मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २१ ओव्या २०१ ते ३००
एकाएकीं सकळ विषयांसी । त्याग न करवे प्राण्यासी ।
यालागीं निषेधें निंदूनि त्यांसी । शनैःशनैः विषयांसी त्यागावी ॥ १ ॥
प्राण्यांना एकाएकींच काही सर्व विषयांचा त्याग करवतः नाहीं; म्हणून निषेधरूपाने त्यांची निंदा करून हळूहळू विषय सुटतील अशी युक्ति केली आहे १ .
जों जों विषयांची निवृत्ती । तों तों निजसुखाची प्राप्ती ।
पूर्ण बाणल्या विरक्ती । साधक होती मद्रूप ॥ २ ॥
पूर्ण बाणल्या विरक्ती । साधक होती मद्रूप ॥ २ ॥
जसजशी विषयाची निवृत्ति होते, तसतशी आत्मसुखाची प्राप्ती होत जाते. पूर्णपणे विरक्ति बाणली म्हणजे साधक मत्स्वरूपच होऊन जातो २.
मद्रूपतेचिये प्राप्तीं । अडवी असे विषयासक्ती ।
ते झालिया विषयनिवृत्ती । साधक होती मद्रूप ॥ ३ ॥
ते झालिया विषयनिवृत्ती । साधक होती मद्रूप ॥ ३ ॥
मत्स्वरूपाच्या प्राप्तीला विषयासक्तिच आड येत असते. तीच विषयाची निवृत्ति झाली की, साधक मत्स्वरूपच होऊन जातात ३.
जेथ माझिया स्वरूपाची प्राप्ती । तेथ निःशेष निमे अहंकृती ।
तेव्हा शोकमोहाची होय शांती । जाय निश्चितीं अविद्या ॥ ४ ॥
तेव्हा शोकमोहाची होय शांती । जाय निश्चितीं अविद्या ॥ ४ ॥
आणि माझ्या स्वरूपाची जेव्हां प्राप्ति होते तेव्हां अहंकार निखालस नष्ट होतो. आणि शोकमोहाची शांति होऊन अविद्या ही खरोखरच नष्ट होते ४.
अविद्यानाशासवें जाण । नाशती जन्मभाव दारुण ।
तेव्हां मरणासीच ये मरण । हारपे जीवपण जीवाचें ॥ ५ ॥
तेव्हां मरणासीच ये मरण । हारपे जीवपण जीवाचें ॥ ५ ॥
अविद्येचा नाश झाला की, त्याच्याबरोबर भयंकर जन्मभाव नाश पावतात. तेव्हां मरणालाच मरण आणि जीवाचे जीवपणच नाहींसें होऊन जातें ५.
अविद्या निमाल्या जीवेंसीं । ठावो नाहीं भवभयासी ।
जेवीं सबळबळें अंधारेंसीं । नुरेचि निशी दिनोदयीं ॥ ६ ॥
जेवीं सबळबळें अंधारेंसीं । नुरेचि निशी दिनोदयीं ॥ ६ ॥
ज्याप्रमाणे सूर्योदय होताच गर्द अंधारासहवर्तमान रात्रीला थारा उरत नाही, त्याप्रमाणे अविद्या जीवासहवर्तमान ठार झाली की, संसारभयाला जागाच राहात नाहीं ६.
जेवीं कां मृगजळाचा पूर । न साहे दृष्टीचा निर्धार ।
तेवीं भवभयेंसीं संसार । झाला साचार वाउगा ॥ ७ ॥
तेवीं भवभयेंसीं संसार । झाला साचार वाउगा ॥ ७ ॥
दृष्टि निश्चित झाली असतां ज्याप्रमाणे मृगजळाचा पूर राहात नाही, त्याप्रमाणे भवभयासहवर्तमान सारा संसारच मिथ्या होऊन जातो ७.
प्राणी पावावया कल्याण । हे वेदोक्त स्वधर्माचरण ।
विषयत्यागालागीं जाण । केलें निरूपण गुणदोषां ॥ ८ ॥
विषयत्यागालागीं जाण । केलें निरूपण गुणदोषां ॥ ८ ॥
वेदोक्त स्वधर्माचरण हें प्राण्यांचे कल्याण होण्यासाठीच आहे. आणि विषयत्यागासाठीच गुणदोषांचे निरूपण केलें आहे ८.
जे साच वेदार्थातें नेणती । ते वेदा प्रवृत्तिपर म्हणती ।
परी वेदें द्योतिली विरक्ती । विषयासक्तिच्छेदक ॥ ९ ॥
परी वेदें द्योतिली विरक्ती । विषयासक्तिच्छेदक ॥ ९ ॥
खरा वेदाचा अर्थ ज्यांना कळत नाही, ते वेद हा प्रवृत्तिपर आहे असे म्हणतात; पण वेदाने विषयावरील आसक्ति नष्ट करणारी विरक्तिच सांगितलेली आहे ९.
वेदोक्त स्वधर्मस्तिथीं । होय विषयांची विरक्ती ।
प्राणी निजमोक्ष पावती । हे वेदोक्ती पैं माझी ॥ २१० ॥
प्राणी निजमोक्ष पावती । हे वेदोक्ती पैं माझी ॥ २१० ॥
वेदांत सांगितल्याप्रमाणे स्वधर्मस्थितीने राहिले असतां विषयांविषयीं विरक्ति उत्पन्न होते, आणि प्राणी मोक्षाला जातात, हीच माझी वेदोक्ति आहे २१०.
हे सांडोनियां वेदस्थिती । केवळ विषयांची आसक्ति ।
प्राणी अतिदुःख पावती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ११ ॥
प्राणी अतिदुःख पावती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ११ ॥
वेदाची आज्ञा सोडून केवळ विषयांचीच आसक्ति धरली असतां प्राणी अत्यंत दुःख पावतात. तेही मी तुला सांगतों ऐक ११.
प्रवृत्ति तितुकी अनर्थहेतु । येचि अर्थींचा वृत्तांतु ।
चौं श्लोकीं श्रीभगवंतु । असे सांगतु उद्धवा ॥ १२ ॥
चौं श्लोकीं श्रीभगवंतु । असे सांगतु उद्धवा ॥ १२ ॥
प्रवृत्ति जितकी आहे, तितकी अनर्थकारकच आहे. ह्याच अर्थाचे निरूपण श्रीभगवान् चार श्लोकांनी उद्भवाला सांगतात १२.
विषयेषु गुणाध्यासात्पुंसः सङ्गस्ततो भवेत् ।
सङ्गात्तत्र भवेत्कामः कामादेव कलिर्नृणाम् ॥ १९ ॥
कलेर्दुर्विषहः क्रोधस्तमस्तमनुवर्तते ।
तमसा ग्रस्यते पुंसश्चेतना व्यापिनी द्रुतम् ॥ २० ॥
सङ्गात्तत्र भवेत्कामः कामादेव कलिर्नृणाम् ॥ १९ ॥
कलेर्दुर्विषहः क्रोधस्तमस्तमनुवर्तते ।
तमसा ग्रस्यते पुंसश्चेतना व्यापिनी द्रुतम् ॥ २० ॥
[श्लोक १९।२०] विषयांवर गुणांचा आरोप करण्याने त्या विषयांबद्दल माणसाला आसक्ती उत्पन्न होते आसक्ती वाटल्याने ते मिळविण्याची इच्छा निर्माण होते आणि मग त्या कामनापूर्तीमध्ये बाधा निर्माण झाल्यास लोकांमध्ये कलह होऊ लागतो. (१९)
कलहामुळे सहन होणार नाही एवढा क्रोध उत्पन्न होतो आणि क्रोधामुळे बुद्धीवर अज्ञानाचे आवरण पसरते या अज्ञानामुळे मनुष्याची कार्याकार्याचा निर्णय करणारी चेतनाशक्ती ताबडतोब लुप्त होते. (२०)
कलहामुळे सहन होणार नाही एवढा क्रोध उत्पन्न होतो आणि क्रोधामुळे बुद्धीवर अज्ञानाचे आवरण पसरते या अज्ञानामुळे मनुष्याची कार्याकार्याचा निर्णय करणारी चेतनाशक्ती ताबडतोब लुप्त होते. (२०)
विषयांचें गोडपण । सदा ध्याय ज्याचें मन
त्यासी विषयासक्ती जाण । अतिगहन उल्हासे ॥ १३ ॥
त्यासी विषयासक्ती जाण । अतिगहन उल्हासे ॥ १३ ॥
ज्याचे मन सदासर्वदा विषयाच्या गोडपणाचाच निदिध्यास करीत असते, त्याला अतिशय घोर विषयासक्ति उत्पन्न होत असते १३.
विषयासक्तीचा संभ्रम । तेणें निर्लज्ज खवळे काम ।
कामास्तव अतिविषम । सोशी दुर्गम उपाय ॥ १४ ॥
कामास्तव अतिविषम । सोशी दुर्गम उपाय ॥ १४ ॥
विषयासक्ति वाढली की निर्लज काम खवळून उठतो आणि त्या कामाकरितां अतिशय संकटाचे व दुर्गम प्रसंग सहन करतो १४.
विषयकामार्थ जे उपाय । त्यासी प्रतिपदीं अपाय ।
जेव्हां विषयकामसिद्धी न होय । तेव्हा महाकलह विवादु ॥ १५ ॥
जेव्हां विषयकामसिद्धी न होय । तेव्हा महाकलह विवादु ॥ १५ ॥
परंतु विषयतृप्यर्थ जे उपाय म्हणून योजितात, ते पदोपदी अपायरूपच होतात. जोपर्यंत विषयवासनेची परिपूर्तता होत नाही, तोपर्यंत मोठा कलह माजून राहातो १५.
जेथ अतिजल्पाचा विवाद । तेथ खटाटोपेंसीं सन्नद्ध ।
खवळला उठी क्रोध । अतिविरुद्ध दुर्धर ॥ १६ ॥
खवळला उठी क्रोध । अतिविरुद्ध दुर्धर ॥ १६ ॥
जेधे वितंडवादाचा कळस होतो, तेथे त्या यातायातीत साहाय्य करणारा अत्यंत विरुद्ध व दुर्धर असा क्रोध चवताळून उठतो १६.
क्रोध खवळल्या दारुण । बुद्धीचें तत्काळ नासे ज्ञान ।
तेव्हां विवेकाचें प्राशन । करी जाण महामोह ॥ १७ ॥
तेव्हां विवेकाचें प्राशन । करी जाण महामोह ॥ १७ ॥
क्रोध भयंकर रीतीनें चवताळला म्हणजे बुद्धीचे ज्ञान तत्काळ नष्ट होऊन जाते. तेव्हां महामोह हा विवेकाचा ग्रास करून टाकतो १७.
विवेकाचें लोपल्या भान । स्तब्ध चेतना होय जाण ।
तेव्हां कार्याकार्यआाठवण हेंही स्मरण बुडालें ॥ १८ ॥
तेव्हां कार्याकार्यआाठवण हेंही स्मरण बुडालें ॥ १८ ॥
विवेकाचे भान लोपलें कीं, चेतनाही स्तंभित होते, आणि त्यामुळे कार्य कोणतें व अकार्य कोणतें ह्याची आठवणही बुजून जाते १८.
तया विरहितः साधो जन्तुः शून्याय कल्पते ।
ततोऽस्य स्वार्थविभ्रंशो मूर्च्छितस्य मृतस्य च ॥ २१ ॥
ततोऽस्य स्वार्थविभ्रंशो मूर्च्छितस्य मृतस्य च ॥ २१ ॥
[श्लोक २१] हे साधो ! चेतना शक्ती लुप्त झाल्याने मनुष्य असून नसल्यासारखा होतो एखाद्या मूर्छा आलेल्या किंवा मेलेल्याप्रमाणे त्याची अवस्था होते अशा स्थितीत तो स्वार्थाला पूर्ण मुकतो. (२१)
विवेकशून्य स्तब्धवत । तेथ विषयो ना परमार्थ ।
न कळे सन्मार्गपंथ । आत्मघात पदोपदीं ॥ १९ ॥
न कळे सन्मार्गपंथ । आत्मघात पदोपदीं ॥ १९ ॥
विवेकशून्य होऊन केवळ मूढ बनला म्हणजे तेथें विषयही नाही आणि परमार्थही नाही अशी स्थिति होते. सन्मार्गाची वाट कळत नाही, त्यामुळे पदोपदीं आत्मघात मात्र होत असतो १९.
केवळ जड मूढ होऊनी । जेवीं कां मूर्च्छित प्राणी ।
तैसेपरी स्तब्ध होऊनी । अज्ञानपणीं श्रमला ॥ २२० ॥
तैसेपरी स्तब्ध होऊनी । अज्ञानपणीं श्रमला ॥ २२० ॥
केवळ जड मूढ होऊन बेशुद्धाप्रमाणे स्तब्ध होतो, आणि अज्ञानपणामध्ये कुचंबत असतो २२०.
यापरी जीत ना मेला । जड मूढ होऊनी ठेला ।
थित्या निजस्वार्था मुकला । अंगीं वाजला अनर्थु ॥ २१ ॥
थित्या निजस्वार्था मुकला । अंगीं वाजला अनर्थु ॥ २१ ॥
अशा प्रकारे धड सजीवही नव्हे आणि धड निर्जीवही नव्हे, अशा प्रकारे मूढ होऊन राहातो, आणि असलेल्या लाभाला मुकून अनर्थ मात्र अंगावर कोसळून घेतो २१.
विषयाभिनिवेशेन नात्मानं वेद नापरम् ।
वृक्षजीविकया जीवन् व्यर्थं भस्त्रेव यः श्वसन ॥ २२ ॥
वृक्षजीविकया जीवन् व्यर्थं भस्त्रेव यः श्वसन ॥ २२ ॥
[ श्लोक २२] विषयांचे चिंतन करता करता ते स्वतःला ओळखत नाही की दुसर्याला त्याचे जीवन वृक्षाप्रमाणे ज्ञानशून्य होते लोहाराच्या भात्याप्रमाणे त्याच्या शरीरात श्वास चालू असतो इतकेच. (२२)
एवं विषयांचे आसक्तीं । तमागुणें ग्रासिली वृत्ती ।
तेव्हां एकीहि स्फुरेना स्फूर्ती । मी कोण हें चित्तीं स्फुरेना ॥ २२ ॥
तेव्हां एकीहि स्फुरेना स्फूर्ती । मी कोण हें चित्तीं स्फुरेना ॥ २२ ॥
ह्याप्रकारे विषयाच्या आसक्तीमुळे तमोगुणाने वृत्तीला ग्रासून टाकल्याने कोणतीच आठवण राहात नाही. मी कोण हेंही मनाला स्मरत नाही! २२.
ऐसा भ्रमें भुलला प्राणी । जैसा उन्मत्त मदिरापानी ।
त्यासी स्मरणाची विस्मरणी । भ्रमिस्त मनीं पडिला ॥ २३ ॥
त्यासी स्मरणाची विस्मरणी । भ्रमिस्त मनीं पडिला ॥ २३ ॥
दारू प्याला म्हणजे मनुष्य जसा झिंगून जातो, आणि त्याच्या स्मरणाचे विस्मरण होऊन मनांत भ्रम उत्पन्न होतो, त्याप्रमाणे मनुष्यप्राणी भ्रमाने भुललेला आहे २३.
कां विषमसंधीज्वरु । तेणें ज्वरें हुंबरे थोरु ।
त्यासी नावडे आपपरु । वृथा विकारु बडबड करी ॥ २४ ॥
त्यासी नावडे आपपरु । वृथा विकारु बडबड करी ॥ २४ ॥
किंवा विषमज्वर झालेला मनुष्य हवी तशी बडबड करतो, त्याला आपले व परकेही आठवत नाहीत. तो व्यर्थ भलभलतें बरळत सुटतो २४.
फाटां फुटलियावरी । भलतेंचि स्मरण करी ।
तया नाठवे कांहीं ते परी । प्राणी अघोरीं पडले जाण ॥ २५ ॥
तया नाठवे कांहीं ते परी । प्राणी अघोरीं पडले जाण ॥ २५ ॥
चित्ताला भ्रम झाल्यामुळे भलभलतेच आठवते ; त्याला कशाचीच नीट आठवण असत नाही. याप्रमाणे प्राणी संकटांत कुचंबत असतात २५.
कां झालिया भूतसंचार । प्राणी हुंबरें हुंहुंकार ।
पडिला चित्तासी विसर । म्हणे मी कुकर म्हणोनि भुंके ॥ २६ ॥
पडिला चित्तासी विसर । म्हणे मी कुकर म्हणोनि भुंके ॥ २६ ॥
अथवा अंगांत भूतसंचार झाला म्हणजे तो मनुष्य 'हः हः हः हः' असें म्हणून हुंकारे देत बसतो; आणि चित्ताला भुरळ पडून आपण स्वतः कुत्रेंचं आहे असे मानून भोंकत असतो २६.
ऐसें जीविके नेणोनि प्राणी । घाबरे जैसा स्वप्नीं ।
म्हणे मी पडलों रणीं । ऐसे प्राणी स्वप्नीं भुलले ॥ २७ ॥
म्हणे मी पडलों रणीं । ऐसे प्राणी स्वप्नीं भुलले ॥ २७ ॥
अशाच रीतीने निजलेला मनुष्य आपलेपणाचे भान विसरून स्वप्नांत जसा घाबरतो, आणि मी रणांत पडलों असें म्हणतो, त्याप्रमाणेच हे सारे प्राणी भुलले आहेत २७.
तैशी भुली लटकी भुलवणी । काममोहें व्यापिले प्राणी ।
जडमूढपण ठाकूनी । अंतःकरणीं वेडावले ॥ २८ ॥
जडमूढपण ठाकूनी । अंतःकरणीं वेडावले ॥ २८ ॥
याप्रमाणे मिथ्याच भुलीनें भूल पडून कामाच्या मोहाने प्राणी व्यापून गेले आहेत. आणि जडमूढ होऊन अंत:करणांत वेडावले आहेत २८.
मुक्यानाकीं भरे मुरकुट । तें फेंफें बें बें करी निकृष्ट ।
न कळे रडे करी हाहाट । ते खटपट वाउगी ॥ २९ ॥
न कळे रडे करी हाहाट । ते खटपट वाउगी ॥ २९ ॥
मुक्याच्या नाकांत चिलट शिरले असता तो घाबरून जाऊन बेबें फेंफें करीत बसतो, काय झाले हें कळत नाहीं, व्यर्थ हाकाहाक करतो, त्याची ती खटपट ज्याप्रमाणे व्यर्थ होते २९,
तैसे दुःखबळें प्राणी । परी न कळे उंच करणी ।
पडिले मोहमदें भुलोनी । मुकपणीं बेंबात ॥ २३० ॥
पडिले मोहमदें भुलोनी । मुकपणीं बेंबात ॥ २३० ॥
त्याप्रमाणे दुःखाच्या आवेशाने प्राणी विव्हळ होतात व सन्मार्ग न कळल्यामुळे मोहमदाने भुलून मुकेपणाने विवळत पडतात २३०.
अहंकृतीचा उभारा । शरीरीं भरलासे वारा ।
तो होऊनि बाधक नरा । पडले आडद्वारा अंधकूपीं ॥ ३१ ॥
तो होऊनि बाधक नरा । पडले आडद्वारा अंधकूपीं ॥ ३१ ॥
अहंकाराच्या जोराने शरीरांत वारे भरते व तेंच बाधक होऊन आडमार्गानं जाऊन खोल विहिरीत पडतात ३१.
कां तेलियाचा ढोर पाहीं । डोळां झांपडी स्वदेहीं ।
अवघा वेळ चाले परी पाहीं । पंथ कांहीं न ठकेचि ॥ ३२ ॥
अवघा वेळ चाले परी पाहीं । पंथ कांहीं न ठकेचि ॥ ३२ ॥
किंवा तेल्याचा बैल जसा डोळ्यावर झापड बांधून केवळ शरीराने सारा वेळ चालत असतो, तरी वाट म्हणून काही सरत नाही ३२.
भवंता फिरे लागवेगीं । परी पाहतां न लगे आगी ।
घाणियाचि भोंवतें वेगीं । भोवंडी अंगीं जिराली ॥ ३३ ॥
घाणियाचि भोंवतें वेगीं । भोवंडी अंगीं जिराली ॥ ३३ ॥
लौकर लौकर आपल्या भोवती फिरतो, पण पाहावयाला गेले तर त्या फिरण्याला काही शेवटच नाही. पाण्याच्या भोवती फिरून फिरून अंगांतील भोवंडही जिरून गेलेली असते ३३.
तैसे विषय भवंडित भवु । परी नकळेचि विधिमावु ।
जैसा सर्प भ्रमला लागे धांवूं । तैसे विषय आघवे धावंति ॥ ३४ ॥
जैसा सर्प भ्रमला लागे धांवूं । तैसे विषय आघवे धावंति ॥ ३४ ॥
त्याप्रमाणे विषय हें सतत फिरणारे संसारचक्र आहे. परंतु विधीची माया कळत नाही. साप वेडावला म्हणजे तो जसा धावत सुटतो, त्याप्रमाणे सारे विषय धावत सुटलेले असतात ३४.
अंवसेचें काळे गडद । तैसा जड मूढ झाला स्तब्द ।
स्फुरेना आप पर हा बोध । जगदांध्य वोढवलें ॥ ३५ ॥
स्फुरेना आप पर हा बोध । जगदांध्य वोढवलें ॥ ३५ ॥
अमावास्येचा अंधार जसा काळा भिन्न असतो, त्याप्रमाणे तो जड मूढ व स्तब्ध होतो. त्याला आप-पर हें भान राहात नाही. साऱ्या जगांत अंधत्व पसरतें ३५.
जेंवी लोहकाराची भाती । तेवीं वृथा श्वासोच्छ्वास होती ।
वृक्षाची जैसी तटस्थ स्थिती । यापरी जीती जीत ना मेलीं ॥ ३६ ॥
वृक्षाची जैसी तटस्थ स्थिती । यापरी जीती जीत ना मेलीं ॥ ३६ ॥
लोहाराच्या भात्याप्रमाणे फुकट श्वासोच्छ्वास मात्र होत असतात. वृक्ष जसे तटस्थ उभे असतात, त्याप्रमाणे तेही धड जिवंत नव्हत व मेलेलेही नव्हत असे तटस्थ होऊन राहातात! ३६.
सकामासी स्वर्गप्राप्ती । म्हणसी बोलिली असे वेदोक्ती ।
तेही प्रलोभाची वदंती । ऐक तुजप्रतीं सांगेन ॥ ३७ ॥
तेही प्रलोभाची वदंती । ऐक तुजप्रतीं सांगेन ॥ ३७ ॥
आता तूं म्हणशील की, सकाम कर्में करणाराला स्वर्गप्राप्ति होते असें वेदांत सांगितले आहे; पण ते सुद्धा लोभिष्ट लोकांचेच म्हणणे आहे ते तुला सांगतो, ऐक ३७.
फलश्रुतिरियं नृणां न श्रेयो रोचनं परम् ।
श्रेयो विवक्षया प्रोक्तं यथा भैषज्यरोचनम् ॥ २३ ॥
श्रेयो विवक्षया प्रोक्तं यथा भैषज्यरोचनम् ॥ २३ ॥
[श्लोक २३] लहान मुलाला औषध आवडावे, म्हणून त्याला प्रलोभन दाखवावे, त्याचप्रमाणे वेदांमध्ये सांगितलेली फलश्रुती वास्तविक कल्याणकारक नसली, तरी मोक्षाविषयी रूची निर्माण करण्यासाठी असते. (२३)
निष्काम जे कां कर्मस्थिती । ते मूर्ख सर्वथा न करिती ।
त्यांसी दावूनियां फलश्रुती । स्वकर्मप्रवृत्तीं लाविले ॥ ३८ ॥
त्यांसी दावूनियां फलश्रुती । स्वकर्मप्रवृत्तीं लाविले ॥ ३८ ॥
मूर्ख लोक निष्काम असें कर्म कधीच करीत नाहीत, म्हणून त्यांना फलश्रुति दाखवून स्वकर्माला प्रवृत्त केले आहे ३८.
सकाम अथवा निष्काम । कर्मक्रिया दोंहीची सम ।
येथ वासनाचि विषम । सकामनिष्कामफलहेतू ॥ ३९ ॥
येथ वासनाचि विषम । सकामनिष्कामफलहेतू ॥ ३९ ॥
सकाम कर्म करणे आणि निष्काम कर्म करणे या दोहींची क्रिया सारखीच असते. पण सकाम व निष्काम कर्माच्या फलाचा हेतु मात्र निराळा असतो ३९.
जेवीं कां स्वातीचें जळ । शिंपीमाजीं होय मुक्ताफळ ।
तेंचि सेवी जैं महाव्याळ । तैं हळाहळ होऊनि ठाके ॥ २४० ॥
तेंचि सेवी जैं महाव्याळ । तैं हळाहळ होऊनि ठाके ॥ २४० ॥
ज्याप्रमाणे स्वातीचे जळ शिंपीत पडले तर मोती होते, पण तेंच सर्पाने प्राशन केले तर दुर्धर विष होऊन राहातें २४०.
तेवीं आपुली जे कां कल्पना । निष्कामें आणी मुक्तपणा ।
तेचि सकामत्वें जाणा । द्रुढबंधना उपजवी ॥ ४१ ॥
तेचि सकामत्वें जाणा । द्रुढबंधना उपजवी ॥ ४१ ॥
त्याप्रमाणे आपली कल्पना असते ती निष्काम बुद्धीनें मुक्तपणाला पोचविते, आणि सकामबुद्धीने दृढतर बंधनास पात्र करते ४१.
वेदु बोलिला जें स्वर्गफल । तें मुख्यत्वें नव्हे केवळ ।
जेवीं भेषज घ्यावया बाळ । देऊनि गूळ चाळविजे ॥ ४२ ॥
जेवीं भेषज घ्यावया बाळ । देऊनि गूळ चाळविजे ॥ ४२ ॥
वेदानें स्वर्गाचे जे फळ सांगितले आहे, तें कांहीं मुख्य नव्हे. तर वैद्य ज्याप्रमाणे मुलाला औषध घेण्यासाठी गुळाची लालुच दाखवितो, त्याप्रमाणे ती ठकवण आहे ४२.
ओखद घेतलियापाठीं । क्षयरोगाची होय तुटी ।
परी बाळ हातींचा गूळ चाटी । ते नव्हे फळदृष्टी भेषजीं ॥ ४३ ॥
परी बाळ हातींचा गूळ चाटी । ते नव्हे फळदृष्टी भेषजीं ॥ ४३ ॥
औषध घेतल्याने क्षयरोग नाहीसा होतो; पण मूल हातातील गुळच चाटीत असते, परंतु गूळ हे काही औषधाचे फळ नव्हे ४३.
तेवीं वेदाचे मनोगतीं । स्वर्गफळाची अभिव्यक्ती ।
मूर्खासी द्यावया मुक्ती । स्वधर्मस्थिती लावितु ॥ ४४ ॥
मूर्खासी द्यावया मुक्ती । स्वधर्मस्थिती लावितु ॥ ४४ ॥
त्याप्रमाणे वेदाचे हृदगत हें की, स्वर्गफळाची आशा दाखवून मूर्खांना मुक्त करण्याकरितां स्वधर्माचरण लावून द्यावें ४४.
म्हणसी कर्मवादि जे नर । वेद सांगती प्रवृत्तिपर ।
तो वेदार्थ निर्वत्तितत्पर । केवीं साचार मानावा ॥ ४५ ॥
तो वेदार्थ निर्वत्तितत्पर । केवीं साचार मानावा ॥ ४५ ॥
आतां तूं म्हणशील की, कर्मवादी जे मनुष्य आहेत ते वेद हा प्रवृत्तिपर आहे असे म्हणतात; त्याच वेदाचा अर्थ निवृत्तिपर आहे हे कसें खरें मानावें? ४५.
श्रुत्यर्थ जैं प्रवृत्ति धरी । तैं वेदु झाला अनर्थकारी ।
ते प्रवृत्ति दूषूनि श्रीहरी । दावी निवृत्तिवरी वेदार्थ ॥ ४६ ॥
ते प्रवृत्ति दूषूनि श्रीहरी । दावी निवृत्तिवरी वेदार्थ ॥ ४६ ॥
(ह्याचे उत्तर) श्रुतीचा अर्थ जर प्रवृत्तिपर असता, तर वेद हा अनर्थकारक होऊन बसला असता ! ह्याकरिता त्या प्रवृत्तीलाच दोष देऊन श्रीकृष्ण हे वेदाचा अर्थ निवृत्तिपर कसा ते दाखवून देतात ४६.
उत्पत्त्यैव हि कामेषु प्राणेषु स्वजनेषु च ।
आसक्तमनसो मर्त्या आत्मनोऽनर्थहेतुषु ॥ २४ ॥
न तानविदुषः स्वार्थं भ्राम्यतो वृजिनाध्वनि ।
कथं युञ्ज्यात्पुनस्तेषु तांस्तमो विशतो बुधः ॥ २५ ॥
आसक्तमनसो मर्त्या आत्मनोऽनर्थहेतुषु ॥ २४ ॥
न तानविदुषः स्वार्थं भ्राम्यतो वृजिनाध्वनि ।
कथं युञ्ज्यात्पुनस्तेषु तांस्तमो विशतो बुधः ॥ २५ ॥
[श्लोक २४।२५] मनुष्यांची मने जन्मतःच स्वतःचे अकल्याण करणार्या विषय, इंद्रिये आणि आप्तेष्टांमध्ये आसक्त असतात. (२४)
आपले परम कल्याण न जाणणार्या व देवादी योनिरूप पापमार्गात भटकणार्या किंबहुना आणखी पापे करून वृक्षपाषाणादी योनीत जाणार्या माणसांना हितचिंतक वेद त्याच विषयांत कसा प्रवृत्त करील बरे ? (२५)
आपले परम कल्याण न जाणणार्या व देवादी योनिरूप पापमार्गात भटकणार्या किंबहुना आणखी पापे करून वृक्षपाषाणादी योनीत जाणार्या माणसांना हितचिंतक वेद त्याच विषयांत कसा प्रवृत्त करील बरे ? (२५)
उपजतांचि प्राणिमात्रासी । देह आवडे सर्वस्वेंसीं ।
देहात्मवादें विषयांसी । जीवेंप्राणेंसीं लोलुप ॥ ४७ ॥
देहात्मवादें विषयांसी । जीवेंप्राणेंसीं लोलुप ॥ ४७ ॥
प्रत्येक प्राणिमात्राला जन्मतांच देह सर्वस्वी आवडत असतो. 'देह तोच मी' असे मानून तो जीवाभावाने विषयावर लुब्ध असतो ४७.
विषयकामाच्या आसक्तीं । स्त्रीपुत्रांची गोडी चित्तीं ।
स्वजनधनांची अतिप्रीती । स्वभावस्थिती अनिवार ॥ ४८ ॥
स्वजनधनांची अतिप्रीती । स्वभावस्थिती अनिवार ॥ ४८ ॥
विषयाच्या आसक्तीमुळे मनामध्ये स्त्रीपुत्रांविषयी प्रेम उत्पन्न होते. स्वजनांवर व द्रव्यावर अत्यंत प्रीति जडते. ती स्वाभाविक स्थिति अनिवार्य असते ४८.
जेणें जाइजे अधोगती । ऐशी जे कां कामासक्ती ।
ते प्राण्यासी सहजगती । विषयासक्ती स्वभावें ॥ ४९ ॥
ते प्राण्यासी सहजगती । विषयासक्ती स्वभावें ॥ ४९ ॥
जिच्या योगानें अधोगतीलाच जावे लागते, ती कामासक्ति म्ह. विषयासक्ति प्राण्यांना नैसर्गिकच असते ४९.
तेचि विषयांची प्रवृत्ती । वेद बोले जैं विध्युक्ती ।
तैं सर्वांचा स्वार्थघाती । झाला अनर्थीं वेदवादु ॥ २५० ॥
तैं सर्वांचा स्वार्थघाती । झाला अनर्थीं वेदवादु ॥ २५० ॥
त्याच विषयाची प्रवृत्ति जर वेद विधियुक्त रीतीनें सांगेल, तर ती वेदवाणी सर्वांचा स्वार्थ बुडविणारी अशी महाअनर्थकारकच होईल २५०.
मरतया तरटमारु केला । बुडत्याचे डोयीं दगड दीधला ।
आंधळा अंधकूपीं घातला । तैसा वेदु झाला अनर्थीं ॥ ५१ ॥
आंधळा अंधकूपीं घातला । तैसा वेदु झाला अनर्थीं ॥ ५१ ॥
मरणाराला चाबकाचा मार द्यावा, किंवा बुडत्याच्या मस्तकावर दगड घालावा, किंवा आंधळ्याला विहिरीत ढकलावें, त्याप्रमाणे वेदही अनर्थकारकच होईल ५१.
वेदु जैं विषयीं गोंवी । तैं प्राण्यातें कोण उगवी ।
राजा सर्वस्वें नागवी । तैं कोण सोडवी दीनतें ॥ ५२ ॥
राजा सर्वस्वें नागवी । तैं कोण सोडवी दीनतें ॥ ५२ ॥
वेदच जर विषयांत गोवू लागला, तर प्राण्यांना दुसरे कोण सोडविणार ? राजाच जर सर्वस्वी नागवू लागला, तर गरिबाला कोण मुक्त करणार? ५२.
नेणोनि वेदींचा मथितार्थु । स्वयें जो कां विषयासक्तु ।
तो मानी प्रवृत्तिपर श्रुत्यर्थु अनर्थहेतु बालिशां ॥ ५३ ॥
तो मानी प्रवृत्तिपर श्रुत्यर्थु अनर्थहेतु बालिशां ॥ ५३ ॥
वेदांतील मथितार्थ न समजतां जो स्वत:च विषयासक्त होतो, तो श्रुतीचा अर्थ प्रवृत्तिपरच आहे असे मानतो. आणि त्यामुळेच मूर्खाना तो अनर्थास कारणीभूत होतो ५३.
पुत्र पित्यास पुसे जाण । ग्रहणीं जेवूं परमान्न ।
येरू म्हणे सुटल्या ग्रहण । उष्ण भोजन स्वगृहीं करूं ॥ ५४ ॥
येरू म्हणे सुटल्या ग्रहण । उष्ण भोजन स्वगृहीं करूं ॥ ५४ ॥
पुत्र पित्याला ग्रहणामध्ये म्हणाला, सकाळची खीर खाऊ या. त्यावर त्याला बाप सांगतो की, ग्रहण सुटलें म्हणजे आपण आपल्या घरी केलेलें ऊन ऊन ताजें जेवणच जेवू ५४.
तैशी माझ्या वेदाची उक्ती । निषेधमुखें दावी प्रवृत्ती ।
येणें वेदाच्या मनोगतीं । विषयनिवृत्ती मुख्यत्वें ॥ ५५ ॥
येणें वेदाच्या मनोगतीं । विषयनिवृत्ती मुख्यत्वें ॥ ५५ ॥
तसेंच माझ्या वेदाचे सांगणे आहे. निषेधमुखाने प्रवृत्ति दाखवून दिली आहे. तात्पर्य, विषयाची निवृत्ति हेंच वेदाचें मनोगत आहे ५५.
विषयीं बुडते जे जन । त्यांचें करावया उद्धरण ।
माझा वेदवादु जाण । सकामपण त्या नाहीं ॥ ५६ ॥
माझा वेदवादु जाण । सकामपण त्या नाहीं ॥ ५६ ॥
विषयांत बुडणारे जे लोक आहेत, त्यांचा उद्धार करण्याकरितांच माझी वेदवाणी आहे. तिच्यांत सकामपणा नाही ५६.
कोणी एक मंदबुद्धी । केवळ विषयांध त्रिशुद्धी ।
ते सकाम जल्पती वेदविधी । त्यांची कुबुद्धी हरि सांगे ॥ ५७ ॥
ते सकाम जल्पती वेदविधी । त्यांची कुबुद्धी हरि सांगे ॥ ५७ ॥
परंतु मंदबुद्धीचे लोक असतात ते, निखालस विषयांध असतात. तेच वेदांतील विधि सकामच आहे अशी बडबड करतात. त्यांची ती दुर्बुद्धि श्रीकृष्ण सांगतात ५७.
एवं व्यवसितं केचिदविज्ञाय कुवुद्धयः ।
फलश्रुतिं कुसुमितां न वेदज्ञा वदन्ति हि ॥ २६ ॥
फलश्रुतिं कुसुमितां न वेदज्ञा वदन्ति हि ॥ २६ ॥
[श्लोक २६] काही अज्ञानी लोक वेदांचा हा अभिप्राय समजून न घेता वरवर गोड वाटणार्या फलश्रुतीला भुलतात, परंतु वेदांचे रहस्य जाणणारे मात्र असे सांगत नाहीत. (२६)
फलत्यागें स्वध्र्मस्थिती । सर्वथा सकाम न करिती ।
यालागीं वेद बोले फलश्रुती । स्वधर्मप्रवृत्तीलागुनी ॥ ५८ ॥
यालागीं वेद बोले फलश्रुती । स्वधर्मप्रवृत्तीलागुनी ॥ ५८ ॥
सकाम लोक फलेच्छा सोडून स्वधर्माचरण कधीच करीत नाहीत, म्हणून स्वधर्माकडे प्रवृत्ति होण्यासाठी वेदानें फलश्रुति सांगून ठेवली आहे ५८.
सैंधव सागरा भेटूं जातां । जेवीं कां हारपे सैंधवता ।
तेवीं स्वधर्मीं प्रवर्ततां । सकामता उरेना ॥ ५९ ॥
तेवीं स्वधर्मीं प्रवर्ततां । सकामता उरेना ॥ ५९ ॥
मीठ समुद्राला भेटावयास गेले असता त्याचा मीठपणाच नाहीसा होतो, त्याप्रमाणे स्वधर्माकडे प्रवृत्ति झाली असता त्याची सकामताच राहात नाही ५९.
जैशी दों दिव्यांची वाती । एकवट केलिया ज्योती ।
तेथ न दिसे भेदगती । पाहतां ज्योती एकचि ॥ २६० ॥
तेथ न दिसे भेदगती । पाहतां ज्योती एकचि ॥ २६० ॥
ज्याप्रमाणे दोन दिव्यांतील वाती एकत्र करून त्यांची एकच ज्योति केली तर त्यांत कांहीं भेद दिसत नाही; पाहावयास गेले असतां ज्योत एकच दिसते २६०,
जेवीं अग्नीं कापुर मिळतां । तो अग्नीचि होय तत्त्वतां ।
तेवीं स्वधर्मकर्मीं प्रवर्ततां । कर्मीं निष्कर्मता स्वयें प्रकटे ॥ ६१ ॥
तेवीं स्वधर्मकर्मीं प्रवर्ततां । कर्मीं निष्कर्मता स्वयें प्रकटे ॥ ६१ ॥
कापूर अनीमध्ये जाऊन मिळाला म्हणजे तोही खरोखर अग्निच होऊन जातो, त्यांत कांहीं भेद दिसत नाही; त्याप्रमाणे स्वधर्मकर्माने वागले असतां आपोआपच निष्कर्मता प्रकट होते ६१.
कर्माकर्मांची वेळुजाळीं । ते स्वधर्माचे कांचणिमेळीं ।
पडे नित्तशुद्धीची इंगळी । ते करी होळी कर्माकर्मांची ॥ ६२ ॥
पडे नित्तशुद्धीची इंगळी । ते करी होळी कर्माकर्मांची ॥ ६२ ॥
कर्माकर्म हें एक कळकाचें बेट आहे, त्याला स्वधर्माचें घर्षण झाले म्हणजे त्यांत चित्तशुद्धीची ठिणगी पडते; आणि ती त्या कर्माकर्माचे जाळून भस्म करिते ६२.
सकामता करितां कर्म । स्वधर्म नाशी फळकाम ।
तेव्हां सकाम आणि निष्काम । दोंहींचें भस्म स्वधर्म करी ॥ ६३ ॥
तेव्हां सकाम आणि निष्काम । दोंहींचें भस्म स्वधर्म करी ॥ ६३ ॥
कामना धरून कर्म केले तरी, स्वधर्म हा फलेच्छेचा नाश करतो; त्या वेळी सकाम आणि निष्काम या दोहोंचेही स्वधर्म भस्म करून टाकतो ६३.
जेवीं दों काष्ठांच्या घसणी । माजीं प्रकटे जो कां वन्ही ।
तो दोंहीतेंही जाळूनी । स्वतेजपणीं प्रकाशे ॥ ६४ ॥
तो दोंहीतेंही जाळूनी । स्वतेजपणीं प्रकाशे ॥ ६४ ॥
दोन लाकडे एकावर एक घासली असता त्यांत अग्नि उत्पन्न होतो, आणि तो त्या दोन्ही लाकडांना जाळून आपल्याच दीप्तीने प्रगट होतो ६४.
तेवीं माझा वेदवादु । स्वकर्में छेदी कर्मबाधु ।
हें नेणोनि जे विषयांधु । जडल्या सुबद्धु फळशो ॥ ६५ ॥
हें नेणोनि जे विषयांधु । जडल्या सुबद्धु फळशो ॥ ६५ ॥
त्याप्रमाणे माझी वेदवाणी आहे; ती स्वकर्मानेच कर्मबंध छेदून टाकते. हे वर्म न कळल्यामुळे विषयांध असतो तो फलाच्या आशेला जखडला जातो ६५.
वेदें प्रवृत्तिरोचनेकारणें । स्वर्गाचि नाना फलें बोलणें ।
त्यांलागीं ज्याचें बैसे धरणें । तेणें नागवणें निजस्वार्थां ॥ ६६ ॥
त्यांलागीं ज्याचें बैसे धरणें । तेणें नागवणें निजस्वार्थां ॥ ६६ ॥
वेदाने स्वकर्मप्रवृत्तीमध्ये रुचि उत्पन्न व्हावी म्हणून स्वर्गादिक अनेक फळे सांगितली आहेत; पण त्यांच्याच जो नादी लागतो, तो आपल्या लाभाला मुकतो ६६.
कष्टोनि शेतीं पेरिले चणे । त्यांची उपडोनि भाजी करणें ।
तो लाभ कीं तेणें नाडणें । तैसें फळ भोगणें सकार्मीं ॥ ६७ ॥
तो लाभ कीं तेणें नाडणें । तैसें फळ भोगणें सकार्मीं ॥ ६७ ॥
पुष्कळ मेहनत घेऊन शेतामध्ये हरभरा पेरला, आणि तो उपटून त्याची भाजी केली, तर तो लाभ समजावा की हानी समजावी? त्याचप्रमाणे सकामाने फळ भोगणे आहे ६७.
वोलीं जोंधळियाचीं करबाडें । खातां अत्यंत लागतीं गोडें ।
त्यालागीं शेत जैं उपडे । तैं लाभु कीं नाडे निजस्वार्था ॥ ६८ ॥
त्यालागीं शेत जैं उपडे । तैं लाभु कीं नाडे निजस्वार्था ॥ ६८ ॥
जोंधळ्याची ओली ताटें खाऊं लागलों असतां मोठी गोड लागतात; म्हणून त्याच्यासाठी जर सारे शेतच उपटले, तर लाभ की आपली नागवण झाली म्हणावी ? ६८.
तैशी सकामकामनाउन्मत्तें । जें फळीं फळाशालोलिंगतें ।
ते नाडलीं स्वधर्मलाभातें । ऐक तूतें सांगेन ॥ ६९ ॥
ते नाडलीं स्वधर्मलाभातें । ऐक तूतें सांगेन ॥ ६९ ॥
त्याप्रमाणे जे लोक सकाम बुद्धीनें उन्मत्त होतात, जे फलाच्या आशेला लुब्ध होतात, ते स्वधर्माच्या लाभाला कसे अंतरतात, तेंही तुला सांगतों ऐक ६९.
शेतीं पेरावया आणिले चणे । त्यांचे आदरें करी जो फुटाणे ।
तो शाहणा कीं मूर्ख म्हणणें । तैसें फळ भोगणें सकामीं ॥ २७० ॥
तो शाहणा कीं मूर्ख म्हणणें । तैसें फळ भोगणें सकामीं ॥ २७० ॥
शेतांत पेरावयासाठी हरभरे आणले, त्यांचे जो आवडीने भाजून फुटाणे करील, त्याला शहाणा म्हणावा की मूर्ख म्हणावा ? त्याप्रमाणेच सकामांचे फल भोगणें आहे ! २७०.
घोडा विकोनि पलाण घेणें । लोणी देऊनि ताक मागणें ।
भात सांडूनि वेळण पिणें । तैसें फळ भोगणें सकामीं ॥ ७१ ॥
भात सांडूनि वेळण पिणें । तैसें फळ भोगणें सकामीं ॥ ७१ ॥
घोडा विकून खोगीर घ्यावे. किंवा लोणी देऊन टाकून ताक मागावें, भात टाकून पेज प्यावी, त्याप्रमाणेच सकामाचे फल भोगणें आहे ७१.
ऐसे सकाम अतिदुर्बुद्धी । जे नाडले स्वधर्मसिद्धी ।
यालागीं देवो म्हणे 'कुबुद्धी' । ते कुबुद्धीची विधी हरि सांगे ॥ ७२ ॥
यालागीं देवो म्हणे 'कुबुद्धी' । ते कुबुद्धीची विधी हरि सांगे ॥ ७२ ॥
असे जे सकाम आणि अत्यंत दुर्बुद्ध असतात ते स्वधर्माच्या सिद्धीला मुकतात. म्हणून देव त्यांना 'कुबुद्धि' म्हणतात. त्या कुबुद्धीची लक्षणेही श्रीकृष्ण सांगत आहेत ७२.
कामिनः कृपणा लुब्धाः पुष्पेषु फलबुद्धयः ।
अग्निमुग्धा धूमतान्ता स्वं लोकं न विदन्ति ते ॥ २७ ॥
अग्निमुग्धा धूमतान्ता स्वं लोकं न विदन्ति ते ॥ २७ ॥
[ श्लोक २७] विषयांची इच्छा करणारे दीनहीन, लोभी पुरूष, स्वर्ग इत्यादी फुलांनाच फळे समजतात अग्नीच्याद्वारा सिद्ध होणार्या यज्ञ इत्यादी कर्मांना भुलतात त्यामुळे त्यांना शेवटी देवलोक, पितृलोक इत्यादींचीच प्राप्ती होते त्यांना आत्मस्वरूपाची कधीच ओळख होत नाही. (२७)
सकामाची तृष्णा पूर्ण । कदाकाळीं नव्हे जाण ।
कामेच्छा तो सदा दीन । 'कृपणपण' या हेतू ॥ ७३ ॥
कामेच्छा तो सदा दीन । 'कृपणपण' या हेतू ॥ ७३ ॥
सकामांची तृष्णा कधींच पुरी होत नसते. कामाच्या इच्छेनें तो सर्वकाळ दीन असतो, त्यामुळे त्याला 'कृपण' असे म्हणतात ७३.
जळीं बक धरोनि ध्यान । जेवीं कां टपत राहे मीन ।
तेवीं सकामा अनुष्ठान । लुब्धोनि जाण कामासी ॥ ७४ ॥
तेवीं सकामा अनुष्ठान । लुब्धोनि जाण कामासी ॥ ७४ ॥
बगळा पाण्यामध्ये माशासाठी जसा ध्यान धरून टपून बसतो, त्याप्रमाणे सकाम मनुष्य फलेच्छेलाच लुब्ध होऊन अनुष्ठान करीत असतो ७४.
जावया परपुरुषापासीं । लवोठवो दावी निजपतीसी ।
तेवीं काम धरोनि मानसीं । स्वधर्मकर्मासी आचरे ॥ ७५ ॥
तेवीं काम धरोनि मानसीं । स्वधर्मकर्मासी आचरे ॥ ७५ ॥
परपुरुषापाशी जाणे सुलभ व्हावे म्हणून जारिणी स्त्री ज्याप्रमाणे आपल्या पतीच्या पुढे पुढे नाचत असते, त्याप्रमाणे तोही मनामध्ये फलेच्छा धरून स्वधर्मकर्म आचरीत असतो ७५.
जेवीं कां अज्ञान बाळ । फूल तेंचि म्हणे फळ ।
तेवीं स्वर्गभोग केवळ । मानी अढळ मूर्खत्वें ॥ ७६ ॥
तेवीं स्वर्गभोग केवळ । मानी अढळ मूर्खत्वें ॥ ७६ ॥
अज्ञान मूल ज्याप्रमाणे फुलालाच फळ समजते, त्याप्रमाणे तोही मूर्खपणानें स्वर्गातील सुखें अक्षयची आहेत असे समजतो ७६.
त्याही स्वर्गभोगासी पाहें । कर्मवैकल्य होय कीं नोहे ।
हाही संदेह वर्तताहे । तेणेंही होय अतिदीन ॥ ७७ ॥
हाही संदेह वर्तताहे । तेणेंही होय अतिदीन ॥ ७७ ॥
त्या स्वर्गसुखाप्रीत्यर्थ कर्म यथासांग होईल की नाही हाही संशय त्याला वाटत असतो, त्यामुळे तो अत्यंत दीन होतो ७७.
सकाम तो सदा दीन । दीनत्वें अतिकृपण ।
कृपणत्वें स्लोभपण । लोभास्तव ज्ञान महामोह ग्रासी ॥ ७८ ॥
कृपणत्वें स्लोभपण । लोभास्तव ज्ञान महामोह ग्रासी ॥ ७८ ॥
सकाम नेहमी दीन झालेला असतो, त्या दीनत्वामुळे अति कृपण व कृपणत्वामुळे लोभी होतो; आणि लोभामुळे त्याचे ज्ञान महामोह ग्रासून टाकतो ७८.
मोहाचें खवळल्या भान । सविवेक ग्रासी ज्ञान ।
तेव्हां बुद्धीमाजीं तमोगुण । सबाह्य परिपूर्ण उल्हासे ॥ ७९ ॥
तेव्हां बुद्धीमाजीं तमोगुण । सबाह्य परिपूर्ण उल्हासे ॥ ७९ ॥
मोह खवळला म्हणजे तो विवेकासहवर्तमान ज्ञानालाच गिळून टाकतो. त्या वेळी बुद्धीमध्ये अंतर्बाह्य तमोगुणच भरून उचंबळू लागतो ७९.
तमें कोंदाटल्या वृत्ती । धूमांकित होय स्थिती ।
जेवीं कां आंधळ्याचा सांगती । अंधारे रातीं आडवीं चुके ॥ २८० ॥
जेवीं कां आंधळ्याचा सांगती । अंधारे रातीं आडवीं चुके ॥ २८० ॥
तमोगुणानें वृत्ति भरली म्हणजे धुकें कोंदाटल्याप्रमाणे स्थिति होऊन जाते. आंधळ्याच्या संगतीने ज्याप्रमाणे अंधेऱ्या रात्री आडरानांत चुकावे त्याप्रमाणे गत होते २८०.
त्या आंधळ्याची जैशी स्थिती । तैशी सकामाची गती ।
चुकला विवेकाचा सांगती । आंधळी वृत्ती अतिमुग्ध ॥ ८१ ॥
चुकला विवेकाचा सांगती । आंधळी वृत्ती अतिमुग्ध ॥ ८१ ॥
त्या आंधळ्याची जशी स्थिति होते, त्याप्रमाणेच सकाम पुरुषाचीही गति होते. विवेकाची संगत चुकली की, आंधळी वृत्ति अत्यंत मुग्ध होते ८१.
जैसें कां अज्ञान बाळ । तैसा मुग्ध होय केवळ ।
कोण कर्म काय तें फळ । नेणे विवळ मुग्धत्वें ॥ ८२ ॥
कोण कर्म काय तें फळ । नेणे विवळ मुग्धत्वें ॥ ८२ ॥
अज्ञान मूल असावे, त्याप्रमाणेच तो निखालस मुग्ध होऊन जातो; मुग्धपणामुळे कर्म कोणते आणि त्याचे फळ काय हें त्याला स्पष्ट कळत नाही ८२.
माझी कोणे लोकीं स्थिती । पुढें कोण आपुली गती ।
हें कांहींच न स्मरे चित्तीं । धूम्रवृत्ती देहांतु ॥ ८३ ॥
हें कांहींच न स्मरे चित्तीं । धूम्रवृत्ती देहांतु ॥ ८३ ॥
जगांत माझी स्थिति कोणती ? पुढे आपली गति काय ? हें देहामध्ये धूम्रवृत्ति झाल्याकारणानें कांहींच स्मरत नाही ८३.
न ते मामङ्ग जानन्ति हृदिस्थं य इदं यतः ।
उक्थशस्त्रा ह्यसुतृपो यथा नीहारचक्षुषः ॥ २८ ॥
उक्थशस्त्रा ह्यसुतृपो यथा नीहारचक्षुषः ॥ २८ ॥
[श्लोक २८] कर्माची प्रशंसा करून त्यायोगे इंद्रियांना तृप्त करणारे लोक ज्या परमात्म्यापासून हे विश्व उत्पन्न झाले आहे, त्या हृदयातच विराजमान असणार्या मला पाहात नाहीत जसे आंधळ्यांना जवळचेही दिसत नाही. (२८)
वेद तात्पर्याचे निजखुणे । तुवां पुसिलें मजकारणें ।
तीं वेदाचीं गुह्य निरूपणें । तुजकारणें म्यां निरूपिलीं ॥ ८४ ॥
तीं वेदाचीं गुह्य निरूपणें । तुजकारणें म्यां निरूपिलीं ॥ ८४ ॥
वेदांतील रहस्याचे मर्म काय, म्हणून तूं मला विचारलेंस ; म्हणून त्यांतील गुह्य गोष्टी मी तुला सांगितल्या ८४.
परिसोनि वेदाचे विभाग । उद्धव सुखावला चांग ।
तेणें संतोषें श्रीरंग । संबोखोनि 'अंग' उद्धवासी म्हणे ॥ ८५ ॥
तेणें संतोषें श्रीरंग । संबोखोनि 'अंग' उद्धवासी म्हणे ॥ ८५ ॥
हे वेदांतील विभाग ऐकून उद्धवाला अतिशय आनंद झाला. त्यामुळे श्रीकृष्णाला संतोष होऊन त्यांनी उद्धवाला 'हे अंग' असें प्रेमाने संबोधून म्हटले ८५.
जो मी हृदयामाजिले वस्ती । परमात्मा निकटवर्ती ।
त्या मातें सकाम निणती । कामासक्तीं नाडले ॥ ८६ ॥
त्या मातें सकाम निणती । कामासक्तीं नाडले ॥ ८६ ॥
सकाम असतात ते कामावर आसक्ति ठेवल्यामुळे भ्रमात पडून सर्वांच्या हृदयात वस्ती करून राहणारा जो मी सन्निध असणारा परमात्मा, त्या मला जाणत नाहीत ८६.
तो मी हृदयामाजीं असें । हें एकादेशित्व मज नसे ।
जगदाकारें मीचि भासें । जेवीं कल्लोळविलासें सागरु ॥ ८७ ॥
जगदाकारें मीचि भासें । जेवीं कल्लोळविलासें सागरु ॥ ८७ ॥
मी हृदयांत असतों खरा, पण तेवढ्यानें मी एकदेशी होत नाही. तर समुद्र जसा लाटांच्या रूपाने भासतो, तसा जगदाकाराने मीच भासत आहे ८७.
अलंकार झालेपणें । जेवीं असे निखळ सोनें ।
तेवीं जगदाकारें म्यां श्रीकृष्णें । परिपूर्ण असणें पूर्णत्वें ॥ ८८ ॥
तेवीं जगदाकारें म्यां श्रीकृष्णें । परिपूर्ण असणें पूर्णत्वें ॥ ८८ ॥
अलंकाररूप झाले तरी ते जसें शुद्ध सोनेच असते, त्याप्रमाणे मी श्रीकृष्णही जगाच्या आकाराने परिपूर्णतेनें पूर्णच आहे ८८.
नाम रूप वर्ण विविध । माझेन प्रकाशें जगदुद्बो ध ।
परी नामरूपजातिभेद । मजसी संबंध असेना ॥ ८९ ॥
परी नामरूपजातिभेद । मजसी संबंध असेना ॥ ८९ ॥
नाम, रूप, किंवा अनेक प्रकारचे वर्ण, किंवा हे जग असा जो बोध, तोही माझ्याच ज्ञानप्रकाशाने होत असतो. तरी नामरूप किंवा जातिभेद यांचा माझ्याशी काही संबंध नाही ८९.
आकाश जळीं बुडालें दिसे । परी तें न माखे जळरसें ।
तेवीं मी जगदाकारें असें । जगदादि दोषें अलिप्त ॥ २९० ॥
तेवीं मी जगदाकारें असें । जगदादि दोषें अलिप्त ॥ २९० ॥
आकाश जरी पाण्यात बुडालेले दिसले, तरी ते काही पाण्याच्या ओलेपणाने मिजत नाही. त्याप्रमाणे मीही जगाच्या आकाराने असून जगाच्या दोषापासून अलिप्त असतो २९०.
ऐसा मी विश्वात्मा विश्वंभरु । विश्वमूर्ति विश्वेश्वरु ।
त्या मज नेणती अज्ञान नरु । जे कां शिश्नोदरुपोषक ॥ ९१ ॥
त्या मज नेणती अज्ञान नरु । जे कां शिश्नोदरुपोषक ॥ ९१ ॥
असा मी विश्वात्मा व विश्वंभर, विश्वमूर्ति व विश्वेश्वर, असे असतां शिस्नोदरपरायण असणारे जे अज्ञान लोक ते मला जाणत नाहीत ९१.
ज्यासी आंधारें दाटे गाढें । कां महाकुहरीं जो सांपडे ।
तो कांहीं न देखे पुढें । अवचिता पडे महागर्तीं ॥ ९२ ॥
तो कांहीं न देखे पुढें । अवचिता पडे महागर्तीं ॥ ९२ ॥
ज्याच्या डोळ्यांपुढे गर्द अंधारी येते, किंवा जो भयंकर गुहेमध्ये सांपडतो, त्याला मागचे पुढचे काही दिसत नसल्यामुळे तो अकस्मात् मोठ्या खड्यांत पडतो ९२.
तेवीं अतिमोहममताभ्रांतें । अज्ञाननिद्रा सबाह्य व्याप्तें ।
जवळिल्या न देखोनि मातें । पडिले महागर्ते तमामाजीं ॥ ९३ ॥
जवळिल्या न देखोनि मातें । पडिले महागर्ते तमामाजीं ॥ ९३ ॥
त्याप्रमाणे अत्यंत मोहममतेच्या भ्रांतीने व अज्ञानरूप निद्रेनें अंतर्बाह्य व्याप्त होऊन जवळ असलेल्या मला पहात नाहीत; आणि अज्ञानाच्या विशाळ गर्तेत पडतात ९३.
न कळोनि माझ्या वेदार्थातें । केवळ जीं कां कामासक्तें ।
तीं पावलीं अधःपातातें । जवलिल्या मातें नेणोनि ॥ ९४ ॥
तीं पावलीं अधःपातातें । जवलिल्या मातें नेणोनि ॥ ९४ ॥
माझ्या वेदाचा अर्थ न कळल्यामुळे जे निखालस कामासक्त होतात, ते मी जवळ असतां मला न ओळखून अधःपाताला पावतात ९४.
तो मी जवळी कैसा म्हणसी । तरी सर्वांच्या हृदयदेशीं ।
वसतसें अहर्निशीं । चेतनेसी चेतविता ॥ ९५ ॥
वसतसें अहर्निशीं । चेतनेसी चेतविता ॥ ९५ ॥
तो मी जवळ कसा आहे असे म्हणशील तर ज्ञानाला प्रकाश देणारा असा मी सर्वांच्या हृदयामध्ये रात्रंदिवस राहात असतों ९५.
त्या माझें वेदार्थमत । नेणतीचि कामासक्त ।
तेचिविखीं श्रीकृष्णनाथ । विशदार्थ स्वयें सांगे ॥ ९६ ॥
तेचिविखीं श्रीकृष्णनाथ । विशदार्थ स्वयें सांगे ॥ ९६ ॥
त्या माझ्या वेदाचा खरा अर्थ कामासक्तांना कळत नाही. त्याविषयींच श्रीकृष्ण स्वतः स्पष्टार्थ सांगत आहेत ९६ .
ते मे मतमविज्ञाय परोक्षं विषयात्मकाः ।
हिंसायां यदि रागः स्याद्यज्ञ एव न चोदना ॥ २९ ॥
हिंसायां यदि रागः स्याद्यज्ञ एव न चोदना ॥ २९ ॥
[श्लोक २९] हिंसेची आवड असेल तर फक्त यज्ञासाठीच हिंसा करा, असे सांगून स्वाभाविक हिंसक प्रवृत्तीला जो मी वेदवाणीच्या द्वारा आळा घातला आहे; (२९)
माझ्या वेदाचा अगम्य भावो । न कळोनि गूढ अभिप्रावो ।
तेणें सकामासी उत्साहो । स्वर्गातें पहा हो मानिती सत्य ॥ ९७ ॥
तेणें सकामासी उत्साहो । स्वर्गातें पहा हो मानिती सत्य ॥ ९७ ॥
माझ्या वेदाचा भाव अगम्य आहे. त्यांतील गूढार्थ न समजल्यामुळे सकाम मनुष्य मोठ्या उत्साहाने स्वर्गालाच सत्य मानतात! ९७.
'रोचनार्थ' स्वर्ग बोले वेद । तो प्रगटार्थ मानूनि शुद्ध ।
मग स्वर्गसाधनें विविध । कामलुब्ध आदरती ॥ ९८ ॥
मग स्वर्गसाधनें विविध । कामलुब्ध आदरती ॥ ९८ ॥
केवळ रुचि उत्पन होण्यासाठी वेदाने स्वर्गाचा उल्लेख केलेला आहे, पण तोच त्याचा प्रकट अर्थ खरा मानून कामलुब्ध लोक अनेक प्रकारची स्वर्गादिक साधनें मोठ्या उत्साहानें करूं लागतात ९८.
तेथ यज्ञ हें मिषमात्र जाण । स्वयें करावया मांसभक्षण ।
अविधीं करिती पशुहनन । अतिदृप्त जाण कामार्थीं ॥ ९९ ॥
अविधीं करिती पशुहनन । अतिदृप्त जाण कामार्थीं ॥ ९९ ॥
त्यांत स्वतः मांसभक्षण करण्याकरितां यज्ञ एक निमित्त मात्र करतात. आपली इच्छा पूर्ण होण्याकडेच त्यांची दृढतर प्रवृत्ति असल्यामुळे अविधीनेंच पशूची हत्या करतात ९९.
त्यांसी पैं गा देहांतीं । मारिले पशु मारावया येती ।
हातीं घेऊनि गड्ग काती । सूड घेती यमद्वारीं ॥ ३०० ॥
हातीं घेऊनि गड्ग काती । सूड घेती यमद्वारीं ॥ ३०० ॥
अशांना देहाच्या अंती ते मारलेले पशुच मारावयाला उठतात. हातांत लखलखित तरवारी घेऊन सूड घेण्याकरितां यमाच्या दारांत ते उभे असतात ३००.
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...