥
स्वयें करावें निवारण । हा स्वधर्म जाण रायाचा ॥ ४७ ॥
प्रजेचे संरक्षण करून आपल्यावर आलेल्या आपत्तीचे निवारणही आपणच करणे हा राजाचा स्वधर्म होय ४७.
चिखलीं रुतल्या भद्रजाती । स्वयें निघे आत्मशक्तीं ।
गजी गजशावे नेणों किती । काढी रुतीबाहेरी ॥ ४८ ॥
गजी गजशावे नेणों किती । काढी रुतीबाहेरी ॥ ४८ ॥
हत्ती चिखलात रुतला तरी तो आपल्या बळाने बाहेर निघतो, आणि चिखलात रुतलेल्या हत्तिणी व छावे किती बाहेर काढतो त्याचा तर ठिकाणच नाही ४८.
तेवीं राजा जो भूपती । तेणें प्रजा रक्षाव्या आपत्तीं ।
आपुलेही आपत्तीची निवृत्ती । निजात्मशक्तीं जो करी ॥ ४९ ॥
आपुलेही आपत्तीची निवृत्ती । निजात्मशक्तीं जो करी ॥ ४९ ॥
त्याप्रमाणे पृथ्वीपति राजाने आपत्तीमध्ये प्रजांचे रक्षण करावे, तसेच आपल्याही आपत्तीचे म्ह. संकटाचे स्वत:च्या शक्तीने निवारण करावें ४९.
ऐशिया स्वधर्मस्थिती । सादरें वर्ते जो भूपती ।
त्याच्या स्वधर्माची फलप्राप्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ ४५० ॥
त्याच्या स्वधर्माची फलप्राप्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ ४५० ॥
अशा स्वधर्माचरणानें जो राजा सादरपणाने वागतो, त्याला त्याच्या स्वधर्मापासून कशी फलप्राप्ति होते ते श्रीपति स्वतः सांगत आहे ४५०.
एवंविधो नरपतिर्विमानेनार्कवर्चसा ।
विधूयेहाशुभं कृत्स्नं इंद्रेण सह मोदते ॥ ४६ ॥
विधूयेहाशुभं कृत्स्नं इंद्रेण सह मोदते ॥ ४६ ॥
[श्लोक ४६] अशा प्रकारचा राजा सर्व पापांपासून मुक्त होऊन सूर्यासारख्या तेजस्वी विमानात बसून स्वर्गात जातो आणि इंद्राबरोबर सुखोपभोग घेतो. (४६)
यापरी जो कां नृपती । इहलोकींच्या राज्यप्राप्ती ।
अधर्म नाशोनि स्वधर्मस्थितीं । स्वर्ग प्राप्ती तो पावे ॥ ५१ ॥
अधर्म नाशोनि स्वधर्मस्थितीं । स्वर्ग प्राप्ती तो पावे ॥ ५१ ॥
अशा प्रकारे जो राजा इहलोकी राज्य प्राप्त झाले असतां अधर्माचा नाश करून स्वधर्मस्थितीनें वागतो, त्याला स्वर्ग प्राप्त होतो ५१.
'राज्याचे अंतीं नरक' । ऐसें बोलती ज्ञाते लोक ।
ते निरयगती नाशोनि देख । स्वधर्में परलोक पावले ॥ ५२ ॥
ते निरयगती नाशोनि देख । स्वधर्में परलोक पावले ॥ ५२ ॥
ज्ञाते लोक 'राज्याचे अंती नरक' असे म्हणतात, पण ती नरकप्राप्ति चुकवून पुष्कळ राजे स्वर्गाला गेलेले आहेत ५२.
ते स्वर्गलोकीं गा जाण । अर्कप्रकाशासम विमान ।
तेथ आरूढोनि आपण । इंद्रसमान सुख भोगिती ॥ ५३ ॥
तेथ आरूढोनि आपण । इंद्रसमान सुख भोगिती ॥ ५३ ॥
ते स्वर्गलोकामध्ये सूर्यप्रभेसारख्या देदीप्यमान विमानांत बसून इंद्रासारखें सुख भोगतात ५३.
गृहस्थाश्रम अतिविषम । तेथें आचरतां स्वधर्म ।
वोडवे जैं कां दुर्गम । ते आपद्धर्म अवधारीं ॥ ५४ ॥
वोडवे जैं कां दुर्गम । ते आपद्धर्म अवधारीं ॥ ५४ ॥
गृहस्थाश्रम फार कठीण आहे. त्यांत स्वधर्माचरण करीत असतां कित्येक वेळा मोठे बिकट प्रसंग येतात. त्या वेळचे आपद्धर्म सांगतो ते ऐक ५४.
सीदन् वीप्रो वणिग्वृत्त्या पण्यैरेवापदं तरेत् ।
खड्गेन वाऽऽपदाक्रान्तो न श्ववृत्त्या कथंचन ॥ ४७ ॥
खड्गेन वाऽऽपदाक्रान्तो न श्ववृत्त्या कथंचन ॥ ४७ ॥
[श्लोक ४७] एखादा ब्राह्मण दारिद्य्राने गांजला असेत तर त्याने वैश्यवृत्तीचा आश्रय घेऊन त्या परिस्थितीतून मार्ग काढावा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडावे लागले, तर तलवार हातात घेऊन क्षत्रिय वृत्तीनेही आपला उदर निर्वाह चालवावा, परंतु कोणत्याही परिस्थितीत नीच लोकांची सेवा करून कुत्र्यासारखे जगू नये. (४७)
स्वधर्में पीडितां ब्राह्मणासी । तेणें करावें वणिग्वृत्तीसी ।
कां दुरावले क्षात्रधर्मासी । तेही सदोषी अतिदुष्ट ॥ ५५ ॥
कां दुरावले क्षात्रधर्मासी । तेही सदोषी अतिदुष्ट ॥ ५५ ॥
ब्राह्मणांला स्वधर्मामध्ये पीडा होऊ लागली, तर त्यांनी वैश्यवृत्ति स्वीकारावी. क्षात्रधर्म स्वीकारून हिंसादि दोष करूं नयेत; कारण ते अत्यंत दुष्ट म्ह. वाईट होत ५५.
ब्राह्मणासी हिंसाकर्म । तो जाण पां परम अधर्म ।
लागल्या अनुपपत्ती दुर्गम । तैं क्षात्रधर्म करावा ॥ ५६ ॥
लागल्या अनुपपत्ती दुर्गम । तैं क्षात्रधर्म करावा ॥ ५६ ॥
ब्राह्मणाने हिंसाकर्म करणे हा मोठा अधर्म होय; परंतु गत्यंतरच नाहीसे झाले तर मात्र त्याने क्षत्रियधर्माचा स्वीकार करावा ५६.
करितां वाणिज्यकर्मास । तिळ सर्षप कार्पास ।
कां लवणादि रस तैजस । यांच्या महादोष विक्रयीं ॥ ५७ ॥
कां लवणादि रस तैजस । यांच्या महादोष विक्रयीं ॥ ५७ ॥
वैश्याचा धंदा स्वीकारला असता, त्याने तीळ, मोहऱ्या, कापूस किंवा मीठ, तेल, तूप इत्यादि पदार्थ विकू नयेत. ते विकले असतां महादोष आहे ५७.
त्या सोडोनि सदोषां समस्तां । लागावें वाणिज्यपंथा ।
तांबूलपर्णें श्वेतवस्त्रता । हें विकितां निर्दुष्ट ॥ ५८ ॥
तांबूलपर्णें श्वेतवस्त्रता । हें विकितां निर्दुष्ट ॥ ५८ ॥
हे सारे दोष सोडून देऊन वाणीपणाचा धंदा करावा. विड्याची पाने आणि पांढरे वस्त्र ही निर्दोष होत ५८.
ऐशिया वाणिज्यस्थितीं । ज्याची ढळेना अनुपपत्ती ।
तेणें खड्ग घेऊनि हातीं । क्षात्रवृत्ती करावी ॥ ५९ ॥
तेणें खड्ग घेऊनि हातीं । क्षात्रवृत्ती करावी ॥ ५९ ॥
अशा रीतीनें वाणीपणाचा धंदा करूनही ज्याचा निर्वाह होत नसेल, त्याने हातात शस्त्र घेऊन क्षात्रवृत्ति पतकरावी ५९.
तेथें चोरावीं ना अंगें । रणीं न सरावें मागें ।
स्वामिकार्याचेनि योगें । देहत्यागें उठावें ॥ ४६० ॥
स्वामिकार्याचेनि योगें । देहत्यागें उठावें ॥ ४६० ॥
त्यांत मग अंगचोरपणा करूं नये. रणांगणांतून माघारें फिरू नये. स्वामिकार्याकरितां देहत्याग करण्याला सिद्ध असावें ४६०.
ऐशिया शुद्ध क्षात्रवृत्तीं । ब्राह्मणें कंठावी अनुपपत्ती ।
परी नीचसेवा प्राणांतीं । श्ववृत्ती न करावी ॥ ६१ ॥
परी नीचसेवा प्राणांतीं । श्ववृत्ती न करावी ॥ ६१ ॥
अशा शुद्ध क्षत्रियवृत्तीने ब्राह्मणाने आपली आपत्ति दूर करावी. परंतु प्राणांतीही 'श्ववृत्ति' म्ह. कुत्र्यासारखी वृत्ति धरून नीचाची सेवा करू नये ६१.
क्षत्रियांसी स्वधर्में अनुपपत्ती । लागल्या वर्तावें कोणे स्थिती ।
तें विशद करूनि श्रीपती । उद्धवाप्रती सांगत ॥ ६२ ॥
तें विशद करूनि श्रीपती । उद्धवाप्रती सांगत ॥ ६२ ॥
आतां स्वधर्मानें वागून क्षत्रियावरही जर आपत्ति येईल तर त्याने कोणत्या रीतीनें राहावे, तेही श्रीकृष्ण उद्धवाला विशद करून सांगतात ६२.
वैश्यवृत्त्या तु राजन्यो जीवेन्मृगययाऽऽपदि ।
चरेद्वा विप्ररूपेण न श्ववृत्त्या कथंचन ॥ ४८ ॥
चरेद्वा विप्ररूपेण न श्ववृत्त्या कथंचन ॥ ४८ ॥
[श्लोक ४८] याचप्रमाणे प्रजापालनाने क्षत्रिय आपला उदरनिर्वाह करू शकत नसेल, तर त्याने वैश्यवृत्तीने व्यापार करून निर्वाह करावा अतिशय घोर आपत्तीत सापडला असेल तर त्याने शिकार करून किंवा ब्राह्मणांचा व्यवसाय अध्यापन करून निर्वाह करावा परंतु नीचांची सेवा करून कुत्र्यासारखे जगू नये. (४८)
क्षत्रियासी लागल्या अनुपपत्ती । पूर्वोक्त करावी वणिग्वृत्ती ।
कां पारधी करावी वनांतीं ॥ तेणें अनुपपत्ती कंठावीं ॥ ६३ ॥
कां पारधी करावी वनांतीं ॥ तेणें अनुपपत्ती कंठावीं ॥ ६३ ॥
क्षत्रियावरही आपत्ति येऊन गुदरल्यास त्यानेही पूर्वी सांगितल्याप्रमाणे वाणीपणाचा धंदा करावा; किंवा अरण्यांत जाऊन शिकार करून आपली आपत्ति दूर करावी ६३.
येणेंही न कंठे अनुपपत्ती । तरी भीक मागावी विप्रगतीं ।
परी नीचसेवा प्राणांतीं । श्ववृत्ती न करावी ॥ ६४ ॥
परी नीचसेवा प्राणांतीं । श्ववृत्ती न करावी ॥ ६४ ॥
इतके करूनही दारिद्रदशा न जाईल तर ब्राह्मणाप्रमाणे भिक्षा मागावी; पण जीव गेला तरी कुत्र्याप्रमाणे नीचाची सेवा करूं नये ६४.
स्वधर्में वैश्यासी अनुपपत्ती । लागल्या वर्तावें कोणे स्थितीं ।
ते विवंचना उद्धवाप्रती । कृष्ण कृपामूर्ति सांगत ॥ ६५ ॥
ते विवंचना उद्धवाप्रती । कृष्ण कृपामूर्ति सांगत ॥ ६५ ॥
आतां वैश्याला स्वधर्माने वागत असतां दारिद्रदशा प्राप्त झाली, तर त्याने कोणत्या रीतीने वागावें ह्याचा विचार कृपेची केवल मूर्ति असे जे श्रीकृष्ण ते उद्धवाला सांगतात ६५.
शूद्रवृत्तिं भजेद्वैश्यः शूद्रः कारुकटक्रियाम् ।
कृच्छ्रान्मुक्तो न गर्ह्येण वृत्तिं लिप्सेत कर्मणा ॥ ४९ ॥
कृच्छ्रान्मुक्तो न गर्ह्येण वृत्तिं लिप्सेत कर्मणा ॥ ४९ ॥
[श्लोक ४९] प्रतिकूल काळात वैश्याने सुद्धा शूद्रांची वृत्तीसेवा करून आपला उदरनिर्वाह चालवावा आणि शूद्रानेसुद्धा चटया विणणे इत्यादी कामे करून आपले जीवन चालवावे परंतु प्रतिकूल काळ संपताच कनिष्ठ वर्णाच्या वृत्तीने उदरनिर्वाह करण्याचा लोभ करू नये. (४९)
वैश्यासी लागल्या अनुपपत्ती । तेणें धरावी शूद्रवृत्ती ।
निष्कपट सेवा यथास्थिती । तीं वर्णाप्रती करावी ॥ ६६ ॥
निष्कपट सेवा यथास्थिती । तीं वर्णाप्रती करावी ॥ ६६ ॥
वैश्यावर आपत्ति येऊन गुदरली तर त्याने शूद्रवृत्ति पतकरावी ; अर्थात त्याने तीन वर्णाची निष्कपटपणे योग्य रीतीनें सेवा करावी ६६.
वैश्य पीडिल्याही अनुपपत्तीं । ब्राह्मण-क्षत्रियांची वृत्ती ।
सर्वथा धरूं नये हातीं । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ६७ ॥
सर्वथा धरूं नये हातीं । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ६७ ॥
उद्धवा ! वैश्यावर आपत्ति येऊन कोसळली तरी त्याने ब्राह्मणाचा किंवा क्षत्रियाचा धंदा कधीही करूं नये, हे निश्चित समज ६७.
वैश्यासी अतिअनुपपत्ती । मांडल्याही प्राणांतगती ।
तरी नीचसेवेची स्थिती । कोणेही अर्थीं न करावी ॥ ६८ ॥
तरी नीचसेवेची स्थिती । कोणेही अर्थीं न करावी ॥ ६८ ॥
वैश्यावर अत्यंत अनुपपत्ति येऊन गुदरली असता त्याने जीव गेला तरी कोणत्याही सबबीवर नीचसेवा ही करूंच नये ६८.
शूद्रासी लागलिया अनुपपत्ती । तेणेंही न करावी श्ववृत्ती ।
धरूनि बुरुडक्रिया हातीं । जीविकावृत्ती करावी ॥ ६९ ॥
धरूनि बुरुडक्रिया हातीं । जीविकावृत्ती करावी ॥ ६९ ॥
शूद्रावर आपत्तीचा काल आला असता त्यानेही कुत्र्यासारखी नीचसेवा करू नये. तर त्याने बुरुडाचा धंदा करून आपलें उपजीवन करावें ६९.
विकावीं दोर दावीं शिंकीं । पाटे वरवंटे टवळीं निकीं ।
कां काष्ठें वाहावीं मस्तकीं । जीवीकेविखीं उदरार्थ ॥ ४७० ॥
कां काष्ठें वाहावीं मस्तकीं । जीवीकेविखीं उदरार्थ ॥ ४७० ॥
दोर, दावीं व शिंकी विकावीत. किंवा पाटे, वरवंटे, चाटू यांचा विकरा करावा. नाही तर पोट भरण्यासाठी डोक्यावरून लाकडांच्या मोळ्या वहाव्यात ४७०.
आपत्काळाचिये गती । चतुर्वर्णांची जीविकास्थिती ।
म्यां सांगीतली तुजप्रती । परी सर्वथा श्ववृत्ती सांडावी ॥ ७१ ॥
म्यां सांगीतली तुजप्रती । परी सर्वथा श्ववृत्ती सांडावी ॥ ७१ ॥
आपत्कालाच्या प्रसंगी चारही वर्णानी आपआपला निर्वाह कसा करावा हे मी तुला सांगितले; तरी पण होतां होईल तो श्ववृत्ति कोणी कधीही करूं नये ७१.
एवं क्रमलिया अनुपपत्ती । म्यां सांगितल्या ज्या जीविकावृत्ती ।
तेथें देखिलियाही लाभप्राप्ती । सर्वथा हातीं न धराव्या ॥ ७२ ॥
तेथें देखिलियाही लाभप्राप्ती । सर्वथा हातीं न धराव्या ॥ ७२ ॥
तात्पर्य, आपत्ति प्राप्त झाली असतां जीविका चालविण्याचे जे मार्ग मी सांगितले. त्या रीतीने आपली जीविका चालवावी; परंतु त्यांतच चांगला लाभ होतो असें दृष्टीस पडले तरी तीच वृत्ति आपत्काल संपल्यावर चालवू नये ७२.
आपत्काळींच्या आपद्वृत्ती । अनुतापें क्रमिल्याअंतीं ।
सांडूनियां स्वधर्मस्थितीं । यथानिगुतीं रहावें ॥ ७३ ॥
सांडूनियां स्वधर्मस्थितीं । यथानिगुतीं रहावें ॥ ७३ ॥
आपत्कालामध्ये निरुपाय म्हणून अनुतापाने केलेले दुसऱ्याचे धंदे, तो आपत्काल संपतांच टाकून देऊन पुन्हा पहिल्याप्रमाणे स्वधर्मानेंच चालावें ७३.
गृहस्थाचें विहित कर्म । त्यांतीलही आवश्यक धर्म ।
तेथील ब्रह्मार्पणवर्म । स्वयें पुरुषोत्तम सांगत ॥ ७४ ॥
तेथील ब्रह्मार्पणवर्म । स्वयें पुरुषोत्तम सांगत ॥ ७४ ॥
आतां गृहस्थाचें जें विहित कर्म आहे, त्यांतील आवश्यक धर्म व त्यांतील ब्रह्मार्पण करण्याचे वर्मही श्रीकृष्ण स्वतः सांगत आहे ७४.
वेदाध्यायस्वधास्वाहाबल्यन्नाद्येर्यथोदयम् ।
देवर्षिपितृभूतानि मद्रूपाण्यन्वहं यजेत् ॥ ५० ॥
देवर्षिपितृभूतानि मद्रूपाण्यन्वहं यजेत् ॥ ५० ॥
[श्लोक ५०] गृहस्थाने ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, काकबली, भूतयज्ञ आणि अन्नदानाने अतिथियज्ञ इत्यादींच्या द्वारे माझेच स्वरूप असणारे ऋषी, देवता, पितर, मनुष्य इत्यादींचे दररोज पूजन करावे. (५०)
स्वाध्याय 'वेदाध्ययन' । वेदप्रोक्त ब्रह्मयज्ञ ।
'स्वधा' म्हणिजे पितृतर्पण । 'स्वाहा' जाण देवतादिकां ॥ ७५ ॥
'स्वधा' म्हणिजे पितृतर्पण । 'स्वाहा' जाण देवतादिकां ॥ ७५ ॥
स्वाध्याय म्हणजे वेदाध्ययन करणे, वेदांत सांगितल्याप्रमाणे ब्रह्मयज्ञ करणे, स्वधा म्हणजे पितृतर्पण करणे व स्वाहा म्हणजे देवादिकांना हवि देणे ७५.
बळिदानादिकीं जाण । तृप्त होय 'भूतगण' ।
'मनुष्यांसी' अन्नोदकदान । हे पंचयज्ञ जाण नित्यकर्म ॥ ७६ ॥
'मनुष्यांसी' अन्नोदकदान । हे पंचयज्ञ जाण नित्यकर्म ॥ ७६ ॥
बलिदानासारखी दाने करावीत, त्या योगे भूतगण तृप्त होतात. मनुष्यांना अन्नोदकाचें दान करावें. हे पंचमहायज्ञ हेंच ब्राह्मणांचे नित्यकर्म आहे ७६.
हेंचि ब्रह्मकर्म जाण । जेणें होय ब्रह्मार्पण ।
त्या अर्पणाची निजखूण । तुज मी संपूर्ण सांगेन ॥ ७७ ॥
त्या अर्पणाची निजखूण । तुज मी संपूर्ण सांगेन ॥ ७७ ॥
ह्याचंच नांव 'ब्रह्मकर्म.' आतां ज्याच्या योगाने ब्रह्मार्पण होत असते, त्या अर्पणाची निजखूण तुला मी संपूर्ण सांगतों ७७.
मी एक कर्मकर्ता येथें । हें सांडोनियां निजचित्तें ।
भगवद्रूप भावितां भूतें । ब्रह्मार्पण तेथें होय कर्म ॥ ७८ ॥
भगवद्रूप भावितां भूतें । ब्रह्मार्पण तेथें होय कर्म ॥ ७८ ॥
ह्यांत मी एक कर्म करणारा अशी आपल्या चित्तांतील भावना सोडून देऊन प्रत्येक प्राणिमात्र भगवत्स्वरूप आहे, अशी भावना धरली म्हणजे तें कर्म ब्रह्मार्पण सहज होते ७८.
सांडितां कर्माभिमान । कर्म होय ब्रह्मार्पण ।
हें संकल्पेंवीण जाण । अर्पिती खूण उद्धवा ॥ ७९ ॥
हें संकल्पेंवीण जाण । अर्पिती खूण उद्धवा ॥ ७९ ॥
कर्माचा अभिमान सोडला की तें कर्म ब्रह्मार्पणच होते. उद्धवा! संकल्पाशिवायच कर्म ब्रह्मार्पण होण्याची ही खूण होय ७९.
माझेनि हें कर्म जाहलें । तें म्यां कृष्णार्पण केलें ।
येणें संकल्पाचेनि बोलें । अंगा आलें कर्तृत्व ॥ ४८० ॥
येणें संकल्पाचेनि बोलें । अंगा आलें कर्तृत्व ॥ ४८० ॥
माझ्यामुळे हे कर्म झाले आणि तें मी कृष्णार्पण केले, असा संकल्प मनाने व वाणीने केला, की त्याचें' कर्तृत्व आपल्या अंगी येते ४८०.
जो म्हणे मी कर्मकर्ता । तो होय कर्मफळभोक्ता ।
मुख्य बाधक ते अहंता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ८१ ॥
मुख्य बाधक ते अहंता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ८१ ॥
आणि जो कर्माचा 'कर्ता' मी असें म्हणतो, तो त्या कर्माचा 'भोक्ता'ही होतो. म्हणून उद्धवा ! अहंता हीच काय ती मुख्यत्वें बाधक आहे ८१.
ज्याच्या ठायीं अहंममता । त्याचे अंगीं नित्यबद्धता ।
जो निरभिमानी निर्ममता । नित्यमुक्तता त्यापाशीं ॥ ८२ ॥
जो निरभिमानी निर्ममता । नित्यमुक्तता त्यापाशीं ॥ ८२ ॥
ज्याच्या ठिकाणी अहंममता असते, त्याच्या अंगीं नित्यबद्धताही लागतेच; आणि जो निरभिमानी व निर्मम असतो, त्याच्यापाशी नित्यमुक्तताच नांदते ८२.
यालागीं सांडूनि अभिमान । पंचमहायज्ञाचरण ।
गृहस्थें प्रत्यहीं करितां जाण । कर्म ब्रह्मार्पण सहजेंचि ॥ ८३ ॥
गृहस्थें प्रत्यहीं करितां जाण । कर्म ब्रह्मार्पण सहजेंचि ॥ ८३ ॥
ह्याकरितां अभिमान सोडून देऊन पंचमहायज्ञ करीत जावे. गृहस्थाने ते प्रत्यहीं केले असता त्याचे कर्म सहजच ब्रह्मार्पण होतें ८३.
जैसेनि अर्पे भगवंता । ते गृहस्थाची नित्यकर्मता ।
तुज म्यां सांगितली तत्त्वतां । यज्ञादि कथा ते ऐक ॥ ८४ ॥
तुज म्यां सांगितली तत्त्वतां । यज्ञादि कथा ते ऐक ॥ ८४ ॥
ज्या रीतीनें गृहस्थाचें नित्यकर्म भगवंताला अर्पण होतें तें मी तुला यथार्थ रीतीने सांगितले. आतां यज्ञादिकांची कथा सांगतों ऐक ८४.
यज्ञ करावया अधिकारवंत । गांठी शुद्ध बारा सहस्र अर्थ ।
ज्यासी वेदीं ज्ञान यज्ञान्त । तेचि येथ अधिकारी ॥ ८५ ॥
ज्यासी वेदीं ज्ञान यज्ञान्त । तेचि येथ अधिकारी ॥ ८५ ॥
ज्याच्या संग्रहीं निदान बारा हजार तरी रुपये असतील, आणि ज्याला संपूर्ण यज्ञांगांचे वेदामधील ज्ञान आहे, तोच यज्ञ करण्याचा अधिकारी होतो ८५.
यदृच्छयोपपन्नेन शुक्लेनोपार्जितेन वा ।
धनेनापीडयन् भृत्यान् न्यायेनैवाऽहरेत् क्रतून् ॥ ५१ ॥
धनेनापीडयन् भृत्यान् न्यायेनैवाऽहरेत् क्रतून् ॥ ५१ ॥
[श्लोक ५१] गृहस्थाने दैवाने प्राप्त झालेल्या किंवा न्यायमार्गाने मिळविलेल्या धनाने आपले कुटुंबीय किंवा आश्रमाला असलेले नोकर इत्यादींना कोणत्याही प्रकारे पीडा न देता विधीनुसार यज्ञ करावे. (५१)
उदीमव्यापारे जोडिलें । का जें असत्प्रतिग्रहें आलें ।
नातरी परपीडा प्राप्त जाहलें । कां आडवूनि घेतलें जें द्रव्य ॥ ८६ ॥
नातरी परपीडा प्राप्त जाहलें । कां आडवूनि घेतलें जें द्रव्य ॥ ८६ ॥
व्यापारउदीम करून मिळवलेले किंवा निषिद्ध दानाने मिळालेले, अथवा दुसऱ्याला छळून आणलेले, तसेंच दुसऱ्याला अडवून घेतलेले ८६,
द्रव्य देतां चरफडी । ते शिष्या घालून सांकडीं ।
ऐसा अर्थ जोडिला जोडी । ते अपरवडी द्रव्याची ॥ ८७ ॥
ऐसा अर्थ जोडिला जोडी । ते अपरवडी द्रव्याची ॥ ८७ ॥
अथवा मनांत जळफळून दिलेले, किंवा शिष्यावर संकट घालून मिळविलेले असें द्रव्य असेल, तर तें यज्ञाला अयोग्य होय ८७.
जें यदृच्छा सहज आलें । कां जें शुक्लवृत्तीं जोडिलें ।
जें सुखोपायें हाता आलें । तें द्रव्य विहिलें यज्ञार्थ ॥ ८८ ॥
जें सुखोपायें हाता आलें । तें द्रव्य विहिलें यज्ञार्थ ॥ ८८ ॥
ईश्वरी इच्छेनें जें सहज मिळालेले असेल, किंवा जें शुक्लवृत्तीने म्ह. ब्राह्मणाकडेच पौरोहित्य करून, सदाचरणाने मिळालेले असेल, किंवा जें सुखोपायाने हाती आलेले असेल, तेच द्रव्य यज्ञाला खर्च करणे उचित होय ८८.
पाडूनि कुटुंबासी लंघन । सर्व द्रव्य वेंचूनि जाण ।
करूं नये यज्ञाचरण । अधर्मपण तेणेंही ॥ ८९ ॥
करूं नये यज्ञाचरण । अधर्मपण तेणेंही ॥ ८९ ॥
कुटुंबांतील मनुष्यांची उपासमार करून सारे द्रव्य खर्ची घालून यज्ञ करु नये. कारण त्यानेही अधर्मच होतो ८९.
कां जीविका जीवनवृत्ती । याग करूं नये निश्चितीं ।
लौकिकीं मिरवावया स्फीती । याग करिती ते मंद ॥ ४९० ॥
लौकिकीं मिरवावया स्फीती । याग करिती ते मंद ॥ ४९० ॥
किंवा ज्याच्यावर आपला नेहमी चरितार्थ चालावयाचा अशी वृत्ति म्ह. शेत वगैरे विकून टाकून त्या द्रव्यानेही खरोखर यज्ञ करूं नये. लोकांत कीर्ति मिरविण्यासाठी यज्ञ करतात, तेही मंदवद्धि होत ९०.
न धरितां कर्माभिमान । शुद्ध द्रव्य जोडिल्या जाण ।
करावें यज्ञाचरण । हें स्वधर्मलक्षण गृहस्थाचें ॥ ९१ ॥
करावें यज्ञाचरण । हें स्वधर्मलक्षण गृहस्थाचें ॥ ९१ ॥
कर्माचा अभिमान न बाळगतां पवित्र मार्गाने द्रव्य संपादन करून त्याने यज्ञ करावा, हेंच गृहस्थाच्या स्वधर्माचे लक्षण होय ९१.
सांडूनिया विषयलिप्सा चित्तीं । त्यजूनि गृहाची गृहासक्ती ।
गृहस्थें धरावी निवृत्ती । हें स्वयें श्रीपति सांगत ॥ ९२ ॥
गृहस्थें धरावी निवृत्ती । हें स्वयें श्रीपति सांगत ॥ ९२ ॥
मनांतील विषयेच्छा सोडून देऊन घरदाराची आसक्ति टाकून गृहस्थाने निवृत्तिमार्ग धरावा हेंच श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत ९२.
कुटुंबेषु न सज्जेत न प्रमाद्येत्कुटुंब्यपि ।
विपश्चिन्नश्वरं पश्येददृष्टमपि दृष्टवत् ॥ ५२ ॥
विपश्चिन्नश्वरं पश्येददृष्टमपि दृष्टवत् ॥ ५२ ॥
[ श्लोक ५२] गृहस्थाने कुटुंबामध्ये आसक्त होऊ नये स्वधर्माचरण व भगवद्भजन करण्याची टाळाटाळ करू नये बुद्धिमान पुरूषाने या जगातील वस्तूंप्रमाणे परलोकांतील भोगसुद्धा नाशवानच आहेत, असे समजावे. (५२)
जरी जाहली स्त्रीपुत्रगृहस्थिती । परी न धरावी त्यांची आसक्ती ।
सावध राखावी चित्तवृत्ती । परमात्मयुक्तिसाधनें ॥ ९३ ॥
सावध राखावी चित्तवृत्ती । परमात्मयुक्तिसाधनें ॥ ९३ ॥
गृहस्थिति जरी घरदार, बायकामुले यांनी संपन्न झाली, तरी त्यांची आसक्ति धरूं नये: परमात्मयुक्तीच्या साधनाने चित्तवृत्ति नेहमी सावध ठेवावी ९३.
सांडूनि कल्पना प्रमाद संग । चुकवूनि प्रमदांचें अंग ।
ईश्वरनिष्ठा अतिचांग । वृत्ति अभंग राखावी ॥ ९४ ॥
ईश्वरनिष्ठा अतिचांग । वृत्ति अभंग राखावी ॥ ९४ ॥
कल्पना, प्रमाद व संगासक्ति सोडून देऊन त्याचप्रमाणे स्त्रियांचा अंगसंग चुकवून व अत्यंत उत्कृष्ट ईश्वरनिष्ठा ठेवून वृत्ति अभंग राखावी ९४.
गृह-कुटुंब-विषयासक्ती । पाहतां विवेकाचिये स्थितीं ।
परिपाकें नश्वरप्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ९५ ॥
परिपाकें नश्वरप्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ९५ ॥
उद्धवा! गृहस्थाच्या कुटुंबांतील विषयाच्या स्थितीचा विचार केला असता ती परिणामी खरोखर अशाश्वत आहे असें जाण ९५.
जैसा इहलोकींचा परिपाक । तैसाचि जाण स्वर्गलोक ।
उभयतां नश्वर देख । केवळ मायिक मिथ्यात्वें ॥ ९६ ॥
उभयतां नश्वर देख । केवळ मायिक मिथ्यात्वें ॥ ९६ ॥
ह्याचप्रमाणे इहलोकचा जो परिणाम, तोच स्वर्गलोकचा. दोन्ही नश्वरच आणि मायिक असल्यामुळे केवळ मिथ्या होत ९६.
स्त्री पुत्र आणि धन । हें नश्वर जैसे कां स्वप्न ।
येचिविषयीं निरूपण । स्वयें नारायण सांगत ॥ ९७ ॥
येचिविषयीं निरूपण । स्वयें नारायण सांगत ॥ ९७ ॥
बायकामुले आणि संपत्ति ही सारीच स्वप्नाप्रमाणे क्षणभंगुर होत. याविषयींच श्रीकृष्ण स्वतः निरूपण करतात ९७.
पुत्रदाराप्तबन्धूनां सङ्गमः पान्थसङ्गमः ।
अनुदेहं वियन्त्येते स्वप्नो निद्रानुगो यथा ॥ ५३ ॥
अनुदेहं वियन्त्येते स्वप्नो निद्रानुगो यथा ॥ ५३ ॥
[श्लोक ५३] स्त्रीपुत्र, आप्तेष्ट इत्यादींचा संबंध पाणपोईवर भेटलेल्या वाटसरूंसारखा समजावा प्रत्येक देहात तो वेगवेगळा असतो जसे झोप असेपर्यंतच स्वप्न असते, तसा हा देह असेपर्यंतच संबंध असतात. (५३)
जैसे वृक्षातळीं पांथिक । एकत्र मीनले क्षण एक ।
तैसे पुत्रदाराप्तलोक । सर्वही क्षणिक संगम ॥ ९८ ॥
तैसे पुत्रदाराप्तलोक । सर्वही क्षणिक संगम ॥ ९८ ॥
झाडाखाली ज्याप्रमाणे पांथस्थ लोक क्षणभर एकत्र जमतात. त्याप्रमाणे बायकामुले व आप्तइष्ट या सर्वांचा समागमही क्षणिकच आहे ९८.
उभय नदीप्रवाहेंसीं । काष्ठें मीनलीं संगमीं जैसीं ।
सोयरीं सर्व जाण तैसीं । हेलाव्यासरसीं फांकती ॥ ९९ ॥
सोयरीं सर्व जाण तैसीं । हेलाव्यासरसीं फांकती ॥ ९९ ॥
दोहींकडून दोन नद्यांचे प्रवाह आले म्हणजे त्यातून वहात आलेली लाकडे त्यांच्या संगमावर एकत्र होतात, त्याप्रमाणेच सारी सोयरींधायरीही एके ठिकाणी जमतात व एक लोंढा आला म्हणजे ती लाकडे जशी दाही दिशांला फांकतात, त्याप्रमाणेच सोयऱ्याधायऱ्यांचीही दशा होते ९९.
जे योनीं जो जीव देहधारी । तेथें तेचि योनींचीं सोयरीं ।
ऐशीं अनंत जन्में संसारीं । तैं अमित सोयरीं जीवाचीं ॥ ५०० ॥
ऐशीं अनंत जन्में संसारीं । तैं अमित सोयरीं जीवाचीं ॥ ५०० ॥
जीव ज्या योनीत देह धारण करतो, त्या योनीत त्याच योनीची सोयरींधायरीही मिळतात. असे संसारामध्ये अनंत जन्म झालेले असतात, तेव्हां त्या साऱ्या जन्मांतील जीवाची सोयरी असंख्य आहेत ५००.
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...