मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २१ ओव्या ५०१ ते ५४५
मूळ संसारचि मायिक । तेथ वेद तोही तद्रूप देख ।
मृगजळीं नाहीं उदक । परी वोलावाहि देख असेना ॥ १ ॥
मूळ संसारच जर मायिक, तर त्यांतील जो वेद तोही तद्रूपच असला पाहिजे. मृगजळामध्ये उदक तर नसतेच, पण ओलावासुद्धा असत नाहीं १.
जेथ मूळीं मुख्य अद्वैतता । तेथ कैंचा वक्ता कैंचा श्रोता ।
कैंचें कर्म कैंचा कर्ता । वेदवार्ता ते कैंची ॥ २ ॥
कैंचें कर्म कैंचा कर्ता । वेदवार्ता ते कैंची ॥ २ ॥
जेथे मुळामध्येच मुख्य अद्वैतपणा, तेथें श्रोता-वक्ता कसला? कर्म आणि कर्ता कशाचा ? तेथें वेदवार्ता तरी कोठची! २.
नाहीं दृश्य-दृष्टा-दर्शन । नाहीं ध्येय-ध्याता-ध्यान ।
नाहीं ज्ञेय-ज्ञाता-ज्ञान । वेदवचन तेथें कैंचें ॥ ३ ॥
नाहीं ज्ञेय-ज्ञाता-ज्ञान । वेदवचन तेथें कैंचें ॥ ३ ॥
जेथें दृश्य, दृष्टा व दर्शन नाहीं; जेथें ध्येय, ध्याता आणि ध्यान नाहीं; ज्ञेय, ज्ञाता व ज्ञान नाही, तेथें वेदवचन तरी कशाचे ३.
जेथ भ्रमाची राणीव । जेथ भेदाची जाणीव ।
तेथ वेदाची शहाणीव । गोड गाणीव उपनिषदांची ॥ ४ ॥
तेथ वेदाची शहाणीव । गोड गाणीव उपनिषदांची ॥ ४ ॥
जेथे भ्रमाचे राज्य व भेदाची जाणीव असते, तेथेंच वेदाचें शहाणपण आणि उपनिषदांचे गोड गायन चालते ४ .
जंव भेदाची सबल स्थिती । तंव वेदाची थोर ख्याती ।
भेदु आलिया अद्वैतीं । वेद विराला 'नेति' म्हणोनी ॥ ५ ॥
भेदु आलिया अद्वैतीं । वेद विराला 'नेति' म्हणोनी ॥ ५ ॥
भेद जोपर्यंत प्रबळ आहे, तोपर्यंतच वेदाचें माहात्म्य ; भेद अक्षतांत शिरला की वेदही 'नेति नेति' म्हणत विरून जातो ५.
जळगार जळीं विरे । तेवीं वेदु अद्वैतीं मुरे ।
हें 'ज्ञानकांड' साचोकारें । तुज म्यां खरें सांगितले ॥ ६ ॥
हें 'ज्ञानकांड' साचोकारें । तुज म्यां खरें सांगितले ॥ ६ ॥
पाण्याची गार जशी पाण्यांतच विरून जाते, त्याप्रमाणे वेदही अद्वैतांत मुरून जातो. हेच खरेखरे ज्ञानकांड होय. ते मी तुला प्रेमानें सांगितले ६.
तेथ उपजला स्वयें अग्नी । त्या अरणी जाळूनि शमे वन्ही ।
तेवीं ज्ञानकांडनिरूपणीं । वेदु निज निर्दळणीं पर्वतला ॥ ७ ॥
तेवीं ज्ञानकांडनिरूपणीं । वेदु निज निर्दळणीं पर्वतला ॥ ७ ॥
ज्या अरणीकाष्ठातून अग्नि स्वतः उत्पन्न होतो, त्या अरणी जाळून टाकून तो शांत होतो. याप्रमाणे ज्ञानकांडनिरूपणामध्ये वेदानें आपलें आपल्यालाच नाहींसें करून घेतले आहे ७.
एक ब्रह्म जें अद्वैत । येणें श्रुतिवाक्यें मिथ्या द्वैत ।
हें बोलूनि वेद हारपे तेथ । ब्रह्म सदोदित संपूर्ण ॥ ८ ॥
हें बोलूनि वेद हारपे तेथ । ब्रह्म सदोदित संपूर्ण ॥ ८ ॥
'अद्वैतरूप ब्रह्म एक आहे,' या श्रुतिवाक्यानेच द्वैत मिथ्या होऊन जाते. इतकें सांगून वेद नाहीसा होतो, व ब्रह्म हें पूर्णपणाने सदोदित असते तसेंच असते ८.
'मी ब्रह्म' हे शुद्धीं स्फुरे स्फूर्ती । तेथचि ॐकाराची उत्पत्ती ।
तोही ब्रह्मरूप निश्चितीं । त्यासी 'बह्म' म्हण्ती एकाक्षर ॥ ९ ॥
तोही ब्रह्मरूप निश्चितीं । त्यासी 'बह्म' म्हण्ती एकाक्षर ॥ ९ ॥
निर्विकार शुद्ध ब्रह्मांत 'मी ब्रह्म' अशी स्फूर्ति स्फुरण पावते, तेथेंच ओंकाराची उत्पत्ति होते. तो ओंकारही ब्रह्मरूपच आहे. त्याला 'एकाक्षर ब्रह्म' असे म्हणतात ९.
त्या ॐकारापासोनि गहन । श्रुति शाखा स्वर वर्ण ।
झालें तें ब्रह्मरूप जाण । एवं वेद पूर्ण परब्रह्म ॥ ५१० ॥
झालें तें ब्रह्मरूप जाण । एवं वेद पूर्ण परब्रह्म ॥ ५१० ॥
त्या ओंकारापासूनच स्वरवर्ण उत्पन्न होऊन श्रुतीच्या मोठमोठ्या शाखा उत्पन्न झाल्या. तें सारें ब्रह्मरूपच होय. याप्रमाणे सर्व वेद पूर्ण परब्रह्मरूप आहे ५१०.
जेवीं सोन्याचे अळंकार । पाहतां सोनेंचि साचार ।
तेवीं श्रुतिशाखावेदविस्तार । तो अवघा ॐकार मद्रूपें ॥ ११ ॥
तेवीं श्रुतिशाखावेदविस्तार । तो अवघा ॐकार मद्रूपें ॥ ११ ॥
ज्याप्रमाणे सोन्याचे दागिने पाहिले असतां खरोखर सारें सोनेच असते, त्याप्रमाणे श्रुतिशाखांनी झालेला जो वेदाचा विस्तार तोही सारा ओंकारस्वरूपानें मद्रूपच आहे " ११.
जो वेदप्रतिपाद्य पुरुषोत्तम । जो भक्तकामकल्पद्रुम् ।
तो हें बोलिला मेघश्याम । आत्माराम श्रीकृष्ण ॥ १२ ॥
तो हें बोलिला मेघश्याम । आत्माराम श्रीकृष्ण ॥ १२ ॥
वेदांनी प्रतिपादन केलेला जो पुरुषोत्तम, जो भक्तांच्या मनःकामना पूर्ण करण्याविषयी कल्पतरुच, तो मेघश्याम आत्माराम श्रीकृष्ण ह्याप्रमाणे बोलला १२.
तिंही कांडी निजसंबंध । पूर्वापर अविरुद्ध ।
हा वेदार्थ परम शुद्ध । तुज म्यां विशद बोधिला ॥ १३ ॥
हा वेदार्थ परम शुद्ध । तुज म्यां विशद बोधिला ॥ १३ ॥
तिन्ही कांडांमधील संबंध पूर्वापर विरोध नसणाराच आहे. हाच अत्यंत शुद्ध वेदाचा अर्थ होय. तो मी तुला विशद करून सांगितला १३.
याहोनियां परता । वेदार्थ नाहीं गा सर्वथा ।
तो तुज म्यां सांगितला आतां । जाण तत्त्वता उद्धवा ॥ १४ ॥
तो तुज म्यां सांगितला आतां । जाण तत्त्वता उद्धवा ॥ १४ ॥
उद्धवा ! याहून निराळा असा वेदाचा अर्थ मुळीच नाही. मी जो तुला आता अर्थ सांगितला तोच खरा होय १४.
या वेदार्थाची निजखूण । हृदयीं भोगितां आपण ।
होय जीवशिवां समाधान । ऐसें श्रीकृष्ण बोलिला ॥ १५ ॥
होय जीवशिवां समाधान । ऐसें श्रीकृष्ण बोलिला ॥ १५ ॥
ह्या वेदाच्या अर्थातील निजखूण हृदयामध्ये ठेवली असतां जीवा-शिवास समाधान होते. असें श्रीकृष्ण बोलले १५.
हें ऐकोनि उद्धव जाण । झाला वेदार्थीं निमग्न ।
दोनी टंवकारले नयन । स्वानंदीं मन बुडालें ॥ १६ ॥
दोनी टंवकारले नयन । स्वानंदीं मन बुडालें ॥ १६ ॥
ते उद्धवाने ऐकून तोही वेदाच्या अर्थामध्ये निमग्न झाला. त्याचे दोन्ही डोळे भरून आले व मन आत्मानंदामध्ये बुडून गेलें १६.
चित्तचैतन्या मिळणी पाडी । कंठीं बाष्प दृढ अडी ।
लागतां स्वानंदाची गोडी । उभिली गुढी रोमांची ॥ १७ ॥
लागतां स्वानंदाची गोडी । उभिली गुढी रोमांची ॥ १७ ॥
चित्त चैतन्यांत लय पावलें, गहिवराने गळा दाटून आला, स्वानंदाची गोडी लागतांच रोमांची गुढी उभारली १७.
शरीरीं स्वेद सकंपता । नयनीं स्वानंदजळ येतां ।
बोल बुडाला सर्वथा । मूर्च्छा येतयेतां सांवरी ॥ १८ ॥
बोल बुडाला सर्वथा । मूर्च्छा येतयेतां सांवरी ॥ १८ ॥
शरीराला घाम सुटून ते थरथर कापू लागले. डोळ्यांत आनंदाश्रु भरल्यामुळे शब्द फुटेनासा झाला. मूर्छा येऊ लागली, पण ती सांवरून धरली १८.
तंव हृदया आली आठवण । हें भलें नव्हे दुश्चित्तपण ।
झणीं निजधामा जाईल श्रीकृष्ण । येणें धाकें नयन उघडिले ॥ १९ ॥
झणीं निजधामा जाईल श्रीकृष्ण । येणें धाकें नयन उघडिले ॥ १९ ॥
त्याच्या मनाला आठवण झाली की, हा गैरसावधपणा उपयोगी नाही. कारण न जाणों, इतक्यांत श्रीकृष्ण कदाचित् निजधामालाही जावयाचे. त्या धाकाने त्याने डोळे उघडले १९.
तंव घवघवीत । मुकुट कुंडलें मेखळा ।
कांसे झळके सोनसळा । आपाद बनमाळा शोभत ॥ ५२० ॥
कांसे झळके सोनसळा । आपाद बनमाळा शोभत ॥ ५२० ॥
तो झगझगीत मेघासारखा श्यामसुंदर; मुकुट, कुंडलें व मेखला धारण केलेली; कासेला सोनसळेचा कसलेला पीतांबर; पायांपर्यंत रुळत असलेली वनमाला, असा श्रीकृष्ण त्याला दिसला ५२०.
अंतरीं भोगी चैतन्यघन । बाहेरी उघडितां नयन ।
आनंदविग्रही श्रीकृष्ण । मूर्ती संपूर्ण संमुख देखे ॥ २१ ॥
आनंदविग्रही श्रीकृष्ण । मूर्ती संपूर्ण संमुख देखे ॥ २१ ॥
तो हृदयांत चैतन्यधन अनुभवीत होताच. डोळे उघडतांच आनंदघन श्रीकृष्णाची मूर्ति तशीच्या तशीच समोर दिसू लागली २१.
म्हणे श्रीकृष्ण चैतन्यघन । जैतन्यविग्रही श्रीकृष्ण ।
सगुणनिर्गुणरूपें जाण । ब्रह्म परिपूर्ण श्रीकृष्ण ॥ २२ ॥
सगुणनिर्गुणरूपें जाण । ब्रह्म परिपूर्ण श्रीकृष्ण ॥ २२ ॥
तो म्हणूं लागला की, श्रीकृष्ण चैतन्यघन असून, चैतन्याची केवळ मूर्तिच आहे. सगुण व निर्गुणरूपानें श्रीकृष्ण हा परिपूर्ण ब्रह्मस्वरूप आहे २२.
बाप भाग्य उद्धवाचें । सगुणनिर्गुण दोंहीचें ।
सुख भोगितसे साचें । हें श्रीकृष्णकृपेचें महिमान ॥ २३ ॥
सुख भोगितसे साचें । हें श्रीकृष्णकृपेचें महिमान ॥ २३ ॥
उद्धवाचे भाग्यच मोठे ! कारण, सगुण आणि निर्गुण या दोन्ही स्वरूपांचे सुखं तोच एक भोगीत होता. हे केवळ श्रीकृष्णकृपेचे माहात्म्य होय २३.
जेथ सद्गुसरुकृपा संपूर्ण । तेथ शिष्याची आवडी प्रमाण ।
तो जैं मागे मूर्ति सगुण । तैं तेचि जाण गुरु देती ॥ २४ ॥
तो जैं मागे मूर्ति सगुण । तैं तेचि जाण गुरु देती ॥ २४ ॥
सद्गुरूची जेव्हां परिपूर्ण कृपा होते, या शिवाची आवड हीच प्रमाण असते. त्याने जर सगुण मूर्ति मागितली, तर गुरुही तीच देतात २४.
पाहिजे निर्गुण निजप्राप्ति । ऐशी आवडी ज्याचे चित्तीं ।
तैं निर्गुणाचिये निजस्थितीं । गुरुकृपा निश्चितीं नांदवी ॥ २५ ॥
तैं निर्गुणाचिये निजस्थितीं । गुरुकृपा निश्चितीं नांदवी ॥ २५ ॥
निर्गुण स्वरूपाची प्राप्ति व्हावी, असें त्याच्या मनांत असेल, तर गुरूची कृपा ही त्याला निर्गुणस्वरूपाच्या स्थितीत निश्चलपणे नांदविते २५.
सगुण निर्गुण स्वरूपें दोनी । भोगावया आवडी ज्याचे मनीं ।
तेही स्थितीच्या गुरु दानीं । कृपाळुपणीं समर्थ ॥ २६ ॥
तेही स्थितीच्या गुरु दानीं । कृपाळुपणीं समर्थ ॥ २६ ॥
किंवा सगुण व निर्गुण ह्या दोन्ही स्वरूपांचा उपभोग घ्यावयाची ज्याच्या मनांत आवड असेल, त्याच्या त्या दोन्ही आवडी पुरविण्याविषयी कृपाळूपणाने गुरु समर्थ असतात २६.
सद्गुसरूचें अगाध महिमान । जें वेदा न बोलवेचि जाण ।
त्याची कृपा झालिया पूर्ण । दुर्लभ कोण पदार्थ ॥ २७ ॥
त्याची कृपा झालिया पूर्ण । दुर्लभ कोण पदार्थ ॥ २७ ॥
सद्गुरूचा महिमा अगाध आहे, तो वेदालासुद्धा सांगता येत नाही. त्यांची परिपूर्ण कृपा झाल्यानंतर दुर्लभ असा कोणता पदार्थ आहे ? २७.
ते कृष्णकृपेस्तव जाण । फिटलें उद्धवाचें दुर्लभपण ।
सगुण निर्गुण एक कृष्ण । हे खूण संपूर्ण बाणली ॥ २८ ॥
सगुण निर्गुण एक कृष्ण । हे खूण संपूर्ण बाणली ॥ २८ ॥
त्या श्रीकृष्णाच्या कृपेमुळे उद्ध्वाचें तें दुर्लभपण नाहींसें झालें. आणि सगुण व निर्गुण दोन्ही एक कृष्णच आहे, ही हृदयाला पुरती खूण पटली २८.
जाणोनि कृष्णाचें पूर्णपण । त्याचे लक्षोनि श्रीचरण ।
धांवोनि उद्धव आपण । घाली लोटांगण हरिचरणीं ॥ २९ ॥
धांवोनि उद्धव आपण । घाली लोटांगण हरिचरणीं ॥ २९ ॥
ही कृष्णाची परिपूर्णता जाणून, त्याच्या चरणकमळी लक्ष ठेवून उद्धवाने धावून जाऊन श्रीकृष्णचरणावर लोटांगण घातले २९.
तेव्हां सांवळा सकंकरण । चारी बाह्या पसरी श्रीकृष्ण ।
उद्धवासी प्रेमें उजलून । दीधलें आलिंगन स्वानंदें ॥ ५३० ॥
उद्धवासी प्रेमें उजलून । दीधलें आलिंगन स्वानंदें ॥ ५३० ॥
तेव्हां सांवळा असा जो श्रीकृष्ण त्याने आपले सकंकण चारही हात पसरून प्रेमानें उद्धवाला उठविलें, आणि स्वानंदानें आलिंगन दिले ५३०.
त्या आलिंगनाचें सुख । अनुभवी जाणती देख ।
जो उद्धवासी झाला हरिख । त्याचा जाणता एक श्रीकृष्ण ॥ ३१ ॥
जो उद्धवासी झाला हरिख । त्याचा जाणता एक श्रीकृष्ण ॥ ३१ ॥
त्या आलिंगनाचे सुख अनुभवी असतील तेच जाणतील. त्या वेळी उद्धवाला जो आनंद झाला, त्याचा जाणता एक श्रीकृष्णच होय ३१.
तो कृष्ण म्हणे उद्धवा । हा विसाव्याचा विसावा ।
माझ्या वेदाचा निजगुह्यठेवा । तो हा एकविसावा तुज सांगितला ॥ ३२ ॥
माझ्या वेदाचा निजगुह्यठेवा । तो हा एकविसावा तुज सांगितला ॥ ३२ ॥
तो कृष्ण म्हणाला, उध्दवा ! हा विसाव्याचाही विसावा, माझ्या वेदरहस्याचा गुप्त ठेवा, तो हा एकविसावा अध्याय मी तुला सांगितला ३२.
जेणें मोडे लिंगदेहाचा यावा । जेणें जीवत्व नाठवे जीवा ।
तो हा विसाव्याचा विसावा । तुज एकविसावा निरूपिला ॥ ३३ ॥
तो हा विसाव्याचा विसावा । तुज एकविसावा निरूपिला ॥ ३३ ॥
ह्याने लिंगदेहाचे बळ मोडतें: जीवाला जीवपणा आठवत नाहीं: तो हा विसाव्याचा विसावा असा एकविसावा अध्याय तुला मी सांगितला ३३.
जेणें मिथ्यात्व ये देहभावा । जेणें शून्य पडे रूपनांवा ।
तो हा विसाव्याचा विसावा । एकविसावा निरूपिला ॥ ३४ ॥
तो हा विसाव्याचा विसावा । एकविसावा निरूपिला ॥ ३४ ॥
ज्याच्या योगेंकरून देहभावना मिथ्या होऊन जाते व नामरूपावर पाणी पडते; तो हा विसाव्याचा विसावा म्ह. एकविसावा अध्याय तुला मी सांगितला ३४.
जेथ अज्ञाना होय नागोवा । जेथ ज्ञान ये अभावा ।
तो विसाव्याचा विसावा । एकविसावा निरूपिला ॥ ३५ ॥
तो विसाव्याचा विसावा । एकविसावा निरूपिला ॥ ३५ ॥
ज्यांत अज्ञानाचा नाश व ज्ञानाचाही अभाव होऊन जातो; तो हा विसाव्याचा विसावा म्ह० एकविसावा अध्याय मी तुला सांगितला ३५.
जेथ वेदुही वेडावला । बोधही लाजोनि बुडाला ।
अनुभवो स्वयें थोंटावला । तो हा निरूपिला वेदार्थ ॥ ३६ ॥
अनुभवो स्वयें थोंटावला । तो हा निरूपिला वेदार्थ ॥ ३६ ॥
ज्याकरिता वेदही वेडावून जातो; ज्ञानही लाजून नाहीसे होते; अनुभव बुडून जातो; तो हा वेदाचा अर्थ मी तुला सांगितला ३६.
हें वेदार्थसारनिरूपण । मज विश्वात्म्याचें निजनिधान ।
तुज म्यां सांगितलें संपूर्ण । हे जीवींची खूण उद्धवा ॥ ३७ ॥
तुज म्यां सांगितलें संपूर्ण । हे जीवींची खूण उद्धवा ॥ ३७ ॥
हे वेदार्थसाराचे निरूपण म्हणजे माझे विश्वात्म्याचें गुप्त निधान आहे. उद्धवा ! तुला म्हणूनच मी ही माझ्या जीवाची सारी खुण सांगितली ३७.
कोटिकोटि साधनें करितां । गुरुकृपेवीण सर्वथा ।
हे न ये कोणाचे हाता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ३८ ॥
हे न ये कोणाचे हाता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ३८ ॥
उद्धवा ! कोट्यवधि जरी साधनें केली, तरी हे गुरुकृपेशिवाय खरोखर कधी कोणाच्याच हाती लागावयाचें नाहीं हें लक्षात ठेव ३८.
ते गुरुकृपेलागीं जाण । आचरावे स्वधर्म पूर्ण ।
करावें गा शस्त्रश्रवण । वेदपठण तदर्थ ॥ ३९ ॥
करावें गा शस्त्रश्रवण । वेदपठण तदर्थ ॥ ३९ ॥
ती गुरुकृपा साध्य करण्यासाठीच आपण पूर्ण स्वधर्माप्रमाणे आचरण करावें: त्याच्याकरितांच शास्त्रश्रवण व वेदपठणही त्याकरितांच करावें ३९.
ते कृपेलागीं आपण । व्हावें दीनाचेंही दीन ।
धरितां संतांचे चरण । स्वामी जनार्दन संतुष्टे ॥ ५४० ॥
धरितां संतांचे चरण । स्वामी जनार्दन संतुष्टे ॥ ५४० ॥
त्या गुरुकृपेसाठी आपण दीनाचेही दीन व्हावे व संतांचे चरण धरावे म्हणजे स्वामी जनार्दन प्रसन्न होईल ५४०.
गुरु संतुष्टोनि आपण । करवी भागवतनिरूपण ।
एका विनवी जनार्दन । कृपा नित्य नूतन करावी ॥ ४१ ॥
एका विनवी जनार्दन । कृपा नित्य नूतन करावी ॥ ४१ ॥
श्रीगुरु प्रसन्न होऊन आपणच भागवताचे निरूपण करविताहेत. म्हणून एकनाथ जनार्दनाला विनंती करीत आहे की, नित्य नूतन कृपा करीत असावी ४१.
पूढील अध्यायीं गोड प्रश्न । उद्धव पुसेल आपण ।
प्रकृतिपुरुषांचें लक्षण । तत्त्वसंख्या पूर्ण विभाग ॥ ४२ ॥
प्रकृतिपुरुषांचें लक्षण । तत्त्वसंख्या पूर्ण विभाग ॥ ४२ ॥
पुढच्या अध्यायामध्ये उद्धव प्रकृति-पुरुषाचे लक्षण व तत्त्वांच्या संख्येचे सारे विभाग याविषयीं गोड प्रश्न विचारील ४२.
त्याचें सांगतां उत्तर । जन्ममरणाचा प्रकार ।
स्वयें सांगेल शर्ङ्गधर । कथा गंभीर परमार्थी ॥ ४३ ॥
स्वयें सांगेल शर्ङ्गधर । कथा गंभीर परमार्थी ॥ ४३ ॥
त्याचे उत्तर सांगतांना जन्ममरणाचा प्रकारही स्वतः श्रीकृष्ण सांगतील. त्या कथेत गहन परमार्थ भरलेला आढळेल ४३.
जे कथेचें करितां श्रवण । वैराग्य उठे कडकडून ।
येणें विन्यासें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगेल ॥ ४४ ॥
येणें विन्यासें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगेल ॥ ४४ ॥
त्या कथेचे श्रवण करतांना वैराग्य कडकडून उठेल, अशाच विस्ताराने श्रीकृष्ण स्वतः निरूपण करतील ४४.
घटाकाशें ठाकिजे गगन । तेवीं एका जनार्दना शरण ।
त्याचे वंदिता श्रीचरण । रसाळ निरूपण स्वयें स्मरे ॥ ५४५ ॥
त्याचे वंदिता श्रीचरण । रसाळ निरूपण स्वयें स्मरे ॥ ५४५ ॥
घटाकाश महाकाशांत मिसळून जाते त्याप्रमाणे एकनाथ जनार्दनाला शरण आहे. त्याचे चरणाला वंदन केले असतां आपोआपच रसाळ निरूपणाची स्फूर्ति होते ४५.
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे
एकाकारटीकायां वेदत्रयविभागनिरूपणं नाम एकविंशोऽध्यायः ॥ २१ ॥
एकाकारटीकायां वेदत्रयविभागनिरूपणं नाम एकविंशोऽध्यायः ॥ २१ ॥
याप्रमाणे श्रीमद्भागवतमहापुराणांतील एकादशस्कंधामधील श्रीकृष्ण-उद्धवसंवादाचा एकनाथकृत टीकेचा 'वेदत्रयविभागनिरूपण' नावाचा एकविसावा अध्याय समाप्त झाला.
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...